जय जय हे गुरुमाउले विशुद्धे । औदार्यें अति प्रसिद्धे । निरंतर आनंदें । वर्षती तू ॥१॥
विषयसर्पें करिता दंश । मूर्च्छा येता होय नाश । तुझियायोगें निर्विष । होतसे गे ॥२॥
कोणा संसारताप पोळी? । कैसा बा शोक जाळी? । जर प्रसादरसकल्लोळीं । पूर येई तुज ॥३॥
योगसुखाचे सोहळे । सेवकां तुझिया हे स्नेहाळे । सोऽहंसिद्धीचे लळे । पुरविसी तू ॥४॥
कुंडलिनी शक्तीचे अंकीं । वाढविसी कौतुकीं । ह्रदयाकाशपलकीं । आंदुळसी निज उपदेशें ॥५॥
आत्मज्योतीची ओवाळणी । करिसी मन-प्राणांची खेळणी । आत्मसुखाची बाळलेणी । लेवविसी माये ॥६॥
जीवनकलेचे अमृतपान सेवविसी । अनाहताचे गीत गासी । समाधिबोधें निजविसी । शांतवुनी ॥७॥
म्हणोनि साधकांसी तू माउली । पिके सारस्वत तुझिये पाउलीं । याकारणें मी साउली । न सोडी तुझी ॥८॥
हे सद्गुरुचिये कृपादृष्टी । तुझी करुणा जयासाठी । तो सकळ विद्यांची सृष्टी । निर्मितसे ॥९॥
हे अंबे, वैभवशालिनी । तू कल्पलता निजजनीं । आज्ञा करी मज झणी । ग्रंथानिरूपणासी ॥१०॥
नवरसांचे भरवी सागर । करवी उचित रत्नांचे आगर । भावार्थाचे गिरिवर । उपजवी माये ॥११॥
साहित्यसोनियाच्या खाणी । मराठीचिये अवनीवरि आणी । विवेकवेलींची लावणी । होऊ दे सर्वत्र ॥१२॥
संवादफळा बहर । सिद्धांतांची उद्याने निरंतर । लावी दाटीने सत्वर । ज्ञानदेव म्हणे ॥१३॥
पाखंडयांच्या दरडी फोडी । विंतडवादांच्या आडवाटा मोडी । दुष्ट सावजे फेडी । कुतर्कांची ॥१४॥
श्रीकृष्णगुण वर्णिता यावे । ऐसे सर्वत्र मज समर्थ करावे । श्रवणसाम्राज्यीं बैसवावे । श्रोतेजनांसी ॥१५॥
या मराठीचिये नगरीं । ब्रह्मविद्येचा सुकाळ करी । देणे-घेणे सुखचि वरी । होऊ दे जगा ॥१६॥
तू आपुल्या स्नेहपल्लवें । मज पांघरुण घालिसी सदैवें । तर आताचि हे आघवे । निर्मीन माये ॥१७॥
पार्थाचे या विनवणीमुळे । श्रीगुरूंनी कृपादृष्टीने पाहिले । गीतार्थास्तव ऊठ म्हटले- । न बोलावे बहु ॥१८॥
तेथ म्हणे, जी, हा महाप्रसाद । म्हणोनि जाहला आनंद । आता निरूपीन गीतानुवाद । अवधान द्यावे ॥१९॥
अर्जुन म्हणाला;
असे मिसळले कोणी तुज भक्त उपासिती
कोणी अक्षर अव्यक्त योगी ते थोर कोणते ॥१॥
तर सकळ वीराधिराज । जो सोमवंशाचा विजयध्वज । तो बोलता जाहला आत्मज । पांडुनृपाचा ॥२०॥
कृष्णासि म्हणे, अवधारिले? । आपण विश्वरूप मज दाविले । ते नवल म्हणोनि भ्याले । चित्त माझे ॥२१॥
आणि या कृष्णमूर्तीचा लळा । जीवें आश्रय तेथ केला । परि देवें मजला । वारिले तेथ ॥२२॥
तर व्यक्त आणि अव्यक्त । हे तूचि एक निभ्रांत । भक्तीने पावे व्यक्त । अव्यक्त योगें ॥२३॥
तर व्यक्त-अव्यक्त हे पथ । तुज पावावया होत । दोन्ही तुझे उंबरठयात । नेउनी घालिती ॥२४॥
जो कस लगडीचा । तोचि गुंजभर सोन्याचा । म्हणोनि व्यापक सीमित यांचा । एकचि पाड ॥२५॥
अगा अमृताचे सागरी । सामर्थ्याची थोरवी खरी । परि चुळीत घेताहि अमृतलहरी । तीचि लाभे ॥२६॥
ही साचचि माझे चित्तीं । निश्चित असे प्रतीती । परि पुसणे हे योगपती, । ते याचिसाठी; ॥२७॥
जे तुम्ही काही क्षण । अंगिकारिले व्यापकपण । ते साचचि की लीला म्हणून । हे जाणावया ॥२८॥
तुजसाठी करिती कर्म । तूचि जयांची गति परम । भक्तीसी सर्व मनोधर्म । विकले जयांनीं ॥२९॥
इत्यादी सर्वपरी । जे भक्त तुज, श्रीहरी, । बांधोनिया जिव्हारी । उपासिति ॥३०॥
आणि जी वस्तु प्रणवापल्याड । वैखरीसी अवघड । कशासवेही सांगड । घालिता न ये ॥३१॥
ती अक्षर, अव्यक्त । नामनिर्देश देश-रहित । सोऽहंभावे उपासीत । ज्ञानी तिज; ॥३२॥
तयात आणि भक्तात । अनंता, या दोहोंत । कोण योग जाणित । साचचि सांगा ॥३३॥
या करीटीचिया बोला । तो जगद्बंधू संतोषला । म्हणे हो, प्रश्न भला । जाणसी करू ॥३४॥
श्रीभगवान् म्हणाले;
रोवूनि मन माझ्यात भजती नित्य जोडिले
श्रद्धेने भारले माझ्या ते योगी थोर मानितो ॥२॥
अस्ताचलाचे निकट । जाता रविबिंबापाठोपाठ । किरण जैसे अलोट । संचरती; ॥३५॥
अथवा वर्षाकाळी सरिता । वाढू लागे पंडुसुता । तैसे भक्ताचे प्रेम मज भजता । नित्य नवे दिसे ॥३६॥
जैसे गाठताही सागर । मागे लोट येत अनिवार । त्या गंगेऐसा अपार भर । जयाचे प्रेमभावा ॥३७॥
तैसे सर्वेद्रियांसहित । चित्त ठेवुनि मजआत । ते रात्र-दिवस न म्हणत । उपासिती ॥३८॥
यापरी जे भक्त । आपणा मजसी देत । तेचि मी योगयुक्त । परम मानी ॥३९॥
परी अचिंत्य अव्यक्त सर्वव्यापी खुणेविण
नित्य निश्चळ निर्लिप्त जे अक्षर उपासिती ॥३॥
आणि अन्य तेही पांडवा । आरूढोनी सोऽहंभावा । झोंबती निराकारा तया । अक्षरब्रह्या ॥४०॥
जेथ मनाचे नखहि न स्पर्शे । बुद्धीची दिठी न शिरतसे । ते इंद्रियां काय, कैसे । आकळेल? ॥४१॥
परि बिकटचि ध्यानासीही । न गवसे कोणे एके ठायी । व्यक्त आकारीं नसे कोणत्याही । परब्रह्म ते ॥४२॥
जया सर्वत्र सर्वपणे । सर्वही काळी असणे । जे पावोनि चिंतने । विसावली; ॥४३॥
जे आहे परि काय । जे नाही परि होय । म्हणोनि प्राप्तीसी उपाय । नच संभवे; ॥४४॥
जे चळे ना ढळे । सरे ना मळे । ते आपुलेचि बळे । स्वाधीन केले जयांनी ॥४५॥
रोधिती इंद्रिये पूर्ण सर्वत्र सम जाणुनी
माझ्याकडेचि ते येती ज्ञानी विश्वहितीं रत ॥४॥
वैराग्याचे महाअग्नीत घातली । विषयसेना जाळिली । इंद्रिये होरपळलेली । जयांनी धैर्यें सावरिली ॥४६॥
मग संयमाचे घालुनि पाशीं । अंतर्मुख केले इंद्रियांसी । आणि कोंडिले तयांसी । हृदयाचे गुहेत ॥४७॥
अपानाचे दारासी । लावुनि आसनमुद्रेसी । मूळबंधाचे गडासी । उभारिले ॥४८॥
आशेचे बंध तोडिले । भीरुतेचे कडे फोडिले । अज्ञाननिद्रेचे नाशिले । अंधारासी ॥४९॥
वज्राग्नीचे ज्वाळांनी केली । अपानधातूची होळी । व्याधींची शिरे अर्पिली । प्राणायामतोफांसी ॥५०॥
मग कुंडलिनीचा टेंभा । आधारचक्रीं केला उभा । तयाची फाकली प्रभा । ब्रह्मरंध्रापावत ॥५१॥
देहीं नवद्वारांचे कवाडीं । घालोनि निग्रहाची कडी । उघडिली दिंडी । सुषुम्रा नाडीची ॥५२॥
संहारोनि संकल्पमेंढयासी । मनोरूप रेडयांचे मुंडक्यांसी । प्राणशक्ती चामुंडेसी । अर्पिले बळी ॥५३॥
इडा-पिंगळा मेळवुनि सुषुम्रेत । अनाहताचा गजर करित । चंद्रामृत त्वरेने जिंकित । वेगे निघे ॥५४॥
मग सुषुम्रेचे मध्यविवरीं । चढुनि कोरीव सोपानावरी । ठाकला शिखरावरी । ब्रह्मरंध्राचे ॥५५॥
चढोनि मकरसोपान । शेवट गाठोनि गहन । काखेत घालोनि मूर्ध्निगगन । ऐक्य पावे ब्रह्मासी ॥५६॥
ऐसे जे समबुद्धी । पावावया सोऽहंसिद्धी । स्वाधीन करूनि घेती आधी । योगदुर्ग ॥५७॥
साटेलोटे करित स्वतःसी देती । शून्यब्रह्म त्वरेने गाठिती । तेही मजचि पावती । निःसंशय गा ॥५८॥
एरवी योगबळे । अधिक काही मिळे । ऐसे नव्हे, आगळे । कष्टचि तया ॥५९॥
अव्यक्तीं गोविती चित्त क्लेश त्यास विशेषचि
देहवंतास अव्यक्तीं सुखें बोध घडेचिना ॥५॥
प्राणिमात्रांचे हित । जे निर्गुण अनाश्रय अव्यक्त । ऐसे ब्रह्म पावण्या आसक्त । भक्तीविण जे; ॥६०॥
तया महेंद्रादि पदे ती । वाटमारी करिती । आणि ऋद्धिसिद्धि ठाकती । आड तेथ ॥६१॥
कामक्रोधाचे उपद्रव एकेक । उठावती अनेक । आणि शून्यासी अंग बिनधोक । झुंजवावे लागे ॥६२॥
तहानचि प्यावी तहानेल्याने । भूकचि खावी भुकेल्याने । अहोरात्र वितीने । मोजावा वारा ॥६३॥
जागणे हेचि निजणे । इंद्रियनिरोध हेचि भोगणे । झाडासवे खेळणे । साजण म्हणोनि ॥६४॥
शीत वेढावे । उष्ण पांघरावे । वृष्टीचिये असावे । घराआत ॥६५॥
किंबहुना पांडवा, । अग्निप्रवेशा नित्य नवा । भ्रताराविण करावा । तो हा योग ॥६६॥
स्वामींचे न काज येथ । ना कुळाचाराचे निमित्त । परि मरणाशी झुंज सतत । नित्य नवी ॥६७॥
ऐसे मृत्यूहुनी जळजळीत । काय पिववे विष कढत? । मुख न काय फाटत । डोंगर गिळिता? ॥६८॥
योगाचिये वाटांनी तेवी । जे निघाले गा काही । तयां दुःखभोगचि पाही । वाटयासी आला ॥६९॥
पाहे बा, लोहाचे चणे । दंतहीना पडती खाणे । ते पोट भरणे की बेतणे । प्राणावरी? ॥७०॥
म्हणोनि समुद्र बाहूंनी । तरेल का कोणी? । की गगनामाजी पायांनी । चालता ये? ॥७१॥
रणधुमाळीत शिरता । अंगा काठीहि न लागता । सूर्यलोकाची पायरी चढता । येईल काय? ॥७२॥
यालागी पैज जैसी । पांगळ्या न घेता ये वायूसी । जीवा देहवंता तैसी । अव्यक्तीं गति नसे ॥७३॥
ऐसे जरि धैर्यं बांधिती । आकाशा झोंबती । तरी पात्र होती । क्लेशासीचि ॥७४॥
म्हणोनि अन्य ते पार्था । न जाणतीचि ही व्यथा । जे का भक्तिपंथा । अनुसरले ॥७५॥
परी जे सगळी कमें मज अर्पूनि मत्पर
अनन्य भक्तियोगाने भजती चिंतुनी मज ॥६॥
कर्मेंद्रिये सुखे । करिती कर्में देखे । जी का वर्णाश्रमधर्मंविशेषे । वाटयासी आली ॥७६॥
शास्त्रविहित पाळिती । शास्त्रनिषिद्ध गाळिती । मज देउनि जाळिती । कर्मफळे ॥७७॥
यापरी गा पाही, । अर्जुना माझे ठायी । अर्पूनि नाहीशीही । करिती कर्मे ॥७८॥
आणिक जे जे सर्व । कायिक वाचिक मानसिक भाव । तयां मजवाचूनि धाव । अन्य नाही ॥७९॥
ऐसे जे मत्पर । उपासिती निरंतर । ध्यानमिषें जे घर । जाहले माझे ॥८०॥
जयांनी ठेवोनि प्रेमभाव । केली मजसी देवघेव । त्यजिले भोग-मोक्ष सर्व । बापुडी कुळे; ॥८१॥
जयांनी ऐसे अनन्यभावें । अर्पिले मजठायी अगेंजीवें । तयांचे काय एक सांगावे । सर्व मी करी ॥८२॥
माझ्यात रोविती चित्त त्यांस शीघ्रचि मी स्वयें
संसारसागरातूनि काढितो मृत्यु मारुनी ॥७॥
किंबहुना धनुर्धरा, । जो मातेचे ये उदरा । तो तिचा सखासोयरा । किती पहा ॥८३॥
तैसे गा मी तयां । जैसे असती तैसियां । कळिकाळा जिंकोनिया । घेतले पदरी ॥८४॥
एरवी तरि माझिया भक्तां । का संसाराची चिंता? । काय समर्थाची कांता । भिक्षा मागे? ॥८५॥
तैसे सकळ भक्तगण जे । अगा, कुटुंबचि माझे । कोण्याही कामा न लाजे । तयांचे मी ॥८६॥
जन्ममृत्युचिया लाटांवरी । हेलकावे ही सृष्टी पुरी । ते देखोनि माझे उदरीं । ऐसे जाहले ॥८७॥
भवसिंधूचे माजें । कोणा भय न उपजे । येथ तर की माझे । भितील भक्तही ॥८८॥
म्हणोनि गा पांडवा, । सगुण मूर्तींचा मेळावा । करूनि, तयांचे गावा । धावत आलो ॥८९॥
नामांचिया सहस्त्रावरी । नावाचि त्या अवधारी । सजूनिया, संसारी । नावाडी जाहलो ॥९०॥
सडेसोट जे देखिले । ते ध्यानाचे कासेसि लाविले । संसारी घातले । नावेवरी ॥९१॥
आणि प्रेमाची पेटी । बांधिली काहींचे पोटी । मग आणिले तटीं । मोक्षचिया ॥९२॥
परि जे जे भक्त या नावे । असोत चतुष्पादादि आघवे । तयां साम्राज्यी वैकुंठाचिये । बैसविले ॥९३॥
म्हणोनि गा भक्तां । नाही एकही चिंता । तयांते उद्धारकर्ता । असे मी सदा ॥९४॥
आणि जेव्हा जे भक्त । चित्तवृत्ती आपुली देत । तेव्हाचि मज ते लावित । तयांचिये नादी ॥९५॥
याकारणे गा भक्तराया । हा मंत्र तुवा धनंजया, । शिकावा गा, की या । भक्तिमार्गा भजावे ॥९६॥
मन माझ्यात तू ठेव बुद्धि माझ्यात राख तू
म्हणजे मग निःशंक मीचि होशील तू स्वयें ॥८॥
बुद्धीचे दृढनिश्चयीं । मनाच्या वृत्ती सर्वही । माझे स्वरूपाठायीं । स्थिर करी ॥९७॥
जर बुद्धि आणि मनही । मजठायी रममाण दोही । तर तू पावसी लवलाही । अर्जुना मज ॥९८॥
कारण मन-बुद्धि दोहींनीही । घर केले माझेठायी । तर सांग मग काय राही । तू मी ऐसे? ॥९९॥
पल्लवाचे झुळुकीनेहि दिवा मालवे । सवेचि तेज मावळुनी जाये । अथवा रविबिंबाचेसवे । प्रकाशहि मावळे ॥१००॥
उचलल्या प्राणासरशी । इंद्रियेहि निधती जैशी । तैसा मनबुद्धीपाशी । अहंकार ये ॥१०१॥
म्हणोनि माझिये स्वरूपीं । मनबुद्धी दोन्ही स्थायी । इतुक्यानेही सर्वव्यापी । मीचि तू होसी ॥१०२॥
या बोलात काही । लटिके ऐसे नाही । तुझी आण पाही । वाहत असे गा ॥१०३॥
जाईल जड माझ्यात चित्तास करणे स्थिर
तरी अभ्यासयोगाने इच्छूनि मज मेळवी ॥९॥
अथवा हे चित्त । मनबुद्धीसहित । माझे हाती अखंडित । न शकसी देऊ; ॥१०४॥
तरी गा ऐसे करी । या आठ प्रहरी । मोजके निमिषभरी । देत जाय ॥१०५॥
मग जितुके की निमिष । घेशील माझे सुख । तितुकी येईल देख । विषयीं अरुची ॥१०६॥
जैसा शरदऋतू येई । आणि ओहटू लागत सरिताही । तैसे गा निघेल चित्तही । प्रपंचातुनी ॥१०७॥
मग पुनवेपासुनि अवलोकिसी । शशिबिंब दिवसादिवसासी । उणावत, अमावस्येसी । नाहीसेचि होय; ॥१०८॥
तैसे भोगातुनी निघेल । चित्त मजमाजी रमेल । मग हळुहळु मीचि होईल । पंडुसुता गा ॥१०९॥
अगा अभ्यासयोग कवण । तो हाचि एक जाण । काही न निपजे यातुन । ऐसे नाही ॥११०॥
अभ्यासाचे बळावर । कोणी अंतराळी चालणार । व्याघ्र सर्प निर्वैर । केले कोणी ॥१११॥
कोणा विषही पडे पचनी । पायी जाती समुद्रावरुनी । वेदही हस्तगत कोणी । अभ्यासें केले ॥११२॥
म्हणोनि अभ्यासासि काही । सर्वथा दुष्कर नाही । यास्तव गा माझेठायी । अभ्यासें मिळावेस ॥११३॥
अभ्यासहि नव्हे साध्य तरी मत्कर्म आचरी
मिळेल तुज ती सिद्धि मत्कर्महि करूनिया ॥१०॥
वा अभ्यासावया काही । कस तुझिये अंगीं नाही । तर आहेस ज्या ठायी । तेथेचि राही ॥११४॥
इंद्रिये न कोंडी । भोगाते न तोडी । अभिमान न सोडी । स्वजातीचा ॥११५॥
कुळधर्म सांभाळी । विधिनिषेध पाळी । मग सुखे मोकळीक सगळी । दिधली आहे तुज ॥११६॥
परि मन वाचा देहे जाहले । जे व्यवहार सगळे । ते मीचि केले । ऐसे न म्हणावेस ॥११७॥
का की करणे वा न करणे । आघवे तोचि जाणे । विश्व चालतसे सत्तेने । ज्या परमात्म्याच्या ॥११८॥
कर्माच्या उण्यापुर्याचे काही । उरू न दे आपुल्याठायी । परमात्मरूप करूनि घेई । जीवित हे ॥११९॥
माळ्याने जिकडे न्यावे । तिकडे निवांतचि जावे । त्या पाण्याऐसे व्हावे । जीवित गा ॥१२०॥
एरवी तरि काय बिकट । सरळ की आडवाट । रथ काय याची वाटाघाट । करीत असे? ॥१२१॥
म्हणोनि प्रवृत्ति आणि निवृत्ति ही । ओझी न मतीवरि घेई । अखंड ठेवी मजठायी । चित्तवृत्ती ॥१२२॥
आणि जे जे कर्म घडावे । ते बहु-थोडे न म्हणावे । निवांतचि अर्पित राहावे । मजठायी ॥१२३॥
ऐसी होता मजठायी भावना । तनु त्यागिता अर्जुना । तू मुक्तिसदना । माझिया येसी ॥१२४॥
न घडे हे असे कर्म योग माझ्यात साधुनी
तरी सर्वचि कर्मांचे प्रयत्नें फळ सोड तू ॥११॥
अथवा हेही तुज । कर्म न देववे मज । तर गा तू भज । पंडुकुमरा ॥१२५॥
बुद्धीचे पाठी-पोटी । कर्माआधी आणि शेवटी । मज स्मरणे तुज किरीटी, । दुर्घट जर; ॥१२६॥
तर हेही असो । माझ्या आग्रहही नसो । परि संयमी वसो । बुद्धि तुझी ॥१२७॥
आणि वेळोवेळा । घडे कर्मसोहळा । तरि तयाचे फळा । त्याजित जाय ॥१२८॥
वृक्ष आणि वेली । दूर लोटिती फळे आली । तैसी सोड जी निपजली । कर्मफळे ॥१२९॥
परि मज मनी धरावे । की मजउद्देशे करावे । हे काही नको आघवे । जाऊ दे शून्यब्रह्मीं ॥१३०॥
खडकावरी वर्षले । की आगीमध्ये पेरिले । तैसे कर्म देखिले । मानी स्वप्न ॥१३१॥
अगा लेकीविषयी देख । जीव जैसा निरभिलाष । तैसा कर्मी अशेष । निष्काम होई ॥१३२॥
वन्हीची ज्वाळा जैशी । वाया जाय आकाशी । क्रिया जिरू दे तैशी । शून्यब्रह्मामाजी ॥१३३॥
अर्जुना हा फलत्याग । गमे साचचि सोपा मग । परि योगांमध्ये योग । सर्वश्रेष्ठ हा ॥१३४॥
ऐसे फलत्यागे त्यजिती । त्या कर्मा अंकुर न फुटती । जैसी प्रसवुनि एकवेळ ती । वेळूझाडे वांझ ॥१३५॥
तैसे याचि शरीरें । शरीरा येणे सरे । किंबहुना फेरे । जन्ममरणाचे थांबती ॥१३६॥
अभ्यासाचे पायरीने जावे । अर्जुना ज्ञान मिळवावे । ज्ञानयोगें भेटीसी यावे । ध्यानाचिये ॥१३७॥
मग ध्यानासी आलिंगन । देती काया वाचा मन । तेव्हा कर्मजात तेथून । दूर ठाके ॥१३८॥
कर्म जेथ दुरावे । तेथ फलत्याग संभवे । त्यागामुळे स्वाधीन पाहे । शांति सगळी ॥१३९॥
तुज लाभावया शांति येथ । याचि अनुक्रमे प्रस्तुत । अभ्यास करणे सांप्रत । अर्जुना गा ॥१४०॥
प्रयत्नें लाभते ज्ञान पुढे तन्मयता घडे
मग पूर्ण फलत्याग शीघ्र जो शांति देतसे ॥१२॥
अभ्यासाहूनि गहन । पार्था मग ज्ञान । ज्ञानाहुनि ध्याय । विशेष असे ॥१४१॥
पार्था, कर्मफलत्याग मानी । उजवा ध्यानाहुनी । ब्रह्मसुखानुभव त्यागाहुनी । शांतिदायी ॥१४२॥
ऐशा या वाटेने । याचि स्थानांच्या क्रमाने । शांतीचा उंबरठा जयाने । गाठिला असे; ॥१४३॥
कोणाचा न करी द्वेष दया मैत्री वसे मनीं
मी माझे न म्हणे सोशी सुखदुःखे क्षमाबळें ॥१३॥
तो सर्व भूतांचे ठायी । द्वेष न जाणेचि काही । आपणर भाव नाही । चैतन्या जैसा ॥१४४॥
उत्तम ते धरणे । अधम तर अव्हेरणे । हे काहीचि न जाणे । वसुधा जैसी ॥१४५॥
राजाचा देह पाळू । रंका दूर वाळू । हे न म्हणोचि कृपाळू । प्राण गा जैसा; ॥१४६॥
गाईची तृषा हरू । की वाघा विष होऊनि मारू । ऐसे न जाणेचि करू । तोय जैसे; ॥१४७॥
भूतमात्रीं आघव्याचि । एकपणें मैत्री जयाची । जन्मभूमी कृपेची । स्वयेंचि जो ॥१४८॥
मी-तू भाष न जाणे । माझे काहीचि न म्हणे । सुखदुःख होणे । नाही जया; ॥१४९॥
तेवीचि क्षमेसाठी सखा । पृथ्वीतुल्य तो देख ॥ जयाचे अंकी संतोषा । लाभले घर; ॥१५०॥
सदा संतुष्ट जो योगी संयमी दृढनिश्चयी
अर्पी मज मनोबुद्धि भक्त तो आवडे मज ॥१४॥
जैसा वर्षेविण सागर । जळें नित्य निर्भर । तैसा निरुपचार । संतोषी जो; ॥१५१॥
वाहोनि आपुली आण । आवरी जो अंतःकरण । निश्चया साचपण । जयाचे असे; ॥१५२॥
जीव परमात्मा दोन्ही । बैसोनि ऐक्याचे आसनी । जयाचे हृदयभुवनीं । विराजती; ॥१५३॥
ऐसा योगसमृद्ध होत । अगा जो अखंडित । मन-बुद्धी अर्पित । माझे ठायी; ॥१५४॥
आतबाहेरी योग । दृढावताहि सांगोपांग । माझा असे अनुराग । सप्रेम जया; ॥१५५॥
अर्जुना तो भक्त । तोचि योगी तोचि मुक्त । तो कांता मी कांत । ऐसा प्रिय ॥१५६॥
हेचि सांगू काय । तो मज जिवापाड प्रिय । परि हेही थोडके होय । रूपक येथ ॥१५७॥
कहाणी ही प्रेमळांची । भुरळचि मंत्राची । ही गोष्ट न बोलण्याची । परि बोलवी श्रद्धा ॥१५८॥
म्हणोनि गा आम्हा । वेगें सुचली उपमा । एरवी काय प्रेमा । वर्णिता ये? ॥१५९॥
आता असो हे किरीटी । परि प्रियाचिया करिता गोष्टी । दुणावुनी घेई पुष्टी । प्रेमभाव गा ॥१६०॥
त्याहीवरी कदाचित । प्रेमळ संवाद होत । त्या गोडीसी तेथ । तुलना मग कोठे? ॥१६१॥
म्हणोनि ना पांडुसुता, । तूचि प्रिय तूचि श्रोता । वरी प्रेमळाची वार्ता । प्रसंगे आली ॥१६२॥
तर आता बोलू । भले हे सुख झेलू । ऐसे म्हणताक्षणी डोलू । लागले देव ॥१६३॥
मग म्हणे जाण । त्या भक्तांचे लक्षण । जयां मी अंतःकरण । बैसण्या देई ॥१६४॥
जो न लोकांस कंटाळे ज्यास कंटाळती न ते
हर्ष शोक भय क्रोध नेणे तो आवडे मज ॥१५॥
अगा सागर माजे । परि जळचरा भय न उपजे । आणि जळचरां न उबगता गाजे । सागर जैसा; ॥१६५॥
तैसे जग होय उन्मत्त जरी । तरी जो न खंत करी । आणि जयायोगे न शिणे खरोखरी । जगही कधी; ॥१६६॥
किंबहुना पांडवा । शरीर जैसे अवयवां । तैसा तो न उबगे जीवां । तोचि सर्वांचा जीव ॥१६७॥
जगचि देह जाहले । म्हणोनि प्रिय-अप्रिय गेले । हर्ष-क्रोध निमाले । दुजेपणाविण ॥१६८॥
ऐसा द्वंद्वनिर्मुक्त । भय-उद्वेगरहित । त्याहीवरी भक्त । माझेठायी ॥१६९॥
तयाची मज हाव । काय सांगू तो प्रेमभाव? । माझेचि जीवें तयाचा जीव । जगतसे ॥१७०॥
आत्मानंदें तृप्त जाहला । तो ब्रह्मचि जन्मा आला । पूर्णतेने वरिला । वल्लभ जो ॥१७१॥
नेणे व्यथा उदासीन दक्ष निर्मळ निःस्पृह
सोडी आरंभ जो सारे भक्त तो आवडे मज ॥१६॥
जयाचे ठायी नावालाही । अपेक्षेसि शिरकाव नाही । सुखाची वाढती ठेव ही । जयाचे असणे ॥१७२॥
मोक्ष देण्या उदार । काशी क्षेत्र खरोखर । परि वेचे जो शरीर । त्या गावी ॥१७३॥
हिमालयी पाप जाई । परि जीविताची हानि होई । तैसे पावित्र्य घातक नाही । सज्जनांचे ॥१७४॥
पवित्रात पवित्र गंगा । तिमुळे पाप-ताप जाय गा । परि तेथ संकट, उगा । बुडण्याचे एक ॥१७५॥
खोलीचा पार न लागत । परि कोणी न बुडे भक्तिगंगेत । रोकडाचि भेटे तेथ । न मरता मोक्ष ॥१७६॥
संतांचे अंगस्पर्शें । गंगेचे पाप नाशे । त्या संतांसंगेही तैसे । पवित्र्य लाभे ॥१७७॥
म्हणोनि ऐसे जे संत । शुचित्वें तीर्थां आश्रय होत । मनोमळ लावित । देशोधडीसी ॥१७८॥
आतबाहेरी निर्मळ । सूर्याऐसा तेजाळ । देखे ब्रह्मधन सकळ । पायाळू जो ॥१७९॥
व्यापक आणि उदास । जैसे की आकाश । तैसे तयाचे मानस । सर्वत्र गा; ॥१८०॥
संसारव्यथेतुनि निसटला । जो नैराश्यें विनटला । व्याधाहातोनि सुटला । विहंग जैसा; ॥१८१॥
तैसा सुखें जो सतत । कोणतेहि दुःख न देखत । देह पडता, उघडा न जाणत । लज्जा जैसी ॥१८२॥
आणि कर्मारंभालागी । जया अहंकार नाही अंगी । जैशा इंधनाविण आगी । विझोनि जाती; ॥१८३॥
तैसी शांतीचि केवळ सुभगा । जयाचे वाटयासि आली गा । जी मोक्षप्राप्तिचे अंगा । लिहिली असे; ॥१८४॥
येथवरी हे निर्मळा, । जो सोऽहंभावें पूर्ण भरला । तो निघोनि गेला । द्वैताचे पैलतीरा ॥१८५॥
आणिक भक्तिसुखास्तव जाण । आपणातचि देव-भक्त ऐसे करून । एके अंगी सेवकपण । बाणवीत असे; ॥१८६॥
मग दुसर्या अंगी देव । भजण्याची रीत अभिनव । न भजणार्या दाविता होय । योगो जो; ॥१८७॥
तयाचे आम्हा व्यसन । आमुचे तो निजध्यान । किंबहुना समाधान । तो भेटे तेव्हा ॥१८८॥
तयासाठी सगुणरूप घेणे । तयास्तवचि मज येथ असणे । तया ओवाळावे जीवेंप्राणें । इतुका आवडे ॥१८९॥
न उल्लासे न संतापे न मागे न झुरेचि जो
बरे वाईट सोडूनि भजे तो आवडे मज ॥१७॥
जो आत्मप्राप्तीसारिखे । गोमटे काहीचि न देखे । म्हणोनि न हरखे । भोगविशेषे ॥१९०॥
आपणचि विश्व जाहला । तर भेदभाव सहजचि गेला । म्हणोनि द्वेष सरला । ज्या योगियाचा ॥१९१॥
आत्मस्वरूप जे साच पाही । न नाशे ते कल्पांतीही । हे जाणोनि गतगोष्टींविषयी । शोक न करी जो ॥१९२॥
जयापार काहीचि नसे । ऐसे ब्रह्म तो जाहला असे । काहीही न आकांक्षे । म्हणोनि जो ॥१९३॥
गोमटे की विपरीत ऐसे । हे काहीचि जया न गमतसे । जैसे रात्र-दिवस नसे । सूर्याठायी ॥१९४॥
ऐसा बोधरूपचि केवळ । जो होऊनि असे निखळ । त्याहिवरी भजनशील । माझे ठायी; ॥१९५॥
तयाऐसे दुसरे । आम्हा आवडते सोयरे । पार्था, नाही गा खरेखुरे । तुझी आण ॥१९६॥
सम देखे सखे वैरी तसे मानापमानहि
शीत उष्ण सुखे दुःखे करूनि सम मोकळा ॥१८॥
अर्जुना जयाचे ठायी । वैषम्याची वार्ता नाही । शत्रु-मित्र दोन्हीही । सारिखेचि मानी; ॥१९७॥
घरच्यांसी उजेड करावा । परक्यांसी अंधार पाडावा । हे न जाणेचि गा पांडवा, । दीप जैसा; ॥१९८॥
खांडाया घाव घाली । की लावणी जयें केली । दोघां एकचि साउली । वृक्ष दे जैसा ॥१९९॥
अथवा पाहे बा, ऊस । गोड, पाणी देणार्यास । आणि कडू, गाळणार्यास । नव्हेचि जैसा; ॥२००॥
अर्जुना, शत्रुमित्रीं तैसा । जयाचा भव ऐसा । मानापमानीं सरिसा । होत जाय; ॥२०१॥
तिन्ही ऋतूत समान । जैसे की गगन । तैसे सरिसेचि जाण । शीतोष्ण जया ॥२०२॥
दक्षिण-उत्तर मारुता । मेरू जैसा पांडुसुता । तैसे सुख-दुःख भेटता । अविचल जो; ॥२०३॥
माधुर्यें चंद्रिका । सरिसी रावा-रंका । तैसा तो सकळिकां । भूतांसि सम ॥२०४॥
अवघ्या जगा एक । सेव्य जैसे उदक । तैसे तया तिन्ही लोक । आकांक्षिती ॥२०५॥
सोडोनिया संग । जो अंतर्बाह्य निःसंग । आपुलेचि अंगी ठेवुनि अंग । एकाकी असे ॥२०६॥
निंदा स्तुति न घे मौनी मिळे ते गोड मानितो
स्थिरबुद्धि निराधार भक्त तो आवडे मज ॥१९॥
तो निंदा मनी न घेई । स्तुतीने न फुगुनि जाई । आकाशा न लागे काही । लेप जैसा ॥२०७॥
तैसे निंदा आणि स्तुती । या बैसवुनि एके पंक्ती । उदास ठेवुनि प्राणवृत्ती । वावरे जनींवनीं ॥२०८॥
साच-लटिके दोन्ही । न बोले जाहला मौनी । भोगिताहि अवस्था उन्मनी । तृप्त नसे ॥२०९॥
जो लाभें न संतोषे । अलाभें न उदासे । न सुकत समुद्र जैसे । वर्षेविण की ॥२१०॥
आणि वाय़ूसी एके ठायी । बिर्हाड जैसे नाही । तैसा आश्रय न घेई । कोठेही जो ॥२११॥
अवघ्याचि आकाशी । वायूची नित्य वसती । जैसी । तैसे विश्रांतिस्थान जयासी । जगचि होय ॥२१२॥
हे विश्वचि माझे घर । ऐसी मति जयाची स्थिर । किंबहूना चरावर । आपण जाहला ॥२१३॥
पार्था, मग याहीवरी । माझिये भजनी आस्था धरी । तया मी मुकुट करी । माथ्यावरी ॥२१४॥
उत्तम भक्तापुढे मस्तक । लवविती हे का कौतुक? । परि मान देत तिन्ही लोक । चरणोदका ॥२१५॥
तर जयाची श्रद्धा मजवरी तया मी कैसा आदरी । हे जाणावया करी । सदाशिवा गुरू ॥२१६॥
परि हे असो आता । महेशाते वानिता । आत्मस्तुती तत्त्वता । होत असे ॥२१७॥
यालागी अधिक बोलणे न व्हावे । म्हटले रमानायके सादभावे । अर्जुना, मी शिरी वाहे । अहर्निश तया ॥२१८॥
पुरुषार्थसिद्धी चौथी । घेऊनि आपुल्या हाती । निघाला तो भक्तिपंथी । जगा मोक्ष देत ॥२१९॥
तो कैवल्याचा अधिकारी समर्थ । मोक्ष कोणा द्यावा ठरवीत । तरि जळापरी सतत । विनम्र असे ॥२२०॥
म्हणोनि गा नमस्कारू । तया माथ्यावरि मुकुट करू । तयाची टाच धरू । हृदयी आम्ही ॥२२१॥
तयाचे गुणांचे लेण्यांसी । लेववू आपुले वाणीसी । तयाची कीर्ति श्रवणासी । लेवू आम्ही ॥२२२॥
तो पहावा हे डोहाळे । म्हणोनि अचक्षूसी मज डोळे । हातींचे लीलाकमळें । पूजितो तया ॥२२३॥
दोन भुजांवरि आणिक । भुज घेउनि आलो एकेक । आलिंगिण्यास्तव देख । तयाचे अंग ॥२२४॥
तयाचे संगतीत सुख घडे । मज विदेहा देह धरणे पडे । किंबहुना तो आवडे । निरुपम ॥२२५॥
तयाशी आमुचे मैत्र । यात कायसे विचित्र? । परि तयाचे चरित्र । ऐकती जे; ॥२२६॥
तेही प्राणातीत । आवडती हे निश्चित । जे भक्तचरित । प्रशंसिती ॥२२७॥
जे हे अर्जुना साद्यंत । सांगितले तुज प्रस्तुत । तो भक्तियोग समस्त । योगरूप ॥२२८॥
मी प्रीती करी । मनी-शिरी धरी । एवढी थोरवी खरोखरी । योगस्थितीची ॥२२९॥
जे धर्मसार हे नित्य श्रद्धेने मीचि लक्षुनी
सेविती ते तसे भक्त फार आवडती मज ॥२०॥
ती ही गोष्ट रम्य फार । अमृतमधुर धर्मपर । ऐकोनि जाहले जाणकार । स्वानुभवें जे; ॥२३०॥
तैसीचि श्रद्धेचे आदरे । ही गोष्ट जयाठायी विस्तारे । जीवीं देऊनि थारे । जे आचरिती ॥२३१॥
परि निरूपिली जैसी । तैसीचि स्थिति जर मानसीं । तर सुक्षेत्रीं देखसी । पेरणी केली की ॥२३२॥
परि मज परमश्रेष्ठ जाणित । भक्तितत्त्वीं प्रेम धरित । हेचि सर्वस्व मानीत । योग अंगिकारिती जे; ॥२३३॥
पार्था गा जगी । तेचि भक्त, तेचि योगी । उत्कंठा तयांलागी । अखंड मज ॥२३४॥
तो तीर्थ तो क्षेत्र । जगीं तोचि पवित्र । भक्तिकथेशी मैत्र । ज्या योगियाचे ॥२३५॥
तयाचे करू ध्यान । तो आमुचे देवतार्चन । अन्य न तयावाचून । गोमटे काही ॥२३६॥
तयाचे आम्हा व्यसन । तो आमुचे द्रव्यनिधान । किंबहुना समाधान । तो भेटता ॥२३७॥
अगा प्रेमळाची वार्ता । जे गाती पांडुसुता । ते मानू परमदेवता । आपुली आम्ही ॥२३८॥
ऐसे निजजनानंद । तो जगदादिकंद । बोलिला मुकुंद । संजय म्हणे ॥२३९॥
पाहे जो निर्मळ । निष्कलंक लोककृपाळ । शरणागताचा करि प्रतिपाळ । शरण्य जो ॥२४०॥
तो धर्मकीर्तिधवल । अगाध दातृत्वी सरल । अतुलबळें प्रबळ । बळीराजाचे प्रेमें बद्ध ॥२४१॥
जो देवांसी साहाय्यशील । लोकलालन हा ज्याचा खेळ । शरणागतांचा प्रतिपाळ । हि लीला जयाची; ॥२४२॥
जो भक्तजनांसी वत्सल । प्रेमळ जनांसी प्रांजळ । सत्य हाचि सेतू सरळ । ज्या परमात्म्याकडे जावया ॥२४३॥
तो कलानिधी सांगे वैकुंठीचा । चक्रवर्ती राजा भक्तांचा । हा अर्जुन लाडका दैवाचा । ऐकत असे ॥२४४॥
आता यावरी । निरूपिती कवणेपरी । संजय म्हणे, अवधारी । धृतराष्ट्राते ॥२४५॥
तीचि कथा रसाळ । मराठीचिये रूपीं सरळ । आता आणिली जाईल । अवधारावी ॥२४६॥
तुम्हां सकळ संतसज्जनांते । सेवावे जी, म्यां येथे । पढविले श्रीगुरूनिवृत्तिनाथें । ज्ञानदेव म्हणे ॥२४७॥