७१
[ तुरुंग . श्रीकृष्णाच्या व सुदामाच्या नांवांचा जयजयकार करीत लोक येतात . आघाडीवर भैरव व कुक्कुट असतात . विश्वकर्मा येतांच तुरुंगाचे दरवाजे आपोआप खाडकन् सताड उघडतात . ]
भैरव : धनशेठी ! धनशेठी ! आपला गांव सोन्याचा झालाय् !
कुक्कुट : ( सुशीलेस ) मातोश्री ! श्रीकृष्णमहाराजांचे प्रतिनिधि विश्वकर्मा आले आहेत .
सुशीला : पण ते कुठं आहेत ? ते आले का द्वारकेहून ?
विश्वकर्मा : ( हात जोडून ) मातोश्री ! सुदामदेव इयक्यांत येतीलच ...
[ इंद्रसेन व चंपाराणी ह्यांना घेऊन शिपाई येतात . ]
विश्वकर्मा : डांबून टाका ह्यांना कोठडींत !
सुशीला : ह्यांना बंदिवास ? नको नको .... सोडा ह्यांना ....
विश्वकर्मा : पण श्रीकृष्णमहाराजांची तशी आज्ञा आहे . माझा नाइलाज आहे .
[ लोक श्रीकृष्ण - सुदामांचा जयजयकार करीत जातात . ]
७२
[ सुदामाचा वाडा . सुशीला , श्रीधर , धनशेठी वगैरे . नगरिकांचा विराट् मेळावा . विश्वकर्मा लोकांना उद्देशून बोलत आहे . ]
विश्वकर्मा : लोक हो ! कालयवनाच्या दास्यांतून आजपासून कपिलानगरी मुक्त झाली आहे . आतां ह्यापुढं ह्या नगरीत राजे सुदा म देव आहेत . सुदामदेव येईपर्यंत दे धनशेठी इथला कारभार पाहातील ! तरी सर्वांनीं त्यांच्या आज्ञा पालन कराव्यात . ( सुशीलेस ) मातोश्री ! मला आतां आज्ञा असावी . येतों मी ...
[ वंदन करून विश्वकर्मा जातो . सर्व मंडळी श्रीकृष्ण - सुदामांचा जयजयकार करतात . ]
७३
[ राजमहाल . श्रीधर राजपुत्रासारखा नटला आहे . सुशीला जुन्या वस्त्रांतच आहे . जवळच अलंकार - वस्त्रांचीं ताटें घेऊन दासी उभ्या आहेत . ]
श्रीधर : आई -- आई ! मी बघ कसा नटलोंय् ! तूं पण दागिने घाल ...
[ लगबगीनें कुक्कुट - भैरव वगैरे येतात . ]
कुक्कुट : ( सुशीलेस ) चला , चला , राणीसरकार !
भैरव : सार्या गांवांत आनंदीआनंद उसळला आहे !
कुक्कुट : उत्साहाला महापूर आला आहे !
सुशीला : पण माझा आनंद .... माझा उत्साह अजून कुठं परतला आहे ?
[ दरबारी राजेशाही पोशाखांत धनशेठी येतो . ]
धनशेठी : सुदामदेव इतक्यांत येतील . त्यांच्या स्वागतासाठींच सारा गांव सामोरा निघाला आहे ... आपणहि चलावं ....
सुशीला : तुम्ही जा . त्यांचं आनंदानं स्वागत करा ....
धनशेठी : पण मातोश्री ! आपल्या पुण्याईनंच हें भाग्य चालून आलंय् !
कुक्कुट : आपण साक्षात् राज्यलक्ष्मी !
भैरव : आपणच सुदामदेवांचं प्रथम स्वागत केलं पाहिजे !
सुशीला : जा . घेऊन या त्यांना . मीहि सज्ज राहतें त्यांच्या स्वागतासाठीं .
धनशेठी : आज्ञा देवी ! ( वंदन करून सर्व जातात . )
७४
[ सुदामा गांवच्या वेशीवर येतो . वेशीवरले रक्षक वगैरे पाहून आपण पुन्हां द्वारकेला आलों कीं काय , असा त्याला भ्रम पडतो . तो पुन्हा परत वळून लगबगीनें चालूं कागतो . कुक्कुट - भैरव वगैरे येऊन त्याच्यामागून धावतात . ]
कुक्कुट : ( सुदामास अडवून ) महाराज ! महाराज ! परत कुठं निघालांत ?
सुदामा : नाहीं ... नाहीं .... मी कृष्णाला पुन्हा भेटणार नाहीं ... त्याच्याकडे जाणार नाहीं ... द्वारकेचं नांव नको मला !
कुक्कुट : पण महाराज , ही द्वारका नव्हे . ही आपलीच कपिलानगरी आहे .... आतां ही सोन्याची सुदामनगरी झाली आहे !
सुदामा : ( गोंधळून ) सुदामनगरी ? सोन्याची सुदामनगरी ?
कुक्कुट : साक्षात् द्वारकानगरीच !... मला आपण ओळखलं नाहीं ? ( लाचारपणें हंसून ) मी तो आपला कुक्कुटशास्त्री ! आम्ही सारे आपलीच वाट पाहात आहोंत ! तो पाहा ... सारा गांव आपल्या स्वागतासाठीं लोटला आहे !
[ इतक्यांत सुदामाचा जयजयकार करीत लोक पालखी घेऊन येतात . धनशेठी , श्रीधरहि येतात . सारेजण सुदामाला वंदन करतात . ]
श्रीधर : बाबा ... बाबा ! ( सुदामाला मिठी मारतो . सुदामा त्याला आपादमस्तक न्याहाळतो व हलकेच दूर लोटतो . )
धनशेठी : ( हात जोडून ) महाराज , पालखींत बसावं !
[ सुदामा कांहींच न बोलतां फक्त एकदां पालखीकडे व धनशेठीकडे बघतो . लोक पुन्हा जयजयकार करतात . तो थांबविण्याचें सुदामा हातांनीं सुचवितो . जयजयकार थांबतो . सुदामा मुकाट्यानें चालूं लागतो . आणि लोकहि त्याच्यामागाहून चालूं लागतात . ]
७५
[ सुदामा पुढें व लोक मागें अशी मिरवणूक शांतपणें सुदामाच्या वाड्याजवळ येते . लोक जयजयकार करतात . ]
सुदामा : ( हात जोडून ) हात जोडतों तुम्हींला ! माझा जयजयकार बंद करा !.... तुम्ही सारेजण जमलांत . पण इंद्रसेनमहाराज ... चंपाराणी ....?
धनशेठी : बंदिवासांत आहेत !
सुदामा : बंदिवासांत ?... त्यांना तात्काळ मुक्त करा !
धनशेठी : जशी आज्ञा !
[ धनशेठीच्या इशार्यावरून एक सेवक बंदिशाळेकडे जातो . सुदामा पुढें जाऊन उंबरा ओलांडणार तोच महाराणीसारखी सजलेली सुशीला पं चा रती घेऊन दासीजनांसह त्याला ओवाळातला येते . सुदामा चटकन् मागें सरतो व तिला आपादमस्तक न्याहाळतो . ]
कुक्कुट : ह्या आपल्या सुशीलादेवी .... महाराणी !
सुशीला : पंचारती ओंवाळते !
सुदामा : नको - नको ! आधीं हीं अलंकार - वस्त्रं उतरून ठेव ! मला बघवत नाहीं हें ऐश्वर्य . ( तोंड फिरवितो . )
सुशीला : असं काय करायचं तें ? आपल्याच पुण्याईनं हें राजवैभव घरीं चालून आलंय् !
सुदामा : ही सारी श्रीकृष्णाची माया आहे ! श्रीकृष्णाला आरत्या ओ वा ळा ! श्रीकृष्णाची पूजा करा ! श्रीकृष्णाचा जयजयकार करा !
धनशेठी : बोला , द्वारकाधीश श्रीकृष्णमहाराजांचा जयजयकार !
[ लोक जयजयकार करतात . ]
सुशीला : पण आतां आपण ह्या सुदामनगरीचे अधिपति आहांत !
धनशेठी : आमचे राजे आहांत !
सुदामा : मी राजा नाहीं ! श्रीकृष्ण खरा राजा ! राजांचा राजा ! विश्वसम्राट !
सुशीला : आपण त्यांचे परम मित्र .... गुरुबंधू !
सुदामा : नाहीं . नाहीं . कृष्णाला मित्र म्हणवून घेण्याची माझी योग्यताच नाहीं . श्रीकृष्णच खरा मित्र ... जगन्मित्र ! श्रीकृष्णच ज्ञानाचा सागर ... पूर्णावतार आहे ! मी अज्ञानी आहें ... अपूर्ण आहें ... पामर आहें ! मला हें वैभव नको !.... हे राजपद नको ...( चालूं लागतो . )
सुशीला : ( आडवून ) पण आम्हांला सोदून कुठं चाललांत !
सुदामा : कृष्णानं मला फसविलं ! ह्या मायामोहांत गुरफटून टाकून मला दुर्बल केलं ! दारिद्र्य हेंच माझं सामर्थ्य होतं !.. माझं वैभव होतं ! पण तें हिरावून घेऊन आज कृष्णानं मला दीन दुर्बळ बनविलं ! ( गहिंवरून ) अरेरे ! कृष्णा ! कृष्णा ! काय रे केलंस हें ? मला मोहांत पाडून माझी परिक्षा का आरंभली आहेस तूं ? ठीक आहे . आतां तुझं दर्शन होईपर्यंत तुझ्या नावांचा जप करीत मी अस्सा इथंच बसून राहणार !
[ एकदम बैठक मारून सुदामा श्रीकॄष्णाचें भजन सुरूं करतो . लोकहि त्याच्या भजनाला साथ करूं लागतात . ]
७६
[ सुदामा भज नक रीत बसला आहे . इंद्रसेन व चंपाराणी येऊन त्याचे पाय धरतात व क्षमा मागतात . दिवसामागून दिवस चालले आहेत . एकविसावा दिवस उजाडला आहे . सुदामाचें प्रायोपवेशन चालूच आहे . आसन्नमरणावस्थेंतहि त्याच्या मुखांतून ’ कृष्ण कृष्ण ’ असा जप क्षीण स्वरांत चालला आहे . इतक्यांत श्रीकृष्णाचा रथ येऊन उभा राहतो . श्रीकृष्णाचें दर्शन होतांच ’ श्रीकृष्णमहाराजांचा जयजयकार ’... असा प्रचंड जयघोष लोक करतात . सुदामा डोळे उघडून पाहतो . श्रीकृष्ण धांवत येऊन सुदामाला मिठी मारतो . ]
श्रीकृष्ण : सुदामा ! सुदामा ! काय चालवलंस हें ? आज एकवीस दिवस झाले ....
सुदामा : आत्मशुध्दीसाठीं ... तुझ्या दर्शनासाठीं !
श्रीकृष्ण : पण तूं तर महाज्ञानी , परम पावन पुण्यारूप ....
सुदामा : नाहीं - नाहीं . मी पामर आहें .... अज्ञानी आहें ! तसं नसतं तर मी न मागतां हें ऐश्वर्य तूं मला कां दिलं असतंस ?
श्रीकृष्ण : ज्ञानदानाचं पवित्र कर्तव्य करीत असतांना तुहा योगक्षेम निरंतर सुरळीत चालावा म्हणूनच तुझा संसार मी सुखाचा केला . आतां प्रपंचाची चिंता न करतां निर्वेधपणें जगाला अखंड ज्ञानदान कर !
सुदामा : पण हें राजपद मला कशाला दिलंस ?
श्रीकृष्ण : राजपद स्वतःच्या उपभोगासाठीं नसतं ! लोकांच्या सेवेसाठीं असतं ! ना विष्णुःपृथिवीपतिः ! राजा म्हणजे परमेश्वराचा प्रतिनिधि !
सुदामा : खरं आहे . मग दे तर तुझ्या खडावा .( चटकन् श्रीकृष्णाचा पायांतल्या खडावा घेऊन त्या वंदनपूर्वक मस्तकीं धारण करतो . ) समस्त प्रजाजन हो ! सुदामनगरीच्या सिंहासनावर श्रीकृष्णाच्या ह्या पादुकाच अधिष्ठित होतील ! श्रीकृष्णानं दिलेलं हें राज्य माझं नव्हे ! तुमचं आहे .... तुम्हां सर्वांचं आहे ! बोला , द्वारकाधीश श्रीकृष्णमहाराजांचा जयजयकार !
[ लोक जयजयकार करतात , श्रीकृष्ण सुदामाला गाढ आलिंगन देतो . तेजोमय आकाशांत शंख - चक्र - गदाधारी श्रीविष्णूची चतुर्भुज हसरी मूर्ति प्रकट होते . श्रीकृष्ण - सुदामावर आकाशांतून पुष्पपृष्टि होते . ]