सुदाम्याचे पोहे - भाग ११ ते १५


प्रस्तुत प्रकार हा चित्रकथा आहे , हे वाचल्यावर प्रत्यक्ष त्या काळाचा भास होतो


११
[ कृष्ण व सुदामा रस्त्यानें चालत असतां सुदामा एकदम थांबतो . ]
सुदामा : कृष्णा , जा आतां परत . अजून किती लांब येणार तूं ?
कृष्ण : तुला सोडून जाऊं नयेसंच वाटत रे !
सुदामा : कृष्ण , कशाला एवढा जगावेगळा स्नेह जोडलास ? तूं श्रीमंत .... मी दरिद्री !
कृष्ण : मग ? हीच खरी मत्री !
सुदामा : कृष्णा , मला विसरूं नकोस हं ! ( एकदम दोन्ही हातांनीं तोंड झाकून घेऊन रडू लागतो . )
कृष्ण : सुदाम्या , हें काय खुळ्यासारखं ? मी तुला विसरेन , असं तुला वाटतं तरी कसं ? वेडा कुठला ! पूस डोळे ....( त्याचे डोळे पुसतो . )
सुदामा : तूं आतां जा पाहूं . तूं आहेस तंबर माझं पाऊलच उचलणार नाहीं ... जा - जा परत .....
कृष्ण : जातों ; पण तूं एकदा हस पाहूं . हसत हसत आपण एकमेकांचा निरोप घेऊं या ... हं ! हस ... हस !... हसला रे हसला !
[ सुदामा केविलवाणें हसण्याचा प्रयत्‍न करतो . कृष्ण हसतो . इतक्यांत बलराम कृष्णाला हाका मारीत येतो . ]
बलराम : कृष्णा ! कृष्ण ! ( जवळ येऊन ) अरे , असे वेड्यासारखे हसत काय उभे राहिलांत रस्त्यावर ? कृष्णा , चल लवकर . तुला गुरुदेव बोलावताहेत .... सुदाम्या , तूं लाग पाहूं चालायला ...
[ बलराम कृष्णाला घेऊन परत फिरतो . सुदामा चालूं लागतो . कृष्ण व सुदामा दोघेही एकमेकांना हाका मारीत वळून वळून पाहातात . ]
१२

[ ’ श्रीहरी गोविंद गोविंद। मना लागला छंद ’ असा कृष्णाच्या नांवाचा जप करीत लहान सुदामा आपल्या गांवाकडे जात असतो आणि मग मोठा झालेला सुदामा तेंच भजन म्हणत नदीवर स्नानासाठीं निघालेला दिसतो . ]
१३

[ सुदाम्याची पत्‍नी सुशीला झोपडीपुढील अंगणात तुळशीवृंदावनापुढें भूपाळी म्हणत आहे . ]
प्रभात झाली ; चलाचलाग जाग पहा आली
दिशा उजळल्या ; मंगल तेजें वसुंधरा न्हाली !
करुनि सडा - संमार्जन गृहिणीकाढिती रांगोळी
अंगणिं सजल्या सुबक साजर्‍या मोत्यांच्या ओळी !
महासती ग वृंदादेवी , जाग .... ऊठ लवलाही
त्रिभुवनसुंदर देवकिनंदन वाट तुझी पाही !
भावभक्तिनें भजतें , पुजतें तुज तुळशी - माउली !
घाल मुलीवर सदा आपुली मायेची सांवली !

[ इतक्यात नदीवरून स्नान करून स्तोत्रें म्हणत ओलेत्यानें सुदामा येतो . ]
सुदामा : कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने।
प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमोनमः ॥

[ सुदाम्याला पाहातांच त्याचा मुलगा श्रीधर फ़ुलें घेऊन धावत येतो . ]
श्रीधर : बाबा , बाबा , हीं बघा ..... मीं किती फ़ुलं काढलीं देवाच्या पूजेला !
सुदामा : तुझ्या हाताला आलीं ?
श्रीधर : म्हणजे ? मी लहान आहे वाटतं ? मीं मोठा आहें ना ग आई ?
सुशीला : होय तर ! मोठाच आहे माझा श्रीधर !
श्रीधर : मी मोठा !.... मी मोठा !....( असें म्हणत नाचूं लागतो . सुशीला व सुदामा त्याच्याकडे पाहून हसतात . )
सुशीला : ( सुदाम्यास ) पूजा उरकून घ्यावी लवकर ... आत्तां येतील विद्यार्थी ....
[ सुदामा व श्रीधर देवघरांत जातात . सुशीला धोतर बाळत घालते . ]
१४

[ देवघर . सुदामा देवापुढें बसून गंध उगाळतांना पुढील स्तोत्रें म्हणतो . ]
सुदामा : गिविंदेति सदा स्नानं
गिविंदेति सदा जपः ।
गिविंदेति सदा ध्यानं
सदा गोविंद - कीर्तनम् ॥
नमः कृष्णाय देवाय
ब्रह्मणेऽनन्तमूर्तये ।
योगेश्वराय योगाय
त्वामहं शरणं गतः ॥

[ सुदाम्याचें लक्ष समईकडे जातें . तिच्यांत तेल नसतें . ]
सुदामा : अग एऽऽ ! ऐकलंस का ?... समईंत तेल नाहीं .... निरांजनाचीही वात कोरडी आहे .
[ सुशीला येते . ]
सुशीला : घरांतच तेल - तूप नाहीं , तर त्यांत कोठून येईल ?
सुदामा : निरांजनापुरतंदेखील तूप नाही ? बघ बघ असेल थोडं ....
[ सुशीला तेलाचा बुधला व तुपाचे भांडें आणून दाखविते . ]
सुदामा : आहेत चार थेंब ... आत्तांची वेळ भागेल . पुढचं पुढं !... हें पाणी सोवळ्याच
आहे ना ?
सुशीला : हो तर ... सोवळ्याचीच घागर आहे ती .
[ सुदामा घागरींतलें पाणी तांब्यांत ओतून घेतो . घागर गळत असते . ]
सुदामा : पार फ़ुटून गेली कीं घागर !
सुशीला : धडकं आहे काय घरांत ? सारं फ़ुटलेलंच !... अठरा विश्वे दारिद्र्य !
सुदामा : अग , दारिद्र्यांतसुध्दा एक प्रकारचा आनंद असतो
सुशीला : साराच आनंद आहे खरा ! रोजची जेवणाची भ्रांत पडते ...
सुदामा : म्हणजे ? आज अन्नपूर्णामाई रुसून बसलीय् वाटतं ? सारं धान्य संपलं ?
सुशीला : दुपारची वेळ भागेल कशी तरी !
सुदामा : मग संध्याकाळी करू थंडा फ़राळ !
सुशीला : अन उद्या कुठं जायचय् वाटतं ?
सुदामा : उद्यांची चिंता भगवंताला !
[ सुशीला श्रीधरला घेऊन हसत जाते . सुदामा पूजा करू लागतो . ]
१५

[ सुदाम्याच्या झोपडीकडे विद्यार्थी येत असतात . चंद्रसेन येतो . ]
चंद्रसेन : सुदामदेवांच्याकडे निघालांत ? मी येऊ तुमच्याबरोबर ?
१ विद्यार्थी : चल कीं !
[ आश्रमांत येऊन मुलें आपापलीं आसनें पसरून बसतात . ]
चंद्रसेन : मला शिकवतील सुदामदेव ?
२ विद्यार्थी : हो .... आनंदानं शिकवतील तुला आमचे गुरुजी .
[ सुदामा येतो . मुलें त्याला उत्थापन देतात . ]
चंद्रसेन : पण मी बसूं कुठं ?
३ विद्यार्थी : बैस इथं माझ्याजवळ .
श्रीधर : तूं आलास चंद्रसेना ?... अहो , बाबा , बाबा !... आज हा बघा कोण आलाय् !
सुदामा : अरे वा ! चंद्रसेन !
चंद्रसेन : मला शिकायचं आहे .
सुदामा : काय शिकायचं आहे तुला बाळ ?
चंद्रसेन : हे सगळे शिकतात तें ....
सुदामा : अवश्य ! अवश्य ! ( मुलांकडे वळून ) हं ! प्रार्थना सुरू करा ....
सर्व मुलें : ( हात जोडून )
गोविंद गोविंद हरे मुरारे।
गोविंद गोविंद रथांगपाणे॥
गोविंद गोविंद मुकुंद कृष्ण।
गोविंद गोविंद नमो नमस्ते॥

[ सुदामा आसनस्थ होतो . मुलेंही बसून आपापल्या पोथ्या उघडतात . तोंच इंद्रसेनाचा नोकर घाईघाईनें येतो . त्याला पाहून चंद्रसेन एका मुलाच्या आड दडतो . ]
नोकर : गुरुजी , आमचे धाकडे धनी इकडे आहेत का ? ( चंद्रसेनाला पाहून ) इथंच आहांत का ? कुठं कुठं शोधलं तुम्हांला ... उठा , चला वाड्यांत ....
चंद्रसेन : मी नाहीं जा . मला लिहायला ... पोथी वाचायला शिकायचं आहे .
नोकर : सगळं शिकायचं आहे तुम्हांला . पण तिकडे वहिनीसाहेबांनीं सारा वाडा डोक्यावर घेतलाय् ना !
चंद्रसेन : आई रागावली ? रागावूं दे खुशाल . मी नाहीं येणार ....
नोकर : आलं पाहिजे . ( हात धरून ओढीत नेऊं लागतो . )
सुदामा : अरे , सोड सोड त्याला ... त्याची इच्छा आहे शिकायची तर ...
[ नोकर चंद्रसेनाला जबरदस्तीन घेऊन जातो . चंद्रसेन ओरडतो . रडतो . ]
सुदामा : श्रीहरि ! श्रीहरि ! ( उठून खुंटीवरचें उपरणें घेऊन बाहेर पडतो . )

N/A

References : N/A
Last Updated : August 30, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP