३१
[ सुदाम्याच्या घरासमोर दवंडीवाला थाळी वाजवून दवंदी पिटतो . सुधीला व श्रीधर दारांत असतात . ]
दवंडीवाला : ऐका हो ऐका ! आजपासून सुदामा ब्राह्मणाला वाळींत टाकलंय् हो ! त्याच्याशीं कोणींही कोणत्याही प्रकारें संबंध ठेवूं नये हो !
[ दवंडी ऐकून सुधीला व श्रीधर खिन्नपणें घरांत जातात . ]
( १ ) देवघरांत सुदामा देवापुढें हात जोडून बसला आहे . सुशीला व श्रीधर तेथें येतात .
सुशीला : वाळींत टाकलं आपणांला ?
सुदामा : होय .
श्रीधर : पण बाबा , बाबा , वाळींत टाकलं म्हणजे काय हो ?
सुदामा : माणसांनीं आपणाला दूर केलं !... पण अजून देवानं दूर लोटलेलं नाहीं ! देव आपला आहे . आपण देवाचे आहेंत !
सुशीला : पण आतां गांवांतलीं मुलं शिकायला येणार नाहींत . पाठशाला बंद पडणार !
सुदामा : श्रीहरीची इच्छा !
[ इतक्यांत त्याला बाहेरून धनशेठीच्या हाका ऐकूं येतात . तो उठून बाहेर जातो . ]
( २ ) पडवींत धनशेठी उभा असतो . सुदामा येतो .
सुदामा : ( हात जोडून ) या - या धनशेठी ! आज बरी गरिबाच्या घरीं पायधूळ झाडलीत ? ( फाटकें घोंगडे अंथरतो . ) बसा .... बसा ....
धनशेठी : बसत नाहीं आतां . उभ्या उभ्या आलोंय् . उद्यांपासून आमच्या घरची देवपूजा तुमच्याकडे !
सुदामा : अहो , पण आमच्यावर बहिष्कार टाकलाय् गांवानं !
धनशेठी : गांवानं नव्हे ! मूठभर लोकांनीं तुमचा दावा साधलाय् उभा गांव तर तुमच्या पाठीशीं उभा आहे !
सुदामा : श्रीहरीची कृपा ! होतं तें सारं बर्यासाठींच होतं . पण धनशेठी , आपले नेहमींचे उपाध्ये ते कुक्कुटशास्त्री ....
धनशेठी : त्यांनीं आम्हांला नकार दिला . सभेंत आम्हीं तुमची बाजू घेतली ना ?.... आतां आजपासून तुम्हीच आमचे उपाध्ये ... पुरोहित ... सर्व कांहीं ! बरय् .... येऊं मी आतां ? ( नमस्कार करून जाऊं लागतो . परत वळून ) हो . बरी आठवं झाली . आणखी एक विनंती आहे . आज कृष्णजन्माचा दिवस आहे . तेव्हां तुमच्या प्रेमळ भजनाचा लाभ आमच्या घराच्या मंडळींना लाभला पाहिजे .....
सुदामा : अवश्य ! अवश्य ! आज रात्रीं आमचं भजन तुमच्या घरीं !
धनशेठी : सहकुटुंब फराळालाच या
सुदामा : ठीक , ठीक . ( धनशेठी जातो . ) श्रीहरि ! श्रीहरि !
सुशीला : देवानंच हाक ऐकली . एवढा श्रीमंत पण किती सज्जन , कनवाळू !
सुदामा : जगांत असे भले लोकही आहेत . म्हणून तर जग चाललंय् ! श्रीहरि ! श्रीहरि !
३२
[ इंद्रसेन व चंपाराणी सोंगट्या खेळत बसलीं आहेत . एक सोंगटी जोरानें मारून चंपाराणी पट उधळून देते व मोठ्यांदा हसते . ]
चंपाराणी : अखेर , मींच मात केली कीं नाहीं ?
इंद्रसेन : पण ह्यांत नवीन काय आहे ? नेहमींच तुमची आमच्यावर मात असते प्रत्येक बाबतींत !
[ इतक्यांत भैरव व कुक्कुटशास्त्री कांहीं ब्राह्मणांसह घाबर्याघाबर्या येतात . ]
भैरव : महाराज ! महाराज ! आमचं रक्षण करा !
कुक्कुट : आम्हांला वांचवा हो !
चंपाराणी : काय , झालं काय ?
भैरव : धर्म करतां कर्म !
कुक्कुट : फद म्हणतां ब्रह्महत्या !
भैरव : आमची सुरी नि आमचाच गळा !
इंद्रसेन : म्हणजे ?
भैरव : सुदाम्यावर आम्हीं बहिष्कार घतलाय् !
कुक्कुट : आणि सार्या गांवानं आतां आमच्यावर बहिष्कार घातलाय् !
चंपाराणी : तो कसा काय ?
भैरव : वाणी धान्य देत नाहीं ...
कुक्कुट : विणकरी कापड देत नाहीं ....
भैरव : कुणीही धर्मकर्माला बोलावीत नाहीं ....
कुक्कुट : फार काय पण आमच्याशीं धड बोलायलाही कुणी तयार नाहीं .
भैरव : जगायचं कसं , हा प्रश्न पडलाय् ...
कुक्कुट : गांवानं आमचा छळ मांडलाय् !
चंपाराणी : तुमचा छळ नव्हे . ह्यांच्या सत्तेचा उपहास मांडलाय् गांवानं !
इंद्रसेन : ( ताडकन् उठून रागानें ) आत्तां सारा गांव ताळ्यावर आणतों . हा इंद्रसेन कोण आहे ? ह्या गांवचा सर्वसत्ताधारी आहे !.... माझं सामर्थ्य अजून लोकांना ठाऊक नाहीं ...
चंपाराणी : पण मला ठाऊक आहे ना ? बसा खालीं मुकाट्यानं ! ( इंद्रसेन बसतो . ) अशा वेळीं सत्तेचा दिमाखा दाखवायला जाल तर .....
भैरव : लोकगंगा जास्तच खवळेल ...
कुक्कुट : प्रकरण फारच चिघळेल .
चंपाराणी : आजच प्रळय उसळेल ... तेव्हां शक्तीपेक्षां युक्तीनंच ...
भैरव : सार्या तंट्याचं मूळच उखडून काढलं पाहिजे .
चंपाराणी : तुम्ही निश्विंत असा . पुन्हा मला संध्याकाळीं भेटा .
[ ’ आज्ञा बाईसाहेब !’ असे म्हणून नमस्कार करून भैरव - कुक्कुट जातात . ]
३३
[ धनशेठीच्या वाड्यांत सुदाम्याचें भजन सुरू असतें . सुशीला व श्रीधरही भजनांत आहेत . गांवकर्यांचा मोठा मेळावा जमला असून भजनांत रंगून गेला आहे . गोपालकृष्ण। जयजय कृष्ण ... असा कृष्णाचा गजर चालतो . ]
३४
[ इंद्रसेनाचा महाल . भैरव व कुक्कुट चंपाराणीच्या कानाशीं कांहींतरी कुजबुजतात तिची मुद्रा आनंदानें फुलते . ]
चंपाराणी : भजनांत दंग आहे सुदामा .... धनशेठीच्या वाड्यांत !... जन्मभर भजनच करीत बैस म्हणावं मेल्या आतां ! अरे , दिवट्या पेटवा ... दिवट्या पेटवा !
[ कांहीं लोक भैरव - कुक्कुटाच्या मागून पेटते पलिते घेऊन सुदाम्याच्या झोपडीकडे धावतांना दिसतात . ]
३५
[ कांहीं गांवकरी घाबर्या घाबर्या सुदामाकडे धनशेठीच्या वाड्यांत येतात . येथें कृष्णनामाचा गजर सुरूच असतो . ]
लोक : अहो , धावा ! धावा ! सुदामजींच्या झोपडीला आग लागली !
धनशेठी : आग ? सुदामजींच्या झोपडीला आग ? अहो सुदामजी ! आग ... आग ....
[ सुदामा कृष्णभजनांत डोळे मिटून दंग असतो . ]
सुशीला : ( सुदाम्याला हालवीत ) अहो , डोळे उघडा ! उठा - उठा !.... आपल्या झोपडीला आग लागली ...
सुदामा : ( भानावर येऊन ) काय ? आग लगली ? झोपडीला ?