संजय म्हणाला:
असा तो करुणाग्रस्त घाबरा अश्रु गाळित
करीत असता खेद त्यास हे कृष्ण बोलिला ॥१॥
मग संजय म्हणे धृतराष्ट्राते । ऐक, तो पार्थ तेथे । शोकाकुल रुदनाते । करितसे ॥१॥
ते कुळ देखोनि समस्त । स्नेह उपजला अद्भुत । तेणें द्रवले असे चित्त । कैशापरी; ॥२॥
जैसे लवण जळीं विरघळे । वा मेघ वार्याने हाले । तैसे खंबीर असुनिही द्रवले । ह्रदय तयाचे ॥३॥
वाकुळ मोहें जाहला । दिसे म्लान कोमेजला । जैसा कर्दमीं रुतला । राजहंस ॥४॥
त्यापरी तो पांडुकुमार । महामोहें अतिजर्जर । देखोनि शारंगधर । काय बोले? ॥५॥
श्रीभगवान् म्हणाले:
कोठूनि भलत्या वेळी सुचले पाप हे तुज
असे रुचे न थोरांस ह्याने दुष्कीर्ति दुर्गति ॥२॥
अर्जुना आधी पाहसी । हे उचित काय या टायासी? । तू कवण, करित आहेसी - । हे काय? ॥६॥
सांग तुज काय जाहले । काय उणे पडले । काय करायाचे राहिले । खेद कायसा? ॥७॥
तू अनुचिता चित्त न देसी । धीर कधीचि न सोडिसी । काढिता तुझ्या नावासी । अपयश लागे देशोधडीसी ॥८॥
तू शूर वृत्तीचा ठाव । क्षत्रियांमाजी राव । तुझ्या पराक्रमाचा प्रभाव । तिन्ही लोकीं ॥९॥
संग्रामीं शंकरा जिंकिले । निवातकवच दैत्यांसी । मारिले । शौर्य तू गाजविले । गंधर्वांवरी ॥१०॥
हे तुजपुढे पाहता । त्रैलोक्यहि दिसे तोकडे आता । ऐसे पौरुष गा पार्था । चोख तुझे ॥११॥
तो तूच की आज येथे । सोडूनिया वीरवृत्तीते । अधोमुख रुदनाते । करीत आहेसी ॥१२॥
अर्जुना विचार करि मनाशी । करुणेने दीन होसी । अंधकार काय ग्रासी - । सूर्यासी सांग? ॥१३॥
वार्यासी मेघांचे काय भय । अमृतासि मरण असे काय । इंधनचि गिळोनि जाय । अग्नीसी काय? ॥१४॥
की लवणेंचि जळ विरे । कोण्या संसर्गे काळकूट मरे । बेडूक महासर्पा, सांग बरे - । गिळील काय? ॥१५॥
कोल्हा झोंबे सिंहासी । घडति का अघटिते ऐसे? । परि ते तू खरे करिसी । आज येथ ॥१६॥
म्हणोनि अजुनी तू अर्जुना । चित्त न द्यावे हीना । वेगें धीर देई मना । सावध होई ॥१७॥
सोडूनिया हा मूर्खपणा । ऊठ, घेई धनुष्यबाणा । मनिं कैसी तव करूणा । युद्धप्रसंगीं? ॥१८॥
अगा, तू भला जाणता । का न करिसि विचार आता । सांग युद्धप्रसंगी सदयता । उचित काय? ॥१९॥
ती असत्या कीतींचा नाश । अडसर परलोकप्राप्तीस । म्हणे जगन्निवास । अर्जुनासी ॥२०॥
निर्वीर्य तू नको होऊ न शोभे हे मुळी तुज
भिकार दुबळी वृत्ति सोडुनी ऊठ तू कसा ॥३॥
म्हणोनि शोक न करी । तू पुरता धीर धरी । आणि हा खेद आवरी । पंडुकुमरा ॥२१॥
तुज नव्हे हे उचित । येणें नासेल जोडिले बहुत । आता तरि हित कशात । विचार करी बा ॥२२॥
या संग्रामाचे अवसरे । कृपाळूपण नच बरे । हे आताचि काय सोयरे । जाहले तुज? ॥२३॥
तू आधीचि का न जाणसी । हे गोत्र नच ओळखसी । वृथाचि त्यांचा करिसी । कळवळा आता ॥२४॥
युद्ध हे आजचे । जन्मांत । तुज का नवलाईचे । परस्परां तुम्हा झुंजण्याचे । सदा असे निमित्त ॥२५॥
मग आताचि काय जाहले । काय प्रेम उफाळले? । उमजेना, परि भले न केले । अर्जुना तुवा ॥२६॥
ममत्व धरिता ऐसे होईल । असलेली प्रतिष्ठा जाईल । आणि परलोकही अंतरेल । इहलोकासह ॥२७॥
ह्रदयाचे ढिलेपण । येथ कल्याणा नव्हे कारण । हे संग्रामीं पतन जाण । क्षत्रियांसी ॥२८॥
ऐशापरी तो कृपावंत । नानापरी असे शिकवीत । ते ऐकोनि पंडुसुत । काय बोले ॥२९॥
अर्जुन म्हणाला:
कसा रणांगणीं झुंजू भीष्मद्रोणांविरुद्ध मी
ह्यांस बाण कसे मारू आम्हा हे पूजनीय की ॥४॥
देवा हे इतुक्यावरी । नये बोलू, अवधारी । आधी तूचि विचार करी । युद्धा असे का हे? ॥३०॥
हे युद्धा नव्हे अपराध । हे करिता दिसत प्रमाद । थोरांचा उघड उच्छेद । ओढवला आम्हा ॥३१॥
मातापितरां सेवावे । सर्वस्वी संतोषवावे । कैसे पुढे तयां वधावे । आपुल्याचि हातें? ॥३२॥
देवा, संतवृंदां वंदावे । घडले तर पूजावे । हे सोडुनि काय निंदावे । आपुल्या मुखें? ॥३३॥
तैसे गोत्रगुरु आमुचे । पूजनीय आम्हा नित्याचे । मज बहुत भीष्मद्रोणांचे । वाटतसे ऋण ॥३४॥
मनीं वैर जयांविषयी । आम्ही धरू न धजू स्वप्नींही । त्यांचा प्रत्यक्षा करू केवी । घात देवा? ॥३५॥
जळो ते जिणे त्यापरीस । येथ झाले आहे काय सर्वांस । ह्यांसि मारूनि विद्याभ्यास । काय आम्ही मिरवावा? ॥३६॥
मी पार्थ द्रोणाचा चेला । यांनीचि धनुर्वेद मज दिधला । उपकारें त्या भारावला । काय वधी तयांसी? ॥३७॥
जयांचे कृपेने लाभावे वर । तयांठायी मन कृतघ्न घोर । तर काय मी भस्मासुर? । अर्जुन म्हणे ॥३८॥
न मारिता थोर गुरूंस येथे
भिक्षाहि मागूनि भले जगावे
हितेच्छु हे ह्यांस वधूनि भोग
भोगू कसे भंगुर रक्तमिश्र ॥५॥
ऐकिले देवा समुद्र गंभीर । परि तोहि दिसे वरवर । क्षोभ न ठाऊक खरोखर । द्रोणगुरूंचे मना ॥३९॥
हे अपार जे गगन । त्याचेही होईल मापन । परि अगाध भले गहन । ह्रदय यांचे ॥४०॥
एकवेळ अमृतही विटेल । कालपरत्वें वज्र फुटेल । परि यांचा मनोधर्म न फिरेल । क्षोभविताही ॥४१॥
ममता करी माय । म्हणती ते खरे होय । परि मूर्तिमंत कृपामय । द्रोणगुरू ॥४२॥
हा उगम दयेचा । निधि सकळ गुणांचा । अनंत सागर विद्येचा । अर्जुन म्हणे ॥४३॥
ऐसे थोर हे महंत । वरि आम्हासाठी कृपावंत । आता सांग तयांचा घात । चिंतावा का? ॥४४॥
ऐसे हे रणीं वधावे । मग आपण राज्यसुख भोगावे । हे मना न येचि आघवे । जावो प्राण; ॥४५॥
ऐसे हे कृत्य दुर्घट । जे याहुनिही भोग श्रेष्ठ -। त्यापरीस आता इष्ट । भिक्षा मागणे ॥४६॥
देशत्याग करावा नातरी । अथवा जावे गिरिकंदरी । परि आता यांजवरी । धरू नये शस्त्र ॥४७॥
देवा बाण नव्याने परजावे । यांचे जिव्हारीं वार करावे । आणि आम्ही का भोग कवळावे । त्या रूधिरीं बुडलेले? ॥४८॥
ते काढुनि काय करावे? । रक्तमाखले कैसे सेवावे । युक्तिवाद तव न मानवे । याचिलागी ॥४९॥
ऐसे अर्जुन त्या अवसरीं । म्हणे श्रीकृष्णा, अवधारी । परि ते घेइचिना मनावरी । ऐकोन मुरारी ॥५०॥
हे जाणोनि पार्थ अस्वस्थला । मग पुनरपि बोलू लागला । म्हणे देव का या बोला । चित्त देतीचिना? ॥५१॥
ह्यांचाचि व्हावा जय आमुचा की
कशात कल्याण असे न जाणो
मारूनि ज्यांते जगणे न इच्छू
झुंजावया तेचि उभे समोर ॥६॥
माझे चित्तीं जे होते । ते मी सविस्तर बोलिलो येथे । परि याहुनि भले काय ते । तुम्ही जाणता ॥५२॥
अगा, वैर जयांसी ऐकावे - । ऐकताचि प्राण सोडावे । तेचि येथ संग्रामानानें । आहेत उभे ॥५३॥
आता ऐसियां वधावे । की सोडूनिया जावे । या होहोंमाजी काय करावे । समजेना आम्हा ॥५४॥
दैन्याने ती मारिली वृत्ति माझी
धर्माचे तों नाशिले ज्ञाने मोहें
कैसे माझे श्रेय होईल सांगा
पायांपाशी पातलो शिष्यभावें ॥७॥
येथ आम्हा काय उचित । विचार करूनिहि न सुचत । कारण मोहें चित्त । व्याकुळ माझे ॥५५॥
नेत्रीं येता सारा जैसे । दृष्टीचे तेज लोपतसे । मग जवळीं असताहि न दिसे । वस्तुजात ॥५६॥
देवा मज तैसे जाहले । मन हे भ्रांतीने ग्रासले । आता कशात हित आपुले । तेही न उमजे ॥५७॥
परि श्रीकृष्णा तुवा जाणावे । भले ते आम्हा सांगावे । सखा सर्वस्व आघवे । आम्हासी तू ॥५८॥
तू गुरु बंधु पिता । तूचि आमुची इष्टदेवता । तूचि सदा रक्षणकर्ता । संकटीं आम्हा ॥५९॥
जैसा शिष्याच्या अव्हेर । कधी न करिती गुरुवर । वा सरितांसी सागर । त्यजी कैसा? ॥६०॥
अथवा अपल्या माय । जर सोडूनि जाय । तर ते जगे काय? । ऐक कृष्णा ॥६१॥
तैसा सर्वपरी आम्हासी । देवा तूचि एक आहेसी । आणि बोलणे जर न मानिसी । मागील माझे; ॥६२॥
तर उचित काय आम्हा । जे सोडीना धर्मा । ते झडकरि पुरुषोत्तमा, । सांगावे आता ॥६३॥
मिळेल निष्कंटक राज्य येथे
लाभेल इंद्रासन देवलोकीं
शमेल त्याने न तथापि शोक
जो इंद्रियांते सुकवीत माझ्या ॥८॥
हे सकळ कुळ देखोनि । जो शोक उपजलासे मनीं । तो तुझिया उपदेशावाचुनी । जाईना कशाने ॥६४॥
येथ पृथ्वीचे राज्य लाभेल । वा इंद्रपद प्राप्त होईल । परि मोह हा न फिटेल । मानसींचा ॥६५॥
बी पूर्ण भाजलेले । सुक्षेत्रीं जरि पेरिले । हवे तितुके पाणी दिले । तरि अंकुरेना ॥६६॥
नातरी आयुष्य सरे । मग औषध काही नुरे । तेथ एकचि उपाय पुरे । परमामृत ॥६७॥
तैसे राज्यभोगसमृद्धीत । बुद्धीचे उज्जीवन ना होत । तुझिया कृपेचा जिव्हाळाचि तेथ । संजीवक ॥६८॥
ऐसे अर्जुन तेथ बोलिला । जेव्हा क्षण एक संभ्रम विरला । मग पुनरपि व्यापिला । मोहऊर्मीने ॥६९॥
मज वाटे ही ऊर्मी नव्हे । हे आगळेचि गमत आहे । तो ग्रासिला महामोहें । काळसर्पें ॥७०॥
मर्मस्थानीं ह्रदयकमळीं । कारुण्यमय भर कातरवेळीं । काळसर्पदंश चढला, मुळी - । उतरेचिना ॥७१॥
जाणुनि विषाचे जालिमपण । कृपाकटाक्षें करी निवारण । तो हाकसरशी आला धावुन । श्रीहरी गारुडी ॥७२॥
तैसा तो व्याकुळ अर्जुन । जवळीं कृष्ण दिसे शोभून । कृपाबळें लीलेने रक्षण । करील आता ॥७३॥
म्हणोनि तो धनंजय । मोहफणिग्रस्त होय । ऐसे मी म्हणे, हा अभिप्राय । जाणूनिया ॥७४॥
मग देखा तेथ अर्जुन । भ्रांतीने घेतला कवळून । घनपटले जाई आच्छादून । जैसा सूर्य ॥७५॥
त्यापरी तो धनुर्धर । जाहलासे दुःखजर्जर । जैसा ग्रीष्मकाळीं मेरू गिरिवर । वेढिला वणव्याने ॥७६॥
म्हणोनि सहज सावळा । कृपामृतें ओथंबला । तो कृष्णमेघ वळला । अर्जुनाकडे ॥७७॥
तेथ सुदर्शनाची द्युती । तीचि विद्युल्लता झळकती । आणि गंभीर वाणी ती । मेघगर्जना ॥७८॥
आता तो उदार कैसा वर्षेल । तेणें अर्जुनाचल निवेल । मग नवे धुमारे फुटतील । उन्मेषाचे ॥७९॥
ती कथा ऐकणे । मनाचिये समाधानें । ऐसे ज्ञानदेव म्हणे । निवृत्तिदास ॥८०॥
संजय म्हणाला:
असे अर्जुन तो वीर ह्रषीकेशास बोलुनी
शेवटी मी न झुंजेचि ह्या शब्दें स्तब्ध राहिला ॥९॥
ऐसे संजय धृतराष्ट्रा सांगत । म्हणे, राया तो पार्थ । पुनरपि शोकाकुल होत । काय बोले ॥८१॥
तो सखेद बोले श्रीकृष्णासी । न आळवावे तुवा मजसी । मी सर्वथा न झुंजे., देखसी - । भरवशाने ॥८२॥
ऐसे एकचि बेळ बोलिला । मग मौन धरूनि राहिला । तेथ श्रीकृष्णा विस्मय वाटला । देखोनि तया ॥८३॥
मग त्यास ह्रषीकेश जणू हसत बोलिला
करीत असता शोक दोन्ही सैन्यात तो तसा ॥१०॥
मग आपुले मनीं म्हणे । येथ काय आरंभिले याने । हा सर्वथा काही न जाणे । काय करावे? ॥८४॥
हा उमजे आता कवणपरी । कैसा धीर धरी? । जैसा मांत्रिक परीक्षा करी । पिशाच्चबाधेची; ॥८५॥
वा असाध्य देखोनि व्याधी । अमृतासम दिव्य औषधी । वैद्य तात्काळ तेथ । शोधी । निर्वाणीची ॥८६॥
त्या दोन्ही सैन्यांचे मध्यात । विचारमग्न श्रीअनंत । कोणत्या उपायें पार्थ । सोडील संभ्रम ॥८७॥
ते कारण मनिं धरिले । मग सरोष बोलणे आरंभिले । जैसे मातेचे कोपीं लपले । वात्सल्य असे ॥८८॥
की औषधाचे कडवटपणीं । जैसी अमृताची पुरवणी । वरि न दिसे परि गुणीं । प्रकट होय; ॥८९॥
तैसे वरवर पाहता उपहास । आत परी अति सुरस । ऐसी वचने हृषीकेश । बोलू लागले ॥९०॥
श्रीभगवान् म्हणाले:
करिसी भलता शोक वरी ज्ञानहि सांगसी
मेल्याजित्याविषी शोक ज्ञानवंत न जाणती ॥११॥
मग अर्जुनाते म्हटले । आम्ही आज हे नवल देखिले । जे तुवा येथ आरंभिले । अकस्मातचि ॥९१॥
तू आणता तर म्हणविसी । परि अजाणपण न सोडिसी । आणि शिकवु म्हणे तर सांगसी । बहुपदरी नीति ॥९२॥
जन्मांधा लागे पिसे । मग सैरावैरा धावतसे । तुझे शहाणपण तैसे । दिसतसे ॥९३॥
तू स्वतःविषयी अजाण । परि शोक या कौरवांकारण । हा बहु विस्मय आम्हा जाण । वारंवार ॥९४॥
तरि सांग बा मज अर्जुना, । तुजमुळे का अस्तित्व त्रिभुवना । अनादि ही विश्वरचना । हे लटिके काय? ॥९५॥
येथ एक समर्थ शक्ती । तीपासूनि प्राणिमात्र होती । हे फुकाचि काय बोलती । जगामाजी? ॥९६॥
काय आता ऐसे जाहले? । की हे जन्ममृत्यु तू निर्मिले? । आणि जर नाश पावले । तर तेहि तुजचियोगें? ॥९७॥
भ्रमूनि तू अहंकारग्रस्त । न चिंतिलासि जर यांचा घात । तर सांग काय हे होत । चिरंजीव? ॥९८॥
तू एक मारणारा । आणि सकळ लोक हा मरणारा । ऐशा संभ्रमा अल्पहि थारा । नसो चित्तीं ॥९९॥
अनादिसिद्ध हे आघवे । होत जात स्वभावें । तरि तू का शोकाकुल व्हावे? । सांग मज ॥१००॥
परि मूर्खपणें न जाणसी । न चितांवे ते चिंतिसी । आणि तूचि नीति सांगसी । आम्हाप्रती ॥१०१॥
पहा, विचारी जे असती । दोहींचाही शोक न करिती । जन्ममृत्यु ही केवळ भ्रांती । म्हणूनिया ॥१०२॥
मी तू आणिक हे राजे न मागे नव्हतो कधी
तसेचि सगळे आम्ही न पुढेहि नसू कधी ॥१२॥
अर्जुना सांगतो ऐक । येथ आम्ही तुम्ही देख । आणि हे राजे इत्यादिक । जमलो सर्व ॥१०३॥
निरंतर ऐसेचि राहू । वा निश्चित विनाश पावू । ही भ्रांती सोडुनि देऊ । तर दोन्ही न साच ॥१०४॥
हे उपजे आणि नाशे । ते दिसे मायावशें । एरवी आत्मा जो असे । तो अविनाशीचि ॥१०५॥
जैसे वायूने पाणी हालविले । आणि ते तरंगाकार जाहले । तर कोण की जन्मले । म्हणावे तेथ? ॥१०६॥
वायूचे वाहणे थांबले । आणि पाणी आपोआप सपाटले । तर आता काय निमाले? । विचार करी ॥१०७॥
ह्या देहीं बाल्य तारुण्य जरा वा लाभते जशी
तसा लाभे नवा देह न डगे धीर तो तिथे ॥१३॥
ऐक, शरीर तर एक । परि वयपरत्वें दशा अनेक । हे प्रत्यक्षचि देख । प्रमाण तू ॥१०८॥
येथ कुमारत्व दिसे । मग तारुण्यां ते नाहीसे । परि देहचि न नाशे । एकेका दशेसवे ॥१०९॥
तैसी चैतन्याचे ठायी । शरीरांतरे होती जाती पाही । हे जो जाणे, तया नाही । व्यामोहदुःख ॥११०॥
शीतोष्ण विषयस्पर्श सुखदुःखात घालिती
करी सहन तू सारे येती जाती अनित्य ते ॥१४॥
येथ नाकळण्या हेचि कारण । इंद्रियांआधीन पण । इंद्रिये कवळिती अंतःकरण । म्हणूनि ते भ्रमे ॥१११॥
इंद्रिये विषय सेविती । तेथ हर्ष शोक उपजती । ते अंतःकरण वाहविती । आपल्यासंगे ॥११२॥
ज्या विषयांचे ठायी । एक स्थिति कधी नाही । तेथ दुःख आणि काही । सुखहि दिसे ॥११३॥
निंदा आणि स्तुती । पहा ही शब्दांची व्याप्ती । तेथ क्रोध लोभ उपजती । श्रवणद्वारें ॥११४॥
मृदु आणि कठिण । हे स्पर्शाचे दोन्ही गुण । जे शरीरसंयोगें कारण । संतोष खेदा ॥११५॥
भेसूर आणि सुरेख । ही रूपाची स्वरूपे देख । जी उपजविती सुखदुःख । नेत्रद्वारें ॥११६॥
दुर्गंध आणि सुगंध । हे परिमळाचे भेद । देती दुःख आणि आनंद । घ्राणेंद्रियांसंगे ॥११७॥
तैसेचि द्विविध रस । उपजविती प्रीती आणि त्रास । म्हणोनि अधोगतीस । कारण विषयसंग ॥११८॥
जो इंद्रियांआधीन । शीतोष्णाची बाधा होउन । होई सुखदुःखास्वाधीन । आपणचि ॥११९॥
या विषयांवाचूनि काही । आणिक सर्वथा । रम्य नाही । ऐसा स्वभावचि पाही । इंद्रियांचा ॥१२०॥
हे विषय तरि कैसे । मृगजळ जैसे । की स्वप्नींचे आभासें । गजऐश्वर्य ॥१२१॥
विषय क्षणभंगुर त्या परी । म्हणूनि ते तू अव्हेरी । त्यांची संगत न धरी । कदापि धनुर्धरा ॥१२२॥
ह्यांची मात्रा न चालेचि ज्या धीर पुरुषावरी
सम देखे सुखे दुःखे मोक्षलाभास योग्य तो ॥१५॥
हे विषय जया ना कवळित । तो सुखदुःख दोन्ही न पावत । आणि गर्भवास यातायात । नाही तया ॥१२३॥
तो ब्रह्मरूप पुरता । ओळखावा सर्वथा । जो इंद्रियपाशां, पार्था । दूर ठेवी ॥१२४॥
नसे मिथ्यास अस्तित्त्व नसे सत्यास नाशही
निवाडा देखिला संतीं ह्या दोहींचा अशापरी ॥१६॥
आता अर्जुना आणिक । काही सांगेन मी, ऐक । जे विचारवंत लोक । ओळखती ॥१२५॥
या विश्वामाजी गुप्त एक । चैतन्य असे विश्वव्यापक । ते तत्त्वज्ञ संत चोख । स्वीकारिती ॥१२६॥
पाण्यात दूध जैसे । एकवटुनि मिळाले असे । परि निवडुनि राजहंसें । वेगळे करावे जैसे; ॥१२७॥
वा सोने अग्नीत तावुनी । आतिल हिणकस काढुनी । केवळ निखळ निवडुनी । काढिती चतुर; ॥१२८॥
अथवा चतुरपणीं । करिता दहीघुसळणी । मग शेवटी लोणी । दिसे जैसे; ॥१२९॥
वा कोंडा धान्य एकवट । पाखडुनि करिता नीट । उरे ते फोलपट । कळे जैसे; ॥१३०॥
तैसे विचारांतीं निरसन होत । तो प्रपंच सहजी सोडीत । मग केवळ ब्रह्य उरत । ज्ञानियांसी ॥१३१॥
म्हणोनि अशाश्वताचे ठायी । तयां सत्यभाव नाही । सार या दोहींचेही । ओळखिले जयांनी ॥१३२॥
ज्याने हे व्यापिले सर्व ते जाण अविनाश तू
नाश त्या नित्यतत्त्वाचा कोणीहि न करू शके ॥१७॥
सारासार विचार करिता । भ्रांति असे ही असारता । तरि सार ते स्वभावता । शाश्वत जाण ॥१३३॥
हा त्रैलोक्य आकार वसे । तो जयाचा विस्तार असे । तेथ नाम वर्ण रूप ऐसे । चिन्ह नाही ॥१३४॥
जो सर्वव्यापी शाश्वत । जन्ममरणातीत । जयाचा करु जाता घात । होईना कदापि ॥१३५॥
विनाशी देह हे सारे बोलिले त्यात शाश्वत
नित्य निःस्सीम तो आत्मा अर्जुना झुंज ह्यास्तव ॥१८॥
आणि अवघे शरीरजात । स्वभावता नाशिवंत । म्हणूनि तू युद्धात । झुंजावे अर्जुना ॥१३६॥
जो म्हणे मारितो आत्मा आणि जो मरतो म्हणे
दोघे न जाणती काही न मारी न मरेचि हा ॥१९॥
तू धरूनि देहाभिमानाते । दिठी ठेवुनि शरीराते । मी मारणारा, हे मरते । म्हणत आहेसी ॥१३७॥
परि अर्जुना, हे न जाणिसी । जर जथार्थ विचार करिसी । तर वधणारा तू नव्हेसी । हे वध्य नव्हेत ॥१३८॥
न जन्म पावे न कदापि मृत्यु
होऊनि मागे न पुढे न होय
आला न गेला स्थिर हा पुराण
मारोत देहास परी मरेना ॥२०॥
निर्विकारचि हा नित्य जन्ममृत्यूंहुनी पर
जाणे हे तत्त्व तो कैसा मारी वा मारवी कुणा ॥२१॥
जैसे स्वप्नामाजी देखावे । ते स्वप्नातचि खरे भासावे । मग जागे होऊनि पहावे । तों काही नाही ॥१३९॥
तैसे हे जाण मायाभास । व्यर्थ तू भ्रमत आहेस । छायेवरि हाणिता शस्त्रास । अंगीं न रुते; ॥१४०॥
की भरला घडा लवंडला । बिंबाकार दिसेना जाहला । परि सूर्य ना विनाशला । प्रतिबिंबासवे ॥१४१॥
आकाश जैसे घरात । घराचा आकार घेत । ते भंगता आपोआप तेथ । मूळस्वरूपचि; ॥१४२॥
तैसे शरीराचे लोपीं । सर्वथा नाश न आत्मस्वरूपीं । तेवी जन्ममृत्यूची भ्रांति न आरोपी । आत्म्यावरि बापा ॥१४३॥
सांडूनिया जर्जर जीर्ण वस्त्रे
मनुष्य घेतो दुसरी नवीन
तशीचि टाकूनि जुनी शरीरे
आत्माहि घेतो दुसरी निराळी ॥२२॥
जैसे जीर्ण वस्त्र टाकावे । मग नवीन वेढावे । तैसे देह लेई नवे । चैतन्यानाथ ॥१४४॥
शस्त्रे न चिरिती ह्यास ह्यास अग्नि न जाळितो
पाणी न भिजवी ह्यास ह्यास वारा न वाळवी ॥२३॥
चिरवे जाळवेना हा भिजवे वाळवेहि ना
स्थिर निश्चळ हा नित्य सर्वव्यापी सनातन ॥२४॥
हा अनादि नित्यसिद्धा । निरूपाधिक विशुद्धा । म्हणोनि शस्त्रादिकांनी छेद । न घडे याचा ॥१४५॥
न देखू ये न चिंतू ये बोलिला निर्विकार हा
जाणूनि ह्यापरी आत्मा शोक योग्य नसे तुज ॥२५॥
बुडेना हा जरि हो प्रळय । अग्निने जळणे असंभवनीय । येथ वायूचा न प्रभाव होय । शुष्कविण्याचा ॥१४६॥
अर्जुना हा नित्य, क्रियारहित । अचल हा शाश्वत । सर्वत्र सदोदित । परिपूर्ण ॥१४७॥
तर्कदृष्टीसि दिसेना । आत्मा हा अर्जुना । याचे भेटीसी ध्यानधारणा । उत्कंठित ॥१४८॥
हा सदा दुर्लभ मना । अप्राप्य साधना । निःस्सीम हा अर्जुना । पुरुषोत्तम ॥१४९॥
हा सत्त्वादि त्रित्रुणरहित । हा आकारातीत । अनादि विकाररहित । सर्वव्यापी ॥१०५॥
अर्जुना, ऐसा हा जाणावा । हा सकळात्मक देखावा । मग सहजे शोक आघवा । हरेल तुझा ॥१५१॥
अथवा पाहसी तू हा मरे जन्मे प्रतिक्षणीं
तरी तुज कुठे येथे नसे शोकास कारण ॥२६॥
अथवा ऐसे न जाणिसी । आत्मा नाशिवंतचि मानिसी । तरी शोक अनुचित तुजसी । पंडुकुमरा ॥१५२॥
उत्पत्ति स्थिती लय यात । हा निरंतर असे नित । जैसा प्रवाह वाहता सतत । गंगाजळाचा; ॥१५३॥
जे उगमीं नाही खंडले । समुद्रीं तर असे मिळाले । मध्ये वाहतचि राहिले । दिसे जैसे; ॥१५४॥
या तिन्ही अवस्था त्यापरी । सारिख्याचि सदा धनुर्धारी, । प्राणिमात्रांसि कोण्या अवसरीं । थोपविता न येतो ॥१५५॥
म्हणोनि हे अवघे देख । तुज न व्हावे शोककारक । सृष्टिक्रम हा स्वाभाविक । अनादि ऐसा ॥१५६॥
अथवा हे जर अर्जुना । येइनाचि तुझ्या मना । देखोनि प्राणिमात्रांना । जन्ममरणाधीन ॥१५७॥
तरी येथ काही । तुज शोकासि कारण नाही । जन्ममृत्यु हे पाही । अपरिहार्य ॥१५८॥
जन्मता निश्चये मृत्यु मरता जन्म निश्चयें
म्हणूनि न टळे त्याचा व्यर्थ शोक करू नको ॥२७॥
उपजे ते नाशे । नाशे ते पुनरपि दिसे । हे घटिकायंत्र तैसे । फिरे अखंड ॥१५९॥
आपोआप उदय अस्त । अखंडित होत जात । हे जन्ममरण जगात । अनिवार वैसे ॥१६०॥
महाप्रळयकाळ । तो त्रैलोक्याही संहारकाळ । म्हणोनि हे अटळ । आदिअंत ॥१६१॥
आणि तू जर हे ऐसे मानिसी । तर शोक का करिसी ? । काय जाणुनिहि न जाणसी । धनुर्धरा? ॥१६२॥
येथ आणिकही एक पार्था । तुज अनेकपरी पाहता । दुःख करावया सर्वथा । कारण नाही ॥१६३॥
भूतांचे मूळ अव्यक्तीं मध्य तो व्यक्त भासतो
पुन्हा शेवट अव्यक्तीं त्यामधे शोक कायसा ॥२८॥
हे प्राणिमात्र समस्त । जन्मण्याआधी अमूर्त । मग जन्मता प्राप्त । आकार व्यक्त ॥१६४॥
ते क्षयासि जेथ । जाती । तेथ खचित वेगळे नसती । पूर्वस्थितीसचि येती । अव्यक्त आपुल्या ॥१६५॥
मध्ये जे साकार भासे । ते निद्रिता स्वप्न जैसे । तैसा जगदाकार हा मायावशें । ब्रह्मस्वरूपीं ॥१६६॥
अथवा पवनें स्पर्शिले नीर । भासतसे तरंगाकार । वा परइच्छेने अलंकारआकार । सुवर्णासी ॥१६७॥
तैसे सकळ हे मूर्त । जाण मायेने आकारित । जैसे आकाशीं उद्धवत । मेघपटल ॥१६८॥
तैसे मुळातचि जे नसे । तयास्तव तू रडसी कायसे । तू अवीट ते पाही ऐसे । चैतन्य एक ॥१६९॥
जयाची ओढ संताम लागते । तेव्हा विषय त्यजिती तयांते । जयालागी विरक्त ते । वनवासी होती ॥१७०॥
दृष्टी ठेवुनि जयावर । ब्रह्मचर्यादि व्रतें मुनीश्वर । तपांसी तपोवतार । आचरिताती ॥१७१॥
आश्चर्य जो साचचि ह्यास देखे
आश्चर्य जो देखत ह्यास वणीं
आश्चर्य जो वर्णन तेहि ऐके
ऐके तरी शून्यचि जाणन्याचे ॥२९॥
साधक जे अंतरीं निश्चिक । आत्म्यासि न्याहाळिता केवळ । विसरले सकळ । संसारव्याप ॥१७२॥
कित्येक गुणवर्णन करिता । उपरति होऊनि चित्ता । पावले तात्काळ तल्लीनता । निरंतर ॥१७३॥
कित्येक ऐकताचि शांत । तयांचा देहभाव सरत । कित्येक अनुभवें पावत । तद्रूपता ॥१७४॥
जैसे सरिताओघ समस्त । समुद्रामाजी शिरत । परि माघारी न फिरत । न सामावता ॥१७५॥
तैशा योगीश्वरांच्या मती । साक्षात्कारीं तद्रूप होती । परि मागुती न फिरती । संसारीं पुन्हा ॥१७६॥
वसे देहात सर्वांच्या आत्मा अमर नित्य हा
म्हणूनि भूतमात्री तू नको शोक करू कधी ॥३०॥
जे सर्वत्र सर्वही देही । जयाचा करिताहि घात नाही । ते विश्वात्मक तू पाही । चैतन्य एक ॥१७७॥
याचेचि स्वभावें । हे होत जात आघवे । तुज शोककारक काय व्हावे । सांग येथ ? ॥१७८॥
एरवीही न कळे पार्था, का न रुचे तव चित्ता । शोक हा अनचित असता । बहुतपरी ॥१७९॥
स्वधर्म तोहि पाहूनि न योग्य डगणे तुज
धर्मयुद्धाहुनी काही क्षत्रियांस नसे भले ॥३१॥
अजूनिही का न विचार करिसी? । काय हे चिंतित आहेसी? । स्वधर्म तो विसरलासी । तरावे जेणें ॥१८०॥
या कौरवां भलते जाहले । वा तुजवरिचि काही पातले । की युगचि बुडाले । जरी येथ; ॥१८१॥
तरि एक असे । तो सर्वस्ती त्याज्य नसे । मग तरूनि जाशील कैसे । कृपाळूपणें ॥१८२॥
अर्जुना तुजें चित्त । जर दयेने विरघळत । तर ते अनुचित । या संग्रामसमयीं ॥१८३॥
अगा दूध जरि जाहले । तरि पथ्यासि नाही म्हटले । तर विषचि होय, जर दिले । नवज्वरीं ॥१८४॥
भळल्यावेळी भलते करिता । नाशकारक होईल हिता । म्हणूनि तू आता । सावध होई ॥१८५॥
व्यर्थचि व्याकुळता का ही ? । आपुला निजधर्म पाही । तो आचरिता बाध नाही । कोण्याही काळीं ॥१८६॥
जैसे मार्गेचि चालता । अपाय न होई सर्वथा । दीपाधारें चालता । अडखळणे नसे ॥१८७॥
तयापरी पार्था, । स्वधर्में वागता । सकळ कामनापूर्तता । सहजी होय ॥१८८॥
म्हणोनि यासाठी पाही । तुम्हा क्षत्रिया आणिक काही । संग्रामावाचुनि नाही । उचित जाण ॥१८९॥
निष्कपट असावे । आवेशें झुंजावे । हे असो, काय सांगावे । प्रत्यक्ष प्रसंगी? ॥१९०॥
प्राप्त झाले अनायासे स्वर्गाचे द्वार मोकळे
क्षत्रियांस महाभाग्यें लाभते युद्ध हे असे ॥३२॥
अर्जुना युद्ध पहा आताचे । हे दैवचि फळले तुमचे । की निधान सकळ धर्माचे । प्रगटले असे ॥१९१॥
हा संग्राम काय म्हणावा? । स्वर्गचि अवतरला रूपें या । उदयला प्रताप अथवा । मूर्तिमत ॥१९२॥
की तुझिये गुणीं मोहिली । उत्कट ओढीने भारली । ही कीर्तीचि स्वयें आली ॥ वरण्या तुज ॥१९३॥
क्षत्रियें बहुत पुण्य जोडावे । तेव्हा युद्ध असे लाभावे । जैसे मार्गीं जाता अडखळावे । चिंतामणीसी ॥१९४॥
जांभयांनी मुख वासे । तेथ अवचित अमृत पडतसे । तैसा येथ पातला असे । संग्राम हा ॥१९५॥
हे धर्मयुद्ध टाळूनि पापात पडशील तू
स्वधर्मासह कीर्तीस दूर सारूनिया स्वये ॥३३॥
आता हा संग्राम अव्हेरणे । नसत्याचा शोक करणे । हे आपणचि हानी करणे । आपलीचि ॥१९६॥
पूर्वजांनी यश पुण्य जोडिले । आपणचि ते गमावले । जर आज शस्त्र टाकिले । रणामाजी या ॥१९७॥
असती कीर्ती जाईल । जगचि अभिशाप देईल । आणि तुज धुंडित येतिल । महापातके ॥१९८॥
जैसी पतीविना वनिता । अपमानित सर्वथा । तैसी दशा जीविता । स्वधर्माविना ॥१९९॥
वा रणांगणीं प्रेत पडे । चौफेर तोडिती गिधाडे । तैसे स्वधर्महीना चोहीकडे । घेरिती महादोष ॥२००॥
अखंड लोक गातील दुष्कीर्ति जगतीं तुझीं
मानवंतास दुष्कीर्ति मरणाहूनि आगळी ॥३४॥
म्हणोनि स्वधर्म हा सोडशील । तर पापासि पात्र ठरशील । आणि अपयश न जाईल । कल्पांतापावत ॥२०१॥
जाणत्याने तोवरिचि जगावे । जोवरी अपकीर्ती न शिवे । आता सांग बा कैसे निघावे । येथूनिया? ॥२०२॥
निर्मत्सर तू दयावत्सल । येथूनि माघारी फिरशील । परि ही गोष्ट न रुचेल । या सर्वांसी ॥२०३॥
हे चहूकडुनी वेढितील । बाणांचा मारा करितील । तेथ पार्था, न सुटशील । कृपाळूपणे ॥२०४॥
ऐशाही प्राणसंकटातुनी । जरि सुटका आली घडुनी । तरि ते जिणेहि मरणाहुनी । अनिष्टचि ॥२०५॥
भिऊनि टाळिले युद्ध मानितील महारथी
असूनि मान्य तू ह्यांस तुच्छता पावशील की ॥३५॥
एक विचार न करिसी । येथ आवेशें झुंजण्या आलासी । आणि कणव येऊनि निघालासी । मागुती जरी ॥२०६॥
तरि तुझे ते अर्जुना, । या वैर्यां दुर्जनां । खरे वाटेल का मना । सांग मज? ॥२०७॥
बोलितील तुझे शत्रु भलते भलते बहु
निंदितील तुझे शौर्य काय त्याहूनि दुःखद ॥३६॥
हे म्हणतिल गेला रे गेला । अर्जुन आम्हा भ्याला । हा सांग का भला । राहिला बोल? ॥२०८॥
लोक सायास बहुत करिती । आपुले जीवित वेचिती । परि कीर्ती वाढविती । धनुर्धरा ॥२०९॥
ती तू अनायासे । सहज संपादिली असे । हे अद्वितीय जैसे । गगन आहे; ॥२१०॥
तैसी कीर्ती नि:स्प्तीम । तुझिये ठायी निरुपम । तुझे गुण उत्तम । तिन्ही लोकीं ॥२११॥
देशोदेशींचे भूपती । भाट होऊनि वाखाणिती । जे ऐकुनी दचकती । कृतांतादिक ॥२१२॥
ऐसा महिमा गहन । गंगेपरी पावन । विस्मित जया देखून । महारथी जगीं ॥२१३॥
ते पौरुष तुझे अद्भुत । ऐकोनिया हे समस्त । जाहले असती विरक्त । जीविताविषयीं ॥२१४॥
सिंहगर्जना जैसी । प्रळयकाळ गमे हत्तींसी । तैसा सर्व कौरवांसी । धाक तुझा ॥२१५॥
जैसे पर्वत वज्रासी । अथवा सर्प गरुडासी । तैसे ते तुजसी । मानिती सदा ॥२१६॥
ते थोरपण जाईल । मग हीनत्त्व अंगीं येईल । जर माघारी फिरशील । न झुंजताचि ॥२१७॥
आणि हे पळता पळू न देतिल । धरूनि अवकळा करितिल । निंदा अपशब्दां न गणतिल । तोंडावरी तव ॥२१८॥
मग त्यावेळी ह्रदय फुटावे । तर आता शौर्यें का न झुंजाव? । जिंकिले तर भोगावे । राज्य पृथ्वीचे ॥२१९॥
मेल्याने भोगिसी स्वर्ग जिंकिल्याने महीतळ
म्हणूनि अर्जुना ऊठ युद्धास दृढनिश्चयें ॥३७॥
अथवा रणीं येथ । झुंजता वेचले जीवित । तर स्वर्गसुख प्राप्त । होईल विनायास ॥२२०॥
वर्थ या गोष्टींचा म्हणूनिया । विचार न करि धनंजया । ऊठ धनुष्य घेऊनिया । झुंज झडकरी ॥२२१॥
पहा स्वधर्म हा आचरिता । असलेले दोष नाशता । तुज भ्रांती कोठली चित्ता । येथ पातकांची ? ॥२२२॥
कोण बुडे नावेत बैसता । की सरळपार्गीं जाता? । जर नीट न ये चालता । तर तेही घडे ॥२२३॥
विषासह केले सेवन । तरचि दुधाने मरण । तैसे सहेतुक स्वधर्माचरण । दोषयुक्त ॥२२४॥
म्हणोनि तू पार्था । निष्काम होऊनि सर्वथा । क्षत्रियधर्में झुंजता । पाप नाही ॥२२५॥
हानि लाभ सुखे दुःखे हार जीत करी सम
मग युद्धास हो सिद्ध न लागे पाप ते तुज ॥३८॥
सुखात संतोषा न कवळावे । दुःखात विषादा न भजावे । लाभ-अलाभ न धरावे । मनामध्ये ॥२२६॥
येथ विजय होईल । की सर्वस्वी देह जाईल । हे आधीचि काही पुढील । चिंतू नये ॥२२७॥
आपणासी उचित । स्वधर्मा आचरीत । जे पावे ते निवांत । सहन करावे ॥२८८॥
ऐसे मज जर होईल । तर सहजी दोष न घडेल । म्हणोनि आता झुंजावे तात्काळ । निभ्रांत तुवा ॥२२९॥
सांख्यबुद्धि अशी जाण ऐक ती योगबुद्धि तू
तोडिशील जिने सारी कर्माची बंधने जगीं ॥३९॥
हा ज्ञानयोग संक्षिप्त । सांगितला तुज येथ । आता बुद्धियोग निश्चित । अवधारी गा ॥२३०॥
जो बुद्धियुक्त होई । तयासी पार्था पाही । कर्मबंध कधीही । बाधू न शके ॥२३९॥
वज्रकवच ल्यावे । मग शस्त्रांचे घाव सोसावे । परि विजयी व्हावे । शस्त्रे चाटुनि जाताही ॥२३२॥
न बुडे येथ आरंभ न घडे विपरीतही
जोडा स्वल्पहि हा धर्म तारी मोठया भयातुनी ॥४०॥
तैसे न नाशे ऐहिक सुख । आणि ठेविलाचि असे मोक्ष । जेथ पूर्वापार चोख । होय कर्म ॥२३३॥
वागावे कर्माचा आधार घेत । परि दृष्टि नसावी कर्मफळात । जैसी मांत्रिका न होत । भूतबाधा ॥२३४॥
त्यापरि अनासक्त बुद्धी ऐसी । पूर्णपणे होय आपलीशी । जन्म - मरण - उपाधि तयासी । बाधू न शके ॥२३५॥
जेथ न शिरे पुण्य - पाप । जी सूक्ष्म, अति निष्कंप । सत्त्व - रज - तमांचा लेप । न लागे जेथ; ॥२३६॥
अर्जुना ती बुद्धी पुण्यवशें । जरि अल्पचि ह्रदयीं प्रकाशे । तरि संपूर्णचि विनाशे । संसारभय ॥२३७॥
ह्यात निश्च्य लाभूनि बुद्धि एकाग्र राहते
निश्चयाविण बुद्धीचे फाटे ते संपतीचिना ॥४१॥
जैसी दीपकलिका सानुली । परि बहुत तेज उजळी । तैसी सद्बुद्धी ही तहानुली । म्हणू नये ॥२३८॥
पार्था गा अनेकपरी । विचारवंत इच्छा धरी । कारण दुर्लभ चराचरीं । सद्बुद्धी ही ॥२३९॥
आणिकांसारिखा बहुत । जैसा परीस न मिलत । अथवा थेंबभर अमृत । लाभे दैवयोगेंचि ॥२४०॥
सद्बुद्धी लाभणे कठीण । जिला परमात्माचि अंतिम स्थान । जैसा गंगेसि उदधी जाण । निरंतर ॥२४१॥
तैसे ईश्वरावाचूनि काही । अन्य जिला आश्रयस्थान नाही । ती एकचि सद्बुद्धी, पाही - । अर्जुना जगीं ॥२४२॥
दुसरी ती दुर्मती । ती बहुधा असे विकृती । तेथ निरंतर रमती । अविचारी; ॥२४३॥
म्हणोनि प्राप्त तयां पार्था । स्वर्ग संसार नरकावस्था । आत्मसुखाची सर्वथा । दृष्टभेटही नाही ॥२४४॥
अविवेकी वृथा वाणी बोलती फुलवूनिया
वेदाचे घालिती वाद म्हणती दुसरे नसे ॥४२॥
वेदाधारें बोलती । केवळ कर्मश्रेष्ठत्त्व प्रस्थापिती । परि कर्मफळीं आसक्ती । धरूनिया ॥२४५॥
म्हणती मृत्युलोकीं जन्मावे । यज्ञादि कर्म करावे । मग स्वर्गसुख भोगावे । मनोहर ॥२४६॥
येथ यावाचुनि काही । सुखचि सर्वथा नाही । अर्जुना बोलती पाही । दुर्बुद्ध जन ते ॥२४७॥
जन्मूनिया करा कमें मिळवा भोगवैभव
भोगा कर्मफळे गोड सांगती स्वर्गकामुक ॥४३॥
होऊनि कामनाग्रस्त । पहा बा, कर्मे आचरीत । केवळ भोगीं चित्त । देऊनिया ॥२४८॥
विशेष कर्मीं अनेक । साक्षेपें विधिपूर्वक । ते राहुनिया दक्ष देख । धर्माते आचरिती ॥२४९॥
त्यामुळे भुलली बुद्धि गुंतली भोग-वैभवी
ती निश्चिय न लाभूनि समाधीत नव्हे स्थिर ॥४४॥
परि एकचि भले न करिती । स्वर्गकामना मनिं धरिती । परमात्म्यासी विसरती । यज्ञभोक्ता जो ॥२५०॥
जैसी कापुराची राम करूनी । लावुनि द्यावा अग्नी । वा काळकूट मिष्टान्नीं । कालवावे ॥२५१॥
दैवें अमृतकुंभ लाभला । तो पायें लाथाडिला । तैसा नाशविती धर्म जो घडला । सहेतुकपणे ॥२५२॥
सायासें पुण्य जोडावें । मग संसारा का अपेक्षावे ? । परि सद्बुद्धिविण कसे कळावे । अज्ञजनां हे? ॥२५३॥
सुगरण उत्तम पक्वान्न करी । मोल घेऊनि करी विक्री । तैसे भोगास्तव अविचारी । दवडिती धर्म ॥२५४॥
म्हणोनि पहा पार्था । जे विवादिती वेदार्था । तयांचे मनीं सर्वथा । दुर्बुद्धी वसे ॥२५५॥
तिन्ही गुण वदे वेद त्यात राहे अलिप्त तू
सत्त्व सोडू नको सोशी द्वंद्वे निर्श्चित सावध ॥४५॥
तिन्ही गुणीं व्याप्त । हे वेद जाण निश्चित । तेथ उपनिषदादि समस्त । सात्त्विक ते ॥२५६॥
अन्य ते रजतमात्मक । जेथ निरूपिले कर्मादिक । जे केवळ स्वर्गसूचक । धनुर्धरा ॥२५७॥
म्हणोनि तू जाण । हे सुखदुःखाचि कारण । येथ तुझे अंत:करण । शिरू न देई ॥२५८॥
तिन्ही गुणां तू अव्हेरी । मी, माझे, हे न करी । एका आत्मसुखा अंतरीं । नये विसंवू ॥२५९॥
सर्वत्र भरले पाणी तेव्हा आडात अर्थ जो
विज्ञानी ब्रहावेत्त्यास सर्व वेदात अर्थ तो ॥४६॥
जरि वेद बहुत बोलिले । विविध मार्ग सुचविले । तरि ज्यात हित आपुले । तेचि घ्यावे आपण ॥२६०॥
जैसा सूर्य उगवता । अनेकही मार्ग दिसता । ते सर्व काय चालता - । येती सांग ? ॥२६१॥
अथवा जलमय सकळ । जरी जाहले भूतळ । तरि आपण घ्यावे केवळ । गरजेपुरते ॥२६२॥
तैसे ज्ञानवंत जे असती । ते वेदार्था विवरिती । मग अपेक्षित स्वीकारिती । शाश्वत जे ॥२६३॥
कर्मातचि तुझा भाग तो फळात नसो कधी
नको कर्मफळीं हेतु अकर्मी वासना नको ॥४७॥
म्हणोनि ऐक पार्था, । याचि दृष्टीने पाहता । तुज उचित होय आता । स्वकर्म हे ॥२६४॥
आम्ही समस्त विचार केले । तेव्हा ऐसेचि मना आले । की सोडू नये तू आपुले । विहित कर्म ॥२६५॥
परि कर्मफळीं आस न धरावी । कुकर्मासवे संगत न व्हावी । सत्कर्मेचि आचरावी । निष्काम बुद्धीने ॥२६६॥
फळ लाभो न लाभो तू निःसंग सम होउनी
योगयुक्त करी कर्मे योगसार समत्वचि ॥४८॥
तू होऊनि योगक्त । फळाचा संग त्यजित । मग अर्जुना, चित्त देत । करी कर्मे ॥२६७॥
परि कर्म अनुकूल दैवें । जरि समाप्तीते पावे । तरि विशेष तेथ तोषावे । हेही नको ॥२६८॥
किंवा कारणें काही । सिद्धीसि न जाता राही । तरी त्या असंतोषेंही । नये त्रासू ॥२६९॥
आचरिता सिद्धीसि गेले । तर कारणीचि लागले । अपूर्ण राहताहि भले झाले । ऐसेचि मानी ॥२७०॥
पहा कर्म जितुके घडले । तितुके परमात्म्यासी अर्पिले । तर सहजचि परिपूर्ण झाले । ऐसे जाण ॥१७१॥
पूर्ण-अपूर्ण कर्माविषयीं । मनाचा जो समतोल राही । तीचि योगस्थिती पाही । प्रशंसिती ज्ञानी ॥२७२॥
समत्वबुद्धी ही थोर कर्म तीहूनि हीनचि
बुद्धीचा आसरा घे तू मागती फळ दीन ते ॥४१॥
येथे समत्वबुद्धीने टळे सुकृत-दुष्कृत
समत्व जोड ह्यासाठी तेचि कर्मात कौशल ॥५०॥
अर्जुना समत्व चित्तावे । ते सार जाण योगाचे । जेथ मन आणि बुद्धीचे । ऐक्य असे ॥२७३॥
बुद्धियोगाचा विचार करिता । बहुत पटींनी पार्था । या सकाम कर्माची न्यूनता । दिसतसे ॥२७४॥
परि ते कर्माचरण होई । तरचि हा योग प्राप्त, पाही । फलाशा त्यजुनि शेष कर्म राही । तीचि योगस्थिती ॥२७५॥
म्हणोनि बुद्धियोग समर्थ । अर्जुना स्थिर होई तेथ । मनापासुनी त्यागित । फलहेतू ॥२७६॥
जे बुद्धियोगा अनुसरत । तेचि भवसागर पार होत । उभय बंधातुनी सुटत । पाप-पुण्याचिया ॥२७७॥
ज्ञानी समत्वबुद्धीने कर्माचे फळ सोडुनी
जन्माचे तोडिती बंध पावती पद अच्युत ॥५१॥
ते कर्मे आचरिती । परि कर्मफळा न शिवती । जन्ममरणाचिया लोपती । येरझारा तयां ॥२७८॥
मग ब्रह्मानंदभरित । अढळ पद पावत । ते बुद्धियोगयुक्त । धनुर्धरा ॥२७९॥
लंघूनि बुद्धि जाईल जेव्हा हा मोहकर्दम
आले येईल जे कानीं तेव्हा जिरविशील तू ॥५२॥
जेव्हा मोह सोडशील । आणि वैराग्य मनीं वसेल । तूही ऐसाचि होशील । धनुर्धरा तेव्हा ॥२८०॥
मग निष्कलंक गहन । उपजेल आत्मज्ञान । तेणें निरिच्छ होईल मन । आपोआप तुझे ॥२८१॥
तेथ आणिक काही जाणावे । की मागिल ते स्मरावे । हे अर्जुना आघवे । खुंटेल सहजी ॥२८२॥
श्रवणें भ्रमली बुद्धि तुझी लाभूनि निश्चय
स्थिरावेल समाधीत तेव्हा भेटेल योग तो ॥५३॥
इंद्रियांचे संगती । बुद्धीसी फाटे फुटती । आत्मस्वरूपीं पुनश्च ती । स्थिर होई ॥२८३॥
समाधिसुखीं केवळ । जेव्हा बुद्धी होईल निश्चळ । तेव्हा लाभेल तुज सकळ । योगस्थिती ॥२८४॥
अर्जुन म्हणाला:
स्थिरावला समाधीत स्थितप्रज्ञ कसा असे
कृष्णा सांग कसा बोले कसा राहे फिरे कसा ॥५४॥
तेथ अर्जुन म्हणे, देवा । हाचि अभिप्राय आघवा । मी पुसेन आता सांगावा । कृपानिधे ॥२८५॥
मग श्रीकृष्ण बोलिले । तुज जे वाटे भले । ते मुक्त मनाने सगळे । अवश्य पुसावेसी ॥२८६॥
या बोलावरि म्हणे धनंजय । सांगा मज श्रीकृष्णराय । कोणासी म्हणती स्थितप्रज्ञ - । ओळखावे कैसे? ॥२८७॥
स्थिरबुद्धी जया म्हणती । तो कोणत्या लक्षणीं जाणती । जो समाधिसुखाची अनुभूती । घेई अखंडित; ॥२८८॥
तो कोणत्या स्थितीत असे । कोण्या रूपीं विलसे । देवा सांगावे हे सुस्पष्टसे । लक्ष्मीपती ॥२८९॥
तेव्हा परब्रह्यावतार श्रीकृष्ण । षड्गुणऐश्वर्यसंपन्न । तो काय तेथ नारायण । बोलत असे ॥२९०॥
श्रीभगवान् म्हणाले:
कामना अंतरातील सर्व सोडूनि जो स्वये
आत्म्यातचि असे तुष्ट तो स्थितप्रज्ञ बोलिला ॥५५॥
म्हणे अर्जुना ऐकसी । ही जी प्रबळ अभिलाषा मानसीं । ती अंतराय स्वसुखासी । करीत असे ॥२९१॥
जो सदा सर्वदा तृप्त । अंतःकरणीं आनंदभरित । परि विषयांमध्ये पतित । ज्याचेसंगे होई; ॥२९२॥
तो काम सर्वथा जाई । आणि आत्मानंदीं मन राही । तोचि स्थितप्रज्ञ होई । पुरुष जाण ॥२९३॥
नसे दुःखात दद्वेग सुखाची लालसा नसे
नसे तृष्णा भय क्रोध तो स्थितप्रज्ञ संयमी ॥५६॥
नाना दुःखे जरि प्राप्त । तरि न जो उद्वेगत । आणि सुखाभिलाषात । अडकेना; ॥२९४॥
अर्जुना तयाचे ठायी । काम क्रोध स्वभावेंचि नाही । आणि भयाचे न नावही । परिपूर्ण तो ॥२९५॥
ऐसा जो बंधमुक्त । समाधि त्यजुनि भेदरहित । तो तू जाण निश्चित । स्थिरबुद्धि ॥२९६॥
सर्वत्र जो अनासक्त बरे वाईट लाभता
न उल्लासे न संतापे त्याची प्रज्ञा स्थिरावली ॥५७॥
जे सर्वत्र सदा सरिसे । परिपूर्ण चंद्रबिंब जैसे । अधम उत्तम न गणतसे । चांदणे वर्षिता ॥२९७॥
ऐसी अखंड समता । भूतमात्रीं सदयता । आणि पालट नाही चित्ता । कोणेही काळीं ॥२९८॥
गोमटे काही लाभता । संतोषें व वेडावता । विपरीत काही घडता । मानीना विषाद; ॥२९९॥
ऐसा हर्षशोकरहित । आत्मज्ञानभरित । तो जाण प्रज्ञायुक्त । धनुर्धरा ॥३००॥
घेई ओढूनि संपूर्ण विषयातूनि इंद्रिये
जस कास्व तो अंगे तेव्हा प्रज्ञा स्थिरावली ॥५८॥
अथवा कासव ज्यापरी । आनंदे अवयव पसरी । वा स्वेच्छेने आवरी । आपले आपण; ॥३०१॥
इंद्रिये स्वाधीन होत । जयाने म्हटले तैसे करीत । तयाची प्रज्ञा जाण स्थित - । जाहली असे ॥३०२॥
निराहारबळें बाह्य सोडी विषय साधक
आतील न सुटे गोडी ती जळे आत्मदर्शनें ॥५९॥
आता अर्जुना आणिकही एक । नवल सांगेन ऐक । या विषयां साधक । त्यजिती निग्रहें ॥३०३॥
कर्णादि इंद्रिये आवरिती । परि जिव्हानिग्रह नच करिती । सहस्त्रपरी घेरिती । विषय तयां ॥३०४॥
पालवी खुडावी वरवर । आणि पाणी घालावे मुळांवर । मग कैसा नाश होणार । वृक्षाचा त्या ? ॥३०५॥
तो पाण्याने अधिक बहरे । आडवा फुटे, विस्तारे । तैशा पोसती जिव्हेद्वारें । मनीं विषयवासना ॥३०६॥
अन्य इंद्रियांचा विषय तुटे । परि जिव्हेचा निग्रहेंहि न फिटे । जीवनही अशक्य वाटे । त्यावाचुनी ॥३०७॥
मग सहजचि खरोखर । साधे विजय जिव्हेवर । जेव्हा परब्रह्मसाक्षात्कार । अनुभवे साधक ॥३०८॥
शरीरभाव लोपती । इंद्रिये विषय विसरती । जेव्हा मी ब्रह्म ही अनुभूती । प्रकट होय ॥३०९॥
करीत असता यत्न ज्ञात्याच्याहि मनास ही
नेती खेचूनि वेगाने इंद्रिये दांडगीचि की ॥६०॥
एरवी तरी अर्जुना । जे निरंतर करिती साधना । इंद्रिये तयांचे स्वाधीन ना । होती कधी ॥३१०॥
करूनि अभ्यासाची खोप । लावुनि यमनियमांची झाप । जे मन सदा आपोआप । मुठीत धरुनी असती; ॥३११॥
त्यांचीही करिती कासाविशी । ही इंद्रिये दांडगी ऐशी । मांत्रिका जखिण जैशी । भुलवी की ॥३१२॥
पहा विषय तैसे भुलविती । ऋद्धिसिद्धींचे रूपें येती । मग ग्रासुनी टाकिती । इंद्रियांकरवी ॥३१३॥
ऐशा तिढयात मन सापडे । मग अभ्यासीं लटके पडे । बळकटपण एवढे । इंद्रियांचे ॥३१४॥
त्यांस रोधूनि युक्तीने रहावे मत्परायण
इंद्रिये जिंकिली ज्याने त्याची प्रज्ञा स्थिरावली ॥६१॥
म्हणोनि ऐक पार्था । इंद्रियां निर्दळी सर्वथा । सर्व विषयीं आस्था । सोडूनिया ॥३१५॥
तयासीचि प्राप्त हो आण । योगनिष्ठेचे अधिकारपण । विषयसुखें जयाचे अंत:करण । भुलुनी न जाई ॥३१६॥
जो आत्मानंदयुंक्त । होऊनि असे सतत । तो मज ह्रदयाआत । विसंबेना ॥३१७॥
बाह्य विषय त्यजी एरवी । परि मानसीं वसे काही । तया हा संसार, पाही - । साद्यंतचि ॥३१८॥
जैसा विषाचा लेश । घेताचि बहुत क्लेश । मग निश्चित नाश । करी जिवाचा; ॥३१९॥
तैसा हा विषय पुसटता । मनी राहुनी जाता । नाश करी पुरता । विवेकजाताचा ॥३२०॥
विषयांचे करी ध्यान त्यास तो संग लागला
संगातूनि फुटे काम क्रोध कामात ठेविला ॥६२॥
क्रोधातूनि जडे मोह मोहाने स्मृति लोपली
स्मृतिलोपें बुद्धिनाश म्हणजे आत्मनाशचि ॥६३॥
ह्रदयीं विषय स्मरती । तर निःसंगाहि चिकटे आसक्ती । आसक्तीतुनि प्रगटे मूर्ती । अभिलाषेची ॥३२१॥
जेथ काम उद्भवला । तेथ क्रोध आधीचि आला । क्रोधीं असे ठेविला । अविचार जाण ॥३२२॥
प्रकटे अविचार जेव्हा । नाश पावे स्मृति तेव्हा । प्रचंड वार्याने दिवा । विझे जैसा ॥३२३॥
रात्र जैसी अस्तसमयीं । सूर्यतेजा ग्रासूनि राही । स्मृतिभ्रंशें दशा होई । प्राण्यांची तैसी ॥३२४॥
मग अज्ञानअंधार केवळ । त्यात बुडे सकळ । तेथ बुद्धि होय व्याकुळ । ह्रदयामाजी ॥३२५॥
जन्मांधा पळण्याचे साकडे । काकुळतीने सैराट धावे पुढे । बुद्धी भ्रमुनी भोवंडे । धनुर्धरा तैसी ॥३२६॥
ऐसा स्मृतिभ्रश घडे । मग सर्वस्वी बुद्धि अवघडे । तेथ समूळ हो उपडे । ज्ञानमात्र ॥३२७॥
चैतन्याचे नाशीं । शरीरा दशा जैशी । मनुष्या बुद्धिभ्रंशीं । तैसे होय ॥३२८॥
म्हणोनि ऐक अर्जुना । जैसी ठिणगी लागे इंधना । मग ते भडकता त्रिभुवना । जाळण्या पुरे ॥३२९॥
तैसे विषयांचे चिंतन । यत्किंचितही करी मन । तरी एवढे हे पतन । ओढवत ॥३३०॥
राग - द्वेष परी जाता आली हातात इंद्रिये
स्वामित्वें विषयीं वर्ते त्यास लाभे प्रसन्नता ॥६४॥
म्हणोनि विषय हे आघवे । सर्वथा मनातुनी काढावे । मग राग द्वेष स्वभावें । नष्ट होतील ॥३३१॥
रागद्वेष नष्ट होई । इंद्रिये तरि रमत विषयीं । परि ते बाधक ना काही । ऐक पार्था; ॥३३२॥
जैसा सूर्य आकाशीं असे । रश्मिकरांनी जगा स्पर्शे । परि त्या संसर्गदोषें । लिप्त होई काय? ॥३३३॥
तैसा विषयांठायी उदासीन । आत्मानंदीं तल्लीन । तो कामक्रोधविहीन । होऊनि असे ॥३३४॥
आणि जया विषयातहि ऐसे । आत्मस्वरूपाविण काही न दिसे । तयासी मग विषय कैसे - । कोठले बाधतील? ॥३३५॥
पाणी पाण्यात बुडेल । अग्नी आगीने पोळेल । तर विषयासंगे लिप्त होईल । पूर्णतया तो ॥३३६॥
ऐसा आत्मस्वरूपचि केवळ । होऊनि असे निखळ । तयाची प्रज्ञा अचळ । निःसंशय मानी ॥३३७॥
प्रसन्नतेपुढे सर्व दुःखे जाती झडूनिया
प्रसन्नतेने बुद्धीची स्थिरता शीघ्र होतसे ॥६५॥
पहा प्रसन्नता अखंडित । असे जेथ चित्तात । शिरकाव न तेथ समस्त । संसारदुःखां ॥३३८॥
जैसा अमृताचा निर्झर । प्रसवे जयाचे जठर । तया तहानभुकेचा अडसर । कधीचि नसे ॥३३९॥
तैसे ह्रदय प्रसन्न । तर दुःख कैसे कोठून? । परमात्मस्वरूपीं सहजी जडून । राहे बुद्धी ॥३४०॥
जैसा निवार्यातील दीप । सर्वथा न जाणे कंप । तैसा स्थिरबुद्धी स्वस्वरूप । योगयुक्त ॥३४१॥
अयुक्तास नसे बुद्धि त्यामुळे भावना नसे
म्हणूनि न मिळे शांति शांतीविण नसे सुख ॥६६॥
योगयुक्त होण्याचा विचारही । ज्याचे अंतःकरणीं नाही । तो जाण गोवला जाई । विषयपाशीं ॥३४२॥
तया स्थिरबुद्धी पार्था, । कधीचि नाही सर्वथा । आणि स्थैर्याची आस्था । तीही न उपजे ॥३४३॥
निश्चलत्वाची भावना । जर शिवेनाही मना । तर शांति कैसी अर्जुना, । लाभणार? ॥३४४॥
जेथ शांतीचा जिव्हाला नाही । तेथ सुख न शिरे चुकूनही । जैसा पाप्याचे ठायी पाही । मोक्ढ न गवसे ॥३४५॥
अग्नीत भाजलेले । बीज जर अंकुरले । अशांता सुखप्राप्ती हे आगळे । तरचि घडू शके ॥३४६॥
म्हणोनि अस्थिरपण मनाचे । तेचि सर्वस्व दुःखाचे । याकारणें इंद्रियांचे । दमन इष्ट ॥३४७॥
इंद्रिये वर्तता स्वैर त्यांमागे मन जाय जे
त्याने प्रज्ञा जशी नौका वार्याने खेचली जळी ॥६७॥
ही इंद्रिये जे जे म्हणती । ते तेचि जे करिती । ते तरले तरी न तरती । विषयसागर ॥३४८॥
जैसी नाव तीरा लागे । तोंचि तुफान होय जागे । तर जे संकट टाकी मागे । तेचि ओढवे ॥३४९॥
तैसे सिद्धपुरुषेंही जाण । कौतुकें केले इंद्रियलालन । तर तोही जाईल व्यापून । संसारदुःखें ॥३५०॥
म्हणूनि इंद्रिये ज्याने विषयातूनि सर्वथा
ओढूनि घेतली आत त्याची प्रज्ञा स्थिरावली ॥६८॥
म्हणोनि आपुली आपण । इंद्रिये केली स्वाधीन । तर अधिक काय त्याहून । सार्थक धनंजया? ॥३५१॥
पहा कासव ज्यापरी । सुखावले अवयव पसरी । अथवा स्वेच्छेने आवरी । आपणचि; ॥३५२॥
तैसी इंद्रिये असती स्वाधीन । जयाने म्हटले ते करिती जाण । तयाची प्रज्ञा परिपूर्ण - । स्थिर असे ॥३५३॥
आता आणिक एक गहन । परिपूर्णाचे लेक्षण । अर्जुना तुज सांगेन । ऐक अगा ॥३५४॥
सर्व भूतांस जी रात्र जागतो संयमी तिथे
सर्व भूते जिथे जागी ज्ञानी योग्यास रात्र ती ॥६९॥
भूतमात्रां आत्मस्वरूपाविषयी अज्ञान । तेथचि तया प्राप्त आत्मज्ञान । जीव देहादि प्रपंचात गढून । तेथ तो निद्रिस्त ॥३५५॥
तोचि तो निरुपाधिक । तोचि स्थिरबुद्धी देख । जाण निरंतर एक । मुनीश्वर तोचि ॥३५६॥
न भंग पावे भरताहि नित्य
समुद्र घेतो जिरवूनि पाणी
जाती तसे ज्यात जिरूनि भोग
तो पावला शांति न भोगलुब्ध ॥७०॥
आणिकही परींनी पार्था । तो जाणता येईल पुरता । जैसी सागरीं शांतता । अखंडित ॥३५७॥
जरि सरिताओघ समस्त । दुथडी भरूनि तया मिळत । तरि किंचितही न वाढत । मर्यादा न सोडी ॥३५८॥
वा ग्रीष्मकाळीं सरिता - । सर्व आटुनी जाता । उणावेना पार्था । समुद्र जैसा; ॥३५९॥
तैशी लाभता ऋद्धिसिद्धी । विचलित न हो तयाची बुद्धी । आणि न लाभे तर न बाधी । असंतोष तया ॥३६०॥
सांग सूर्याचे घरीं । प्रकाश काय वातीवरी ? । की न लावावी तर अंधारीं । कोंडेल तो? ॥३६१॥
ऋद्धिसिद्धी तयापरी । आली गेली स्मरण न करी । तो निमग्न असे अंतरीं । महासुखीं ॥३६२॥
जो आपुल्या संपन्नतेत । इंद्रभुवना तुच्छ लेखित । कैसा भिल्लांच्या पालात । रमेल तो? ॥३६३॥
जो अमृताही नावे ठेवी । तो जैसा कांजी न सेवी । तैसा आत्मसुखानुभवी । क्षुल्लक मानी ऋद्धीही ॥३६४॥
पार्था, नवल हे येथ । स्वर्गसुख नसे गणतीत । ऋद्धिसिद्धींचा तेथ । काय पाड? ॥३६५॥
सोडूनि कामना सर्व फिरे होऊनि निःस्पृह
अहंता ममता गेली झाला तो शांतिरूपाचि ॥७१॥
ऐसा आत्मज्ञानें तोषला । जो परमानंदें पोषला । तोचि स्थितप्रज्ञ भला । ओळख तू ॥३६६॥
तो अहंकारा ठोकरुनी । सर्व कामना सोडुनी । विश्वरूप होवोनि । वावरे विश्वातचि ॥३६७॥
अर्जुना स्थिति ही ब्राह्मी पावता न चळे पुन्हा
टिकूनि अंतकाळींहि ब्रह्मनिर्वाण मेळवी ॥७२॥
निःस्सीम ही ब्रह्मस्थिती । निष्काम जे अनुभविती । परब्रह्मा ते पावती । अनायासे ॥३६८॥
कारण चिद्रूपीं मिळता । देहान्तीची व्याकुळता । अडवू न शके प्राज्ञचित्ता । जिचेयोगें; ॥३६९॥
तीचि ही स्थिती । स्वमुखें श्रीपती । अर्जुना सांगती । संजय म्हणे ॥३७०॥
ऐसे श्रीकृष्णवाक्य ऐकिले । तेव्हा अर्जुनें मनीं म्हटले । आता आमुचे कामचि जाहले । विचारें या ॥३७१॥
अवघ्या कर्ममात्रा आता । येथ देवांनी निषेधिता । माझेही युद्धकृत्या आता । मिळे विराम ॥३७२॥
ऐसा श्रीअच्युताचिया बोला । धनुर्धर चित्तीं संतोषला । आता प्रश्न करील भला । शंकित होउनी ॥३७३॥
तो प्रसंग असे सुंदर । सर्व धर्मांचे सार । की विवेकामृतसागर । अमर्याद ॥३७४॥
जी स्वयें श्रीसर्वज्ञनाथें । निरूपिली कथा श्रीअनंतें । ती ज्ञानदेव सांगेल येथे । निवृत्तिदास ॥३७५॥