श्रीगणेशाय नमः । श्रीदत्तात्रेयाय नमः ।
ॐ नमोजी गणनाथा । पुढे बोलवी रसाळकथा । सर्व भार तुझे माथा । सकलार्था साधक तू ॥१॥
माझे मनीचे अखिलार्थ । पूर्ण कर्ता तूचि समर्थ । तू संपूर्ण स्वार्थाचा स्वार्थ । परमार्थ जगताचा ॥२॥
विषयवासना ही उदंड । निरसूनिया वक्रतुंड । त्वत्पदारविंदी अखंड । लावी माझी चित्तवृत्ती ॥३॥
पूर्वाध्यायी अनुसंधान । मुकुंदा गृत्समद क्रोधायमान । परस्परे शाप देवून । नाश करिती आपुलाले ॥४॥
गृत्समद भ्रमण करित । प्रवेशला घोर वनात । झर्झरोदके शोभिवंत । ऋषी महंत वसती तेथे ॥५॥
तयांसि करोनिया नमन । घेऊनि त्यांचे आज्ञावचन । पादांगुष्ठी उभा राहुन । तपालागून प्रवर्तला ॥६॥
नासाग्री दृष्टी जितेंद्रिय । देव करूनि मनोमय । सदा ध्यातसे महाकाय । भक्ता अभयकर्ता जो ॥७॥
पंचदशसहस्त्राब्द । तप करितांच विशद । भय पावले देववृंद । घेईल पद म्हणती हा ॥८॥
नेत्री निघती वह्निज्वाला । तेणे विश्वगोळ तापला । पाहूनि त्याचे निर्वाणाला । मग धावला गजानन ॥९॥
दीनवत्सल दीननाथ । सिंहारूढ गणनाथ । प्रसन्नमुख सिद्धिबुद्धिसहित । दिव्यालंकारे मंडीत जी ॥१०॥
कुंकुममृगमदचर्चितभाल । उरगवेष्टित तो दोंदिल । मोदके पूरित उभयगल्ल । माथा अमूल्य मुगुट शोभे ॥११॥
कोटिसूर्यतेज भासमान । ऐसा प्रगटता गजानन । भये मूर्छागत होऊन । झाले पतन तयाचे ॥१२॥
म्हणे प्रगटले काय अद्भूत । भये थरथरा कापत । धाव धाव गा एकदंत । विघ्न अद्भुत निवारी हे ॥१३॥
जन्मप्रभृती तप केले । ते आजि का व्यर्थ गेले । महाविघ्न हे पुढे पातले । ध्यान विराले तेणे माझे ॥१४॥
झाकोनिया नेत्र दोन्ही । गणेशपद आणोनि ध्यानी । भये विव्हल होता मनी । कैवल्यदानी कळवळला ॥१५॥
ना भी म्हणे गणराज । सिद्धि पावले तुझे काज । जो ध्याशी मनी तोच मज । वोळखे सहज मुनिवर्या ॥१६॥
ऐसी ऐकून अभयवाणी । गृत्समद तोषोनि मनी । मिठी घालिता गणेशचरणी । अंकुशपाणी उठवी तया ॥१७॥
आनंदे स्रवती त्याचे नयन । गृत्समद कर जोडून । यथामती करी स्तवन । आनंदघन संतोषला ॥१८॥
गृत्समदासि म्हणे गजानन । मागे इच्छित वरदान । येरू बोले सद्गदवचन । चरणी मन लावूनिया ॥१९॥
जो वेदशास्त्रासि अगोचर । हरिहर न पावती ज्याचा पार । जो जगताचा आधार । तो गोचर मज झाला ॥२०॥
धन्य माझे जन्मांतर । तेणे तुष्टलासि मजवर । आता देई एक वर । लंबोदरा मजलागी ॥२१॥
चवर्यांशीलक्ष योनी । त्यात उत्तम मानवजनी । मानुषांतही ब्राह्मण अनुष्ठानी । त्यामाजी ज्ञानी श्रेष्ठ पै ॥२२॥
ते ज्ञान त्वदधीन । मज तू द्यावे कृपा करून । छेदी माझे मोहबंधन । करी पावन गणराया ॥२३॥
सर्वभूती भगवद्भाव । रसनेस तुझे नाव । अखंड पावो भक्तिवैभव । हेचि अभिन्नव मागणे ॥२४॥
आणीक मागणे वर एक । विमान दे का मज पुष्पक । पुष्पकनगर अलोलिक । विनायका हे करी ॥२५॥
ऐकोन म्हणे विश्वनायक । इच्छिले पावशील सकळिक । विप्रत्व पावशील अलोलिक । वसिष्ठादिक मानिती तूते ॥२६॥
तुझे स्मरण जे करिती । ते संपूर्ण सिद्धीते पावती । तुझे बलाढ्य पुत्र त्रिजगती । बळे जिंकितील गृत्समदा ॥२७॥
रुद्रावाचोनि अनिवार । त्रिभुवनी होतील साचार । ऐश्वर्य भोगोनि समग्र । मत्पद पार पावतील ते ॥२८॥
कृती पुष्पकनामे हे नगर । त्रेती म्हणतील मणिपुर । द्वापारी भानकनामे साचार । कलियुगी भद्रनाम याचे ॥२९॥
येथे करिता स्नानदान । जन पावती भवमोचन । ऐसी वरदोक्ती वदून । अंतर्धान पावला ॥३०॥
गृत्समद पावोनि आनंद । करिता जाहला दिव्यप्रासाद । मूर्ती स्थापोनि नाम वरद । ठेविता जाहला देवाचे ॥३१॥
व्यासास म्हणे कमलासन । हे आख्यान श्रवणपठण । कर्ते सकल काम पावून । गणेशपद पावती ॥३२॥
स्वस्तिश्रीगणेशप्रतापग्रंथ । गणेशपुराणसंमत । उपासनाखंड रसभरित । दशमोध्याय गोड हा ॥३३॥ अध्याय ॥१०॥ ओव्या ॥३३॥