अर्जुन म्हणाला:
बुद्धि कर्माहुनी थोर मानिसी तू जनार्दना
मग कर्मात का घोर घालिसी मज केशवा ॥१॥
मग अर्जुन म्हणे । देव तुमचे बोलणे । ऐकिले मी नीटपणे । कमळापती ॥१॥
यावरूनि पाहता । उरेचिना कर्म, कर्ता । ऐसे तुझे मत अनंता । निश्चित जर;- ॥२॥
तर कैसे हरी मजसी - । पार्था, युद्ध करी म्हणसी । गुंतविता न संकोचसी । या महाघोर कर्मीं? ॥३॥
अगा पूर्णपणे निषेधिसी । तूचि सर्व कर्मांसी । परि मजकरवी का करविसी । हे हिंसक तू? ॥४॥
तर विचार करि बा मानसीं । लेशभर कर्माहि मान देसी । आणि मजकडूनि करविसी । एवढी ही हिंसा ॥५॥
मिश्र बोलूनि बुद्धीस जणू मोहात टाकिसी
ज्याने मी श्रेय पावेन सांग ते एक निश्चित ॥२॥
देवा, तूचि ऐसे बोलावे । तर आम्ही अज्ञांनी काय करावे? । आता संपले म्हणावे आघवे । विवेकाचे ॥६॥
अगा, हाचि जर उपदेश । तर संभ्रम म्हणती कशास? । आता पुरली आमुची हौस । आत्मबोधाची ॥७॥
वैद्यें पथ्य सांगुनी जावे । मग स्वयेंचि विष द्यावे । तर रोग्याने कैसे जगावे? । सांग मज ॥८॥
आडवाटे लावावे अंधास । मद्य पाजावे माकडास । तैसा हा गोमटा उपदेश । ओढवला आम्हा ॥९॥
मी आधीचि काही न जाणे । त्यात ग्रस्त या भ्रमाने । सारासार विचार पुसावा म्हणे । म्हणूनिया तुजसी ॥१०॥
तों एकेक नवलाई तुझी । गुंतागुंतचि उपदेशामाजी । तर शिष्यवरासी का जी, - । ऐसे करिशी? ॥११॥
आम्ही तनमनजीवें । तुझिया बोलावरी विसंबावे । आणि तुवाचि ऐसे करावे । तर सरलेचि सारे ॥१२॥
आता ऐशापरी हे बोधन । तर चांगलेचि कल्याण । मग ज्ञानाची आशा कोठून? । अर्जुन म्हणे ॥१३॥
ज्ञानसंपादन तर सरले । परि आणिक एक जाहले । जे स्थिर ते डहुळले । मानस माझे ॥१४॥
तेवीचि कृष्णा तुझिया येथ । लीला काही न उमगत । की पाहसी माझे चित्त । यानिमित्तें? ॥१५॥
की आहेसी फसवीत । गूढ तत्त्वज्ञान सांगत । हे अनुमानिता, निश्चित - । कळेना काही ॥१६॥
म्हणोनि ऐक देवा । हा भावार्थ आता न बोलावा । मज विवेक सांगावा । सरळ सोपा जी, ॥१७॥
मी अत्यंत मंद असे । परि अशा मलाही समजेलसे । कृष्णा बोलावे तू तैसे । निश्चितसे ॥१८॥
पहा रोगासी घालवावे । तर औषध लागे द्यावे । परि जैसे ते मधुर व्हावे । अति रुचकर; ॥१९॥
तैसे सकळर्थभरित । तत्त्व तर सांगावे उचित । परि बोधे माझे चित्त । ज्यामुळे गा ॥२०॥
देवा, तुज ऐसा लाभता गुरु । आज इच्छापूर्ती का न करू? । येथ भीड कोणाची धरू ? । तू माउली आमची ॥२१॥
अगा, कामधेनूचे दुभते । दैवें जर लाभते । तर इच्छेची का तेथे । वाण पडे? ॥२२॥
जर चिंतामणी हाती येई । तर वांछेचे का साकडे काही । जे आपणा सुखवित राही । ते का न इच्छावे? ॥२३॥
अमृतसागरासी थडकावे । मग तहानेने तडफडावे । तर सायास का करावे । तेथवरी जाण्याचे? ॥२४॥
तैसे जन्मजन्मांतरी बहुत । तुझी उपासना करीत । तो तू दैवें आज येथ । लाभलासी लक्ष्मीपती ॥२५॥
तर आपुल्या इच्छेऐसा । वर का न मागावा परमेशा? । देवा, सुकाळ हा मानसा । जाहला असे ॥२६॥
सकळ इच्छांचे सुफळ जीवित । आज पुण्य यशासी येत । हे जाहले मनोरथ । विजयी माझे ॥२७॥
जय जय हे परममंगलधामा । सकळ देवदेवोत्तमा । तू स्वाधीन आज आम्हा । म्हणूनिया ॥२८॥
जैसे मातेचे ठायी । बाळा काळवेळ नाही । अंगावरी पीत राही । ज्यापरी गा ॥२९॥
देवा तुजसी तैसे । आवडे ते पुसतसे । मनींचे इच्छेऐसे । हे कृपानिधी ॥३०॥
तरि ज्यात पारलौकिक हित । आणि आचरिण्या उचित । ते सांग एक निश्चित । पार्थ म्हणे ॥३१॥
श्रीभगवान् म्हणाले;
दुहेरी ह्या जगीं निष्ठा पूर्वी मी बोलिलो असे
ज्ञानाने सांख्य जी पावे योगी कर्म करूनिया ॥३॥
हे ऐकूनि अच्युत । म्हणे होत विस्मित । अर्जुना हा गर्भित । अभिप्राय ॥३२॥
निष्काम कर्ममार्ग सांगता । ज्ञानमार्गाचा महिमा पार्था, । प्रगटला स्वभावता । प्रसंगानुरूप ॥३३॥
तो उद्देश तू न जाणलासी । म्हणोनि व्यर्थ क्षोभलासी । तरि आता दोन्ही मार्गांसी । मीचि कथिले जाण ॥३४॥
ऐक हे वीरश्रेष्ठवर, । हे दोन्ही मार्ग पृथ्वीवर । माझेचिपासुनी पूर्वापार । प्रगटले ॥३५॥
एका ज्ञानयोग म्हणती । तो ज्ञानी आचरिती । ओळखीसवे पावती । तद्रूपता ॥३६॥
दुसरा कर्मयोग जाण । तेथ साधक होउनि निपुण । पावताती निर्वाण । कालांतरी ॥३७॥
हे मार्ग दोन दिसती । परि एकवटती अंती । जैसी सारिखीचि तृप्ती । शिध्यात, रांधापत ॥३८॥
वा पूर्व-पश्चिम वाहता । भिन्न दिसती सरिता । परि सागरीं एकरूपता । पावती अंती ॥३९॥
तैसे या दोन्ही मार्गात । एकचि साध्य सूचित । परि साधनेची रीत । योग्यतेआधीन ॥४०॥
पहा एके झेपेसरशी । फळासी झोंबे पक्षी । त्या वेगें माणसा कशी । फलप्राप्ती सांग? ॥४१॥
डहाळ्यांमधुनि हलके हलके । काही वेळाने एके । मार्गाचे आधारें देखे । गाठी फळ तो ॥४२॥
त्या पक्ष्याऐसे मार्गस्थ होत । ज्ञानमार्ग चोखाळीत । मिळविती मोक्ष त्वरित । ज्ञानी जन ॥४३॥
अन्य योगी कर्माधारें । विहितचि निज आचारें । योग्यता काही अवसरें । पावताती ॥४४॥
न कर्मारंभ टाळूनि लाभे नैष्कर्म्य ते कधी
संन्यासाच्या क्रियेनेचि कोणी सिद्धि न मेळवी ॥४॥
कर्तव्यकर्म उचित । न करिताचि सिद्धवत् - । कर्महीना निश्चित । होता येईना ॥४५॥
कर्तव्यकर्म सोडुनि देणे । तेचि निष्कर्म होणे । अर्जुना, हे व्यर्थ बोलणे । मूर्खपणाचे ॥४६॥
पैलतीरा कैसे जावे । हे संकट उभे राहे । तेथ नावेसी त्यजावे । कैसे सांग? ॥४७॥
तैसी तृप्ती इच्छिता । कैसी हो न रांधता । वा रांधिलेही न सेविता । सांग मज ॥४८॥
जोवरि निरिच्छपण नाही । तोवरि कर्म करित राही । मग आत्मतृप्तीचे ठायी । सहजी कुंठे कर्म ॥४९॥
म्हणोनि ऐक पार्था, । जया मोक्षपदीं आस्था । तया उचित कर्म सर्वथा । त्याज्य नाही ॥५०॥
आणि आपुल्या इच्छेऐसे । स्वीकारिले कर्म होतसे । वा त्यजिता नाहीसे । ऐसे होय; ॥५१॥
हे व्यर्थ बोलणे सगळे । विचार करिता कळे । टाळिताहि कर्म न टळे । निःसंशय जाण ॥५२॥
कर्माविण कधी कोणी न राहे क्षणमात्रहि
प्रकृतीच्या गुणीं सारे बांधिले करितातचि ॥५॥
जोवरि शरीर हे आश्रयस्थान । तोवरि करीन टाकीन म्हणणे अज्ञान । कर्म घडे ते गुणाधीन । आपोआप ऐसे ॥५३॥
कर्तव्यकर्म जितुके असे । ते सोडिले जरि अट्टाहासें । तरी स्वभाव काय नाहीसे - । होत इंद्रियांचे? ॥५४॥
सांग, कान ऐकण्याचे थांबले । की नेत्रांचे तेज गेले । नाक वास घेईना झाले । नाकपुडया बुजुनी? ॥५५॥
निर्विकल्प जाहले मन ॥ की खुंटले प्राण - अपान । अथवा भूक तहान । सरल्या इच्छा ? ॥५६॥
की जागृति - स्वप्न थांबले । पाय चालणे विसरले । हे असो, कोणा काय चुकले ॥ जन्म मृत्यू? ॥५७॥
हे न चुकेचि जर काही । तर सोडिले ते काय? पाही, । म्हणोनि कर्मत्याग नाही । देहधार्यांसी ॥५८॥
कर्म पराधीनपणें । उपजे प्रकृतीगुणें । ते करीन टाळीन म्हणणे । अभिमान व्यर्थ ॥५९॥
जैसे रथीं आरूढ व्हावे । मग जरी निश्चिल बैसावे । तरी चल होऊनि हिंडावे । परतंत्र; ॥६०॥
वा उडविले वायुझोतें । वाहे शुष्क पान ते । निश्चेष्ट जैसे भिरभिरते । आकाशात; ॥६१॥
तैसे देहाधारें । कर्चेद्रियांचे द्वारें । कर्मातीतही व्यवहारीं संचरे । निरंतर ॥६२॥
म्हणूनि जोवरि देहाची संगत । तोवरि कर्मत्याग न संभवत । ऐसे असुनीही करू म्हणत । तो दुराग्रहचि केवळ ॥६३॥
इंद्रिये करिती कर्म मूढ त्यांसचि रोधुनी
राहतो भोग चिंतूनि तो मिथ्याचार बोलिला ॥६॥
जे उचित कर्म सोडिती । मग कर्मातीत होऊ पाहती । परि कर्मेंद्रियप्रवृत्ती । निरोधुनी; ॥६४॥
तयां कर्मत्याग नसे । परि कर्तव्य मनीं वसे । तरि त्यागाचा डौल दिसे । ते जाण दारिद्रय ॥६५॥
ऐसे ते पार्था, । विषयासक्त सर्वथा । ओळखावे तत्त्वता । यात न संशय ॥६६॥
आता देई अवधान । प्रसंगे तुज सांगेन । निरिच्छ पुरुषाचे लक्षण । धनुर्धरा ॥६७॥
जो इंद्रिये मनाने ती नेमुनी त्यांस राबती
कर्मयोगात निःसंग तो विशेषचि मानिला ॥७॥
दृढ जो अंतर्मनीं । परमात्मरूपीं गढुनी । बाह्य तरी दर्शनीं । रूढ व्यवहारीं ॥६८॥
इंद्रियां आज्ञा न करी । विषयांचे भय न धरी । प्राप्त कर्म न अव्हेरी । उचित जे जे ॥६९॥
कर्मेंद्रियांचे वर्तन । जो न करी त्याचे नियमन । परि जाई न झाकोळून । विकारऊर्मींनी ॥७०॥
तो कामनामात्रें न लिप्त होई । मोहमळें न माखेहि । न भिजे जळीं असुनिही । कमलपत्र जैसे; ॥७१॥
तैसा तो संसारीं असे । सकळांसारिखा दिसे । जैसे जळासंगे आभासे । सूर्यबिंब ॥७२॥
वरकरणी पाहता तैसे । तो साधारणचि दिसे । एरवी निश्चित न कळतसे । स्थिती तयाची ॥७३॥
ऐशा लक्षणांनी युक्त । पाहसी तोचि मुक्त । आशापाशरहित । ओळख तू ॥७४॥
अर्जुना तोचि योगी । स्तुत्य तो जगीं । ऐसा हो यालागी । म्हणे मी तुज ॥७५॥
तू मननियमन करी । निश्चळ होई अंतरीं । मग कर्मेंद्रिये व्यवहारीं । राहोत सुखें ॥७६॥
नेमिले तू करी कर्म करणे हेचि थोर की
तुझी शरीरयात्राहि कर्माविण घडेचिना ॥८॥
म्हणसी कर्मरहित व्हावे । परि देहधार्यां ते न संभवे । मग निषिद्ध का वागावे । विचार करी ॥७७॥
म्हणोनि जे जे उचित । समयोचित प्रस्तुत । ते कर्म हेतुरहित । आचरी तू ॥७८॥
पार्था आणिकही एक । न जाणसी तू कवतिक । ऐसे कर्म मोक्षदायक । सहजसे ॥७९॥
अधिकारनुसार येथ । स्वधर्म जो आचरीत । तो त्या आचरणें निश्चित । पावे मोक्ष ॥८०॥
यज्ञार्थ कर्म सोडूनि लोक हा बांधिला असे
यज्ञार्थ आचरी कर्म अर्जुना मुक्तसंग तू ॥९॥
स्वधर्मयुक्त आचरण होय । तोचि जाणावा नित्ययज्ञ । म्हणोनि तेथ शिरकाव । पापासी नाही ॥८१॥
हा निजधर्म सोडे । आणि कुकर्मीं बुडे । तेव्हाचि बंध पडे । सांसारिक ॥८२॥
म्हाणोनि स्वधर्माचे अनुष्ठान । तेचि अखंड यज्ञयाजन । जो करी तया बंधन । कधीचि नाही ॥८३॥
जग हें कर्में बांधिले । देहाधीन परतंत्र जाहले । ते नित्ययज्ञा चुकले । म्हणोनिया ॥८४॥
आता याचिविषयीं पार्था । तुज सांगेन एक मी कथा । जेव्हा सृष्टी आदि व्यवस्था । ब्रह्मदेवें केली; ॥८५॥
पूर्वी प्रजेसवे ब्रह्मा यज्ञ निर्मूनि बोलिला
पावा उत्कर्ष यज्ञाने हा तुम्हा कामधेनुचि ॥१०॥
तेव्हा नित्ययज्ञासहवर्तमान । केले समस्त प्राणी निर्माण । परि ते यज्ञकर्म गहन । जाणू न शकती ॥८६॥
प्राण्यांनी विनविले ब्रह्मदेवासी - । आधार काय येथ आम्हासी । तेव्हा म्हणता जाहला प्राण्यांसी । नभिकमलोत्पन्न तो ॥८७॥
तुम्हासी वर्णविशेषें । आम्ही स्वधर्मचि कथिला असे । यासि आचरा, मग सहजसे । पुरेल इच्छित ॥८८॥
तुम्ही व्रतवैकल्य न करावे । शरीरा न पीडावे । दूर कोठेही न जावे । तीर्थयात्रेसी ॥८९॥
योगादिक मोक्षसाधना । साकांक्ष आराधना । मंत्रतंत्र अनुष्ठाना । नयेचि करू ॥९०॥
अन्य देवतांसी न भजावे । हे सर्वथा काही न करावे । तुम्ही स्वधर्मयज्ञा यजावे । अनायासे ॥९१॥
स्वधर्माचरण पाहे । निर्हेतुक चित्तें व्हावे । पतिव्रतेने भजावे । पतीसी जैसे ॥९२॥
तैसा स्वधर्मयज्ञ एक । हाचि तुम्हा आचरिण्यालायक । ऐसे ब्रह्मदेव सत्यलोकनायक । म्हणता जाहला ॥९३॥
पहा स्वधर्मा भजाल । तर कामधेनू हा होईल । मग जनहो, ती न सोडील । कदापि तुम्हां ॥९४॥
रक्षा देवांस यज्ञाने तुम्हा रक्षोत देव ते
एकमेकांस रक्षूनि पावा कल्याण सर्वही ॥११॥
स्वधर्माचरणें सकल । देवता संतोषतील । मग तुम्हा इच्छित फल । देतील त्या ॥९५॥
स्वधर्मपूजेने पूजिता । या समस्त देवता । योगक्षेम तुमचा सर्वथा । निश्चित करितील ॥९६॥
तुम्ही देवांसी भजाल । देव तुम्हावरि संतुष्टतील । ऐसी परस्परांत घडेत । प्रीती जेथ; ॥९७॥
तेथ तुम्ही जे करू म्हणाल । ते सहजी सिद्धीसि जाईल । इच्छितही पुरेल । मानसींचे ॥९८॥
वाचासिद्धी पावाला । आज्ञा करणारे व्हाल । आज्ञा तुमच्या मागतील । महाऋद्धी ॥९९॥
जैसी वसंतऋतुचे द्वारीं । निरंतर । वनश्री । सेवी पुष्पफलसंभारीं । लावण्यासह; ॥१००॥
यज्ञतुष्ट तुम्हा देव भोग देतील वांछित
त्यांचे त्यांस न देता जो खाय तो एक चोरचि ॥१२॥
तैसे सर्व सुखांसहित । दैवचि मूर्तिमंत । येईल माग काढित । तुमचे पाठी ॥१०१॥
ऐसे भोग भोगुनी समस्त । व्हाल तुम्ही इच्छारहित । जर एकनिष्ठ स्वधर्मांत । राहाल बापा ॥१०२॥
परि लाभता सकल संपदा । जो अनुसरेल इंद्रियमदा । लुब्ध होऊनि स्वादा । विषयांचिया ॥१०३॥
यज्ञांयोगें संतुष्ट होउनी । ही जी संपत्ति दिली देवांनी । सर्वेश्वरा या स्वधर्माचरणीं । न भजेल जो; ॥१०४॥
अग्निमुखीं हवन । न करील देवतापूजन । योग्यवेळीं न देईल भोजन । पुरोहितांसी; ॥१०५॥
विन्मुख होइल गुरूभक्तीस । मान न देइल अतिथींस । जातगोता न देइल संतोष । आपुलिया ॥१०६॥
ऐसा स्वधर्माचरणरहित । संपन्नपणें उन्मत्त । केवळ भोगासक्त । होईल जो; ॥१०७॥
तया मग मोठाचि घात । जेणें हातीचे सकळ जात । मिळविलेही न लाभत । भोगण्यासी ॥१०८॥
जैसे आयुष्यसरल्या शरीरीं । चैतन्य वास न करी । अथवा दैवहीनाघरीं । न राहे लक्ष्मी; ॥१०९॥
तैसा स्वधर्म जर लोपला । सर्व सुखांचा थारा मोडला; । जैसा दीप मालवला । की प्रकाश जाय ॥११०॥
निजधर्म सुटे जेथ । आत्मस्वातंत्र्य लोपे तेथ । प्रजाजनहो, ऐका व्यवस्थित । म्हणती ब्रह्मदेव ॥१११॥
म्हणूनि स्वधर्म जो सोडील । तया काळ दंडील । चोर म्हणुनी हरील । सर्वस्व तयाचे ॥११२॥
मग सकळ पापे भोवती । तया घेरूनि घेती । स्मशानासी रातीं । भुते जैसी ॥११३॥
तैसी त्रिभुवनींची दुःखें । आणि नानाविध पातके । दैन्यजात तितुके । तेथेचि वसे ॥११४॥
ऐसे होय तया उन्मत्ता । मग न सुटे आक्रोशता । कल्पांतीही सर्वथा । प्राणिगणहो ॥११५॥
म्हणूनि विजवृत्ती न सोडावी । इंद्रिये न बरळू द्यावी । ऐसे प्रजेसी शिकवी । चतुरानन ब्रह्मदेव ॥११६॥
माशासी पाण्यावाचून । तत्क्षणीं येई मरण । म्हणूनि स्वधर्माचरण । सोडू नये ॥११७॥
यास्तव तुम्ही सर्वानी । आपुलाल्या उचित कर्माचरणीं । तत्पर व्हावे म्हणुनी । वारंवार सांगतसे ॥११८॥
यज्ञात उरले खाती संत ते दोष जाळिती
रांधिती आपुल्यासाठी पाणी ते पाप भक्षिती ॥१३॥
विहित कर्माचे जाण । निर्हेतुक बुद्धीने आचरण । असती समृद्धी वेचून । करी जो गा ॥११९॥
गुरुगोत्रअग्निपूजन । यथाकाल भजे द्विजगण । निमित्ते यज्ञयाजन । पितरांसाठी ॥१२०॥
स्वधर्माचरणाची ऐशा । आहुति अर्पुनी यज्ञपुरुषा । शेषभाग मागे सहजसा । उरेल जो; ॥१२१॥
तो सुखेनैव आपुल्या घरीं । कुटुंबासह सेवन करी । ते सेवनचि निवारी । पातके सर्व लाभता । महारोग ॥१२३॥
जैसा तत्त्वानिष्ठांस । भ्रांतीचा न लवलेश । तैसा सेविता यज्ञावशेष । घेरिती न पापे ॥१२४॥
म्हणोनि स्वधर्में जे मिळवावे । ते स्वधर्मींचि वेचावे । मग उरे ते भोगावे । संतोषनें ॥१२५॥
यावाचुनी पार्था, । वागू नये अन्यथा । ऐसी आद्य ही कथा । मुरारी सांगे ॥१२६॥
जे आपणा देहचि मानिती । आणि विषयचि भोग्य म्हणती । यापरते न स्मरती । आणिक काही; ॥१२७॥
ही सकळ असे यज्ञसंपत्ती । परि भ्रांतचित्त हे न जाणिती । केवळ स्वार्थालागी पाहती । भोगावया; ॥१२८॥
इंद्रियरुचीसारिखे । करविती पदार्थ सुखें । ते पापी जणु पातके । सेविती जाण ॥१२९॥
हे संपत्तिजात आघवे । हवनद्रव्य मानावे । मग स्वधर्मयज्ञें अर्पावे । परमेश्वरा ॥१३०॥
हे सोडोनिया मूर्ख । आपणाचिसाठी देख । रांधिती स्वयंपाक । नानाविध ॥१३१॥
जेणें यज्ञ सिद्धीसी जाई । परमेश्वर संतुष्ट होई । ते हे अन्न सामान्य नाही । म्हणूनिया; ॥१३२॥
हे न म्हणावे साधारण । अन्न ब्रह्मरूप जाण । जे असे जीवनसाधन । विश्वासी या ॥१३३॥
अन्नापासूनि ही भूते पर्जन्यातूनि अन्न ते
यज्ञें पर्जन्य तो होय यज्ञ कर्मामुळे घडे ॥१४॥
अन्नानेचि समस्त । प्राणिमात्र वाढत । पर्जन्यातुनि पिकत - । सर्वत्र अन्न ॥१३४॥
त्या पर्जन्या यज्ञीं जन्म । यज्ञा प्रकट करी कर्म । कर्माचे मूळ ब्रह्म । वेदरूप ॥१३५॥
प्रकृतीपासुनी कर्म ब्रह्मीं प्रक्रुति राहिली
ऐसे व्यापक ते ब्रह्म यज्ञात भरले सदा ॥१५॥
अविनाशी परापर ब्रह्म । मग वेदा देत जन्म । म्हणूनि हे स्थावरजंगम । ब्रह्मबद्ध ॥१३६॥
परि ऐक एक येथ । कर्मरूप यज्ञीं मूर्तिमंत । सकळ वेद वसत । निरंतर ॥१३७॥
प्रेरिले हे असे चक्र ह्या लोकीं जो न चालवी
इंद्रियासक्त तो पापी व्यर्थ जीवन घालवी ॥१६॥
ऐसी ही आदिपरंपरा । संक्षेपें तुज धनुर्धरा, । कथिली या अवसरा । यज्ञालागी ॥१३८॥
म्हणूनि उचित हा सर्वस्वी । स्वधर्मरूप यज्ञ पाही । उन्मत्त जो आचरिनाही । या लोकीं गा; ॥१३९॥
तो पातकांची रास । जाण भार भूमीस । जो कुकर्मीं इंद्रियांस । लाडावुनी ठेवी ॥१४०॥
ते जन्म कर्म सकळ । अर्जुना, अति निष्फळ । जैसे की अभ्रपटल । अकाली नभीं ॥१४१॥
वा स्तन गळ्यासि अजाचे । तैसे जिणे व्यर्थ तयाचे । जयाकडुनि आचरण स्वधर्माचे । घडेचिना ॥१४२॥
म्हणोनि ऐक पांडवा, । हा स्वधर्म कोणी न सोडाव । सर्वभावें भजावा । हाचि एक ॥१४३॥
अगा, शरीर जरी मिळाले । तरि ते पूर्वकर्में लाभले । मग उचित कर्म आपुले । का सोडावे? ॥१४४॥
ऐक हे सव्यसाची । मूर्ती लाभोनि देहाची । खंत करिती कर्माची । ते गांवढे गा ॥१४५॥
परी आत्म्यात जो खेळे आत्मा भोगूनि तृप्त जो
आत्म्यामध्येचि संतुष्ट त्याचे कर्तव्य संपले ॥१७॥
देहधर्म असोनि येथ । तोचि एक कर्मे न लिप्त । जो रमे अखंडित । आत्मस्वरूपीं ॥१४६॥
तो आत्मज्ञानें तोषला । कृतकृत्य पहा जाहला । म्हणोनि सहजी सुटला । कर्मसंग तयाचा ॥१४७॥
केल्याने वा न केल्याने त्यास भावार्थ सारखा
कोणामधे कुठे त्याचा न काही लोभ लोभ गुंतला ॥१८॥
जैसी जाहल्यावरी तृप्ती । साधने आपोआप सरती । तैसी कर्मे नुरती । होता आत्मतुष्टी ॥१४८॥
जोवरी गा अर्जुना । तो बोध भेटेना मना । तोवरी या साधना । भजावे लागे ॥१४९॥
म्हणूनि नित्य निःसंग करी कर्तव्यकर्म तू
निःसंग करिता कर्म कैवल्यपद पावतो ॥१९॥
म्हणूनि तुवा सतत । सकळ आसक्तीरहित - । होऊनिया, उचित । स्वधर्में राहावे ॥१५०॥
निष्काम बुद्धिने या जगतीं । जे स्वधर्म आचरिती । ते खचित पावती । मोक्षपद ॥१५१॥
कर्मद्वाराचि सिद्धीस पावले जनकादिक
करी तू कर्म लक्षूनि लोकसंग्रहधर्महि ॥२०॥
सकळ हे जनकादिक पाही । कर्ममात्रा न त्यजिताही । सहजतया मोक्षसुखही । पावते जाहले ॥१५२॥
पार्था गा या कारणें । कर्मासी पहावे आस्थेने । हे आणिकही एके अर्थाने । उपकारक ॥१५३॥
ऐसे करिता आचरन । लागेल लोकांसी वळण । सहजी चुकेल जाण । हानि तयांची ॥१५४॥
मिळवावयाचे ते मिलविले । आणि जे निरिच्छ जाहले । तयांही कर्तव्य असे उरले । लोकांसाठी ॥१५५॥
मार्गी अंधा सांभाळीत । पुढे डोळस जैसा चालत । तैसा धर्म आचरीत । दावावा अज्ञजनां ॥१५६॥
अगा, ऐसे न करावे - । तर अज्ञजनां कसे कळावे ? । तयांनी कैसे जाणावे । मार्गासी या? ॥१५७॥
जे जे आचरितो श्रेष्ठ ते तेचि दुसरे जन
तो मान्य करितो जे जे लोक चालवितात ते ॥२१॥
येथ वडील जे जे करिती । तया नाव धर्म ठेविती । आणि तोचि चारिती । सामान्य सकळ ॥१५८॥
हे ऐसे असे स्वभावें । म्हणोनि कर्म न सोडावे । विशेषकरूनि लागे आचरावे । संतमहात्म्यांसी ॥१५९॥
करावे - मिळवावेसे नसे काही जरी मज
तिन्ही लोकीं तरी पार्था कर्मीं मी वागतोचि की ॥२२॥
अगा, आणिकांचिया कथा । तुज सांगू काय आता । पहा, याचि पथीं, पार्था, । वागणारा मीही ॥१६०॥
काही संकट मज पडतसे । वा काही एक इच्छितसे । म्हणूनि मी धर्म आचरीतसे । म्हणसी जरी ॥१६१॥
अगा, परिपूर्णत्वालागी । आणिक दुसरा नाही जगीं । ऐसे सामर्थ्य माझे अंगीं । जाणसी तू ॥१६२॥
सांदीपनीगुरूंचा पुत्र मृत । केला जिवंत तुझ्यादेखत । तो मीही कर्म आचरीत । निमूटपणें ॥१६३॥
मीचि कर्मीं न वागेन जरी आळस झाडूनी
सर्वथा लोक घेतील माझे वर्तन ते मग ॥२३॥
मी स्वधर्मीं वागे कैसा । साकांक्ष की होय जैसा । फलाशेचे एकेचि उद्देशा । धरूनिया; ॥१६४॥
जे भूतजात सकळ । असे अम्हांचि आधीन केवळ । तयां न लागावा चळ । म्हणोनिया ॥१६५॥
सोडीन मी जरी कर्म नष्ट होतील लोक हे
होईन संकरद्वारा मीचि घातास कारण ॥२४॥
आम्ही कामनातृप्त व्हावे । आत्मानंदीं रमावे । तर कैसे निस्तरावे । प्रजेने हे? ॥१६६॥
आमुची वर्तणूक पाहावी । वागण्याची रीत जाणावी । एरवी ही जनराहाटी आघवी । नासली होईल ॥१६७॥
म्हणोनि जो सामर्थ्यवान । आणि सर्वज्ञानसंपन्न । तयाने विशेषेकरून । कर्म न त्यागावे ॥१६८॥
गुंतूनि करिती अज्ञ ज्ञात्याने मोकळेपणें
करावे कर्म तैसेचि इच्छुनी लोकसंग्रह ॥२५॥
पहा, फलाचे आशेवर । फलेच्छु करी कर्माचार । तैसा कर्मीं द्यावा भर । निरिच्छानेही ॥१६९॥
सांगे पुन्हापुन्हा पार्था । ही सकळ लोकसंस्था । रक्षणीय सर्वथा । म्हणूनिया ॥१७०॥
अगा, शास्त्राधारें वागावे । जगा सरळमार्गी लावावे । अलौकिक न व्हावे । लोकांप्रती ॥१७१॥
नेणत्या कर्मनिष्ठांचा बुद्धिभेद करू नये
गोदी कर्मात लावावी समत्वें आचरूनि ती ॥२६॥
जे सायसें अंगावरि पीत । तयें पक्वान्ने कैसी खावीत? । म्हणूनि बालका न द्यावीत । धनुर्धरा जैसी; ॥१७२॥
तैसा कर्म करण्यास । अयोग्य असे तयास । कर्मत्यागाचा उपदेश । थट्टेतहि नये करू ॥१७३॥
तया सदाचरण शिकवावे । तेचि एक वाखाणावे । सत्कर्मचि आचरावे । निष्काम ज्ञानियांनीही ॥१७४॥
लोकसंग्रहाकारण । करिता कर्माचरण । ते न होई बंधन । तयाअंगीं ॥१७५॥
जैसे बहुरूपी होती राजाराणी । स्त्री-पुरुषभाव नसे मनीं । परि लोकात बतावणी । तैशीचि करिती ॥१७६॥
कर्में होतात ही सारी प्रकृतीच्या गुणांमुळे
अहंकारबळें मूढ कर्ता मी हेचि घेतसे ॥२७॥
पहा, दुसर्याचा भार । घेता आपुल्या शिरावर । काय आपण ना दबणार । धनुर्धरा? ॥१७७॥
तैसी शुभाशुभ कर्मे । जी निपजती प्रकृतिधर्में । मूर्ख म्हणे मतिभ्रमें । मी तयांचा कर्ता ॥१७८॥
ऐसा जो अहंकाररूढ । एककल्ली मूढ । तया हा परमार्थ गूढ । नये उपदेशू ॥१७९॥
हे असो, प्रस्तुत । सांगेन तुझे हित । अर्जुना देऊनी चित्त । अवधारी गा ॥१८०॥
गुण हे आणि ही कर्मे ह्यांहुनी वेगळाचि मी
जाणे तत्त्वज्ञ गुंतेना गुणात गुण वागता ॥२८॥
तत्त्वज्ञानियांचे ठायी । तो देहाभिमान नाही । जेथ कर्मजात पाही । निपजत असे ॥१८१॥
देहाभिमान सोडित । गुणकर्मे ओलांडित । होऊनि साक्षीभूत । राहती ते देहीं ॥१८२॥
म्हणूनि जरि ते देहात । तरि कर्मबंधीं न गुंतत । जैसा सूर्य न होई लिप्त । प्राणिमात्रांचे कर्मीं ॥१८३॥
गुंतले गुणकर्मीं जे भुलले प्रकृतीगुणें
त्या अल्प जाणणारांस सर्वज्ञें चाळवू नये ॥२९॥
येथ कर्मीं तोचि लिप्त । जो गुणांनी घेरिला जात । प्रकृतीचे आधीनतेत । वागतसे; ॥१८४॥
गुणांचा घेत आधार । इंद्रिये करिती व्यवहार । ते परकर्म आपुल्यावर । जो घेई ओढवुनी ॥१८५॥
मज अध्यात्मवृत्तीने सर्व कर्मे समर्पुनी
फलाशा ममता सर्व सोडुनी झुंज तू सुखें ॥३०॥
तर उचित कर्मे आघवी । तुवा आचरोनि मज अर्पावी । परि चित्तवृत्ती ठेवावी । आत्मरूपीं ॥१८६॥
हे कर्म, मी कर्ता । आचरेन या - त्याकरिता । ऐसा अभिमान नको चित्ता । शिवू देऊ ॥१८७॥
तू देहासक्त न व्हावे । सर्व कामनांसी त्यजावे । मग सकळ भोग भोगावे । यथाकाळ ॥१८८॥
आता धनुष्य घेऊनि हातीं । आरूढ होई या रथीं । अंगिकारी वीरवृत्ती । समाधानें ॥१८९॥
जगीं कीर्ती विस्तारून । स्वधर्माचा वाढवी मान । सोडवी दुष्टभारापासून । पृथ्वी ही ॥१९०॥
आता पार्था निःशंक होई । या संग्रामा चित्त देई । येथ यावाचुनी काही । बोलू नये ॥१९१॥
माझे शासन हे नित्य जे निर्मत्सर पाळिती
श्रद्धेने नेणते तेहि तोडिती कर्मबंधने ॥३१॥
हे निःसंदिग्ध माझे मत । जे परमादरें स्वीकारीत । श्रद्धापूर्वक आचरीत । धनुर्धरा; ॥१९२॥
तेही सकळ कर्मे करीत । तरि जाण ते कर्मरहित । म्हणोनि कर्म हे निश्चित । करणीय गा ॥१९३॥
परी मत्सरबुद्धीने जे हे शासन मोडिती
ज्ञानशून्यचि ते मूढ पावले नाश जाण तू ॥३२॥
नातरी देहाधीन होऊनी । इंद्रियांचे लाड करूनी । जे हे माझे मत अव्हेरूनी । टाकुनी देती; ॥१९४॥
जे हे सामान्यसे लेखिती । अनादरं देखिती । वा ही अतिशयोक्ती म्हणती । वाचाळपणे; ॥१९५॥
ते मोहमद्यें भ्रमले । विषयविषें घेरिले । अज्ञानपंकीं बुडले । निःसंशय मान ॥१९६॥
पहा शवाहातीं दिधले । जैसे की रत्न वाया गेले । अथवा जन्मांधा उजाडले । समजेना; ॥१९७॥
अथवा चंद्रम्याचा उदय । कावळ्यां न उपयुक्त होय । तैसा मूर्खांसी काय । रुचेल विवेक? ॥१९८॥
तैसे ते पार्था, । जे विन्मुख या परमार्था । तयांसी संभाषणही सर्वथा । नये करू ॥१९९॥
म्हणोनि ते न मानिती । आणि निंदाही करू लागती । सांग पतंग काय साहती । प्रकाशासी? ॥२००॥
पतंगाचे दीपा आलिंगन । तेथ तया निश्चित मरण । तैसेचि विषयाचरण । आत्मघातकी ॥२०१॥
ज्ञानीहि वागतो त्याच्या स्वभावास धरूनिया
स्वभाव-वश ही भूते बलात्कार निरर्थक ॥३३॥
म्हणोनि शहाण्याने । मौजेने वा कौतुकाने । लाड न पुरवावे कोणे । कधीही इंद्रियांचे ॥२०२॥
सर्पासवे का खेळता येईल? वाघाची संगत का निभेल? । हलाहल विष का पचेल । सेविता सांग? ॥२०३॥
अग्नी लागे सहज खेळता । तो न आवरे भडकता । तैसा इंद्रियांचा लळा लागता । भला नव्हे ॥२०४॥
एरवी तरि पार्था येथ - । या पराधीन शरीरात । का विषयभोग अनुचित । मिसळावे? ॥२०५॥
बहुत सायासें आपण । सकळ समृद्धी ओतून । या देहा रात्रंदिन । प्रतिपाळावे का? ॥२०६॥
सर्वपरी शिणुनी येथ । संपादुनि संपत्तिजात । त्यालागी स्वधर्म त्यजित । काय पोसावे देहा? ॥२०७॥
हा पंचमहाभूतांचा मेळावा जाण । अंतीं पंचत्त्वीं होइल विलीन । त्यावेळी कोठे शोधावा मग शीण । आपुला गा? ॥२०८॥
म्हणूनि केवळ देहपोषण । हे उघड घाता कारण । यास्तव तेथ अंतःकरण । शिरू न द्यावे ॥२०९॥
इंद्रियीं सेविता अर्थ राग द्वेष उभे तिथे
वश होऊ नये त्यांस ते मार्गातील चोरचि ॥३४॥
एरवी इंद्रियांकरिता । हवे ते विषय पुरविता । संतोष होईल चित्ता । साचचि गा ॥२१०॥
परि ती चोरांची संगत । जो अल्पकाळ राही स्वस्थ । नगरसीमा ओलांडीपर्यंत । सावाऐसा ॥२११॥
अगा, बचनाग विषाचे माधुर्य । आरंभी वाटे प्रिय । परि परिणामीं होय । प्राणघातक ॥२१२॥
इंद्रियांठायीची विषयलालसा । लावितसे खोटी आशा । गळा लाविले आमिष माशा । भुलवी जैसे; ॥२१३॥
त्यामाजी आहे गळ । जो प्राणासि घेउन जाईल । हे जैसे न कळे सकळ । झाकलेपणें; ॥२१४॥
तैसे अभिलाषेने होईल । जर विषयलालसा धरिशील । तर पडावे लागेल । क्रोधाग्नीत ॥२१५॥
जैसे पारधी घेरिती । मारण्या संधी हेरिती । बुद्ध्याचि हरिणां आणिती । वळवुनिया; ॥२१६॥
येथ तैसाचि प्रकार आहे । म्हणूनि विषयसंग धरू नये । पार्था, कामक्रोध दोन्ही हे । घातक जाण ॥२१७॥
म्हणूनि विषयेच्छेसी थारा न द्यावा । मनीं आठवही न धरावा । एक हा निजवृत्तीचा ओलावा । नासू न देई ॥२१८॥
उणाहि आपुला धर्म परधर्माहुनी बरा
स्वधर्मात भला म्रुत्यु परधर्म भयंकर ॥३५॥
अगा, स्वधर्म हा आपुला । जरी का कठीण वाटला । तरी तोचि पहा भला । आचरण्यासी ॥२१९॥
आचारधर्म परकीय । देखता खचित लक्षणीय । परि आचरिणार्याने आचरावा । आपुलाचि ॥२२०॥
सांग अधमाघरीं आघवी । पक्कान्ने आहेत बरवी । ती उत्तमें केवी सेवावी । दरिद्री जरि जाहला ? ॥२२१॥
हे अनुचित कैसे करावे? । अप्राप्य केवी इच्छावे? । इच्छिले तरि का घ्यावे? । विचार करी ॥२२२॥
जैसी मनोहर चुनेगच्ची । देखोनि घरे इतरांची । झोपडी आपुली गवताची । मोडावी केवी? ॥२२३॥
हे राहो, पत्नी आपुली । कुरुप जरी असली । तरी संसारीं तीचि भली । ज्यापरी गा; ॥२२४॥
तैसा कितिहि असो दुष्कर । आचरिण्या जरि दुर्धर । तरी स्वधर्मचि सुखकर । परलोकीं ॥२२५॥
अगा, साखर आणि दूध । यांची गोडी तर प्रसिद्ध । परि जंतविकारीं विरुद्ध । द्यावी कैसी? ॥२२६॥
ऐसे असूनी जर सेवील । तर तो दुराग्रह ठरेल । परिणामीं हित न साधेल । धनुर्थरा ॥२२७॥
म्हणोनि इतरां जे विहित । आणि आपणा अनुचित । ते न आचरावे यातचि हित । पुससी जर ॥२२८॥
स्वधर्माचरणा करित । लगले वेचावे जीवित । तरि इहपरलोकात । स्वधर्मचि श्रेष्ठ ॥२२९॥
ऐसे समस्तसुरशिरोमणी । बोलिले जेथ शारंगपाणी । तेथ अर्जुन म्हणे विनवणी । असे देवा ॥२३०॥
जे तुम्ही सांगितले । ते सकळ नीट ऐकिले । आता पुसेन काही वेगळे । मनातले ॥२३१॥
अर्जुन म्हणाला:
मनुष्य करितो पाप कोणाच्या प्रेरणोमुळे
आपुली नसता इच्छा वेठीस धरिला जसा ॥३६॥
देवा, ऐसे कैसे होते । ज्ञानियांचीही स्थिति भ्रष्टते । मार्ग सोडुनी भरकटती ते । भलत्याचि वाटेने ॥२३२॥
सर्वज्ञही जे असती । हे उपायही जाणिती; । तेही परधर्में भ्रष्ट होती । काय कारणें? ॥२३३॥
धान्य आणि भुसा । अंधा न निवडता ये जैसा । क्षणभर तैसेचि डोळसा । व्हावे काय? ॥२३४॥
जे असता संग सोडित । तेचि पुन्हा संसारसंगीं अतृप्त वनवासीही परतुनि येत । जनराहाटीत ॥२३५॥
आपण तर लपती । सर्वस्वें पाप चुकविती । परि बळात्कारें गुंतती । त्याचिमाजी ॥२३६॥
जयाची किळस येते । तेचि जिवासि चिकटते । चुकविता घेरी ते । तयासीचि ॥२३७॥
देवा, बळात्कार एक असे । तो कोणाचा आग्रह असे? । हे बोलावे ह्रषीकेशें, । पार्थ म्हणे ॥२३८॥
श्रीभगवान् म्हणाले;
काम हा आणि हा क्रोध घडिता जो रजोगुणें
मोठा खादाड पापिष्ठ तो वैरी जाण तू इथे ॥३७॥
घेई ह्रदयकमळीं विश्राम । जो निष्काम योगियांचा काम । तो म्हणतसे पुरुषोत्तम । सांगतो ऐका ॥२३९॥
हे कामक्रोध पाही समक्ष । ज्यात कृपेचा न लवलेश । हे यमधर्मचि प्रत्यक्ष । मानिले जाती ॥२४०॥
हे ज्ञाननिधीवरचे भुजंग । विषयदरीतिल वाघ । भजनमारेकरी ठग । अती निर्दय ॥२४१॥
हे दगड देहगडाचे । गावकूस इंद्रियग्रामाचे । अविवेकादिक बंड यांचे । जगावरी ॥२४२॥
हे मानसींचे रजोगुण । समूळ आसुरीचि जाण । जयांचे पालनपोषण । अविद्येने केले ॥२४३॥
हे रजोगुणाचे जाहले । तरि तमोगुणा प्रिय भले । तयाने निजपद ह्यांसी दिधले । प्रमाद - मोहरूप ॥२४४॥
यांना मृत्यूचे नगरीं । मानिती श्रेष्ठापरी । हे जीविताचे वैरी । म्हणूनिया ॥२४५॥
ज्या भुकेल्यांचे खाद्यास । या विश्वाचा न पुरे घास । त्या कामक्रोधांचे व्यापारास । वाढवी आशा ॥२४६॥
मुठीत धरिता सहजपणें । अपुरी जिला चौदा भुवने । ती भ्रांति तिची बहीण म्हणे । जिवाभावाची धाकटी ॥२४७॥
जी त्रैलोक्याचे भातुके । खेळता खाय कौतुकें । तिचे दासीपण करित सुखें । जगे तृष्णा ॥२४८॥
असो, मोह यांसि मानितसे । अहंकारासवे देवघेव असे । जग जो चालवीतसे । आपुल्या कर्तृत्वें ॥२४९॥
जयाने सत्याचा कोथळा काढिला । मग दुष्कृत्यांचा पेंढा भरिला । तो दंभ पुढे आणिला । जगीं यांनी ॥२५०॥
साध्वी शांति नागविली । माया चेटकी शृंगारिली । तिचेकरवी विटाळविली । साधुमंडळी यांनी ॥२५१॥
विवेकाची बैठक फेडिली । वैराग्याची साल काढिली । जितेपणीं मान मोडिली । निग्रहाची ॥२५२॥
यांनी संतोषवन खांडिले । धैर्यदुर्ग पाडिले । आनंदरोपटे टाकिले । उपटूनिया ॥२५३॥
बोधाची रोपे उखडिली । सुखाची लिपी पुसली । जिव्हारीं आग ओतिली । तापत्रयाची ॥२५४॥
हे देहासवेचि घडले । जिवासि असती भिडले । परि न गवसत, जरि शोधिले । ब्रह्यादिकांनी ॥२५५॥
हे चैतन्याचे शेजारासी । बैसती ज्ञानाचे पंक्तीसी । म्हणोनि उसळत्या महाघातासी । आवरतीना ॥२५६॥
हे जळाविण बुडविती । आगीविण जाळिती । न बोलता कवळिती । प्राणियांसी ॥२५७॥
हे शस्त्राविण मारिती । दोराविण बांधिती । ज्ञानियांसी तर वधिती । पैजेवरी ॥२५८॥
हे चिखलाविण रोविती । जाळ्याविण गोविती । कोणा आटोक्यात न येती । इतुके आत ॥२५९॥
धुराने झाकिला अग्नि धुळीने आरसा जसा
वारेने वेष्टिला गर्भ कामाने ज्ञान हे तसे ॥३८॥
शोधूनि चंदनाची मुळी । जैसी साप घाली वेटोळी । अथवा गर्भाशयाची खोळी । वेढी गर्भा; ॥२६०॥
प्रभेविण सूर्य जैसा । वा अग्नि धुराविण सहसा । अथवा मळाविना आरसा । कधीचि नसे; ॥२६१॥
तैसे कामक्रोधाविण एकले । आम्ही ज्ञान नाही देखिले । जैसे कोंडयाने लपेटले । बीज निपजे; ॥२६२॥
कामरूप महाअग्नि नव्हे तृप्त कधीचि जो
जाणत्याचा सदा वैरी त्याने हे ज्ञान झाकिले ॥३९॥
तैसे ज्ञान तर शुद्ध । परि झाकिती हे कामक्रोध । म्हणोनि हे अगाध । होऊनि राहिले ॥२६३॥
आधी ह्यांसि जिंकावे । मग ते ज्ञान संपादावे । परि पराभव न संभवे । रागद्वेषांचा ॥२६४॥
यांचे विनाशाकारण । अंगीं जे आणावे अवसान । ते अग्नीसी जैसे इंधन । तैसे होय साहाय्यक ॥२६५॥
घेऊनि आसर्यासाठी इंद्रिये मन बुद्धि तो
मोह पाडी मनुष्याते त्याच्या ज्ञाना गुंडुनी ॥४०॥
ऐसे जे जे करावे उपाय । तयांचे यांनाचि होय साहाय्य । म्हणोनि हठयोग्यांसीही अजिंक्य । जगीं हेचि ॥२६६॥
ऐशाही महासंकटाला । एक उपाय आहे भला । तो पहा जर साधला । सांगतो तुज ॥२६७॥
म्हणूनि पहिला थार इंद्रिये तीचि जिंकुनी
टाळी पाप्यास जो नाशी ज्ञान विज्ञान सर्वहि ॥४१॥
इंद्रिये यांचे मूळ स्थान । कर्मप्रवृत्ती प्रसवे तेथून । आधी इंद्रियां टाकी निर्दळून । सर्वथैव ॥२६८॥
इंद्रिये बोलिली थोर मन त्यांहूनि थोर ते
बुद्धि थोर मनाहूनि थोर तीहूनि तो प्रभु ॥४२॥
मग मनाची धाव खुंटेल । आणि बुद्धीची सुटका होईल । थाराचि नाहीसा होईल । एवढयानेही पापांचा ॥२६९॥
असा तो प्रभु जाणूनि आवरी आप आपणा
संहारी काम हा वैरी तू गाठूनि परोपरी ॥४३॥
हे अंतरातुनि हुसकले । तर निःसंशय नष्ट जाहले । सूर्यकिरणाविण कोठले । मृगजळ जाण? ॥२७०॥
तैसे राग द्वेष जर निमाले । तर ब्रह्मरूप स्वराज्य आले । मग तो भोगी सुख आपुले - । आपणचि ॥२७१॥
ही गुरुशिष्यांची गोष्ट । जिवाशिवाची गाठ । कोणेकाळी न उठता नीट । तेथेचि स्थिर होई ॥२७२॥
संजय म्हणे, सकळ सिद्धांचा राजेश्वर । लक्ष्मीपती परमेश्वर । धृतराष्टा, ऐक देवदेवेश्वर । बोलता जाहला ॥२७३॥
आता पुनरपि तो मधुसूदन । गोष्ट के प्राचीन - । सांगेल तेथ अर्जुन । करील प्रश्न ॥२७४॥
त्या कथेची योग्यता । निरुपम रसाळता । श्रोत्यां सुकाळ होईल आता । श्रवनसुखाचा ॥२७५॥
ज्ञानदेव म्हणे निवृत्तिदास । फुटो बुद्धीसी उन्मेष । श्रीकृष्णार्जुन संवादास । बोगावेमग ॥२७६॥