सुदाम्याचे पोहे - भाग ४६ ते ५०

प्रस्तुत प्रकार हा चित्रकथा आहे , हे वाचल्यावर प्रत्यक्ष त्या काळाचा भास होतो


४६

[ मळ्यांतल्या झोपडीवर एक शिपाई येतो . ]

शिपाई : सुदामभट ! अरे ए सुदामभट ! ( श्रीधर येतो . ) काय रे पोरा , तुझा बाप कुठं आहे ?

श्रीधर : बाबा गेले द्वारकेला !

शिपाई : द्वारकेला ?

श्रीधर : कृष्णदेवांना भेटायला !

[ तितक्यांत सुशीला येते . शिपाईला पाहून चपापते . ]

शिपाई : सुदामभट द्वारकेला गेलाय् ?

[ सुशीला गोंधळून गप्प राहाते . ]

श्रीधर : आईला काय विचारतां ? मी सांगतों ना ? बाबा खरंच द्वारकेला गेले !... आत्तांच गेले !

[ शिपाई घाईघाईनें जातो . ]

४७

[ इंद्रसेन व चंपाराणी . धनशेठी आला लाहे . भैरव - कुक्कुटशास्त्रीही आहेत . ]

कुक्कुट : महाराज , कालच्या कटांत हे नगरशेठही सामील होते

भैरव : आपली आज्ञा मोडण्यांत ह्यांचाच पुढाकार होता .

इंद्रसेन : खरं आहे का हें ?

धनशेठी : खरं आहे . भलताच जुलुमी निर्बंध कोण जुमानणार ?

चंपाराणी : अस्सं ! म्हणजे त्या कृष्णाचा उदो उदो आम्ही आमच्या राज्यांत मुकाट्यानं चालूं द्यावा म्हणतोस ?

इंद्रसेन : कृष्ण आमचा वैरी आहे .

धनशेठी : श्रीकृष्ण विश्वप्रेमाचं आगर ... करुणेचा सागर आहे !.... श्रीकृष्ण दुर्जनांचा वैरी आहे , पण सज्जनांचा कैवारी आहे !

कुक्कुट : वाहवा ! म्हणजे तुम्ही सज्जन आणि महाराज दुर्जन ! असंच ना ?

भैरव : कृष्णाची स्तुति प्रत्यक्ष महाराजांच्या समोर ?

चंपाराणी : तुमच्या कृष्णाचा सतरा वेळां प्रभाव केलाय् आम्हीं !

इंद्रसेन : आम्ही म्हणजे काय ?... आमच्या कालयवनमहाराजांनीं ! त्यांच्या भीतीनं तर तो तुमचा समुद्रांत द्वारकानगरी वसवून तिथं राहिला ! भेकड , पळपुटा कुठला !

धनशेठी : पण अखेर काय झालं ? कंस - जरासंधाप्रमाणंच ...

कुक्कुट : कालयवनमहाराजही कृष्णाच्या कपटाला बळी पडले !

इंद्रसेन : त्या कपटी कृष्णाला तुम्ही परमेश्वर समजतां ? त्याचं भजनपूजन करतां ?

धनशेठी : कृष्णनिंदेनं कशाला उगीच जीभ विटाळतां ?

इंद्रसेन : बस्स ! तें कांहीं नाहीं . आमच्या राज्यांत आमचंच भजनपूजन झालं पाहिजे !

कुक्कुट : अवश्य झालं पाहिजे . कृष्ण देव असेल तर इंद्रसेनमहाराज महादेव आहेत !

भैरव : देवाधिदेव आहेत !

धनशेठी : देवपण दैवी गुणांमुळं लाभत असतं . देवाचं देवपण तर दूरच पण माणसाची साधी माणुसकी देखील ज्याच्या अंगीं नाहीं ....

चंपाराणी : खबरदार ! खात्रीच झाली कीं सुदाम्यालाच काय , पण सार्‍या गांवाला तुझीच फूस आहे .

धनशेठी : दुर्जनांपासून सज्जानांचं संरक्षण करणं , हें देवकार्य आहे !

[ इतक्यांत शिपाई येतो . ]

चंपाराणी : काय रे ? कुठं आहे सुदाम्या ?

शिपाई : तो म्हणे द्वारकेला गेला ! आज ... आत्तांच ...

इंद्रसेन : ( घाबरून ) द्वारकेला ? कृष्णाला भेटायला ?

चंपाराणी : ( शिपायांस ) सेनापतींना म्हणावं , जलदी करा ... सुदाम्याचा पाठलाग करा . त्याला पकडून आणा . ( शिपाई ’ आज्ञा ’ म्हणून जातात . ) आणि तूं सुदाम्याच्या बायकोला इकडे घेऊन ये .( शिपाई जातो . धनशेठीस ) अकूण ह्या थरापर्यंत तुझं कृष्णकारस्थान रंगलंय् ! तूंच सुदाम्याला द्वारकेला धाडलंस ! होय कीं नाहीं ?

[ धनशेठी गप्प राहतो . शिपाई सुशीला - श्रीधरला घेऊन येतो . ]

चंपाराणी : ( सुशीलेस ) काय ग सटवे , तुझा नवरा कुठं आहे ? बोल . दांतखिळी बसली कीं काय ? कानाची किल्ली पिरगाळल्याखेरीज तुझ्या तोंडाचं कुलूप उघडायचं नाहीं ! ( जोरानें कान पिरगाळते . सुशीला ’ आई ग ’ असें किंचाळते . ) खरं सांग . तो द्वारकेला गेलाय् कीं नाहीं ? अंगाची चामडी सोलून काढीन ....

सुशीला : ते द्वारकेला गेलेत ! श्रीकृष्णांच्या दर्शनाला !

इंद्रसेन : साफ खोटं ? सुदाम्या कृष्णाकडे राजकारण करायला गेला आहे ! आमच्या विरूध्द कारस्थान ?.... आमच्या सत्तेला आव्हान ?

चंपाराणी : कालयवनमहाराज गेले तरी त्यांची सत्ता अजून शाबूत आहे .

धनशेठी : पण त्या जुलुमी सत्तेची धुंदी घातक आहे .

चंपाराणी : बंद कर थोबाड ! ( सुशीलेस ) अवदसे , अजून तुझं थोबाड उघडत नाहीं ? ( तिच्या थोबाडींत मारायला धावून जाते . धनशेठी मध्यें येतो . त्याच्या थोबाडींत बसते . )

धनशेठी : ( चंपाराणी ) खबरदार त्या माउलीच्या अंगाला हात लावशील तर !

चंपाराणी : पकडा ह्या राजद्रोह्याला ! अंधारकोठडींत डांबून टाका .... अन् ह्याच्याच शेजारीं हिलाही .....

[ शिपाई धनशेठी , सुशीला व श्रीधर ह्यांना अटक करतात . ]

इंद्रसेन : ह्यांच्या साथीदारांनाही बंदिशाळेंत धाडून द्या ह्यांच्या सोबतीला !

धनशेठी : इंद्रसेना ! बंदिशाळेची भीति कोणाला ? देशद्रोही दुर्जनांना !... तुझ्यासारख्या जुलुमी राज्यकर्त्यांना ! स्वतंत्र्याचा जन्म बंदिशाळेंतच होत असतो . समजलास ?

चंपाराणी : स्वतंत्र्याचा जन्म नव्हे पण तुमचा मृत्युमात्र बंदिशाळेंत होणार !

धनशेठी : मरणानं भय दुष्ट भेकडांना ! न्यायधर्मसाठीं लढणारा वीर मरणार मारून चिरंजीव होत असतो . इंद्रसेना , लक्षांत ठेव ! खवळलेल्या लोकगंगेच्या प्रवाहांत तुझी जुलुमी राजसत्ता पाचोळ्यासारखी वाहून जाणार अन् अखेर धुळीळेच मिळणार !

चंपाराणी : घेऊन जा ह्यांना ...( शिपाई येतो . )

शिपाई : महाराज , सुदाम्याला पकडायला घोडेस्वार रवाना झाले .

[ सुशीला व धनशेठी एकमेकांकडे घाबरून पाहाता . शिपाई त्यांना घेऊन जाता . ]

४८

[ पुढील द्दश्यें दिसतात . ]

( १ ) सुदाम्याला शोधण्यासाठीं घोडेस्वार धावतात .

( २ ) ’ कृष्ण हरि। जय कृष्ण हरि ’ असें भजन करित सुदामा द्वारकेला जात असतो .

( ३ ) घोडेस्वार त्याचा पाठलाग करतात .

( ४ ) दोन रस्ते फुटतात अशा एका ठिकाणीं सुदामा येतो व एका रस्त्यानें निघून जातो . तो गेल्यावर घोडेस्वार तेथें येतात व थांबतात .

अधिकारी : तुम्ही ह्या रत्स्यानं जा ... आम्ही इकडे जातों .

[ अर्धे स्वार एका रस्त्यानें व अर्धे दुसर्‍या रस्त्यानें जातात . ]

( ५ ) सुदामा चालतां चालतां हमरस्ता सोडून एका पायवाटेनें निघून जातो . तितक्यांत घोडेस्वार भरधाव येऊन सरळ निघून जातात .

( ६ ) दोन रस्ते मिळतात त्या ठिकाणी दोन्हीकडील घोडेस्वार पुन्हा एकत्र येऊन थांबतात .

अधिकारी : नाहीं ना सापडला सुदाम्या ?

१ स्वार : ( मान हलवून ) आडवाटेनं गेला असेल .

अधिकारी : छट ! सरळ टाकून आडवाटेनं कुठं जाईल मरायला ? चला , परत फेरा .

[ घोडेस्वार परत फिरतात . ]

४९

[ रानावनांतून आडवाटेनें जात असतां सुदामा गाणें म्हणूं लागतो . प्रवासांत पुष्कळ दिवस - रात्री जातात . श्वापदांचे अडथळे येतात . वार्‍यावादळाशीं सुदाम्या तोंड द्यावें लागतें . डोंगर - पहाड चढावे लागतात . घनदाट अरण्यें ओलांडावीं लागतात . नदीपार व्हाचें लागतें . तरी तो तसाच दमलाभागलेला वाट तुडवीत असतो .

सुदामा :

मित्र सुदामा तुझा

तुजकडे चालला श्रीकृष्णा !

पंचप्राण नेत्रांत दाटले

तुझिया शुभदर्शना !

हरि ! तुझी साजरी सोन्याची द्वारका !

परि मला खुलें तें सोन्याचें द्वार का ?

स्नरशील तरी का बाळपणींचा

स्नेह आपुला जुना ?

बसलास आश्रमीं मजसह दर्शासनीं

दिसशील आतां तूं माणिमय सिंहासनीं

मन तुझें बदल्या काळासंगें

पालटलें नाहिं ना ?

हें कृपासिंधु ! करि संशयाची क्षमा

तूं दीनबंधु करुणाघन पुरुषोत्तम !

होईन धन्य तव पुण्यादर्शनें

यदुराया , मोहना !

५०

[ सुदामा द्वरकेच्या वेशीवर येऊन द्वारपाळांजवळ चौकशी करतो . ]

सुदामा : अहो , श्रीकृष्णाचा वाडा कुठं आहे ?

१ द्वारपाळ : कां बरं ? तिथं कुणाला भेटायचं आहे ?

सुदामा : श्रीकृष्णाला भेटायचं आहे

[ द्वारपाळ सुदाम्याला आपादमस्तक न्याहाळतो . ]

१ द्वारपाळ : ( दुसर्‍या द्वरपाळास ) ह्या भटजीबुवांना खुद्द महाराजांना भेटायचं आहे .

२ द्वारपाळ : खरं का हो ? ( सुदाम्याचें डोकें फिरलें आहे , असें खुणेनें सुचवितो . ) उद्यां सकाळीं दानशाळेंत जा . तिथं भेटतील महाराज .

१ द्वारपाळ : अन् दानदक्षिणाही भरपूर मिळेल .

सुदामा : पण मला दान .... दक्षिणा नको आहे .

१ द्वारपाळ : ( चेष्टेनें त्याच्याच स्वरांत ) मग आपल्याला काय हवं आहे ?

सुदामा : श्रीकृष्णाची भेट !

१ द्वारपाळ : अगदीं कडकडून भेटणार का ?

सुदामा : होय तर .... तेवढ्यासाठींच फार लांबून आलोंय् ... श्रीकृष्ण माझा मित्र आहे .

दोघे द्वारपाळ : तुमचे मित्र ? श्रीकृष्णमहाराज ? ( हसतात . )

सुदामा : अहो , थट्टा नव्हे . खरंच तो माझा बाळमित्र आहे ?

[ इतक्यांत कांहीं लोक तेथें येतात . ]

१ द्वारपाळ : पाहा .... पाहा ... हे महाराजांचे बाळमित्र ...

२ द्वारपाळ : ( त्यांना कडकडून भेटायला आले आहेत . ( सर्व हसतात . )

१ शिष्ट : मह खरंच ते . हसताय् काय असे ? आमचे महाराज जगन्मित्र आहेतचेहेही त्यांचे मित्रच !

सुदामा : बाळमित्र ! अन् शिवाय , गुरुबंधु ! कृष्ण माझा गुरुबंधु आहे !

२ शिष्ट : घ्या ! ऐका हें ! नुसते मित्र नव्हेत हं ! तर गुरुबंधु !

३ शिष्ट : शक्य आहे . महाराज दीनबंधु आहेतच . हे त्यांचे बंधुच !

४ शिष्ट : पण काय हो बाळमित्र , गुरुबंधु ! आपण आलांत कुठून ? गोकुळांतून ?

सुदामा : छे , छे ! विदर्भांतून आलोंय् मी !

१ शिष्ट : विदर्भांतून ? वाहवा ! म्हणजे महाराजांना सासुरवाडीहून वाटतं ? वा ! गुरुबंधु !

२ शिष्ट : बाकी तुमच्यांत नि आमच्या महाराजांत पुष्कळच साम्य आहे . श्रीकृष्णमहाराज साक्षात् नारायण !

३ शिष्ट : अन् हे त्यांचे बंधु दरिद्रीनारायण !

४ शिष्ट : महाराज द्वारकेचे राजे !

१ शिष्ट : अन् हे भिकार्‍यांचे राजे ! ( सारेजण हसतात . सुदामा ओशाळतो . )

थांबा . हसू ह्यांना मोठ्या सन्मानानं महाराजांकडे घेऊन गेलं पाहिजे .

१ द्वारपाळ : होय तर ! हे महाराजांचे बाळमित्र गुरुबंधु !

२ द्वारपाळ : चलावं भटजीबुवा !

१ शिष्ट : भटजीबुवा काय म्हणतांय् ? भटजीमहाराज म्हणा ! चलावं भटजीमहाराज !

२ शिष्ट : ( चोपदाराप्रमाणें पुढें येऊन ओरडतो . ) सावधान ! सावधान ! श्रीकृष्णमहाराजांच्या बाळमित्रांची ... गुरुबंधूंची स्वारी येत आहे हो ! बाजूला व्हा ! नमस्कार करा !....

[ सुदामा चालूं लागतो . सारेजण कुचेष्टेनें हसत त्याच्या मागून जाऊं लागतात . ]

N/A

References : N/A
Last Updated : August 30, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP