आज भाग्योदय श्रवणेंद्रियांचा । लाभला हा ठेवा गीतेचा । जैसा भासचि स्वप्नांचा । खरा व्हावा ॥१॥
आधीचि विवेकाची कथा । त्यात जगदीश्वर कृष्ण वक्ता । भक्तरांज अर्जुन श्रोता । परिसत असे ॥२॥
पंचमालाप आणि सुगंध । परिमळ आणि सुस्वाद । तैसा भला जाहला आनंद । कथेचा या ॥३॥
कैसी अपूर्वाई दैवाची । ही गंगा लाभली अमृताची । की जपतपे श्रोत्यांची । फळा आली ॥४॥
आता इंद्रियजात आघवे । श्रवणेंद्रियांठायी वसावे । मग संवादसुख भोगावे । गीतानामक ॥५॥
“ अप्रासंगिक पाल्हाळ आता । सोडुनी सांग ती कथा । जी कृष्णार्जुन उभयता । बोलत होते” ॥६॥
त्यावेळी संजय धृतराष्ट्रा म्हणे । अर्जुन अधिष्ठिला दैवगुणें । नारायण अति प्रेमाने । बोले तयाशी ॥७॥
जे न कथिले वसुदेवपित्यासी । जे न वदले देवकीमातेसी । जे न बोलिले बलरामबंधूसी । ते गुपित अर्जुना सांगे ॥८॥
देवी लक्ष्मीची एवढी जवळीक । तीही न देखे या प्रेमाचे सुख । कृष्णस्नेहाचे फळ देख । यालाचि आज ॥९॥
सनकादिक राजांच्या आशा । वाढल्या होत्या बहुतशा । परि त्याहि एवढया यशा । नच पावल्या ॥१०॥
जगदीश्वरांचे प्रेम । येथ दिसतसे निरूपम । कैसे पार्थें या सर्वोत्तम । पुण्य केले ॥११॥
पहा याचे प्रेमाकरिता । साकारिली अमूर्तता । मज यांची एकरूपता । आवडे बहुत ॥१२॥
एरवी हा योगियांही न उकले । वेदार्थाही न आकळे । जेथ ध्यानाचेही डोले । पावती ना ॥१३॥
ते हा निजस्वरूप । अनादि निष्कंप । किती अर्जुनास्तव सकृप । जाहला आहे ॥१४॥
हा त्रौलोक्यपटाची घडी खरोखर । आकारातीत निराकार । अर्जुनाचिये प्रेमें अपार - । स्वाधीन जाहला ॥१५॥
श्रीभगवान् म्हणाले:
योग हा अविनाशी मी स्वयें सूर्यास बोलिलो
मनूस बोलिला सूर्य तो इक्ष्वाकूस त्यापरी ॥१॥
मग देव म्हणे अर्जुनासी । हाचि योग आम्ही सूर्यासी - । कथिला, परि त्या गोष्टीसी । बहुत काळ लोटला ॥१६॥
मग सूर्याने विवस्वान । योगस्थिती संपूर्ण । कथिली उलगडून । मनूप्रती ॥१७॥
मनूने आपण आचरिली । पुत्र इक्ष्वाकूसी उपदेशिली । ऐसी परंपरा वर्णिली । पूर्वापार ॥१८॥
अशा परंपरेतूनि हा राजर्षीस लाभला
पुढे काळबळाने तो ह्या लोकीं योग लोपला ॥२॥
आणिकही या योगासी । जाणते जाहले राजर्षी । परि आता स्थिति ऐसी । या जाणी न कोणी ॥१९॥
प्राण्यांचा वासनेवरी भर । देहाचाचि करिती आदर । म्हणोनि पडला विसर । आत्मबोधाचा ॥२०॥
आडवाटे गेली अस्थाबुद्धी । विषयसुखचि परमावधी । देहादिक उपाधी । आवडे लोकां ॥२१॥
दिगंबरांचे गावी भले । काय करावे शालूशेले? । सांगू, जन्मांधा काय वेगळे । सूर्यामुळे? ॥२२॥
वा बहिर्यांचे सभास्थानीं । गीताते कोण मानी? । की उपजे कोल्ह्याचे मनीं । चांदण्याचे प्रेम? ॥२३॥
अगा, चंद्रोदयाचे वेळे । जयांचे फुटती डोळे । चंद्रा कैसे ते कावळे । ओळखतील? ॥२४॥
तैसे बैराग्याची शीव न देखती । विवेकाची भाषा न जाणती । त्या मूर्खां कैसी प्राप्ती । मज ईश्वराची? ॥२५॥
कैसा न जाणे मोह वाढला । तेणें बहुत काळ व्यर्थ गेला । म्हणोनि योग हा लोपला । लोकीं या; ॥२६॥
तोचि हा बोलिलो आज तुज योग पुरातन
जीवींचे गूज हे थोर तूहि भक्त सखा तसा ॥३॥
तोचि हा योग आता । तुजप्रती कुंतीसुता । कथिला आम्ही तत्त्वता । शंका न धरी ॥२७॥
हे जीवींचे माझिया गुज । परि कैसे न सांगू तुज? । लाडला इतुका तू मज । म्हणूनिया ॥२८॥
तू प्रेमाचा पुतळा । भक्तीचा जिव्हाळा करावी तुजसी? । जरि येथ सज्ज युद्धासी । जाहलो आम्ही ॥३०॥
क्षणैक हे दुरी सारवे । या काहुराचे मनीं न धरावे । परि तुझे अजाणपण घालवावे - । लागे आधी ॥३१॥
अर्जुन म्हणाला:
ह्या काळचा तुझा जन्म सूर्याचा तो पुरातन
तू बोलिलास आरंभी हे मी जाणू कसे बरे ॥४॥
अर्जुन म्हणे, श्रीहरिराय, । अपल्यावरि प्रेम करी माय । यात नवल ते काय? । कृपानिधी तू ॥३२॥
तू संसारश्रांतांसी साउली । अनाथ जीवांसी माउली । आम्हां जन्मासी घाली । तुझीच कृपा ॥३३॥
देवा, पांगळे जन्मा घालावे । तर जन्मापासुनि जंजाळ सोसावे । हे तुझे काय बोलावे । तुजचिपुढे? ॥३४॥
आता पुसेन जे काही । तेथ नीट चित्त देई । देवें कोपू नाही । गोष्टीसि एका ॥३५॥
तर मागील जी कथा । तुवा सांगितली अनंता । ती क्षणभर माझे चित्ता । पटेचिना ॥३६॥
तो विवस्वान म्हणजे कोण की । वाडवडिलांहि न ठाउकी । तर तूचि कैसा म्हणसी की । उपदेश केला ॥३७॥
ऐकिले तो पुरातनकाळिचा । कृष्णा, तू तर आजचा । म्हणोनि या गोष्टीचा । विसंवाद वाटे ॥३८॥
देवा तुझिया लीला तशातुनी । आम्हा येईनात उमजुनी । लटिके तरि कैसे म्हणुनी । म्हणावे एकाएकी? ॥३९॥
तर हीचि गोष्ट आघवी । मज समजेलशी सांगावी । की तूचि सूर्यासी केवी । उपदेश केला? ॥४०॥
श्रीभगवान् म्हनाले:
माझे अनेक ह्यापूर्वी झाले जन्म तसे तुझे
जाणतो सगळे मी ते अर्जुना तू न जाणसी ॥५॥
कृष्ण म्हणे, पांडुसुता । तो विवस्वान जेव्हा होता । तेव्हा आम्ही नव्हतो, ऐसी चित्ता । शंका जरि तव; ॥४१॥
तरि तू गा अज्ञानात । तुमचे अमुचे जन्म बहुत । होऊनि गेले, नच स्मरत । तुजला ते ॥४२॥
मी ज्या ज्या अवसरें । जे जे होऊनि अवतरे । ते समस्तही मज स्मरे । धनुर्धरा, ॥४३॥
असूनिहि अजन्मा मी निर्विकार जगत् - प्रभु
माझी प्रकृति वेढूनि मायेने जन्मतो जणु ॥६॥
म्हणोनि हे आघवे । मागील मज आठवे । मी अजन्मा, परि संभवे । मायायोगें ॥४४॥
अविनाशित्व माझे न नाशे । परि होणे जाणे एक दिसे । ते प्रतिबिंबे मायावशें । माझेचि ठायी ॥४५॥
माझी स्वतंत्रता न भंगते । कर्माधीन मी भासे येथे । तेही अज्ञानबुद्धिने घडते । एरवी नाही ॥४६॥
एकचि असूनि दिसे दुसरे । ते केवळ दर्पणाचेचि आधारें । वास्तविक सारासार विचारें । काय दुजे आहे? ॥४७॥
तैसा अर्जुना मी अमूर्त । परि प्रकृतीसी अंगिकारीत । तेव्हा सगुन रूपें नटत । कार्यालागी ॥४८॥
गळूनि जातसे धर्म ज्या ज्या वेळेस अर्जुना
अधर्म उठतो भारी तेव्हा मी जन्म घेतसे ॥७॥
कारण धर्मजात आघवे । युगानुयुगे मी रक्षावे । ऐसा ओघ हा स्वभावें । आद्य असे ॥४९॥
म्हणोनि अजन्मत्व दुरी ठेवी । मी अव्यक्तपणही नच आठवी । ज्यावेळी धर्मासी नाशवी । अधर्म हा ॥५०॥
राखावया जगीं संतां दुष्टां दूर करावया
स्थापावया पुन्हा धर्म जन्मतो मी युगीं युगीं ॥८॥
त्यावेळीं आपुल्यांचे कैवारें । मी साकार होउनि अवतरे । मग अज्ञानाचे अंधारे । गिळूनि टाकी ॥५१॥
अधर्माची हद्द तोडी । दोषांच्या सनदा फाडी । सज्जनांकरवी गुढी । सुखाची उभारी ॥५२॥
दैत्यकुळे विनाशत । साधूंचा मान उजळित । नीतीची धर्मासंगत । गाठ घाली ॥५३॥
मी अविवेकाची काजळी - । फेडुनि, विवेकदीप उजळी । तेव्हा योगीजनां उदये दिवाळी । निरंतर ॥५४॥
आत्मसुखें विश्व कोंदे । धर्मचि जगीं नांदे । भक्तां निघती दोंदे । सात्त्विकतेची ॥५५॥
पापांचा पर्वत फिटे । पुण्याचे तांबड फुटे । जेव्हा मूर्ति माझी प्रगटे । पंडुकुमरा ॥५६॥
ऐशा या कार्यालागी । अवतरे मी युगीं युगीं । हे ओळखे जो जगीं । तो विवेकी ॥५७॥
जन्मकर्मे अशी दिव्य जो माझी नीट ओळखे
देह गेल्या पुन्हा जन्म न पावे भेटुनी मज ॥९॥
जन्मरहित माझे जगणे । अक्रियपणें कर्म करणे । हे अलिप्तत्व जो जाणे । तो परममुक्त ॥५८॥
देहासंगे चाले, परि न हाले । देहींचा, परि देहा न आकळे । मग पंचत्वीं तो मिळे । माझेचि रूपीं ॥५९॥
नाही तृष्णा भय क्रोध माझ्या सेवेत तन्मय
झाले ज्ञानतपें चोख अनेक मज पावले ॥१०॥
आपपरांचा शोक न करिती । जे कामनाशून्य होती । केव्हाही वाटे न जाती । क्रोधाचिये ॥६०॥
जे मजयोगें संपन्न असती । माझिये सेवेस्तव जगती । आणि आत्मबोधें संतोषती । विरागी जे; ॥६१॥
जे तपतेजाचिया राशी । एकमेव स्थान ज्ञानासी । पवित्रता तीर्थांसी । तीर्थरूप; ॥६२॥
सहजी तद्रूप होती । ते मीचि होऊनि राहती । भिन्नभाव नुरती । ना आडपडदा; ॥६३॥
पितळेची कळकट झाक । जर पूर्ण नाहीशी देख । तर सुवर्ण काय आणिक । शोधू जावे? ॥६४॥
तैसे जमनियमीं तावले । तपज्ञानें चोखाळले । मी तेचि ते जाहले । यात संशय कायसा? ॥६५॥
भजती मज जे जैसे भजे तैसाचि त्यांस मी
माझ्या मार्गास हे येती लोक कोणीकडूनिही ॥११॥
एरवी तरी पाही । जे जैसे भजती माझेठायी । अगा, तयां मीही । तैसाचि भजे ॥६६॥
पहा मनुष्यजात सकळ । स्वभावत: भजनशील । जाहले असे केवळ । माझेचि ठायी ॥६७॥
परि ज्ञानाविण सारे । बिघडत । तयांचा बुद्धिभेद होत । माझेठायी कल्पितात । अनेकत्व ॥६८॥
म्हणोनि अभेदीं भेद देखती । या अनामिका नावे देती । देव देवी म्हणती । चर्चातीता मज ॥६९॥
जे सर्वत्र सदा सम । तेथ मानिती अधम-उत्तम । मतिवशें संभ्रम । पावताती ॥७०॥
जे कर्मासिद्धि वांछूनि यजिती येथ दैवते
मनुष्यलोकीं कर्माचे पावती फळ शीघ्र ते ॥१२॥
मग नाना हेतु मनीं धरूनी । यथोचित उपचारांनी । देवता अनेक मानुनी । उपासिती ॥७१॥
तेथ जे जे अपेक्षित । ते तेचि पावती समस्त । परि ते कर्मफळ निश्चित । ओळख तू ॥७२॥
कार्माविण देते घेते आणिक । निश्चित नाही परिपूर्ण देख । येथ कर्मचि फलसूचक । मनुष्यलोकीं ॥७३॥
जैसे क्षेत्रीं जे पेरावे । त्याहुनि अन्य न उगवे । वा पहावे तेचि दिसावे । दर्पणाधारें; ॥७४॥
अथवा डोंगरकडयाखालती । आपुलेचि बोल उमटती । पडसाद होऊनि उठती । निमित्तयोगें ॥७५॥
तैसे समस्त या भजना । मी साक्षी केवळ अर्जुना । येथ फलद्रूप होय भावना । आपुलाली ॥७६॥
निर्मिले वर्ण मी चारी गुण-कर्मे विभागुनी
करूनि सर्व हे जाण अकर्ता निर्विकार मी ॥१३॥
याचिपरीं मी आता । हे चारी वर्ण पार्था । सृजिले आहेत सर्वथा । गुणकर्मानुरोधें ॥७७॥
प्रकृतिधर्माआधार । गुणव्यवहार - विचार । कर्मे तदनुसार । आयोजिली ॥७८॥
हे सर्व लोक एकचि असुनी । गुण - कर्मांचा विचार करुनी । चार वर्णीं विभागणी । सहजी केली ॥७९॥
गुणकर्मनुसार पार्था । ही वर्णभेदव्यवस्था; । मी कर्ता नव्हे सर्वथा । याचिलागी ॥८०॥
कर्मे न बांधिती माते फळीं इच्छा नसे मज
माझे स्वरूप हे जाणे तो कर्मातहि मोकळा ॥१४॥
हे मजपासोनि जाहले । परि मी नाही केले । हे जयाने जाणिले । तो सुटला गा ॥८१॥
केली कर्मे मुमुक्षूंनी पूर्वी हे तत्त्व जाणुनी
तैसी तूहि करी कर्मे त्यांचा घेऊनि तो धडा ॥१५॥
मुमुक्षु जे होऊनि गेले । तयांनी ऐशा मज जाणिले । आणि समस्त कर्माचरण केले । धनुर्धरा ॥८२॥
परि बीजे जैसी भाजलेली । उगवती ना जरि पेरिली । तैसी कर्मेचि, परि जाहली । मोक्षालागी तया ॥८३॥
आणिक एक खरोखर । हा कर्माकर्म विचार । आपुल्या इच्छेनुसार । बुद्धिमंतांहि अवघड ॥८४॥
नेणती जाणते तेहि काय कर्म अकर्म हे
तुज हे सांगतो कर्म जाणूनि सुटशील जे ॥१६॥
कर्म म्हणती ते कोणते । अकर्माचे लक्षण काय ते । या विचारें विचक्षणहि जाणते । गोंधळुनी जात ॥८५॥
वा जैसे नाणे खोटे । हुबेहुब खरे वाटे । डोळसाचेहि दृष्टीसि भेटे । आणि संशयीं घाली; ॥८६॥
तैसे नैष्कर्म्यतेचे भ्रमात । कर्मपाशीं गुंतत । प्रतिसृष्टीही जे उभवू शकत । मनोसंकल्पें ॥८७॥
मग मूर्खांची काय कथा । भले क्रांतदर्शी फसता । म्हणोनि तेचि आता । सांगेन तुज ॥८८॥
सामान्य कर्म जाणावे विकर्महि विशेष जे
अकर्म तेहि जाणावे कर्माचे तत्त्व खोल हे ॥१७॥
कर्म म्हणजे स्वाभाविक ते । जेणे विश्व आपसुक साकारते । ते आधी जाणावे लागते । यथार्थ येथ ॥८९॥
मग वर्णाश्रमासी उचित । जे विशेष कर्म विहित । तेही ओळखावे निश्चित । उपयोगासह ॥९०॥
निषिद्ध म्हणती जयासी । जाणावे तयाचेहि स्वरूपासी । मग गुंतेना तो कर्मपाशीं । स्वाभाविकचि ॥९१॥
एरवी जग हे कर्माधीन । ऐसी याची व्याप्ती गहन । परि ते असो, ऐक लक्षण । कृतकृत्याचे ॥९२॥
कर्मीं अकर्म जो पाहे अकर्मीं कर्म जो तसे
तो बुद्धिमंत लोकात तो योगी कृतकृत्य तो ॥१८॥
जो सकळ कर्मे आचरिता । देखे आपुलीं नैष्कर्म्यता । कर्मासंगे न धरिता । फलाशेसी ॥९३॥
केवळ कर्तव्यबुद्धी अवघी । जया दुसरे नाही जगीं । नैष्कर्म्यता तयाचे अंगीं । मुरलेली असे ॥९४॥
परि कर्मसमूह आघवा । आचरीत दिसे बरवा । तर तो याचि चिन्हीं जाणावा । ज्ञानी म्हणोनि ॥९५॥
जैसा का जळाशी उभा ठाके । स्वतासी जळामाजी देखे । तरि तो निःसंशय ओळखे । की मी जळावेगळा आहे; ॥९६॥
अथवा नावेतुनी जो निघे । काठची झाडे जाता देखे वेगें । तो साचपणे पाहू लागे । मग झाडे म्हणे अचल; ॥९७॥
तैसे सर्व कर्मीं असणे । ते मानूनि आभासवाणे । मग स्वतासि जो जाणे । कर्मरहित; ॥९८॥
आणि उदय-अस्ताचे प्रमाणाने । जैसे न चालता सुर्याचे चालणे । तैसे तो नैष्कर्म्यत्व जाणे । कर्मींचि असता ॥९९॥
तो मनुष्यासारिखा दिसे । परि सामान्य मनुष्यत्व तया नसे । जळीं न बुडे जैसे । सूर्यबिंब ॥१००॥
तयाने न पाहता विश्व पाहिले । न करिता सर्व केले । न भोगिता भोगिले । भोग्यजात ॥१०१॥
एकेचि ठायी बैसला । परि सर्वत्र तोचि गेला । हे असो, विश्व जाहला । स्वयेंचि तो ॥१०२॥
उद्योग करितो सारे कामसंकल्प सोडुनी
ज्ञानाने जाळिली कर्मे म्हणती त्यास पंडित ॥१९॥
ज्या पुरुषाचे ठायी । कार्माविषयी अनास्था नाही । परि फलाशा कधीही । शिवेना मना; ॥१०३॥
आणि हे कर्म मी करीन । वा आरंभिले सिद्धीसि नेईन । ऐशा संकल्पेंहि जयाचे मन । विटाळेना; ॥१०४॥
तो ज्ञानरूप अग्नींत । सर्व कर्मांची आहुति देत । तो ब्रह्यचि मनुष्यवेषात । ओळख तू ॥१०५॥
नित्यतृप्त निराधार न राखे फलवासना
गेला गढूनि कर्मात तरी काही करीचिना ॥२०॥
जो देहाविषयीं उदास । फळभोगीं नसे आस । सदोदित उल्हास । होऊनि असे ॥१०६॥
संतोषगाभार्यात, अर्जुना, - । जो आत्मबोधाच्या पक्वान्ना । पुरे मुळी म्हणेचिना । सेवितांना; ॥१०७॥
संयमी सोडुनी सर्व इच्छेसह परिग्रह
शरीरेंचि करी कर्म दोष त्यास न लागतो ॥२१॥
मिळे तेचि करी गोड न जाणे द्वंद्व मत्सर
फळो जळो जया एक करूनिहि न बांधिला ॥२२॥
कैसी अधिकाधिक आवडीन पाही । महासुखाची गोडी घेई । आशेची कुरवंडी ठायी ठायी - । करी अहंभावसह ॥१०८॥
म्हणोनि वेळेसि जे पावे । तेणेचि तो सुखावे । जया आपुले - परके न ठावे । कोण्याही काळीं ॥१०९॥
तो दिठीने जे पाही । ते स्वयेंचि होऊन राही । आणि ऐके तेही । जाहला तोचि ॥११०॥
चरणीं जे चालणे । मुखें जे बोलणे । ऐसे व्यवहार जितुके जाणे । तो स्वयेंचि होत; ॥१११॥
हे असो, अवघे विश्व ऐसे । स्वतःहुनि जया वेगळे नसे । आता कवण ते कैसे । बाधक तया? ॥११२॥
हा मत्सर होय निर्माण । ते नुरेचि जया दुजेपण । तो निर्मत्सर म्हणून - । शब्दांनी काय सांगावे ? ॥११३॥
म्हणोनि सर्वपरी तो मुक्त । कर्म करिताहि कर्मरहित । सगुण परी गुणातीत । यात संदेह नाही ॥११४॥
ज्ञानात बैसली वृत्ति संग सोडूनि मोकळा
यथार्थ करितो कर्म जाय सर्व जिरूनि ते ॥२३॥
तो असे देहधारी । दिसे चैतन्याऐसा परी । परब्रह्माचे कसासि उतर वरी । चोख भला ॥११५॥
ऐसा कौतुकें जरी । यज्ञादिक कर्मे करी । तरि ती लय पावत सारी । तयाचेचि ठायी ॥११६॥
अकाळींची अभ्रे जैशी । जोमाविण आकाशीं । विरती आली तैसी । आपोआप ॥११७॥
तैसी यज्ञयागादि कर्म विहित । जरित आचरे तो समस्त । तरि तयाचेचि ऐक्यभावात । एकरूप ती होती ॥११८॥
ब्रह्मात होमिले ब्रह्म ब्रह्माने ब्रह्म लक्षुनी
ब्रह्मीं मिसळले कर्म तेव्हा ब्रह्यचि पावला ॥२४॥
हे हवन मी कर्ता । की या यज्ञीं हा भोक्ता । ऐसी बुद्धीसी न निन्नता । म्हणूनिया ॥११९॥
जे इष्ट यज्ञा करावे । हविर्मांत्रादि आघवे । ते देखतसे ब्रह्मभावें आत्मपबुद्धीन ॥१२०॥
म्हणोनि ब्रह्म तेचि कर्म होय । ऐसे बोधा आले जया साम्य । तया कर्तव्यकर्म ते नैष्कर्म्य । धनुर्धरा ॥१२१॥
आता विवेकरूप कुमारत्वा मुकले । जयासी विरक्तीचे पाणि ग्रहण जाहणे । मग जयांनी अनुष्ठिले । योगरूप अग्निहोत्र; ॥१२२॥
देवताराधनें यज्ञ योगी कोणी अनुष्ठिती
ब्रह्माग्नीत तसे कोणी यज्ञें यज्ञत्व जाळिती ॥२५॥
जे योगयज्ञीं अहर्निश । अविद्येची आहुति देत अशेष । अग्नी जणु गुरुपदेश । त्यात हवान करिती ॥१२३॥
योगाग्निहोत्रीं यज्ञा करिती । तया दैवयज्ञ म्हणती । जेणे आत्मसुख इच्छिती । धनुर्धरा ॥१२४॥
दैवयोगें देहाचे पालन । ऐसा ज्याचा निश्चय पूर्ण । जो चिंतीना देहभरण । तो जाण महायोगी ॥१२५॥
आता अवधारी, सांगेन आणिक । जे ब्रह्मरूप अग्नीचे उपासक । ते यज्ञेंचि यज्ञ देख । उपासिती ॥१२६॥
श्रोत्रादि इंद्रिये कोणी संयमाग्नीत होमिती
कोणी विषय शब्दादि इंद्रियाग्नी अर्पिती ॥२६॥
कोणा आत्मसंयमनचि अग्निहोत्र । काया-वाचा-मननियमन हे मंत्र । इंद्रियद्रव्यांची पवित्र । आहुति देत ॥१२७॥
कोणास्तव प्रगटे वैराग्यसूर्य । संयमचि अग्निकुंड होय । मग सिद्ध करिती अवश्य । इंद्रियाग्नी तेथ ॥१२८॥
विरक्तीची ज्वाला चेतून । पेटे विकारांचे इंधन । आशेचा धूर जाय सोडून । पंचेंद्रियकुंडासी ॥१२९॥
मग वेदोक्त विधिघोषात । इंद्रियाग्निकुंडात । उदंड विषयाहुति देत । यज्ञा करिती ॥१३०॥
प्राणेंद्रिय - क्रिया कोणी सर्व होमूनि टाकिती
चिंतनाने समाधीस अंतरीं चेतवूनिया ॥२७॥
कोणी पार्था ऐशापरी । दोष क्षाळिती सर्वपरी । कोणी घासण्या ह्रदय्काष्ठावरी । चूड करिती विवेकाची ॥१३१॥
ती शांतीने बळकट धरिती । धैर्याचा नेट लाविती । आणि गुरूपदेशें घासती । कसूनिया ॥१३२॥
घासती ऐसे समरसुनी । की ते फळा येई झणी । आणि तेथ तो ज्ञानग्नी । प्रकट होत ॥१३३॥
ऋद्धिसिद्धिचा संभ्रम । तो धूर गेला प्रथम । मग प्रकटला सूक्ष्म । स्फुल्लिंग ज्ञानाचा ॥१३४॥
यमदमें आयते वाळवून । हलके जाहले मन । तेचि घातले पेटवण । ज्ञानाग्नीसी ॥१३५॥
तयाच्या ज्वाळा उसळत । समिधा नाना वासनांच्या तेथ । मोहरूप तुपासहित । जाळियेल्या ॥१३६॥
‘ सोऽहं’ मंत्राने तेथ । जीवरूप दीक्षित । इंद्रियकर्मांच्या आहुति देत । ज्ञानाग्नीत प्रदीप्त ॥१३७॥
मग प्राणक्रियेचे पात्र घेत । पूर्णाहुति पडे अग्नीत । सहजचि अवभृतस्नान घडत । ऐक्यबोधाचे ॥१३८॥
संयमाग्नीचा शेष हविर्भाग । तेचि आत्मज्ञनसुख यथासांग । तोचि यज्ञावशेष मग । सेविती ते ॥१३९॥
कोणी ऐशा या यजनीं । मुख्त जाहले त्रिभुवनीं । यज्ञक्रिया भिन्न असुनी । प्राप्य ते एकचि ॥१४०॥
द्रव्यें जपें तपें योगें चिंतनें वा अशापरी
संयमी ययिती यज्ञ व्रते प्रखर राखुनी ॥२८॥
काहींसी द्रव्ययज्ञ म्हणती । काही तपसामुग्रीने होती । किति एक योगयज्ञही असती । सांगितले ॥१४१॥
शब्दांनी शब्दांनी होम ज्यात । तया वागयज्ञ म्हणत । ज्ञानें ब्रह्यज्ञान होत । तो ज्ञनयज्ञ ॥१४२॥
हे सर्व यज्ञ बिकट असती । अनुष्ठिण्या दुर्घट अती । परि इतेंद्रियांसी घडती । योग्यतेऐसे ॥१४३॥
तेथ ते भले प्रवीण । योगसमृद्धीसंपन्न । म्हणोनि आत्म्याठायी हवन । करिती जिवाचे ॥१४४॥
होमिती एकमेकात कोणी प्राण अपान ते
रोधूनि गति दोहोंची प्राणायामास साधिती ॥२९॥
मग अपानाग्नीचे मुखात । प्राणद्रव्याची आहुति देत । हवन कोणी करितात । अभ्यासयोगें ॥१४५॥
कोणी प्राणाठायी अपान अर्पिती । कोणी दोहोंसही रोधिती । तयां प्राणायामी म्हणती । पंडुकुमरा ॥१४६॥
प्राणात होमिती प्राण कोणी आहार तोडुनी
यज्ञवेत्तेचि हे सारे यज्ञाने दोष जाळिती ॥३०॥
कोणी हठयोग आचरीत । आहार करुनी संयमित । प्राणाचे प्राणवायूत । यत्नें हवन करिती ॥१४७॥
ऐसे मोक्षेच्छु सकळ । समस्त हे यज्ञशील । जयांनी यज्ञद्वारा मनोमळ । प्रक्षाळिले ॥१४८॥
अज्ञानजात ऐसे जाळिता । सहजी निजस्वरूप उरता । अग्नी आणि यज्ञकर्ता । द्वैतभाव यांत उरेचिना ॥१४९॥
जेथ यज्ञकर्त्याच्या इच्छा पुरती । आणि यज्ञक्रिया सरती । माघारी फिरुनि जेथ ओसरती । सर्व कर्मे; ॥१५०॥
विचारा जेथ न शिरकाव । तर्का जेथ न वाव । द्वैतदोषाचे न नाव । अलिप्तचि तयापासुनी ॥१५१॥
यज्ञशेषामृतें धाले पावले ब्रह्म शाश्वत
न यज्ञाविण हा लोक कोठूनि परलोक तो ॥३१॥
ऐसे अनादिसिद्ध अवीट । जे ज्ञान यज्ञावशिष्ट । ते सेविती ब्रह्मनिष्ठ । मी ब्रह्म या मंत्रें ॥१५२॥
यज्ञशेष अमृतें होउनि तृप्त । अमरत्व जयां होय प्राप्त । म्हणोनि ब्रह्मत्व ते पावत । अनायासे ॥१५३॥
जयां विरक्ती माळ घालीना । संयमाग्नीची सेवा घडेना । हातूनि योगयाग साधेना । जन्मले असताही ॥१५४॥
जयांचे धड नाही ऐहिक । तयांचे काय पुससी पारलौकिक । म्हणोनि व्यर्थ किती सांगु आणिक । पंडुकुमरा ॥१५५॥
विशेष बोलिले वेदें असे यज्ञ अनेक हे
कर्माने घडिले जाण जाणूनि सुटशील तू ॥३२॥
ऐसे बहुतपरींचे अनेक । कथिले तुज यज्ञयाग एकेक । ते वेदातचि विस्तारपूर्वक । आहेत वर्णिले ॥१५६॥
कर्तव्य काय त्या विस्ताराशी? । यज्ञाचा उगम कर्माशी । एवढे जरी जाणिलेसी । कर्मबंध ना बाधेल ॥१५७॥
द्रव्ययज्ञांदिकांहूनि ज्ञानयज्ञचि थोर तो
पावती सगळी कर्मे अंतीं ज्ञानात पूर्णता ॥३३॥
अर्जुना वेद जयांचे मूळ । क्रियांचा व्याप जेथ पुष्कळ । ज्यापासोनि अपूर्वसे फळ । स्वर्गसुखाचे; ॥१५८॥
ते द्रव्यादि यज्ञ भले असोत । परि ज्ञानयज्ञाची सर न पावत । तार्यांचे तेज फिके पडत । सूर्यापुढे जैसे ॥१५९॥
पहा परमात्मसुखनिधान । लाभावया योगीजन । जे न विसंबिती ज्ञानांजन । बुद्धिनेत्रीं ॥१६०॥
आरंभिल्या कर्माचे फलस्थान । कर्मातीत ज्ञानाची खाण । जे साधकांचे समाधान । भुकेलेल्या; ॥१६१॥
जेथ प्रवृत्ति पांगळी जाहली । तर्काची दृष्टी गेली । जेणे इंद्रिये विसरली । विषयसंग; ॥१६२॥
मनाचे मनपणा गेले । बोलाचे बोलकेपण खुंटले । जयामाजी सापडले । ब्रह्म दिसे; ॥१६३॥
जेथ वैराग्याचा पांग फिटे । विवेकाचाही सोस तुटे । जेथ न पाहता सहज भेटे । आत्मस्वरुप; ॥१६४॥
सेवा करूनि ते जाण नम्रभावें पुसूनिया
ज्ञानोपदेश देतील ज्ञानी अनुभवी तुज ॥३४॥
ते ज्ञान गा बरवे । जर मनीं ऐसे जाणावे । तर संतां यां भजावे । सर्वस्वासह ॥१६५॥
की ज्ञानाचिया मंदिरा । संतसेवा हा उंबरा । स्वाधीन करी तो पंडुकुमरा । सेवा करुनी ॥१६६॥
तर तनमनजीवें । चरणासी लागावे । निगर्वीपणे करावे । दास्य सकळ ॥१६७॥
मग अपेक्षित जे आपुले । तेही सांगती पुसिले । जेणें अंत:करण बोधले । संकल्पीं न वळे ॥१६८॥
ज्या ज्ञानाने असा मोह न पुन्हा पावशील तू
आत्म्यात आणि माझ्यात भूते निःशेष देखुनी ॥३५॥
तयांचे बोधप्रकाशात । निश्चिंत जाहले चित्त । ब्रह्मासमान होत । निःशंकचि ॥१६९॥
त्यावेळी आपणासहित । हे भूतमात्र समस्त । माझे स्वरूपीं अखंडित । देखसी तू ॥१७०॥
ऐसे ज्ञानप्रकाशें उजाडेल । मोहांधकार जाईल । जेव्हा गुरुकृपा होईल । पार्था गा ॥१७१॥
जरी पाप्यांमधे पापी असशील शिरोमणि
तरी ह्या ज्ञाननौकेने पाप ते तरशील तू ॥३६॥
जरी पातकांचे आगर । तू भ्रांतीचा सागर । व्यामोहाचा डोंगर । होऊनि अससी; ॥१७२॥
तरि ज्ञानशक्तीपुढे जाण । हे अवघेचि गा गमे सान । ऐसे सामर्थ्य महान । या ज्ञानीं चोख ॥१७३॥
पहा विश्वाभासाऐसा गमत । जो अमूर्ताचा कवडसा भासत । तो जयाच्या प्रकाशापुढयात । उरेचिना ॥१७४॥
तया मनोमालिन्य हे कायसे? । ही तुलनाचि अनुचित असे । नाही समर्थ समर्थ तयाऐसे । दुजे जगीं ॥१७५॥
संपूर्ण पेटला अग्नि काष्ठे जाळूनि टाकितो
तसा ज्ञानाग्नि तो सर्व कर्मे जाळूनि टाकितो ॥३७॥
त्रिभुवनाची काजळी क्षणात । जी उधळी गगनत । त्या प्रळयकाळच्या वावटळीत । टिके काय अभ्र? ॥१७६॥
की पवनाचे कोपें । जो पाण्यानेचि उद्दीपे । तो प्रळयाग्नि काय दडपे । गवतकाष्ठांनी? ॥१७७॥
ज्ञानासम नसे काही पवित्र दुसरे जगीं
योगयुक्त यथाकाळीं ते पावे अंतरीं स्वयें ॥३८॥
असो, हे न घडत । विचार करिताहि विसंगत । ज्ञानाऐसे पवित्र येथ । काही न दिसे ॥१७८॥
येथ ज्ञान हे उत्तम होय । आणिक तैसे आहे काय? । जैसे नाही चैतन्य । दुसरे गा ॥१७९।
लाविता सूर्यतेजाचे कसास । तयाचे प्रतिबिंब जर तेजसे । वा कवळू जाता आकाश । येई का कवळिता? ॥१८०॥
अथवा पृथ्वी तोलण्यास । मिळेल काही तुलनेस । तरचि उपमा ज्ञानास । सापडेल ॥१८१॥
म्हणूनि अनेकपरी पाहता । पुन्हा पुन्हा विचार करिता । ही ज्ञानाची पवित्रता । ज्ञानींचि असे ॥१८२॥
जैसी अमृताची चव जोखावी । तर अमृताचिऐसी म्हणावी । तैसी ज्ञानासि उपमा द्यावी । ज्ञानाचीच ॥१८३॥
आता यावरि जे बोलणे । ते वायाचि वेळ दवडिणे । खरेचि जी हे, पार्थ म्हणे, । जे बोलता आपण ॥१८४॥
परि तेचि ज्ञान कैसे होत । पुसावेसे अर्जुनाचे मनात । तोंचि ते मनोगत । जाणिले देवांनी ॥१८५॥
मग देव अर्जुना म्हणत । या गोष्टीसी देई चित्त । ज्ञानप्राप्तीचा सांगत । उपाय तुज ॥१८६॥
श्रद्धेने मेळवी ज्ञान संयमी नित्य सावध
ज्ञानाने शीघ्र तो पावे शांति शेवटची मग ॥३९॥
तर गोडीने आत्मसुखाचिया । विटे जो सकळ विषयां । जयाठायी इंद्रियां । मान नाही; ॥१८७॥
मनासि इच्छा न सांगे । प्रकृतिने केले आपल्यावरि न घे । जो श्रद्धेचे उपभोगें । सुखी जाहला; ॥१८८॥
तयासीचि शोधित । हे ज्ञान येई निश्चित । जयामाजी ओतप्रोत । शांती वसे ॥१८९॥
ते ज्ञान ह्रदयीं प्रविष्टे । आणि शांतीचा अंकुर फुटे । मग विस्तार बहु प्रकटे । आत्मबोधाचा ॥१९०॥
मग ज्या दिशेसी पाही । तेथ शांतीचि ठायी ठायी । अपारासी पार नाही । विचार करिता ॥१९१॥
ऐसा हा उत्तरोत्तर । ज्ञानबीजाचा विस्तार । सांगता असे अपरंपार । परि असो आता ॥१९२॥
नसे ज्ञान नसे श्रद्धा संशयी नासला पुरा
न हा लोक न तो लोक न पावे सुख संशयी ॥४०॥
ऐक ज्या प्राण्याठायी । ज्ञानाची आवड नाही । तयाचे जिणे पाही । त्याहुनी मरण बरे ॥१९३॥
शून्य जैसे गृह । वा चैतन्याविण देह । तैसे जीवित ते संमोह । ज्ञानहीना ॥१९४॥
ज्ञान जरी न लाभत । परि इच्छा वसे मनात । तर संभवे काही तेथ । ज्ञानप्राप्ती ॥१९५॥
एरवी ज्ञानाची काय कथा? । जर ती मानसीं न आस्था । मग तो संशयाग्नीत पुरता । पडिला जाण ॥१९६॥
जेव्हा अमृतही नावडत । ऐसी सहजी अरूचि येत । तेव्हा मरण आले असे निश्चित । जाणावे की ॥१९७॥
तैसा विषयसुखीं रंगुनि जाई । ज्ञानप्राप्तीची तमा नाही । तो संशयें घेरिला जाई । यात न शंका ॥१९८॥
मग संशयीं जर पडला । तर निश्चित जाण नाशला । सुखासी तो मुकला । इहपरलोकीं ॥१९९॥
जो पडला विषमज्चराने । शीत-उष्ण न जाणे । आग आणि चांदणे । सारिखेचि मानी ॥२००॥
तैसे साच आणि लटिके । प्रतिकूल - अनुकूल नेमके । संशयग्रस्त न ओळखे । हित - अहित ॥२०१॥
हा दिवस, रात्र ही । जैसे जन्मांधा ठाउकी नाही । तैसे संशयीं पडता काही । येईना मना ॥२०२॥
म्हणोनि संशयाहूनि थोर । आणिक नाही पाप घोर । हा विनाशाचे जाळे भयंकर । प्राण्यांसी ॥२०३॥
तुवा त्यजावा याकारणें । आधी हाचि एक जिंकिणे । जो फोफावे अभावाने - । ज्ञानाचिया ॥२०४॥
अज्ञान - अंधार गडद पडे । तेव्हा हा बहुत मनीं वाढे । सर्वथा मार्ग मोडे । विश्वासाचा ॥२०५॥
न समावे हा ह्रदयीं । बुद्धीसी ग्रासुनी राही । तेथ संशयमय होई । त्रैलोक्यचि ॥२०६॥
योगाने झाडिली कर्मे ज्ञानें संशय तोडिले
जो सावधान आत्म्यात कर्मे त्यास न बांधिती ॥४१॥
ऐसा जरी थोरावे । एके उपायें जिंकिता ये । जर असेल हातीं बरवे । ज्ञानखड्ग ॥२०७॥
तर तिखट त्या शस्त्रावाटे । निखळ हा निपटे । निःशेष मालिन्य फिटे । मानसींचे ॥२०८॥
म्हणूनि अंतरातील अज्ञानकृत संशय
तोडुनी ज्ञानखड्गाने ऊठ तू योग साधुनी ॥४२॥
यास्तव हे कोंदडपाणी । ऊठ आता झणी । संशयाचा नाश करूनी । ह्रदयींच्या ॥२०९॥
सर्व ज्ञानाचा जनक । तो कृष्ण ज्ञानदीपक । तो कृपाळू म्हणे, ऐक - । ऐसे संजय म्हणे धृतराष्ट्रा ॥२१०॥
हे मागिल - पुढील भाषण । मनीं धरूनी अर्जुन । कैसा समयोचित प्रश्न । करील आता ॥२११॥
त्या कथेची संगती । आशयाची संपत्ती । रससौंदर्याची उन्नती । येईल पुढे ॥२१२॥
जयाचिया बरवेपणीं । करावी आठा रसांची ओवाळणी । सज्जन जो बुद्धीसी मानी । विसावा जगीं; ॥२१३॥
तो शांतरसचि आता प्रकटेल । ऐका ते मराठी बोल । जे समुद्राहुनि खोल । अर्थभरित ॥२१४॥
सूर्यबिंब जरि बचकेएवढे । तरि प्रकाशा त्रैलोक्य तोकडे । शब्दांचे व्यापकपण केवढे । अनुभवावे ॥२१५॥
अथवा कल्पवृक्ष जैसा । फळे इच्छुकाचे इच्छेऐसा । बोल अर्थघन होई तैसा। अवधान द्यावे ॥२१६॥
हे असो, काय बोलावे । सर्वज्ञ जाणती स्वभावें । तरि स्वस्थचित्त द्याए । ही विनंती माझी ॥२१७॥
जेथ साहित्य आणि शांती । ही मूर्ती दिसे बोलती । जैसी लावण्यगुणकुळवती । आणि पतिव्रता ॥२१८॥
आधीचि साखर प्रिय । तीचि जर औषधीं होय । तर न सेवावी काय । पुन्हा पुन्हा? ॥२१९॥
मलयानिल मंद सुगंधित । तया अमृताचा स्वाद लाभत । जुळे जर नादही तेथ । दैवयोगें; ॥२२०॥
तर स्पर्शें सर्वांग निववी । स्वादें जिव्हेसि नाचवी । कानाकरवी म्हणवी । धन्य बाप्पा ॥२२१॥
ऐसी ही कथा ऐकणे । श्रवणासि होय पारणे । संसारदुःख समूळ फिटणे । विकाराविण ॥२२२॥
जर मंत्रेंचि वैरी मरणार । तर का बांधावी व्यर्थ कटयार? । दूधसाखरेने रोग जाय दुर्धर । तर कडुनिंबरस का प्यावा? ॥२२३॥
तैसे मना न मारिता । आणि इंद्रियां न दुखविता । येथ मोक्ष असे आयता । श्रवणाचिमाजी ॥२२४॥
म्हणोनि पूर्ण प्रसन्नपणे । गीतार्थ हा ऐकणे । येथ ज्ञानदेव म्हणे । निवृत्तिदास ॥२२५॥