५१
[ नागरिकांच्या घोळक्यांत सुदामा वाड्याच्या प्रवेशद्वाराशीं येतो व तसाच पुढें चालूं लागतो . द्वारपाळ अडवितात .
१ शिष्ट : ( द्वारपाळास ) अहो , हे महाराजांचे बंधु .... गुरुबंधु आहेत !... बाळमित्र आहेत !
२ शिष्ट : ह्या भटजीमहाराजांना आधीं वंदन करा !( सर्व हसतात . )
सुदामा : अहो , मला असं आडवतांय् कां ? मल कृष्णाला भेटायचं आहे ... फार लांबून आलोंय् हो मी !
१ द्वारपाळ : तिकडे त्या मंडळींत उभें राहा .
२ द्वारपाळ : महाराजांचं दर्शन होईल ... दक्षिणाही मिळेल .
१ नागरिक : ( कुचेष्टेनें ) पण हे दक्षिणेसाठीं आलेले नाहींत . ह्यांना महाराजांना फक्त भेटायचं आहे ....
२ नागरिक : अगदीं कडकडून भेटायचं आहे हो !
३ नागरिक : जाऊं दे ह्यांना राजसभेंत .
१ द्वारपाळ : पण आज रोजच्याप्रमाणं मुक्तद्वार नाहीं .
२ द्वारपाळ : ह्या वेळीं राजसभेंत महाराजांच्या विजयदिनाचा समारंभ चालला आहे ... देशोदेशींचे राजे महाराजे आले आहेत ...
१ नागरिक : हे महाराजदी त्याचसाठीं आले आहेत ...
१ द्वारपाळ : ह्या वेळीं नजराण्यांचा समारंभ चालला आहे .
२ नागरिक : मग ह्यांनींहीं कांहीं तरी मोलाचा नजराणा आणला असेलच कीं ! काय हो बाळमित्र ! गुरुबंधु ! कांहीं भेटबीट आणलीय् का ?
सुदामा : ( बावरून ) भेट ?... हो , हो ... नाहीं ... नाहीं ...( पोह्यांची मोटली चांचपतो . ) पण मला जाऊं द्या हो ! दुरून तरी कृष्णाचं दर्शन घेऊं दे ...
१ नागरिक : ( द्वारपाळास ) सोडा ह्यांना आंत ... महाराजांनीं ह्यांना पाहिलं तर ...
२ नागरिक : ते ह्यांना आपल्या शेजारीं सिंहासनावर बसवतील !
३ नागरिक : कां नाहीं बसवणार ? कसें झालें तरी हे त्यांचे बाळमित्र ... गुरुबंधु !
( १ ) सारेजण हसतात . सुदामा तसाच चटकन् पुढें सटकतो . त्याला मागें खेचण्यासाठीं द्वारपाळ त्याच्या मागून धावतात .
( २ ) सुदामा राजसभेंत पाऊल टाकतो . द्वारपाळ त्याला खेंचून नेऊं लागतात . त्याच वेळीं कृष्णाची नजर सुदाम्याकडे जाते . एका राजाचें नजाराण्याचे ताट बाजूला करून श्रीकृष्ण चटकन् सिंहासनावरून उठतो व तसाच सुदाम्याकडे धावतो . सर्व सभाजन उठतात . द्वारपाळच काय पण सारी राजसभा हा विलक्षण प्रकार पाहून आश्वर्यानें थक्क होते .
( ३ ) श्रीकृष्ण लगबगीनें येऊन ’ सुदामा ! सुदामा !’ असें म्हणत सुदाम्याचे पाय धरतो .
सुदामा : हें काय ? हें काय ? कृष्ण ! ( श्रीकृष्णाला वर उठवतो . )
श्रीकृष्ण : तूं विद्वान् ब्राह्मण ! म्हणून प्रथम तुला वंदन केलं . आतां माझा बाळमित्र म्हणून ...
[ श्रीकृष्ण सुदाम्याला कडकडून मिठी मारतो . सुदाम्याच्या नेत्रांतून आनंदाश्रु घळघळतात . कृष्ण्लाही गहिंवरून येतें . ]
श्रीकृष्ण : मित्रा सुदामा ! किती वर्षांनीं भेटलासरे ! चल ... चल ...
[ सुदाम्याला हातातला धरून श्रीकृष्ण सिंहासनाकडे घेऊन जातों . सर्व सभाजन सुदाम्याला वंदन करतात . राजसभेचें ऐश्वर्य पाहून सुदामा भांबावून जातो . चहूंकडे बावरलेल्या नजरेनें वाहात असतो . ]
( ४ ) श्रीकृष्ण - सुदामा सिंहासनाकडे येतात . सुदामा खालीं बसूं लागतो . पं श्रीकृष्ण त्याला आग्रहानें सिंहासनावर बसवितो व मग आपण त्याच्या शेजारी बसतो . सभाजन बसतात . नजराणे देण्याचें कार्य पूर्ववत् सुरू होतें .
५२
[ सुदाम्याची टवाळी करणारे लोक वरील प्रकार दुरून पाहातात व घाबरतात . ]
१ : अरे , खरंच त्याला महाराजांनीं सिंहसनावर बसविलं !
२ : अगदीं आपल्या शेजारीं !
३ : कुणी थोर महात्मा देसतोय् !
४ : अन् तुम्हीं त्याची टवाळी केलीत !
१ : आम्ही नव्हे ... तुम्ही ... तुम्हीच !
२ : पण हा वाद कशाला ? आतां पळा येथून घेऊन ...
३ : महाराजांना कळलं तर ...
४ : आपणं सर्वांनाच शासन होईल !
५३
[ राजसभा . श्रीकृष्ण उभा राहून बोलत असतो . ]
श्रीकृष्ण : राजमंडळाला मी माझ्या बालमित्राचा परिचय करून देतों . दे सुदामदेव ! माझे गुरुबंधु ! विद्वत्तेंत साक्षात् सांदीपनी ! ह्यांच्या आकस्तिक अकल्पित आगमनानं आज माझा आनंद शतगुणित झाला आहे . प्रवासानं शिणलेल्या माझ्या मित्राला सभा संपेपर्यंत तिष्ठत ठेवणं बरं नव्हे . तेव्हां ...
सुदामा : छे छे ! मी बसतों कीं ! चालू दे तुझं ...
श्रीकृष्ण : ( सुदामास ) तुला ह्या वेळीं विश्रांतीची जरूर आहे . ( राजसभेत उद्देशून ) तेव्हां उरलेल्या भेटी उद्यां स्वीकारल्या जातीत , क्षमस्व !
[ श्रीकृष्ण सर्वांना वंदन करओ व सुदाम्याच्या हाताला धरून चालू लागतो . सारे सभाजन उठून त्या दोघांना वंदन करतात . ’ द्वारकाधीश कृष्णमहाराजांचा जयजयकार !’ असा प्रचंड जयघोष होतो . ]
५४
[ रुक्मिणीचा महाल . रुक्मिणी हिंदोळ्यावर बसली असून वीणावादनानें दासी तिचें मनरंजन करीत आहेत . इतक्यांत एक दासी लगबगीनें येते . ]
दासी : ( हात जोडून ) राणीसरकार ! महाराजांची स्वारी इकडे येत आहे . महाराजांच्या बरोबर एक दरिद्री ब्राह्मण आहे ....
रुक्मिणी : दरिद्री ब्राह्मण ?
[ इतक्यांत श्रीकृष्ण सुदाम्यासह येतो . रुक्मिणी चटकन् उठते . दासी वंदन करून जातात . ]
श्रीकृष्ण : होय , दरिद्री ! धनानं दरिद्री ! पण मनानं कुबेर ! हा माझा गुरुबंधु , परममित्र सुदामा ! विद्वत्तेचा सागर ... भक्तीचं माहरेघर !
रुक्मिणी : म्हणजे ? आपण ज्यांची नेहमीं आठवण काढीत असतां तेच का हे सुदामदेव ?
श्रीकृष्ण : होय .( सुदामास ) ही रुक्मिणी !
सुदामा : विदर्भाची राजकन्या !
श्रीकृष्ण : तुझी बहिनी ! ( रुक्मिणीस ) नमस्कार कर ह्याला ...( रुक्मिणी वांकून नमस्कार करते . सुदामा भांबावून राजमहालाचें ऐश्वर्य पाहाण्यांत दंग असतो . )
श्रीकृष्ण : अरे ए बावळटा ! असा आ वासून कुठं बघतो आहेस ? तुझ्या वहिनीला आशीर्वाद दे ....
सुदामा : अष्टपुत्रा सौभाग्यवती भव !
श्रीकृष्ण : सत्यभामा , जांबुवंती , कालिंदी , भद्रावती ... कुठं आहेत सार्याजणी ? ह्याच्या स्नानाची ... भोजनाची तयारी करा ... जा जा लवकर ...
[ रुक्मिणी दासीजनांसह जाते . सुदाम्याच्या गळ्यांत हात टाकून श्रीकृष्ण हिंदोळ्यावर बसतो . ]
५५
कृष्णकांता : चला सखींनो , सुदामजींचा करुं आदरसत्कार
प्रेमळ पाहुणचार !
करा सिध्दता झतपट सारी
उष्ण सुवासिक जलें सत्वरी
स्नान घालुं या सुदामदेवा
भभ्यंगच साचार !
हलक्या हातें कृशांग चोळुनि
लावुं सुंगवी तेलें , उटणीं
विप्रोत्तम हा सखा प्रभुंचा
भक्तिभाव साकार !
वसनालंकारें नव सजवुनि
रत्नजडित चौरंगी बसवुनि
यदुवर पूजित जीवेंभाव
ज्ञानाचा अवतार !
[ वरील गाणें म्हणत कृष्णकांता सुदाम्याच्या स्नानाची तयारी करतात . सुदाम्याचें अभ्यंगस्नान होतें . श्रीकृष्ण त्याला बहुमोल उंची वस्त्रें देतो . तीं परिधान करून सुदामा चौरंगावर बसतो . श्रीकृष्ण त्याची यथासांग पाद्यपूजा करून त्याच्या चरणांचे तीर्थ घेतो . ]
श्रीकृष्ण : अग , पण तुम्ही अशा स्वस्थ हात जोडून उभ्या कां ? ह्या भूदेवाला .... माझ्या गुरुबंधूला नमस्कार करा !
रुक्मिणी : भूदेव ! नमस्कार करतें ( वांकून नमस्कार करते . )
सुदामा : अष्टपुत्रा सौभाग्यवती भव !
[ सत्यभामा नमस्कार करते . ]
श्रीकृष्ण : ( सुदाम्यास ) ही तुझी वहिनी सत्यभामा !
सुदामा : अष्टपुत्रा सौभाग्यवती भव !
[ अशा रीतीनें कृष्णकांता एकीमागून एक अशा , सुदाम्याला वांकून नमस्कार करूं लागतात . प्रत्येकाला आशीर्वाद देतां देतां सुदामा थकून जातो . त्याच्या तोंडून शब्द फुटेनासा होतो . पुढें पुढें तो नुसतें ’ भव - भव ’ असें म्हणूं लागतो . ]
सत्यभामा : ( हंसून ) सुदामदेवा ! आशीर्वाद देतां देतां इतक्यांतच थकलांत ?
सुदामा : ( श्रीकृष्णास ) अरे श्रीकृष्णा ! तुझ्या स्त्रिया आहेत तरी किती ?
रुक्मिणी : आम्ही एकंदर सोळा हजार एकशें आठ कृष्णकांता आहोंत ! आतांपर्तंय पुरत्या शंभरजणींनींही नमस्कार केले नाहींत !
जांबुवंती : आतां आम्ही सर्वजणी एकदमच वंदन करतों आपणांला !
श्रीकृष्ण : छान युक्ति काढलीस जांबुवंती !
[ सार्याजणी एकदमच नम्रपणें सुदाम्याला वंदन करतात . ]
सुदामा : अष्टपुत्रा सौभाग्यवती भव !... पतिप्रिया भव !
श्रीकृष्ण : ए भल्या गृहस्था ! अष्टपुत्रा काय म्हणतोस ? एकपुत्रा म्हण !... तुझ्या आशीर्वादानं प्रत्येकीला आठ आठ पुत्र झाले तर मला दुसरी द्वारकानगरी वासवावी कागेल ना ?
सुदामा : मग ? तुला काय कमी आहे ?
[ सर्वजण हांसतात . इतक्यांत कांहीं दासी नजराण्यांचे ताटें घेऊन येतात . ]
रुक्मिणी : ( दासींना ) काय ग हें ?
१ दासी : महाराजांना मिळालेले नजराणे !
२ दासी : अमात्यांनीं देवींना पाहाण्यासाठीं पाठविले आहेत .
सत्यभामा : तिकडे महालांत नेऊन ठेव .( दासी जातात . )
श्रीकृष्ण : अरे हो ! बरी आठवण झाली . सुदामा ! तूं कांहीं भेट म्हणूं मला आणलं आहेस हीं नाहीं ?
सुदामा : तुला ?.... भेट ?
श्रीकृष्ण : हो ... काय आणलंस ?... अरे गप्प कां ? बोल ना ... काय आणलीस भेट ? भामा , ह्याचं गांठोडं कुठं आहे ग ?
सत्यभामा : तिकडे रुक्मिणीदेवींच्या महालांत असेल ....
रुक्मिणी : होय . तिकडेच आहे ... आणतें हं ! ( जाते . )
श्रीकृष्ण : वहिनीनं कांहीं तरी भेट दिलीच असेल माझ्यासाठीं ...
सत्यभामा : दिलीय् तर ! साधी भेट नव्हे ... पृथ्वीमोलची भेट ! खरं ना भावोजी ?
श्रीकृष्ण : उगीच काय ग अशी थट्टा करताय् माझ्या मित्राची ?
सत्यभामा : आमचा हक्क आहे भावजींची थट्टा करायचा ! होय ना हो भावोजी ?
जांबुवंती : आम्हांलाहि कांहीं तरी धाडलं असेल जाऊबाईंनीं ...
[ इतक्यांत रुक्मिणी सुदामाचें बोचकें घेऊन येते व सोडूं लागते . ]
सत्यभामा : कांहींच दिसत नाहीं ह्या बोचक्यांत ... सगळा ठणठणाट ... गाठीं बरीक सत्राशें साठ ! ( बोचकें सोडून बघते . )
श्रीकृष्ण : ( पोह्यांची पोटळी घेऊन ) हें - हें दिसतंय् कांहीं तरी ! सुदामा , काय रे आहे हें ?
सुदामा : अरे हो .... विसरलोंच ! तिनं तुला दिलंय् हें !
श्रीकृष्ण : ( पोटळी सोडून पाहून ) पोऽऽहे !
रुक्मिणी : इश्श ! पोहे ?
सत्यभामा : आम्हाला वाटलंकांहीं मेवा - मिठाई ... फराळाचं ...
जांबुवंती : लाडू -- करंज्या - चकल्या ...
सत्यभामा : येतय् मागाहून गाडा भरून ! डोळे लावून बसा तिकडे ...
रुक्मिणी : जाऊबाईंनीं काय पाठविलं अप्रूपाईचं , तर म्हणे पोहे ... !
जांबुवंती : आणि तेहि पसाभरच !
[ श्रीकृष्ण हंसत हंसत पोह्यांचा बकणा भरतो . ]
श्रीकृष्ण : वाः ! वाः ! किती गोड आहेत हे पोहे ! अमृताची रुचे आहे ह्यांना ... इथं आमच्या द्वारकेंत असले नसतात .
[ श्रीकृष्ण पोह्यांची दुसरी मूठ भरूं लागतो . रुक्मिणी त्याचा हात धरते . ]
रुक्मिणी : पण असं एकट्यानंच काय खायचं तें ?
सत्यभामा : म्हटलं , आमचाहि वांटा ह्यांत आहे .
श्रीकृष्ण : मग घ्या कीं ... तुम्हीहि खा . तुमचीं पंचपक्वान्नं तुच्छ आहेत ह्या पोह्यापुढं !
[ रुक्मिणी व सत्यभामा पोहे खातात . सुदामाला तें पाहून आनंदानें भरतें येतें . ]
जांबुवंती : पण हें हो काय , भामादेवी ? आम्हांला नको का भावजींचा प्रसाद ?
श्रीकृष्ण : अग , चटणी झाली सार्या पोह्यांची ! हा घे थोडा प्रसाद ! ( घांसभर पोहे हातावर ठेवतो )
जांबुवंती : पण मूठ मूठ तरी प्रत्येकीला ...
श्रीकृष्ण : मूठ मूठ म्हटलं तरी शंभर खंडी पोहे हवेत तुम्हां सार्याजणींना ! हें घ्या ... एक एक कण बघा वांटणीला आला तर ! ( सर्व पोहे देऊन टाकून फडकें झटकतो . )
सुदामा : कृष्णा , पोहे तुला खरंच आवडले ?
श्रीकृष्ण : अरे , आवडले म्हणजे ? फारच आवडले . पोहे मला नेहमींच आवडतात . त्यांतून हे तुझे ... माझ्या परम मित्राचे ... सुदाम्याचे पोहे !
रुक्मिणी : हो पण भावोजींनीं आमच्यासाठीं कांहींच कसं आणलं नाहीं ?
सत्यभामा : निदान एक एक खण तरी ?
श्रीकृष्ण : एक एक खण ? म्हणजे किमान सोळा हजार एकशें आठ खण !... खणाऐवजीं आतां एक एक धागा काडून घ्या ह्याच्या कपड्यांचा
रुक्मिणी : हो - हो . अस्संच करूं या . भामादेवी , हें गांठोडं तुमच्याजवळ ठेवा ... देऊं नका भावोजींना .
सत्यभामा : मग सावकाशीनं धागे मोजूं आपण ...( सार्याजणी हंसतात . )
श्रीकृष्ण : बरं पण माझा मित्र भुकेजला आहे ... नि तुम्हांला सुचतेय् थट्टा ! चला , वाढा बघूं लवकर .( सर्वजणी जातात . )
सुदामा : ( भरल्या डोळ्यांनी पाहात ) कृष्णाऽऽ !
[ एक दासी येते . ]
दासी : ( हात जोडून ) महाराज ! भोजनाची सिध्दता आहे . ( जाते . )
श्रीकृष्ण : चल , सुदामा !
सुदामा : कृष्णा , तुला एक सांगायचं आहे रे !
श्रीकृष्ण : एक कां ? लाख सांग ना . पण आतां आधीं जेवायला चल .