मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री गणेश प्रताप|
क्रीडाखंड अध्याय २८

श्री गणेश प्रताप - क्रीडाखंड अध्याय २८

सर्व कीर्तीने युक्त, सर्व देवाधिदेवांमध्ये श्रेष्ठ अशा अत्यंत प्रिय असलेल्या श्रीगजाननाच्या स्तुतीपर हा ग्रंथ आहे.


श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीगुरुभ्यो नमः । श्रीक्षेत्रपालाय नमः ।

ॐ नमोजी आदिपुरुषा । शिवात्मजा सुंदरवेषा ।

अनादिनिधना अखंडतोषा । देवविशेषा जगत्पते ॥१॥

सिंधू असुराचें करोनि निधन । मुक्त केले अमरगण ।

चक्रपाणी गुणेशपूजन । केलें परमभक्तिभावें ॥२॥

मग नारद म्हणे शंकराशी । आतां चलावें लग्नाशी ।

शिव म्हणे नारदाशी । येथें लग्नाशी योग्य स्थळ ॥३॥

तें मानवलें विधीशी । तेणें पाचारिलें वनितांशी ।

आणविलें निजकन्यकांशी । सकल संपत्तीशी समवेत ॥४॥

सत्यलोकींची सकल संपत्ती । सिद्धिबुद्धी कन्या गुणवती ।

घेऊनियां विधी युवती । लग्नाप्रति पातल्या ॥५॥

चक्रपाणीस आनंद बहुत । तेणें नगर केलें शोभिवंत ।

मंडप उभारिले अत्यद्भुत । तोरणें बांधिलीं गोपुरासी ॥६॥

मिळालें ऋषींचें भार । स्त्रियांसहित आले निर्जर ।

राजे पातले सादर । प्रमोद थोर विस्तारला ॥७॥

पुलोमजा संज्ञा तारा । रोहिणी रती मन्मथदारा ।

यम वरुणांगना इंद्रिरा । महोत्साहें पातल्या ॥८॥

अहिल्या अरुंधती आदिकरुनी । मिळाल्या ऋषींच्या नितंबिनी ।

संपूर्ण पातल्या गंधर्वकामिनी । त्यांचे मनीं उत्साह बहू ॥९॥

वाद्यें वाजती घनसुस्वर । गायक गाती अतिमधुर ।

अप्सरा नृत्यें मनोहर । होती तेव्हां लग्नमंडपीं ॥१०॥

विधी घेवोनि शक्रादिसुर । सीमांतपुजनीं जाहला सादर ।

सिंहासनीं बैसवी शिवकुमर । चामरें अपार ढाळीती वरीं ॥११॥

जामाताचें चरणक्षाळण । करिता जाहला चतुरानन ।

गायत्रीसावित्री घालिती जीवन । मंत्रोच्चारें विप्र गर्जती ॥१२॥

धन्यधन्य भाग्य विरिंचीचें । निधान जोडलें इक्षुसागरींचें ।

मुख पाहतांचि गुणेशाचें । विधिललनाचें संतुष्ट मन ॥१३॥

विरिंचीनें शुद्धभाव चंदन । केला गुणेशभाळी अर्पण ।

सुमनाचे हार सुगंधपूर्ण । कंठीं अर्पिले श्रद्धाळुकें ॥१४॥

वस्त्राभरणीं अमोलिक । विधीनें अर्चिला विनायक ।

वर्‍हाडी गौरविले एकएक । उमानायक संतोषविला ॥१५॥

गौरीगंगा मुख्य विहिणी । अनुसूया अदिती इंद्रायणी ।

या आदिकरुनि वर्‍हाडिणी । विधिरमणीनीं गौरविल्या ॥१६॥

समारंभें सीमांतपूजन । करितां विरंची आनंदघन ।

निजमंडपीं वर्‍हाडी घेऊन । चतुरानन प्रवेशला ॥१७॥

जाहली तेलफळाची सामग्री । वर्‍हाडिणी घेऊनि निघे गौरी ।

वाद्यें वाजती नानापरी । अप्सरा सुंदरी नाचती पुढें ॥१८॥

करावया वाक्‌निश्चय । देवऋषीसहित गौरीप्रिय ।

येतां ऐकूनि विष्णुतनय । घाली बैठक रंगमंडपीं ॥१९॥

सामोरा जाऊनि चतुरानन । नमिला तेणें गौरीरंजन ।

संपूर्ण वर्‍हाडी मंडपीं आणुन । सन्मानूनि बैसविले ॥२०॥

गायत्रीसावित्रीविधिनारी । त्याहीं जावोनियां बाहेरी ।

नमस्कारोनि गंगागौरी । मंडपाभीतरीं आणियेल्या ॥२१॥

संपूर्ण ललनासमवेत । आदरे गौरी चवरंगीं बैसत ।

वरी चामरें दासी ढाळित । नृत्य होत अप्सरांचें ॥२२॥

सिद्धिबुद्धी कन्या सुंदरी । नारदें आणिल्या बाहेरी ।

विधी त्यांतें घेऊनि अग्रीं । समारंभें बैसला ॥२३॥

त्याचेसमोर बैसे शंकर । घेऊनि पूजेचा संभार ।

वस्त्रा भरणें कंचुकीचिर । मनोहर मुंडावळी ॥२४॥

ऋषि गर्जती मंत्रघोषें । वाद्यें वाजती विशेषें ।

गणगंधर्वदेव तोषें । समारंभ अवलोकिती ॥२५॥

उभयतां वधूस वस्त्राभरणें । अर्पण केलीं भोगिभूषणें ।

केलें कन्यांचें मागणें । तथास्तू म्हणे विधि तेव्हां ॥२६॥

वाक्‌निश्चय करोनि तयेवेळीं । मानें गौरविली वर्‍हाडी मंडळी ।

तेलवण अर्पी गोत्रबाळी । साडीचोळी अर्पीतसे ॥२७॥

मायावासाचा त्याग करुनी । परेश वसने ब्रह्मनंदिनी ।

आनंदल्या अत्यंत मनीं । धन्य जनीं म्हणविती पैं ॥२८॥

शिव घेऊनि वर्‍हाडीजन । प्रवेशता जाहला निजभुवन ।

वर्‍हाडणी संगें घेऊन । गिरिजा आली निजमंडपीं ॥२९॥

विधि म्हणे स्वरमणीतें । आतां अर्पावें रुखवतातें ।

पूजोनियां गुणेशातें । निज जन्मातें सफल करा ॥३०॥

विधिआज्ञा वंदोनि शिरीं । रुखवताची करोनि तयारी ।

निघत्या जाहल्या विधिसुंदरी । सकल नारीं समवेत ॥३१॥

वाद्यें वाजती घनसुस्वर । पुढें चातुरंग सेनेचा भार ।

वेत्रधारी गर्जती अपार । आनंद थोर ललनासी ॥३२॥

पाहावया जगन्निवास । स्त्रियांचे मनीं थोर उल्हास ।

वेगीं पातल्या वरमंडपास । गिरिजेस श्रुत जाहलें ॥३३॥

मंडपीं घालोनियां बैठका । वरीं बैसविल्या तेव्हां नायका ।

गौरी म्हणे विनायका । होईल बाळका दृष्ट तूतें ॥३४॥

माय लावी तीट भाळीं । कज्जल बोटें दोन कपोलीं ।

लिंबलोण तयेवेळीं । गोत्रबाळी करीतसे ॥३५॥

बैठका घालोनि भावाच्या । वरी रांगोळ्या विरक्तीच्या ।

त्यांत अडण्या श्रद्धेच्या । सत्वसंपन्न ताटें वरी ॥३६॥

पंच तत्वांच्या पांच वाटया । सुवर्णझार्‍या रत्‍नखचित तोटया ।

वरी वाढिती गोमटया । देवांगना रुखवता ॥३७॥

जी विधीची माता सुंदरी । ती तेथें वडीलपणें साजिरी ।

पद्मा सासूची आज्ञा वंदोनि शिरीं । विधिनारी वर्तती तशा ॥३८॥

नानापरीच्या शाका पंक्ती। कोशिंबिरी हारी विराजती ।

पक्वान्नें नानापरी शोभती । वर्णूं किती सोज्वळ खिरी ॥३९॥

वडे पापडफेण्या सारे । आंबटीं सांबारीं एकसरे ।

लोणचीं रंगली सुरंग खारें । मोरआंवळे साजिरे पैं ॥४०॥

दुग्धदधिघृत साजुक । ताटीं विस्तारलीं फळें अनेक ।

मेवामिठाई अलोलिक । सुरसुंदरी वाढताती ॥४१॥

जैसा रजताचा अर्क गोठला । तैसा सोज्वळ भात वाढिला ।

वरी वरान्न हेमकला । जिंकणारे वोढिलें पैं ॥४२॥

सुटला षड्रसान्नाचा सुवास । तो निजलालसत्व दे सुरांस ।

इंदिरा विनवी अद्रिजेस । आण पुत्रास लवलाहीं ॥४३॥

मग चवरंगावरोनि उठली भवानी । संगें शचीगंगाआदि करोनी ।

घेवोन तिणें मोक्षदानी । स्नेहभावें पाचारिला ॥४४॥

अंबा म्हणे बा राजसा । रुखवत विस्तारिलें डोळसा ।

तें तुवां अंगिकारोनियां तोषा । मजलागीं पाववावें ॥४५॥

धरोनि मयूरेशाचा कर । त्याहीं बैसविला चौरंगावर ।

षण्मुखादि गणांचे भार । त्याचे पंक्तीसि बैसविले ॥४६॥

अष्टसिद्धि तेथें राबती । दीप लाविले रत्‍नज्योती ।

उदबत्या परिमळ जळती । तोषविती घ्राणेंद्रिया ॥४७॥

विधियुवती सलज्जपणें । पुष्पमाळा पुष्पभूषणें ।

गुणेशकंठीं आनंदमनें । अर्पित्या जाहल्या कौतुकानें ॥४८॥

आपोषणीसि घृत घेउनी । वडीलपणें विष्णुमानिनी ।

घालितां तोषला कैवल्यदानी । भक्ताभिमानी जगदात्मा ॥४९॥

गणासहित जगन्निवास । समारंभें घेतसे ग्रास ।

तंव ज्योतिर्विद गुरु म्हणे नगजेस । समारंभास सिद्ध करा ॥५०॥

लग्नघडीशी अवकाश थोडा । तुझा पुरे वरमायपण झेंडा ।

वधूकडील सुंदरी सोडोनि व्रीडा । गुणेशमूर्ती अवलोकिती ॥५१॥

देवांगना म्हणती परस्पर । सिद्धिबुद्धीचे ललाट थोर ।

योग्य मिळाला यांसि वर । मनोहर जगन्मोद पै ॥५२॥

याचे सुंदर वदनावरुन । वोवाळावें हो कोटि मदन ।

साफल्यास्पद आमचे नयन । अवलोकून जाहले ॥५३॥

वारंवार गंगा भवानी । लिंबलोण करिती सुमुखावरुनी ।

गालबोटें तीट लाउनी । भाळीं मुंडावळी बांधिती ॥५४॥

किरीटकुंडलेंमंडित वदन । कटितटीं विलसे रक्तवसन ।

वरी रत्‍नजडित मेखलाबंधन । कंठीं मुक्तमाला विलासती ॥५५॥

वक्षीं नवरत्‍नहरावली । मध्यें चिंतामणी प्रभा फांकली ।

विलसे अवतंस तेज कपोलीं । चरणीं नुपुरें रुणझुणती ॥५६॥

तळवें प्रभातराग कोमळ । टांच जैशा रातोत्पळ ।

ध्वज वज्रांकुश सुढाळ । चरण शोभती गुणेशाचे ॥५७॥

प्रसन्न विलसे गुणेशमूर्ती । पायीं पादुका विराजती ।

झगा घालोनि भक्तपती । आसनावरती आरुढळा ॥५८॥

वरासि मूळ त्रिदशांसहित । येता जाहला शचीकांत ।

तयासि सन्मानें कुबेर बैसवित । मग अर्पित वस्त्रभूषणें ॥५९॥

गुणेशास अर्पिती वस्त्रालंकार । इंद्रें प्रार्थिला गौरीवर ।

वर्‍हाडी घेवोनियां शंकर । तो सत्वर सिद्ध जाहला ॥६०॥

घेऊनि मुनिगणाचे भार । निघता जाहला तेव्हां शंकर ।

जाहला वाद्यांचा गजर । मयूरावर बैसला ॥६१॥

वरी शोभती दिव्यातपत्रें । चामरें वारिती चित्रविचित्रें ।

ऋषि गर्जती वेदमंत्रें । शिवकलत्रें निघालीं ॥६२॥

गायत्रीसावित्रीविधीरमणी । गंगागौरी त्यांच्या विहिणी ।

सवें इंदिराइंद्रायणी । ऋष्यंगना गुणी निघाल्या ॥६३॥

चतुरंग सेनेचे पुढें भार । उल्हाटयंत्राचे भडमार ।

होती मंगलतुरांचे गजर । त्या नादें अंबर गुणी जाहलें ॥६४॥

मिरवत चालला सुंदर वर । जनास पाहतां आनंद थोर ।

लग्नमंडपीं लक्ष्मीवर । समारंभें उभा असे ॥६५॥

वर प्रवेशला मंडपद्वारीं । पूर्णकलशेंसि दासी सुंदरी ।

त्याचा मान भक्तकैवारी । पूर्ण करी निजांगें ॥६६॥

दध्योदनाची मूद वोंवाळुन । टांकिता विधी वर घेऊन ।

मंडपामाजी प्रवेशून । करी स्थापन बहुल्यावरी ॥६७॥

मधुपर्क विधी विधी करी । तेणें तोषला भक्तकैवारी ।

वरी लग्नघटिकाते अवसरीं । सुरगुरुसि सांगतसे ॥६८॥

गुरु येवोनि शिघ्रगती । लग्नासि तेणें नेला गणपती ।

मंगलाष्टकें तेव्हा म्हणती । ज्योतिर्विद मंगलपणें ॥६९॥

लग्न घडी प्राप्त जाहली । सुटला अंतःपट तयेवेळीं ।

सुमनमाळा विधीबाळी । कंठीं घालिती परमात्म्याच्या ॥७०॥

प्रकृतीपुरुष एक जाहले । वर्‍हाडी टाळी वाजविती तयेवेळे ।

मंगलवाद्यें ध्वनि कल्होळें । दुमदुमलें निराळ पैं ॥७१॥

व्याहीवराडी चतुराननें । देऊनि अर्चिलें वस्त्राभरणें ।ब्व

तांबूल घेऊनि आपलीं स्थानें । वर्‍हाडी पावले तेधवां ॥७२॥

गायत्री सावित्री दोघीजणी । त्यांहीं गौरविल्या दोघी विहिणी ।

पदोपदीं पांय राबणी । घेतां शिवरमणी तोषल्या ॥७३॥

त्याही सकल वर्‍हाडीसहित । अंगी करविला सन्मान बहुत ।

समारंभें निजमंडपांत । जात्या जाहल्या कौतुकें ॥७४॥

दोन सुंदरी समवेत । कन्यादानविधी विधी करित ।

दोहीं ललनासहित । शिवसुत शोभतसे ॥७५॥

गृहस्थ जाहला विश्वेशनंदन । तेणें सिद्ध केला हव्यवाहन ।

लज्जाहोमीं मान देऊन । ब्रह्मनंदन तोषविला ॥७६॥

विप्रांतें अमित धन देउनी । तोषविता जाहला पद्मयोनी ।

बोहरें पाहतां जननयनीं । आनंदवनीं डोलतसे ॥७७॥

सुवर्णताटीं षड्रसअन्नें । वाढोन वोहरें आनंदानें ।

बैसवोन देती भोजनमानें । पाहतां मनीं चोज वाटे ॥७८॥

सवें घेऊनि दोन वितंबिनी । भोजन करी मोक्षदानी ।

कौतुक पाहे कमलयोनी । सुधापानी समवेत ॥७९॥

वधुवरांचा हरिद्रा खेळ । पाहावया मिळाले सकळ ।

बहुल्यावरी वर तेजाळ । बैसविला ललनाहीं ॥८०॥

विधि मानिनी जावोनि वरमाया । प्रार्थून आणी अद्रितनया ।

सकळ वर्‍हाडिणीसहित शिवजाया । रंगमंडपीं बैसल्या पै ॥८१॥

ऋषिपत्‍न्या अमरांगना । राजकांता कमललोचना ।

आनंद न साहे त्यांच्या मना । गुणेशवदना अवलोकितां ॥८२॥

लागले वाद्यांचे सुस्वर गजर । नृत्य करिती अप्सरा सुंदर ।

गणेशभक्त करिती जयजयकार । प्रमोद थोर विस्तारला ॥८३॥

हरिद्रासमारंभ पूर्ण जाहला । पाहतां विधि संतोषला ।

सार्थकता वाटे तयाला । निजजन्माची ते काळीं ॥८४॥

सन्मुख सकल स्त्रियांसहित । अंबा तेव्हां अवलोकित

रत्‍नभूषणें लेववित । स्नुषालागीं तेधवां ॥८५॥

वंशपात्रीं सोज्ज्वळ दीप । लावोनियां सुराधिप ।

ऐरिणी दानें पुण्य अमुप । जोडिता जाहला परमेष्टी ॥८६॥

घेऊनि ऐरिणीदान । गिरिजा जाहली आनंदघन ।

ब्रह्मा करी बहुत सन्मान । दे आंदण बहुसाल ॥८७॥

दासीदास वाजीवारण । अमित देतां गजकर्ण ।

तोषला तेव्हां जगद्भुषण । भाव पाहून विधीचा पैं ॥८८॥

केली वरातीची तयारी । कन्या वोपोनि पार्वतीकरी ।

प्रार्थना करिती विधिनारी । परोपरीं नगजेची ॥८९॥

पार्वतीसि म्हणती विधिनायिका । आजवरी पाळल्या आह्मी कन्यका ।

आतां अर्पिल्या विनायका । सांभाळ निका करी तूं ॥९०॥

गहिवरल्या विधिकामिनी । सिद्धिबुद्धी रडती स्फुंदस्फुंदुनी ।

त्या संतोषऊनि कैवल्यदानी । हातीं धरोनि निघाला ॥९१॥

त्यांचेसहित मयूरेश्वर । करी वडिलांस नमस्कार ।

वर आरुढला शिखीवर । समारंभें तेधवां ॥९२॥

मयूरावरी बैसला गणपती । त्याचे अंकीं दोन युवती ।

पाहतां जन आनंदती । वरात निगुती निघाली ॥९३॥

सुरगणांसहित डमरुधर । निघता जाहला सत्वर ।

पुढें होतसे वाद्यगजर । सुमनभार वर्षती सुर ॥९४॥

राजबिदींतून मिरवे वरात । नगरनारी जन वोवाळित ।

चक्रपाणी बोळवीत येत । त्यास फिरवित मयुरेश ॥९५॥

घेऊनि मयुरेशाचा निरोप । नगरीं गेला नराधिप ।

पुढें चालला निजभक्तप । समारंभें करोनियां ॥९६॥

निजनगरीं वधुवरें । प्रवेशतां मोद एकसरें ।

वाजती जाहलीं मंगलतुरें । नगर साजिरें जाहलें तेव्हां ॥९७॥

वधुवरें घेऊनि निजभुवनीं । येता जाहला शिवभक्ताभिमानी ।

लक्ष्मीपूजन तेथें करुनी । समारंभ पूर्ण करी ॥९८॥

स्वकीयसदनीं गिरिजासुत । सिद्धिबुद्धीसह क्रीडा करित ।

नगजेसि आनंद बहुत । होता जाहला तेधवां ॥९९॥

गुणवती त्या दोघी सुना । करिती अंबेचे पादसेवना ।

ऐसें दिवस गेले नाना । महोत्साहें करोनियां ॥१००॥

मनीं विचारी विनायक । अवतारकृत्य जाहलें सकळिक ।

आतां स्वधामी जावें निःशंक । आज्ञा घेवोनि नगजेची ॥१॥

मग मातेस करुनियां नमन । विनविता जाहला राजीवनयन ।

मातें आठवी वरदान । तुज जे म्यां अर्पियेलें ॥२॥

तुझें पुत्रत्व मी येथें पाऊन । केलें दुष्टांचे निष्कदंन ।

सद्धर्माचें करोनि अवन । साधुजन केलें सुखी ॥३॥

आतां जातसे निजाश्रमीं । ऐकतां अंबा जाहली श्रमी ।

मग तीतें बोध विश्वस्वामी । करिता जाहला तेधवां ॥४॥

माते मी सर्व भूतीं व्याप्त असें । तुझे हृदयीं मीच विलसें ।

वचन पुत्राचें ऐकतां ऐसें । मग ती हांसे प्रमोदभरें ॥५॥

सुहास्यवदनें बोले नंदन । पुढें तुझे उदरीं होईन गजवदन ।

सदैव तुझे करीन सेवन । सत्य वचन हें माझें ॥६॥

ऐसेम वदोन जगन्निवास । हातीं धरोन दोन ललनास ।

नगजा हृदयीं करी वास । अंतर्धान पावोनियां ॥७॥

विधि म्हणे व्यासालागुन । कथिलें तूतें गुणेशमहिमान ।

याचें श्रवणमात्रें भवबंधन । तुटोन मुक्त होती नर ॥८॥

जे ऐकती गुणेशाचें चरित्र । कदां न होती ते दुःखपात्र ।

इहलोकीं सुख पावोन परत्र । नांदती गा अक्षयपदीं ॥९॥

आधिव्याधि संकटहरण । श्रवणमात्रें होय जाण ।

ऐकतां व्यास आनंदोन । करी नमन विधीस पैं ॥११०॥

जयजयाजी अनंतवेषा । अनंता रे परमपुरुषा ।

भक्तपालका अखंडतोषा । भक्तपाशछेदक तूं ॥११॥

स्वस्तिश्रीगणेशप्रतापग्रंथ । श्रीगणेशपुराण संमत ।

क्रीडाखंड रसभरित । अष्टाविंशतितमोध्याय गोड हा ॥१२॥अध्याय॥२८॥ओव्या॥११२॥

अध्याय अठ्ठाविसावा समाप्त

N/A

References : N/A
Last Updated : September 22, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP