मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री गणेश प्रताप|
क्रीडाखंड अध्याय २२

श्री गणेश प्रताप - क्रीडाखंड अध्याय २२

सर्व कीर्तीने युक्त, सर्व देवाधिदेवांमध्ये श्रेष्ठ अशा अत्यंत प्रिय असलेल्या श्रीगजाननाच्या स्तुतीपर हा ग्रंथ आहे.


श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीगुरुभ्यो नमः । श्रीक्षेत्रपालाय नमः ।

जयजयाजी पार्वतीसुता । अप्रमेया रे अनंता ।

विश्वात्मया एकदंता । अजअजिता जगत्पते ॥१॥

गताध्यायीं कथा पावन । केलें गुणेशाचें मौंजीबंधन ।

व्यास विधीचे मुखें ऐकुन । करी प्रश्न विधात्यास पैं ॥२॥

गुणेशातें मयुरेश्वर । किमर्थ म्हणती विष्णुकुमर ।

ऐकोन त्याचा प्रश्नवर । सांगे सत्वर विधी तया ॥३॥

ब्रह्मा म्हणे परशरनंदना । तव प्रश्न आल्हाद मना ।

होवोनियां करितों कथना । लावोनि मना श्रवण करी ॥४॥

एके दिवसीं पातालभुवनीं । शेष बैसला सभास्थानीं ।

अनंतवासुक्यादि बंधु जनीं । वेष्टोनियां शोभतसे ॥५॥

कद्रू येतां निजमाता । आसनावरोनि उठोनि अवचितां ।

तिचे चरणीं ठेऊनि माथा । जाहला विनविता तेधवां ॥६॥

बहुत दिवसीं कृपा करुन । किमर्थ जाहलें आगमन ।

त्याचें वचन श्रवण करुन । स्फुंदस्फुंदोन ती सांगे ॥७॥

माझ्या सापत्‍न वनितेच्या आश्रमी । गेलें तिचे दर्शनकामी ।

मातें पाहतां सवत श्रमी । होवोनि क्रोधोर्मी न साहे ॥८॥

तिणें जटायस सुचविलें । तेणें अमर्याद कर्म केलें ।

वेणी धरोन आसुडिलें । वस्त्र फेडिलें पापिष्ठें ॥९॥

नग्न करोनियां मातें । करिता जाहला धिःकारातें ।

मग मी आक्रंदत निजगृहातें । जावोन येथें पातलें ॥१०॥

ऐकोन तिचें ऐसें वचन । शेष जाहला क्रोधायमान ।

म्हणें तीतें आतां बांधुन । दावितों आणून तुजलागीं ॥११॥

शेषें केली तयारी । वासुकी येवोनि विनंती करी ।

तुम्हीं असावें निजमंदिरीं । पराक्रम तरी पाहे माझा ॥१२॥

कोटी संख्या नाग घेऊन । वासुकी पावला विनतास्थान ।

तीतें नागपाशीं बांधुन । गेला घेऊनि नागलोकीं ॥१३॥

ऐसें होतां विपरीत । ती विष्णु वहनाचें स्मरण करित ।

तो पातला तेथें त्वरित । पक्षी कुलासमवेत पैं ॥१४॥

जटायु संपाति श्येन । पुढें धांवलें वेगें करुन ।

त्याचे पक्षवातें करुन । जाहलें पतन द्रुमचया ॥१५॥

वासुक्यादि व्यालसमाज । आले ऐकोन ते अंडज ।

सांडोनियां सकलकाज । एक एक निघाले ॥१६॥

महाभुजंग फुंफावती । दुःसह गरळ मुखें वमिती ।

नेत्रविषाग्नीनें जाळिती । द्विजांप्रति तेधवां ॥१७॥

नानाजाती पक्षीजन । पक्षवातें सर्प झडपून ।

चंचुपटें करिती खंडण । घेती प्राण सर्पांचे ॥१८॥

धोरांदर युद्ध मांडलें । अनेक पक्षी सर्प पडिले ।

उरगीं अंडज माघारले । मुख्य उठले द्विज तेव्हां ॥१९॥

जटायु संपाति श्येन । उठावले बळसंपन्न ।

त्यांहीं पक्षवातें करुन । करविलें भ्रमण अहिलागीं ॥२०॥

पक्षवातें धुरोळा उडे । सर्पांची भरलीं नाकेंतोंडें ।

अनेक सर्पांचें केलें तुकडे । सर्प बापडे माघारले ॥२१॥

ऐसें पाहतां वासुकीकंबल । धृतराष्ट्रतक्षकादि व्याल ।

दुःसह वमिती हलाहल । जाहले व्याकुल पक्षिगण ॥२२॥

जटायुश्येन संपाती । मूर्च्छा दाटोन भुमीशी पडती ।

पादोदर त्यातें बांधोन नेती । नेवोनि कोंडिती विवरांत ॥२३॥

मुख्यधुरा धरोनि नेल्या । पक्षी जाती पळोन गेल्या ।

गरुडें पाहतां धिःकारल्या । मागें आणिल्या परतोनी ॥२४॥

क्रोधें संतप्त पतंगपती । पक्षवायूची लावोन गती ।

सर्प उडविले आकाशपंथीं । भ्रमती मरती पडोनियां ॥२५॥

शतमुख पंचशतानन । स्फटिकाभरण अंजनवर्ण ।

विषदृष्टी विषपवन । विक्राळ पर्वतासारिखे पैं ॥२६॥

सहस्त्र कुळांचे लक्ष अनेक । गरुडें संव्हारिले दंदशुक ।

हें पाहोनियां अही अनेक । वासुकी धांवला तयापुढें ॥२७॥

मुखें वमिती दुःसह विष । पक्ष जळोनि पक्षी विशेष ।

मरतां त्यांवरी करित रोष । गरुड धांवला त्वरितगती ॥२८॥

पक्षवातें करोनि घाबरा । मूर्च्छित करोनि उरगेश्वरा ।

अंडजप्रभूनें करोनि त्वरा । सोडविली दारा कश्यपाची ॥२९॥

केले मातेचें बंधमोचन । गरुडें सूक्ष्मरुप धरुन ।

स्वमाता मंदिरीं पोंचऊन । गेला आपण हरिलोकीं ॥३०॥

विनता पावली स्वस्थान । पुत्र ठेविले उरगीं कोंडुन ।

तेणें तिचें संतप्तमन । घेतलें दर्शन पतीचे तिणें ॥३१॥

विनता विनयभावें । पतीस रिजवी स्वभावे ।

कृपा केली तिचे दैवें । मुनिपुंगवें गौरविली ॥३२॥

शोक न करी वो चंद्रानने । रति देतों प्रसन्नमने ।
तुझे उदरीं मयूर तेणें । निपजेल विख्यात पैं ॥३३॥

बलाढय जैसा अपरगरुड । वरीं आरुढोन वक्रतुंड ।

मोडील उरगांचें बंड । पुत्र तुझे सोडवील ॥३४॥

ऐकोन पतीची अभयवाणी । आनंदें कोंदली तरुणी ।

मदनें विंधिली पंचबाणी । तेणें रमणी विव्हळ ॥३५॥

मुनीनें नेउनि एकांतस्थानीं । आनंदें भोगितां कामिनी ।

गर्भ राहिला तयेलागुनी । आनंदवनीं प्रवेशली ॥३६॥

श्रोते ऐका सावधान । पूर्वील कथानुसंधान ।

सप्तम वर्षीं मौजीबंधन । केलें शिवानें गुणेशाचें ॥३७॥

अष्टम वर्षीं वेदशास्त्र । अध्यायनालागीं पुत्र ।

घालोनियां परमपवित्र । विद्यापात्र केलें तया ॥३८॥

मुनिपुत्राचें मस्तकी कर । ठेविता जाहला लंबोदर ।

तेहि जाहले विद्यासागर । सर्वेश्वर प्रसादें ॥३९॥

गुणेशें साम गायन । करितां प्राणी जाहले तल्लीन ।

सकळ सुर येऊन । लुब्ध होऊन ऐकती ते ॥४०॥

सामगायनाचे निनादें । भोंवती जमली पशुमृगवृंदें ।

नाचताति प्रेमानंदें । निगुति छंदें करोनियां ॥४१॥

त्याचें ऐकतां सामगायन । गंधर्व अप्सरा लज्जायमान ।

द्रवलें शंकराचें मन । पुत्राचि तान ऐकोनियां ॥४२॥

शंकराचे मुगुटाश्रित । चंद्र द्रवला तेव्हां अमृत ।

ते खालीं रुंडी पडत । जाहले जीतनर त्याचे ॥४३॥

शंकराचे माळेतून । एकाएकी जाहले उत्पन्न ।

पुढें उभे कर जोडून । सेवकामाजी तिष्ठती ॥४४॥

ऐसा सामगायनाचा महिमा । दाविता जाहला परमात्मा ।

पाहतां सत्पुत्र उमा । धन्य आत्मा मानीतसे ॥४५॥

तंव कोणी एक असुर । श्वापदरुपें करित विहार ।

तीनमुखें पांचनेत्र । शृंगें चार जयातें ॥४६॥

आठपाद चार कर्ण । दोन पुच्छें परिपूर्ण ।

पाहोनियां गजकर्ण । म्हणे बाळकांसि धरा धरा ॥४७॥

धरावयास बाळकें जाती । तंव तो पळे शीघ्रगती ।

पाठिलागे बाळ धांवती । रानीं गणपती समवेत पैं ॥४८॥

श्वापद गेलें गहनवनीं । जें वर्जिले मानवानीं ।

बाळांसमवेत मोक्षदानीं । दुर्घट विजनीं प्रवेशला ॥४९॥

तेथोन दूर देशी गेले । तेणें गुणेश मन क्षोभलें ।

मग तयाने पाश टांकिले । धरुनि आणिलें तयासी ॥५०॥

कंठदेशीं पाश झोंबला । तेणें असुराचा प्राण गेला ।

चतुर्विंशति योजनें पडला । देह त्याचा धरणीवरी ॥५१॥

वनीं फिरतां बाळें श्रमलीं । फळेंमुळें भक्षूं लागलीं ।

अन्न भक्षोनि तृप्त जाहली । फिरुं लागलीं अरण्यांत ॥५२॥

तव विनता पक्षिणीरुपें । अंडें रक्षी साक्षेपें ।

तें पाहोनि गणाधिपें । झेंप घाली तयावरी ॥५३॥

अंडे भूमिसि आपटिलें । त्याची जाहलीं दोन शकलें ।

आंतोन एक मोर निघालें । चुडामेचक समवेत पै ॥५४॥

तो मयूर भासे अद्भुत । पक्षवातें समुद्र पर्वत ।

कांपवीतसे क्षणांत । पाहोन एकदंत धरी शिखा ॥५५॥

पाहोनि त्याचें अद्भुतबळ । युद्ध करी गिरिजाबाळ ।

त्याचे पक्ष धरी सबळ । परि तो खळ नाटोपे ॥५६॥

मग तीं आयुधें धरुन करीं । नीलकंठासि गुणेश मारी ।

तेणे पडला उर्वीवरी । गुणेशवरी आरुढला ॥५७॥

शिखंडी करोन स्ववशग । येतां देखोन भक्त भवभंग ।

जयजयकारें भरोनि रंग । बाळें समीप पातलीं ॥५८॥

त्याच्या पाहोनि पराक्रमा । जवळ येऊनि कश्यपवामा ।

नमोनियां परमात्मा । स्तुत्युत्तमा स्तवीतसे ॥५९॥

जय आदिपुरुषा गौरीसुता । निगमसारा एकदंता ।

ब्रह्मांडभरी तुझी सत्ता । जगन्नाथा जगद्‌गुरो ॥६०॥
तूंच हरीविधिशंकर । सूर्यचंद्रपुरंदर ।

सर्वात्मा तूं लंबोदर । सर्वेश्वर करुणार्णवा ॥६१॥

कश्यपें जेव्हां कथिले मातें । तेव्हां पासोन प्रतीक्षा करितें ।

आतां देखिलें पदांबुजातें । प्रमोदांतें पावलें ॥६२॥

सपत्‍नी कद्रूसुत मातले । त्याहीं मत्पुत्र बंदीं घातले ।

ते तुवां पाहिजे सोडविले । कृपा करोनि जगत्प्रभो ॥६३॥

तथास्तु म्हणे अंबासुत । नीलकंठासी वर माग म्हणत ।

येरु करोनि दंडवत । मग बोलत मधुरोक्तीनें ॥६४॥

जरीं तूं प्रसन्न जगत्पती । मन्नाम पूर्वीं तुजप्रती ।

करोनियां भरीं कीर्ती । हे गणपती त्रिभुवनांत ॥६५॥

संतोषोनि जगदीश । म्हणे मज म्हणतील मयूरेश ।

ऐसें वदोन गणाधीश । मयूरेश म्हणवी आपणातें ॥६६॥

आज्ञा मागोन विनतासती । गेली जेव्हां गृहाप्रती ।

मयूरीं बैसोन भक्तपती । गृहाप्रती चालला ॥६७॥

मयूरेश्वर मयूरेश्वर । बाळकें भोवतीं करित गजर ।

चामरें ढाळित मुगुटावर । निज मंदिरीं प्रवेशले ॥६८॥

बाळकमुखें सकलवार्ता । ऐकतां आनंदली नगदुहिता ।

आलिंगोन प्रियसुता । निंबलोण करीतसे ॥६९॥

विधि म्हणे व्यासाप्रती । मयुरेश जाहला गुणेशमूर्ती ।

ही कथा अति निगुती । तुजप्रति कथियेली ॥७०॥

नववर्ष होतां प्राप्त । मयूरावरी बसोन येकदंत ।

वनामाजी क्रीडा करित । सर सुंदर पाहोनियां ॥७१॥

रसाळ वृक्षाची सुरसफळें । भक्षितां तृप्त जाहलीं बाळें ।

तंव जळीं हलकल्होळे । असुर बळे आरडतसे ॥७२॥

त्याचा ऐकतां विक्राळ स्वर । बाळकें कांपती थरथर ।

जळांत उडी मयुरेश्वर । टांकी सत्वर तेधवां ॥७३॥

जळांत पडतां विनायक । बाळकें करिती बहुत शोक ।

तंव असुर वधोन जगन्नायक । जळाबाहेर निघाला ॥७४॥

जळाबाहेर प्रेत । टाकितां जाहला शिवसुत ।

बाळें जाहली आनंदभरित । जयजयकारें गर्जती ॥७५॥

मग घेवोनि बाळकांशी । गुणेश करी निजक्रीडेशी ।

अनंतरुपें हृषीकेशी । सिंची उदक बाळकांवरि ॥७६॥

तंव तेथें नागकन्यका । जैसा विकसित कनकलतिका ।
त्या पाहोनि विनायका । विव्हळ जाल्या कामज्वरें ॥७७॥

त्या म्हणती परस्पर । हा असावा गे प्राणेश्वर ।

तरींच साफल्य जन्मांतर । आपलें साचार होईल गे ॥७८॥

मग त्याही जोडोनि कर । लक्षोनियां सर्वेश्वर ।

म्हणती तूं आमुचा प्राणेश्वर । हो साचार ये काळीं ॥७९॥

तुज करितों शरीरदान । संतुष्ट करीं आमचें मन ।

मग त्यातें बळेंच धरुन । मोरासहित नेला गृहीं ॥८०॥

मंगळस्नान घालोनि त्यातें । तिलक रेखिती आपुले हातें ।

मयुरेशें तुष्टी करोनि त्यातें । निरोपातें मागतसे ॥८१॥

नागकन्या धरोनि त्याशी । नेत्या जाहल्या वासुकीपाशीं ।

गर्वसंपन्न वासुकीशी । पाहतां गुणेश क्षोभला ॥८२॥

झेंप घालोन मोक्षदानी । मस्तकावरील सोज्वळमणी ।

घेता जाहला चिंतामणी । पाहतां फणी धुधुःकारे ॥८३॥

धरोनि त्यांचीं सकल शिरें । हालवोनि जगदीश्वरें ।

कटीभोवता लंबोदरें । बांधिला फणी तेधवां ॥८४॥

गुणेश करी जेव्हां गर्जना । कांपवी तेव्हां त्रिभुवना ।

शेषासहित उरग नाना । विष वमना करीत आले ॥८५॥

मयूरेश्वरें मयूरास । पुढें पाठविलें युद्धास ।

तो धावोनि आसमास । बहु सर्पांस मारीतसे ॥८६॥

पक्षवातें उडविलें । कितीकांचे तुकडे केले ।

मयूरे किती सर्प भक्षिले । विदारिले पादोदर ॥८७॥

मयूरे संव्हारिले सर्प विशेष । हें पाहोनि क्षोभला शेष ।

विषभरित सोडी श्वास । तेणें मयुरास भ्रम दाटला ॥८८॥

भूमिशी पडतां तो अंडज । क्षोभता जाहला गणराज ।

उडी टांकोनियां सहज । दाबी पदीं फणा त्याच्या ॥८९॥

त्रिभुवनदाहक ऐसी गरळ । वमीतसे तेव्हां व्याल ।

त्याणें लावोन पादकमल । फणा सकल रगडिल्या ॥९०॥

अनंतब्रह्मांडे उदरीं ज्याच्या । भार न साहे शेष त्याचा ।

महिमा दावी मग नृत्याचा । प्राण शेषाचा व्याकुळ ॥९१॥

फणींद्र फिरवोनियां वेगें । परीकरी बांधिला भवभयभंगे ।

हें पाहोनि धावले रागें । सर्प उगे न राहती ॥९२॥

युद्धास पातले अनेक सर्प । त्यातें पाहे गणाधिप ।

कांही न मानितां ताप । करी साक्षेप हुंकाराचा ॥९३॥

गणेश जेव्हां हुंकारला । तेणें सर्पांचा संहार जाहला ।

मग शेषें स्तव केला । तेणें तुष्टला मयुरेश ॥९४॥

नागकन्याहीं गुणेश नेला । वियोग न साहे बाळकांला ।

ते धुंडित वनी त्याला । हाका तयाला मारिताती ॥९५॥

रडती बाहती करुणास्वरें । भगासुराचे मुखांत सारे ।

शिरोनि जातां जाहले घाबरे । ह्मणती बरें दिसेना ॥९६॥

काय जाहली दिशाभूल । कोठे गेला दिनदयाळ ।

आमचा कैवारी गौरीबाळ । ह्मणोनि विव्हळ जाहलों ॥९७॥

सर्वज्ञ तो गौरीनंदन । देता जाहला त्यांस दर्शन ।

योगमायेने मोहून मन । बाळा निमग्न तेथें केलें ॥९८॥
सायंकाळ होतां प्राप्त । गृही वाट पाहती आप्त ।

शोध करिती मातातात । कोठे सुत न देखती ॥९९॥

आक्रोश करिती ज्यांच्या माता । दुःख करी ग्रावदुहिता ।

कळवळा येवोनि एकदंता । काय करिता जाहला ॥१००॥

जीचे जैसें होतें बाळक । तैसा नटला जगन्नायक ।

बाळरुपें धरोनि अनेक । आपण नायक मयुरेश्वर ॥१॥

घेऊनि बाळकांचा मेळा । गृहीं पातला तयेवेळां ।

पाहोनियां निजबाळा । माता कवळिती तयातें ॥२॥

बाळकें कवळोनियां पोटीं । तयासि ह्मणती तेव्हां गोरटी ।

विनायकाचे स्नेहासाठीं । तुमचे पाठीं कर्मदशा ॥३॥

संगती केली तुह्मी त्याची । आतां दैना संसाराची ।

क्षुधेनें उदरें खोल तुमची । गेलीं पहा बाळक हो ॥४॥

कराल मयुरेशाची संगती । तरी ताडूं तुह्माप्रती ।

पाय बांधोनियां निश्चिती । यथामती शिक्षा करुं ॥५॥

श्रोते परिसा पूर्वानुसंधान । मयुरेशें करितां सर्पदमन ।

ऐकोन शेषाचें स्तवन । जाहला प्रसन्न जगदात्मा ॥६॥

शेष म्हणे देवाधिदेवा । काहीं सांगे मला सेवा ।

गुणेश म्हणे मुक्त करावा । बंध आतां आंडज्यांचा ॥७॥

वंदोनि त्याचें तेव्हां वचन । जटायु संपाती आणि श्येन ।

भेटविले मयुरेशास आणुन । करिती नमन गुणेशाते ॥८॥
घेऊनि आज्ञा तेव्हां तिघेजण । येऊनि वंदिती विनताचरण ।

मग तिणे आलिंगुन । केलें अवघ्राण मस्तकाचें ॥९॥

शेष गुणेशातें सिंहासनी । पूजिता जाहला चित्त लाउनी ।

अमोल्य वस्त्रें भूषणें अर्पुनी । जाहला स्तवनी सादर ॥१०॥

शेषाचा घेऊनियां निरोप । पूर्वस्थळीं आला गणाधिप ।

तव भगासुर पातिला अमुप । मुख पसरिलें तयानें ॥११॥

परशुघातें असुरशीर । छेदिता जाहला लंबोदर ।

देव करिती जयजयकार । सुमनें भार वर्षती ॥१२॥

योगमाया काढोन सावधान । करिता जाहला ऋषिनंदन ।

मग तयास सवे घेऊन । पावले निकेतन तेधवां ॥१३॥

जयजयाजी सर्वज्ञमूर्ती । आदिपुरुषा गणपती ।

पुढें बोलवि तुझी कीर्ती । यथामती वर्णीन मी ॥१४॥

स्वस्ति श्रीगणेशप्रतापग्रंथ । श्रीगणेशपुराण संमत ।

क्रीडाखंड रसभरित । द्वाविंशोध्याय गोड हा ॥११५॥

श्रीगणेशार्पणमस्तु ॥अध्याय॥२२॥

अध्याय बाविसावा समाप्त

N/A

References : N/A
Last Updated : September 22, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP