४१
[ धनशेठीचा मळा . झोपडीपुढील आंगणांत लोक भजनासाठीं जमले आहेत . चांदणी रात्र आहे . लोक आपसांत कुजबुजतात . ]
१ ... ही दवंडी म्हणजे शुध्द अन्यान आहे .
२ ... जुलुमाचा कळस आहे .
३ ... मग आज भजन होणार कीं नाहीं ?
४ ... आज तर सारा गांव मुद्दाम लोटणार भजनाला दवंडी ऐकून ...
[ धनशेटी येतो . आंतून सुदामा येतो . सर्वांना नमस्कार करतो . ]
धनशेठी : सुदामदेव !
सुदामा : बसा बसा मंडळी ! बसा धनशेठी !
धनशेठी : म्हणजे ? अज भजन होणार ? दवंडी कानांवर आली ना ?
सुदामा : आले ! तरी पण रोजच्याप्रमाणं भजन होणारच !
धनशेठी : पण ....
सुदामा : पण काय ? अन्यायापुढं मान तुकवायची ? कदापि नाहीं .
धनशेठी : पण इंद्रसेन सर्वसत्ताधीश आहे . सत्तेपुढं शाहणपण नाहीं !
सुदामा : इंद्रसेन इथला राजा असेल तर आम्हीही आमचे राजे आहोंर ! आम्ही कुणाचं भजनपूजन करायचं , हें इंद्रसेन कोण ठरवणार ? श्रीकृष्ण आमचा देव आहे !
धनशेठी : हो ! पण इंद्रसेनाला तसं वाटत नाहीं ...
सुदामा : हा ज्याच्या त्याच्या श्रध्देचा प्रश्न आहे . वास्तविक , देवाचं नावं मनांतल्या मनांतही घेतां येतं . पण अन्यायी इंद्रसेनाची जुलुमी आज्ञा मोडण्यासाठींच ....
धनशेठी : मुक्तकंठानं आम्ही आमच्या देवाच्या नांवाचा जयघोष करणार !
सर्व लोक : बोला , द्वारकाधीश गोपालकृष्ण महाराजांचा जयजयकार !
[ सर्वजण त्रिवार जयजयकार करतात . सुदामा भजन सुरू करतो . ]
सुदामा : कृष्णसखा आमुचा
दयाघन कृष्णसखा आम्य्चा
आम्हाला छंद हरिभक्तिचा !
आम्हाला जगीं काय हो कामी !
राजे आमुचे आम्ही !
आभाळाचें छत्र शिरवर
धर्णीचे सिंहासन सुंदर
अनंत हा विस्तार आमुच्या
दिगंत साम्राज्याचा !
कृष्णसखा आमुचा !
घुमत चलाचलिं मंजुळ मुरली
अणुरेणुंत नटला वनमाळी
भय न आम्हांला कळिकाळाचें
हरि सांगाती आमुचा !
कृष्णसखा आमुचा !
[ भजन संपल्यावर ’ कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण ’ अशी धून सुरू होते . इतक्यांत राजदूत येतात . ]
अधिकारी : बंद करा ... हें भजन बंद करा ! ए सुदाम्या ! बंद कर भजन ! कृष्णाचं नांव घ्यायचं नाहीं !
सुदामा : तें कां ? देवाचं नामस्मरण करण्याचा हक्क प्रत्येकाला आहे .
अधिकारी : ( शिपायांस ) पकडा रे ह्याला !
[ शिपाई सुदामाला धरायला धावतात . धनशेठी मध्यें येतो . ]
धनशेठी : खबरदार सुदामजींच्या अंगाला हात लावाल तर !
अधिकारी : चल हो बाजूला !
[ अधिकारी धनशेठीला बाजूला ढकलून सुदाम्याच्या अंगावर धावतो . लोक त्याला अडवितात . चकमक झडते . एकजण अधिकार्याच्या अंगावर काठी घेऊन धावतो . सुदामा ’ थांबा - थांबा ’ असें ओरडत पुढें येतो . तोंच अधिकार्याचा दंडुका त्याच्या डोक्यावर पडून खोक फुटते . सुदाम बेशुध्द पडतो . लोक जास्तच खवळतात . शिपाई पळ काढतात . लोक त्यांचा पाठालाग करतात . धनशेठी व सुशीला सुदाम्याला उचलून झोपडींत नेतात . ]
उत्तरार्ध
४२
[ भैरव व कुक्कुट घाबर्या घाबर्या इंद्रसेनाकडे धावत येतात . ]
भैरव : महाराज !... महाराज !....
इंद्रसेन : अरे , कां उगीच कोकलतांय् ?
कुक्कुट : दंगल उडाली !... भयंकर दंगल उडाली !
भैरव : चकमक झडली !... डोकीं फोडलीं !
[ चंपाराणी येते . ]
चंपाराणी : डोकीं फोडलीं ? कोणीं ? कुणाचीं ?
भैरव : लोकांनी शिपायांचीं डोकीं फोडलीं !
चंपाराणी : पण सुदाम्याचं काय झालं ?
कुक्कुट : त्याला जबर मार बसलाय् डोक्यावर एव्हांना राम म्हटला असेल त्यानं .
भैरव : सुदाम्या घायळ झाला म्हणूनच लोक जास्त खवळलेत !
इंद्रसेन : माझी तरवार कुठं आहे ? तरवार ! तरवार ! ( उगीचच धावधाव करतो . )
[ एक सेवक नंगी समशेर आणून देतो . ]
चंपाराणी : कशाला तरवार ? कुठं निघालांत ?
इंद्रसेन : लोकांचीं डोकीं उडवतों ...( जाऊं लागतो . )
चंपाराणी : ( अडवून ) डोकं आहे का तुम्हांला ? ह्याच तरवारीने लोक तुमचं डोक उडवतील !
इंद्रसेन : ( घाबरून ) असं ? ( तरवार त्याच्या हातांतून गळून पडते . ) मग आतां करायचं कसं ?
चंपाराणी : सर्वांना पकडून भराभर तुरुंगांत डांबायचं !
इंद्रसेन : ठीक ! ठीक ! तुरुंगांत डांबायचं ! आतां नाहीं थांबायचं !
४३
[ धनशेठीच्या मळ्यांतली झोपडी . सुदामा शुध्दीवर आला आहे . सुशीला व धनशेठी त्याच्या बिछान्याजवळ आहेत . ]
धनशेठी : आतां नाहीं थांबायचं !... जुलुमी सत्तेशीं सुरू झालेलं आमचं भांडण आतां नाहीं थांबायचं !
[ एक इसम येतो . ]
इसम : ( धनशेठीस ) चला - चला . लवकर . गांवांत मोठी दंगल पेटलीय् ... लोकांना पकडून भराभरा तुरुंगांत डांबताहेत .
धनशेठी : पाहा सुदामदेवा ! दंगल ... धरपकड ... तुरुंग ! आतं हें सत्र सुरू झालं !
इसम : शिपाई तुमच्याही शोधांत आहेत .
धनशेठी : असूं देत .... घाबरूं नकोस ... आलोंच मी .... जा तूं ( इसम जातो . ) सुदामजी . पुन्हा एकदा हात जोडून विनंती करतों ... श्रीकृष्णाकडे जाऊन आमची हांक त्याच्या कानांवर घाला . ह्या पापाच्या नरकांतून आमचा उद्धर श्रीकृष्णाकडे दुसरा कोण करणार ?
सुदामा : खरं आहे .
धनशेठी : म्हणून म्हणतों , विचार करा . गांवाच्या वतीनं तुम्हांला विनवितों . मायभूमीच्या उध्दाराचं पुण्य पदरीं घ्या ! ( जातो . )
सुशीला : धनशेठींचं म्हणणं खरंच मनावर घ्यावं . द्वारकेला जाऊन श्रीकृष्णांना भेटावं ...
सुदामा : माझ्या बाळमित्राला भेटायला मीही मनांतून अत्यंत अधीर झालोंय् ग ! पण ....
सुशीला : पण काय ?
सुदामा : तो द्वारकेचा राजा ! अन् मी हा असा दीन दरिद्री !
सुशीला : पण संकोच कसला त्यांत ? स्वतःसाठीं थोडंच कांहीं मागायचं आहे त्यांच्याजवळ ? फक्त दीन - दलितांची ... रंजल्यागांजल्यांची हांक त्यांच्या कांनीं घालायची आहे . गांवासाठीं जायचं . स्वतःसाठीं थोडंच जायचं आहे ?
सुदामा : जनसेवा म्हणजेच ईश्वरसेवा ! गुरुदेवांनींच सांगितलंय् ...
सुशीला : होय ना ? मग कधीं जाणार ?
सुदामा : उद्याचं !
सुशीला : उद्याचं ?
४४
[ दुसर्या दिवशी सकाळीं सुदामा द्वारकेस जाण्यास निघाला असून सुशीला त्याचे कपडे व शिदोरी बांधून देते . ]
सुदामा : येतों .... सांभाळून राहा ... मुलांना सांभाळ ... लवकरच परत येतों . श्रीहरि श्रीहरि !
सुशीला : जपून जायचं .... प्रकृतीला सांभाळून असायचं . प्रवास दूरचा आहे . झेपेल ना प्रकृतीला ?
सुदामा : अग , ती चिंताच नको . श्रीकृष्णाची भेट होणार म्हणतांच माझ्या अंगांत भीमाचं बळ संचारलंय् ! ( हसतो . ) बराय् !... धनशेठींचा निरोप घेऊन तसाच पुढं जालू लागतों .
[ सुदामा जातो . सुशीला भरल्या डोळ्यांनी दारांत उभी राहते . इतक्यांत श्रीधर येतो . ]
श्रीधर : आई आई ! बाबा कुठं गेले ग ?
सुशीला : द्वारकेला ! कृष्णदेवांना भेटायला !
श्रीधर : द्वारकेला ? तर मग आतां खूप खूप सोनं आणतील बाबा द्वारकेहून ! होय ना ग आई ? कृष्णदेवांची द्वारका सोन्याची आहे ना ग ?... बाबा गेले द्वारकेला ... द्वारकेला ! ( टाळ्या पिटून नाचतो . ) पण आई , मला भूक लागली ग !
सुशीला : भूक लागली तर काय देऊं बाबा खायला ? थोडंसं होतं तें त्यांना वाटेला बांधून दिलं ... थांब , जराशानं पेज करून देतें हं !
श्रीधर : पण आई , परवां तूं त्या लक्षूबाईंचे पोहे कांडलेस ना ?... त्यांनीं दिलेत कीं थोडे पोहे ! ते असतील कीं !
सुशीला : पोऽऽहे ! हो ... बरी आठवण केलीस . माझ्या लक्षांतच आलं नाहीं बघं .
[ सुशीला पोहे काढते . तिच्या मनांत एक विचार चमकतो . श्रीधरला ती थोडे पोहे देते आणि उरलेले धडका कपडा शोधून त्यांत बांधते . ]
श्रीधर : आई , बांधून कशाला ठेवतेस ? मला आणखी दे ना ग !
सुशीला : अरे , कृष्णदेवांना देण्यासाठीं ...
श्रीधर : कृष्णदेवांना ? अग मग हे देखील घे ... मला नकोत ... सगळेच कृष्णदेवांना दे ...
सुशीला : किती शाहाण आहे ग माझं बाळ ! ( मुका घेते . )
श्रीधर : पण आई , कृष्णदेवांना हे पोहे आवडतील ना ते खातील ना हे ?
सुशीला : कां नाहीं खाणार ?
भावभक्तिचा सदा भुकेला
दीनजनांचा कैवारी
विदुराघरच्या कण्या खातसे
आवडीनें श्रीहरी !
श्रीधर : पण आई , कुणाबरोबर देणार हे ? बाबा तर गेले !
सुशीला : अजून असतील धनशेठींकडे ! त्यांना एवढे देऊन येतें हं !
[ पोह्यांची मोटली घेऊन सुशीला लगबगीनें जाते . ]
४५
[ धनशेठींच्या वाड्यांत लोक जमले असून सुदाम्याला निरोप देण्याचा समारंभ चालला आहे . त्याला कुंकुमतिलक लावून सुवासिनी पंचारत्या ओवाळतात . धनशेठी त्याच्या गळ्यांत पुष्पहार घालतो व नमस्कार करतो . ]
धनशेठी : सुदामदेव ! आम्हां सर्वांच्या शुभेच्छा तुमच्याबरोबर आहेत ... विजय मिळवून या ! श्रीकृष्णांना म्हणावं , दानवांच्या दास्यांतून आमची लवकर मुक्तता करा !
सुदामा : तुमचा संदेश श्रीकृष्णाला सांगून शक्य तें सर्व कांहीं करतों .
धनशेठी : इकडची ... कुटुंबाची चिंता करूं नका .
[ इतक्यांत पोह्यांची मोटली घेऊन सुशीला येते . ]
सुशीला : ( सुदामाला मोटली देऊन ) एवढं सांभाळून न्यावं .
सुदामा : काय हें ?
सुशीला : पोहे !... गरिबाची भक्तिभेट !
सुदामा : द्वारकाधीश श्रीकृष्णाला ?
सुशीला : होय . राजाच्या भेटीला रिक्त हस्तानं जाऊं नये ...
सुदामा : असं शास्त्रवचन आहे खरं .( हसतो . ) बराय् ! येतों मंडळी ! ( नमस्कार करतो . )
धनशेठी : बोला ! द्वारकाधीश गोपालकृष्ण महाराजांचा जयजयकार ! सुदामदेवांचा जयजयकार !
[ सर्व लोक जयजयकार करतात . सुदामा जातो . ]
धनशेठी : ( सुशीलेस ) मातोश्री , कांहीं लागलं संवरलं तर लेकराला आज्ञा करा . संकोच करू नका ...
सुशीला : आपणांसारख्या देवमाणसांची कृपा ..( जाते . )
[ शिपाई येतो . ]
शिपाई : ( धनशेठीस ) इंद्रसेन महाराजांनीं लगोलग बोलावलंय् , चला असेच ...
धनशेठी : हो पुढं . आलोंच ...