मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री गणेश प्रताप|
क्रीडाखंड अध्याय २३

श्री गणेश प्रताप - क्रीडाखंड अध्याय २३

सर्व कीर्तीने युक्त, सर्व देवाधिदेवांमध्ये श्रेष्ठ अशा अत्यंत प्रिय असलेल्या श्रीगजाननाच्या स्तुतीपर हा ग्रंथ आहे.


श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीक्षेत्रपालाय नमः ।

जयजयाजी मयुरेशा । भक्तपालका रे जगदीशा ।

चराचरा अवनीशा । पुरवी आशा माझी तूं ॥१॥

पूर्वाध्याईं कथा मधुर । कद्रुपुत्रातें मयुरेश्वर ।

सोडवोनी अघासुर । वधोन आला निजगृहीं ॥२॥

पुढें जाहली काय कथा । दशम वर्ष जगन्नाथा ।

महोत्साहें प्राप्त होतां । काय करी पराक्रम ॥३॥

कश्यपादी ऋषिसमस्त । भविष्यार्थ जाणोन त्वरित ।

त्यांहीं येऊनि ऊमाकांत । वंदियेला तेधवां ॥४॥

ऋषि ह्मणती पयःफेनधवला । तुवां जावें हो अन्यस्थळा ।

मयुरेशास्तव अरिष्टमाळा । सदां येती आम्हांवरी ॥५॥

तुम्हास राहणें असेल येथें । आम्ही जाऊं आणिक पंथें ।

निर्भय स्थळ असेल जेथें । राहूं तेथें सर्वज्ञा ॥६॥

ऐकोन त्याचें ऐसें वचन । कृपेनें द्रवला त्रिलोचन ।

कृपें मृडानीमनोरंजन । अभयवचन देत तयां ॥७॥

शिव म्हणे ऋषिलागीं । आजवर होतों तुमचे संगीं ।

तेणें सुख जाहलें मजलागीं । तें वर्णिलें न जाय हो ॥८॥

तुम्ही असावें येथें सुखें । आम्ही जाऊ येथून हरिखें ।

शिव म्हणे नगजे सखे । कर गे तयारी गमनाचि ॥९॥

नंदीवरी आरुढला । अग्री घेतली हिमनगबाळा ।

तिचे अंकी मयूरेश भला । सुत शोभला अत्यंत ॥१०॥

लागले वाद्यांचे गजर । भोंवते चालती गणभार ।

ढाळिती शिवावरी चामर । माथां छत्रें धरिलीं त्याहीं ॥११॥

दक्षिणाभिमुख शिव चालिला । तंव तिकडून कमलासुर पातला ।

तेणें कोल्हाळ बहुत केला । सकळ दळासहित पैं ॥१२॥

द्वादशक्षोणी दैत्यसेना । करिताहेत बहु गर्जना ।

ऋषि म्हणती गौरीरंजना । कसा नंदना रक्षिशील ॥१३॥

ऐकोन त्याचें ऐसें वचन । मयुरेश बोले तेव्हां गर्जुन ।

शंभु असतां विद्यमान । काय कमलानें करावें ॥१४॥

पार्वतीचे अंकाखालीं । मयुरेशें उडी टांकली ।

शिरे ठेवोनी पादकमळीं । विनयें बोली बोलतसे ॥१५॥
तुझें प्रसादें सर्वेश्वरा । आतां संव्हारीन असुरा ।

शिव म्हणें रे कुमरा । बरा बरा शब्द तुझा ॥१६॥

घेउनियां प्रमथगण । बा उत्साहें करी रण ।

घेशील कमलासुराचा प्राण । विजयी होउनी येशील रे ॥१७॥

माथां स्पर्शोन वरद करीं । त्रिशूल देऊनियां मदनारी ।

प्रमथातें आज्ञा करी। करा तयारी युद्धाची ॥१८॥

मयूरारुढ मयुरेश्वर । होवोनि फुंकी शंख थोर ।

दुमदुमिलें दिशा अंबर । मही थरथर कांपतसे ॥१९॥

त्याचे ऐकतां शंखनादाशी । विरश्री चढली शिवगणाशी ।

कंप संचरला मानशीं । असुराचे तेधवां ॥२०॥

रणवाद्यांची घाई लागली । दोनी दळे एकवटलीं ।

गगनी उसळली तेव्हां धुळी । गांठी पडली महावीरां ॥२१॥

वर्षती शस्त्रास्त्रसंभार । सिंहनादें गर्जती थोर ।

जाहला सेनेचा संव्हार । महावीर पडले रणीं ॥२२॥

कोणाचे तुटले चरण । कितीकांचे उडाले कर्ण ।

कितीक पावले वीर मरण । असुरगण संग्रामीं ॥२३॥

तुटलीं मनगटें वीरांची । कोणी तुटले अर्धेची ।

हारी पडली शिरांची । किरीटकुंडलासमवेत ॥२४॥

कोणाचे जाहले मस्तक भग्न । कोणाचें उदर गेलें फाटुन ।

जंघा पोटर्‍या विदारुन । वीर पडले असंख्यात ॥२५॥

रणांतून उडाला धुरोळा । तो आच्छादी सूर्यमंडळा ।

तेणें अंधकार दाटला । कोणी कोणा नोळखती ॥२६॥

स्वामीची नामें पुसोनियां । मग हाणिती निष्ठुरघायां ।

पर रथ टांकिती मोडोनियां । भिडताती अति निकुरें ॥२७॥

रणीं मांडली झोंट धरणी । पडल्या गजतुरंगाच्या श्रेणी ।

अंबर झाकुळलें बाणी । राक्षसगणीं हाहाःकार ॥२८॥

गुणेशबळें सुरगण । राक्षसाचे घेती प्राण ।

ऐसें पाहतां असुर दारुण । अंतःकरणीं क्षोभला ॥२९॥

चाप सज्जऊनियां वेगीं । कवच बांधलें अभेद अंगीं ।

विक्राळ हाका तयाप्रंसगीं । मारोनि जगीं कंप करी ॥३०॥

म्हणे मजसीं युद्ध करी । ऐसा वीर कोण महीवरी ।

हा एकाकीं अवसरी । बरोबरी करीन म्हणे ॥३१॥

तशांत हा जगदीश्वर । उतरावया भूभार ।

प्रगटोन करी संव्हार । असुरांचा तेधवां ॥३२॥

दाढा खावोन करकरां । अमित सोडी तेव्हां शरां ।

तेणें जाहली पीडा वीरां । गुणेशाचें तेधवां ॥३३॥

कमलासुराचे तिखट बाण । तेणें माघारले सुरगण ।

हें पाहोनियां गजकर्ण । निजरुप दारुण प्रगट करी ॥३४॥

घेऊनियां चाप हातीं । शरजाल मोकली गणपती ।

तेणें पडल्या असुरपंक्ती । पुढें गती न धरती ते ॥३५॥

सिंहनाद करी जेव्हां । असुर मूर्च्छित पडती तेव्हां ।

कोरडी पडोनियां जिव्हा । प्राण सोडिती रणांगणीं ॥३६॥

पाहतां गुणेशाचा प्रताप । कमलासुराचे हृदयीं ताप ।

संचरोनी राक्षसाधीप । धरोनि साक्षेप अस्त्र योजी ॥३७॥

सर्पास्त्र सोडिलें कमलासुरें । पन्नगीं प्रमथ केले घाबरे ।

हें पाहतां नगजाकुमरें । गरुडास्त्र त्वरें सोडियेलें ॥३८॥

गरुड येऊनियां अनेक । सर्प भक्षिती एकएक ।

क्रोधें संतप्त दैत्यनायक । सोडी सायक सहस्त्रशा ॥३९॥

मयुरेशें काय केलें । तेणें चक्रास्त्र अभिमंत्रिलें ।

दैत्यचमूवरी सोडिलें । संव्हारिलें दैत्यगण ॥४०॥

असुर जाहले छिन्नभिन्न । जानूजंघा गेल्या तुटोन ।

कितीकांचे नासीक कान । केलें खंडण चक्रानें ॥४१॥

वाहती शोणिताचे पुर । रणीं कबंध नाचती अपार ।

गुणेशें पाहतां मेले वीर । जाहला उद्धार तयांचा ॥४२॥

वीर मरती रणांगणीं । त्यातें वरोनी अप्सरागणी ।

नेऊनियां नाकस्थानीं । भोगिती मानिनी तयातें ॥४३॥

असुरांचा संव्हार जाहला । तेणें दैत्येंद्र प्रज्वाळला ।

निबिडबाण तेव्हां वर्षला । तेणें पडला अंधकार ॥४४॥

जाहला प्रमथांचा संव्हार । पाहतां क्षोभला मयूरेश्वर ।

करोनियां सायकमार । तोडिले शर तयाचे ॥४५॥

असुरनाथ तुरंगावरी । बैसोनियां युद्ध करी ।

गुणेश सायकें अश्व मारी । असुर अंबरीं उडाला ॥४६॥

गर्जोनियां असुर बोले । तुवां माझे अश्व मारिले ।

आतां मोर सांभाळी आपले । माझें आलें शरजाल ॥४७॥

करोन चापाचा ठणत्कार । वरोनि सोडी असुर शर ।

तेणें प्रमथांचा संहार । होता जाहला बहुसाल पै ॥४८॥

कमलासुरें बाणघातें । विव्हल केलें मयूरातें ।

गुणेशें उतरोनि खालतें । पाश करातें वसवीतसे ॥४९॥

गुणेशे पाश फिरविले । तेव्हां चराचर कांपूं लागलें ।

विमानें घेऊनियां पळाले । अमरगण तेधवां ॥५०॥

पाश टांकोनियां खडतर । त्यांत गोविले तेणें असुर ।

जाहला तयांचा संहार । कमलासुर सांपडला ॥५१॥

कंठदेशीं पाश पडतां । दानव आचरे कृत्रिमता ।

रुपांतर धरोनि तत्वता । उंचावल बहुसाल ॥५२॥

मस्तकें आच्छादोन रवीमंडळ । मुखें गर्जना करी विक्राळ ।

तो शब्द ऐकतां तत्काळ । गर्भपतन जाहले ॥५३॥

मयुरेशास ह्मणे कमलासुर । तूं तव तान्हा अंबाकुमर ।

बाळकांशीं क्रीडा कर । सेवीं सत्वर मातृकुचा ॥५४॥

पळोन वेगें जाय आतां । व्यर्थ मरु नको गौरीसुता ।

जय न येगा मज देखतां । तुझी माता रडेल पैं ॥५५॥

मी क्षोभतां कमलासुर । उभा राहेल कोण समोर ।

मुष्टिघाते नगाचा चूर । मी करणार बलाढयपणें ॥५६॥

पायें रगडितो अवनीतळ । शेषाचें खचले तेव्हां बळ ।

नखाग्रें उडवीन शिरकमळ । मागें पळ आतांची ॥५७॥

ऐकतां खळाचे बोल निष्ठुर । त्याशी म्हणे नगजाकुमर ।

माझे दृष्टी तूं पामर । गाढा वीर नव्हेस रणीं ॥५८॥

चावट वलगना किती करिशी । पुढें स्थीर राहे कर युद्धाशी ।

हुंकारमात्रें त्रिभुवनाशी । विलयाशी पाववीन रे ॥५९॥

ऐकोन मयुरेशाचें ऐसें वचन । क्रोधें दैत्य रक्तलोचन ।

शर सोडी वेगेंकरुन । पाहून तोषला गुणाग्रणी ॥६०॥

दाविली विराटरुपाची स्थिती । कमलासुर पाहे सभोंवती ।

जिकडे तिकडे मयुरेश मूर्ती । पाहतां चित्ती घाबरला ॥६१॥

पळों लागला कमलासुर । त्याची शिखा गौरीकुमर ।

धरोनि पाडी उर्वीवर । धरीं धीर ह्मणे तया ॥६२॥

वीरवृत्तीच्या सांगशी गोष्टी रणीं पळशी । दाऊनि पाठी ।

दैत्य उघडोन पाहे दृष्टी । मूर्ती गोमटी एक दिसे ॥६३॥

मग हाका देऊनि विक्राल । युद्धास सर्सावला दैत्य सबळ ।

विनायकावरी बाणजाळ । घाली खळ तेधवां ॥६४॥

विनायकें सोडोनि शर । भेदिलें दानवाचें सर्व शरीर ।

महीतळीं पडतां रुधिर । होती असुर त्यापासुनी ॥६५॥

लक्षानुलक्ष कमलासुर । पाहून विस्मित आर्याकुमर ।

सिद्धिबुद्धी येउनी सत्वर । त्यांही उत्पन्न वीर केंले ॥६६॥

साडेतीनकोटी वीरश्रेणी । मयूरेशातें म्हणती तेक्षणी ।

क्षुधा लागली आम्हालागुनी । काय भक्षावें सांग आतां ॥६७॥

विनायक म्हणे तयांशी । सरक्त भक्षावें असुरांशी ।

ते विक्राळ तेजोराशी । खाती असुरांशीं तेधवां ॥६८॥

विनायकाचें शरधातें । पडतां रुधिर चाटती त्यातें ।

एकला देखोन कमलासुरातें । काय करिता जाहला ॥६९॥

खड्‌ग घेऊनि विनायक । तेणें तोडिला असुरनायक ।

शतखंडें पडतां देख । जाहले शंभर कमलासुर ॥७०॥

ते सोडिती शरजाळ । सिद्धिजपुरुष भक्षिलें सकळ ।

रणीं एकला उभा खळ । शरमार करितसे ॥७१॥

गुणेश तेव्हां परम क्षोभला । शिवदत्त शूल तेणें घेतला ।

भोवंडोनिया भिरकाविला । शब्द उठला दुःसहपणें ॥७२॥

तडकलें तेव्हां समुद्रजळ । कांपू लागला ब्रह्मांडगोळ ।

अवनी पाहे रसातळ । शेषें भाळ सर्साविलें ॥७३॥

आदिकूर्में पृष्ठी देउनी । तेव्हां सांवरिली मेदिनी ।

विमानें पळविलीं अमरानीं । प्रळय मनी भासे तयां ॥७४॥

शूळें कमलासुराचें शिर । छेदुनी केला त्याचा संहार ।

देव करिती जयजयकार । सुमन संभार वर्षोनियां ॥७५॥

उडालें असुराचें मस्तक । तें भिमा दक्षिणतटीं पडलें देख ।

कृष्णोत्तर तटाकि विनायक । युद्ध करिता जाहला ॥७६॥

जयवाद्यें वाजवित । मागें परतला अंबासुत ।

यशस्वी पुत्र ऐकतां अंबाकांत । आनंदभरित नाचतसे ॥७७॥

पुत्रेंकरिता शिवासी नमन । शंभू देऊनि आशीर्वचन ।

करी मस्तकाचें अवघ्राण । शर्करा दान करीतसे ॥७८॥

विनायकें निजजननी । पाहतां प्रेमाश्रू लोटती नयनीं ।

माता धांवत येउनी । पुत्रालागीं भेटली ॥७९॥

आडवा घेऊनि मांडीवरी । स्तनपान त्यातें करवी गौरी ।

स्तुती करितां मनुज अमरी । भक्तकैवारी तुष्टला ॥८०॥

मयुरेश्वराचेनि येतां । जाहला तेथें नगरनिर्मिता ।

विश्वकर्म्याची कर्तृत्वता । पाहतां विस्मित पुरंदर ॥८१॥

मयुरेशनामें दिव्य नगर । तेथेंच प्रमथ ऋषेश्वर ।

घेऊनियां शंकर । राहतां जाहला कौतुकें ॥८२॥

मग मीं जावोनियां तेथें । पूजोनियां स्तवीं गुणेशातें ।

विधि म्हणें पाराशरसुतातें । सम्यक चित्तें करोनियां ॥८३॥

तंव मायेचें पडोनि पटल । बुद्धि जाहली मोहें विव्हल ।

हा तव पार्वतीचा बाळ । मज मनासी योग्य नव्हें ॥८४॥

सृष्टीकर्ता मी परमेष्ठी । यास पूजितों कशासाठीं ।

म्हणोनि अदृश्य केली सृष्टी । त्यास हिंपुटी करावया ॥८५॥

गुणेश अवलोकून पाहे जंव । तंव दृश्य मावळलें सर्व ।

मग माझें कृत्य देवाधिदेव । समजता जाहला तेधवां ॥८६॥

अनंत ब्रह्मांडाचा नायक । लीला विग्रही विनायक ।

दाविता जाहला कौतुक । सृष्टी सकळिक उत्पन्न करी ॥८७॥

स्वर्गपातालमृत्युभुवन । देवराक्षस ऋषीजन ।

पूर्ववत जग करुन । करी क्रीडन बाळांसवें ॥८८॥
ऐशीं पाहतां सृष्टीरचना । अनुताप जाहला माझें मना ।

मग शरण मी गौरीनंदना । जाउनी चरणा धरियेलें ॥८९॥

तेणें नासाश्‍वासें आकर्षिलें । उदरामाजी नेउनी सोडिलें ।

तेथें माझें मन भुललें । अनंत ब्रह्मांडें अवलोकितां ॥९०॥

गळोन गेला अभिमान । मग मी स्तविला गजवदन ।

तेव्हां तेणें कृपा करुन । बाहेर काढोन टांकिलें मज ॥९१॥

मग मी चरणी ठेविला माथा । कृपा आली विश्वनाथा ।

गुणेश मज म्हणे सर्वथा । गर्व व्यथा धरुं नको ॥९२॥

माझे शिरीं वरदकर । ठेविता जाहला लंबोदर ।

आज्ञा घेऊनि सत्वर । निज मंदिरीं प्रवेशलों ॥९३॥

एकादश वर्षांचा आर्याकुमर । पराक्रम तेणें केला थोर ।

पुढें द्वादश संवत्सर । उत्साह थोर प्रवर्तला ॥९४॥

गौरी त्याचे जन्मदिवसीं । द्वादशाब्दीक उत्साहासि ।

करिती जाहली तेजोरासी । स्वपुत्रासीं शुभद जो ॥९५॥

भाद्रपद शुक्ल चतुर्थीस । करोनि मृन्मय मूर्तीस ।

उत्साहें पूजितां भक्तजनास । आनंदास न्यून नसे ॥९६॥

तंव तेथें दैत्य विश्वेदेव । धरोनियां भगद्भाव ।

श्रीमुद्रांकित काय सर्व । कंठीं माळा तुळशीच्या ॥९७॥

शंखचक्रगदापद्म । आयुधें धरिलीं तेणें उत्तम ।

जलपूरित कमंडलू परम । उमाधामीं प्रवेशला ॥९८॥

पाहोनि त्यातें शिवकामिनी । बैसविती जाहली त्यास आसनीं ।

पादप्रक्षाळुनी त्या जीवनीं । केली सदनीं पवित्रता ॥९९॥
यथा विधी पूजन केलें । मग तिणें पात्र वाढिलें ।

तयास भोजनालागीं बैसविलें । करीं घेतलें उदक तेणें ॥१००॥

करावें जव आपोशन । तंव ब्राह्मणाचें दुश्चित मन ।

अंबा विनवी तयालागुन । घ्या आपोशन विप्रवर्या ॥१॥

येरु म्हणे सर्व चुकलें । हरीचें दर्शन नाही केलें ।

मी आधीं उदक भक्षिलें । अंतर पडलें नेमास हो ॥२॥
अंबा म्हणे नेम जरीं । कां बैसलांत पात्रावरी ।

हें पिनाकीस कळेल जरीं । काय तरीं करील तो ॥३॥

जवळ बैसला होता गणपती । बोले तेव्हां विप्राप्रती ।

तुम्हीं अवलोकितां पार्वती । विष्णु दर्शन घडलें तुम्हां ॥४॥

जी आदिशक्ती जगन्माता । त्रिगुणात्मिका सौभाग्यसरिता ।

तिचें भावें दर्शन घेतां । आहे अनंता आल्हाद पैं ॥५॥

षड्रस अन्नें पात्र वाढिलें । तें तुवां टांकितां नाहीं चांगलें ।

ब्रह्मरुप अन्न भरिलें । वेद बोलले वैष्णववरा ॥६॥

येरु म्हणे विनायकास । मी तो आहें विष्णुचा दास ।

न घेतां त्याचे दर्शनास । कधीं अन्नास न भक्षीन मी ॥७॥

सर्वरुपी म्हणविसी आपणा । तरीं दाखवी त्याचे चरणा ।

आश्चर्य वाटे गजकर्णा । भाव पाहुनि तयाचा ॥८॥

गुणेश तेव्हां गुप्त जाहला । विष्णुरुपें प्रगटला ।

कटी रुळती तुळसीमाळा । दिव्य नेसला पीतांबर ॥९॥

शंखचक्रगदापद्म । करीं आयुधें शोभती उत्तम ।

भक्ताभिमानी पूर्णकाम गळयांत दाम मुक्तामय ॥११०॥

वक्षीं झळके कौस्तुभमणी । कुंडलें झळकती दिव्य कर्णीं ।

पादसंवाहन करी रमणी । समुद्रनंदिनी तेधवां ॥११॥

कोटिकंद रुपागळा । विश्वेदेवें देखिला सांवळा ।

मग उठोनियां उताविळा । पादकमळा घाली मिठी ॥१२॥

अष्टभावें होवोनि सद्गद । वारंवार नमी त्याचे पद ।

तयासी म्हणे तेव्हां मुकुंद । महत्प्रमोदा दाऊनियां ॥१३॥

तुजसाठीं भक्तसखया । क्षीराब्धी टाकोन या ठाया ।

आलों तुजला भेटावया । प्रेमभावें करोनि गा ॥१४॥

बाहू पसरोनि इंदिरारंजन । देत तयासी आलिंगन ।

तव तेथें शक्तिनंदन । करी अर्चन पराशर ॥१५॥

करुन मृन्मय गणेशमूर्ती । पूजा करुन करी स्तुती ।

प्रार्थना करितां तिजप्रती । जाहली चेतना मुनिवर्या ॥१६॥

हातीं होते मृन्मय मोदक । ते भक्षी मूर्ती देख ।

क्षणांत भासे गजमुख । क्षणांत विष्णुमुर्ती दिसे ॥१७॥

ऐसें पाहतां विश्वेदेव म्हणे । मृत्तिकाशन काय करणें ।

ऐकतां त्यास मूर्ती म्हणे । तुज कारणें हें न कळेच ॥१८॥

भावें अर्पिलें विष जरीं । आह्मास तें अमृतापरी ।

दांभिकें अमृत अर्पिलें तरीं । विषापरी देवास तें ॥१९॥

मुख्य देवासी भाव कारण । नोहे वश्य भावाविण ।

भावशून्य मानव जाण । तो देवासी आवडेना ॥१२०॥
मग मयुरेशे रुप प्रगटिलें । तयासि तेणें हातीं धरिलें ।

घरोघरीं फिरविलें । तेथें दाविलें अभेदपण ॥२१॥

घरोघरीं मृन्मयमूर्ती । करोनियां ऋषि पूजिती ।

क्षणांत दिसे मयूरेशाकृती । विष्णुमूर्ती क्षणांत पाहे ॥२२॥

विश्वेदेवास तेव्हां कळलें । पंचायतन एक भलें ।

एक असतां पांच भासले । यथामती जनासीं ॥२३॥

विश्वेदेव आज्ञा घेउनी । जाता जाहला स्वकीय सदनीं ।

विधि सांगे व्यासालागुनी । ऐके कथा रसाळ पुढें ॥२४॥

स्वस्ति श्रीगणेशप्रतापग्रंथ । श्रीगणेशपुराण संमत ।

क्रीडाखंड रसभरित । त्रयोविंशत्यध्याय गोड हा ॥२५॥अध्याय॥२३॥ओव्या॥१२५॥

अध्याय तेविसावा समाप्त

N/A

References : N/A
Last Updated : September 22, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP