५६
[ भोजनशाळा . चौरंगावर ताटें मांडलीं असून रुक्मिणी . सत्यभामा वगैरे राजस्त्रिया वाढीत असतात . श्रीकृष्ण व सुदामा येतात . ]
श्रीकृष्ण : ( सुदामास ) बैस . ( दोघे पानावर बसतात . ) आज किती तरी दिवसांनी आपल्या पंगतीचा योग आलाय् , नाहीं रे ?
सुदामा : होय तर . तपं लोटलीं ! गुरुदेवांच्या आश्रमांत ’ सहनौ भुनक्तु ’ म्हणून दर्भासनावर बसूण आपण जेवत होतों
श्रीकृष्ण : खरंच , आश्रमांतली मौज राजमंदिरांत नाहीं .
सुदामा : पण कृष्ण , त्या वेळीं तुझामुळंच आश्रमाला राजमंदिरची शोभा आली होती .
श्रीकृष्ण : आणि आज तुझ्यामुळंव हें राजमंदिर आश्रमप्रमाणांच पवित्र , पुण्यापावन बनलं आहे ! हं ! कर सुरुवात ! म्हण ... पारवतीपते हरहर म्हादेव !
[ सुदामा पानभोंवती उदक फिरवून चित्राहुति घालतो . आपोषण घेऊन घांस तोंडाजवळ नेतो पण लगेच बावरून तसाच बसून राहातो . ]
५७
[ कपिला नगरी ... कैदखाना .. अंधारकोठडी . सुशाला व श्रीधर एका कोठडींत आहेत . शेजारच्या कोठडींत धनशेठी कांहीं लोकांसह दिसतो . शिपाई त्यांच्यापुढें भाकरीचे शिळे तुकडे फेकतात . सारेजण त्यावर तुटून पडतात . पण धनशेठी स्वस्थ असतो . सुशीलाहि भाकरीला हात लावीत नाहीं . श्रीधर मात्र एक तुकडा उचलतो . ]
श्रीधर : आई , भूक लागली ग !
धनशेठी : ( सुशीलेस ) मातोश्री ! तुम्हीहि खा थोडं . उपास किती दिवस करणार ?
सुशील : श्रीकृष्णच्या नामामृतानंच पोटं भरतंय् माझं . द्वारकेहून होऊपर्यंत ....
श्रीधर : तूं खाणार नाहींस , तर मग बाबा येईपर्यंत मीहि कांहीं खाणार नाहीं .
[ भाकरी फेकून देतो . सुशीला त्याला कुरवाळते . ]
५८
[ द्दश्य ५६ पुढें चालूं ]
सुदामा : कृष्ण !
श्रीकृष्ण : हें रे काय खुळ्यासारखं ? हातांत घास घेऊन काय बसलाय ? जेवायला लाग .
रुक्मिणी : घरची आठवण झालेली दिसते भावोजींना .
श्रीकृष्ण : होय रे ?.... वहिनीला पण आणूं इकडे ...( सत्यभामेस ) लहानपणापासून हा असाच हळव्या मनाचा . एकदां काय झालं आश्रमांत ....( सुदामास ) हं ! लाग जेवायला . तूं जेवणार नहींस तर मीहि जेवणार नाहीं
सुदामा : तसं नव्हे रे !
श्रीकृष्ण : मग कसं रे !
[ सुदामा नाइलाजानें जेऊं लागतो . कृष्णहि हंसून जेवूं लागतो . ]
श्रीकृष्ण : अग भामा , ह्याला भाज्या , चटण्या - कोशिंबरी फार आवडतात . आणखी वाढ ....
सत्यभामा : वाढतें ना ! ( भाज्या - कोशिंबरी वाढते . )
रुक्मिणी : पण ती आश्रमांतली गोष्ट तशीच राहिली भावोजींची ....
श्रीकृष्ण : खरंच की ... एकदां असेच आम्ही जेवायला बसलों होतों . गुरुपत्नी वाढत होती . एवढ्यांत एका कुमारानं रनांत पकडलेला एक पोपट लाकडी पिंजर्यांत घालूण आणला . तो पोपट सारखा तडफडत होता . ओरडत होता . गुरुपत्नीनं त्याला फळं घातलीं खायला पण तो त्या फळांकडे ढुंकूनहि पाहिना . आम्ही आपले जेवत होतों . पण त्या पोपटाची ती केविलवाणी तडफड पाहून ह्या राजेश्रीचं
कोवळं मन कळवळलं . ह्यांच्या डोळ्यांतून गंगायमुना वाहूं लागल्या . तिकडे पिंजर्यांत त्या पोपटाचा आक्रोश अन् इकडे ह्या चिरंजीवांचं पानावर बसून रडणं !
सत्यभामा : अग बाई ! बरं मग ?
श्रीकृष्ण : मग काय ? मी उठलों नि त्या पोपटाला पिंजर्यातून काढून बाहेर सोडून दिलं !
रुक्मिणी : पोपट आनंदानं उडून गेला असेल .
श्रीकृष्ण : हो ... अन् मग आम्हीहि आनंदानं जेवलों . अग , ह्याला आणखी बासुंदी वाढ .
[ सत्याभामा बासुंदी वाढते . सुदामा ’ नको नको ’ म्हणतो . ]
सुदामा : कृष्णा , त्या वेळीं तो एकच पोपट बंदिवान् होऊन पिंजर्यात तळमळत होता . पण आतां ...
श्रीकृष्ण : आतां काय ? तूं आतां आमच्या तावडींत सांपडला आहेस . यजमानाच्या तंत्रानंच पाहुण्यानं चाललं पाहिजे . संकोच करूं नकोस . पोटभर जेव ...
सुदामा : जेवतोंय् रे ! पण तुला एक सांगायचं आहे ....
श्रीकृष्ण : कांहीं सांगूं नकोस . मला सारं ठाऊक आहे . वाटचालीच्या श्रमानं तुझी भूक मंदावली आहे .... जेवणानंतर वामकुक्षी झाली कीं चांगली हुषारी वाटेल तुला .
५९
[ श्रीकृष्णाचें शयनमंदिर . सुदामा व श्रीकृष्ण येतात . ]
श्रीकृष्ण : आतां भरपूर विश्रांति घे .... इथं मझ्याच मंचकावर ....
सुदामा : आणि तूं ?
श्रीकृष्ण : मी आहें शेजारच्या महालांत
[ इतक्यांत रुक्मिणी विडे आणते . श्रीकृष्ण एक विडा खातो व दुसरा सुदामाच्या तोंडात कोंबतो . ]
सुदामा : अरे . मी कधीं खात नाहीं विडा .
श्रीकृष्ण : अरे , हा गोविंदचा विडा आहे .
सुदामा : हो - पण तुझं ’ गोविंद ’ नांवच अष्टौप्रहर माझ्या तोंडांत आहे की ! तुझ्या नांवाचा विडा आणखी कशाला ? ( विडा खातो . )
श्रीकृष्ण : ( रुक्मिणीस ) ह्याला इथं निवांत झोपूं दे .( जातो . )
रुक्मिणी : ( दासींना ) भावोजींना झोप लागेपर्यंत वीणा - वादन ... विंझणवारा ...
दासी : आज्ञा देवी !
[ रुक्मिणी जाते . कांहीं दासी मंद मधुर वीणावादन सुरूं करतात . दोन दासी सुदामाला पंख्यानें वारा घालूं लागतात . सुदामा शय्येवर अंग टाकतो व डोळे मिटतो . ]
६०
[ बंदिशाळा . चंपाराणी एका अधिकार्यासह आली आहे . ]
चंपाराणी : ( सुशीलेला उद्देशून ) ही सटवी अन्न खात नाहीं काय ? एवढा मस्तवालपणा ?... ठीक आहे . आजपासून हिला पाणीहि देऊं नका ... अन्नपाण्यावांचून टांचा घांसून मरूं दे हिला ... हिचं अंथरून - पांघरूणहि काढून घ्य्या ... लोळूं दे हिला जमिनीवरच ....
[ सुशीला व श्रीधर एका फाटक्या कांबळ्यावर झोपलेलीं असतात . शिपाई त्यांना उठवून कांबळें काढून घेतो . ]
धनशेठी : ( चंपाराणीस ) चांडाळणी ! केवढं ग तुझं राक्षसी काळीज ! ह्या माउलीची नाहीं पण तिच्या पोराची तरी दया येऊं दे तुला ... थंडीनं कुडकुडत दगडावर पडणार तें ...
चंपाराणी : मरेना का कारटं ! ( भेसूरपणें हंसत निघून जाते . )