आता ह्रदय हे आपुले । शुद्ध करुनि चांगले । त्या चौरंगावरि प्रतिष्ठापू पाउले । श्रीगुरूंची ॥१॥
ऐक्यभावाचे ओंजळीत या । घेउनि सर्वेंद्रियांच्या कमळकळ्या । त्या पुष्पांजलींचे अर्ध्य देऊया । श्रीगुरुचरणीं ॥२॥
अनन्यभावें विशुद्ध करुनि नीट । भावना जी गुरुनिष्ठ । तेचि लावू बोट । चंदनाचे ॥३॥
प्रेमरूप सोन्याचे पवित्र । घडवूनिया नूपुर । लेववू सुकुमार । चरण तयांचे ॥४॥
दृढावले प्रेम जीवीं । अनन्यभावें ठायी ठायी । तीचि लेववू जोडवी । श्रीगुरूंचे अंगुष्ठीं ॥५॥
आनंदसुगंधें बहरलेले । अष्टसात्त्विकभावें उमललेले । आठ पाकळ्यांनी फुललेली । ठेवू कमळ वरी ॥६॥
तेथ अहं हा धूप जाळू । सोऽहंतेजें ओवाळू । सामरस्यें कवटाळू । निरंतर ॥७॥
माझी तनु आणि प्राण । या खडावा श्रीचरणीं लेववून । भोगमोक्षाचे लिंबलोण । ओवाळू चरणांवरुनी ॥८॥
करोनि श्रीगुरुचरणसेवा । होऊ पात्र त्या दैवा । जेणे सकळ पुरुषार्थमेळावा । प्राप्त होई ॥९॥
ब्रह्मीं विसावण्यापावत धावे । हे ज्ञान उत्कर्ष पावे । जे वाचेसी करि दैवें । सुधासिंधू ॥१०॥
कोटयवधि पूर्णचंद्र आघवे । वक्तृत्वावरूनी ओवाळावे । ऐसी गोडी ज्या दैवें । अक्षरांसी ये ॥११॥
सूर्यें अंगिकारिता प्राची । ती जगा संपदा दे प्रकाशाची । तैसी दिवाळी करी ज्ञानाची । वाचा श्रोत्यांसी ॥१२॥
नादब्रह्यही गमे खुजे । कैवल्यहि तैसे न साजे । ऐसा बोल स्फुरुनि विराजे । जेणे दैवें ॥१३॥
श्रवणसुखाचे मांडवीं । विश्व भोगी माधवी । तैसी बहरे बरवी । वाचावेली ॥१४॥
जयाचा न पावता ठाव । परतली वाचा मनासह । शब्दांचे अंकित तो देव । गुरुचरण उपासकाच्या ॥१५॥
ज्ञानेंही जे न भेटे । ध्यानेंही अवघड वाटे । ते ब्रह्म सहज बोलण्यात कोठे । लाभे तयाच्या ॥१६॥
एवढे एक सद्भाग्य हे । वाचेचे अंग पावे । गुरुचरणकमळाचा सुगंध ये । ज्यासमयीं ॥१७॥
तर बहु बोलू काय ? । मजवाचुनी कोठे अन्य । आज ते नाही दैव । ज्ञानदेव म्हणे ॥१८॥
अपत्य मी तान्हुले । आणि गुरूंचे एकुले । कृपेसी जाहले । म्हणोनि पात्र ॥१९॥
भरभरुनी वर्षाव । मेघ करी चातकास्वव । स्वामींनी माझा भाव । देखुनि तैसे केले ॥२०॥
रिकामे माझे तोंड । करू लागे बडबड । तेव्हा गीतेऐसे गोड । गवसले ॥२१॥
अनुकूल असेल अदृष्ट । तर वाळूचे होई रत्नकूट । आयुष्य असे जर बळकट । मारणाराहि लोभावे ॥२२॥
आधणीं वैरता खडवण केवळ । अमृतमय होत तांदूळ । जर भुकेची राखे वेळ । जगन्नाथ ॥२३॥
यापरी गुरुवर । करिती जेव्हा अंगिकार । होऊनि ठाके संसार । मोक्षमय आघवा ॥२४॥
पांडवांचे असुनि उणे । केलीचि ना नारायणें । पुराणे कथागुणें । विश्ववंद्य ॥२५॥
तैसे श्रीनिवृत्तिराज गुरुवर्यें । अज्ञानत्वा माझिये । आणिले ज्ञानाचिये । योग्यतेसी ॥२६॥
आता असो हे परंतु । वर्णिता प्रेम जाय उतू । गुरुगौरवाचा मनी हेतू । परि ज्ञान कोठे मज ॥२७॥
आता तयाचेचि प्रसादें । तुम्हा संतांची पदे । सेवीन अर्थगंधें । गीतेचिया ॥२८॥
तर तोचि परिसा अभिप्राय । सरतांना चौदावा अध्याय । करिती ऐसा निर्णय । कैवल्यपती ॥२९॥
की ज्ञान जयाचे हातीं । तोचि समर्थ लाभण्या मुक्ती । जैसी शतयज्ञें मिळवी संपत्ती । स्वर्गींची की ॥३०॥
सतत शतजन्म । जो करी ब्रह्मकर्म । तोचि होय ब्रह्मदेवासम । अन्य न कोणी ॥३१॥
किंवा सूर्याचा प्रकाश । पावे जैसा डोळस । तैसा ज्ञानेंचि मोक्षसुखास । पावे तो ॥३२॥
तर त्या ज्ञानालागी । कोणा बा योग्यता अंगीं । हे पाहता जगीं । देखिला एक ॥३३॥
अहो पाताळींचेही निधान । दिसेल घालिता नेत्रीं अंजन । परि असावे लोचन । पायाळूचे ॥३४॥
तैसे मोक्ष देईल ज्ञान । यात संशय नसे जाण । परि ते स्थिरावे ऐसे मन । शुद्ध असावे ॥३५॥
तर विरक्तीवाचुनी कोठेही । ज्ञान तगणेचि नाही । हा विचार आपुल्याठायी । ठेविला देवें ॥३६॥
आता विरक्तीची कवण परी । जी येउनि मनाते वरी । हेही सर्वज्ञ श्रीहरी । देखत असे ॥३७॥
विषें रांधिला स्वयंपाक । जेवणार्यासि होय ठाऊक । तो ताटचि सोडुनि जाय देख । ज्यापरी मग; ॥३८॥
तैसी समस्त संसारा या पाहता । जाणवे जेव्हा अनित्यता । तेव्हा वैराग्य दूर दवडिता । पाठोपाठ येई ॥३९॥
आता अनित्यत्व ह्यास कैसे । तेचि वृक्षाकारमिषें । कथिले असे विश्वेशें । पंधरावे अध्यायीं ॥४०॥
झाद पडे उन्मळून । ठाके बूड वरी होऊन । ते वेगें जाय सुकून । तैसे हे नव्हे ॥४१॥
याचि एकेपरी । रूपकाचिये कुसरीवरी । भगवंत सारिती वारी । संसाराची ॥४२॥
दावुनि संसाराचे मिथ्यात्व । जीवाठायी अहंतेसि द्यावद्या ठाव । जाहला असे अंतर्भाव । पंधराव्या अध्यायाचा ॥४३॥
आता हेचि आघवे । ग्रंथगर्भींचे आशय नवे । विशद होतील जीवेंभावें । परिसावे हो ॥४४॥
तर ब्रह्मानंदसमुद्र । जो पूर्णपूर्णिमाचंद्र । तो द्वारकेचा नरेंद्र । ऐसे म्हणे; ॥४५॥
अगा पंडुकुमरा । येता स्वरूपाचिया घरा । घालितसे अडसर पुरा । प्रपंचतरू हा ॥४६॥
तो हा विश्वविस्तार । नव्हे येथ संसार । जाण हा महातरुवर । पसरला असे ॥४७॥
परि अन्य वृक्षांऐसा हा नसे । तळीं मुळे वरी शाखा ऐसे । वर्णिता न ये कोणाही कैसे । अंत न लोग ॥४८॥
मुळाशी लागती कुर्हाडी । वा अग्नि शिरे बुडीं । वरची वाढ केवढी । असे जरी ॥४९॥
मुळापासुनि वृक्ष तुटे थेट । उन्मळे शाखांसकट । परि तैसी या प्रपंचतरुची गोष्ट । सोपी नसे ॥५०॥
अर्जुना हे कवतिक । सांगता असे अलौकिक । कारण वाढ अधोमुख । वृक्षाची या ॥५१॥
भानूची उंची नकळे । रश्मिजाल खाली पसरले । तैसा हा संसारवृक्षहि त्यामुळे । विस्मयकारकचि ॥५२॥
आणि आहे नाही तितुके । व्यापिले असे यानेचि एके । कल्पांतींचे उदकें । व्योम जैसे ॥५३॥
की रवीचे अस्तमानी । अंधारें कोंदे रजनी । तैसा हाचि एक गगनीं । भरिला असे ॥५४॥
चाखावे तर फळ नाही । हुंगावे तर ना फूलही । अजुना, असे जे काही । ते वृक्षचि हा ॥५५॥
हा ऊर्ध्वमूळ आहे । परि उन्मळला नोहे । त्यामुळेचि हा राहे । हिरवागार ॥५६॥
आणि ऊर्ध्वमूळ ऐसे भले । जरि असे वर्णिले । तरि खालीही मुळे । असंख्य यासी ॥५७॥
चौफेर लव्हाळ्यापरी । पिंपळा की वडापरी । ह्यासि पारंब्यांतरीं । डहाळ्या असती ॥५८॥
तैसेचि गा धनंजया । संसारतरूसी या । खालीचि असती फांद्या । ऐसेही नव्हे ॥५९॥
तर वरीही चौफेर । शाखांचा विस्तार । दिसतात अपार । बहरलेल्या ॥६०॥
गगनचि वेल जाहले । की वार्याने वृक्षरूप घेतले । अथवा येथ उदयले । उत्पत्ति-स्थितिलय ॥६१॥
ऐसा हा एक खरोखर । घनदाट विश्वाकार । उदयला जाण तरुवर । ऊर्ध्वमूळ ॥६२॥
आता ऊर्ध्वभाग कवण ? । मुळाचे काय लक्षण ? । का ह्यास अधोमुखपण । शाखा कैशा ? ॥६३॥
अथवा तरूसी या । तळीं ज्या असती मुळ्या । कोणत्या कैशा तया । वरी शाखा ? ॥६४॥
आणि अश्वत्थ ऐसी । प्रसिद्धी ही याची कायसी ? । आत्मविद्याविलासी । निर्णय करिती ॥६५॥
आता पांडवा हे आघवे । तुझिये प्रतीतीसि यावे । ऐसे सांगू बरवे । सोलीव विस्तारें ॥६६॥
तर ऐक गा सुभगा । हा पसंग असे तुजचिजोगा । कानचि करि हो सर्वांगा । हृदयसंपन्ना ॥६७॥
ऐसे प्रेमरसभरात । बोलिले जेव्हा यदुनाथ । अवधानचि जाहले मूर्त । अर्जुनाकारें ॥६८॥
देवांचे निरूपण होय धाकुले । एवढे पार्थाचे श्रोतेपण फाकले । जैसे आकाश की कवळिले । दाही दिशांनी ॥६९॥
अहो श्रीकृष्णोक्तिसागरा । हा अगस्तीचि दुसरा । घोट घेवो पाहे पुरा । अवघ्याचाचि ॥७०॥
ऐसी असीम उसळली । उत्कंठा देवें देखिली । सुखाची कुरवंडी केली । अर्जुनावरी ॥७१॥
श्रीभगवान् म्हणाले:
खाली शाखा वरी मूळ नित्य अश्वत्थ बोलिला
ज्याच्या पानांमधे वेद जाणे तो वेद जाणतो ॥१॥
मग म्हणे, धनंजयासी । ब्रह्म ते गा ऊर्ध्व या तरूसी । या वृक्षानेचि ब्रह्मासी । ऊर्ध्वता गमे ॥७२॥
एरवी अध मध्य ऊर्ध्य । ऐसे नाही जेथ भिन्नत्व । एकत्वहि लया जाय । जयाठायी ॥७३॥
काना विषया न हो ऐसा नाद । सुगंधाविना मकरंद । जो मूर्तिमंत आनंद । निरामय; ॥७४॥
जया जे अलिकडे पलीकडे । जया जे मागुते पुढे । पाहणार्याविण पाहणे घडे । अदृश्य जे; ॥७५॥
माया-उपाधीचा गाहिरा । सोयरसंबंध दुसरा । नामरूपादि प्रपंचपसारा । होय जया ॥७६॥
ज्ञाता-ज्ञेय-विहीन । केवळ सुखभरले ज्ञान । जे गगनातून । गाळलेले; ॥७७॥
जे कोणाचे कार्य ना कारण । जया दुजे ना एकपण । जे आपुले आपण । आपणासी ॥७८॥
ऐसे ब्रह्म जे साचे । ते ऊर्ध्वं गा या तरूचे । तेथ अंकुरणे मुळाचे । ऐसे असे ॥७९॥
तर माया ऐशी जी ख्याती । नसलेलीचि मुळा आली ती । अगा वांझेची संतती । वानावी जैशी; ॥८०॥
तैशी सत् ना असत् । विचाराचे नाव न साहत । ऐशापरीचि आभासत । तिज अनादि म्हणती ॥८१॥
जी भवद्रुमबीजिका । प्रपंचवृक्षा भूमी जी देखा । विपरीतज्ञानदीपिका । उजळली जी ॥८२॥
माया जी अनेक शक्तींचे स्थळ । जी जगदरूप अभ्रासि आभाळ । जी विश्वाकाराची सकळ । घडी जणु ॥८३॥
माया ब्रह्मवस्तूचे ठायी भासे । जैसी असे की नसे । मग जितुका ज्ञानव्यवहार दिसे । तोचि ब्रह्मवस्तूचा प्रकाश ॥८४॥
डोळ्यावरि येता नीज । आपणा मूढ करी सहज । वा काजळीं मंद करी तेज । दीपाचे गा ॥८५॥
स्वप्नीं प्रियापुढे तरुणांगी । स्वप्नींचि तया जागवुनि वेगीं । आलिंगिल्याविण आलिंगी । सकाम करी ॥८६॥
तैसी स्वरूपीं जाहली माया । अज्ञाना स्वाश्रयीं आणी, धनंजया । तेचि वृक्षाकारासि या । मूळ पहिले ॥८७॥
ब्रह्मवस्तूसि आपुला जो अबोध । तोचि याचा वस्तुठायी बांधिला कंद । वेदान्तींही हाचि प्रसिद्ध । बीजभाव ॥८८॥
गाढ अज्ञान सुषुप्ती । तो अबोधबीजाचा कोंभ म्हणती । स्वप्न आणि जागृती । ही फलावस्था ॥८९॥
निरूपिण्या यासि वेदान्तात । ऐसी भाषा होय प्रतीत । परि ते असो प्रस्तुत । अज्ञान मूळ याचे ॥९०॥
आत्मा निर्मळ ऊर्ध्वभागात । तयातळीं मुळे वाढट । मायारूप जाळ्यात । बळावती ॥९१॥
मग आणखी खालती । असंख्य देह उद्भवती । ते चौफेर फोफावती । अंकुरोनी ॥९२॥
माया भवद्रुमाचे मूळ । ब्रह्माठायी घेई बळ । अग्राचे झुपके सरळ । लोंबती खाली ॥९३॥
चिदवृत्तिपासुनि पहिले । महत्तत्त्व उमलले । ते पान एक निघे कोवळे । लुसलुशीत ॥९४॥
मग सत्त्वरजतमात्मक । त्रिविध अहंकार जो एक । ती त्रिपर्णी अधोमुख । डिरी फुटे ॥९५॥
तो अहंकार बुद्धीचा अंकुर घेई । भेदाची वृद्धि करित राही । तेथ धरी टवटवी । डहाळी मनाची ॥९६॥
ऐशा मुळाचे दृढतेने । विकल्परसाचे कोवळेंपणें । मन-बुद्धि-अहंकार-येणें । डहाळ्या अंकुरती ॥९७॥
उपजले तामस अहंकारातून । आप-पृथ्वी-नभ-वायु-तेज जाण । हे पंचमहाभूतांचे फोक फुटून । वाढती सरळ ॥९८॥
पंचज्ञानेंद्रिये सूक्ष्म विषय ती । कोवळी लवलवती । चित्रविचित्र पाने फुटती । शेंडयासी जणु ॥९९॥
मग शब्दांकुर तेथ । श्रवणाएवढा वाढत । आकांक्षांची फुट । कांडी पुढती ॥१००॥
अंगत्वचेचे वेलपल्लव । स्पर्शांकुरीं घेती धाव । तेथ मोहोळ फुटे अभिनव । विकारांचे ॥१०१॥
रूपविषयाची पालवी फुटत । नेत्रेंद्रिय लांब वाढत । व्यामोहा चढे तेथ । पाल्हाळ बहु ॥१०२॥
डहाळ्या वेगें वाढत रसरूप । जिव्हेसी वांछेची अप्रूप- । पानास पाने फुटता अमाप । झुपके होती ॥१०३॥
जैसा गंधाचा वाढे कोंभ । घ्राणाची डिरी लुटे सौरभ । तेथ अनावर सुटे लोभ । अत्यानंदें ॥१०४॥
ऐसे महत्तत्त्व अहंकार मन बुद्धि येथ । आणि महाभूतसमृद्धी सतत । हा संसारविस्तार भरास येत- । राही, देखा ॥१०५॥
किंबहुना या आठ अंगें ऐसे । वृक्ष हा अधिकचि वाढतसे । परि शिंपलीएवढेचि भासे । रुपे शिंपलीवरिल जैसे ॥१०६॥
वा समुद्राएवढया विस्तारास । व्यापी लाटांचा पसाला पैस । तैसे ब्रह्मचि ये आकारास । अज्ञानमूळ वृक्षीं या ॥१०७॥
आता हाचि पावे विस्तारा । हाचि तयाचा पसारा । जैसा स्वप्नींचे परिवारा । आपणचि एकला ॥१०८॥
परि हे असो, ऐसे होई । भ्रमरूप झाड हे वाढत राही । जया अधोशाख फुटती पाही । महत्तत्त्वादि अंकुरांनी ॥१०९॥
आणि अश्वत्थ ऐसे याते । म्हणती जे जाणते । तेही परिस हो येथे । सांगू आता ॥११०॥
अगा श्व: म्हणजे उद्या । तोवरिहि न एकसारखा हा । नाही जीवित वृक्षा या । प्रपंचरूप ॥१११॥
जैसा न लोटे एकक्षणही । मेघ नानावर्णी होई । वीज न दिसे निमिषभरही । संपूर्ण की ॥११२॥
थरथरता कमळदळ । त्यावरी ठरेना जळ । चित्त तैसे व्याकुळ । माणसाचे ॥११३॥
तैसीचि याची स्थिती । नाशत जाय क्षणाक्षणाप्रती । म्हणोनि यास ज्ञाते म्हणती । अश्वत्थ ऐसे ॥११४॥
आणि व्यवहारीं जरि व्हावे । अश्वत्थ म्हणजे पिंपळ हे । तरि तो अभिप्राय नव्हे । श्रीहरीचा ॥११५॥
एरवी पिंपळ या अर्थें भगवंतें । संसारा अश्वत्थ म्हटले असते । तरि ते मज अवश्य रुचते । परि काय लौकिकार्थाचे आपणा ? ॥११६॥
म्हणोनि हा प्रस्तुत । अलौकिक परियेसा ग्रंथ । तर क्षणभंगुरत्वेंचि शास्त्रात । अश्वत्थ म्हटला जाय हा ॥११७॥
एक थोर आणिक ऐक । अविनाशत्वें हा विख्यात देख । परि गर्भित अर्थाची मेख । ऐसी आहे ॥११८॥
उन्हामुळे वाफेचे तोंडें । सिंधुजळें मेघ घडे । परि नद्या एकीकडे । सिंधू भरतचि असती ॥११९॥
म्हणोनि वाढे ना ओहटे । ऐसा परिपूर्णचि वाटे । परि जोवरिन विस्कटे । संयोग मेघ-नद्यांचा ॥१२०॥
ऐसे या वृक्षाचे होणे-जाणे । तर्काने न होय जाणणे । म्हणोनि जनलोक म्हणे । अविनाशी हा ॥१२१॥
एरवी दानशूर पुरुष । खर्चिकपणेचि संचक देख । तैसा नाश पावताहि हा वृक्ष । अविनाशी गमे ॥१२२॥
बहु वेगें फिरे एक । भूमीतचि रुतले गमे देख । चालत्या रथाचे चाक । ज्यापरी गा ॥१२३॥
तैसी कालगतीने जी वाळे । ती भूतशाखा जेथ गळे । तेथ कोटिवरी फुटत आगळे । अंकुर आणिक ॥१२४॥
नकळे एक केव्हा गेली । कोटिशाख केव्हा फुटली । आषाढीं विरता मेघावली । जैशा अनेक उमलती ॥१२५॥
उदयल्या सृष्टी उन्मळती । जैशा महाकल्पाचे अंतीं । तैसीचि आणिक राने उठती । फोफावुनी कल्पारंभीं ॥१२६॥
प्रचंड संहारवारे सुटती । प्रळयांतींची साले गळती । झुपके पालवती । कल्पारंभींचे ॥१२७॥
एक मन्वंतर दुसर्यापुढे । वंशापुढे वंश वाढे । अथवा ऊस कांडें कांडें । वाढे जैसा ॥१२८॥
कलियुगान्तीं कोरडी जीर्ण । चार युगांची सालडी गळून । कृतयुगाची पहिली जाण । साल उदभवे ॥१२९॥
आताचे वर्ष जाई । तेचि पुढिल्या मूळ पाठवी । जैसा दिवस जाई की येई । हे न जाणवे ॥१३०॥
जैसा वार्याचे झुळुकांसि देखा । सांधा मुळी न ठाउका । तैशा फुटती-गळती शाखा । न जाणे किती ॥१३१॥
एका देहाची डिरी तुटे । तोंचि देहांकुर बहुत फुटे । यापरी भवतरु हा वाटे । अविनाशी ऐसा ॥१३२॥
जैसे वाहते पाणी जाय वेगें । तैसेचि आणिक मिळे मागे । संसारवृक्ष अस्थिरपणेंचि जगे । तरि मानिती स्थिर ॥१३३॥
डोळ्यांची उघडझाप होई । तोंवरि अगणित घडामोड होय विश्वीं । लाटेवरि लाट लाख फुटे पाही । तरि अज्ञ म्हणे लाट नित्य ॥१३४॥
एकचि बुबुळ दोही डोळां । फिरवित वेगें उडे कावळा । दोन ऐसा सकळां । पडे संभ्रम; ॥१३५॥
भिंगरी गरगर फिरली । गमे भूमीसि उभी जडली । ऐसी वेगातिशयें जाहली । करण भ्रमा ॥१३६॥
दाखले द्यावेत किती ते । अंधारीं फिरविता स्वताभोवते । कोलित अखंड गमते । चक्राकार; ॥१३७॥
या संसारवृक्षा तैसे । मोडणे घडणे सतत असे । ते न देखोनि लोक पिसे । अविनाशी मानिती तया ॥१३८॥
परि जो याचा वेग देखे । हा क्षणिक ऐसे ओळखे । आणि जाणे हा निमिषीं एके । कोटिवेळा होत-जात ॥१३९॥
नाही अज्ञानावाचुनि करणे । मिथ्याचि याचे असणे । ऐसे झाड हे देखिले ज्याने । जीर्णशीर्ण ॥१४०॥
तयासी गा पांडुसुता । मी सर्वज्ञहि म्हणे जाणता । अगा वैदिक सिद्धांता । वंद्य तोचि ॥१४१॥
योगाभ्यासें जे जोडिले । ते त्या एकाचेचि उपयोगा आले । किंबहुना ज्ञानही जगले । तयाचेचियोगें ॥१४२॥
हे असो, बहु किती बोलावे ? । कैसे तयासी वर्णावे ? । भववृक्ष जाणिला जयें । मिथ्या ऐसा ॥१४३॥
वरीहि शाखा फुटल्या तयास
ही भोगपाने गुणपुष्ट जेथे
खालीहि मूळे निघती नवीन
दृढावली कर्मबळें नृलोकीं ॥२॥
मग प्रपंचरूप या । अधोशाख वृक्षाचिया । अगणित डहाळ्या । वरीहि जाती ॥१४४॥
आणि खाली ज्या विस्तारती । तयांच्याही मुळ्या होती । तयांतुनी फोफावती । वेल पालवी ॥१४५॥
आम्ही जे ऐसे । प्रारंभी म्हटले असे । तेचि आता सुलभसे । सांगू ऐक ॥१४६॥
तर अज्ञानमुळाचे बळकटपणें । महत्तत्त्वादींचे बहराने । फुटती मोठी पाने । वेदज्ञानाची ॥१४७॥
परि आधी तर स्वेदज- । जारज-उदभिज्ज-अंडज । बुडापासुनी महाभुज । फुटती चार ॥१४८॥
या एकेका अंकुरापासुनी । फुटती चौर्यांयशी लक्ष योनी । त्यावेळी निघती जीवशाखातुनी । सर्वदूर फाटे ॥१४९॥
प्रसवती सरळ शाखा या । नाना सृष्टींच्या डहाळ्या । आणिक फुटती आडव्या । नाना जातींच्या ॥१५०॥
स्त्री-पुरुष-नपुंसक । व्यक्तिभेदांचे घोस कितीक । आंदोळती स्वाभाविक । विकारभारें ॥१५१॥
जैसा वर्षाकाळ गगनीं । प्रकटे नव घनीं । तैसे आकारजात अज्ञानीं । वेलरूपा जाय ॥१५२॥
शाखा आपुले अंगभारें । लवुनि गुंफिती परस्परें । गुणोत्कर्षाचे वारे । उदय पावती ॥१५३॥
मग अचाट मोठे । गुणांचे वारे सुटे । आणि तीन ठायी हा फाटे । ऊर्ध्वमूळ वृक्ष ॥१५४॥
रजोगुणाचे वारे अफाटपणे । भरारता वेगाने । मनुष्यजातिशाखा जोमाने । फोफावती ॥१५५॥
त्या वर ना खाली जाती । मध्येचि कोंदाटती । तयां आडव्या फांद्या फुटती । चतुर्वर्णांचिया ॥१५६॥
विधिनिषेधपल्लवीने डवरली । वेदवाक्याची पालवी कोवळी । मनुष्यशाखांसी आगळी । शोभा आणी ॥१५७॥
अर्थ काम पसरत । ऐहिक भोग नाशवंत । तेचि क्षणभंगुर अंकुरत । जोमाने तेथ ॥१५८॥
प्रवृत्तीचा धरुनि लोभ । उपजती शुभाशुभ । नाना कर्मांचे स्तंभ । न जाणे किती ॥१५९॥
मागिल भोगाचा क्षय होत । शुष्क देहकाष्ठे गळुनि पडत । तेथ पुन्हा फाटे फुटत । नव्या देहांचे ॥१६०॥
आणि सुशोभित शब्दादिक । सहजरंगें आकर्षक । नवे विषयपल्लव देख । नित्यचि होती ॥१६१॥
ऐसे रजोगुणवातें प्रचंड । वाढती शाखांचे जुडे अखंड । तयां नाव येथ रूढ । मनुष्यलोक ॥१६२॥
ऐसे रजाचे वारे । क्षणभरी ओसरे । मग भयंकर भरारे । तमाचे ते ॥१६३॥
मग याचि मनुष्यशाखांना । खाली नीच वासना । देखा विस्तारतांना । डहाळ्या कुकर्मांच्या ॥१६४॥
अपप्रवृत्तींचे बळकट । फोक निघती सरसकट । पाने पल्लव फांद्या अनिष्ट- । प्रमादांच्या ॥१६५॥
सांगती निषिद्ध कर्मनियम । ज्या ऋचा यजुःसाम । तो पाला वाजे घुसघुम । अग्रावरी ॥१६६॥
पतिपादिती जारणमारण । अथर्ववेदीं जे परपीडन । तेही पर्णीं करिती प्रसारण । वासनावेली ॥१६७॥
तों तों थोराड होती । कर्मांचे बुंधे वाढती । आणि जन्मशाखा घेती । पुढे पुढे धाव ॥१६८॥
तेथ तमोगुणें मोहित । जे कर्मभ्रष्ट होत । तयां जाळे पडत । पापयोनींचे ॥१६९॥
पशू पक्षी डुक्कर । सर्प विंचू व्याघ्र । या आडशाखांचा विस्तार । थोरावे गा ॥१७०॥
परि ऐशा शाखा धनंजया, । सर्वांगींही नित्य नव्या । त्या नरकभोगाचिया । फळा पावती ॥१७१॥
हिंसा विषयभोग पुढारी । कुकर्मसंग धुरेवरी । ऐसे अंकुर जन्मजन्मांतरीं । वाढतचि राहती ॥१७२॥
ऐसे होती तरू तृण । लोह माती पाषाण । तेथ ह्याचि फांद्या जाण । फळेही हीचि ॥१७३॥
अर्जुना गा अवधारी । मनुष्यापासोनि यापरी- । वृद्धि स्थावरांतरी । अधोशाखांची ॥१७४॥
म्हणोनि मनुष्यरूपी डहाळ्या । याचि अधोशाखांच्या मुळ्य़ा । येथूनि लागे विस्तारावया । संसारतरू ॥१७५॥
एरवी वरचे पार्था । अज्ञानमूळ पाहता । मनुष्यशाखा त्या अश्वत्था । खाली मध्यावरी ॥१७६॥
परि तामस सात्त्विक । सुकृत दृष्कृतात्मक । शाखा वर-खाली अनेक । वाढती येथूनचि ॥१७७॥
आणि वेदत्रयीचे पान । न फुटे मनुष्यशाखेवाचुन । कारण वेदाज्ञेसी अन्य कोण । पात्र नसे ॥१७८॥
म्हणोनि मनुष्यतनु ह्या शाखा । ऊर्ध्वमूळापासुनि जरी का । तरी कर्मवृद्धीसी देखा । हीचि मुळे ॥१७९॥
अन्य झाडांची हीचि परी । शाखा वाढता मुळे खोलवरी । मुळे बळावत तैसा वरी । वाढे विस्तार ॥१८०॥
तैसेचि या शरीरा । कर्मे तोवरी देहाचा पसारा । आणि देह तोवरी व्यापारा । ना म्हणताचि न ये ॥१८१॥
म्हणोनि मुळे ही मनुष्यदेह । यात न काही अन्य । बोलिले श्रीकृष्णराय । ऐसे ते गा ॥१८२॥
मग तमाचे दारुण । स्थिरावता उधाण । सत्त्वाची बलवान । सुटे वावटळ ॥१८३॥
याचि मनुष्याकार मुळांवरती । जेव्हा सद्वासनेचे मोड येती । आणि सुकृतांचे अंकुरती । कोंभ तेथ; ॥१८४॥
मग उमलुनी ज्ञान । बुद्धिचातुर्यसंपन्न । डिर्या निघती तरारून । निमिषात ॥१८५॥
मतीचे सोट वाढत । स्फूर्तीचे बळ घेत । बुद्धि प्रकाशत । विवेकाने ॥१८६॥
मेधारसगर्भवंत । आस्थापर्णें सुशोभित । सरळ कोंभ निघट । सद्वृत्तीचे ॥१८७॥
सदाचाराचे धुमारे । विपुल फुटती एकसरे । घुमघुमती गजरें । वेदपद्यांचे ॥१८८॥
शिष्टाचार वेदोक्त आचार । विविध यज्ञयागविस्तार । ऐसी पाने पानांवर । पसरती ॥१८९॥
यम-दमांचे घोस बहरती । तपडहाळ्या वाढती । वैराग्यशाखा कोवळ्या फुटती । वेल्हाळपणे ॥१९०॥
थोर व्रतांचे फोक । तयां धीराचे तीक्ष्ण टोक । जन्मवेगें ऊर्ध्वमुख । उंचावती ॥१९१॥
मध्ये वेदांचा पाला दाट । करी सुविद्येचा सळसळाट । जोवरी वाहे अचाट । वारा सत्त्वगुणाचा ॥१९२॥
धर्मशाखा विस्तारती । जन्मशाखा सरळ दिसती । तया आडशाखा फुटती । स्वर्गादिक फळांच्या ॥१९३॥
वैराग्यशाखा भगवी । तेथ धर्ममोक्षाची पालवी । लवलवती नित्य नवी । वाढतचि असे ॥१९४॥
रविवंद्रादि ग्रहवर । पितर, ऋषी, विद्याधर । हे आडशाखाप्रकार । विस्तारती ॥१९५॥
त्याहुनी उंचाडे । इंद्रादिक शाखांचे जुडे । तयांची बुडे । झाकती फळांनी ॥१९६॥
मग त्याहीवरी डहाळ्या । तपोज्ञानीं उंचावल्या । मरीचि कश्यपादि या । वरच्या डहाळ्या ॥१९७॥
ऐसा चोहिकडुनि उत्तरोत्तर । ऊर्ध्वशाखांचा हा विस्तार । तळीं सान वरी थोर । फळभार ॥१९८॥
वरच्या शाखांनंतर । येती जे फळभार । ते ब्रह्मा-शिवरूप अणीदार । कोंभ निघती ॥१९९॥
सत्कर्मफळभारें लवून । या मनुष्यशाखा जाण । मूळ मायेशी भिडून । ब्रह्मासमीप येती ॥२००॥
लौकिकही वृक्षासी अन्य । शाखा फळांनी लहडुन । त्या फळभारें लवून । बुडीं टेकती ॥२०१॥
तैसे जेथूनि हा आघवा । विस्तार उभा-आडवा । त्या मुळीं टेके पांडवा । वाढत्या ज्ञानें ॥२०२॥
म्हणोनि ब्रह्मदेवा-शिवापरते । वाढणे नाही जीवांते । तेथूनि मग वर ते । ब्रह्मचि की ॥२०३॥
परि हे असो एक । या डहाळ्या ब्रह्मादिक । तयांची तुलना न देख । ऊर्ध्वमूळासवे ॥२०४॥
आणिकही निवृत्तिशाखा तेथ । सनकादिक नामें विख्यात । त्या फळीं मुळीं मुळी ना गुंतत । ब्रह्मरसीं भरलेल्या ॥२०५॥
मनुष्यशाखेपासुनि जाणावी । वरी ब्रह्मादिक पालवी । शाखांची वाढ बरची । उंचावे तेथवरी ॥२०६॥
वरचे ब्रह्मादि हे सव्यसाची । तयां कारण मनुष्यत्वचि । म्हणोनि ही तळींची । म्हटली मुळे ॥२०७॥
ऐसा तुज अलौकिक । हा अध-ऊर्ध्वशाख । सांगितला भववृक्ष । उर्ध्वमूळ ॥२०८॥
आणि तळींची दाविली मुळे । वर्णिले विस्तार सगळे । तर कैसा हा उन्मळे । ऐक आता ॥२०९॥
ह्याचे तसे रूप दिसे न येथे
भासे न शेंडा बुडख न खांदा
घेऊनि वैराग्य अभंग शस्त्र
तोडूनिया हा दृढमूल वृक्ष ॥३॥
परि अगा चित्तीं तुझिया । ऐसे गमेल धनंजया । हे एवढे झाड उपटावया । साधन काय ? ॥२१०॥
ब्रह्मलोकापावत वर वर । होई वरच्या शाखांचा विस्तार । ब्रह्याठायी निराकर । असे मूळ तयांचे ॥२११॥
वृक्ष हा खाळी स्थावरापावत । तळींचे डहाळीने विस्तारत । दुज्या मुळें मध्ये वाढत । मनुष्यरूपी ॥२१२॥
ऐसा गाढा आणि अफाट । आता कोण करिल याचा शेवट ? । मनीं क्षणैक ऐसे तर्कट । धरिसी जरी; ॥२१३॥
तरि यासि उपटावया । सायासचि कायसे धनंजया ? । काय बाळास्तव लागे दवडावा । बागुलबुवा देशोधडीसी ? ॥२१४॥
मेघदुर्ग काय पाडावे ? । काय सशाचे शिंग मोडावे ? असेल तर खुडावे । आकाशपुष्य ॥२१५॥
तैसा हा धनंजया । संसारवृक्ष असे मिथ्या । मग तो उपटावया । कायसे भय ? ॥२१६॥
आम्ही कथिला जो प्रकार । मूळ डहाळ्यांचा विस्तार । ती वांझेची घरभर । लेकरे जैसी ॥२१७॥
काय करावी जागेपणी । स्वप्नींची ती बोलणी । तैसी जाण कहाणी । पोकळचि ती ॥२१८॥
आम्ही निरूपिले जैसे । तयाचे अचल मूळ असे तैसे । आणि तैसाचि जर हा असे । साच गा ॥२१९॥
तर कोण मायेचा पूत निपजेल । जो ह्यास उपटील ? । काय गगन उडेल । फुंकल्याने ? ॥२२०॥
म्हणोनि गा आम्ही वाचें । वर्णिले रूप ते मायेचे । राजासी तूप कासवीचे । वाढावे जैसे ॥२२१॥
मृगजळाची गा तळी । दृष्टीने दुरुनीचिअ न्याहाळी । त्या तळीं साळी केळी । लाविसी काय ? ॥२२२॥
तयाचे अज्ञानमूळचि लटिके । मग तयाचे कार्य ते कितुके ? । तेवीचि संसारवृक्ष कोठे टिके ? । तो मिथ्याचि गा ॥२२३॥
आणि ह्यासि अंत नाही । ऐसे बोलती जे काही । साचचि गा तेही । एके परी ॥२२४॥
तर जागृति जोवर नोहे । तोवरि निद्रेसि काय अंत आहे ? । रात्र सरण्याआधी पाहे । उजाडे कोठे ? ॥२२५॥
तैसा जोवरि पार्था । विवेक न उचली माथा । तोवरि अंत नाही अश्वत्था । भवरूप या ॥२२६॥
वाहता वारा निवांत । जोवरि न राहे जेथल्यातेथ । तोवरि लाटांसी अनंत । म्हणावेचि लागे ॥२२७॥
म्हणोनि मावळता दिनेश । लोपे मृगजळाभास । अथवा जाय प्रकाश । दीप मालवता ॥२२८॥
तैसे जे मूळ अविद्या खात । ते ज्ञान उभे राहत । तेव्हाचि याचा अंत । एरवी नाही ॥२२९॥
तेवीचि हा अनादि । ऐसे बोलती जे शब्दीं । तो आळ नव्हे, लक्षणानुरोधी । बोल असे ॥२३०॥
अगा संसारवृक्षाचे ठायी । साचपणचि नाही । मग नाही तया आदि पाही । कोण होईल ? ॥२३१॥
जो साचचि उपजे । तया आदि हे साजे । आता तो नाहीचि, म्हणजे- । आदि कोठला ? ॥२३२॥
म्हणोनि जया जन्मचि नोहे मग काय ? । तयाची कोण आहे माय ? । यालागी नाहीपणोचि होय । अनादि हा ॥२३३॥
वांझेचिया लेका । कोठली जन्मपत्रिका ? । नभीं निळी भूमी असे का । कैसी कल्पू ? ॥२३४॥
आकाशपुष्पाचा पांडवा । देठ कोणी तोडावा ? । म्हणोनि नाही ऐशा भवा । आदि कोठला ? ॥२३५॥
जैसे घटाचे अनादिपण । असतचि असे तो केल्याविण । तैसा समूळ वृक्ष जाण । अनादि हा ॥२३६॥
अर्जुना ऐसे पाही । आदि-अंत ह्यासी नाही । मध्ये स्थिति आभासे काही । परि मिथ्या ती गा ॥२३७॥
ब्रह्मगिरीहुनि न निघे । आणि समुद्रींही न रिघे । तरि मध्ये मृगजळ लागे । लटिके जैसे ॥२३८॥
तैसा आदि-अंतीं नाही खचितचि । आणि साचहि नाही कोठेचि । परि नवलाई लटिकेपणाची । की नसूनिही भासे ॥२३९॥
नाना रंगीं गजबजलेसे । देखावे इंद्रधनू जैसे । तैसा अज्ञान्यासि हा भासे । जणु आहे ऐसा ॥२४०॥
स्थितिकाळीं संसारवृक्ष ऐसे । अज्ञान्यांचे डोळ्यां भुलवितसे । चातुर्यें बहुरूती जैसे । चकवी लोकां ॥२४१॥
आणि नसलेलीचि निळाई फुका । आभाळीं दिसेना का । ते दिसणेही क्षणात एका । होय-जाय ॥२४२॥
स्वप्नींचे लटिके मानिले सत्य । तरि ते राहे काय नित्य ? । तैसा हा आभास होय । क्षणैकचि ॥२४३॥
देखता आहेसे वाटे । घेऊ जावे तर दिसे कोठे ? । माकड जळीं घाली बोटे । प्रतिबिंब धराया जैसे ॥२४४॥
लाटेवरि लाट फुटे विरे । वीजही पैजेसी न पुरे । या आभासांचे तितुक्याचि त्वरें । होणे-जाणे गा ॥२४५॥
सरत्या ग्रीष्माचा वारा । नकळे समोर की पाठमोरा । तैसी एक स्थिति नसे तरुवरा । भवरूप या ॥२४६॥
आदि ना अंत, स्थिति, यासी । ना रूप या वृक्षासी । आता कुंथाकुंथी कायसी । तो उपटण्या गा ? ॥२४७॥
आपुलिये अज्ञानापोटीं । नसता हा बळावला, किरीटी । आता या वृक्षासी निपटी । आत्मज्ञानाचे शस्त्रें ॥२४८॥
ज्ञानावाचुनि एकेक । जितुके करिसी उपाय देख । त्यामुळे गुंतसी अधिकाधिक । वृक्षीं या ॥२४९॥
मग किती फांदोफांदीं । हिंडावे याचे ऊर्ध्वीं-अधीं । म्हणोनि मूळचि छेदी । सम्यक्ज्ञानें ॥२५०॥
दोरीवरि सर्प भासता । बडविण्या काठया जमविता । तो व्यर्थचि भार पांडुसुता । घेतला होय ॥२५१॥
तरावया मृगजळाची गंगा । नावेस्तव धावता उगा । ओहोळामाजी बुडावे गा- । साच जैसे; ॥२५२॥
तैसे या लटिक्या संसारा । नाशविण्या उपाय शोधिता, वीरा, । ज्ञान लोपे, संसारवारा । विकोपासी जाय ॥२५३॥
म्हणोनि स्वप्नींचिये भया । औषध जागृतीचि धनंजया । तैसे अज्ञानमूळ वृक्षा या । ज्ञानचि खडग ॥२५४॥
परि तेचि लीलया परजावे । ऐसे वैराग्याचे नित्य नवे । अभंग बळ असावे । बुद्धीसी गा ॥२५५॥
उदयता ते वैराग्याबळ । त्यागावे स्वर्ग-मृत्यु-पाताळ । जैसे ओकुनिया कुत्रे ओंगळ । आताचि गेले ॥२५६॥
येथवरी गा धनंजया । पदार्थजातांचा आघव्या । वीट ये ऐसे वैराग्या । यावे बळ ॥२५७॥
मग देहअहंतेचे म्यान सर्व- । एकसरशी त्यागावे । अंतर्मुख बुद्धीचे मुठीत धरावे । ज्ञानखड्ग ॥२५८॥
लावावी विवेकसहाणेवर । अहंब्रह्मास्मिबोधाची तीक्ष्ण धार । मग पूर्णबोध हे एकचि सत्वर । पाणी द्यावे ॥२५९॥
परि निश्चयाचे मुष्टिबळ । पाहावे एकदोन वेळ । मग तोलावे अति चोख सकळ । मननापावत ॥२६०॥
मग आपण आणि ज्ञानसाधन । निदिध्यासें एक होऊन । धाव घेण्या नुरे जाण । पुढे काही ॥२६१॥
आत्मज्ञानाचे साधन ते । अद्वैतप्रभेने लखलखते । कोठेही भववृक्षाते । उरू न देइल ॥२६२॥
जैसा शरदागमीचा वारा । नाशी मेघरूप कचरा । रवी उदयला वीरा । तमाचा घोट भरी ॥२६३॥
वा होताक्षणी जागृत जैसे । स्वप्नसंभ्रमाचा ठाव नुरतसे । स्वानुभवधारेचा वार तैसे । करील तेथ ॥२६४॥
तेव्हा वरचे मूळ । की खालचे शाखाजाल । हे काहीचि न दिसेल । मृगजळ चांदण्यात जैसे ॥२६५॥
ऐसे गा वीरनाथा । आत्मज्ञानाची खड्गलता । छेदी भवअश्वत्था । ऊर्ध्वमूळ या ॥२६६॥
घ्यावा पुढे शोध तया पदाचा
जेथूनि मागे फिरणे नसेचि
द्यावी बुडी त्या परमात्मतत्त्वीं
प्रवृत्ति जेथे स्फुरली अनादि ॥४॥
हे म्हणोनि न जाय जाणिले । जे मजवीण संचले । ते रूप पहावे आपुले । आपणचि ॥२६७॥
परि दर्पणाचे आधाराने । एकचि करुनि दुसरे, कोणे- । मुख पाहावे गांवढयाने । तैसे नको हो ॥२६८॥
हे पाहणे गा ऐसे । विहीर खणण्याआधी जैसे । झस भरोनि असे । आपुल्या उगमीं ॥२६९॥
जेव्हा जळ आटे । प्रतिबिंब निजबिंबा भेटे । वा जेव्हा घट फुटे । घटाकाश मिले महाकाशा ॥२७०॥
जेव्हा इंधन सरते । वन्हि आपुले स्वरूपीं परते । तैसे आपण आपणाते । न्याहाळने जे गा ॥२७१॥
जिव्हेने आपुली चव चाखणे । डोळ्याने निज बुबुळ देखणे । आहे तैसे निरीक्षिणे । आपण आपणा गा ॥२७२॥
की प्रभेसी प्रभा मिळे । गगन गगनावरी लोळे । वा खोळीत पाणी भरले । पाण्याचेचि ॥२७३॥
आपणचि आपणा पाहणे । अगा जे अद्वैतपणें । ते ऐसेचि होय निश्चितपणे । सांगे तुज साच ॥२७४॥
आत्मस्वरूप जे पाहण्याविण पाहावे । काही जाणण्याविण जाणावे । आद्यपुरुष म्हणावे । ज्या स्थाना ॥२७५॥
तेथहि उपाधींचे राहुनि आश्रया । वेद लागती जिभा उचलाया । मग नामरूपाचा वाया । करिती गलबला ॥२७६॥
बव-स्वर्गा उबगुनी । मोक्षेच्छु वळले योगज्ञानीं । पुन्हा न परतू ही प्रतिज्ञा करुनि । निघाले आत्मस्वरूपाकडे ॥२७७॥
संसाराचे पायांपुढती । विरागी पैजेवरी पळती । उत्तुंग कर्मकडा । ओलांडिती । ब्रह्मपदाचा ॥२७८॥
अहंतादिभावांचा आपुल्या । झाडा देऊनि आघव्या । पत्र घेती ज्ञानिये ज्या । मूळ घरासाठी ॥२७९॥
ज्या का वस्तूचे अज्ञानें । उद्भवे ज्ञान विपरीतपणे । मग जे नाही ते नांदविणे । मी-तूपण जगीं ॥२८०॥
अगा जेथुनि ही एवढी । वाढ विश्वपरंपरेची गाढी । जैसी वाढे आस कोरडी । दैवहीनाची ॥२८१॥
पार्था ते आत्मस्वरूपही । पाहावे आपुलेचि ठायी । जैसे की थंड होई । थंडपण थंडपण थंडीने ॥२८२॥
आणिकही एक आता । ओळखण्या खूण पार्था । त्या आत्मस्वरूपा भेटता । परतुनी येणेचि नाही ॥२८३॥
परि तया भेटती ऐसे । जे ज्ञानें सर्वत्र सरिसे । महाप्रळयजळाचे जैसे । भरलेपण ॥२८४॥
जे मान-मोहांसह संगदोष
जाळूनि निर्वासन आत्मनिष्ठ
द्वंद्वे न घेती सुखदुःखमूळ
ते प्राज्ञ त्या नित्यपदीं प्रविष्ट ॥५॥
जया पुरुषाचे मन । सोडुनी गेले मोह मान । वर्षाऋतु सरता घन । आकाशा जैसे ॥२८५॥
अगा निर्धन निष्ठुरा । उबगे जैसा सोयरा । तैसे न गवसत विकारा- । वेटाळण्या जे ॥२८६॥
फळली केळ उन्मळे । तैसी आत्मलाभबळें । जयाची क्रिया गळे । सावकाशा ॥२८७॥
आग लागता वृक्षीं । सैराट धावती पक्षी । तैसे सोडिले जयांसी । विकल्पांनी आघव्या ॥२८८॥
भेदरूप भूमीत जे । दाट तण माजे । अगा तयाची वार्ता न वाजे । जयाचे कानीं ॥२८९॥
पाहता सूर्याचे रूप । रात्र पळे आपोआप । गेली देहअहंता तैसी अमाप । अविद्येसवे ॥२९०॥
आयुष्यहीन जीवा जैसे । शरीर अवचित सोडितसे । अज्ञानात्मक द्वैत तैसे । सोडी तया ॥२९१॥
लोहाचे दुभिक्ष परिसा । सूर्या न गवसे अंधार जैसा । द्वैतबुद्धीचा तैसा । दुष्काळ जयां ॥२९२॥
अगा द्वंद्वे सुखदुःखाकार । देहीं जी होती गोचर । ती तयांचेसमोर । येतीचिना ॥२९३॥
स्वप्नींचे राज्य की मरण । न हो हर्षशोका कारण । जागे जाहल्यावर जाण । ज्यापरी गा ॥२९४॥
तैसे ते सुखदुःखतापांनी । पुण्यपापरूप द्वंद्वांनी । नच जात कदापि वेढुनी । गरुड जैसे सर्पांनी ॥२९५॥
आणि अनात्मनीर टाकिती । आत्मरसक्षीर सेविती । विचारी जे असती । ज्ञानी राजहंसाऐसे ॥२९६॥
जैसा की वर्षेनि दिनकर । आपुलाचि रस भूतलावर । तोचि किरणांद्वारे आणी वर । बिंबाठायी; ॥२९७॥
जैसी होता आत्मभ्रांति मनीं । आत्मभाव विखुरे बारा वाटांनी । तो एकवटती आपुले अंतःकरणीं । अखंड जे ॥२९८॥
किंबहुना आत्म्याचे करिता चिंतन । जयांचा विवेक तद्रूप होउनि । ओघ गंगेचा होय विलीन । सिंधूत जैसा ॥२९९॥
सर्वव्यापी आकाशा जैसे । पलीकडे जाने नसे । आपुलेचि आघवेपणे तैसे । जो न हो अभिलाषी ॥३००॥
जैसा अग्नीचा डोंगर । न घे कोणताहि अंकुर । तैसा मनीं जया विकार । उपजेना ॥३०१॥
जैसा काढिता मंदराचळ । राहिला क्षीराब्धी निश्चळ । तैसा न उठे सळ । कामऊर्मींचा ॥३०२॥
चंद्र सोळा कलांनी पूर्ण । न दिसे कोणेहि अंगी अपूर्ण । तैसे आशा-आकांक्षा उपजणे हे न्यून । नसे जयांचे ठायी ॥३०३॥
किती बोलू निरुपम केवढे । जैसा परमाणु नुरे वायूपुढे । तैसे विषयांचे नावडे । नावचि जयां ॥३०४॥
तर ऐसे जे कोणी । शुद्ध करिती ज्ञानाग्नी । ते तेथ जात मिळोनि । जैसे सुवर्णीं सुवर्ण ॥३०५॥
तेथ म्हणजे कवणे ठायी ? । ऐसे पुससी जरि काही । तर त्या पदास नाही । नाश कदापि ॥३०६॥
दृष्यत्वें देखावे । वा ज्ञेयत्वें जाणावे । अमुक तमुक म्हणावे । ऐसे जे नव्हे ॥३०७॥
न त्यास उजळी सूर्य कायसे अग्नि-चंद्र हे
जेथ गेला न परते माझे अंतिम धाम ते ॥६॥
दीपाचे भळभळीं । वा चंद्र जे उजळी । हे काय बोलू, अंशुमाळी- । प्रकाशी जे ॥३०८॥
ते आघवेचि दिसणे । हे जया न देखणे । आत्मस्वरूप जे पाहणे । ते सर्व निरासुनी ॥३०९॥
जों जों शिंपपण हरपे । तों तों साच भासे वरचे रुपे । अथवा दोरी लपता सापें । जैसे उघड व्हावे ॥३१०॥
तैसी चंद्रसूर्यादि प्रदीप्त । तेजे जी आहेत । ती ज्या ब्रह्मवस्तूचे अंधारात । प्रकाशती ॥३११॥
ती वस्तु केवळ तेजोराशी । सर्व भूतात्मक सरिसी । चंद्रसूर्यांचे मानसीं । प्रकाशे जी ॥३१२॥
म्हणोनि चंद्र-सूर्यं हे कवडसे । पडती त्या वस्तूचे प्रकाशें । यालागी तेज जे तेजसांचे असे । ते ब्रह्मवस्तूचे अंग ॥३१३॥
ज्या आत्मवस्तूचे प्रकाशात । जग हरपे चंद्रसूर्यांसहित । नक्षत्रे जैसी चंद्रासंगत । हरपती दिनोदयी ॥३१४॥
नातरि जागृतिचे वेळे । स्वप्नींचा पसारा मावळे । मावळे । अथवा नुरेचि सांजवेळे । मृगजळ; ॥३१५॥
तैसे ज्या आत्मवस्तूठायी । कोणताचि की आभास नाही । ते माझे निजधाम पाही । सत्तेचे गा ॥३१६॥
पुढती जे तेथ गेले । ते न घेतीचि मागुती पाउले । महोदधीसी मिळाले । स्त्रोत जैसे; ॥३१७॥
हत्तीण लवणाची जरी । घातली लवणसागरीं । येईचिना माघारी । परतुनि जैसी; ॥३१८॥
वा गेल्या अंतराळा । मागे न वळती वन्हिज्वाळा । नाही तप्तलोहापासुनि जळा । निघणे जैसे ॥३१९॥
तैसे मजसी एकवटले । जे ज्ञानें चोख जाहले । तया पुनर्जन्माचे टळले । संकट गा ॥३२०॥
बुद्धिरूप पृथ्वीचा राजा पार्थ । म्हणे जी, हा महाप्रसाद्द सार्थ । परि द्यावे हो चित्त येथ । ही विनंती देवा ॥३२१॥
तर देवासी स्वये एक होती । मग मागुते जे न येती । ते देवापासुनि भिन्न असती । की अभिन्न, जी ? ॥३२२॥
जर भिन्नचिं अनादिसिद्ध । तर मागुते न येती हे असंबद्ध । कमळीं जे झाले भ्रमर बद्ध । ते फुलेचि होती का ? ॥३२३॥
अगा बाण लक्ष्याहुनि वेगळे । लक्ष्या शिवुनी सगळे । मागुते पडोनि मोकळे । येतीलचि की ॥३२४॥
जर तूचि ते स्वभावें । तर कोणी कोणासी मिळावे ? । आपणचि आपणा रुतावे । शस्त्रें कैसे ? ॥३२५॥
म्हणोनि तुजसी अभिन्न जीवा । तुझा संयोग-वियोग कैसा म्हणावा ? । शरीरापासूनि अवयवां । वेगळेपन कैसे ? ॥३२६॥
आणि जे सदा वेगळे तुजसी । तयां मिळणे नाहीचि कोणे दिवशी । मग ते मागुते येती न येती ही कायसी । व्यर्थ भाषा ? ॥३२७॥
तर कोण गा तुजसी । पावोनि न येती मागुते ऐसी । ही गोष्ट विश्वतोमुखा मजसी । समजावी, जी ॥३२८॥
या अर्जुनरायाच्या शंकांनी । संतोषला सर्वज्ञशिरोमणी । बोध जाहलेले देखोनि । शिष्यवरासी ॥३२९॥
मग म्हणे गा महामती । मज पावोनि मागुते न येती । तयांच्या भिन्न-अभिन्न रीती । असती दोन ॥३३०॥
खोल विवेकें पहावे जे । तर मी तेचि ते सहजे । वर वर पाहता परि दुजे । ऐसे गमती ॥३३१॥
जैसे पाण्याहुनि वेगळे सकळ । उपजता दिसती कल्लोळ । एरवी तरी निखळ । पाणीचि ते ॥३३२॥
अथवा सोन्याहून । लेणी गमती भिन्न । मग पाहावे तर सुवर्ण । अवघेचि ते ॥३३३॥
तैसे ज्ञानदृष्टिने देखसी । तर अभिन्नचि ते मजसी । भिन्नपणाची गोष्ट ऐसी । उपजे अज्ञानायोगें ॥३३४॥
वास्तविक आत्मदृष्टिविचारें । कैसे एकासी दुसरे ? । जे भिन्न-अभिन्न-व्यवहारें । उपजेल ? ॥३३५॥
पोटीं घालुनि अवघे नभ । ब्रह्यांड व्यापी सूर्यबिंब । तर कोठे पडे प्रतिबिंब । किरण कोठे शिरे ? ॥३३६॥
अथवा कल्पांतीचे जळा । काय पाट फुटती बाळ ? । तर कैसे भिन्नांश निर्मळा । अविकारी या मज ? ॥३३७॥
अगा पात्राचेचि मेळें । पाणी सरळ परि वाकुडे झाले । सुर्यासी दुजेपण आले । जळींचे प्रतिबिंबें ॥३३८॥
व्योम चौकोनी की वाटोळे । हे ऐसे कैसे मिळे ? । परि घट-मठीं वेटाळे । तेव्हा तैसेही असे ॥३३९॥
अगा निद्रेचे आधारें । काय एकटयाने न जग भरे ? । स्वप्नीं जेव्हा अवतरे । राजेपणें ? ॥३४०॥
सोन्यात मिसळता धातू हीन । उतरे कसीं भिन्न भिन्न । तैसी माझिये स्वरूपीं जाण । जेव्हा माया वेटाळे; ॥३४१॥
तेव्हा अज्ञान एक रूढे । मी कोण हा विकल्प वाढे । मग विचारान्ती निश्चय दृढे । देह मी ऐसा ॥३४२॥
माझाचि अंश संसारी झाला जीव सनातन
पंचेंद्रिये मनोयुक्त प्रकृतीतूनि खेचितो ॥७॥
जाणे एक शरीरचि तेवढे । मग आत्मज्ञान मागे पडे । तेव्हा माझा अंश ऐसे रूढे । अल्पपणेंचि ॥३४३॥
समुद्र जेव्हा वायुवशें । तरंगाकार उल्लासे । तेव्हा तो समुद्रांशाचि दिसे । सान जैसा; ॥३४४॥
तैसा जडा सचेतनकर्ता । देहअहंता उपजविता । मी जीव गमे, पांडुसुता । जीवलोकीं ॥३४५॥
जीवाचिया बोधासाठी । चाले व्यवहार जो, किरीटी । तोचि जीवलोक या शब्दापाठी । अभिप्राय ॥३४६॥
अगा जन्मणे आणि मरणे । हे खरेचि ऐसे जे मानणे । तो जीवलोक मी म्हणे । अथवा संसार ॥३४७॥
ऐशापरी जीवलोकीं । तू मज ऐसा अवलोकी । जैसा चंद्र की उदकीं । जरी उदकाबाहेरी ॥३४८॥
अर्जुना स्फटिकमणी । कुंकुमावरी ठेवोनी । कोणा गमे रक्तवर्णी । जरि तो तैसा ना ॥३४९॥
तैसे अनादिपण न मोडे । माझे अक्रियत्व न खंडे । परि कर्ता-भोक्ता महणती वेडे । ती भ्रांति केवळ ॥३५०॥
किंबहुना आत्मा शुद्ध । प्रकृतीसी होउनि बद्ध । प्रकृतीसवे संबंध । जोडी आपणचि ॥३५१॥
मग मनादि इंद्रिये साही । श्रोत्रादि जी प्रकृतिकार्येही । ती माझी म्हणोनि तो होई । व्यापारा प्रवृत्त ॥३५२॥
जैसे स्वप्नीं संन्याशाने । आपणचि आपुले कुटुंब होणे । मग तयाचे मोहाने । धावावे सैरावैरा ॥३५३॥
आत्मस्वरूपाचा पडोनि विसर । आपणासीचि मानी शरीर । प्रकृतिऐसाचि गमे वरवर । तिजसीचि भजे ॥३५४॥
मनाचिये रथीं वेगें । श्रवणाचिये द्वारें निघे । मग शब्दांचिया रिघे । रानामाजी ॥३५५॥
तोचि प्रकृतीचा मोहरा । वळवी त्वचेचिया द्वारा । आणि स्पर्शाचिया, वीरा, । घोर वना जाय ॥३५६॥
कोणे एके अवसरी । शिरोनि नेत्रांचे द्वारीं । मग रूपाचे डोंगरी । स्वैर हिंडे ॥३५७॥
किंवा जिव्हेचिये द्वारी । निघोनि गा धनुर्धारी । रसाची दरी । भरोचि लागे ॥३५८॥
अथवा याचि घ्राणातून । देहेश जीव निघून । मग गंधाची दारुण । अरण्ये लंघी ॥३५९॥
जीव जो देहइंद्रियनायक । करी मनासी ऐसी जवळीक । आणि भोगी शब्दादिक । विषयगण ॥३६०॥
पुष्पादिकातुनी वारा गंध खेचूनि घेतसे
तशी घेऊनि ही सर्व देह सोडी धरी प्रभु ॥८॥
परि कर्ता भोक्ता ऐसे । जीवाचे तेव्हाचि दिसे । जेव्हा तो प्रवेशे । एखाद्या देहीं ॥३६१॥
संपन्न आणि विलासी जैसा । तेव्हाचि ओळखू ये सहसा । जेव्हा तो वस्तीसी येई ऐशा । राजधानीत ॥३६२॥
तैसे अहंकाराचे बळ । वा विषय-इंद्रियांचा धुमाकूळ । हे तेव्हाचि दिसे सकळ । जेव्हा स्थूळ देह पावे ॥३६३॥
अथवा शरीराते सोडी । तरि इंद्रियांचा तांडा सवेचि काढी । आपणासवेचि ओढी । घेऊनि जाय ॥३६४॥
अपमानिला अतिथी । नेई सुकृताची संपत्ती । कळसूत्री बाहुलींची गती । दोरा तुटता थोपे; ॥३६५॥
अथवा रवि अस्ता जाई । लोकांची दृष्टी नेई । हे असो, वारा वाही । सुवास जैसा; ॥३६६॥
तैसी मन आदि साही । इंद्रिये धनंजया ही । देहराज जीव सवे नेई । देहा सोडुनिजाता ॥३६७॥
श्रोत्र जिव्हा त्वचा चक्षु घ्राण आणिक ते मन
ह्या सर्वांस अधिष्ठूनि ते ते विषय सेवितो ॥९॥
मग तेथ अथवा स्वर्गींही । जीव ज्या देहा आश्रयी । मन आदींचा पसारा त्या देहीं । मांडी पुन्हा ॥३६८॥
जैसा मालविता दिवा । प्रभेसह जाय पांडवा, । मग उजळावा तेव्हा । तैसाचि प्रकाशे ॥३६९॥
परि ऐशा या व्यवहारीं । लोकांसी अविचारी । इतुके हे धनुर्धारी । वाटेचि गा; ॥३७०॥
की आत्मा देहीं आला । विषय तयानेचि भोगिला । अथवा देहातुनि गेला । हे खरेचि मानिती ॥३७१॥
जन्मणे आणि मरणे । वा करणे आणि भोगणे । हे देहाचे धर्म तयाने । आत्माचे मानिले ॥३७२॥
सोडितो धरितो देह भोगितो गुणयुक्त हा
परी न पाहती मूढ ज्ञानी डोळस पाहती ॥१०॥
योगी यत्नबळें ह्यास पाहती ह्रदयीं स्थित
चित्तहीन अशुद्धात्मे प्रयत्नेंहि न पाहती ॥११॥
देह उपजे साना । तयाठायी प्रकटे चेतना । मग म्हणती त्या चलनवलना । जन्मा आला ऐसे ॥३७३॥
तैसे त्या जीवासंगती । इंद्रिये आपुलाले विषय सेविती । तया नाव सुभद्रापती, । भोगणे ऐसे ॥३७४॥
मग भोगक्षय होत । देह आपसुक थंडावत । मग गेला गेला ऐसे आक्रंदत । करिती बोभाटा ॥३७५॥
वृक्ष डोलतांना देखावे । तरचि का वारा वाहे म्हणावे ? । मग वृक्ष नसे तर वारा नव्हे ? । काय पांडवा ? ॥३७६॥
वा आरशासमोरी बैसावे । आपणा तेथ देखावे । तर तेव्हाचि जन्मलो मानावे ? । काय आधी नव्हतो ? ॥३७७॥
की उलटा करिता आरसा । लोपविता त्या आभासा । तर आपणचि नाही ऐसा । काय निश्चय करावा ? ॥३७८॥
शब्द हा गुण आकाशाचा । परि कपाळीं फुटे मेघांच्या । अथवा वेग अभ्राचा । आरोपिती चंद्रावरी; ॥३७९॥
तैसे होणे-जाणे देहाचे । ते म्हणे विकारी आत्मसत्तेचे । ऐसे आरोप तयांचे । मोहांध गा ॥३८०॥
येथ आत्मा आत्म्याचे ठायी । देखावा देहाचा देहाचा धर्म देहीं । ऐसे मानती ते पाही । वेगळेचि असती ॥३८१॥
ज्ञानें की जयांचे लोचन । देहाची खोळ जात भेदून । मेघपटलांसी सूर्यकिरण । ग्रीष्मीं जैसे ॥३८२॥
ऐसे विवेकाचे विस्तारें । जयांची बुद्धि आत्मस्वरूपीं स्फुरे । ते ज्ञानी देखती खरे । आत्म्यासी गा ॥३८३॥
जैसे नक्षत्रांनी भरले । गगन समुद्रीं बिंबले । परि तुटोनि नाही पडले । निःसंशय ॥३८४॥
गगन गगनींचि आहे । प्रतिबिंब मिथ्या आभासे हे । तैसा आत्मा देखती देहें । अवगुंठिला ॥३८५॥
खळाळाची लगबग ऐसी । लखलाभ असो खळाळासी । साच चंद्रिका देखसी । चंद्रबिंबींचि ॥३८६॥
वा डबके भरे, सुकतसे । सूर्य जैसाच्या तैसा असे । देह होता जाता तैसे । ज्ञानी देखती मज ॥३८७॥
घट-मठ घडविले । तेचि मग मोडिले । तरि आकाश त्यात संचले- । असतचि असे ॥३८८॥
आत्मसत्तेचे आधारें अखंडित । हे देहचि होत-जात । आत्मा तो जेथल्या तेथ । हे जाणती ज्ञानी ॥३८९॥
चैतन्य वाढे ना नाशे । कर्म करवी ना करितसे । शुद्ध आत्मज्ञानें ऐसे । जाणती ते ॥३९०॥
आणि ज्ञानही आपलेसे होईल । प्रज्ञा परमाणुचाहि झाडा देईल । सकल शास्त्रांचे येईल । सर्वस्व हाता; ॥३९१॥
परि ती विद्वत्ता ऐसी । जर विरक्ती न शिरे मानसीं । तर सर्वात्मका मजसी । न हो तयाची भेट ॥३९२॥
तोंड भले विद्धत्तेने भरा । आणि अंतःकरणी विषयां थारा । तर न सापडे धनुर्धरा । त्रिवार गा मी ॥३९३॥
निद्रेमाजी बरळता । काय सुटे संसारगुंता ? । की पोथीसी स्पर्शिता । वाचली होय ? ॥३९४॥
अथवा बांधोनिया डोळे । नाकी जर मोतो लाविले । तर तयांचे काय आकळे । मोल तेज ? ॥३९५॥
तैसा चित्तीं अहंतेसी ठाव । सर्व शास्त्रांचा जिव्हेसि सराव । ऐसे कोटिजन्महि जाण्याचा संभव । परि प्राप्त न होई मी ॥३९६॥
जो एक मी समस्त । व्यापूनि असे भूतजात । ऐक त्या माझी व्याप्ती येथ । सांगू आता ॥३९७॥
सूर्यात जळते तेज जे विश्व उलळीतसे
तसे चंद्रात अग्नीत जाण माझेचि तेज ते ॥१२॥
तर सूर्यासकट आघवी । ही विश्वरचना जी दावी । ती दीप्ती माझी जाणावी । आदिअंती आहे ॥३९८॥
जळ शोषुनि जाता सविता । ओलांश पुरवी जो मागुता । ती चंद्रामाजी, पंडुसुता, ज्योत्स्ना माझी ॥३९९॥
आणि दहन पचन सतत । जे अग्नी करीत । तयाचे तेज प्रदीप्त । ते माझेचि गा ॥४००॥
आकर्षणबळे भूते धरारूपें धरीतसे
वनस्पतींस मी सोम पोषितो भरिला रसें ॥१३॥
मी शिरलो असे भूतळात । म्हणोनि समद्रमहाजळात । पृथ्वी हे मातीचे ढेकूळ तेथ । विरेचिना ॥४०१॥
आणि भूते ही अपरिमित । जी अपार वसत । ती मीचि धारण करित । धरेत शिरूनिया ॥४०२॥
चंद्राचे रूप घेरूनि । अमृतें पूर्ण भरोनि । जाहलो मी गगनीं । चालते सरोवर ॥४०३॥
तेथून जे फाकती रश्मिकर । ते पाट होऊनि अपार । सर्व वनस्पतींचे आगर । भरितसे मी ॥४०४॥
ऐसी धान्यादिके पिकवून । करी समृद्धीचा सुकाळ जाण । देई अन्नद्वारा जीवन । भूतमात्रांसी ॥४०५॥
शिजविले जरि अन्न । तरि तयाचे कैसे हो पचन ? । ज्यामुळे ते जिरुनि समाधान । भोगितील जीव ? ॥४०६॥
मी वैश्वानररूपाने प्राणिदेहात राहूनी
अन्ने ती पचवी चारी प्राणापानास फुंकुनी ॥१४॥
म्हणोनि प्राणिमात्रांचे पोटीं । नाभिस्कंदीं करुनि आगटी । मीचि जाहलो, हे किरीटी । जठरीं अग्नी ॥४०७॥
प्राण-अपानाचे जोडभात्यांनी । अहोरात्र फुंकफुंकुनी । पचवी किती उदरांतुनी । न जाणे गा ॥४०८॥
असो शुष्क अथवा स्निग्ध । सुपक्व की दग्ध । परि मीचि चतुर्विध । अन्ने पचवी ॥४०९॥
ऐसे मीचि आघवे जन । जनां जीवविते मीचि जीवन । जीवनीं मुख्य साधन । अग्नीही मीचि ॥४१०॥
आता काय यावरीही । सांगू मम व्याप्तीची नवलाई । येथ दुजे नाहीचि काही । सर्वत्र मी गा ॥४११॥
तर कैसे या जगीं की । कोणी सदा सुखी । कोणी व्याकुळ दुःखी । जीव असती ? ॥४१२॥
एकेचि दीपें अवघ्या नगरीत । दीप जरि करावे प्रज्वलित । तरि का न प्रकाशत । काही दीप ? ॥४१३॥
तर्कवितर्क ऐसे जरी । अससी मनिं करित तरी । ऐक, तीही निवारी । शंका तुझी ॥४१४॥
अगा सर्व मीचि आहे । यात संशयचि नोहे । परि प्राण्यांसी भासताहे । आपुल्या बुद्धीऐसा ॥४१५॥
जैसा एकचि आकाशध्वनी । वेगवेगळ्या वाद्यांतुनी । भिन्न नादरूपांनी । येई कानीं; ॥४१६॥
लोकांचा व्यापार वेगळाला । परि हा एकचि भानू उदेला । अगा तरि तो आला । अन्य अन्य उपयोगा ॥४१७॥
नाना बीजधर्मानुरूप । वृक्षीं जळ उपजवी रूप । तैसे परिणमले स्वरूप । जीवांमाजी माझे ॥४१८॥
अज्ञानी-आणि चतुरासमोरी । नीलमण्यांचा हार दुपदरी । अज्ञान्या भासला सर्प जरी- । चतुर सुख पावे ॥४१९॥
करी स्वातीचा पाऊस । शिंपलीत मोती, सर्पीं विष । तैसा सुख मी सज्ञान्यांस । दुःख अज्ञान्यांसी ॥४२०॥
सर्वांतरीं मी करितो निवास
देतो स्मृति ज्ञान विवेक सर्वां
समग्र वेदांसहि मीचि वेद्य
वेदज्ञ मी वेद-रहस्य-कर्ता ॥१५॥
एरवी सर्वांचे ह्रदयीं वसे । मी अमका तमका असे । ऐसी जी बुद्धी दिवसरात स्फुरतसे । ती वस्तु गा मी ॥४२१॥
परि संतांसवे वसता । योगज्ञानीं प्रवेशता । गुरुचरण उपासिता । वैराग्यपूर्वक ॥४२२॥
याचि गा सत्कर्में । अशेषही अज्ञान विरामे, आणि जयांचा अहं विश्रामे । आत्मस्वरूपी; ॥४२३॥
आत्मस्वरूपीं वळता दृष्टी की । मज आत्म्यायोगे ते सदा सुखी । येथ मजवाचुनि, अवलोकी । अन्य काय कारण ? ॥४२४॥
किंबहुना होता सूर्योदय । सूर्येंचि पहावा सूर्य । तैसे मज जाणण्या होय । मीचि कारण ॥४२५॥
अथवा शरीरासक्तांचे संगतीत । संसारगौरवचि ऐकत । जयांची अहंबुद्धी देहात । गढूनि राहिली ॥४२६॥
ते स्वर्गसंसारालागी । धावता कर्ममार्गीं । दुःखाचे शेलक्या भागी । भागीदार होती ॥४२७॥
परि हेही होणे अर्जुना । मजचियोगें तयां अज्ञानां । जैसा जागृतचि कारण स्वप्ना । आणि निद्रेसी होय ॥४२८॥
अभ्रें सूर्य हरपला । तोही सूर्यायोगेंचि जाणो आला । तेवी मज न जाणोनि विषय भोगिला । मजचियोगें प्राण्यांनी ॥४२९॥
तैसे निद्रेसी वा जागण्या । जोगपणचि कारण धनंजया । तैसा ज्ञाना-अज्ञाना जीवांचिया । मीचि मूळ ॥४३०॥
जैसा सर्पत्वा की दोरा । दोरचि मूळ धनुर्धरा । तैसा ज्ञान-अज्ञान-व्यवहारा । मीचि सिद्ध ॥४३१॥
म्हणोनि जैसा असे तैसिया । मज न जाणूनि धनंजया । वेद जाणू लागला तों तया- । फुटल्या शाखा ॥४३२॥
तर त्या वेगवेगळ्या शाखातुनी । निःसंशय मीचि आणिला जाय श्रवणीं । जैशा नद्या पूर्व-पश्चिमवाहिनी । समुद्रींचि मिळती ॥४३३॥
आणि महासिद्धांतांपाशी । श्रुती हरपती शब्दांसरशी । जैशा गंधासवे आकाशीं । वायुलहरी ॥४३४॥
तैसे समस्तही श्रुतिजात । जेथ थबके लाजुनि निवांत । ते ब्रह्मस्वरूप करूनि यथावत् । मीचि प्रकटे ॥४३५॥
मग श्रुतींसकट अशेष । जग हारपे निःशेष । ते निजज्ञानही चोख । जाणता मीचि ॥४३६॥
निजलेल्या जाग येई । नुरे स्वप्नींचे द्वैतही । देखू शके एकटेपणही । आपुले तो ॥४३७॥
तैसे आपुले अद्वैतत्व । मी जाणू शके द्वैताशिवाय । कारण त्याही बोधास्तव । ज्ञाता मीचि ॥४३८॥
मग कापूर जाळिताही । ना काजळी ना अग्नीही । नुरेचि तेथ काही । ज्यापरी गा ॥४३९॥
जे समूळ अविद्या खाय । आणि ते ज्ञानही बुडोनि जाय । तरी जे नाही ऐसे कदापि न होय । आणि आहेही न म्हणवे ॥४४०॥
विश्व घेउनि गेला मागासवे । तया चोरा कोणी कोठे शोधावे? । जी एक शुद्ध दशा ऐसी आहे । ती मी असे ॥४४१॥
ऐसी चराचरातिल आपुली व्याप्ती । वर्णिता वर्णिता कैवल्यपती । आपुल्या स्वरूपीं पोचविती । निरुपाधिक ॥४४२॥
तो आघवाचि बोध सहसा । अर्जुनीं उमटला कैसा । तर व्योमींचा चंद्र जैसा । क्षीरार्णवीं ॥४४३॥
अथवा आरशाऐशा भिंतीवरी । प्रतिबिंबे चित्र जे समोरी । तैसा कृष्णार्जुनाअंतरीं । नांदे एक बोध ॥४४४॥
धन्य धन्य परमात्मरूप । अनुभवे तों तों गोडी अमाप । म्हणोनि अनुभवियांचा बाप । अर्जुन म्हणे; ॥४४५॥
जी, व्यापकपण वर्णित असता । निरुपाधिक जे आता । आपुले स्वरूप प्रसंगता । बोलिलात आपण; ॥४४६॥
ते एक वेळ पूर्णपणे । करावे की मज सांगणे । तेथ द्वारकेचा नाथ म्हणे । हे भले केले तुवा; ॥४४७॥
अर्जुना आम्हाही लाडेकोडे । अखंड बोलणे आवडे । परि पुसणारे एवढे । नच भेटे कोणी ॥४४८॥
आज मनोरथां फळ । भेटलासी तू सुढाळ । तोंड भरुनि सकळ । आलासी पुसो ॥४४९॥
अद्वैतापैल भोगणे जे सुख । ते अनुभविण्या तू साहाय्यक । पुसोनि मज माझे देख । देतोसी समाधान ॥४५०॥
आरशाजवळीं येता लोचन । दिसतो आपणा आपण । तैसा संवादियात तू पावन । शिरोमणी ॥४५१॥
न कळोनि तुवा पुसावे । आम्ही ऐकविण्या बैसावे । तैशापरी गा हे नव्हे । प्रियोत्तमा ॥४५२॥
ऐसे म्हणोनि आलिंगिले । कृपादिठीने अवलोकिले । मग देव काय बोलिले । अर्जुनासी; ॥४५३॥
दोही ओठीं एक बोलणे । दोही चरणीं एक चालणे । तैसेचि पुसणे-सांगणे । तुझे-माझे ॥४५४॥
तैसे आम्ही-तुम्ही येथे । देखावे एका अर्थाते । सांगते आणि पुसते । दोन्हीही एक येथ ॥४५५॥
ऐसा भुलला देव मोहें । अर्जुनासि आलिंगुनि राहे । मग विस्मयें म्हणे भले नव्हे । प्रेम इतुके ॥४५६॥
इक्षुरसाची भेली नासेल । जर मीठ न घालाल । तैसे संवादसुख रसाळ । नाशेल द्वैताविण ॥४५७॥
आधीचि आम्हा येथ काही । नर-नारायण भेद नाही । परि आता शिरो मजठायी । आवेग माझा ॥४५८॥
या बुद्धीने सहसा । श्रीकृष्ण म्हणे वीरेशा । अगा, तो तुवा कैसा । प्रश्न केला ? ॥४५९॥
अर्जुन श्रीकृष्णीं विरत होता । तो परतोनिया मागुता । प्रश्नावलीची कथा । ऐकण्या आला ॥४६०॥
तेथ सद्गदित होउनि बोले । अर्जुनें जी, जी, करीत म्हटले । निरुपाधिक आपुले । रूप सांगा ॥४६१॥
या बोलावरि तो अनुरागी । तेचि सांगावयालागी । उपाधी दोन भागीं । निरूपित असे ॥४६२॥
जर निरुपाधिक पुसे । तर उपाधि का सांगतसे । प्रस्तुत कोणाही ऐसे । गमे जरी ॥४६३॥
तरि ताकाचे अंश वगळणे होय । लोणी काढणे याचेचि नाव । शोधावे चोख सोन्यास्तव । हीण जैसे ॥४६४॥
शेवाळ सारावे हातें । तर पाणी असे आयते । अभ्र विरे तर गगन ते । सिद्धचि की ॥४६५॥
वरि कोंडयाचा गुंडाळा । झाडुनि करिता वेगळा । हातीं घेण्या स्वच्छ तांदुळा । प्रत्यवाय काय ? ॥४६६॥
तैसे अज्ञानादि उपाधि काढिता । तेथ सारासार विचार ठेविता । कोणातेही न पुसता । उरे ते शुद्ध स्वरूप ॥४६७॥
मुग्धा पतीचे रूप अनुरागें । नाव न घेताचि सांगे । श्रुतिवधू आत्म्या वर्णिता रंगे । निःशब्दपणे ॥४६८॥
जे शब्दात व्यक्त होणे नव्हे । ते स्वरूप वर्णिणे ऐसे आहे । म्हणोनि उपाधी देवरायें । कथिली आधी ॥४६९॥
दावावी प्रतिपदेची चंद्रकोर । जवळच्या तरुशाखेचे वर । तैसी उपाधीस्तव करिती सादर । बोली ही ॥४७०॥
लोकीं पुरुष ते दोन क्ष आणिक अक्षर
क्षर सर्वचि ही भूते स्थिर अक्षर बोलिला ॥१६॥
मग श्रीकृष्ण म्हणे गा सव्यसाची । या संसारनगरीची । वस्ती असे मोजकीचि । दोनच पुरुषांची ॥४७१॥
जैसे अवघ्याचि गगनीं । दिवस-रात्र नांदे दोन्ही । तैसे संसारराजधानीतुनी । दोघेचि हे ॥४७२॥
तिजा पुरुष आहे आणिकही । तो या दोहोंचे नावहि न साही । प्रकटता गावासह खाई । दोहोंते या ॥४७३॥
परि ते असो, परिसा तुम्ही । आधी या दोहोंचे ऐकवीत मी । वस्तीसी संसारग्रामीं । आले असती ॥४७४॥
एक पंगु वेडा आंधळा । एक सर्वांगे पुरता चांगला । परि एके ग्रामीं घडला । संग दोघांचा ॥४७५॥
तया एका नाव क्षर । दुसर्याते म्हणती अक्षर । या दोहोंनीचि परि संसार । कोंदला असे ॥४७६॥
आता क्षर तो कोण । अक्षराचे काय लक्षण । याचे विवेचन । करू परिपूर्ण ॥४७७॥
तर महत्तत्त्वादि या । अहंकारापासोनिया । तों गा तृणाचिया । अग्रापावत; ॥४७८॥
जे काही सान-थोर । चालते अथवा स्थिर । किंबहुना गोचर । मन-बुद्धीसी जे; ॥४७९॥
जितुके पंचमहाभूतीं घडे । ते नामरूपीं सापडे । गुणत्रयाचिया पडे । टाकसाळीतुनी जे ॥४८०॥
भूताकृतींचे नाणे । घडे ज्या सुवर्णे । काळाचे जुगार खेळणे । ज्या धनें गा; ॥४८१॥
विपरीतचि ज्ञानें । जे जे काही जाणणे । जे प्रतिक्षणीं मरणे । जन्मोनिया ॥४८२॥
तोडुनि भ्रांतीचे रान अथांग । उभवी सृष्टीचे अंग । हे बहु असो, जग- । नाव जया ॥४८३॥
आठ भागी करुनि वेगळे । जे प्रकृतीरूपें दाविले । जे क्षेत्रद्वारा केले । छत्तीस भागी; ॥४८४॥
मागिल सांगू किति एक ? । अगा, आताचि जे प्रस्तुत देख । करोनि वृक्षाकाररूपक । निरूपिले ॥४८५॥
अवघेचि जगत् साकार । कल्पूनि आपुले नगर । जाहले असे तदनुसार । चैतन्यचि ॥४८६॥
जैसा आडात आपणचि बिंबे । प्रतिबिंब पाहता सिंह क्षोभे । खवळलेला न थांबे । उडी घेई ॥४८७॥
सलिलीं मूळ आकाश असे । त्यावरि वरचे महाकाश बिंबतसे । अद्वैत असुनिहि तैसे । चैतन्य द्वैतरूप ॥४८८॥
अर्जुना गा यापरी । साकार देहा कल्पुनि नगरी । आत्मा विस्मृतीची करी । निद्रा तेथ ॥४८९॥
स्वप्नीं देखावे अंथरुण । मग तेथ पहुडावे आपण । तैसे देहनगरीत शयन । आत्म्याचे गा ॥४९०॥
त्या आत्मविस्मृतीचे निद्रेत । मी सुखी-दुःखी म्हणे घोरत । मी-माझे या अहंसमाधीत । बरळे मोठयाने ॥४९१॥
हा जनक ही माता । हा मी गौर काळा पूर्ण पुरता । हे पुत्र वित्त कांता । माझेचि ना ॥४९२॥
ऐशा स्वप्नावरी स्वार होय । स्वर्गसंसाररानीं घेई धाव । तया चैतन्य हे नाव । तोचि अक्षर पुरुष गा ॥४९३॥
आता ऐक क्षेत्रज्ञ या नावें । जयासी उल्लेखावे । वा जनलोकें जीव म्हणावे । ज्या दशेसी ॥४९४॥
आत्मस्वरूपाची पडे विस्मृती । करी संचार सर्वांभूतीं । त्या आत्म्यासी ओळखती । क्षर पुरुष या नावें ॥४९५॥
तो आत्मस्वरूपें पूर्ण । म्हणोनि आले पुरुषपण । वरी देहनगरीत निद्राधीन । पुरुष नावें ॥४९६॥
आणि क्षरपनाचा नसला । आळ ज्याचेवरि आला । उपाधीसवे पावला । तादात्म्यता म्हणोनि ॥४९७॥
जैसे खळाळाचे उदकामुळे । प्रतिबिंब आंदोळे । उपाधिविकारांबळे । गमे तैसेचि ॥४९८॥
खळाळ अंमळ आटे । त्यासरशी चंद्रिका नष्टे । तैसा उपाधिनाशे न वाटे । उपाधिक हा ॥४९९॥
ऐसे उपाधियोगे घडे । क्षणिकत्व यासी जडे । त्या नश्वरपणें पडे । क्षर हे नाव ॥५००॥
जीव चैतन्य आघवे । हे क्षर पुरुष जाणावे । आता वर्णू बरवे । अक्षर पुरुषा ॥५०१॥
तर अक्षर जो दुसरा । पुरुष असे धनुर्धरा । तो मध्यस्थ गा गिरिवरां । मेरुपर्वत जैसा ॥५०२॥
तो पृथ्वी-पाताळ स्वर्गी । न भेदे या तीन भागीं । तैसा ज्ञान-अज्ञानाअंगी । समानचि तो ॥५०३॥
ना ऐक्याचे यथार्थज्ञान । ना द्वैताचे विपरीत ज्ञान । ऐसे निखळ जे अज्ञान । तेचि ते रूप ॥५०४॥
मातीपण निःशेष जाई । परि घट-भांडे आदि न होई । त्या चिखलाचे गोळ्याऐसी पाही । मध्यस्थिती जया ॥५०५॥
आटोनि जाता सागर । ना तरंग ना नीर । त्याऐसी अनाकार । जी दशा गा; ॥५०६॥
जागेपण तर सरे । परि स्वप्नीं काही न शिरे । ऐसी गाढ निद्रा भरे । ते जयाचे रूप; ॥५०७॥
विश्व आघवेचि मावळे । आणि आत्मबोध न उजळे । त्या अज्ञान दशेमुळे । केवळ अक्षर नाव ॥५०८॥
श्रुती म्हणती अजा ऐसे । अजा म्हणता जन्म नसे । मग कैसा काय नाशे ? । म्हणोनि अक्षर अज्ञानघन ॥५०८अ॥
जैसे सर्व कलांनी त्यजावे । चंद्रत्व अवसेसी उरावे । तैसे रूप जाणावे । अक्षर पुरुषाचे या ॥५०९॥
सर्व उपाधिविनाशे । ही जीवदशा जेथ प्रवेशे । फळ पिकता जैसे । झाड बीजीं ॥५१०॥
देहादि उपाधींसकट जेथ । अक्षर लीन होऊनि ठाकत । तयाते अव्यक्त । म्हणती गा ॥५११॥
अगा, जया बीजभाव । ऐसे वेदान्तीं नाव । तो तया ठाव । अक्षर पुरुषा ॥५१२॥
जेथूनि हे विपरीत ज्ञान । विस्तारोनि जागृति स्वप्न । नाना बुद्धींचे रान । तुडवीत असे ॥५१३॥
जीवत्व जेथूनि मग । उपजे उपजवितचि जग । त्या उभय बोधांचा संयोग । तो अक्षर पुरुष गा ॥५१४॥
दुसरा पुरुष जो जनीं । खेळे जागृति-स्वप्न अवस्थांनी । त्या अवस्था दोन्ही । प्रसविल्या जयाने ॥५१५॥
अज्ञानघनसुषुप्ती । ऐसी जिची की ख्याती । ती म्हणता ये ब्रह्माप्राप्ती । परि एक उणे ॥५१६॥
हा अक्षर पुरुष पांडुसुता । या अवस्थांसी न येता । तर हाचि म्हणो येता । ब्रह्मभाव साच ॥५१७॥
परि प्रकृति-पुरुष दोन्ही । अभ्रे झाली ज्या गगनीं । क्षेत्र-क्षेत्रज्ञ स्वप्नीं । देखिले ज्या निद्रेने; ॥५१८॥
हे असो, या अधोशाखा । संसाररूप वृक्षा । मूळ ते चाणाक्षा । अक्षर पुरुष ॥५१९॥
तया पुरुष का म्हणावे जाण । तर तो स्वरूपें पूर्ण । मायापुरीत निद्राधीन । याही कारणें ॥५२०॥
आणि विकारांची येरझार । जो विपरीत ज्ञानाचा प्रकार । न जाणवे जिच्यात खरोखर । ती सुषुप्ती गा, हा ॥५२१॥
म्हणोनि आपोआप हा कोठेही । कदापि नष्ट न होई । आणि वठेना कधीही । ज्ञानावाचुनि अन्य उपायें ॥५२२॥
यालागी हा अक्षर । ऐशा सिद्धांताचा थोर । केला देखसी प्रसार । वेदान्तशास्त्रीं ॥५२३॥
ऐसे जीवकार्यकारण । जयाचे मायासंगचि लक्षण । अक्षर पुरुष जाण । चैतन्य ते ॥५२४॥
म्हणती परमात्मा तो तिजा पुरुष उत्तम
विश्वपोषक विश्वात्मा जो विश्वेश्वर अव्यय ॥१७॥
तर आता विपरीत ज्ञानीं । या दोन ज्या अवस्था जनीं । त्या जाती हरपुनी । गाढ अज्ञानतत्त्वीं ॥५२५॥
ते अज्ञान बुडता ज्ञानीं । ज्ञानायोगें कीर्ति पावुनी । जैसा काष्ठासी जाळुनी । जळे वन्हीही स्वये; ॥५२६॥
तैसे अज्ञान ज्ञानें नेले । आत्मसाक्षात्कार । देउनि गेले । ऐसे जाणणेपणाविण उरले । जाणणे जे; ॥५२७॥
ते तो उत्तम पुरुष गा आगळा । जो तिसरा म्हणुनी कथिला । जो असे वेगळा । मागिल दोहोंहुनी ॥५२८॥
सुषुप्ती आणि स्वप्नाहुनी । अर्जुना, बहुतपरींनी । जागृति जैसी कहाणी । अन्य बोधाचीच ॥५२९॥
रश्मी आणि मृगजळ । याहुनि अफाट वेगळे सुर्यमंडळ । तैसा उत्तम पुरुष निखळ । वेगळा गा ॥५३०॥
अगा काष्ठातिल अग्नी । काष्ठावेगळा आहे राहुनी । तैसा क्षर अक्षराहुनी । अन्यचि तो ॥५३१॥
सोडूनि आपुली मर्यादा । एक करीत नदी-नदा । उसळे कल्पांतीं सुहृदा, । प्रळयजळाचा लोंढा ॥५३२॥
तैसे स्वप्न ना सुषुप्ती । ना जागृतिची वार्ता ती । जैशा गिळिल्या दिवसराती । प्रळयतेजें ॥५३३॥
मग एकपण ना दुजेपण । आहे नाही हे न आकळे जाण । अनुभव गोंधळून । बुडाला जेथ; ॥५३४॥
ऐसे असे जे काही । ते तो उत्तम पुरुष पाही । जो परमात्मा या नावेही । ओळखती ॥५३५॥
तेही तयासी ऐक्य न पावता । बोलणे जीवदशेतचि पंडुसुता । जैसी बुडणार्याची वार्ता । तीरावरचा सांगे ॥५३६॥
तैसे विवेकाचे काठीं । उभें राहुनी किरीटी । ऐल-पैल-थडीच्या गोष्टी । करणे आले वेदां ॥५३७॥
क्षर-अक्षर पुरुष जाण । दोन्ही अल्याड देखून । तयाते म्हणती म्हणून । पर-आत्मरूप ॥५३८॥
अर्जुना गा ऐशापरी । परमात्मा शब्दावरी । सुचविती येथ अवधारी । पुरुषोत्तम ॥५३९॥
एरवी न बोलणेचि बोलणे । न जाणणेचि जेथिचे जाणणे । काहीचि न होउनि होणे । जी ब्रह्मवस्तु गा ॥५४०॥
सोऽहं हेही अस्ता जाय । सांगणारेचि सांगणे होय । द्रष्टत्वासह दृश्य । गेले जेथ ॥५४१॥
बिंबीं आणि प्रतिबिंबींही । कैसे म्हणावे प्रभा नाही ? । जरी न लाभावी । अनुभवावया ॥५४२॥
अथवा नाका-फुलांमध्येही । सुगंध वसे जो मधल्या ठायी । तो न दिसे तरीही । नाही ऐसे म्हणू नये ॥५४३॥
तैसा द्रष्टा दृश्य हे जाय । मग कोण म्हणे तेथ काय ? । हा जो घेई अनुभव । तेचि तया रूप ॥५४४॥
जो प्रकाश्याविण प्रकाश । जो नियम्यावाचुनि नियामक ईश । आपणानेचि अवकाश । वसवीत असे ॥५४५॥
जो नादें ऐकावा नाद । स्वादें चाखावा स्वाद । जो भोगावा आनंद । आनंदेंचि ॥५४६॥
सुखासि सुख जोडिले । जे तेजा तेज गवसले । शून्यही बुडाले । महाशून्यीं ज्या ॥५४७॥
जो पूर्णतेचा विराम । पुरुष गा सर्वोत्तम । विश्रांतीचाही विश्राम । विरला जेथ ॥५४८॥
जो उरल विश्व व्यापुनी । पुरला ग्रासाही ग्रासुनी । जो पुष्कळपट पुष्कळांहुनी । पुष्कळ असे ॥५४९॥
अगा न जाणत्यासी । रुपेपणाचे प्रतीतीसी । स्वयें रुपे न होता दावी जैसी । शिंपली ती ॥५५०॥
वा अलंकारदशेत जैसे । सोने न लपता लपले असे । विश्व न होउनि धरी तैसे । विश्व जो, गा ॥५५१॥
हे असो, जळ आणि तरंगांसी । नाही वेगळेपण देखसी । तैसा दिसे प्रकाश जगासी । स्वयेचि जो ॥५५२॥
प्रतिबिंबाचे संकोच-विकासा । स्वयेचि रूप देत वीरेशा, । हा जळींचा चंद्र जैसा । समग्र गा ॥५५३॥
तैसा विश्वपणें काही न होई । विश्वलोपीं कोठे न जाई । द्विधा न होय रवी । रात्र-दिवसामुळे ॥५५४॥
तैसा केव्हाचि कोणीकडे । कशानेही खर्ची न पडे । जयाची तुलना घडे । जयासीचि ॥५५५॥
मी क्षरा-अक्षराहूनि वेगळा आणि उत्तम
वेद लोक म्हणे माते म्हणूनि पुरुषोत्तम ॥१८॥
जो आपणचि आपणा । प्रकाशितसे, अर्जुना । काय बहु बोलू जया ना । दुजे कोठेही ॥५५६॥
तो गा मी निरुपाधिक । क्षराक्षरोत्तम एक । म्हणोनि म्हणती वेद, लोक । पुरुषोत्तम ॥५५७॥
मोह सारूनि जो दूर जाणे मी पुरुषोत्तम
सर्वज्ञ तो सर्वभावें सर्वरूपीं भजे मज ॥१९॥
परि हे असो ऐसिया- । मज पुरुषोत्तमाते, धनंजया । जाणे जो उदयल्या । ज्ञानसूर्यासी; ॥५५८॥
जागे होता आपुले ज्ञान । जैसे नाहीसेचि होय स्वप्न । तैसे भासमान हे त्रिभुवन । तया मिथ्या जाहले; ॥५५९॥
अगा माळ हाती घेता । फिटे सर्पभासाची भयवार्ता । तैसा माझा बोध होता । मिथ्यात्व न बांधी जया; ॥५६०॥
लेणे सोनेचि जो जाणे । तो लोणेपण मिथ्या म्हणे । तैसे मज जाणोनि ज्याने । वारिला भेद ॥५६१॥
मग म्हणे सर्वत्र सच्चिदानंद । मीचि एक स्वतःसिद्ध । जो न मानी भेद । आपणा-माझ्यात ॥५६२॥
त्यानेचि सर्व जाणिले । अगा, हेही म्हणणे धाकुले । अल्पही न उरले । द्वैत तया ॥५६३॥
म्हणोनि माझिये भजना । उचित तोचि अर्जुना, । गगन जैसे आलिंगना । गगनाचिया ॥५६४॥
क्षीरसागरा मेजवानी कोणें । करावी क्षीरसागरचिपणें । अमृतचि होऊनि मिळणे । अमृतीं जैसे ॥५६५॥
चोख सोन्यात मिसळावे । ते चोख सोनेचि असावे । तैसे मी होताचि संभवे । भक्ती माझी ॥५६६॥
सिंधूहूनि अन्य होय । तर गंगा कैसी मिळोनि जाय ? । म्हणोनि मी न होता शिरकाव । भक्तीत कैसा ? ॥५६७॥
ऐशाचिमुळे सर्वपरी । लाट जैसी अनन्य सागरीं । तैसे मज, अवधारी, । भजतसे जो; ॥५६८॥
प्रभा आणि सविता । यात जितुकी एकरूपा । तितुकी मानू योग्यता । भजना त्या लाभे ॥५६९॥
अत्यंत गूढ हे शास्त्र निर्मळा तुज बोलिलो
हे जाणे तो बुद्धिमंत होईल कृतकृत्यचि ॥२०॥
जेव्हा कथिण्या केला प्रारंभ । तोंपासुनि शास्त्राभ्यासें एक लाभ । ते उपनिषदातिल सौरभ । कमलदलाऐसे ॥५७०॥
हे वेदांचे मंथन करूनी । व्यासप्रजेचे हातांनी । काढिले आम्ही लोणी । अनादिसिद्ध ॥५७१॥
जी ज्ञानामृताची जान्हवी । आनंदचंद्राची कला सतरावी । विचारक्षीरार्णवींची नवी । लक्ष्मी गीता ही ॥५७२॥
म्हणोनि आपुले पदें वर्णें । अर्थाचे जीवें प्राणें । मजवाचुनि अन्यां न मिळणे । मद्रूप होई ॥५७३॥
क्षराक्षरत्वें समोर आले । तयांचे पुरुषत्व दुरी सारिले । मग सर्वस्व मज दिधले । पुरुषोत्तमा ॥५७४॥
म्हणोनि जगीं गीता । मज आत्म्याची पतिव्रता । ही प्रस्तुत तुवा आता । ऐकियेली ॥५७५॥
शब्दपांडित्याचे नव्हेचि हे शास्त्र । संसारजिंकिते हे शस्त्र । आत्मा प्रकटविते मंत्र । गीताक्षरे ही ॥५७६॥
परि तुजपुढे कथिले । ते अर्जुना ऐसे जाहले । जैसे गुप्तधन काढिले । माझे आज ॥५७७॥
मज चैतन्यशंभूचे जटेत । जो ठेवा होता येथ । तया गौतम जाहलासि सार्थ । आस्थानिधी तू पार्था ॥५७८॥
निर्मळपणे आपुलिया । समोरच्यासी आकळावया । दर्पणाचीच परी धनंजया । केली तुवा ॥५७९॥
वा नभ भरले चंद्रतारकांनी । सिंधू आपणामाजी आणी । तैसी गीतेसह मज अंतःकरणीं । ठेविले तुवा ॥५८०॥
अगा त्रिविध ताप आता । तू त्यागिलेसि विमुक्ता । म्हणोनि गीतेसह मज पार्था । विसावा जाहलासी ॥५८१॥
परि हे काय बोलू आता । जी ही माझी उन्मेषलता । जो जाणे तो पार्था । समस्त मोहां त्यागी ॥५८२॥
ही अमृतसरिता सेवावी । जी रोगाम पळवुनि लावी । आणि देऊनिया सुखवी । अमरपण उचित ॥५८३॥
आणि जाणती जे गीता । विस्मय काय मोह लोपता । आत्मज्ञानें तयां ये मिळता । आत्मस्वरूपीं ॥५८४॥
ज्या आत्मज्ञानाचे ठायी । कर्म आपुल्या जीविता पाही । मग होऊनिया उतराई । लया जाय ॥५८५॥
हरपले दावूनिया । माग सरे धनंजया । तैसे ज्ञानचि कर्मप्रासादा या । कळस होई ॥५८६॥
म्हणोनि ज्ञानी पुरुषा । कर्म करणे सरले देख । ऐसे अनाथांचा सखा । बोलिला तो ॥५८७॥
ते श्रीकृष्णवचनामृत । पार्थीं भरोनि ओसंडत । मग व्यासकृपें प्राप्त । संजजासी ॥५८८॥
ते बोधामृत कौरवराजासी । देई तो प्राशन करण्यासी । म्हणोनि जीवितान्त धृतराष्ट्रासी । नव्हेचि भारी ॥५८९॥
एरवी गीताश्रवणसमयीं । गमला अनधिकारी त्या ठायी । परि अंतीं प्रकाशदायी । तीचि जाहली ॥५९०॥
द्राक्षवेलीसी दूध घालावे । ते वाया गेले गमावे । परि फलप्राप्तीने देखावे । दुणावले ऐसे; ॥५९१॥
तैसी हरिमुखीची अक्षरे । संजयें कथिली आदरें । तेणें तोही त्या अवसरें । सुखी जाहला ॥५९२॥
तेचि मराठीचे रचनेने । म्यां वेडयाबागडया ज्ञानें । आणि जाणे न जाणे । ऐसे निरूपिले ॥५९३॥
शेवंतीचे अरसिकें । रूप पाहता फिके । परि सौरभ्य नेले कौतुकें । ते भ्रमरचि जाणिती; ॥५९४॥
तैसे घडले प्रमेय घ्यावे । उणे ते मज द्यावे । जे अजाण तेचि स्वभावें । रूप की बाळाचे ॥५९५॥
परि अजाण जरि आहे । तरि मायबापें । जेव्हा देखावे । हर्ष कोठेही न समाये । चोजचि करिती ॥५९६॥
तैसे संत तुम्ही माहेर व्हावे । की भेटता मी लाडावे । तेचि आता जाणावे । ग्रंथरूपें, जी ॥५९७॥
आता विश्वात्मक हा माझा । स्वामी निवृत्तिराजा । अवधारो वाक्पूजा । ज्ञानदेव म्हणे ॥५९८॥