सुदाम्याचे पोहे - भाग २१ ते २५

प्रस्तुत प्रकार हा चित्रकथा आहे , हे वाचल्यावर प्रत्यक्ष त्या काळाचा भास होतो


२१

[ ब्राह्मणांचें भोजन होऊन ते जाण्याचा तयारींत पडवींत उभे आहेत . ]

सुदामा : ( हात जोडून ) फार फार आनंद झाला . गरिबाघरची मीठभाकरी गोड करून घेतलीत ....

१ ब्राह्मण : मीठभाकर ? अहो , पंचपक्वान्नांपेक्षांही रुचि होती अन्नाला !

२ ब्राह्मण : अंतरात्मा संतुष्ट झाला !( ढेकर देतो )

१ ब्राह्मण : सुदामदेव ! तुम्ही धनानं दरिद्री असलांत तरी मनानं नवकोटनारायण आहांत !

२ ब्राह्मण : नारायण तुम्हांला अखंड सुखांत ठेवो ! ( ब्राह्मण जातात . )

२२

[ सुदामा स्वयंपाकघरांत येतो . ]

सुदामा : कांहीं उरलं असेल तर मुलाला वाढ .

सुशीला : त्याच्यापुरतंच आहे .

सुदामा : आनंद आहे ! आज आपली एकादशी ! बोलावतों त्याला .... श्रीधर ! बाळ श्रीधर ! जेवायला चल ...( श्रीधर येतो . )

सुशीला : ( पान वाढून ) बस जेवायला .

श्रीधर : अन् बाबाचं पान ?... अन् आई , तूं नाहीं जेवणार ?

सुशीला : तुझं होऊं दे , मग बसूं आम्ही जेवायला ....

श्रीधर : खोटं ! अन्न शिल्लकच नाहीं ...( मोकळी भांडी पाहातो . )

सुशीला : पुष्कळ आहे . तूं जेव मुकाट्यानं .

श्रीधर : आम्ही नाहीं जेवणार जा . तूं नि बाबा बसा जेवायला माझ्याबरोबर ...

सुशीला : बाळ , सगळ्यांना पुरणार नाहीं हें अन्न ....

श्रीधर : कां नाहीं पुरणार ? एक तीळ सातजणांनीं वांटून खावा , असं तुम्हीच सांगत असतां ना ?

सुदामा : ( श्रीधरचा मुका घेऊन ) भरलं माझं पोट !

[ सुशीलाही त्याच्या दुसर्‍या गालाचा मुका घेते . इतक्यांत बाहेर दारांत भिकारी ओरडल्याचे ऐकूं येतें . ]

भिकारी : वाढ गो माई !... कांहीं उरलं सुरलं अन्न आंधळ्याला दे गो माई !

श्रीधर : आई , रोजचा अंधळा आला ....

[ श्रीधर आपलें पान उवलून बाहेर पदवींत जातो . ]

२३

[ श्रीधर भिकार्‍याला पान वाढतो . सुदामा व सुशीला येतात . ]

सुदामा : छान ! सगळं दिलंस ना ?

सुशीला : तुमचाच मुलगा !

सुदामा : अन् तुझा नव्हे वाटतं ? ( हसतो . सुशीला लाजते . )

[ इतक्यांत एक श्रीमंताची बाई नोकराकरवीं धान्य घेऊन येते . ]

बाई : अहो सुशीलाबाई !

सुशीला : या .... या !

[ सुदामा घरांत जातो . बाई पदवींत येते . नोकर धान्याची पोती खालीं ठेवतो . ]

बाई : हे एवढे दोन पायली गहूं दळायचे आहेत ... अन् हे चार पायली तांदूळ सडायचे आहेत . मोलकरणी नीट सदत नाहींत . अन् मुख्य म्हणजे चोरतात हो ! मी म्हणतें , माणसानं मागून घ्यावं . चोरावं कां बरं ?

सुशीला : खरं आहे , कुणीं खुषीनं दिलं तर घ्यावं . मागायचं तरी कशाला ?

बाई : पीठ तेवढं संध्याकाळपर्यंत हवं आहे . तांदूळ उद्यां दिलेत तरी चालेल ... अन् हें तुमच्या श्रमाचं .( धान्यांची मोटली देते . ) येऊं आतां ?

सुशीला : थांबा , कुंकूं लावतें ....( कुंकूं लावल्यावर बाई जाते . सुदामा येतो . )

सुदामा : बघ , देवाला कशी काळजी आहे आपली ! घरांत धान्याचा कण नव्हता ना ? धान्य घरीं चालून आलं . थोडे गहूं - तांदूळ काढून दे .... तेल आणतों नंदादीपाला .

सुशीला : अन् थोडं तूपही आणावं फुलवातीला .

२४

[ रात्रीची वेळ . सुदामा पडवींत भजन सुरू करतो . ]

सुदामा : नंदाघरीं गोकुळीं

अवतरला श्रीहरी !

ब्रह्म सानुलें नाचत खेळत

यशोदेच्या मांडीवरी !

नव नवलाच्या दावुनि लिइला

भान जगाचें हरी !

जगासि पोशित विश्वंभर तो

दहीं - दूध - लोणी चोरुनि खातो

गोपगोकांसंगे खेळत

रंग - रास यमुना - तीरीं !

सान वयीं कालिया मर्दिला

पापी कपटी कंसहि वधिला

दीन अनाथांचा वाली प्रभु

गोवर्धनगिरिधारी !

अवतरला श्रीहरी !

२५

[ इंद्रसेनाचा वाडा . सुदाम्याचें भजन सुरू झाल्यामुळें त्रासलेली चंपाराणी लगबगीनें चौकांत येते . नोकरांना हाका मारते . दोन - तीन नोकर येतात . ]

चंपाराणी : ( एका नोकरास ) आत्तांच्या आत्तां जा नि त्या रंगा नर्तकीला घेऊन ये ...

नोकर : पण अशी आयत्या वेळीं येणार नाहीं ती .

चंपाराणी : आलंच पाहिजे तिला . माझा हुकूम आहे . जा लवकर ...( नोकर जातो . ) अन् तूं रे ... तूं सारा गांव गोळा करून आण ... वाड्यांत नाच - गाण्याला चला , म्हणून सर्वांना सांग ...( नोकर जातो . इंद्रसेन येतो . )

इंद्रसेन : नाचगाणं ? कधीं ? कुठं ? कुणाचं ?

चंपाराणी : इथं .... आत्तां ... रंगा नर्तकीचं !

इंद्रसेन : पण ही काय भलत्या वेळीं भलतीच लहर ?

चंपाराणी : आज त्या सुदाम्याचं भजन मला बंद पाडायचं आहे

इंद्रसेन : काय , बोलतांय् काय ?

चंपाराणी : रोज रोज मेल्याची कटकट ! अंथरुणावर अंग टाकायला अवकाश कीं झालाच सुरू ह्याच्या भजनाचा आक्रोश ! कान किटले ... डोळ्याला डोळा लागूं देत नाही मेला !... ऐका ... ऐका ( सुदाम्याचें भजन जोरानें ऐकूं येतें . ) पाहा , कसा टाहो मांडलाय् त्यानं ! कान आहेत ना जागेवर ?... तुमच्याच्यानं त्याला हाकलून देणं होत नाहीं ... मग असंच सतावलं पाहिजे त्याला .

इंद्रसेन : काय तुमची अक्कल ! शक्कल तर खूप काढलीत !

N/A

References : N/A
Last Updated : August 30, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP