आत्मरूप गणेशाचे करुनि स्मरण । सकळ विद्यांचे जे आश्रयस्थान । तेचि वंदू श्रीचरण । श्रीगुरूचे ॥१॥
जयाचे स्मरणें, साक्षात । शब्दसृष्टी अंगी येत । आघवे सारस्वत । जिव्हेसि ये ॥२॥
वक्तृत्व मधुरपणें । अमृता फिके म्हणे । रस सेवक नम्रपणे । अक्षरांसी ॥३॥
गर्भितार्थाचे आगमन । प्रकट करी खूप । हाती येई संपूर्ण । वर्म तत्त्वाचे ॥४॥
श्रीगुरुचे पाय । कवळुनि राही हृदय । तेव्हा एवढा भाग्योदय । होय ज्ञानासी ॥५॥
ते नमस्कारुनी मी सांगे आता । तो पितामहाचा पिता । लक्ष्मीचा भर्ता । ऐसे म्हणू ॥६॥
श्रीभगवान् म्हणाले:
अर्जुना ह्या शरीरास म्हणती क्षेत्र जाणते
जाणे हे क्षेत्र जो त्यास क्षेत्रज्ञ म्हणती तसे ॥१॥
तर पार्था ऐक । देह हे क्षेत्र एक । हे जाणे तया देख । क्षेत्रज्ञ म्हणू ॥७॥
क्षेत्रज्ञ मीचि तो जाण क्षेत्रात सगळ्या वसे
क्षेत्र-क्षेत्रज्ञ भेदास जाणणे ज्ञाने मी म्हणे ॥२॥
तर क्षेत्रज्ञ जो येथ । तो मी जाण निश्चित । जो असे संगोपित । सर्व क्षेत्रांसी ॥८॥
क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाते । जाणणे जे पुरते । ज्ञान ऐसे तयाते । मानू आम्ही ॥९॥
क्षेत्र कोण कसे त्यात विकार कुठले कसे
क्षेत्रज्ञ तो कसा कोण ऐक थोडयात सांगतो ॥३॥
तर क्षेत्र या नावें । शरीर ज्या भावें । म्हटले ते आघवे । सांगू आता ॥१०॥
यासी क्षेत्र का म्हणावे । कैसे कोठे उपजे हे । कोणकोणते विकार पाहे । वाढविती यासी; ॥११॥
हे साडेतीन हात मोजके । केवढे बा कितुके । बरडमाळ की पिके । कोणाचे हे ॥१२॥
इत्यादी संपूर्ण । जे जे याचे गुण । देईं बा अवधान । वर्णू आता ॥१३॥
याचि निर्णयाकारणे । वेदांचे सदा बडबडणे । तर्का याचि स्थानें । तोंडाळ केले ॥१४॥
खल करिता या स्थळीं । षट्दर्शने टेकीस आली । अजुनी नाही मिटली । द्वंद्वे त्यांची ॥१५॥
शास्त्रांची सोयरीक । विचलित यामुळेचि देख । याचेचि मतैक्यास्तव अनेक । माजले वाद जगीं ॥१६॥
तोंडा तोंड न मिळे । बोला बोल न जुळे । सकळ त्या युक्तिबळें । बडबड बाष्कळ ॥१७॥
न जाणे कोणाचे हे क्षेत्र । निर्णयाविषयीं वादस्त । काथ्याकूट घरोघर मात्र । हाचि चाले ॥१८॥
नास्तिकां द्यावया तोंड । वेदांचे गाढे बंड । ते देखोनि अखंड । पाखंडी अन्यचि बडबडे ॥१९॥
म्हणती तुम्ही निर्मूळ । लटिके हे वाग्जाळ । ना म्हणाल तर पोफळ । पैजेचे ठेविले ॥२०॥
पाखंडयात दिगंबर । केस उपटती डोईवर । ते येती ताळ्यावर । वाद करिता ॥२१॥
मृत्यूचे सामर्थ्य अपरिमित । हे देहक्षेत्र जाईल व्यर्थ । यामुळे योगी सरसावत । पुढे आले ॥२२॥
मृत्यूसी भेदरले । तयांनी अरण्य धरिले । यमनियमांचे केले । अभ्यास पुरे ॥२३॥
याचि क्षेत्राचे विचारें । राज्य त्यजिले शंकरें । देहक्षेत्राचे अडसरें । स्मशानी वास केला ॥२४॥
क्षेत्रनिर्णयाचे पैजेवरि महेशा । पांघरणे आले दाहीदिशा । लाचखाऊ म्हणुनि कोळसा । मदनाचा केला ॥२५॥
ब्रह्मदेव सत्यलोकनाथ । तया चार वदने आली बळार्थ । तरि तो नाभिकमलस्थ । क्षेत्र जाणीचिना ॥२६॥
ऋषींनी भिन्न मंत्रात गाइले हे परोपरी
वर्णिले ब्रह्मवाक्यात सप्रमाण सुनिश्चित ॥४॥
जीववादी म्हणती हे स्थळ । जीवाचेचि समूळ । मग प्राण हे कुळ । तयाचे येथ ॥२७॥
राबती या प्राणाचे घरीं । अपानादि भाऊ चारी । आणि मन हा कुळवाडी करी । देखरेख ॥२८॥
तया दशइंद्रियांची बैलजोडी । म्हणे दिवस-रात्र थोडी । विषयक्षेत्रीं काढी । कष्ट भले ॥२९॥
मग विहित कर्माची वाफ चुकवित । अन्यायाचे बीज पेरित । आणि कुकर्माचे खत । घाली जर: ॥३०॥
तर तयाचिसारिखे । अनन्वित पाप पिके । मग कोटिजन्म दुखे । भोगी जीव ॥३१॥
शास्त्रविधीची वाफ साधील । सत्कर्माचे बीज पेरील । तर शतजन्म मोजील । सुखाचे केवळ ॥३२॥
प्रकृतिवादी म्हणती, नव्हे । हे जीवाचेचि न म्हणावे । आम्हा पुसा आघवे । क्षेत्राचे या ॥३३॥
अहो जीव हा उपरा खरोखर । वाटेने जाणारा वस्तीकर । आणि प्राण हा बलुतेदार । जागे रात्रंदिन ॥३४॥
अनादि जी प्रकृती । सांख्य जियेसी गाती । क्षेत्र ही वृत्ती । तियेचीच जाणा ॥३५॥
हिजसीचि आघवा । असे घरमेळावा । म्हणोनि शेताच्या वहिवाटी या । घरीचि वाही ॥३६॥
या वहिवाटींचे व्यवहारी । जे मूळ तिघे हिचे बरोबरी । ते गुण हिचेचि उदरीं । जन्मले असती ॥३७॥
पेरणी करी रजोगुण । तितुकी सत्त्वगुण करी राखण । मग एकला तमोगुण । कापणी करी ॥३८॥
महततत्त्वाचे खळे रचुनी । काळपोळ करी मळणी । तोंचि अव्यक्ताची जाय होउनी । सांज भली ॥३९॥
संकल्पवाद्यांनी तेव्हा । या बोलें खंत वाद्वनिया । म्हटले मतिवंतांनी त्या । ज्ञान अर्वाचीन हे ॥४०॥
अहो परब्रह्मरूपीं आता । काय प्रकृतीची वार्ता? । सांगतो क्षेत्रवृत्तांता । उगेचि ऐका ॥४१॥
शून्यब्रह्माचे शेजघरी । सुलीन अवस्थेचे शय्येवरी । निद्रा केली, अवधारी । बलिष्ठ संकल्पें ॥४२॥
तो अकस्मात जागा झाला । उद्यमीं सदैव भला । म्हणोनिया ठेवा लाभला । इच्छावशे ॥४३॥
निर्गुण ब्रह्माची वाडी । होती त्रिभुवनाएवढीं । ती तयाचे प्रयत्नें केवढी । रूपी आली ॥४४॥
पंचमहाभूते करुनि एकत्रित । जारज, स्वेदज, अंडज, उदभिज्ज, तेथ । हे चार घाट बांधुनि प्रशस्त । महाभूतांचे ॥४५॥
यावरी आधी सिद्ध । केले तयाने बद्ध । आकार अनेकविध । प्राणिमात्रांचे ॥४६॥
कर्म-अकर्मांचे मांडुनि धोंडे । बांध घातले दोहीकडे । आणि नापिक बरडराने चहुकडे । सुपीक केली ॥४७॥
तेथ करण्या येरझारा । जन्ममृत्यूचा फेरा । संकल्पें घडविले भुयारां । जी कधी न मिटती ॥४८॥
मग अहंकारासह ऐक्य करोनी । आयुष्यभरी राबोनी । करविले बुद्धीकडुनी । व्यवहार चराचराचे ॥४९॥
यापरी निराळी । वाढे संकल्पाची डहाळी । म्हणोनि तो मुळीं । प्रपंचवृक्षाचिया ॥५०॥
संकल्पवाद्यांची मुक्ताफळे । ऐकोनि, स्वभाववादी तनतणले । सरसावुनी म्हणाले । भले विचारवंत तुम्ही ॥५१॥
परब्रह्माचे गावीं । संकल्पाची शेज देखावी । तर का न मानावी । सांख्यांची प्रकृति तेथ? ॥५२॥
परि तुमचे योग्य नव्हे । तुम्ही या नादी न लागावे । आताचि हे आघवे । सांगतो आम्ही ॥५३॥
तर आकार्शी कोणी । केली मेघांची भरणी? । अंतरिक्षीं आणि । धरिली तारांगणे? ॥५४॥
गगनाचे मांडवा । कोणी उभारिले केधवा? । वारा हिंडत असावा । हे कोणाचे मत? ॥५५॥
शरीरीं केस कोण पेरी? । कोण समुद्र भरी? । पर्जन्याच्या करी । धारा कोण? ॥५६॥
तैसे क्षेत्र असे स्वभावें हे । ही वृत्ती कोणाची नव्हे । जो येथ खपे तया लाहे । इतरां न भेटे ॥५७॥
तेव्हा काळवादी क्षोभले । हे जर साच असले । तर भोगावे एके काळे । कैसे हे शेत? ॥५८॥
हे क्षेत्र म्हणजे पुरी । संतप्त मृत्युसिंहाची दरी । व्यर्थ वाग्जाळा परी । पुरे पडे का कोणी? ॥५९॥
तर या काळाचा मार । देखताती अनिवार । परि स्वमतांवरी भर । देती अभिमानी ॥६०॥
अवचित महाकल्पापार । कवेत घेउनि ब्रहम्याचे घर । तेथ सत्यलोकगजावर । प्रहार करी ॥६१॥
लोकपाल नित्य नवे । दिग्गजांचे मेळावे । शिरुनिज नष्ट करी आघवे । स्वर्गरूप अरण्यीं ॥६२॥
अन्य जीवरूप हरिणे । याचे अंगीचे वार्याने । भ्रमती निर्जीव शरीराने । जन्ममृत्यूचे गर्तेत ॥६३॥
न्याहाळी बा केवढा । पसरलासे चवडा । काळसिंहें पकडिता एवढा । विश्वाकार गज ॥६४॥
म्हणोनि काळाची सत्ता । हाचि बोल तत्त्वता । ऐसे वाद पांडुसुता । या क्षेत्रासाठी ॥६५॥
भवति न भवति ऋषींनी । बहुत केली नैमिषारण्यीं । या विषयीं पुराणीं । आधार असे ॥६६॥
अनुष्टुभादि छंदातून । क्षेत्रचर्चा वैविध्यपूर्ण । आधारा ते ग्रंथ अजून । आवेशें घेती ॥६७॥
वेदातील बृहत्सामस्तोत्र । आणिकही ग्रंथ पवित्र । परि तयांहि हे क्षेत्र । नच आकळे ॥६८॥
अन्यही कोणी बहुत । महाकवींनी युक्तिमंत । या क्षेत्रीनर्णयाप्रत । मती वेचिल्या ॥६९॥
परि एवढे हे ऐसे विस्तृत । की अमक्याचेचि असे निश्चित । हे कोणाही आकळलेसे येथ । होईचिना ॥७०॥
आता यावरी हे । क्षेत्र जैसे आहे । तुज सांगू, पाहे । साद्यंत गा ॥७१॥
पंचभूते अहंकार बुद्धि अव्यक्त मूळ जे
इंद्रिये अकरा त्यांस खेचिते अर्थपंचक ॥५॥
इच्छा द्वेष सुखे दुःखे धृति संघात चेतना
विकारयुक्त हे क्षेत्र थोडयात तुज बोलिलो ॥६॥
तर महाभूतपंचक । आणि अहंकार एक । बुद्धि, अव्यक्त, प्रकृति,-दशक । इंदियांचे ॥७२॥
आणिक मन एक, । विषयांचे दशक, । द्वेष, सुख, दुःख । मेळ, इच्छा; ॥७३॥
आणि धैर्य, चेतना, । ऐसे क्षेत्राचे गुणां । कथिले तुज सुजाणा । आघवेचि ॥७४॥
आता कोणती महाभूते । इंद्रिये किती, विषय कोणते । वेगळालेपणे अवघे ते । एकेक सांगू ॥७५॥
तर पृथ्वी, आप, तेज, । वायू, आकाश, ही तूज । सांगितली समज । भूते पाच ॥७६॥
जागृतावस्थेत । स्वप्न जैसे लपत । अथवा चंद्र असे गुप्त । अवसेसी; ॥७७॥
सान बालकात । तारुण्य राही गुप्त । कोवळ्या कळीत । सुगंध जैसा; ॥७८॥
किंबहुना किरीटी, । अग्नी जैसा काष्ठीं । तैसा प्रकृतीपोटीं । गुप्त जो असे ॥७९॥
जैसा की हाडीज्वर । अपथ्याचेचि निमित्तावर । मग अपथ्य होता आत बाहेर । व्यापुनी टाकी; ॥८०॥
तैसी पंचमहाभूतांची गाठ पडे । आणि देहाकार घडे । तेव्हा नाचवी चहूकडे । तो अहंकार गा ॥८१॥
अहंकाराचे नवल ऐक पुढे । विशेष न वळे अज्ञान्यांकडे । सज्ञान्यांचे धरी नरडे । संकटी नाचवी ॥८२॥
अता बुद्धि जियेसि म्हणावे । तिज ऐशा चिन्ही जाणावे । म्हटले श्रीकृष्ण देवें । ऐक सांगतो ॥८३॥
काम जेव्हा बळावे । तेव्हा इंद्रिये वृत्तीसवे । विषयांचे मेळावे । जिंकुनि घेती; ॥८४॥
सुखदुःखाची लयलूट होत । जीव मोजणी करीत । जी करी निवड तेथ । दोहोतिल उचिताची; ॥८५॥
हे सुख, हे दुःख । हे पाप देख । की हे मलिन, हे चोख । ऐसे जी निवडी; ॥८६॥
जी अधम-उत्तम ओळखे । सान-थोर ऐसे देखे । जिचे दिठीने पारखे । विषयांसी जीव; ॥८७॥
जी तेजतत्त्वाची आदि, पाही । सत्त्वगुणाची वृद्धीही । आणि वस्तीसी येई । जीव-आत्म्यांचे मध्यभागी ॥८८॥
अर्जुना, ती गा जाण । बुद्धि तू संपूर्ण । आता ऐक ओळखीची खूण । अव्यक्ताची ॥८९॥
सांख्यांचिया सिद्धांतीं । जी प्रकृति हे महामती । तीचि येथ जाणती । अव्यक्त गा; ॥९०॥
आणि सांख्ययोगमतें । प्रकृति समजाविली तूते । परा-अपरा दोहीपरी येथे । विवेचिली; ॥९१॥
येथ दुजी जी जीवदशा । तिचेचि नाव प्रकृति, वीरेशा । येथ अव्यक्त ऐसा । पर्याय हा ॥९२॥
तर सरता रजनी । तारे लोपती गगनीं । वा थांबती अस्तमानी । प्राणिमात्रांचे व्यवहार ॥९३॥
नातरि देह गेल्यावरी । देहाहिक उपाथी सारी । लपतसे उदरी । केल्या कर्माचिया ॥९४॥
अथवा बीजरूपात । सामावे तरू समस्त । वस्त्रपण तंतुदशेत । राहतसे; ॥९५॥
तैसे स्थूळ धर्म सोडून । महाभूते प्राणिगण । लय पावती जाण । लीन होउनि जेथ ॥९६॥
अर्जुना तयानावें । अव्यक्त हे जाणावे । आता ऐक आघवे । इंद्रियभेद ॥९७॥
तर नयन श्रवण । त्वचा रसना घ्राण । ही ज्ञानेंद्रिये जाण । पाच असती ॥९८॥
या छत्तीस तत्त्वांच्या मेळ्यात । सुखदुःखाची वाटाघाट नित । एक बुद्धीचि करीत । पंचेंद्रियांद्वारे ॥९९॥
मग वाचा आणि कर । चरण आणि अधोद्वार । जनन हे प्रकार । इंद्रियांचे पाच आणिक ॥१००॥
कर्मेंद्रिये म्हणती । ती ही जाणती । ऐक कैवल्यपती । सांगत असे ॥१०१॥
प्राणाची सहचरीज । क्रियाशक्ती जी शरीरीं । तिचे जाणे जेणे द्वारीं । याचि असे ॥१०२॥
ऐसे दहा इंद्रियांचे करणे । सांगितले, देव म्हणे । परिस आता नीटपणे । मन ते कैसे ॥१०३॥
जे बुद्धि आणि इंद्रिये । या दोहोंचे मध्ये । रजोगुणाचे आश्रयें । चंचलपणे असे ॥१०४॥
आकाशात निळाई । की लाटा मृगजळाठायी । तैसे व्यर्थ भास, पाही । आभासे गा ॥१०५॥
स्त्रीपुरुषबीजमीलनात । पंचभूतात्मक आकार घडत । होती दहा प्रकार तेथ । एका वायुतत्त्वाचे ॥१०६॥
मग ते भाग दाही । आपुलाल्या धर्मबळें देही । वस्ती त्या त्या ठायी । करितात ॥१०७॥
तेथ चांचल्या निखळ । उरले एकले केवळ । म्हणोनि रजोगुणाचे बळ । धरिले तयें ॥१०८॥
ते बुद्धीचे बाहेरी । अहंकाराचे उरावरी । ऐसे मधल्या स्थानावरी । बळावले ॥१०९॥
त्या चांचल्या नाव मन । एरवी कल्पनाचि मूर्त जाण । तयायोगे ब्रह्मासी पावन । जीवदशा घेणे आले ॥११०॥
जे मूळ प्रवृत्तीचे । कामासी बळ जयाचे । जे अखंड डिवचे । अहंकारासी; ॥१११॥
जे इच्छेसी वाढवी । आशेसी चढवी । जे साहाय्य पुरवी । भयासी गा; ॥११२॥
द्वैत जेथ उपजे । अविद्या जेथ माजे । इंद्रियां लोटी जे । विषयांमध्ये; ॥११३॥
संकल्पें घडवी सृष्टीची घडी । सवेचि विकल्पें मोडी । मनोरथांच्या उतरंडी । उतरी-रची; ॥११४॥
कोठार जे भ्रांतीचे । अंतरंग वायुतत्त्वाचे । झाकले बुद्धीचे । द्वार जयाने; ॥११५॥
तर ते गा मन । हा बोल निश्चयें जाण । आता अन्य विषय कवण । ती नावे ऐक ॥११६॥
तर स्पर्श आणि शब्द । रूप रस गंध । हे विषय पंचविध । ज्ञानेंद्रियांचे ॥११७॥
याचि पाच द्वारातून । बाहेरी धावे ज्ञान । जैसे की उगवता तृणा । उधळती गुरे ॥११८॥
उच्चारणे स्वर, व्यंजन, विसर्ग, । करणे स्वीकार, त्याग । तैसे चालणे आणि उत्सर्ग । मलमूत्रांचा ॥११९॥
पाच हे कर्मेंद्रियांचे । विषय गा साचे । बांधुनि मचाण तयांचे । क्रिया धावे ॥१२०॥
ऐसे हे दाही । विषय गा या देही । आता इच्छा काय तेही । कथिले जाईल ॥१२१॥
तर भोगिले स्मरते । ऐकताचि कान झाकते । ऐसियावरी चेतते । जी गा वृत्ती; ॥१२२॥
इंद्रियां विषय भेटे । तोंचि जी वेगें उठे । कामाचे बाहुटे । धरूनिया ॥१२३॥
ऐसी जी उद्भवे । तेव्हा मन स्वैर धावे । इंद्रियांनी जेथ न शिरावे । तेथचि तोंडे घालिती; ॥१२४॥
ज्या वृत्तींचे आवडीस्तव । बुद्धी वेडी होय । गोड जियेसी विषय । ती गा इच्छा ॥१२५॥
इंद्रिये लाख इच्छिती । परि ती आमिषे तया न मिळती । तेथ जे विकार बळावती । तोचि द्वेष ॥१२६॥
आता यावरी सुख । ते यापरी देख । जीवा विसरवी जे अशेष । अन्य सकळ ॥१२७॥
जे मनें वाचा कायें । आपुली आण वाहे । आणि देहभाग विसरावे । ऐसेचि करी ॥१२८॥
जे जन्मा येई । तेव्हा प्राण शांत होई । सात्त्विक वृत्ती वाढत राही । दुपटीने की ॥१२९॥
अवघ्याचि इंद्रियवृत्तींसी जाण । हृदयाचे एकांती आणून । तेथ तयांसी थोपटून । गाढ निद्रा जे आणि ॥१३०॥
किंबहुना कोणत्याही ठायी । जीवासी आत्मा भेटे, पाही । तेथ जे होई । तया नाव सुख ॥१३१॥
आणि ऐसी ही स्थिती । जर न मिळविती । तर जगणे हेचि अती । दुःख जाण ॥१३२॥
मनोरथासंगे ते न लाहे । एरवी स्वतःसिद्ध आहे । मनाचे स्थैर्य आणि चांचल्य हे । सुख-दुःखासी कारण ॥१३३॥
अलिप्त साक्षीभूत आता । देहीं जी चैतन्यसत्ता । तिचे नाव पांडुसुता । चेतना येथ ॥१३४॥
जी नखापासुनि केसापावत । उभी जागे शरीरात । पालटेना तिन्ही अवस्थात । जागृति, स्वप्न, सुषुप्ती या ॥१३५॥
मन, बुद्धि आदि आघवीं । यांसि जिचेयोगे टवटवी । प्रकृतीवनी माधवी । सदैव जी ॥१३६॥
जड, चेतन पदार्थीं । अगा संचरे ती । अर्जुना, तिज म्हणती । चेतना ऐसे ॥१३७॥
राजा सैन्यदळ न जाणे देखा । तयाची आज्ञाचि जिंके परचक्रा । जैसी पूर्णचंद्रे एका । सागरा ये भरती ॥१३८॥
चुंबकाचे सान्निध्यें केवळ । लोह करी हालचाल । वा सूर्यं उगवता सकळ । व्यवहार होती ॥१३९॥
अगा अंगावरि पाजज्याविण । करी पिल्लांचे पोषण । केवळ दिठीने न्याहाळून । कासवी जैसी ॥१४०॥
पार्था गा, तयापरी । आत्म्याची संगत शरीरीं । जडासी करी । सजीव गा ॥१४१॥
मग तिजसी चेतना । म्हणती गा अर्जुना, । आता धृतिविवेचना । परिसावे ॥१४२॥
पंचमहाभूतांचे परस्पर । मूळ स्वभावे उघड वैर । काय पृथ्वीसी नीर । न नाशे? ॥१४३॥
नीरासी आटवी तेज । तेजाची वायूशी झुंज । आणि गगन तर सहज । वायू भक्षी ॥१४४॥
तैसेचि कोणेही वेळे । आपण कशासीही न मिळे । प्रत्येकात शिरोनि वेगळे । आकाश हे ॥१४५॥
ही पाच भूते ऐसी । नच साहती परस्परांसी । परि तीही ऐक्यासी । देहीं येती ॥१४६॥
द्वंद्वाची वादावादी पुरती । सोडुनी एकी करिती । एकमेकां पोषिती । निजगुणें, गा ॥१४७॥
न होयसे मित्रत्व । ज्या धैर्यायोगे होय । ठेवी मी तया नाव । धृती गा ॥१४८॥
आणि जीवासह पांडवा । हा छत्तीसाचा मेळावा । तो हा येथ जाणावा । समुदाय गा ॥१४९॥
ऐसे छत्तीसही भेद । केले तुज विशद । हे सर्व मिळोनि प्रसिद्ध । ते क्षेत्र गा ॥१५०॥
रथाचे सर्व भागांचा मेळावा । तया रथा म्हणती पांडवा । वा अधऊर्ध्व आदि अवयवां । नाव देह; ॥१५१॥
हत्ती-घोडयांचे समुदया । सैन्य म्हणती रणीं या । अथवा शब्दसमूहा । वाक्य म्हणती; ॥१५२॥
जलधरांचा मेळावा । गणिला जाईल आभाळ वा । नाना लोक वसत, तया । नाव जग; ॥१५३॥
अथवा तेल, वात, अग्नी । मिळोनि एके स्थानी । धरिला जाई जनी । तो दीप होय; ॥१५४॥
तैसी छत्तीसही ही तत्त्वे । मिळती जेथ एकत्वें । तेथ समूहपरत्वें । क्षेत्र म्हणती ॥१५५॥
लागवडीसी आणिल्या शरीरें एके । पाप पुण्य येथे पिके । म्हणोनि आम्ही कौतुके । क्षेत्र म्हणतो ॥१५६॥
आनि कित्येकांचे मते । देह म्हणती याते । परि हे असो, अनंत तेथे । नावे यासी ॥१५७॥
परब्रह्माचे ऐलतटी । आणि स्थावरजंगमाचे शेवटी : ज्या काही होत जात गोष्टी । ते क्षेत्रचि हे ॥१५८॥
आणि सुर-नर-सर्प-योनीत । ते विभागले जात । गुण-कर्माचे संगतीत । पडल्यायोगे ॥१५९॥
हेचि गुणविवेचन । पुढे होईल जाण । प्रस्तुत आता तुज ज्ञान । स्पष्ट दावू ॥१६०॥
क्षेत्र तर सविस्तर । कथिले सविकार । आता मोक्षदाय़ी, उदार । ज्ञान ऐक ॥१६१॥
ज्या ज्ञानाची धरोनि हांव । योगी करिती मूर्ध्निआकाशाचा लय । स्वर्गाचे आडमार्गींचा ठाव । ओलांडुनी ॥१६२॥
न करिती सिद्धीची चाड । न धरिती ऋद्धीची भीड । योगाऐसे द्वाड । साहती ते ॥१६३॥
तपोदुर्ग ओलांडिती । कोटियज्ञ ओवाळिती । उलथूनि टाकिती । कर्मवल्ली ॥१६४॥
भजनमार्गीं किती । उघडया अंगी धावती । कोणी भुयारीं शिरती । सुषुम्नेचिया ॥१६५॥
ऐसे ज्या ज्ञानी । मुनीश्वर तहानुनी । वेदतरूचे पानोपानी । हिंडताती; ॥१६६॥
ते ज्ञान मिळेल गुरुभक्तीने या । ऐशा बुद्धीने धनंजया । जन्म ओवाळुनिया । टाकिती जे ॥१६७॥
ज्या ज्ञानाचे प्रवेशें । अविद्या नाशे । जीव-आत्म्याचे घडतसे । ऐक्य तेथ; ॥१६८॥
जे इंद्रियांची द्वारे कोंडी । प्रवृत्तीचे पाय मोडी । जे दैन्यचि फेडी । मानसाचे; ॥१६९॥
द्वैताचा दुष्काळ पडे । समत्वाचा सुकाळ घडे । ज्या ज्ञानप्राप्तियोगे जोडे । ऐसे सकळ; ॥१७०॥
मदाचा ठावचि पुसी । जे महामोहाते ग्रासी । न दे आपपर भाषेसी । कोठेही उरू; ॥१७१॥
जे संसारा उन्मळी । संकल्पपंका प्रक्षाळी । अनावरा वेटाळी । परब्रह्म जे: ॥१७२॥
जयाचे उजजळें । उघडती बुद्धीचे डोळे । जीव दोंदावरि लोळे । आनंदाचिया; ॥१७३॥
ऐसे जे ज्ञान । पावित्र्याचे एक निधान । जेथ विटाळले मन । शुद्ध होई ॥१७४॥
‘मी जीव’- ऐशी भ्रमात । आत्म्या जी क्षयव्याधी लागत । ती जयाचे सान्निध्यात । नष्ट होई; ॥१७५॥
जे निरुपिण्याऐसे नाही । तरी निरुपितसे पाही । डोळ्यांनी देखावे ऐसे न काही । ते बुद्धीने जाणावे ॥१७६॥
मग तेचि या शरीरी । आपुला प्रभाव करी । तेव्हा इंद्रियांचे व्यवहारी । डोळ्यांसीही दिसे ॥१७७॥
वसंताचे येणे । कळे झाडांचे साजरेपणे । तैसे ज्ञानियांचे करणे । सांगे तयांचे ज्ञान ॥१७८॥
वृक्षांसी भूमीखाली । जळ सापडे मुळीं । ते शाखीं फुलीं फळीं । बाहेरी दिसे; ॥१७९॥
अथवा भूमीचे मार्दव । सांगे कोंभाची लवलव । वा नाना आचारगौरव । कुलवंताची थोरवी; ॥१८०॥
अथवा आदरातिथ्यातुनी । जैसा सुस्नेह ये कळुनी । वा दर्शनाचे समाधानी । कळे पुण्यपुरुष; ॥१८१॥
सोपटीं कापूर जाहला । परिमळें जाणो आला । वा काचपात्रीं दीप ठेविला । बाहेरी फांके ॥१८२॥
तैसी हृदयीचे ज्ञानें । जी देहीं उमटती चिन्हे । ती सांगतो अवधानें । नीट ऐक आता ॥१८३॥
नम्रता दंभशून्यत्व अहिंसा ऋजुता क्षमा
पावित्र्य गुरुशुश्रूषा स्थिरता आत्मसंयम ॥७॥
कोणत्याही गोष्टीत कोणाचे । कोणाशीही तुलना न रुचे । वाटे थोरपणाचे । ओझे जया ॥१८४॥
असलेले गुण वानिता । मान्यवर म्हणोनि मानिता । अथवा योग्यतेचे येता । रूप अंगा; ॥१८५॥
कासावीस होई कैसा । पारध्याने वेढिल्या मृगाऐसा । की पोहता भोवर्यात जैसा । सापडला ॥१८६॥
पार्थां ऐसे हे एवढे । सन्मानाचे जया साकडे । थोरपण अंगाकडे । येवोचि न दे ॥१८७॥
पूज्यता डोळ्यांनी न देखावी । स्वकीर्ती कानी न ऐकावी । हा अमका ऐसी न व्हावी । आठवणही लोकां; ॥१८८॥
तेथ सत्काराच्या कशास गोष्टी । आदराच्या कासया भेटी । मरणप्राय वेदनें हो कष्टी । कोणी नमस्कारिता ॥१८९॥
बृहस्पतीसी तुल्य । सर्वज्ञता जरि होय । तरि थोरवीचे भयें की काय । वेड पांघरें ॥१९०॥
चातुर्य लपवी । महत्त्व हरवी । पिसेपण मिरवी । आवडोनी ॥१९१॥
लौकिकाचा उद्वेग । शास्त्रांचा उबग । उगेपणावरि मग । असे भर ॥१९२॥
जगाने अवज्ञाचि करावी । आप्तांनी संगत न धरावी । ऐसी तयाचे जीवीं । इच्छा बहु ॥१९३॥
नम्रपण बाणवावे । अंगी सानपण भूषवावे । इतुकेचि तया ठावे । बहुतकरूनी ॥१९४॥
हा जिता आहे की नव्हे । लोक कल्पिती येणे भावें । तैसे जिणे व्हावे । ही आस तयाची ॥१९५॥
पल्याडचा तो चाले की नाही । की वार्यावरि जात राही । जनीं ऐसा भ्रम होई । तैसे व्हावे ॥१९६॥
माझे असतेपण जावो । नाव रूप हरवो । माझे भय न शिवो । प्राणिमात्रां ॥१९७॥
नवस करित ऐसे । नित्य एकांतीं जातसे । नावेंचि जो जगतसे । विजनवासाचे ॥१९८॥
वायूशी मैत्र जडे । गगनाशी बोलणे आवडे । जीवेप्राणें झाडे । लाडकी जया ॥१९९॥
किंबहुना ऐसी ऐसी । चिन्हे जयाठायी देखसी । जाण तया ज्ञानासी । एकशेज जाहली ॥२००॥
अगा, अमानित्व जे साधकात । ते जाणावे यानिमित्त । आता अदंभाचे ओळखीसी येथ । रहस्य सांगू ॥२०१॥
तर ऐसे हे अदंभत्व । जैसे लोभ्याचे मन होय । जीव जावो, न बोले ठेव । ठेविली कोठे; ॥२०२॥
तयापरी किरीटी । पडताही प्राणसंकटीं । केले पुण्यकर्म न प्रकटी । आपुल्या वाचें ॥२०३॥
खोडयाळ गाईसी आला पान्हा । ती जैसी चोरी अर्जुना । अथवा पण्यांगना । लपवी उतारवय; ॥२०४॥
धनाढय सापडे अरण्यां । श्रीमंती आपुली दडवी । अथवा कुलवधू लपवी । वयवांत; ॥२०५॥
अथवा शेतकरी आपुले । आच्छादी बीज पेरिले । तैसे तो झाकी, निपजले- । दान-पुण्य ॥२०६॥
फसव्या वेषें लोकां न चकवीत । लोकांभवती रुंजी न घालित । आपुली धर्मकृत्ये न बांधित । वाचाध्वजी ॥२०७॥
परोपकार न बोले । न मिरवी अभ्यासिले । न विके पुण्य जोडिले । कीर्तीसाठी ॥२०८॥
शरीरभोगासंगत । पाहता कृपण गमत । परि दानधर्मीं थोडे-बहुत । न म्हणे ॥२०९॥
घरी दिसे ओढाओढ । देह पाहावा तर रोड । परि दानीं करी चढाओढ । कल्पतरूशी ॥२१०॥
किंबहुना स्वधर्मीं थोर । योग्य अवसरीं उदार । आत्मचर्चेत चतुर । एरवी वेडा ॥२११॥
केळीचे सोपटे । हलके पोकळ वाटे । परि फळोनिया गोमटे । रसाळ जैसे ॥२१२॥
मेघांचे अंग तरल । दिसे वार्याने जाईल । परि वर्षती नवल । घनदाट ते ॥२१३॥
पूर्णतेचे दृष्टीने पाही । इच्छा तृप्त होई । लौकिकदृष्टाने तयाठायी । वानवाचि सकळ ॥२१४॥
हे असो, चिन्हांचा या । उत्कर्ष जयाचे ठाया । जाण ज्ञान तया । हता आले ॥२१५॥
अगा अदंभपण । ते हे जाण । आता ऐक खूण । अहिंसेची ॥२१६॥
तर अहिंसा बहुतपरी । बोलिली असे, अवधारी । आपापल्या मतांतरी । निरूपिता ॥२१७॥
परि ती ऐसी देखा । वृक्षाचिया खांडूनि शाखा । त्या वृक्षाचेचि बुडुखा । कुंपण करावे ॥२१८॥
बाहू तोडोनि विकावे । मग भूकपीडेसी शमवावे । वा देऊळ मोडोनि करावे । आवार देवाचे ॥२१९॥
ऐसी हिंसाचि करुनि, अहिंसा- । निपजवावी, हा ऐसा । पहा पूर्वमीमांसा । निर्णय करी ॥२२०॥
अवर्षणाचे उपद्रवें । गांजले विश्व आघवे । म्हणोनि पर्जन्येष्टी करावे । नाना यज्ञ ॥२२१॥
तर त्या यज्ञांचिये बुडी । पशुहिंसा रोकडी । मग अहिंसेची थडी । कैसी दिसेल? ॥२२२॥
पेरली नुसती हिंसा । तेथ उगवेल काय अहिंसा? । परि नवल या धाडसा । याज्ञिकांच्या ॥२२३॥
आणि आयुर्वेदहि, पांडवा, । याचि पंथाचा आघवा । की जीवाकारणे करावा । जीवघात ॥२२४॥
नाना रोगीं पोळली । लोळती भूतमात्रें देखिली । ती हिंसा निवाराया केली । औषधचिकित्सा ॥२२५॥
त्या औषधचिकित्सेत प्रथम काही । वृक्षांचे कंद खणिले पाही । काही उपटिले मुळासकटही । सपर्ण ते ॥२२६॥
काही झाडे आडवी पाडिली । काहींची साल काढिली । काही गाभे काढुनि उकडिली । क्षारपुटे देउनी ॥२२७॥
अजातशत्रू तरुवरा । सर्वांगी पाडिल्या चिरा । ऐसे जीव घेउनि धनुर्धरा । कोरडे केले ॥२२८॥
लावुनि प्राण्यांसीही हात । काढिले तयांचे पित्त । मग रक्षिले, जे होते शिणत । आणित जीव ॥२२९॥
अहो वसती घरे मोडुनी । केले देऊळ देव्हारे आणि । व्यवहारी लोकां फसवुनी । अन्नछत्रे घातली ॥२३०॥
मस्तका पांघरविले । आणि तळीं उघडे पाडिले । घर मोडोनि घातले । मांडव पुढे ॥२३१॥
अथवा पांघरुणे । जाळूनि जैसे शेकणे । वा हत्तींचे आंग धुणे । तात्काळ उडवुनि घे माती ॥२३२॥
बैल विकुनि केला गोठा । पिंजरा बांधिला उडवुनि पोपटा । ही करणी की चेष्टा । की केवळ हसावे? ॥२३३॥
कोणी धर्ममार्ग म्हणुनी । गाळू लागले पाणी । ते गाळण्याचे दडपणीं । जीव मेले ॥२३४॥
कोणी न शिजविता खाती धान्य । तयां या हिंसेचे भय । परि खाता प्राण कासाविस होय । हीचि हिंसा ॥२३५॥
ऐसी हिंसाचि होय अहिंसा । कर्मकांडीं हा ऐसा । सिद्धांत हे सुमनसा । ओळख तू ॥२३६॥
अगा, अहिंसेचे नावा । आम्ही प्रथम काढिले जेव्हा । ही मते कथिण्या । स्फूर्तीसी सुटली हाव ॥२३७॥
तर कैसे यांते गाळावे । म्हणोनि पडले बोलावे । तेवीचि तुवा जाणावे । ऐसा आमुचा भाव ॥२३८॥
पार्था गा, बहुतकरुनी । अहिंसेतचि हिंसेच्या कथा दडुनी । एरवी का आडरानीं । धावे कोणी? ॥२३९॥
आणि स्वमत करुनि घेण्या मान्य । मतमतांतरांचा अन्य अन्य । लागे करावा निर्णय । धनुर्धरा ॥२४०॥
ऐसी ही अवधारी । निरूपिण्याची परी । आता ऐक यावरी । मुख्य जे गा; ॥२४१॥
ते आमुचे मत कथिले जाईल । अहिंसेचे रूप स्पष्ट होईल । जी चित्तीं प्रकटता आतील । ज्ञान दिसे ॥२४२॥
अहिंसा अंगी वसे । हे आचरणावरुनि दिसे । कसोटी सांगे जैसे । कस सोन्याचा ॥२४३॥
तैसे ज्ञान मनाते भेटे । तत्क्षणी अहिंसेचे चित्र उमटे । हे घडे कैसे नवल मोठे । ऐक आता अर्जुना ॥२४४॥
तर तरंग न विस्कटता । लहरी पायाने न फोडिता । साचुल न मोडता । पाण्याचा गा; ॥२४५॥
वेगें आणि जपुनसा । दिठी ठेवुनि आमिषा । जळीं बगळा जैसा । पाऊल घाली ॥२४६॥
की कमळावरी भ्रमर । पाय ठेविती हळुवार । कुस्करतील केसर । या शंकेने, गा ॥२४७॥
तैसे कणाकणांत गुंतले । जाणुनी जीव सानुले । करुणेमाजी पाउले । लपवुनी चाले ॥२४८॥
जाई ती वाट कृपेची करीत । पाही ती दिशा स्नेहें भरीत । जीवातळी अंथरीत । आपुला जीव ॥२४९॥
अर्जुना, ऐसिये सदयपणे । जपुनि तयाचे चालणे । तया शब्दांनी काय वानणे । पुरे न पडे ॥२५०॥
अगा, मायेने मांजरी । पिलासि तोंडाने धरी । दाताच्या कण्या तयांवरी । न रुतविता जैसी; ॥२५१॥
अथवा मायेने आई । लेकराची वाट पाही । तिची दृष्टी होई । हळुवार जैसी; ॥२५२॥
कमळा डोलवीत वा । ललकेचि वारा यावा । तो सुखकर व्हावा । डोळ्यांसी जैसा; ॥२५३॥
तैसेचि मार्दवें पाय । भूमीवरी ठेवित जाय । ते लागती तेथ होय । जजां सुख ॥२५४॥
ऐसे हळुवार चालता । कृमिकीटक, पांडुसुता । देखे तरी मागुता । हळुचि निघे; ॥२५५॥
म्हणे पाय धडपडेल । तर स्वामींची निद्रा मोडेल । स्वस्थपण ढळेल । विक्षेपाने; ॥२५६॥
या काकुळतीने जाता । पाय घेई मागुता । पायदळी न तुडविता । कोण्याही जीवा ॥२५७॥
जीवाचे नावे । तृणहि न ओलांडवे । मग निष्काळजी चालावे । ही काय गोष्ट? ॥२५८॥
मुंगीसी मेरू न ओलांडवे । चिलटा सागर न तरता ये । भेटता कोणी न करवे । अतिक्रम तैसा ॥२५९॥
तयाचे चालीं । कृपाफळे फळा आली । तेथ जगली । वाचेत दया ॥२६०॥
तयाचे श्वसनहि सुकुमार । मुख प्रेमाचे माहेर । माधुर्या फुटले अंकुर । दंत तैसे ॥२६१॥
पुढे स्नेह पाझ्रेर । मागुती चालती अक्षरे । शब्द मागाहुनि अवतरे । कृपा आधी ॥२६२॥
तर बोलणेचि नाही । बोलू म्हणे जरि काही । तरि बोल कोणाही । खुपेल का? ॥२६३॥
बोलता अधिक काही निघे । कोणा वर्मी तर न लागे? । अथवा कोणी घे । शंका मनी; ॥२६४॥
जुळली गोष्ट मोडेल । भिईल कोणी दचकेल । ऐकोनीचि उपेक्षील । कोणी जर; ॥२६५॥
पीडा कोणा न व्हावी । कोणाची भिवई न चढावी । ऐसा भाव जीवीं । म्हणोनि राही उगा ॥२६६॥
मग कोणी प्रार्थिला । म्हणोनि बोलू लागला । तर ऐकणार्या जाहला । मायबाप ॥२६७॥
नादब्रह्मचि साक्षात आले । की गंगाजळ उचंबळले । पतिव्रतेसी आले । वार्धक्य की ॥२६८॥
तैसे साच आणि मवाळ । मित आणि सरळ । बोल जैसे कल्लोळ । अमृताचे ॥२६९॥
वादंग, उपरोधिक बोलणे । प्राण्या पापकर्मीं ढकलणे । उपहास आणि हिणवणे । वर्मीं झोंबेलसे बोलणे; ॥२७०॥
आशा शंका प्रतारणा । हट्ट आवेग कपटभाषणा । संन्यासिले या अवगुणां । जयाचे वाचेने ॥२७१॥
आणि त्याचिपरी किरीटी, । स्थिर जयाची दृष्टी । चढलेल्या न भृकुटी । कपाळा न आठी ॥२७२॥
ब्रह्म देखे सर्वांठायी । तयां दृष्टी रुपू शकेही । म्हणोनि कोणाकडे न पाही । बहुतकरुनी ॥२७३॥
ऐसेही कोणे एके वेळे । अंतरीचे कृपाबळें । उघडोनिया डोळे । दिठी घाली; ॥२७४॥
चंद्रबिंबातुनी अमृतधारा । निघता न देखे कोणी, वीरा, । परि आनंद केवढा चकोरा । तयांयोगे; ॥२७५॥
तैसे प्राणियांसि होई । जर तो तयांकडे पाही । या अवलोकनाची रीत ही । कासवीही न जाणे ॥२७६॥
किंबहुना जयाची दिठी । जणु की प्राणिमात्रांसाठी । तयाचा हातगुण किरीटी, । तैसाचि तो ॥२७७॥
सदैव कृतार्थ । सिद्धांचे मनोरथ । तैसे तयाचे हात । व्यापाररहित ॥२७८॥
आधीचि अंध, पाहणे टाकिले । अग्निकुंड काष्ठरहित विझलेले । वा मुक्याने घेतले । मौनव्रत जैसे; ॥२७९॥
तयापरी गा काही । करांसी करणे नाही । कारण अकर्त्याचे ठायी । राहावया येती; ॥२८०॥
हिसडेल वारा । नख लागेल अंबरा । या बुद्धीने करां । हलू न देई; ॥२८१॥
तेथ अंगावरची माशी उडवावी । की डोळ्यांपुढली चिलटे जाडावी । वा पशुपक्ष्यांसी दावावी । भीतिदायक मुद्रा; ॥२८२॥
ह्या कोठल्या गोष्टी । नावडे दंडा काठी । मग शस्त्र घेण्यासाठी । बोलणे कोठले? ॥२८३॥
कमळ फिरवित खेळने । पुष्पमाळा झेलणे । हे न करी, म्हणे । ते गोफणीऐसे होईल ॥२८४॥
हालतील रोमावळी । यास्तव अंग न कुरवाळी । नखांची होय गुंडाळी । बोटांवरी ॥२८५॥
हातांसी काही न कर्तव्य । तरी जर पडे प्रस्ताव । तर सदैव हाचि सराव । की ते जोडावे; ॥२८६॥
अभय देण्या उचलावे । पडलेल्या आधारा द्यावे । पीडिता स्पर्शावे । हळुवारपणे ॥२८७॥
हेही सहज स्वभावें होई । केवळ पीडितां अभय देई । नच जाणत चंद्रकिरणेही । जिव्हाळा तो शीतळ ॥२८८॥
जे तो स्पर्श अनुभवीत । तयां मलयानिलही खरखरीत । ऐशा रीतीने कुरवाळित । पशूंसीही तो ॥२८९॥
सदा रिते मोकळे हात । जैसी चंदनांगे सुगंधित । न फळताहि न होत । निष्फळ ती ॥२९०॥
आता असो हे वाग्जाळ । जाण ते करतळ । सज्जनाचे शील । स्वभाव जैसे ॥२९१॥
आता मन तयाचे । सांगू म्हणावे जर साचे । तर अतापावत कोणाचे । कथिले विलास हे? ॥२९२॥
काय शाखा नव्हेत तरुवर? । जळावीण असे का सागर? । तेज आणि रविकर । अन्य अन्य काय? ॥२९३॥
शरीर आणि अवयव । काय वेगळे असती होय? । रस आणि नीर काय । वेगळे असती? ॥२९४॥
म्हणोनि हे जे सर्व । कथिले बाह्य भाव । ते मनचि या सावयव । ऐसे जाण ॥२९५॥
बीज भुईत खोविले । तेचि वरि वृक्ष जाहले । तैसे इंद्रियांद्वारें फाकले । अंतर्याम ॥२९६॥
अगा मानसींचि न होय । जर अहिंसेचा उदय । तर बाहेरी कैसी काय । ओसंडेल? ॥२९७॥
कोणतीही वृत्ती पाही । आधी उद्भवे मनाठायी । मग ती येई । वाचा-दिठी-करासी ॥२९८॥
जे मनींचि न वाटे । ते वाचेत कैसे उमटे? । काय बीजाविण कोठे । अंकुरे भुई? ॥२९९॥
उगमींचि वाळुनि जाई । ते ओघीं कैसे वाही? । काय जीव जाता देहीं । हालचाल असे? ॥३००॥
म्हणोनि मन मोडुनि जाय । तेव्हा इंद्रियशक्ती उपडी होय । सूत्रधारविण हाले काय । कळसूत्री बाहुली? ॥३०१॥
तैसे मन हे धनंजया । मूळ इंद्रियभावां या । हेचि वावरे व्यवहारीं आघव्या । इंद्रियांद्वारे ॥३०२॥
ते ज्यावेळी जैसे । जे होउनि आत असे । बाहेरी ये तैसे । व्यवहारीं ॥३०३॥
म्हणोनि गा पांडुसुता, । मनी अहिंसा बळावता । सुगंध जैसा फळ पिकता । तैसी चहुकडे पसरे ॥३०४॥
म्हणोनि इंद्रियां तीचि संपदा । भांडवलही वेचित सदा । अहिंसेचा धंदा । करित असती ॥३०५॥
समुद्रा भरती येई । तेव्हा समुद्रचि भरी खाडयाही । तैसे स्वसंपत्तीने पाही । चित्तीं अहिंसा भरे ॥३०६॥
हे बहु असो, पंतोजीही । धरुनि बालकाचा हात, पाही । ओळी स्पष्ट लिही । आपणचि; ॥३०७॥
तैसे दयाळूपण आपुले । मनें हातपाया आणिले । मग तेथ उपजविले । अहिंसेसी ॥३०८॥
याकारणे गा पाही । इंद्रियांकडुनि जे होई । त्यामागे मनचि उभे राही । अवश्य जाण ॥३०९॥
ऐसा मन-वाचा-देहेंही । सर्वत्र त्याग हिंसेचा पाही । जाहला जयाचे ठायी । देखशील; ॥३१०॥
तो जाण वेल्हाळ । ज्ञानाचे राऊल । हे असो निखळ । ज्ञानचि तो ॥३११॥
जी अहिंसा कानें ऐकावी । ग्रंथाधारें निरूपावी । इच्छा उपजे ती पाहावी । तेव्हा तोचि पाहावा ॥३१२॥
ऐसे म्हटले त्यासमयी देवें । ते एके बोले म्यां सांगावे । परि विस्तारिले, हे साहावे । क्षमा करावी श्रोत्यांनी ॥३१३॥
म्हणाल, हिरव्या चार्यांत वासरू । मागिल वाट लागे विसरू । की वार्यावरी पाखरू । गगनीं भरारे ॥३१४॥
तैसी नव्हे, अवधारा, । कारण आहे विस्तारा । एरवी तीनचि अक्षरीं पुरा । अहिंसा शब्द ॥३१६॥
अहिंसा शब्द तैसा सान । तरि विचारांचे करिता मंथन । मतामतांचे होई खंडन । तेव्हांचि तो स्पष्ट होत ॥३१७॥
एरवी मतामतांचे गलबले थोपवून । केवळ अंगबळें बोलेन । तर न चाले श्रोते सज्जन, । तुम्हापाशी ॥३१८॥
तुम्हा रलपारख्यांचे गावीं । काय म्यां शिळा विकावी? । सरस्वतीपुढे न दावावी । वक्तृत्वकला जैसी ॥३१९॥
मंद वासस म्हणती कापुरा । तरि पिठाची त्या बाजारा । कापूर म्हणुनि विक्री करा । होईल काय? ॥३२०॥
म्हणोनि या सभेत राहोनि उभे । बोलकेपणाचे लोभें । बोलण्या जवळीक लाभे । मज ठावे जी; ॥३२१॥
विशेष आणि सामान्य । बोलणे जर सरसकट होय । तर ते वक्तृत्व । काना शिवू न द्याल ॥३२२॥
आणि शंकेचे गदळें । जेव्हा शुद्ध प्रमेय मळे । तेव्हा पळेल अवधान आपुले । मागल्या पाउली ॥३२३॥
पांघरोनि शेवाळाची शाल । जेथे कोठे असे जळ । ती वाट हंसांनी चपळ । शोधिली काय कधी? ॥३२४॥
अभ्रापलिकडुनी जर । चांदणे पडे धूसर । तर त्या वेळी चकोर । चोची न उचलिती ॥३२५॥
तैसे तुमचे औत्सुक्य कोमेजून । ग्रंथा न शिवाल कोपून । जर न होईल निरूपण । निर्विवाद ॥३२६॥
मतमतांचे न होता निराकरण । न करिता आक्षेपांचे निरसन । तुम्हांसी जी, माझे व्याख्यान । प्रिय न होईल ॥३२७॥
आणि माझे तर आघवे । ग्रंथ रचिने याचि भावें । की तुम्ही संतांनी असावे । सन्मुख सदा ॥३२८॥
एरवी तरी खरोखर । तुम्ही गीतार्थाचे आप्तवर । म्हणोनि गीता जिवापार । कवटाळिली म्यां ॥३२९॥
आपुले सर्वस्व देउनी । न्याल हिज सोडवुनी । ग्रंथ नव्हे ओलीस म्हणुनी । ठेविले हिजसी ॥३३०॥
अथवा सर्वस्वाचा लोभ धराल । ओलिसा अव्हेराल । तर गीतेची माझी होईल । एकचि गती ॥३३१॥
किंबहुना मी निश्चित । तुमचिये कृपेस्तव आर्त । त्यालागी निमित्त । ग्रंथाचे केले ॥३३२॥
तरि तुम्हा रसिकांजोगे । व्याख्यान शोधावे लागे । म्हणोनि आवर्जुनि सांगे । मतमतांतरे ॥३३३॥
परि कथेचा पसारा जाहला । श्लेकार्थ दुरी गेला । तरि करावी क्षमा या बोला । अपत्या मज ॥३३४॥
आणि घासातील खडेही । काढण्यात वेळ जाई । परि तो दोष जेवणाराचा नाही । ते आधीचि काढावे लागत ॥३३५॥
चुकवीत सावचोरा । दिवस लोटले परतला घरा । तर मातेने कोपावे पुत्रा । की उतरावे लिंबलोण? ॥३३६॥
परि तैसे हे न गमले । मम पल्हाळ तुम्ही साहिले । यावरी देव काय बोलिले । ऐकावे ते ॥३३७॥
म्हणे हे ज्ञानसुलोचना, । सावध होई अर्जुना । आता तुज ज्ञाना । भेटवू गा ॥३३८॥
तर ज्ञान गा तेथ । ओळख तू निश्चित । आक्रोशाविण जेथ । क्षमा वसे ॥३३९॥
अथांग सरोवरीं । कमलिनी ज्यापरी । वा दैववानाघरी । लक्ष्मी जैसी; ॥३४०॥
तैसीचि जयात पार्था । क्षमा दिसे वाढता । तयाची लक्षणे आता । सांगू निश्चित ॥३४१॥
तर आवडते लेणे । अंगीं ज्या भावे घालणे । तैसेचि सहन करणे । अवघे जया ॥३४२॥
त्रिविध तापांचे मेळावे । कोसळताही आघवे । जो कधी न लवे । भांबावुनी ॥३४३॥
इष्ट अपेक्षित पावता । तो संतोषे पुरता । तितुकेचि अनिष्ट अनपेक्षिता । आदरीतसे ॥३४४॥
मानापमाना साही । सुख-दुःख सम पाही । निंदा-स्तुतीने न होई । दुःखी वा सुखी जो ॥३४५॥
जो न तापे उन्हाळ्याने । न कापे हिवाळ्याने । न थरकापेही भयाने । प्रसंग येता ॥३४६॥
स्वशिखरांचा भार । न मानी मेरूगिरिवर । न मानी वराह अवतार । पृथ्वीसी ओझे; ॥३४७॥
नाना चराचर भूतांनी । पृथ्वी जाईना दबुनी । तैसा सुखदुःखादि द्वंद्वांनी । घामेजत नसे जो ॥३४८॥
घेऊनि जळाचे लोट । येती नद-नद्या उतट । त्यां सामावुनी घेई पोट । समुद्राचे जैसे: ॥३४९॥
तैसे जयाचे ठायी । न साहणे कधीचि नाही । आणि साहिले ऐसेही । स्मरण नुरे; ॥३५०॥
देहा जे भोगणे आले । ते करुनि घेई आपुले । तेथ नवल काय साहिले । न धरी अभिमान ॥३५१॥
ही अनाक्रोश क्षमा । जयापाशी हे प्रियोत्तमा । जाण तयाचा महिमा । ज्ञानासी लाभे ॥३५२॥
तो पुरुष पांडवा । ज्ञानाचा ओलावा । ऐक आता आर्जवा । कथिले जाईल ॥३५३॥
तर आर्जव ते ऐसे प्राणाचे सौजन्य जैसे । कोणाही कोणत्याही उद्देशें । एकचि गा ॥३५४॥
तोंडे पाहूनि प्रकाश । देतसे का कधी दिनेश? । जैसे सर्व जगासी आकाश । समान आश्रय देई ॥३५५॥
तैसेचि जयाचे मनही । माणसाप्रत अन्य अन्य नाही । आणि जयाचे वर्तन पाही । तैसेचि ते ॥३५६॥
सर्व जगाशी ओळख । अगा जुनी सोयरीक । आपपर ही भाष । नच जाणे ॥३५७॥
कोणाशीही जमे मेळ । जैसे कोठेही मिसळे जळ । कोणाविषयी न धरी सळ । चित्तीं अगा ॥३५८॥
वारियाची धाव । तैसे सरळ भाव । शंका आणि हाव । नाही जया ॥३५९॥
मातेपुढे बालका । येण्या लव न शंका आणि हाव । नाही जया ॥३५९॥
मातेपुढे बालका । येण्या लव न शंका । तैसे मन देता लोकां । विचार न करी ॥३६०॥
उमलत्या कमळा । लपविता न ये परिमळा । तैसे काही निर्मळा । छपविणे न जाणे ॥३६१॥
सुरेकपण रत्नाचे । रत्नाहुनि किरणांचे । तैसे पुढे मन जयाचे । करणे मागुते ॥३६२॥
तो संकल्प न जाणेही । मग्न आत्मानुभवीं । लिप्त ना कशासवेही । ना त्यागाचा बोभाटा ॥३६३॥
दृष्टीत मिंधेपण नसे । बोलण्यातही ना संदिग्धपण तैसे । कोणाशीही न वागतसे । हीनबुद्धीने ॥३६४॥
दाही इंद्रिये प्रांजळ । निष्कपट निर्मळ । मोकळे सर्वकाळ । पंचप्राण ॥३६५॥
अमृताची धार । तैसे सरळ अंतर । किंबहुना जो माहेर । या सकळ चिन्हांचे ॥३६६॥
तो पुरुष जेथ भेटे । आर्जवचि ते मूर्त गोमटे । जण तेथेचि घरटे । ज्ञानें केले ॥३६७॥
आता यावरी । गुरुभक्तीची परी । सांगू गा अवधारी । चतुरश्रेष्ठा ॥३६८॥
अवघ्याचि दैवा । जन्मभूमि ही गुरुसेवा । जी ब्रह्म करी जीवां । शोकग्रस्तां ॥३६९॥
ती आचार्यभक्ती । प्रकटेल तुजप्रती । बैसू दे एके पंक्ती । अवधान सर्व ॥३७०॥
तर घेउनि सकळ समृद्धी । गंगा शोधी उदधी । वा वेद हे ब्रह्मपदीं । पविष्ट होती ॥३७१॥
आपुले गुणावगुणा जीवित । वेटालुनिया कवेत । प्राणनाथा अर्पिले । प्रिया जैसी ॥३७२॥
तैसे अंतर्बाह्य आपुले । जयाने गुरुकुळीं अर्पिले । आपुल्यासि केले । भक्तीचे घर ॥३७३॥
गुरुगृह ज्या देशीं । तो देशचि वसे मानसीं । विरहिणी चित्तीं जैसी । बैसवी वल्लभा ॥३७४॥
तिकडोनि येतसे वारा । देखोनि धावे सामोरा । आडवा पडोनि म्हणे, घरा । यावे आपण ॥३७५॥
साच प्रेमाचे भुलीने जाण । त्या दिशेसी दिठी लावून । जीवा करी मिराशीचे स्थान । गुरुगृहीं जो ॥३७६॥
वरि देहा गुरआज्ञेने बांधिले । गावीं राहणे आले एकले । वासरा लाविले । दावे जैसे; ॥३७७॥
म्हणे केव्हा ही गाठ सुटेल । आणि तो स्वामी भेटेल । युगाहुनीही वडील । निमिष मानी ॥३७८॥
ऐशात गुरुग्रामींचे कोणी आले । की स्वयें गुरुंनीचि धाडिले । तर गतायूसी लाभले । आयुष्य जैसे; ॥३७९॥
की अंकुरा सुकत्या । अमृतधारा लाभल्या । वा तळ्यातील मासोळ्या । सागरीं आल्या; ॥३८०॥
वा रंकें निधान देखिले । अंधा डोळे लाभले । की भणंगाचे अंगा आले । इंद्रपद; ॥३८१॥
गुरुकुळाचे नावें । महासुखें अति उंचावे । वाटे सहजी कवटाळावे । आकाश की ॥३८२॥
गुरुकुळाविषयी ऐसी । आवड जया देखसी । जाण ज्ञान तयापाशी । चाकरी करी ॥३८३॥
आणि अंतःकरणीं । प्रेमाचेचि बहरांनी । श्रीगुरूंचे रुपडे ध्यानी । उपासी नित्य ॥३८४॥
शुद्ध हृदयाचे आवारीं । आराध्य गुरूसी अढळ करी । मग सर्वभावें परिवारीं । आपण होय ॥३८५॥
ज्ञानाचिये तटाआत । आनंदाचिये मंदिरात । श्रीगुरुलिंगावरि ध्यानामृत । ढाळितसे ॥३८६॥
बोधरूप सूर्य येता उदयाचलीं । सात्त्विक बुद्धीची भरुनि टोपली । श्रीगुरुशंकरावरि लाखोली । वाहतसे ॥३८७॥
शिवपूजनी त्रिकाळी शुद्ध काळीं । जीवनरूप धूप जाळी । ज्ञानदीपें ओवाळी । निरंतर ॥३८८॥
सामरस्याचा नैवेद्य । अखंड अर्पित जाय । आपण पुजारी होय । श्रीगुरु हेचि शिवलिंग ॥३८९॥
अथवा जिवाचिये शेजेसी । कांत करुनि भोगे गुरुसी । प्रेमाचे संतोषें ऐसी । भरोनि बुद्धि राहे ॥३९०॥
कोणे एके अवसरीं । अनुराग भरे अंतरी । की तया आदरी । क्षीराब्धी नावें ॥३९१॥
तेथ गुरुध्यान बहु सुख । ती शेषशय्या निर्दोष । वरि शयन करि विष्णूचि देख । ऐसे मानितसे गुरूसी ॥३९२॥
मग चरण जी सेवी । ती लक्ष्मी आपण होई । गरूड होऊनि उभा राही । आपणचि ॥३९३॥
नाभिकमळीं आपणचि जन्मे । ऐसे श्रीगुरुमूर्तिप्रेमें । अनुभवी मनोधर्में । ध्यानसुख ॥३९४॥
कधी एखादे वेळे । गुरुसी माय करित खेळे । मग तृप्तिसुखें लोळे । अंकावरी ॥३९५॥
अथवा चैतन्यतरुतळीं । जी शीतल साउली । तेथ गुरु धेनू आपण जवळी । वत्स होय ॥३९६॥
गुरुकृपास्नेहजळीं । आपण होय मासोळी । कोणे एके वेळी । हेचि कल्पी ॥३९७॥
गुरुकृपामृतवर्षावें । आपण सेवावृत्तीचे रोप व्हावे । ऐसे ऐसे संकल्प प्रसवे । तयाचे मन ॥३९८॥
चक्षुपंखावीन । पिलू होय आपण । कैसे गा अपारपण । प्रेमाचे त्या ॥३९९॥
गुरूते पक्षिणी करी । चारा घेई चोचीवरी । गुरु तारू धरी । आपण कास ॥४००॥
ऐसे प्रेम बळावे । ध्यानचि ध्यानासी प्रसवे । जैसा पूर्णसिंधू हेलावे । लाटांवरि लाटांनी ॥४०१॥
किंबहुना यापरी । श्रीमूर्ती भोगी अंतरीं । आता अवधारी । बाह्यसेवा ॥४०२॥
तर जीवी धरी अवसान । म्हणे चोख दास्य करीन । की गुरु कौतुके भरून । माग म्हणती ॥४०३॥
तैसे साच उपासनेअंतीं । गुरु प्रसन्न होती । तेथ मी विनंती । ऐसी करीन; ॥४०४॥
म्हणेन तुमचा आहे । परिवार जो सर्वत्र पाहे । तितुक्या रूपें व्हावे । मीचि एके ॥४०५॥
आणि आपण स्वीकारिता । जितुक्या उपकरणजाता । तितुकी रूपे आता । माझी ॥४०६॥
ऐसा मागेन वर । तेथ रुकार भरतिल गुरुवर । मग तो परिवार । मीचि होईन ॥४०७॥
उपकरणजात सकळ । मीचि होईन केवळ । तेव्हा दृष्टीसि लोभवील । उपासनेचे कवतिक ॥४०८॥
गुरु बहुतांची माय । परि एकुलती मज होय । ऐसे करुनि घेई काय काय । कृपेकडुनि त्या ॥४०९॥
तयामे प्रेमा मम छंड लावी । एकपत्नीव्रतचि घेववी । गुरुप्रेमा साठवी । माझ्यातचि ॥४१०॥
कितिहि वाहो वारा वेगे । चार दिशांबाहेरी न निघे । तैसे गुरुकृपेसी अवघे । पिंजरा मी होईन ॥४११॥
करीन गुरुसेवेसी स्वामिनी । लेववीन आपुल्या गुणांची लेणी । हे असो, होईन गवसणी । भक्तीसी मीचि ॥४१२॥
वृष्टी होता गुरुस्नेहाची । पृथ्वी होईन तळींचि । ऐशा अनंत सृष्टी रची । मनोरथांच्या ॥४१३॥
म्हणे गुरूंचे भवन । आपण मी होईन । आणि दास होऊनि करीन । दास्थ तेथले ॥४१४॥
जातायेता श्रीगुरु माझे । ओलांडिती उंबरे जे । ते मी होईन, आणि दरवाजे, । तैसे द्वारपालही ॥४१५॥
पादुका मी होईन । त्या मीचि लेववीन । छत्र मी धरीन । ते होईन मीचि ॥४१६॥
खळगे उंचवटे दावीन । चवरी ढाळित उभा राहीन । स्वामींचा हात धरून । वाटाडया होईन मी ॥४१७॥
झारी मीचि धरीन । चुळीस्तव पाणी देईन । चूळ टाकिती तेव्हा होईन । तस्त मीचि ॥४१८॥
विडा मी देईन । मीचि चोथा झेलीन । सोहळा मी करीन । आंघोळीचा ॥४१९॥
गुरूंचे आसन । अलंकार परिधान । चंदनादि होईन । उपचार ते ॥४२०॥
मीचि आचारी होईन । उपाहार वाढीन । आत्मभावें ओवाळीन । श्रीगुरूंसी ॥४२१॥
गुरुमाउली करिता भोजन । सवे मीचि पंक्तीसी बैसेन । मीचि पुढे होऊन । देईन विडा ॥४२२॥
ताट मी वाढीन । शेज मी झाडीन । पाय मी चेपीन । करीन सर्व मीचि ॥४२३॥
स्वयेंचि होईन सिंहासन । श्रीगुरु करिती आरोहण । ऐसे परिपूर्णत्व होईन । सेवेचे मी ॥४२४॥
श्रीगुरूंचे मन । जयासी देई अवधान । ते मीचि होऊनि करीन । चमत्कार ऐसा ॥४२५॥
श्रवणअंगणी तयांचिया । होईन अक्षौहिणी शब्दांचिया । स्पर्शविषय होईन अंगाचिया । घसणीने ॥४२६॥
श्रीगुरूंचे लोचन । करिता स्नेहाल अवलोकन । न्याहाळिती ती होईन । रूपे सकळ ॥४२७॥
रसनेसी करी प्रसन्न । तो तो रस मी होईन । गंधरूपें करीन । घ्राणसेवा ॥४२८॥
समस्त वस्तुजात होऊनि । गुरुस्वेसी घेईन वेटाळुनी । ऐसी बाह्यसेवा तो मनीं । वागवीतसे ॥४२९॥
देह हा असेल । तोवरि ऐसी सेवा घडेल । मग देहांतीं सेवेस्तव नवल । बुद्धीसी सुचे ॥४३०॥
म्हणे या शरीरींची माती । मेळवीन त्या स्थानाप्रती । जेथ श्रीचरण उभे असती । आराध्य गुरूंचे ॥४३१॥
माझा स्वामी कवतिकें । स्वर्शील जी उदके । तेथ लया नेईन नेटके । आपुले आप मी ॥४३२॥
श्रीगुरुसी ओवाळीत । वा भवन जे उजळीत । त्या दीपांचिये दीप्तीत । ठेवीन तेज ॥४३३॥
जेथ चवरी आणि विंझण । तेथ प्राणाचा लय करीन । मग वायू मी होईन । अंग सेविणारा ॥४३४॥
ज्या ज्या अवकाशीं । गुरु निकट परिवाराशी । आकाश लया त्या आकाशीं । नेईन माझे ॥४३५॥
जीव जावो न विसंबे क्षणही । लोकांवरी न सोपवी काही । ऐसी सेवा गणता कोटि कल्पही । न पुरती ॥४३६॥
इतुक्यावरीही आस । धरी जयाचे मानस । आणि सेवा करुनिहि ध्यास । सेवेचा नित्य ॥४३७॥
रात्र-दिवस न जाणे । थोडे बहुज न म्हणे । सेवेचे अधिकपणे । अधिकचि प्रसन्न होई ॥४३८॥
गुरुसेवा या नावें । तो गगनाहुनि उंचावे । एकला करी आघवे । एकेचि काळी ॥४३९॥
हृदयवृत्तीवे पुढे । तयाचे अंगचि दौडे । तयाची कृती घडे । पैज घेत मनाशी ॥४४०॥
जीविताचे उतरी लिंबलोण । गुरूंचिया लीलांवरून । जीवित ओवाळून । धन्य होई ॥४४१॥
जो गुरुदास्यें कृश । गुरुप्रेमें सुपोष । गुरुआज्ञेसी निवास । आपणचि जो ॥४४२॥
जो गुरुकुळें सुकुलीन । गुरुबंधुसौजन्यें सुजन । जो गुरुसेवाव्यसनें सव्यसन । निरंतर ॥४४३॥
ग्रुरुसंप्रदायधर्म । ते जयाचे वर्णाश्रम । गुरुपरिचर्या नित्यक्रम । जयाचे गा ॥४४४॥
गुरु क्षेत्र, गुरु देवता । गुरु माय, गुरु पिता । जो गुरुपूजेपरता । मार्ग न जाणे ॥४४५॥
श्रीगुरुचे द्वारीं ठाव । हे जया जीवितसर्वस्व । गुरुसेवकांसी बंधुभाव । प्रेमें भजे ॥४४६॥
जयाचे वदन सर्वत्र । वाहे गुरुनामाचे मंत्र । गुरुवाक्यावाचुनि शास्त्र । हाता न शिवे ॥४४७॥
खेळले गुरुचरणीं । कोणतेहि जे पाणी । त्या तीर्थयात्रेसि आणि । तीर्थे त्रैलोक्यींची ॥४४८॥
श्रीगुरूचे उष्टे । अवचित केव्हा भेटे । त्या लाभे विटे । समाधीसुखासीही ॥४४९॥
कैवल्यसुखासाठी । चरणरज घेई, किरीटी । जे उधळती पायांपाठी । श्रीगुरूंचिया ॥४५०॥
हे असो, सांगू किती? । अपार ऐसी गुरुभक्ती । परि गा उचंबळली मती । याकारणे ॥४५१॥
जया या भक्तीची चाड । जया हिजविषयी कोड । जो या सेवेवाचुनि गोड । न मानी काही; ॥४५२॥
तो तत्त्वज्ञानाचे स्थान । ज्ञाना त्याचेचियोगे मान । हे असो, तयाचा भक्त ज्ञान । तो देव गा ॥४५३॥
हे जाण बा खरे । ज्ञान तेथ नांदे उघडया द्वारें । अवघ्या जगा पुरे । ऐशापरी ॥४५४॥
या गुरुसेवाबावासी । माझा जीव अभिलाषी । म्हणोनि केले पाल्हाळिकीसी । ज्ञानदेव म्हणे ॥४५५॥
एरवी हात असे लुळा । भजनावधानीं आंधळा । परिचयेंलागी पांगळा । त्याहुनिही मंद ॥४५६॥
गुरुवर्णनीं मुका । आळशी पोसला फुका । परि मनीं असे देखा । अनुराग भला ॥४५७॥
तेणेचि बा कारणे येथ । हे स्थळ करणे विस्तृत । मज भाग पडले म्हणत । ज्ञानदेव ॥४५८॥
परि हा बोल साहुनि घ्यावा । आणि सेवेसि अवसर द्यावा । आता सांगेन जी बरवा । ग्रंथार्थचि ॥४५९॥
साहे भूतांचा भार । जो विष्णूचा अवतार । परिसा बोले तो शारंगधर । पार्थ ऐके ॥४६०॥
म्हणे शुचित्व गा ऐसे । जयापाशी दिसे । अंग मन जैसे । कापुराचे ॥४६१॥
रत्नाच स्वरूप होय । चोक अंतर्बाह्य । आतबाहेरी तेजोमय । सूर्य जैसा ॥४६२॥
बाहेरी कर्मांनी प्रक्षाळिला । अंतरीं ज्ञानें उजळिला । दोहोंपरी आला । निर्मळत्वा एका ॥४६३॥
माती आणि जळ । यांचा घालिता मेळ । बाह्यांगहोय निर्मळ । वेदोक्त मंत्रोच्चारें ॥४६४॥
कोठेही बुद्धीचे बळें । मातीने आरमा उजळे । परीट कढईत उकळे । डाग धुण्या वस्रे ॥४६५॥
किंबहुना यापरी । बाह्य चोख अवधारी । आणि ज्ञानदीप अंतरीं । म्हणोनि शुद्ध ॥४६६॥
एरवी तरी पांडुसुला । आत शुद्ध नसता । बाह्य कर्माचार ती तत्त्वता । विटंबना गा ॥४६७॥
मृता जैसे शृंगारिले । गाढव तीर्थीं न्हाणिले । कडू दुध्यासि माखिले । गुलाने जैसे ॥४६८॥
ओस गृही तोरण बांधिले । की उपाश्या अन्नें लिंपले । कुंकू शेंदूर केले । कांतहीनेसी ॥४६९॥
कळस मुलाम्याचे पोकळ । जळो तो वरिल झळाळ । काय करावे रंगविले फळ? । आत शेण ॥४७०॥
तैसे वरवरचे कर्म पाहे । अधिक मूल्यें ना हीन विकले जाये । मदिरेचा घडा पवित्रत्व न पावे । गंगेतही बुडविता ॥४७१॥
म्हणोनि अंतरीं ज्ञान व्हावे । मग बाह्यशुद्धी लाभेल स्वभावें । परि ज्ञानें आणि कर्में संभवे । ऐसे शुचित्व कोठे ? ॥४७२॥
यालागी बाह्य सकळ । कर्में धुतले निर्मळ । आणि ज्ञानें फेडिला मळ । अंतरींचा; ॥४७३॥
तेथ अंतर-बाह्य गेले । निर्मळत्व एक जाहले । किंबहुना उरले । शुचित्वचि ॥४७४॥
म्हणोनि सद्भाव जीवींचे । बाहेरी फाकति साचे । जैसे की स्फटिकगृहींचे । डोलती दीप ॥४७५॥
विकल्प जेणे उपजे । नसती विकृति निपजे । अपप्रवृत्तींची बीजे । अंकुरती; ॥४७६॥
काही ऐके, देखे, अथवा भेटे । परि मनीं मुळी न उमटे । मेघरंगे न मळे कोठे । आकाश जैसे ॥४७७॥
इंद्रियांचे संगतीत एरवीही । विषयांवरि जरि लोळत राही । तरि विकारांचे विटाळें केव्हाही । लिंपिला न जाय ॥४७८॥
पवित्र-अपवित्र स्त्री वाटेत । वाट दोहींपासुनि अलिप्त । तैसे तो व्यवहारात । वागणे जाणे ॥४७९॥
पती वा पुत्राते आलिंगी । एकचि ती तरुणांगी । तेथ पुत्रभावाचे अंगीं । न शिरेचि काम ॥४८०॥
तैसे हृदय जेव्हा चोख । संकल्प-विकल्पांची असे ओळख । कृत्य-अकृत्य हे विशेष । जाणे साच ॥४८१॥
पाण्यात हिरा न विरत । आधणीं खडा न शिजत । तैसे न रुजे विकल्पजात । मनोवृत्तींत ॥४८२॥
तया नाव शुचित्व । पार्था गा यास्तव । देखसी तेथ होय । ज्ञानाची वसती ॥४८३॥
आणि स्थिरता साचे । घर व्यापी जयाचे । तो आहे ज्ञानाचे । आयुष्य गा ॥४८४॥
वरपांगी शरीर दिसे थोडे । आपुल्या स्वभावें हिंडे । तरि बैठक न मोडे । मानसींची ॥४८५॥
धेनू राना जात । ममता वत्सा न त्यजित । सतीचे वस्त्रालंकार नसत । प्रेमभोग; ॥४८६॥
लोभी दूर जाई । चित्त ठेव्यापाशी राही । तैसा देह चालता न होई । चळ चित्ता: ॥४८७॥
धावत्या अभ्रासवे । जैसे आकाश न धावे । न फिरे तारांगणासवे । ध्रुव जैसा; ॥४८८॥
येरझारांसवे पथिकांचिया । पथ न चाले धनंजया । वा नाही तरुवरां या । येणे जाणे; ॥४८९॥
तैसा चलनवलनात्मक । असोनि देह पंचभौतिक । क्षुधादि ऊर्मींनी एकेक । चळेना जो ॥४९०॥
वावटळीचे बळें । पृथ्वी जैसी न ढळे । तैसा उपद्रवांचे लोढयांमुळे । लोटला न जाय तो ॥४९१॥
न तापे दैन्यदुःखें । न कापे भयशोकें । मृत्यू समोरी ठाके । तरी न भीत ॥४९२॥
मन-पीडा-आशा-भरें । वय-व्याधी-गजरें । चित्त न होय पाठमोरे । आत्मसन्मुख असता ॥४९३॥
निंदा-अपमानाचा दंडा । कामलोभाचा वरि पगडा । तरि रोमही न वाकुडा- । होत मनीं ॥४९४॥
आकाश हे ओसरो । वरि पृथ्वीही विरो । परि मागुती न दे फिरो । चित्तवृत्ती ॥४९५॥
फुलांनी प्रहार करिता । हत्ती न फिरे मागुता । तैसे अपशब्दें छळिता । खिन्न न होय ॥४९६॥
क्षीरसागराचे कल्लोळीं । कंप नाही मंदराचळीं । आकाश न जळे जाळीं । वणव्याचिया; ॥४९७॥
आल्यागेल्या उर्मींनी । गजबज न होय मनीं । किंबहुना तो धैर्यवान आणि । कल्पांतीही क्षमाशील ॥४९८॥
स्थैर्य ऐसी भाष । म्हणती जी विशेष । ती ही दशा देख । डोळस अर्जुना ॥४९९॥
हे स्थैर्य निधडे । जो अंगे जीवे जोडे । तो ज्ञानाचे उघडे । निधान साच ॥५००॥
आणि समंध जैसा घरा । अथवा योद्धा हत्यारा । की न विसंबे भांडारा । कृपण जैसा; ॥५०१॥
एकुलत्या बालकासी । माता कवळुनि राही कैसी । मधास्तव मधुमक्षिका जैसी । लोभिणी की; ॥५०२॥
अर्जुना, जो यापरी । अंतःकरण जतन करी । उभे ठाको न दे द्वारीं । इंद्रियांच्या ॥५०३॥
म्हणे कामबागुलबुवा ऐकेल । ही आशाडाकीण देखेल । तर जिवावरी बेतेल । म्हणोनि भीतसे ॥५०४॥
दांडगा पती छचोर पत्नीसी । कोंडुनि घाली घरासी । प्रवृत्तीवरी जै तैसी । टेहळणी करी ॥५०५॥
चित्ता आवर घालुनी । देहासकट झिजुनी । इंद्रिया शांतवुनी । संयमीं ठेवी ॥५०६॥
मनाचिये महाद्वारीं । अंतर्मुखतेचे ठाण्यावरी । जो यम दम शरीरीं । जागवी उभे; ॥५०७॥
मूलाधारीं नाभिकंठीं । बांधोनि तीन बंधांची घरटी । इडा पिंगळा संपुटीं । ठेवी चित्त; ॥५०८॥
समाधिचे शेजेसी जाण । ध्यानासी ठेवी बांधुन । चित्तचैतन्य सामरस्यें रममाण । अंतर्यामीं; ॥५०९॥
अंतःकरणनिग्रह म्हणावा । तो हा खचित जाणावा । अगा, हा असे तेथ व्हावा । ज्ञानाचा विजय निश्चित ॥५१०॥
जयाची आज्ञा स्वयें । अंतःकरण शिरीं वाहे । मनुष्याकार पाहे । ज्ञानचि तो साक्षात ॥५११॥
निरहंकारता चित्तीं विषयात विरक्तता
जन्म-मृत्यु-जरा-रोग-दुःख-दोष-विचारणा ॥८॥
आणि आवरण्या विषयां । वैराग्य असे साहाय्या । मानसीं नित्य जया । जिवंत भले ॥५१२॥
जैसी ओकल्या अन्ना । लाळ न घोटी रसना । अंग न उठे आलिंगना । प्रेताचिया ॥५१३॥
विष न खाववे । जळत्या घरी न शिरवे । व्याघ्रगुहेत न करवे । वसती जैसी; ॥५१४॥
रसरसत्या लोहरसीं । उडी न घेववे जैसी । न करवे उशी । अजगराची; ॥५१५॥
अर्जुना जया एवढे । विषयवार्तेचे वावडे । जावो न देई इंद्रियांतोंडें । काहीचि मनाकडे ॥५१६॥
विषयालागी मनीं आळस । देह अति कृश । यमदमीं समरस । असे जो गा ॥५१७॥
तपा-व्रतांचा मेळावा । जयाचे ठायी पांडवा, । जयासि येता गावा । युगान्ताऐसे संकट ॥५१८॥
योगाभ्यासीं बहु हाव । विजनाकडे धाव । न साहे नाव । मेळाव्याचे ॥५१९॥
बाणांची शय्या करणे । वा पूयपंकीं लोळणे । तैसे तयालेखीं भोगणे । इहलोकींचे ॥५२०॥
स्वर्गीचे भोग मानसें । ऐकोनि मानी ऐसे । कुजले मांस जैसे । श्वानाचे की ॥५२१॥
ते हे विषयवैराग्य । जे आत्मलाभाचे भाग्य । येणे ब्रह्मानंदायोग्य । जीव होती ॥५२२॥
इहपरलोकभोगीं अनास्था । जेथ बहुत देखसी पार्था । तेथ रहिवास तत्त्वता । ज्ञानाचा जाण ॥५२३॥
आणि सकामापरी । इष्ट-इच्छित कर्मे करी । परि केलेपण शरीरीं । वसो न दे ॥५२४॥
वर्णाश्रमपोषक । कर्मे नित्य-नैमित्तिक । त्यामाजी खंड न देख । आचरिता ॥५२५॥
परि हे मी केले । की हे मजयोगें जाहले । ऐसे नाही ठेविले । वासनेमाजी ॥५२६॥
जैसे अहेतुकपणे । वायूसी सर्वत्र संचरणे । की निरभिमान उगवणे । सूर्याचे जैसे ॥५२७॥
वेद स्वभावता बोले । गंगा निर्हेतुक चाले । तैसे अहंकारहीन भले । वागणे जयाचे ॥५२८॥
ऋतुकाळी जरि फळती । तरि फळलो हे न जाणती । त्या वृक्षांऐसी वृत्ती । कर्मीं सदा ॥५२९॥
ऐसी मनीं कर्मीं बोलीं । अहंकाराची बोळवण केली । एकपदरी माळेची काढिली । दोरी जैसी ॥५३०॥
चिकटल्याविण जैसी । अभ्रे राहती आकाशीं । देहीं कर्मे तैसी । जयासी गा ॥५३१॥
मद्यप्याअंगीचे वस्त्र । चित्राहातींचे शस्त्र । बैलावरी धर्मशास्त्र । बांधिले गेले; ॥५३२॥
त्यापरी जयासी देहीं । आहो हे स्मरणचि नाही । निरहंकारिता पाही । तया नाव ॥५३३॥
हे संपूर्ण जेथ दिसे । तेथेचि ज्ञान वसे । त्याविषयी अन्य ऐसे । बोलू नये ॥५३४॥
आणि जन्म-मृत्य़ू-दुःखे । व्याधी-वार्धक्य-पातके । अंगा न येता देखे । दुरुनी जो ॥५३५॥
मांत्रिक जैसा पिशाच्चासी । वा योगी उपसर्गासी । ओळंबा भिंतीचे उण्यापुर्यासी । आधीचि पाही ॥५३६॥
वैरे जन्मांतरीचे । न जाय मनातुनि सर्पाचे । तैसे मागील जन्मांचे । उणे जो वाहे ॥५३७॥
डोळ्यात कण न विरे । घावीं शस्त्र न जिरे । पूर्वजन्मींचे दुःख न विसरे । पुनर्जन्म अव्हेरी ॥५३८॥
म्हणे पूयगर्तेत शिरलो । हाय मूत्ररंध्रें निघालो । अरेरे चाटित राहिलो । कुचस्वेद ॥५३९॥
ऐशाऐशापरी पार्था । जन्माचा कंटाळा करिता । म्हणे ते न मी करी आता । जेणे ऐसे होय ॥५४०॥
हरले जिंकावया । जैसा जुगारी ये डावा । की बापाचे वैर्याशी झुंजाया । पुत्र झटे ॥५४१॥
वडिल भावा मारल्याचे रागें । पाठचा जैसा सूड घे । तैसा आवेशे लागे । जन्मापाठी ॥५४२॥
परि जन्मलो ही लाज दारुण । न सोडी जयाचे मन । संभावितामाजी अपमान । न जिरे जैसा ॥५४३॥
आणि मृत्यू पुढे पाहे । तो कल्पांताइतुका दूर आहे । तरि आधीचि राहे । सावध जो ॥५४४॥
नदीमाजी आहे डोह । म्हणोनि काठासीचि सावध होय । पोहणारा जैसा पाण्यात जाय । कासोटा कसून; ॥५४५॥
पावण्याआधी रणाचा ठाव । सांभाळावा जैसा आव । पडण्याआधीचि घाव । धरावी ढाल; ॥५४६॥
उद्या वस्ती वाटमारीठायी । म्हणोनि आजचि जैसा सावध होई । जीव जाण्याआधी घाई । औषधासाठी करी ॥५४७॥
एरवी ऐसेही घडे । जो जळत्या घरी सापडे । तो मग कितीही धडपडे । तरि खणू न शाके विहीर; ॥५४८॥
डोहात दगड पडला । तैसाचि जो बुडाला । तो बोंबेहिसकट निमाला । हे कोण सांगे ? ॥५४९॥
म्हणोनि समर्थासर अनिवार । जया पडले हाडवैर । तो जैसा आठही प्रहर । शस्त्र परजुनी असे; ॥५५०॥
केळवण होता वधु उदास माहेरी । वा संन्यासी संसाराविषयी ज्यापरी । तैसी मरणाआधीचि वारी । तो मृत्यूची स्मरे ॥५५१॥
अगा जो यापरी । या जन्मींचि पुनर्जन्म निवारी । या मरणीं मृत्यूसि मारी । आपण ब्रह्मरूप उरे; ॥५५२॥
तयाघरी ज्ञानाचे । साकडे नाही साचे । जया जन्ममृत्यूचे । निमाले शल्य ॥५५३॥
त्याचिपरी वृद्धत्वही । टेकण्याआधीचि देहीं । तारुण्याचे भरातही । देखे पुढील ॥५५४॥
म्हणे आजचे अवसरीं । पुष्टता जी शरीरीं । ती होईल काचरी । वाळली जैसी ॥५५५॥
दैवहीनाचे व्यवसाय । तैसे ओहोटती हात पाय । मंत्र्याविना राज्य । तैसे जाय बळ ॥५५६॥
फुलांचिये भोगा । प्रेम ज्या नाका गा । ते उंटाचा की गुडघा । ऐसे होईल ॥५५७॥
ओढाळ गुरांचे खुरी । खाचा पडती भुईवरी । तैसी दशा माझे शिरीं । होईल गा ॥५५८॥
पद्मदळासी इसाळेपिसाळें । भांडती जे हे डोळे । ते होतील पडवळे । पिकली जैसी ॥५५९॥
भिवया जणु जीर्ण साली । येतील लोंबुनी खाली । आणि डोळ्यातील जळीं । ऊर कुजेल ॥५६०॥
जैसा बाभळीचे खोडा । डिंकें गिरबिडुनि जाय सरडा । तैसा लाळेचा तोंडा । लडबडाट होईल ॥५६१॥
चरामाजी चुलीपुढे । सांपडपाण्याचे बुडबुडे । तैसी ही नाकाडे । लिडबिडतील ॥५६२॥
तांबुलें ओठ रंगवू । हासता दात दावू । बहु सुंदर मिरवू । बोल जेणे; ॥५६३॥
त्याचि पाहे या तोंडा । येईल कफाचा लोंढा । ह्या उन्मळतील दाढा । दातांसहित ॥५६४॥
शेतीवाडी ऋणात बुडली । की पाऊसझडीत ढोरे बैसली । न उठेल काही केल्या, लोंबली । जीभ जैसी ॥५६५॥
जैसी कुसळे काटेरी । उडती बरडमाळावरी । तैसी आपत्ती तोंडावरी । दाढीसी ओढवेल ॥५६६॥
जैसी आषाढझडीत । गिरिशिखरे झिरपत । तैसे दातांचे खिंडीत । लाळेचे पूर ॥५६७॥
वाचा लुळी पडेल । कान बहिरे होतील । आणि पिंड होईल । म्हातार्या माकडाऐसा ॥५६८॥
तृणाचे बुजगावणे । जैसे आंदोळे वार्याने । कापरे भरेल त्याप्रमाणे । सर्वांगासी ॥५६९॥
पाय पडतील फेंगडे । हात होतील वाकडे । नाचविले जाईल सोंगाडे । या देहाचे ॥५७०॥
मलमूत्रांची द्वारे । होतील फुटकी पात्रे । नवस करितील सारे । निधनास्तव माझिया ॥५७१॥
देखोनि थुंकेल जग । अंताची वाट पाहील मग । सोयर्यांसी उबग । येईल माझा ॥५७२॥
स्त्रिया म्हणतील भूअ । बाळे होतील मूर्च्छित । अवघ्यांसी येईल खचित । किळस माझी ॥५७३॥
येता कफाची उबळ । जागवील घरा शेजारील । म्हणतील म्हातारा शिणवील । बहुतांते हा ॥५७४॥
वार्धक्याची सूचना ही । आपुल्या तरुणपणी पाही । मग विटे तनमनही । सर्वस्वी जयाचे ॥५७५॥
म्हणे उद्या हे येईल । आणि आताचे जाईल । मग काय उरेल । हितासाठी ? ॥५७६॥
म्हणोनि बहिरेपण न येई । तोवरि सारे ऐकोनि घेई । पंगू होण्याआधी जाई । जायचे तेथ ॥५७७॥
दृष्टी जोवरि आहे । तोवरि पाहुनि घ्यावे । वाचा जाण्याआधी वाहे । मुखें सुभाषिते ॥५७८॥
हात होतील लुळे । हे पुढील थोडके कळे । आणि करुनि घेई सगळे । दानादिक ॥५७९॥
ऐसी अवस्था येऊन । वेडे होईल मन । तोवरी ठेवी चिंतून । चोख आत्मज्ञान ॥५८०॥
चोर उद्या लुटतील सर्वस्वी । तर संपत्ती आजचि त्यागावी । अथवा झाकापाक करावी । दिवा जाण्याआधी; ॥५८१॥
तैसे वार्धक्य यावे । मग जे वाया जावे । ते आताचि आघवे । हातावेगळे करी ॥५८२॥
दुर्गांच्या सावल्या लांबल्या । पक्षिणी कोटरीं परतल्या । ऐशा कातरवेळी किल्ल्यात शिरलेल्या । कैसे लुटतील चोर ? ॥५८३॥
तैसा वृद्धापकाळ येई । जन्मा आलेपण वाया जाई । तरी तो शतवर्षीय होई । न जाणे कैसा ? ॥५८४॥
झाडिलीचि ताटे झाडी । तया न मिळे तीळ बोंडी । अग्नि जर जाहला राखाडी । तर जाळील काय ? ॥५८५॥
वार्धक्याचे स्मरण तारुण्यींचि ठेवी । तर ते जया न शिणवी । जाणावे तयाचे ठायी । ज्ञान आहे ॥५८६॥
तैसेचि नाना रोग । ग्रासिती पुढे अंग । तोवरि आरोग्याचे उपयोग । करूनि घेई ॥५८७॥
सापाचे तोंडीं । पडली अन्नाची उंडी । ती मिळताहि दूर झाडी । प्रबुद्ध जैसा ॥५८८॥
ज्या सुखाचे वियोगें ऐसे । दुःख-शोक-विपत्ति पोसे । ते त्यजुनी सझजसे । निरिच्छ होय ॥५८९॥
आणि इंद्रियांद्वारे जिकडे जिकडे जिकडे । दोष घालिती तोंडे । त्या बिळीं दगडधोंडे । निग्रहाचे दडपी ॥५९०॥
सामुग्र्यांनिशी ऐशा एकेक । असे जयाची वर्तणूक । तोचि ज्ञानसंपत्तीचा देख । स्वामी होय ॥५९१॥
आता आणिकही एक । लक्षण अलौकिक । सांगेन ते ऐक । पार्था अगा ॥५९२॥
निःसंगवृत्ति कर्मात पुत्रादीत अलिप्तता
प्रिय-अप्रिय लाभात अखंड समचित्तता ॥९॥
जो या देहावरी । उदास ऐशापरी । वाटसरू जैसा बिढारीं । बैसविला आहे ॥५९३॥
अथवा झाडाची सावली । वाटेने जाता भेटली । घराविषयी न उपजली । तितुकीही आस्था; ॥५९४॥
साउली सवेचि असे । परि हे न जाणे जैसे । स्त्रीविषयी जया तैसे । लोलुप्य नाही; ॥५९५॥
आणि प्रजा जी जाहली । ती जणु वस्तीला आली । अथवा गुरे बैसलीव । वृक्षातळी; ॥५९६॥
जो संपत्तिमाजी असता । ऐसा गमे पांडुसुता । जैसा की वाटेने जाता । साक्षी ठेविला; ॥५९७॥
किंबहुना राघू जैसा । पिंजर्यात ये निवासा । वेदाज्ञेसी भिऊनि तैसा । संसारी असे; ॥५९८॥
एरवी दारा गृह पुत्र । यांचे नाही जया मैत्र । तो आधारा पात्र । केवळ ज्ञानासी ॥५९९॥
आणि महासिंधू जैसे । ग्रीष्म-वर्षाकाळी सरिसे । इष्ट-अनिष्ट तैसे । जयाचे ठायी ॥६००॥
अथवा सायंप्रातर्माध्यान्ही । सूर्य न होय तीन परींनी । तैसा सुखदुःखीं अंतःकरणीं । भेद न जया; ॥६०१॥
ऋतूंचे येरझारांनी नभात । समत्वा उणे न पडत । तेथेचि ज्ञान साक्षात । ओळख तू ॥५०२॥
माझ्याठायी अनन्यत्वें भक्ति निष्काम निश्चळ
एकांताविषयी प्रीति जनसंगात नावड ॥१०॥
आणि मजवाचूनि काही । आणिक गोमटे नाही । ऐसा निश्चयचि पाही । जयाने केला; ॥६०३॥
शरीर वाचा चित्त । यांनी निश्चयें वाहिली शपथ । एके मजवाचुनी पंथ । न धरिती अन्य; ॥६०४॥
किंबहूंना जयाचे अंतःकरण मज । निकट जाहले सहज । तये आपणचि एकशेज । आम्हासह केली ॥६०५॥
शिरता वल्लभापुढे । नाही अंगीं जीवीं साकडे । त्या कांतेचिएवढे । ऐक्य जयाचे मजसी ॥६०६॥
मिळोनिही मिळतचि असे । समुद्रीं गंगाजळ जैसे । मी होऊनिहि मज तैसे । सर्वस्वें भजती ॥६०७॥
सूर्यासवे उगवावे । सूर्यासवेचि अस्ता जावे । हे शोभे अनन्यत्वें । प्रभेसि जैसे ॥६०८॥
पहा गा पाण्यावरी । पाणीचि खेळे ज्यापारी । लौकिकीं त्या लहरी । एरवी जळचि; ॥६०९॥
जो अनन्य यापरी । मी होऊनिहि मम भजन करी । तोचि तो गा अवधारी, । मूर्तिमंत ज्ञान ॥६१०॥
आणि तीर्थक्षेत्रीं राहणे । पवित्र किनारीं बैसणे । आवडे जया तप करणे । गुहेत वा तपोवनीं; ॥६११॥
डोंगरदर्या-गिरीकुहरीं । जलाशय परिसरीं । प्रेमें जो वसति करी । नगरा न ये; ॥६१२॥
एकांतावरि बहु प्रीत । जनसंपर्कीं खंत । जाण मनुष्याकार मूर्त । ज्ञानचि ते ॥६१३॥
पुढती काही आणिक । चिन्हे गा एकेक । ज्ञानाचे निश्चितीस्तव देख । सांगू तुज ॥६१४॥
आत्मज्ञानीं स्थिर श्रद्धा तत्त्वता ज्ञेयदर्शन
हे ज्ञान बोलिले सारे अज्ञान विपरीत जे ॥११॥
तर परमात्मा या नावें । जी एक वस्तु आहे । ती अनुभवासी ये । ज्या ज्ञानायोगें ॥६१५॥
अन्य त्या एकावाचून । जे भवस्वर्गादि ज्ञान । ते अज्ञान, ऐसा तयाचे मन । निश्चय करी ॥६१६॥
स्वर्गाची गोष्ट सोडी । संसाराविषयी कान झाडी । देई आत्मज्ञानीं बुडी । सदभावें ॥६१७॥
अनेक वाटा फुटता । आडवाटा शोधिता । लागावे राज पथा । नीट जैसे;अ ॥६१८॥
तैसे ज्ञानमात्राचा विचार करुनी । अन्य ज्ञाने एकीकडे सारुनी । मन बुद्धी आत्मज्ञानीं । वळवीतसे ॥६१९॥
म्हणे एक हेचि गमे विचारान्ती । अन्य ज्ञाने केवळ भ्रांती । ऐसे निकरें म्हणे मती । मेरूपरी स्थिर ॥६२०॥
ऐसा निश्चय जयाचा । अध्यात्मज्ञानाद्वारीं साचा । ध्रुवदेव गगनींचा । तैसा राहिला ॥६२१॥
ज्ञान वसे तयाचे ठायी । या बोला अन्य नाही । ज्ञानीं स्थिर बैसले मनही । तो मद्रूप जाहला ॥६२२॥
तरि बैसल्यावरी जे होई । ते बैसताचि होत नाही । परि ज्ञानासमचि त्या स्थितीसिहि । योग्यता असे ॥६२३॥
आणि तत्त्वज्ञान निर्मळ । प्रसवी जे एक फळ । त्या ब्रह्माहिपावत सरळ । दृष्टी जयाची ॥६२४॥
एरवी ज्ञानबोध होता । ज्ञेय न दिसले तत्वता । तर ऐसे न मानी वृथा । की ज्ञान लाभले ॥६२५॥
अंधाने हाती दिवा । घेऊनि काय करावा ? तैसा ज्ञाननिश्चय आघवा । वाया जाय ॥६२६॥
जर ज्ञानाचे प्रकाशें । परतत्त्वीं दिठी न प्रवेशे । तर ती बुद्धीचि असे । अंध जाहली ॥६२७॥
म्हणोनि ज्ञान जितुके दावी । तितृकी ही ज्ञेयवस्तुचि आघवी । परि ती देखे ऐसी व्हावी । बुद्धी चोख ॥६२८॥
यालागी दाविले ज्ञानें निर्दोष । देखे जी ज्ञेय अशेष । ऐशा शुद्ध बुद्धीने विशेष । संपन्न जो; ॥६२९॥
जेवढी ज्ञानाची वृद्धी । तेवढी तयाची बुद्धी । तो मूर्त ज्ञानचि हे शब्दीं । सांगावे न लागे ॥६३०॥
ज्ञानाचिये प्रभेसवे । जयाची मति ज्ञेयीं पावे । तो हातोहात शिवे । परतत्त्वाते ॥६३१॥
तोचि ज्ञान हे बोलता । विस्मय काय पंडुसुता ? । काय सवित्याते सविता । म्हणावे लागे ? ॥६३२॥
तेव्हा श्रोतेजन म्हणती । “असो ही अतिशयोक्ती । अडथळा ग्रंथाप्रती । आणिसी का ? ॥६३३॥
तुझा हाचि आम्हा थोर । वक्तृत्वाचा पाहुणेर । की ज्ञानविषय अपार । निरूपिला ॥६३४॥
मनमुक्त वर्णावे रस । हाचि कविमंत्र घेतलास । तर आमंत्रुनि शत्रु आम्हास । करिसी का गा ? ॥६३५॥
भोजना बैसतेवेळे । जी रांधिलेचि घेऊनि पळे । तिचे अन्य अतिथ्य मिळे । त्यात काय अर्थ ? ॥६३६॥
चांगली अवघ्या गोष्टीत । परि कासेसि टेकू न देत । ऐसी लाथाळ गाय पोषित । काय कोणी ? ॥६३७॥
तैसी ज्ञानीं मति न फाके । त्या अन्य कवींचे पाल्हाळ कितुके ? । परि ते असो, देखे । भले केले तुवा ॥६३८॥
ज्या ज्ञानलेश-उद्देशें । करिती योगादिक सायासें । ते तृप्तिदायी, भरले रसें । निरूपण तुझे ॥६३९॥
अमृताची झड लागत । वर्षेना का दिवस सात । सुखाचे कोणी का मोजित । कोटी दिवस ? ॥६४०॥
चंद्रासह रात्रवि सतत । युग एक नसो उजाडत । तर चकोर काय वाट पाहत । उजाडण्याची ? ॥६४१॥
तैसे ज्ञानाचे बोलणे । आणि ऐसे रसाळपणे । आता पुरे कोण म्हणे । श्रवण करिता ? ॥६४२॥
भाग्यवंत पाहुणा ये । सुभगाचि वाढित जाये । तेथ पाकसिद्धी सरू नये । ऐसेचि होय ॥६४३॥
तैसाचि प्रसंग हाही । ज्ञानाची आवड आम्हासीही । आणि अनुराग तुजलाही । असे येथ ॥६४४॥
म्हणोनि या निरूपणीं । स्फूर्ती चौपट येउनी । का न म्हणावे तुज कोणी । ज्ञानद्रष्टा ? ॥६४५॥
तरी आता यावरी । प्रज्ञेचे बळ धरी । श्लोकांचे यथार्थ करी । निरूपण ” ॥६४६॥
या संतवाक्यासरिसे । म्हटले निवृत्तिदासें । माझेही जी, ऐसे । मनोगत ॥६४७॥
आता यावरी तुम्ही । आज्ञापिले मज स्वामी । तर वायाचि शब्द मी । वाढू न देई ॥६४८॥
ऐसी ही अवधारा । ज्ञानलक्षणे अठरा । श्रीकृष्णें धनुर्धरा । निरूपिली ॥६४९॥
मग म्हणे या नावें । ज्ञान येथ जाणावे । हे स्वमत, आणि आघवे । ज्ञानीही म्हणती ॥६५०॥
सर्वांगीं परिपूर्ण वाटोळा । करतळीं डोलता पहावा आवळा । तैसे आम्ही तुजला । दाविले ज्ञान डोळ्यांनि ॥६५१॥
आता हे पार्थ । ज्यास अज्ञान म्हणत । तेही करू व्यक्त । लक्षणांसह ॥६५२॥
एरवी साच ज्ञान होई । तेव्हा अज्ञान जाणवेही । तर ज्ञान नव्हे ते पाही । अज्ञानचि तत्त्वता ॥६५३॥
पाहे बा दिवस आघवा सरे । मग रात्रीची बारी उरे । त्यावाचुनी अन्य तिसरे । नाहीचि गा जैसे ॥६५४॥
तैसे ज्ञान जेथ नाही । तेथचि अज्ञान राही । तरि सांगू काही काही । चिन्हे तयाची ॥६५५॥
तर प्रतिष्ठेस्तवचि जगे देही । मानाची वाट पाही । सत्कारें होई । तोष जया; ॥६५६॥
गिरिशिखर कदापि न लवे । तैसा महतपदावरुनि न उतरे गर्वें । तयाठायी निश्चित जाणावे । अज्ञान आहे ॥६५७॥
आणि स्वधर्माचे जानवे । बांधी पिंपळा वाचेचिये । देऊळ निर्मळ राखावे । म्हणुनी उभा कुंचा जैसा; ॥६५८॥
घाली विद्येचा पसारा । पिटी सुकृताचा डांगोरा । जे करी तितुक्याचा मोहरा । वळवी कीर्तीकडे; ॥६५९॥
अंग भस्मगंधें चर्ची । आपणा पूजिणार्या वंची । तो जाण गा अज्ञानाची । ठेव येथ ॥६६०॥
आणि वणवा वनीं संचरे । स्थावरजंगम जळे पुरे । तैसे तयाचे आचारें । जगा दुःख ॥६६१॥
सहजी जे जे बरळे । ते भाल्याहुनिही तीक्ष्ण बळें । जयाचे संकल्प सगळे । मारक विषाहुनीही; ॥६६२॥
तयापाशी बहु अज्ञान । तोचि अज्ञानाचे निधान । हिंसेचे सदन । जयाचे जिणे ॥६६३॥
आणि फुंकता भाता फुगे । दाबल्याक्षणींचि चिंबे अंगें । तैसा जो संयोगवियोगें । चढे-ओहटे ॥६६४॥
वार्याचे भोवर्यात सापडे । धूळ आकाशापावत उडे । तैसा हर्षाने चढे । स्तुति कोणी करिता; ॥६६५॥
निंदा थोडी ऐके । आणि बैसे धरुनि डोके । थेंबें विघरे, वार्याने सुके । चिखल जैसा; ॥६६६॥
तैसी मानापमानीं गत होई । जो विकारोर्मी न साही । आहे तयाचे ठायी । अज्ञान पुरे ॥६६७॥
आतल्या गाठीचा परी । वरपांगी मोकळाढाकळा जरी । एका जवळ करी । साह्य देई दुसर्यासी ॥६६८॥
पारधी मृगा चारा घाली । तैसी तयाची प्रांजळ बोली । सुजनांची अंत:करणे भली । व्यथित करी ॥६६९॥
गारगोटी शेवाळीं गुंडाळिली । वा निंबोळी जैसी पिकली । तैसी तयाची भली । बाह्यक्रिया ॥६७०॥
अज्ञान तयाचे ठायी । ठेवलेलेचि असे पाही । या बोला अन्य नाही । सत्य मानी ॥६७१॥
गुरुकुळाची लाज वाटे । जो गुरुभक्तीसी विटे । विद्या घेऊनि उलटे । गुरूवरीचि ॥६७२॥
तयाचे नाव घेणे । जणु वाचेने कदन्न खाणे । परि सांगता लक्षणे । बोलणे आले ॥६७३॥
आता गुरुभक्ताचे नाव घेऊ । तेने वाचेसि प्रायश्चित देऊ । गुरुसेवकाचे नाव पाहू । सूर्याऐसे ॥६७४॥
तितुक्यानेही फळ पायाचे । निस्तरेल या वाचेचे । जे गुरुनिंदकाचे । नामोच्चारें आले ॥६७५॥
हे नाव येथवरी । अभक्त नामोच्चरणाचे भय हरी । मग म्हणे, अवधारी, । आणिक चिन्हे ॥६७६॥
तर अंगें कर्में ढिला । जो मनीं विकल्पें भरला । रानींचा जैसा वाळला । आड पडका ॥६७७॥
काटेकुटे खाय तोंडें । आत नुसती हाडे । अमंगळ तयासम घडे । अंतर्बाह्य जो ॥६७८॥
पोटास्तव कुत्रे ओंगळवाणे । उघडे झाकले न म्हणे । तैसे आपपर न जाणे । द्रव्यासाठी जो ॥६७९॥
या ग्रामकुळाचे ठायी । जैसे मीलनी स्थान-अस्थान नाही । तैसा स्त्रीविषयी काही । धरबंध नसे ॥६८०॥
विहित कर्माची वेळ चुके । वा नित्य-नैमित्तिका मुके । ते जया न दुखे । जिवामाजी ॥६८१॥
पाणी जो निसुग । पुण्याविषयीं निःसंग । जयाचे मनीं वेग । विकल्पाचे ॥६८२॥
तो जाण निर्ढावला । अज्ञानाचा असे पुतळा । बांधोनि असे डोळा । धनाशेशी ॥६८३॥
आणि अल्पशा स्वार्थबळें । जो धर्मापासोनि चळे । जैसे तृणबीज ढळे । मुंगीने हालविता ॥६८४॥
पाय पडताक्षणी । डबेके निघे ढवळुनी । तैसा जाय गडबडुनी । भयाचे नावें ॥६८५॥
वायूचे घेत साहाय्य । धूर दिगंता जाय । दुःखवार्तेने होय । तैसे तया ॥६८६॥
मनोरथांचे ओघें ऐसा । वेग जयाचे मानसा । पुरात पडला जैसा । दुध्या वाहे ॥६८७॥
अगा वावटळीचे परी । जो आश्रय कोठेचि न करी । क्षेत्रीं तीर्थीं वा पुरीं । थारा न जाणे ॥६८८॥
अथवा रिकामटेकडा सरडा । खेपा करि व्यर्थ बूड ते शेंडा । हिंडणवारा कोरडा । तैसाचि तो ॥६८९॥
भूमीत रोविल्यावीण । थारा न जाणे रांजण । तैसे पडे तेव्हाचि स्वस्थपण । एरवी हिंडे ॥६९०॥
तयाचे ठायी उदंड । अज्ञान असे प्रचंड । जो चांचल्ये भावंड । मर्कटाचे ॥६९१॥
आणि अगा धनुर्धरा । जयाचिया अंतरा । न शिवे धरबंधाचा वारा । संयमाचिया ॥६९२॥
लोंढा येता ओढयासी । जुमानिना वाळूचे बांधासी । तैसा निषिद्ध कर्माचरणासी । जो न भीत ॥६९३॥
व्रते मध्येचि मोडी । स्वधर्मा लाथाडी । नियमांची सीमा तोडी । जयाची क्रिया ॥६९४॥
नाही पापाचा कंटाळा । न जाणे पुण्याचा लळा । लाजेचा बांध सगळा । खणूनि काढी ॥६९५॥
पाठमोरा कुळाचारीं । वेदाज्ञेसी ठेवी दुरी । कृत्य-अकृत्य विचारीं । निवड न जाणे ॥६९६॥
पोळ जैसा मोकाट । सुटे वारा अफाट । की फुटे पाट । विजनामाजी ॥६९७॥
आंधळा हत्ती मातला । डोंगरीं वणवा पेटला । तैसा विषसीं स्वैर सुटला । चित्तें जो गा ॥६९८॥
उकिरडयावरि काय न पडे ? । मोकाट ढोर कोणा न सापडे ? । कोण न ओलांडे । गाववेशीचा उंबरा ? ॥६९९॥
जैसे अन्नछत्री अन्न रांधिले । सामान्या अधिकार लाभले । अथवा कोण न शिवले । गणिकेचा उंबरठा ? ॥७००॥
तैसे जयाचे अंतःकरण । तयाचे ठायी संपूर्ण । अज्ञानाची खाण । समृद्ध असे ॥७०१॥
आणि विषयांची गोडी । जो जगता-मरताहि न सोडी । स्वर्गींही खावया जोडी । सामुग्री येथूनचि ॥७०२॥
जया अखंड ध्यान भोगाचे । व्यसन काम्यक्रियेचे । मुख देखोनि विरक्ताचे । सचैल स्नान करी ॥७०३॥
शिणोनि जाय विषय । परि हा न शिणे ना सावध होय । कुजल्या हाती खाय । कुष्ठरोगी जैसा; ॥७०४॥
गाढवी टेकू न देई । लाथांनी फोडी नाकाडही । तरी न माघार घेई । गाढव जैसे; ॥७०५॥
तैसा तो विषयांसाठी पाही । जळत्या आगीत उडी घेई । मिरवी व्यसनांचीही । लोणी अंगी ॥७०६॥
ऊर फुटोनि जाय । तरि मृगाची वाढे हाव । न गमे घेता धाव । की मृगजळ मायावी ॥७०७॥
जन्मापासुनि मृत्यूपर्यंत ऐसे । विषयी बहुतपरींनी ग्रासे । तरि न मुळी त्रासे । करी अधिकचि प्रेम ॥७०८॥
बाळदशेत पाही । आई-बा हेचि पिसे घेई । मग पुढे भुलोनि राही । स्त्रीलोलुप्यें; ॥७०९॥
भोगिता काळ जाय । येवो पाहे वार्धक्य । मग तोचि प्रेमभाव । नातवंडांसाठीही; ॥७१०॥
जैसी माय आंधळी । बाळासी कुरवाळी । तैसे मरेती न टाळी । विषयांसी जो; ॥७११॥
जाण तयाचे ठायी । अज्ञाना पार नाही । आता आणिक काही । लक्षणे सांगू ॥७१२॥
तर देह हाचि आत्मा । बाळगोनि ऐशा मनोधर्मा । प्रारंभ करी कर्मा । अगा जो काय ॥७१३॥
आणि उणे की पुरे । जे काही आचरे । तयाचे आविष्कारें । कुंथू लागे ॥७१४॥
डोईवरी देव्हारा ठेवून । देवर्षी घुमू लागे चेवून । तैसा विद्येने वयाने माजून । उताणा चाले ॥७१५॥
म्हणे मीचि एक आहे । माझेचि घरी संपत्ती वाहे । माझी आचरती रीत पाहे । आहे कोणा? ॥७१६॥
नाही माझेहुनि कोणी प्रसिद्ध । एक मीचि सर्वज्ञ सिद्ध । ऐसा गर्वतुष्टतेचा मद । घेऊनि ठाके ॥७१७॥
व्याधी लागल्या माणसा । नये भोग दावू जैसा । भले न साहे तो तैसा । इतरांचे ॥७१८॥
वात तेवढी खाय । तेल की जाळित जाय । ठेवावा तेथ होय । काजळी अवघी; ॥७१९॥
तडतडे पाणी शिंपडता । विझे वारा येता । जाळी घरा लागता । काडी उरू न देई; ॥७२०॥
थोडका प्रकाश करी । तितुक्यानेचि उष्मा भरी । ऐशा दीपापरी । सुविद्य जो ॥७२१॥
औषधानावें देता दूध । होय नवज्वरीं बाध । सर्पा देता उलटे विरुद्ध । विषचि होउनी ॥७२२॥
सद्गुणांचा मत्सर । विद्वत्तेचा अहंकार । तप-ज्ञानें अपार । ताठा जया; ॥७२३॥
अधम राज्यावरि बैसविला । अजगरें खांब गिळिला । तैसा गर्वें फुगला । देखसी जो ॥७२४॥
जो लाटण्याऐसा असे, लवेना । दघडाऐसा असे, पाझरेना । फुरसे चावले उतरेना । जैसे मांत्रिका ॥७२५॥
किंबहुना तयात पाही । अज्ञान ऐसे वाढत राही । हे निकराने तुजपाशीही । बोलतसे ॥७२६॥
आणिकही वेढिती पुष्कळ । गृह, देह, सामुग्री सकळ । तो न देखे मागील । जन्माते अगा; ॥७२७॥
कृतघ्नावरि उपकार केला । वा चोरा पैसा दिधला । निलाजरा स्तविला । विसरे जैसा ॥७२८॥
हाकलिले कान शेपूट कापुनी । ते तैसेचि ओले घेउनी । जैसे पुन्हा येई परतुनी । कोडगे कुत्रे ॥७२९॥
बेडुका सापाचे तोंडी । मिळे पुरती बुडी । परि माशांची हाव न सोडी । स्मरेना काही ॥७३०॥
तैसी नऊही द्वारे स्त्रवती । लूतभरली जिती । ज्यामुळे आली, ते चित्तीं । सलेना जया; ॥७३१॥
मातेचे उदरकुहरीं । राहुनी विष्ठेचे थरीं । उदरीं नवमासवरी । उकडला जो; ॥७३२॥
ती गर्भींची व्यथा । की जे जाहले उपजता । ते काहीचि सर्वथा । न स्मरे जो ॥७३३॥
मलमूत्रपंकी । लोळते बाळ अंकीं । देखोनि जो न थुंकी । न उबगे ॥७३४॥
कालचि ना जन्म गेला । उद्याचि पुढचा आला । हे काहीचि जयाला । वाटले ना कधी; ॥७३५॥
आणि गा याचिपरी । जीविताची भरारी । देखोनि न करी । मृत्युचिंता ॥७३६॥
जिण्याचे विश्वासें । मृत्यु एक येथ असे । हे जो मानसें । मानीचिना ॥७३७॥
डबक्यातील मासे । ते न आटेल ऐशा आशे । नच जाती जैसे । अथांग डोहा ॥७३८॥
अथवा गाण्यासी भुलत । मृग पारध्या न ओळखत । वा गळ न जाणता गिळित । आमिष मासा जैसा ॥७३९॥
दीपाचा प्रकाश गा । जाळील आपुल्या अंगा । हे न जाणवेचि पतंगा । ज्यापरी की ॥७४०॥
मूर्ख जैसा निद्रासुखें । घर जळते न देखे । वा अजाण जैसा विषें । रांधिले अन्न खाय ॥७४१॥
जीविताचे करुनि निमित्त । हा मृत्यूचि वसे येथ । जो राजससुखें न जाणत । हे काहीचि गा ॥७४२॥
शरीरींची वाढ । दिवसरात्रीची जोड । विषयसुख गाढ । साचचि मानी ॥७४३॥
परि बापुडा हे न जाणे । वेसवेचे सर्वस्व देणे । तेचि की नागवणे । मूर्तिमंत ॥७४४॥
सावचोराचे मित्रपण । तेचि मृत्यूसी आमंत्रण । भित्तिचित्रा घालणे स्नान । तेचि तया मरण; ॥७४५॥
पंडुरोगें अंग सुटणे । त्याचेचि नाव जीवित खुंटणे । हे भुले आहार-निद्रेने । निर्बुद्ध जो; ॥७४६॥
सन्मुख असे सूळ । धावते पाय चपळ । पाउलापाउला ये जवळ । मृत्यू जैसा; ॥७४७॥
तैसा देह जों जों वाढत । जों जों दिवस लोटत । जों जों विषयसुखीं निमग्न होत । भोगांमाजी ॥७४८॥
तों तों अधिकाधिक पुढे ठाके । मरण आयुष्यासी जिंके । मीठ जैसे उदकें । धुपुनी जाई ॥७४९॥
तैसे जीवित होय थोडे । आणि काळासी उजाडे । हे नित्यचि घडे । परि न ठावे जया ॥७५०॥
किंबहुन पांडवा । हा अंगींचा मृत्यू नित्य नवा । जयासि न ठावा । विषयमोहें; ॥७५१॥
तो अज्ञानदेशीचा कर्ताकरविता । या बोलासह पांडुसुता । न पडे गा उणीव आता । आणिक लक्षणांची ॥७५२॥
अगा जीविताचे सुखें । जैसा का मृत्यू न देखे । तैसाचि तारुण्यातोषें । वृद्धत्वा न गणी ॥७५३॥
कडयावरुनि लोटले गाडे । शिखरावरूनि सुटले धोंडे । तैसे न देखे जो पुढे । वार्धक्य आहे ॥७५४॥
आडरानी पाणी आले खळाळी । की रेडयांची झुंज मातली । तैसी तारुण्याची चढली । धुंदी जया ॥७५५॥
पुष्टता लागे विघरो । कांति पाहे ओसरो । मस्तकीं लागे भरो । कंप सतत ॥७५६॥
दाढी पिकुनि पांढरी । मान हालोनि वारी । वाढवी तो तरी । व्यर्थ पसारा ॥७५७॥
पुढली वस्तू उरीं आदळे । तरि न देखे जैसे आंधळे । वा डोळ्यांवरील गुंगीमुळे । आळशी संतोषे; ॥७५८॥
तैसे तरुणपण आजचे । भोगिता वृद्धत्व उद्याचे । न देखे तेचि साचे । अज्ञान गा ॥७५९॥
अशक्त कुबडा पाही । आणि गर्वें लागे वेडावूही । परि न म्हणे गत माझीही । उद्या हीचि होईल ॥७६०॥
आणि अंगीं जरेची । छाया ये मरणाची । परि तयाची तारुण्याची । भूल न उतरे ॥७६१॥
तो अज्ञानाचे घर । हे साचचि घे उत्तर । तैसीचि ऐक थोर । लक्षणे आणिक ॥७५२॥
तर वाघाचिये रानीं । एकवेळ दैवें ये चरोनि । त्या विश्वासें पुनरपि धावुनी । पोळ जाय तेथ; ॥७६३॥
द्रव्यावरी सर्प बैसलेला । तरि स्वस्थचित्तें ठेवा आणिला । एवढयानेही नास्तिक ठरला । निश्चित जो ॥७६४॥
अवचित तैसे पाही । क्वचित आरोग्य लाभेही । म्हणोनि रोग तेथ राही । हे मानीना जो ॥७६५॥
वैर्यासी आली नीज । आता द्वंद्वे सरली मज । म्हणे तो प्रजेसह निज । मुके प्राणा ॥७६६॥
तैसे आहार निद्रा व्यवस्थित । रोग जोवरी निवांत । तोवरी न करीत । व्याधीचिंता; ॥७६७॥
आणि स्त्रीपुत्रादींचे संगतीमुळे । संपत्ति जों जों फळफळे । तों तों त्या धुळीने डोळे । आंधळे होती जयाचे ॥७६८॥
क्षणात वियोग घडेल । एक दिवस विपत्ति येईल । हे काहीचि पुढील । देखेना जो; ॥७६९॥
तो अज्ञान होय पांडवा । आणि तोही अज्ञानचि जाणावा । जो इंद्रिये अवाच्यासवा । चारी येथ ॥७७०॥
तारुण्याचे सुखें । संपत्तीचे साहाय्यें फुके । सेव्य-असेव्य न देखे । सरसकट सेवी सर्व ॥७७१॥
न करावे ते करी । असंभाव्य ते मनी धरी । चिंतू नये ते चिंती अंतरीं । जयाची मति; ॥७७२॥
न शिरावे तेथ शिरतसे । न घ्यावे ते मागतसे । न लागावे तेथ स्पर्शे । अंग मन; ॥७७३॥
न जावे तेथ जाई । न पहावे ते पाही । न खावे ते खाई । तेणेचि तोषे; ॥७७४॥
न धरावी ति धरी संगत । संबंध जोडी नको तेथ । न आचरावा तो पथ । आचरे जो; ॥७७५॥
न ऐकावे ते ऐके । न बोलावे ते भुंके । परि दोष त्यातिल न देखे । आचरिता; ॥७७६॥
अंगा-मनासि रुचावे । मग कृत्य-अकृत्य न आठवे । जो करण्याचेही नावे । भलतेचि करी; ॥७७७॥
परि पाप घडेल । की नरकयातना होतील । हे काहीचि पुढील । देखेना जो; ॥७७८॥
तयाचे आश्रयें जगे । अज्ञान जगीं दांडगे । जे सज्ञानाचेहिसंगे । झोंबू शके ॥७७९॥
हे असो हे ठेवी ऐकून । आणिक अज्ञानचिन्हे जाण । जेणे तुज संपूर्ण । आकळे ते ॥७८०॥
तर जयाची पुरेपूर प्रीत । गुंतली देखसी घरात । टवटावीत कमलकेसरात । भ्रमरिणी जैसी ॥७८१॥
साखरेचे राशीवरून । न माशी जाय उडून । तैसे न उठे स्त्रीवरून । जयाचे मन ॥७८२॥
बेडूक वसे कुंडीं । चिलट गुंते शेंबुडीं । वा ढोर रुते बुडीं । चिखलात; ॥७८३॥
तैसे निघणे न हो घरातुनी । जिवंतपणी वा मरूनी । जो राहे साप होउनी । त्याचि जागी ॥७८४॥
प्रियोत्तमाचे कंठी । प्रमदा घाली मिठी । तैसी जिवेभावे खोपटी । धरुनी बैसे ॥७८५॥
मधलाभउद्देशें । मधुकर श्रमतसे । गृहसंगोपन तैसे । करी जो गा ॥७८६॥
म्हातारपणी जाहले । माणिक एक दैवबळे । तयाचे कौतुक जैसे आगळे । मातापितरां; ॥७८७॥
तितुकीचि जयासी पार्था, । घराविषयी प्रेम, आस्था । आणि स्त्रीवाचूनि सर्वथा । अन्य जाणेना जो; ॥७८८॥
सिद्ध पुरुषाचे अंतःकरण । ब्रहास्वरूपी होता निमग्न । थबके व्यवहार संपूर्ण । ज्यापरी गा; ॥७८९॥
तैसा स्त्रीदेहीं जो जीवें । पडोनिया सर्वभावे । कोण मी, काय करावे । काही न जाणे ॥७९०॥
हानि लाज न देखे । लोकापवाद न ऐके । जयाची इंद्रिये एकमुखें । स्त्रीकारणे केली ॥७९१॥
चित्त आराधी स्त्रीचे । स्त्रीचेचि छंदें नाचे । माकड की गारुडयाचे । जैसे होय ॥७९२॥
स्वतःसीही शिणवी । इष्टमित्रां दुरावी । कवडी कवडी वाढवी । लोभी जैसा; ॥७९३॥
दानपुण्यीं न वेची । गोत्रकुटुंबा वंची । परी भर करी स्त्रीची । उणे पडू न देई ॥७९४॥
आराध्यदैवता पूजी कसेबसे । गुरूसी बोलें चकवीतसे । मायबापा दावीतसे । अनुदारपण ॥७९५॥
परि स्त्रीसाठी औदार्याचा अतिरेक । भोगसंपत्ती अनेक । आणी वस्तू निवडक । जी जी देखे ॥७९६॥
प्रेमें ओथेंबल्या भक्ताने । जैसे की कुलदेवतेसी भजणे । तैसे एकाग्रचित्ताने । उपासी जो स्त्रीसी ॥७९७॥
जे चोख आणि परिपूर्ण । ते स्त्रीसीचि देई संपूर्ण । इतरांचे उदरभराण । तेही नाही ॥७९८॥
कोणी वाकडया दृष्टीने देखेल । तिचे विरुद्ध बोलेल । तर युगचि बुडेल । ऐसे गमे जया ॥७९९॥
नायटयासी भिऊन । न मोडावी नागाची आण । तैसी जपे मनची उणखुण । स्त्रियेची जो ॥८००॥
किंबहुना धनंजया, । स्त्रीचि सर्वस्व जया । आणि तिजपासुनि जाहल्या । अपल्यांलागी प्रेम ॥८०१॥
आणिकही समस्त । तिचे वैभवजात । ते जिवाहुनी आप्त । मानी जो गा; ॥८०२॥
तो अज्ञानाचे मूळ । अज्ञाना तयाचे बळ । हे असो, केवळ । अज्ञानमूर्ती तो ॥८०३॥
मातल्या सागरात । मोकळी सोडिली नाव तेथ । लाटांच्या येरझारात । आंदोळे जैसी; ॥८०४॥
तैसी प्रिय वस्तू पावे । आणि सुखें जो उंचावे । तैसाचि अप्रियासवे । रसातळा जाई ॥८०५॥
ऐसी जयाचे चित्तीं । सुखदुःखचिंतांची वसती । त्रिवार तो हे महामती । अज्ञान गा ॥८०६॥
आणि माझेठायी भक्ती । परि आस जया फळाप्रती । धनोद्देशें पांघरोनि विरक्ती । नटे जैसा; ॥८०७॥
अथवा स्वैरिणी जैसी । जाराकडे जावयासी । कांताचे शिरोनि मानसीं । पुढेपुढे करी; ॥८०८॥
अर्जुना त्यापरी । करुनि माझे भजनाची पायरी । जो विषयांवरी । दृष्टी ठेवी; ॥८०९॥
आणि जर भजनासवे । इच्छित विषय न पावे । तर भजन सोडूनी आघवे । टवाळी करी माझी ॥८१०॥
नाना उद्यम करी शेतकरी । तैसा अन्यअन्य देव धरी । आणि पहिल्याची परवड करी । तैसीचि दुसर्याची ॥८११॥
त्याचि गुरुमार्गा टेके । जयाचा थाटमाट देखे । तयाचाचि मंत्र शिके । अन्य न घेई ॥८१२॥
प्राणिमात्रासी निष्ठुर । पाषाणमूर्तीवरि बहु भर । तैसीचि नाही एकाहीवर । श्रद्धा जयाची ॥८१३॥
माझी मूर्ती घडवी । ती घराचे कोनीं बसवी । आपण करित देव-देवी । यात्रेसी जाय ॥८१४॥
नित्य आराधन माझे । कार्यीं कुलदेवता भजे । पर्वविशेषें पूजे । अन्य देवा ॥८१५॥
माझे अधिष्ठान असता घरी । व्रत-नवस अन्यांचे करी । पितृकार्य-अवसरीं । पितरांचा होय ॥८१६॥
एकादशीचे दिवशी । जितुका मान आम्हांसी । तितुकाचि नागांसी । नागपंचमीसी ॥८१७॥
चतुर्थी नेमकी पाही । आणि गणेशाचाचि होई । चतुर्दशीसि म्हणे आई । तुझाचि गे अंबे ॥८१८॥
नित्य-नैमित्तिक कर्मे सोडी । मग अनुष्ठी नवचंडी । आदित्यवारी वाटी खिचडी । बहिरोबाचे नावें ॥८१९॥
मग सोमवार पावे । आणि बेलासह लिंगा धावे । ऐसे एकलाचि आघवे । सेवितसे जो ॥८२०॥
अखंड भजन करी । उगा नसे क्षणभरी । अवघ्यांची जैसी गावद्वारीं । अखंड सौभाग्यवती ॥८२१॥
तैसाचि जो गा भक्त । देखसी सैराट धावत । जाण अज्ञानाचा मूर्त । अवतार तो ॥८२२॥
आणि उत्तम एकांत । तपोवन, नदीतट, तीर्थ । देखोनि जो गा विटत । तोही अज्ञानचि ॥८२३॥
जया जनसमाजीं सुख । गजबजीचे कौतुक । वर्णिला आवडे लौकिक । तोही तोचि ॥८२४॥
आणि आत्मा गोचर होई । ऐसी विद्या असे काही । ती ऐकोनि उपहासेही । विद्वान जो ॥८२५॥
उपनिषदे न वाचे । योगशास्त्र न रुचे । अध्यात्मशास्त्रीं जयाचे । मनचि नाही ॥८२६॥
आत्मचर्चा एक महत्त्वाची । भिंत पाडुनि या विचाराची । मति धावे जयाची । स्वैर ओढाळ ॥८२७॥
कर्मकांड तर जाणे । मुखोद्गत पुराणे । स्वतःसि निष्णात ज्योतिषी म्हणे । तो सांगे तैसेचि होय ॥८२८॥
शिल्पकलेत निपुण । पाकशास्त्रीं प्रवीण । वशीकरण जारणमारण । हस्तगत तया ॥८२९॥
कामशास्त्र शिकण्याचे नुरले । भारत मुखोदगत केले । मंत्रशास्त्र मूर्तिमंत्र जाहले । स्वाधीन तया ॥८३०॥
नीतिशास्त्र समजे । वैद्यकही उमजे । काव्यनाटकीं दुजे । चतुर तयासम नाही ॥८३१॥
स्मृतींची करी चर्चा । मर्मज्ञ इंद्रजलाचा । शब्दकोश वेदाचा । चकरचि तया ॥८३२॥
व्याकरणीं हातखंडा । तर्कंशास्त्रीं अति गाढा । एके अध्यात्मज्ञानीं तेवढा । जन्मांध जो ॥८३३॥
अवघ्या शास्त्रीं त्यावाचुनि एका । तो सिद्धांतनिर्मितीची भूमी देखा । परि जळो ति, पहावे का । मूळनक्षत्रींचे मूळ ? ॥८३४॥
मोराचे अंगी पिसे पाही । वरी असंख्य डोळेही । परि दृष्टी नसे एकाही । तैसे गा हे ॥८३५॥
जर परमाणुहिएवढे । संजीवनीमूळ जोडे । तर बहु काय भरणे गाडे । अन्य मुळांचे ? ॥८३६॥
दीर्घायुविण भली अन्य लक्षणे । शिर नसलेल्या अलंकरणे । वधुवरांविण मिरविणे । ती विटंबना गा ॥८३७॥
तैसे शास्त्रजात जाण । आघवेचि अप्रमाण । एके अध्यात्मशास्त्राविण । निश्चित गा ॥८३८॥
यालागी अर्जुना पाही । या अध्यात्मज्ञानाठायीही । तया नित्य जागति नाही । शास्त्रमूढा; ॥८३९॥
तया प्राप्त जे शरीर । तो अज्ञानबीजाचा अंकुर । आणि विद्वत्ता भारंभार । ती अज्ञानवेलचि ॥८४०॥
तो जे जे बोले । ते अज्ञानचि फुलले । आणि तयाचे पुण्य जे फळले । तेही अज्ञानचि गा ॥८४१॥
आणि अध्यात्मज्ञान जे काय । जयाने मानिले न होय । तो न देखे ब्रह्म, जे ज्ञानविषय । हे का सांगावे लागे ? ॥८४२॥
ऐलथडीसी न पोचता । पळे जो मागुता । तया पैलथडीची वार्ता । कैसी कळावी ? ॥८४३॥
अथवा रोविले खाचेत उंबर्याचे । शिर खांडूनि जयाचे । अगा, तो अंतर्गृहीचे । कैसे देखे ? ॥८४४॥
तैसे अध्यात्मज्ञानाशी न होय । जयाचा अल्पही परिचय । तो ब्रह्य जे ज्ञानविषय कैसे देखणार ? ॥८४५॥
तो ज्ञानाचे तत्त्व न देखे । हे आकडेमोडीने लिहूनि फुके । न सांगावे लागे तुज एके । विशेषसे ॥८४६॥
जेव्हा गर्भवतीसी वाढिले । तेव्हाचि पोटींचे तृप्त झाले । तैसे अज्ञानही विवरिले । ज्ञानलक्षणे कथिता ॥८४७॥
यावाचुनि वेगळे आता । स्पष्टीकरण नलगे पंडुसुता । जैसे अंधा आमंत्रिता । दुज्यासह ये ॥८४८॥
ऐसे गा उलट रीतिने । अमानित्वादि ज्ञानचिन्हे । वळवुनि मागुती, वाखाणणे- । आरंभिले ॥८४९॥
कारण ज्ञानलक्षणे अठरा । फिरविता मोहरा । अज्ञान या आकारा । सहजी येती ॥८५०॥
मागे श्लोकीं एके । कथिले रमानायकें । उफराटी करिता ज्ञानपदे, ठाके- । तेचि अज्ञान ॥८५१॥
म्हणोनि या ओघात । विस्तारपूर्वक केले श्लोकार्थ । पाणी मिसळुनी वाढवीत । दूध जैसे ॥८५२॥
तैसे जी, मी न बडबडे । श्लोकसीमा न ओलांडे । परि जाहलो निमित्त तेवढे । मूळ अर्थाचे वाढीसी ॥८५३॥
तेव्हा “हे राहो”, म्हणती श्रोतेजन । “कशासि करिसी दोषनिरसन ? । उगा बोलसी भिऊन । कविपोषका ॥८५४॥
आम्ही जे अभिप्राय आपुले । गीतागुहेत गुप्त ठेविले । ते तू प्रकट करी ऐसे कथिले । श्रीमुरारीने तुज; ॥८५५॥
ते देवाचे मनोगत । दावित आहेसी तू मूर्त । हेही म्हणता तुझे चित्त । दाटुनि येईल ॥८५६॥
म्हणोनि असो हे बोलणे । तोषविले सहजपणे । तुझिये ज्ञाननौकेने । श्रवणसुखाचिया ॥८५७॥
आता यावरी । जे तो श्रीहरी । बोलिला ते करी । कथन वेगे” ॥८५८॥
या संतवाक्यासरिसे । म्हटले श्रीनिवृत्तिदासें । जी, अवधारा तरी, ऐसे । बोलिले देवें ॥८५९॥
म्हणती, तुवा पांडवा । हा चिन्हसमुच्चय आघवा । ऐकिला तो जाणावा । अज्ञानभाग ॥८६०॥
या अज्ञानविभागा । पाठ फिरवुनी गा । भला ज्ञानांगा । दृढ होई ॥८६१॥
मग निर्वाळिल्या ज्ञानें । मन भेदील ज्ञेया, म्हणे । ते जाणावया अर्जुनें । आस केली ॥८६२॥
तेव्हा सर्वज्ञांचा राव । म्हणे जाणोनि तयाचा भाव । ऐक ज्ञेयाचा अभिप्राय । सांगू आता ॥८६३॥
ज्ञेय ते सांगतो ज्याच्या ज्ञानाने अमृतत्वचि
अनादि जे परब्रह्म आहे नाही न बोलवे ॥१२॥
तर ज्ञेय ऐसे म्हणणे । ब्रह्मासि याचिकारणे । की ते ज्ञानाविण कोणे । उपायें न लाभे ॥८६४॥
आणि जाणिल्यावरी ते । काहीचि करणे नुरते । जाणणार्यासि करिते । तन्मय गा ॥८६५॥
जे ज्ञेयस्वरूप जाणावे । संसारकुंपण तोडावे । पोटीं जिरोनि जावे । नित्यानंदाचे ॥८६६॥
ते ज्ञेय गा ऐसे । आदि जया नसे । परब्रह्म सहजसे । नाव जया ॥८६७॥
ते नाही म्हणू जावे । तर विश्वाकारें दिसे आघवे । आणि ते विश्व ऐसे म्हणावे । तर विश्व हाचि भास ॥८६८॥
रूप वर्ण आकार नाही । ना दृष्य-द्रष्टा स्थितीही । तर कोणा कैसे म्हणता येई । आहे ऐसे गा ? ॥८६९॥
आणि साचचि जर नाही । तर महत्तत्त्वादि स्फुरे कोणे ठायी ? । तेवीचि कैसे काय काहीही । तयाविण असे ? ॥८७०॥
म्हणोनि आहे-नाही ही बोली । जे देखोनि मूक जाहली । विचारांची मोडली । वाट जेथ ॥८७१॥
जैसे डेरा परळ घागर- । यात मातीचि असे तदाकार । तैसे सर्व होऊनि सर्वत्र- । असे जे ब्रह्म ॥८७२॥
सर्वत्र दिसती ज्यास हात पाय शिरे मुखे
कान डोळेहि सर्वत्र झाकूनि जे उरे ॥१३॥
अवघ्याचि देशीं काळीं । न होता देशकाळावेगळी । जी क्रिया होय सूक्ष्मीं स्थूळीं । तेचि जयाचे हात ॥८७३॥
तयाते याचि कारणत्वें । विश्वबाहू ऐसे म्हणावे । जे सर्वचि सर्वस्वें । सर्वदा करी ॥८७४॥
आणि समस्तांही ठाया । एकेचि काळी धनंजया । आले आहे म्हणोनि जया । विश्वचरण हे नाव ॥८७५॥
अगा सूर्या अंग डोळे । नाहीत वेगवेगळे । तैसे जे स्वयंप्रकाशामुळे । सर्वत्र पाहणारे ॥८७६॥
म्हणोनि या अचक्षूस । विश्वतश्चक्षू म्हणण्यास । वेद आदरें दक्ष । जाहला असे ॥८७७॥
जे सर्वांचिये शिरीं । नित्य नांदे सर्वतोपरी । ऐसिये स्थितीवरी । तया विश्वमूर्धा म्हणती ॥८७८॥
अगा स्वरूप तेचि मुख । अग्नीचे जैसे देख । तैसे सर्वपणे अशेष । भोगी जे ॥८७९॥
यालागी तया पार्था । विश्वतोमुख ही नामव्यवस्था । आली वाचेचिये पथा । श्रुतीचिया ॥८८०॥
आणि वस्तुमात्रीं गगन । जैसे असे संलग्न । तैसे शब्दमात्रीं कान । सर्वत्र जया; ॥८८१॥
म्हणोनि आम्ही तयाते । म्हणू सर्वत्र ऐकते । ऐसे जे सर्वांते । व्यापुनी असे ॥८८२॥
एरवी तरी हे महामती । विश्वतश्चक्षू आदिपरींनी श्रुती । तयाचे व्यापकत्व दर्शविती । रूपक करुनी ॥८८३॥
वस्तुत: नेत्र हात पाय ही । भाषा तेथ कोठे काही ? । सर्व शून्यत्वाचाहि न साही । निष्कर्ष जे ॥८८४॥
अगा कल्लोळाते कल्लोळें । ग्रासिले ऐसे कळे । परि ग्रासिते ग्रासावेगळे । आहे काय ? ॥८८५॥
अगा साचचि जे एक । तेथ कोठले व्याप्य व्यापक ? । परि बोलता क्षणिक । भेद करावा लागे ॥८८६॥
अगा शून्य जेव्हा दावावे । तेव्हा बिंदुले लागे काढावे । तैसे अद्वैत सांगावे । तेव्हा द्वैत करावे लागे ॥८८७॥
एरवी तरी पार्था । गुरु-शिष्य सत्पथा । अडथळा येउनी सर्वथा । बोलणेचि खुंटे ॥८८८॥
म्हणोनि गा श्रुती । द्वैतभावें अद्वैती । निरूपणाची वाहती । वाट करिती ॥८८९॥
तेचि आता अवधारी । या नेत्रगोचर आकारी । ते ज्ञेय ज्यापरी । व्यापुनी असे ॥८९०॥
असूनि इंद्रियातीत त्यांचे व्यापार भासवी
न स्पर्शता धरी सर्व गुण भोगूनि निर्गुण ॥१४॥
तर ते गां किरीटी ऐसे । अवकाशीं आकाश जैसे । की वस्त्र होऊनि असे । तंतू जैसा ॥८९१॥
उदक होउनी उदकीं । रस जैसा अवलोकीं । दीपपणे दिपकीं । तेज जैसे ॥८९२॥
कर्पूरत्वें कापुरीं । सौरभ्य असे ज्यापरी । शरीररूप होउनि शरीरीं । कर्म जैसे ॥८९३॥
किंबहुना पांडवा, । सोनेचि सोनियाचा रवा । तैसे जे या सर्वा । सर्वांगीं असे ॥८९४॥
रवेपणामाजी असे । तेव्हा रवाचि गमतसे । परि रवेपणाचे रूप मोडे जसजसे । सोने सोन्याचिऐसे ॥८९५॥
अगा ओघचि वाकडा असे । परि पाणी सरळ जैसे । लोहीं अग्नि प्रवेशे । परि लोह न हो अग्नी ॥८९६॥
घटाकारें वेटाळे । तेव्हा नभ गमे वाटोळे । मठात आकारबळें । चौकोनी दिसे ॥८९७॥
आकाश हे जैसे । अवकाश न होतसे । तैसेचि ब्रह्म विकारी नसे । इंद्रियें, गुणें विकारूनीही ॥८९८॥
मन इंद्रियांत प्रमुख । गुणात सत्त्वगुण चोख । त्यासम असे ब्रह्म देख । वरवर पाहता ॥८९९॥
गुळाची गोडी परी । नसे ढेपेच्या आकारी । तैसी ब्रह्माठायी खरोखरी । नसती गुणइंद्रिये ॥९००॥
अगा क्षीरदशेत जैसे । घृत क्षीराकारे असे । परि क्षीरवि घृत नसे । कपिध्वजा; ॥९०१॥
तैसे जे असे या विकारीं । परि विकार नसे, अवधारी । अगा बुगडी दिसे आकारीं । एरवी सोनेचि ते ॥९०२॥
ह्या मराठीत उघड जाणावे । अर्जुना मी सांगे परिसावे । ब्रह्म वेगळे देखावे । गुण-इंद्रियांपासुनी ॥९०३॥
नाम-रूप-संबंध । जाति-क्रिया भेद । हा आकारासीचि प्रवाद । वस्तूसी नव्हे ॥९०४॥
ब्रह्म ते गुण न कधीही । गुणासि तयाचा संबंध नाही । तरि गुण तयाचेचि ठायी । आभासती ॥९०५॥
एवढयाचिमुळे पार्था, । अज्ञानजनांचे चित्ता । ब्रह्मचि गुणधारणकर्ता । ऐसे गमे ॥९०६॥
ते गा धरणे ऐसे । अभ्रासि जैसे आकाशें । अथवा प्रतिबिंब जैसे । आरशाने ॥९०७॥
सुर्याचे प्रतिबिंब तेजाळ । जैसे धरी सलिल । अथवा रश्मिकरीं मृगजळ । धरिले जाय ॥९०८॥
तैसे गा संबंधावाचून । या सर्वां धरी ब्रह्म निर्गुण । एरवी ती व्यर्थचि जाण । मिथ्यादृष्टी ॥९०९॥
आणि निर्गुण ब्रह्माने यापरी । गुण ते भोगणे नातरी । रंक की राज्य करी । स्वप्नीं जैसे ॥९१०॥
म्हणोनि गुणांचा संग । वा गुणभोग । हा निर्गुण ब्रह्माशी लाग । म्हणू नये ॥९११॥
जे एक आतबाहेर जे एकचि चराचर
असूनि जवळी दूर सूक्ष्मत्वें नेणवेचि जे ॥१५॥
नाना अग्नीत उष्णता । एकचि जैसी पांडुसुता, । तैसे चराचरीं भूतीं पाहता । ब्रह्म अभेदें वसे ॥९१२॥
तैसेचि अविनाशरूपें । जे सूक्ष्मदशेत व्यापे । ते जाणावे विनादीपें । ज्ञेय येथ ॥९१३॥
जे एक आत आत बाहेरी । जे एक जवळी दुरी । ज्या एकावाचुनी परी । दुजी नाही ॥९१४॥
गोडी क्षीरसागरीं । मध्ये बहु थोडी न तीरीं । येथही तैशाचि परी । पूर्ण जे गा ॥९१५॥
अगा स्वेदज प्रभृती । वेगळात्या भूतीं । जयाची व्याप्ती । अपार असे ॥९१६॥
पार्था, हे श्रोतेमुखटिळका । घटसहस्त्रात अनेकां- । बिंबोनिही चंद्रिका । न भेदे जैसी ॥९१७॥
लवणकणांची असो रासही । क्षारता एकचि पाही । मोळीत वा एका उसातही । एकचि गोडी जैसी ॥९१८॥
भूतमात्रीं न भेदूनि राहिले भेदिल्यापरी
भूतांस जन्म दे पाळी गिळी जे शेवटी स्वयें ॥१६॥
अनेक भुतमात्रीं पाही । जे सरिसे व्यापुनि राही । पार्था विश्वकार्यासीही । कारण जे गा ॥९१९॥
म्हणोनि जेथुनि जन्मे हा भूताकार । ते ब्रह्मचि तया आधार । लाटेसी सागर । ज्यापरी गा ॥९२०॥
वा बाल्यादि तिन्ही अवस्थातही । काया एकचि जैसी ही । तैसे आदि स्थिति लयींही । अखंड जे ॥९२१॥
सायंप्रातर्मध्यान्ह । होता जाता दिनमान । जैसे का गगन । पालटेना ॥९२२॥
अगा उत्पत्तीचे वेळी प्रियोत्तमा । जया नाव म्हणती ब्रह्मा । स्थितिकाळीं जे विष्णु नामा । प्राप्त जाहले ॥९२३॥
मग जगदाकार हा हरपे । तेव्हा राहे जे रुद्ररूपें । उत्पत्ति-स्थिति-लयही-लोपे । तेव्हा राहे जे शून्यब्रह्म ॥९२४॥
नभाचे शून्यत्व गिळून । या गुणत्रयाते नुरवून । जे शून्य ते महाशून्य जाण । हे श्रुतिवचनसंमत ॥९२५॥
जे अंधारास अंधार तेजाचे तेज बोलिले
ज्ञानाचे ज्ञान ते ज्ञेय सर्वांच्या हृदयी वसे ॥१७॥
ब्रह्म जे अग्नीचे उद्दीपन । जे चंद्राचे जीवन । देखती सूर्याचे नयन । जयाचे दीप्तीने ॥९२६॥
जयाचे उजाळें । तारांगण उजळे । सविता वावरे त्यामुळे । सुखेनैव ॥९२७॥
जे आदींचा आदि । जे वृद्धीची वृद्धी । बुद्धीची जे बुद्धी । जिवाचा जीव ॥९२८॥
जे मनाचे मन । जे नेत्राचे नयन । जे श्रवणाचे कान । वाचेची वाचा ॥९२९॥
जे प्राणाचा प्राण । जे गतीचे चरण । क्रियेचे कर्तेपण । जयाचेचि ॥९३०॥
आकार जेणे आकारे । विस्तार जेणे विस्तारे । संहार जेणे संहारे । पांडुकुमरा ॥९३१॥
जे मेदिनीची मेदिनी । जे पाणी पिउनि असे पाणी । तेजा दिवेलावणी । जेणे तेजें ॥९३२॥
जे वायूचा श्वासोच्छ्वास । जे गगनाचा अवकाश । हे असो, अवघाचि आभास । आभासे जेणे ॥९३३॥
किंबहुना पांडवा । जे आघवेचि असे आघवा । जेथ नाही द्वैतभावा । शिरकाव ॥९३४॥
जे देखल्याचिसवे । दृश्य द्रष्टा हे आघवे । एकवट कालवे । सामरस्यें ॥९३५॥
मग तेचि ज्ञान । तेचि आता ज्ञेय जाण । ज्ञानें जाणावे जे स्थान । तेही तेचि ॥९३६॥
जैसे सरता गणित । अंक एक होत । तैसे ऐक्यासि येत । साध्यसाधनादिक ॥९३७॥
न लागे ज्या ठायी । द्वैतव्यवहाराची वही । हे असो, जे हृदयीं । सर्वांच्या असे ॥९३८॥
संक्षेपें वर्णिले क्षेत्र ज्ञान ज्ञेय तसेचि हे
जाणूनि भक्त जे माझा माझे सायुज्य मेळवी ॥१८॥
आधी तुजपुढे ऐसे । क्षेत्र दाविले असे । सुहृदा, सुस्पष्टसे । विवेचुनी ॥९३९॥
तैसेचि क्षेत्रामागून । जे देखू शकती तुझे नयन । किरीटी. तेही ज्ञान । सांगितले ॥९४०॥
अज्ञानाचेही इतुके । निरूपण केले कौतुकें । जोवरि बुद्धि तुझी टेके । पुरे म्हणे ॥९४१॥
आणि देउनिया दृष्टांत । उपपत्तीसह तुज येथ । ज्ञेय साद्यंत । निरूपिले ॥९४२॥
हा आघवाचि विचार । बुद्धीत भरोनि सत्वर । माझिये प्राप्तीस्तव चतुर । मजकडे येती ॥९४३॥
देहादि सर्व विषयातुनी । अगा संन्यस्त राहूनी । जीव मजठायी जयांनी । वतनदार केला ॥९४४॥
हे जाणोनिया अंतीं । जे चित्त मज अर्पिती । मज त्या ठायी स्थापिती । आणि मीचि होती ॥९४५॥
मीचि होण्याची परी । ही मुख्य गा अवधारी । सोपी सर्वात धनुर्धारी । रचिली आम्ही ॥९४६॥
डोंगरकडयासी पायरी करावी । अंतराळीं मचाणे बांधावी । खोल जळीं तराया घ्यावी । नाव जैसी ॥९४७॥
एरवी हे अवघेचि आत्मा । हे सांगू जरि वीरोत्तमा । तरि तुझिया मनोधर्मा । न रुचेल ॥९४८॥
ब्रह्मचि एक सर्वत्र भरलेले । तरि चार प्रकारें तुज कथिले । कारण मंदपण देखिले । तुझिये प्रज्ञेचे ॥९४९॥
अगा बाळा जेवू घालावे । तेव्हा घास वीस ठायी करावे । तैसे ब्रह्मचिएक मनोभावें । सांगितले चार परींनी ॥९५०॥
एक क्षेत्र एक ज्ञान । एक ज्ञेय एक अज्ञान । हे भाग केले जाणून । अवधान तुझे ॥९५१॥
आणि एवढे करुनिही पार्था । जर हा अभिप्राय तुज हाता- । न ये तर ही व्यवस्था । पुन्हा एकवार सांगू ॥९५२॥
आता चार ठायी न करू । ब्रह्म एकचि म्हणोनिहि न सारू । प्रकृति-पृरुष ह्यांसि धरू । एकाचि तोलाचे ॥९५३॥
परि तुवा इतुके करावे । मागू ते आम्हा द्यावे । अगा, कान करुनि ऐकावे । सर्वांगाचे ॥९५४॥
या श्रीकृष्णाचिया बोला । पार्थ रोमांचित जाहला । देव म्हणती, तू भला । नयेसि उचंबळू ॥९५५॥
ऐसा अर्जुनाचा हर्षावेग । आवरोनि म्हणे । श्रीरंगु, । आता प्रकृति-पुरुष विभाग । ऐक, सांगतो ॥९५६॥
प्रकृति-पुरुषाची ही जोडी जाण अनादि तू
प्रकृतीपासुनी होती विकार गुण सर्वहि ॥१९॥
ज्या मार्गाते जगीं । सांख्य मार्ग म्हणती योगी । तयाचे प्रशंसेलागी । मी कपिलावतारी जाहलो ॥९५७॥
निर्दोष तो ऐक । प्रकृति-पुरुष विवेक । म्हणे आदिजनक । अर्जुनाते ॥९५८॥
तर पुरुष अनादि हे सुमती । त्याची सहचरी प्रकृती । दिवस-रात्र दोन्ही चालती । सवे जैसी ॥९५९॥
अगा रूप नसे भास वाया । परि रूपासंगे ये छाया । जैसा कणिसात वाढे धनंजया । धान्यकणासह कोंडा ॥९६०॥
तैसी दोन्ही येथ एकवटती । प्रकृति-पुरुष प्रकटती । अनादिसिद्धचि ती । जुळी जैसी ॥९६१॥
अगा क्षेत्र या नावें । जे कथिले आघवे । तेचि एक जाणावे । प्रकृति म्हणोनि ॥९६२॥
आणि क्षेत्रज्ञ या नावें । जया म्हटले असे पहे । तो पुरुष वेगळे हे । बोलावे न लागे ॥९६३॥
ही असती अन्य अन्य नावे । परि निरूपावे ते अन्य नव्हे । हे वर्म तुवा न चुकावे । पुन्हा पुन्हा ॥९६४॥
तर केवळ जी सत्ता । तो पुरुष गा पांडुसुता । प्रकृति हे तत्त्वता । सकळ क्रियांसी नाव ॥९६५॥
इंद्रिये, अंतःकरण, बुद्धी- । हे विकारसमूह इत्यादी । आणि ते सत्त्वादी । तिन्ही गुण; ॥९६६॥
हा अवघाचि मेळावा । प्रकृतिपासुनि जाहला जाणावा । हेचि कारण असे संभवा । कर्माचिया ॥९६७॥
देहेंद्रियांचे कर्तुत्व बोलिले प्रकृतीकडे
दुःखा-सुखाचे भोक्तृत्व बोलिले पुरुषाकडे ॥२०॥
तेथ इच्छा आणि बुद्धी । घडविती अहंकारा आधी । मग तया लाविती नादी । कारणाचे ॥९६८॥
तेचि कारण मिळवावया । सूत्र धरणे ही शरीरक्रिया । तया नाव धनंजया, । कार्य हे गा ॥९६९॥
आणि इच्छा मदाचे आश्रयें । राहुनी मनाते उठवे । राहाटवी मन-इंद्रिये । हे कर्तृत्व गा ॥९७०॥
म्हणोनि तिन्ही या जाणा । कार्य-कर्तृत्व-कारणा । प्रकृति मूळ, हे राणा । सिद्धांचा म्हणे ॥९७१॥
या तिहींचे समन्वयीं । प्रकृति कर्मरूप होई । परि जो गुण विशेषत्वा येई । तयाचिसारिखी ॥९७२॥
सत्त्वगुणाधिष्ठित जे । ते सत्कर्मीं साजे । रजोगुणें निपजे । ते मध्यमकर्म ॥९७३॥
अगा तमोगुणें केवळ । घडती जी कर्मे सकळ । ती अधम निषिद्ध पोकळ । जाणावी तुवा ॥९७४॥
ऐसे बरे-वाईट कर्म जे । ते प्रकृतिपासुनी निपजे । तयापासूनि उपजे । ते सुख-दुःख गा ॥९७५॥
दुष्कर्मीं दुःख निपजे । सत्कर्मीं सुख उपजे । त्या दोहींचे घडती जे । भोग पुरुषा ॥९७६॥
सुखदुःखे जोवरी । उपजती खरोखरी । तोवरी प्रकृति उद्यम करी । पुरुष भोगी ॥९७७॥
प्रकृति-पुरुषाचे व्यवहारजात । सांगता अघटित । जेथ बायको मिळवीत । नवरा खाय ॥९७८॥
नवरा-बायको यातही । संबंध होत नाही । तरी बायको जग प्रसवी । नवल ऐक ॥९७९॥
बांधिला प्रकृतीने तो तिचे ते गुण भोगितो
गुणसंगामुळे ह्यास घेणे जन्म शुभाशुभ ॥२१॥
पंगु तो अंगहीन । एकला द्रव्यहीन । तो अतिवृद्धाहून । जीर्ण वृद्ध ॥९८०॥
तया म्हणती पुरुष देख । एरवी स्त्री ना नपुंसक । किंबहुना अमुक एक । निश्चित नव्हे ॥९८१॥
अचक्षु अश्रवण । अहस्त अचरण । रूप ना वर्ण । नाव नसे ॥९८२॥
अर्जुना, काहीचि जेथ नाही । तो प्रकृतीचा भ्रतार, पाही । परि भोगणे ऐशाही । सुख-दुःख ॥९८३॥
तो तर अकर्ता । उदास अभोक्ता । परि ही पतिव्रता । भोगवी तया ॥९८४॥
ही अल्पसा तरी । रूपगुणांचा विभ्रम करी । प्रत्यक्षात आणी वरी । कोणताही खेळ ॥९८५॥
तर या प्रकृतीस्तव । गुणमयी हेचि नाव । किंबहुना सावयव । गुण तेचि ही ॥९८६॥
ही प्रतिक्षणीं नित्य नवी । रूप गुणांचीच आघवी । जडातेही माजवी । हिचा माज ॥९८७॥
जडासी नावे लाभत । स्नेह ही स्निग्ध करित । इंद्रिये प्रबुद्ध होत । हिचेचियोगे ॥९८८॥
कय मन हे नव्हे नपुंसक ? । परि भोगवी तया तिन्ही लोक । ऐसे अलौकिक । करणे हिचे ॥९८९॥
ही भ्रमाचे महाद्वीप । व्याप्तीचेही रूप । विकार अमाप । हिने केले ॥९९०॥
ही कामवेलीच्या मांडवीं । मोहवनींची माधवी । हिचे प्रसिद्धचि दैवी । माया हे नाव ॥९९१॥
ही वाङ्मयाची वाढ । साकारतेची जोड । प्रपंचाची टोळधाड । अखंड ही ॥९९२॥
कला येथुनी जाहल्या । विद्या हिनेचि केल्या । इच्छा ज्ञान क्रिया । प्रसवली ही ॥९९३॥
ही नादाची टांकसाळ । ही चमत्काराचे राऊळ । किंबहुना सकळ । खेळ हिचा ॥९९४॥
जे उत्पत्तिप्रलय होत । ते हिचे सायं-प्रात । हे असो, अद्भुत । मोहजाल हे ॥९९५॥
ही अद्वयाची जोडीदारीण । निःसंगाची सांगातीण । निराकारासवे घरधनीण । नांदत असे ॥९९६॥
हिची एवढयावरुनिचि । थोरवी सौभाग्यप्राप्तीची । तया आवरी हीचि । अनावराते ॥९९७॥
तयाचे तर ठायी । सर्वथा काही नाही । परि तया तया आघवेही । आपणचि होय ॥९९८॥
त्या स्वयंभूची उत्पत्ती । त्या अमूर्ताची मूर्ती । आपण होय स्थिती । ठावही तयाचा ॥९९९॥
त्या आसहीनाची आस ती । त्या पूर्णाची तृप्ती । त्या अकुळाची जात, गा सुमती । आणि गोतही ॥१०००॥
निराकाराचा आकार । त्या निर्व्यापाराचा व्यापार । जिरहंकाराचा अहंकार । होऊनि ठाके ॥१००१॥
त्या अवर्णनीयाचे लक्षण । त्या अपाराचे प्रमाण । त्या अमनस्काचे मन । बुद्धीही होय ॥१००२॥
त्या अनामाचे नाम । त्या अजन्माचे जन्म । आपण होय कर्म । क्रिया तया ॥१००३॥
त्या निर्गुणाचे गुण । त्या अचरणाचे चरण । त्या अश्रवणाचे श्रवण । अचक्षूचे चक्षू ॥१००४॥
त्या भावातीताचे भाव । त्या निरवयाचे अवयव । किंबहुना होय सर्व । पुरुषाचे ही ॥१००५॥
ऐसी ही प्रकृती । जिची इतुकी सर्व व्याप्ती । त्या अविकारा ती । विकृतीत ओढी ॥११०६॥
जे असे पुरुषपण । ते प्रकृतिवशेचि जाण । चंद्रमा तेजोहीन । अवसेसी जैसा ॥१००७॥
हीण गुंजभरचि असावे । चोख सोन्यात मिसळावे, । तरी कस उणावे । ज्यापरी गा ॥१००८॥
हडळ सज्जनाते कवटाळी । संचरोनि ढकली अमंगळीं । मळभ दाटुनी आभाळीं । सुदिनाचा करी दुर्दिन ॥१००९॥
दुध गायीचे उदरीं । वन्हि लपला काष्ठांतरी । गुंडाळिला रत्नदीप वस्त्रीं । न दिसती जैसे ॥१०१०॥
जैसा राजा पराधीन । वा सिंह रोगें गांजून । तैसा पुरुष प्रकृतिआधीन । स्वतेजा मुके ॥१०११॥
कोणाही जागृतासी । निद्रा येता जैसी । तो स्वप्नींच्या सुखदुःखासी । वश होई ।१०१२॥
तैसा पुरुष प्रकृतीसी जडे । तया गुण भोगणे भाग पडे । जैसा विरक्त जखडे । स्त्रीयोगें गा ॥१०१३॥
तैसे त्या अजन्मा नित्यासि होय । अंगीं जन्ममृत्यूचे पडती घाव । जेव्हा तो वेढिला जाय । गुणसंगें ॥१०१४॥
पार्था ते ऐसे होई । घण मारिता तप्त लोहीं । ते अग्नीसीचि घाव पाही । बैसती ज्यापरी ॥१०१५॥
अथवा आंदोळता उदक । प्रतिमा होत अनेक । ते अनेकत्व लावित । लोक चंद्राअंगीं ॥१०१६॥
दर्पणाचे जवळिकीने देखा । दुजेपण जेसे ये मुखा । अथवा कुंकुमें स्फटिका । लाली येई ॥१०१७॥
तैसा गुणसंगमें । अजन्मा हा जन्मे । अगा ऐसे उगा गमे । एरवी नाही ॥१०१८॥
ऐशा अधम-उत्तम योनीतही । ऐसे मानी, हा जाई । जैसा संन्यासी स्वप्नीं होई । हीन जातीचा ॥१०१९॥
म्हणोनि केवळ पुरुषा ऐसे । जन्मणे-भोगणे नसे । येथ गुणसंगचि असे । सकळाठायी मूळ ॥१०२०॥
सर्वसाक्षी अनुज्ञाता भर्ता भोक्ता महेश्वर
म्हणती परमात्माहि देहीं पुरुष तो पर ॥२२॥
हा प्रकृतिमाजी उभा नर । जैसा जुईसि खांब आधार । परि यात आणि प्रकृतीत अंतर । पृथ्वी-नभाइतुके ॥१०२१॥
प्रकृतिसरितेचे तटी । मेरूपर्वत हा किरीटी, । तियेमाजा बिंबे, परि लोटीं- । वाहत ना जाय ॥१०२२॥
प्रकृति होई जाई । हा आहे तैसाहि राही । म्हणोनि मुंगीपासुनि ब्रह्नयापावत होई । नियामक हा ॥१०२३॥
प्रकृति याचेचियोगे जगे । जग प्रसवी याचेचि सत्तेयोगे । म्हणोनि हा म्हणावा लागे । भर्ता हिचा ॥१०२४॥
अनंतकाळ किरीटी, । उपजती ज्या सृष्टी । त्या शिरती याचे पोटी । कल्पांतसमयीं ॥१०२५॥
हा प्रकृतीचा भ्रतार । ब्रह्मांडाचा सूत्रधार । मोजमापी सीमित संसार । अपारपणे आपुल्या ॥१०२६॥
आणि या देहाअंतरीं । परमात्मा वसे ऐशापरी । बोलती ते अवधारी ह्यासचि गा ॥१०२७॥
अगा, प्रकृतीचे पार । एक आहे, हे धनुर्धर । ऐसे म्हणती तो खरोखर । पुरुष हा ॥१०२८॥
पुरुषाचे असे रूप प्रकृतीचे गुणात्मक
जाणे कसाहि तो राहो न पुन्हा जन्म पावतो ॥२३॥
जो ऐशा निखळपणे । पुरुषाते या जाणे । आणि गुणांचे करणे । प्रकृतीचे, हेही ॥१०२९॥
हे रूप ही छाया । पैल जळ हे मृगजळ वा । ऐसी निवड धनंजया । कैसी करावी ? ॥१०३०॥
तो शरीराच्या संगतीने । करीना का कर्म कोणे । परि नभ न मळे धुराने । तैसा असे ॥१०३२॥
असतांना जो देहें । न भुले देहमोहें । देह जाता नोहे । पुनर्जन्म तया ॥१०३३॥
ऐसा तयावरी एक । हा प्रकृति-पुरुष विवेक । उपकार अलौकिक । करितसे गा ॥१०३४॥
हाचि विवेक अंतरी । उदयण्या भानूपरी । उपाय बहुत धनुर्धारी, । ऐक आता ॥१०३५॥
ध्यानाने पाहती कोणी स्वयें आत्म्यास अंतरीं
सांख्ययोगें तसे कोणी कर्मयोगेंहि आणिक ॥२४॥
आत्म्यावरिल हीणा कोणी येथ । विचारांच्या धगधगत्या अग्नीत । झळाळती पुटे देत । आत्मस्वरूप-सुवर्ण प्रक्षाळिती ॥१०३६॥
छत्तीसही भेद । जाळूनिया निर्विवाद । निवडिती शुद्ध । आत्मभाव ॥१०३७॥
आत्मभावाचिये पोटी । आत्मध्यानाच्या दिठीने किरीटी । देखती गा शेवटी । आपणासचि ॥१०३८॥
दैववशात कोणी आणिक । सांख्ययोगें चित्त देती देख । आत्म्यासी कोणी पाहती चोख । कर्मयोगाचे आश्रर्यं ॥१०३९॥
स्वयें नेणूनिया कोणी थोरांपासूनि ऐकिती
तरती तेहि मृत्यूस श्रद्धेने वर्तुनी तसे ॥२५॥
ऐशा ऐशा परी । ही संसारभयभवरी । निस्तरिती खरोखरी । अवघीचि ॥१०४०॥
परि ते ऐसे करिती । अभिमान देशोधडी लाविती । आणि विश्वासें टेकती । एके गुरूचे बोलावरी ॥१०४१॥
जे गुरु हिताहित देखती । हानि होता कणवेने व्यापिती । पुसोनि शीण हरिती । देती सुख ॥१०४२॥
तयांचे मुखें जे आले । ते ऐकती आदरें भले । मग तैसेचि होत चांगले । मनें अंगें ॥१०४३॥
ते श्रवण करणे हेचि किती । इतिकर्तव्य मानिती । त्या अक्षरांवरुनि ओवाळिती । जीव आपुला ॥१०४४॥
अंती तेही धनंजया । जन्ममरणसिंधूतून या । नीटपणे निघोनिया । बाहेरी येती ॥१०४५॥
हे उपाय ऐसे अनेक । येथ पाही चोख । जाणावया एक । ब्रह्मवस्तू ॥१०४६॥
आता पुरे हे बहुत । अगा सर्वार्थाचे मथित । सिद्धांतनवनीत । देऊ तुज ॥१०४७॥
इतुक्याने तुज पांडुसुता । ब्रह्मानुभव लाभला आयता । तर होईल, सायास न पडता । अन्य आनंदही ॥१०४८॥
म्हणोनि सिद्धांतमांडणी करू व्यवस्थित । अन्य मतांचे खंडन करित । शुद्ध अर्थ गर्भित । विस्तारें सांगू ॥१०४९॥
उत्पन्न होतसे लोकीं जे जे स्थावर-जंगम
क्षेत्र-क्षेत्रज्ञ-संयोगें घडिले जाण सर्व ते ॥२६॥
तर क्षेत्रज्ञ या बोलें । तुज आपुले रूप दाविले । आणि क्षेत्र सांगितले । आघवे जे ॥१०५०॥
त्या एकमेकांचे मेळीं । होत भूते सगळी । वार्यासंगे जळीं । कल्लोळ जैसे ॥१०५१॥
वा रविकिरण आणि वाळवंट । यांची होता भेट । मृगजळाचा लोट । अवतरे जैसा ॥१०५२॥
अथवा जलधरधारा । भिजविती वसुंधरा । उपजविती अंकुरा । नानाविध जैशा ॥१०५३॥
तैसे चराचर आघवे । जे काही जीव या नावें । ते क्षेत्र-क्षेत्रज्ञ-योगें संभवे । ऐसे घेई समजुनी ॥१०५४॥
यालागी जाण । क्षेत्रज्ञ हे तत्त्व प्रधान । तयाहून नसे भिन्न । व्यक्त भूतमात्र ॥१०५५॥
समान सर्व भूतात राहिला परमेश्वर
अनाशी नाशवंतात जो पाहे तोचि पाहतो ॥२७॥
अगा वस्त्रत्व तंतू नव्हे । तरि तंतूसहचि ते आहे । ऐशा सखोलपणे पाहे । ऐक्य हे गा ॥१०५६॥
भूते एकाचि वस्तूची असती । एकापासुनी एक होती । परि भूतप्रतीती । वेगळी असे ॥१०५७॥
नावेही अन्य अन्य जाण । वेगवेगळे यांचे वर्तन । वेषही भिन्न भिन्न । अवघ्यांचे ॥१०५८॥
ऐसे देखोनिहि किरीटी, । भेद ठेविसी जर पोटीं । तर यातुनि जन्म कोटी । न शकसी निघो ॥१०५९॥
घेत नानाविध आकार । लंब, वक्र, वर्तुळाकार । येती फळे एकेचि वेलावर भोपळ्याचे ॥१०६०॥
लाकूड सरळ की वाकुडे । परि बोरीचे हे न दडे । तैसे भूतजात भिन्न घडे । परि ब्रह्मवस्तु ती सरळ ॥१०६१॥
ठिणग्या असोत बहुतशा । परि उष्णते समान जैशा । नाना जीवराशीत तैसा । परमात्मा एकचि ॥१०६२॥
गगनभरी धारा । परि जळ एकचि वीरा । तैसा या भूताकारा । सर्वांगीं तो ॥१०६३॥
हे भूतग्राम विषम । परि ब्रह्मवस्तु ती सम । घट मठीं व्योम । ज्यापरी गा ॥१०६४॥
ह नाशता भूताभास । येथ आत्मा तो अविनाश । जैसा बाहुभूषणीं कस । सुवर्णाचा ॥१०६५॥
तैसा परमात्मा जीवधर्मावेगळा । सर्व जीवां व्यापुनि राहिला । ऐसे ओळखे जो तयाला । तो सुनयन ज्ञानियांमाजी ॥१०६६॥
ज्ञानचक्षूंनी जे डोळस । तयांत डोळस तो विशेष । ही स्तुति नव्हे चौरस । भाग्याचा तो ॥१०६७॥
जो पाहे प्रभु सर्वत्र भरला सम तो स्वयें
आत्म्याची न करी हिंसा गति उत्तम मेळवी ॥२८॥
देह हा गुण-इंद्रियांची मोट । कफ-वात-पित्ताचे त्रिकूट । पंचमहाभूतांचा मेळावा दुष्ट । भयंकर हा ॥१०६८॥
हा उघडचि पाच नांग्यांची इंगळी । जीवा पाचपरींनी आग लागली । की जीवसिंहा सापडली । देहरूप हरिणकुटी ही ॥१०६९॥
ऐसे असूनि या शरीरीं । कोणी नित्यबुद्धीची सुरी । या अनित्य देहाचे उदरीं । खुपसेनाचि कैसी ? ॥१०७०॥
परि ज्ञानी वसता या शरीरी । आपुला घात नच करी । आणि शेवटी खरोखरी । ब्रह्मस्वरूपींचि मिळे ॥१०७१॥
योगज्ञानबळें योगीजन । कोटि जन्म ओलडून । मागे न फिरू ही घेत आण । बुडी देती ब्रह्मस्वरूपीं ॥१०७२॥
जे आकाराचे पैलतीर । जे नादाची पैलमेर । तुर्यावस्थेचे माजघर । परब्रह्म जे ॥१०७३॥
मोक्षासकट गती । जेथ घेती विश्रांती । गंगादि सरिता विसावती । सागरीं जैशा ॥१०७४॥
ते सुख याचि देहीं । चरण प्रक्षाळण्या येई । भूतभिन्नत्वें न होई । विषमबुद्धी जो ॥१०७५॥
कोटि दीपांचे जैसे । एकचि तेज सरिसे । तैसा जो असे । सर्वत्र ईश ॥१०७६॥
ऐसे समत्वें देखता । जगे जो पंडुसुता । तो मरणा आणि जीविता । न गवसे साच ॥१०७७॥
म्हणोनि तो दैवाआगळा । ऐसे मानित असू वेळोवेळा । समत्वशेजेवरी डोळा । लागला तयाचा ॥१०७८॥
आत्मा तो न करी काही हे पाहे तोचि पाहतो ॥२९॥
मन बुद्धि आदी प्रमुख । कर्मेंद्रिये जे करिती देख । ते प्रकृतीचि करी एक । हे जो जाणे साच ॥१०७९॥
घराची वावरती घरी । घर काही न करी । अभ्र धावे अंबरीं । अंबर ते उगे ॥१०८०॥
तैसी प्रकृति आत्मप्रभेत निखळ । त्रिगुणें आरंभी विविध खेळ । आत्मा तो आधारा खांब केवळ । कर्मकर्त्या न जाणे ॥१०८१॥
ऐशा या निर्णयें । जयाचे जीवीं उजाडावे । तयेंचि साच देखावे । अकर्त्या आत्म्या ॥१०८२॥
एकत्वीं जोडिले पाहे भूतांचे वेगळेपण
त्यामधूनिचि विस्तार तेव्हा ब्रह्मत्व लाभले ॥३०॥
एरवी तेव्हाचि पार्था । ब्रह्मसंपन्न येई होता । जेव्हा या भूताकृती भिन्न न दिसता । एक दिसती ॥१०८३॥
जैशा जळीं लहरी । परमाणुकणिका भूमीवरी । वा सूर्यमंडलावरी । किरण जैसे; ॥१०८४॥
अथवा देहीं अवयव । मनीं आघवेचि भाव । वा स्फुल्लिंग सर्व । एकेचि अग्नीत ॥१०८५॥
तैसे एकेचि ब्रह्माचे भूताकार । हे दृष्टीसि ये खरोखर । तेव्हांचि ब्रह्मसंपत्तीचे अपार । तारू लाभे ॥१०८६॥
मग जिकडे तिकडे । ब्रह्मचि दृष्टीसी पडे किंबहुना जोडे । सर्वस्वें सुख ॥१०८७॥
ऐशा रीतीने पार्था । तुज प्रकृति-पुरुष व्यवस्था । यथायोग्य प्रतीतिपथा । दावुनी निरूपिली ॥१०८८॥
चूळ भरण्या अमृत लाभावे । की डोळ्याने निधान देखावे । त्याचि योग्यतेचे लाभ मानावे । प्रकृति-पुरुष विचाराचे या ॥१०८९॥
अगा, होता अनुभवप्राप्ती । चिरंतन ठेवावी जी चित्तीं । ती आताचि नव्हे, सुबद्रापती, । मागाहुनी ॥१०९०॥
तर ते बोल एक दोन । सखोल आता बोलेन । ओलीस ठेवी मन । मग ते घेई ॥१०९१॥
ऐसे देवें म्हटले । मग बोलणे आरंभिले । तेथ अवधानचि केले । सर्वांगें याने ॥१०९२॥
परमात्मा न वेचेचि की निर्गुण अनादि हा
राहे देहीं परी काही न करी न मळेचि तो ॥३१॥
म्हणे परमात्मा जो म्हणावा । तो ऐसा स्वरूपें जाणावा । जळीं जळें न लिंपावा । सूर्य जैसा ॥१०९३॥
जळाआधी अथवा मागाहून । सूर्य असतचि असे जाण । जळीं बिंबे तरचि ये दिसून । ते इतरांचे दृष्टीने ॥१०९४॥
तैसा आत्मा देहीं । म्हणती ते काही । अल्पही साच नाही । तो तर जेथल्या तेथचि ॥१०९५॥
मुख बिंबता दर्पणाठायी । तया प्रतिबिंब नाव पाही । तैसे वसणे देहीं । आत्मतत्त्वाचे ॥१०९६॥
तयासवे देहाची भेट । ही सर्वथा निरर्थक गोष्ट । वार्यासवे वाळूची गाठी । कोण बांधी ? ॥१०९७॥
अग्नी आणि पीस यां । कैसा दोरा घालावा ? । कोणता सांधा जोडावा । आकाशा-पाषाणासी ? ॥१०९८॥
एक निघे पश्चिमेसी । एक तो पूर्वेसी । त्यांची भेट कधी कैसी ? । तैसा संबंध हा । १०९९॥
अंधार आणि प्रकाशात । जे साम्य, जित्या-मृतात । तेचि आत्म्यात आणि देहात । जाण अगा ॥११००॥
रात्र आणि दिवसात । कनक आणि कापुसात । भेद जितुका गवसत । तितुकाचि यात ॥११०१॥
देह पंचमहाभूतांचा जरी । गुंफिला पाहे कर्मसूत्री । घातला फिरत्या चाकावरी । जन्ममृत्य़ूच्या ॥११०२॥
काळाग्नीचे कुंडीं । घातली देह-लोण्याची उंडी । माशी पंख पाखडी । तोवरिचि ही सरे ॥११०३॥
हा जर आगीत पडे । तर भस्म होउनी उडे । श्वानाचे तावडीत सापडे । तर होई विष्ठा ॥११०४॥
चुके या दोहीसही । तर कृमींचा पुंज होई । ऐसा किळसेसी पात्र पाही । परिणाम अर्जुना ॥११०५॥
या देहाची ही दशा । आणि आत्मा तो येथ ऐसा । नित्य सिद्ध स्वाभाविकसा । अनादिपणे ॥११०६॥
तो अपूर्ण ना अखिल । अक्रिय ना क्रियाशील । कृश ना स्थूळ । निर्गुणपणे ॥११०७॥
तो दृश्य ना गुप्त । प्रकाशयुक्त ना प्रकाशरहित । अल्प ना बहुत । अरूपपणे ॥११०८॥
रिता ना ओसंडत । रहित ना सहित । मूर्त ना अमूर्त । शून्यपणे ॥११०९॥
आनंद ना निरानंद । एक ना विविध । मुक्त ना बद्ध । आत्मपणे ॥१११०॥
इतुका ना तितुकाही । आयता ना रचिलाही । बोलका ना मुकाही । अलक्षपणे ॥११११॥
सृष्टीसवे तो न होई । सर्वसंहारीं न जाई । आहे नाही या दोहींसही । लयस्थान तो ॥१११२॥
न मापू ये न वर्णू ये । न वाढे न उणावे । न वेचे न विकार पावे । अव्ययपणे ॥१११३॥
ऐशापरी असे तो आत्मा । देहीं जे म्हणती प्रियोत्तमा । ते महाकारें व्योमा । मठाकाश म्हणणे जैसे ॥१११४॥
तैसी तयाची व्याप्ती । तेथ होत जात देहाकृती । तो घे ना त्यजी, सुमती, । असे जैसाच्या तैसा ॥१११५॥
दिवस-रात्र जैशी । येती जाती आकाशीं । आत्म्याचे सत्तेने तैशी । शरीरे जाण ॥१११६॥
म्हणोनि या शरीरीं । काही करवी ना करी । सहज घडत्या व्यवहारीं । कर्तृत्त्वा न सज्ज ॥१११७॥
यालागी स्वरूपें । उण्यापुर्याने न दडपे । हे असो न लिंपे । देहीं देहें ॥१११८॥
सर्व व्यापूनि आकाश सूक्ष्मत्वें न मळे जसे
सर्वत्र भरला देहीं आत्मा तो न मळे तसा ॥३२॥
अगा आकाश कोठे नाही? । ते न शिरे कोणे ठायी ? । परि कशाने काधीही । न मळे जैसे; ॥१११९॥
तैसा सर्वत्र सर्व देहीं । आत्मा असतचि असे पाही । परि संगदोषें एकेही । लिप्त न होय ॥११२०॥
पुन्हा पुन्हा जाणावे ऐसे । हेचि लक्षण निश्चितसे । क्षेत्राहुनि क्षेत्रज्ञ असे वेगळाचि ॥११२१॥
एकलाचि जसा सूर्य उजळी भुवनत्रय
तसा क्षेत्रज्ञ तो क्षेत्र संपूर्ण उजळीतसे ॥३३॥
चुंबकसंसर्गें लोह हले देख । परि लोह नसे चुंबक । तैसाचि प्रकार ऐक । क्षेत्र-क्षेत्रज्ञांचा ॥११२२॥
पहा ज्योत दिव्याची खरोखर । चालवी घराचे व्यवहार । परी वेगळीक अपार । दिव्यात आणि घरात ॥११२३॥
काष्ठाचे पोटीं अग्नि आहे । परि अग्नि काष्ठ नोहे । या दृष्टीने पाहे । देह आणि आत्म्यासी ॥११२४॥
भेद अभ्र-आभाळीं । रवी आणि मृगजळीं । तैसाचि कोणेही काळीं । देखसी जरी ॥११२५॥
हे आघवेचि असो एक । गगनातुनी सूर्य देख । प्रकाशवी तिन्ही लोक । वेळोवेळा; ॥११२६॥
येथ क्षेत्रज्ञ तो ऐसा । प्रकाशक क्षेत्राचे आभासा । यावरी काही न पुसा । शंका न घ्या ॥११२७॥
पाहती ज्ञानदृष्टीने क्षेत्र-क्षेत्रज्ञ-भेद हा
भूतप्रकृति लंघूनि ते ब्रह्मपद पावती ॥३४॥
हे शब्दतत्त्वसारज्ञा । डोळस तीचि प्रज्ञा । जी क्षेत्र-क्षेत्रज्ञा । वेगळे देखे ॥११२८॥
या दोहीतिल अंतर । देखावया चतुर । ज्ञानियांचे द्वार । आराधिती ॥११२९॥
याचिसाठी हे सुमती । जोडिती शांतिसंपत्ती । शास्त्राची दुभती । पोषिती घरी ॥११३०॥
याचेचि आशेवरी । योगाचे आकाशावरी । आरूढण्याचा विक्रम सर्वतोपरी । करिती ते ॥११३१॥
शरीरादि समस्त । मानिताती तृणवत् । जिवें संतांचे होत । वहाणाधरू ॥११३२॥
ऐशा ऐशा परींनी । ज्ञानास्तव सायास करुनी । अगा जे अंत:करणीं । स्थिरावती ॥११३३॥
क्षेत्र-क्षेत्रज्ञातिल अंतर । देखती जे खरोखर । ओवाळू आपुले ज्ञान तयांवर । ऐसे म्हणती भगवंत ॥११३४॥
आणि पंचमहाभूतादिक । भिन्नरूपीं अनेक । पसरलीसे लटिकी एक । प्रकृति जी ही; ॥११३५॥
ती आत्म्यासी शुक-नलिका-न्यायें । न लागला लागली आहे । जैसे होतसे हे । ठाउके तया ॥११३६॥
जैसी माला ती माला । ऐसेचि देखे डोळा । मिथ्या सर्पबुद्धीचा सगळा । होउनिया नाश; ॥११३७॥
वा शिंपचि आहे शिंप ती । ही साच होय प्रतीती । रुप्याची भ्रांती । जाऊनिया; ॥११३८॥
तैसी आत्म्याहुनी वेगळेपणे । प्रकृति जे अंतःकरणें । देखती ते मी म्हणे । ब्रह्म होती ॥११३९॥
ब्रह्म जे आकाशाहुनि श्रेष्ठ । जे अव्यक्ताचा पैलकाठ । जे भेटता होय नष्ट । भेदभाव ॥११४०॥
आकार जेथ सरे । जीवत्व जेथ विरे । द्वैत जेथ नुरे । अद्वय जे ॥११४१॥
ते परमतत्त्व पार्था । होती ते सर्वथा । आत्मा-अनात्मा-व्यवस्था । सेविती भ्रमराऐसे ॥११४२॥
ऐसा हा जी, आघवा । श्रीकृष्णें तया पांडवा । उलगडा केला जीवा । जिवाचिया ॥११४३॥
एके कळशीत दुसरी । रिचवावी ज्यापरी । आपणासी देती हरी । तैसे तया ॥११४४॥
आणि कोणा देत कोण ? । तो नर तैसा नारायण । परि आधीचि अर्जुना श्रीकृष्ण । हा मीचि म्हणाले ॥११४५॥
असो, विषयांतर हे जाहले । परि न पुसता का मी बोले ? । किंबहुना पार्थासी दिधले । सर्वस्व देवें ॥११४६॥
की तो पार्थ जी, मनीं । तृप्ती न मानी अजुनी । अधिकाधिक तृष्णा ज्ञानीं । वाढवीतसे ॥११४७॥
जों जों तेल घालावे वरी । तों तों दीप उजाळा धरी । आस अर्जुनाचे अंतरीं । परिसता तैसी ॥११४८॥
उदार तैसी सुगरण । आणि जेवणारे रसज्ञ- । मिळती, मग सरसावून । हात जैसे; ॥११४९॥
तैसे जी, होतसे राया । टवटवी, अवधानाची त्याचिया । पाहता व्याख्यान चढे शिखराचिया । चौपट वरी ॥११५०॥
सुवातें मेघ सावरे । पूर्णचंद्रें सिंधू भरे । तैसे अर्जुनाचे श्रवणादरें । व्याख्यान होय रसभरित ॥११५१॥
आता आनंदमय आघवे । विश्व होईल देवें । ते राजांनी परिसावे । संजय म्हणे ॥११५२॥
महाभारतीं विशालमती श्रीव्यासें । भीष्मपर्वीं भरलेले शांतरसें । जे सांगितले अजरामर ऐसे । कथानक; ॥११५३॥
तो श्रीकृष्णार्जुनसंवाद येथ । दावू सुंदर बोलीत । विशद करू ओवीछंदात । गुंफूनिया ॥११५४॥
केवळ शांतरसकथा । कथिली जाईल सर्वथा । जी शृंगाररसाचेहि माथ्यावरि आता । ठेवील पाय ॥११५५॥
दावू अपूर्व मराठी रसाळ । जी साहित्या सजवील । अमृताही लाजवील । मधुरपणे ॥११५६॥
शीतलता चंद्राऐसी । माझिया बोलांसी । लोपवील नादब्रह्मासी । रसरंगभुलावण ॥११५७॥
पिसाटाचेही मना । भरी सात्त्विकाचा पान्हा । श्रवणासवे सुमना । समाधि लाभे ॥११५८॥
तैसा वाग्र्विलास विस्तारू । गीतार्थें विश्व भरू । आनंदाचे करू । आवार जगा ॥११५९॥
विवेकाची वान फिटो । कानामना सार्थक वाटो । इच्छी तया खाण भेटो । ब्रह्मविद्येची ॥११६०॥
परतत्त्व डोळ्यासी दिसो । सुखसोहळ्याने त्या मन तोषो । विश्व प्रवेशो । महाबोधसुकाळीं ॥११६१॥
हे निपजेल आता आघवे । ऐसे बोलेन बरवे । अंगिकारिले असे परमदेवें । श्रीनिवृत्तींनी ॥११६२॥
म्हणोनि शब्द स्पष्ट करितिल मर्मा । वृष्टी करितील दृष्टांत उपमा । उलगडोनि सांगेन अर्थ तुम्ही । प्रत्येक पदाचा ॥११६३॥
मज येथवरी शिकवून । श्रीगुरुरायें श्रीमान । सर्व विद्यांनी परिपूर्ण । केले असे ॥११६४॥
आणि त्याचि जी, कृपाबळें । मान्य होय मी जे जे बोले । समर्थ होई सभेत आपुले । गीता कथिण्या ॥११६५॥
वरि तुम्हा संतांचे चरणीं । आज मी पावलो हे जाणुनी । जी, नाही म्हणोनी । अटकाव काही ॥११६६॥
मुके बालक सरस्वतीचे कुशीसी । नुपजे यात नवलाई कायसी ? । काय उणी लक्ष्मीसी । सामुद्रिक सुचिन्हे ? ॥११६७॥
तैसी तुम्हा संतांपाशी । अज्ञानाची गोष्ट कायसी ? । यालागी नवरसीं । वर्षेन मी ॥११६८॥
किंबहुना आता देवा । अवसर मज द्यावा । ज्ञानदेव म्हणे बरवा । सांगेन ग्रंथार्थ ॥११६९॥