मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री गणेश प्रताप|
क्रीडाखंड अध्याय २६

श्री गणेश प्रताप - क्रीडाखंड अध्याय २६

सर्व कीर्तीने युक्त, सर्व देवाधिदेवांमध्ये श्रेष्ठ अशा अत्यंत प्रिय असलेल्या श्रीगजाननाच्या स्तुतीपर हा ग्रंथ आहे.


श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः । श्रीगुरुभ्यो नमः । श्रीक्षेत्रपालाय नमः ।

ॐ नमोजी पुराणपुरुषा । सच्चिदानंदा नित्यहर्षा ।

त्वत्कृपेनें पावोनि तोषा । वर्णितों गुण यथामती ॥१॥

विजयी जाहले शिवगण । सिंधू करी शोक दारुण ।

नाहीं जिंकिले अमरगण । पावले मरण वीर कसे ॥२॥

ज्यांही तृणतुल्य देव केले । ते आज कैसे पहुडले ।

काय दैव प्रतिकूल जाहलें । म्हणोन घडलें अपूर्व हें ॥३॥

शलभें उलथिला कैसा मेरु । मुंगीनें शोषिला काय सागरु ।

कर्पूर जिंकिला वैश्वानरु । पश्चिमेस दिनकरु उगवला ॥४॥

क्रोधें थरथर कांपत । तुरंगावरी तो आरुढत ।

अनंतसेना सवें घेत । मग निघत रणांगणीं ॥५॥

ऐकोन वाद्यांचे तुमुलघोष । शिवगणासि न साहे रोष ।

पुढें धांवती पावोन हर्ष । युद्ध विशेष करावया ॥६॥

घडघडले जेव्हां रथ । वीर क्षोभले तेव्हां प्रमथ ।

शर सोडी दैत्यनाथ । नसे प्रमाण तयांसी ॥७॥

महारथी वीर गाढे । दैत्य तेव्हां लोटले पुढें ।

शत्रु पराक्रम पाहतां कुडें । सिंधू रडे बहुसाल ॥८॥

महाबलाढय शिवगण । त्याहीं माजविलें अद्भुत रण ।

दानव पावलें बहुत मरण । सिंधू पाहून खिन्न जाहला ॥९॥

मग साटोप धरोनियां भारी । गगन झांकुळी निजशरीं ।

अंधकार पडला अवनीवरी । धीर वीरीं सोडियेला ॥१०॥

रणीं खवळिला दैत्य दुर्धर । करीत चालला गणसंहार ।

तयाचा पराक्रम साचार । पाहतां वीर गजबजले ॥११॥

हयाखालीं उतरोन । दानवेश धांवळा वेगेंकरुन ।

वीरभद्रासि करी ताडण । केलें पतन तयानें ॥१२॥

खड्‌ग घेऊनियां हातीं । सिंधू हाणी नंदीप्रती ।

धेनुज पावला मूर्च्छागती । रणांगणीं पहुडला ॥१३॥

भूतराज पुष्पदंत । आले पुढें गर्जना करित ।

त्यास सिंधू हाणित । करीं मूर्च्छित तयातें ॥१४॥
हिरण्यगर्भाची शिखा धरुन । करी सिंधू त्यासि ताडण ।

शामलाचे ललाटीं बाण । मारोन पाडिलें रणांगणीं ॥१५॥

चपल आणि विकट । हाक देवोनि धांवले बलकट ।

सिंधूनें मारोन बाण तिखट । पाडिले भट भूतळीं ॥१६॥

दानवेंद्र अत्यंत क्षोभला । लंबकर्णातें भेदिता जाहला ।

रक्तलोचन चरणीं धरिला । आपटिला भूमीवरी ॥१७॥

सुमुखाचें फोडिलें मुख । सोमास दाविलें लत्तासुख ।

भृंगीस मारोनियां फुंक । फोडिलें उदर तयाचें ॥१८॥

दावानल वीर राणा । करीत पातला बहुत गर्जना ।

त्यातें मारोनि शरनाना । त्याचे मस्तक फोडियेलें ॥१९॥

जे जे सिंधु पुढें गेलें । ते ते तेणें पराभविलें ।

बाकी गरीब पळों लागले । तेही मारिले बाणजाळें ॥२०॥

बाण सोडीत सिंधु धावला । विरुपाक्ष पाहोनि पळाला ।

सिंधू गर्जना करुं लागला । तेणें कांपला भूगोळ पैं ॥२१॥

रणीं मुनि बाळकांसहित । उभा पाहोनि अंबासुत ।

गर्वें सिंधू तयासि बोलत । गर्जना करीत बहुसाल ॥२२॥

मागें ऐकिला पराक्रम । आतां दिससी जंबुकासम ।

कोमलांगासि युद्धकर्म । कैसें करुं कठोरपणें ॥२३॥

तुवां प्राशून मातृस्तन । खेळें रिजवावें आंगण ।

तूं काय करावें रण । वांचवी प्राण जा मागें ॥२४॥

येथवर मी दयाळूपणें । नाहीं मारिला मित्रपणें ।

ऐकतां ऐसें गुणेश म्हणें । मूढपणें बोलसी ॥२५॥

तुझ्या ऐशा नेणो किती । ब्रह्मांडीं करुन अनंत व्यक्ती ।

मारोनियां दुष्टाप्रती । रक्षिता गा साधू मी ॥२६॥

घेऊनियां तुझा प्राण । करीन रे भूभार हरण ।

जरीं येसी मातें शरण । मग रक्षन करीन तुझें ॥२७॥

ऐसी ऐकतां वीरवाणी । असुर विधीं अनेक बाणीं ।

तोडी परशूनें परशुपाणी । दृष्टीस नाणीं तयातें ॥२८॥

दानवेंद्र करी त्वरा । मेघापरी वर्षे शरा ।

तितुके तोडितां अंबाकुमरा । तो योद्धा बरा न वाटे ॥२९॥

परशूनें दानव चापें । तोडिजेली गणाधिपें ।

मग दानव फार कोपे । चक्र साक्षेपें घेत करीं ॥३०॥

चक्र भवंडोन टांकी जेव्हां । कडकडाट जाहला मोठा तेव्हां ।

गणेशें टांकिला शूल बरवा । तेणें तडकला ब्रह्मगोळ ॥३१॥

शूलें चक्र टांकिलें भेदून । छेदिले तेव्हां मुगुटकान ।

गुणेश करीं पुन्हां येऊन । संचरोन राहिला तो ॥३२॥

सिंधूचे तुटले दोनी कान । लज्जित जाहलें त्याचें वदन ।

म्हणे तुझें नाक छेदीन । हो सावधान गुणेशा ॥३३॥

खड्‌ग घेऊनि उठावला । गुणेश तेव्हां आनंदला ।

जिकडे तिकडे भासे त्याला । पाहतां भुलला दानवेंद्र ॥३४॥

चारी आयुधासहित मूर्ती । अनेक पाहतां भुलली मती ।

रविवचन दैत्यपती । स्मरोन चित्तीं तरकला ॥३५॥

हा तो विश्वात्मा अनंत । माझा करील आतां अंत ।

पावेन याचें पद अद्भुत । वैर अत्यंत करोनियां ॥३६॥

डोळे मिटोन घाबरा पळे । रुपें आच्छादिलीं तयेवेळे ।

मध्येंच उघडोन नेत्रकमळें । पाहे सोज्ज्वळ एकलाच ॥३७॥

तथापि पोटीं मानोन भय । पळता जाहला दैत्यराय ।

मुख वस्त्रें आच्छादोन आलय । जवळ केलें तयानें ॥३८॥

होवोनियां खिन्न मन । तल्पकीं दैत्य करी शयन ।

चिंतातुर सैनिक होऊन । स्वनिकेतन प्रवेशले ॥३९॥

जयवाद्यें वाजवित । माघारा परतला अंबासुत ।

मातापित्यातें नमन करीत । गौरी आलिंगी तयासी ॥४०॥

गौरी म्हणे कोमलांगा । कृतांतवत असुरभंगा ।

पावविले तुवां जिवलगा । श्रमलासि गा तान्हया तूं ॥४१॥

ऐसें वदतां श्रमी जाहली । कमलेक्षण अश्रू मोकली ।

रुदन करितां शिवें देखिलीं । मग समजाविली भवानी ॥४२॥

ऋषिशिव गिरिजेस सांगती । ही नव्हे प्राकृत गणेशमूर्ती ।

भूभार हरणार्थ जगत्पती । अवतारस्थिती दावीतसे ॥४३॥

ज्याचे सत्तामात्रें जग जाहलें । सात्विकपणें यानें पाळिलें ।

कितीक वेळां संहारिलें । पुन्हां रचिलें शक्तिबळें ॥४४॥

अनंत ब्रह्मांडाचा हा स्वामी । तूं उगीच होतेस कां गे श्रमी ।

गुणेश तेव्हां मातेस नमी । दुःख शमवी वाक्यामृतें ॥४५॥

शंकराचे वरप्रसादें । कोटीच्या कोटी दैत्यवृंदें ।

मी मारोनियां आनंदें । पदारविंदें सेवीन तुझीं ॥४६॥

ऐकतां आनंदली गौरीबाला । तिणें पुत्र हृदयीं धरिला ।

तो घेऊनि वसिष्ठादि मुनिश्वराला । निघे रणाला पाहावया ॥४७॥

रणीं येऊनि पाहती सकळ । मांसकर्दम जाहला तुंबळ ।

दुर्गंधी वाहे तेथें अनिळ । पाहतां सकल त्रासले पैं ॥४८॥

रण शोधित जाती जन । तंव पडला रणीं षडानन ।

त्यातें मयुरेशें पाहून । करी रुदन स्नेहभावें ॥४९॥

गुणेश म्हणे दादा उठावें । प्राकृता ऐसें काय पडावें ।

म्हणोन उठवी जिवेंभावें । षडाननासि तेधवां ॥५०॥

उठोनियां कार्तिकेय । तेणें आलिंगिला गणराय ।

गुणेश वंदोनि त्याचे पाय । म्हणे भय नाहीं तुम्हां ॥५१॥

स्वामी तुम्ही तारकासुर । वधोन रक्षिले देव सर्व ।

काय करील सिंधू दानव । प्राकृत भाव दाऊ नये ॥५२॥

उभयतां बंधु धरोनि हात । रण चालले पाहत पाहत ।

तंव वीरभद्रादि वीर अद्भुत । पडले अमित रणांगणीं ॥५३॥

कार्तिकेयास म्हणे महाकाय । याचे जीवनार्थ काय उपाय ।

हांसोन बोले गांगेय । जाणशी सोय सर्वज्ञा तूं ॥५४॥

तथापि जरी प्राकृतापरी । विचारितोसि ऐक तरी ।

पूर्वीं वधितां त्रिपुरवैरी । जाहली अमरीं हीच दशा ॥५५॥

द्रोणाचळावरील आणोन औषधी । त्याणें केला चिकित्साविधी ।

गुणेश म्हणे मिळतील कधीं । त्या औषधी षडानना ॥५६॥
आतां दानव येतील युद्धासी । कोणीं करावा संग्राम त्यांशी ।

कोण आणील औषधीशी । हें मजसी सांग दादा ॥५७॥

ऐसें बोलोनि जगज्जीवन । मोकलोनि निजांग पवन ।

केलें वीरांचें तेव्हां जीवन । हडबडोन सर्व उठले ॥५८॥

नंदी भूतराज पुष्पदंत । वीरभद्र चपळादि वीर अद्भुत ।

येऊनि गुणेशाशी भेटती त्वरित । गुणेश बोलत स्मितमुखें ॥५९॥

करितां तुम्ही संग्राम । पावलेति बहुत श्रम ।

ऐसें ऐकतां वाक्यउत्तम । वीरसत्तम बोलताती ॥६०॥

तूं असतां अनंतशक्ती । त्या असुराचा पाड किती ।

तंवप्रसादें जगत्पती । पावलों शक्ती द्विगुणित ॥६१॥

गुणेशप्रसादें देवसेना । करिती जाहली बहुत गर्जना ।
मग पातले शिवदर्शना । करोनि वंदना स्तविताती ॥६२॥

येरीकडे दानवपती । तल्पकीं करीं शयन सुमती ।

ऐकोन त्याची मुख्य युवती । दुर्गासती पावली ॥६३॥

सर्वावयव सुदारा । घालोनि रत्‍नमयालंकारा ।

भाळीं मृगमदतिलक बरा । बिंदी बीजोरा माथ्यावरी ॥६४॥

कुरळ केशी रत्‍नभूषणें । मुखचंद्रें केलें शशीस उणें ।

जिचें पाहोनियां चालणें । अंतःकरण खिन्न करी ॥६५॥

विस्तीर्ण जघना सिंहकटी । कंचुकी दाटली कुचतटीं ।

कुंकुम रेखिलें ललाटीं । अत्यंत गोरटी शोभतसे ॥६६॥

तल्पका निकटीं येवोन कामिनी । पतीस विनवी सुहास्य वदनी ।

कां हो रतलां तल्पकशयनीं । काय मनीं चिंता असे ॥६७॥

जें पडलें असेल संकट । तें सांगावें मजला स्पष्ट ।

कल्याणाची सांगेन वाट । सौभाग्य सुभट राहील हो ॥६८॥

पतिकार्यालागीं दासी । रतिकाळीं वैश्याजशी ।

विपत्तिकाळीं दे बुद्धीशी । भार्याऐसी दुर्लभ हो ॥६९॥

मनामाजी दुःख झगटलें । ते स्वामी पाहिजे कथिलें ।

ऐकतां मन संतोषलें । दानव बोले तियेसी ॥७०॥

मयुरेश जो पार्वतीसुत । त्याणें आटले दानव बहुत ।

मग मी केलें युद्ध अद्भुत । वीर समस्तही भांडलें ॥७१॥

परी शेवटीं मयुरेशान । माझे छेदिले मुगुटकान ।

तेणें जाहलों लज्जायमान । म्हणोन शयन केलें सखे ॥७२॥

ऐकोन त्याची सखिन्नवाणी । नीतिज्ञ बोले तेव्हां तरुणी ।

म्हणे कांता सुयोधनकर्णी । तुंवां रणीं दाविली खरी ॥७३॥

परि आलें नाहीं तूंतें यश । आपले हातें करिसी नाश ।

पार्वतीगृहीं जगदीश । धरी वेश बाळकाचा ॥७४॥

उतरावया भूभार । लीला दावी सर्वेश्वर ।

तूं न जाणशी तामसतर । चरित्र अपार तयाचें ॥७५॥

यश यावया हेंचि कारण । सदां पुजावे देवब्राह्मण ।

करावें साधूंचें रक्षण । प्रतिपाळण धेनूचें पैं ॥७६॥

परदोषाचें आच्छादन । स्वगुण उच्चारणी मोहन ।

दुष्टकलाचें निक्रंदन । सदा अवन सुधर्माचें ॥७७॥

हाचि होय पराक्रम । पराक्रम नोहे अधर्मकर्म ।

हें न जाणोनि जिवलगा वर्म । व्यर्थ श्रम पावतोसि ॥७८॥

करावें देवांचे बंधमोचन । स्वपदी पाठवावें गौरवोन ।

कृपा करील अंबानंदन । करील अवन सकुल तूतें ॥७९॥

ऐकोनि तिची चातुर्य वाणी । दानव तोषला अंतःकरणी ।

भली भली गें तूंच शाहणी । मातें तरुणी साजतेसी ॥८०॥

तुझी पाहावया चतुरमती । खिन्नत्व दाविलें तुज युवती ।

तूं जी बोलली सधर्मनीती । ती मी सुमती जाणतसे ॥८१॥

रावणाचे हननास्तव । अवतरला पूर्वीं राघव ।

तैसा मयुरेश देवाधिदेव । वधिल दानव माझ्यासह ॥८२॥

त्याचे हातें पावेन मरण । मग मी पद पावेन निर्वाण ।

वीर काय शत्रूस शरण । जावोंनि रक्षण करितील गे ॥८३॥

नंदी तेणें पाठविला जेव्हां । मी काय नेणता होतो तेव्हां ।

दुर्गा ह्मणे विचार बरवा । तुम्ही करावा सर्वज्ञपणें ॥८४॥

तिचें करोनि शांतवन । वस्त्रें आच्छादोनि दोनि कान ।

सभास्थानी तो येऊन । बोले गर्जून तेधवां ॥८५॥

माझे दोन प्रधान होते । जे अमरांसि जाहले जिंकिते ।

त्यांवाचोनि राज्य रितें । मज भासतें या प्रसंगीं ॥८६॥

कोणी आणखी वीर दिसेना । आतां जिंकिल गौरीनंदना ।

ऐकोन शालक करिती गर्जना । करुं कलना कालासि रे ॥८७॥

तुवां चिंता न करावी मनीं । निद्रा करावी सुमन शयनीं ।

तव प्रसादें शत्रू वधुनी । मग येऊनि मुख दाखवूं ॥८८॥

ऐसे ऐकतां त्याचे बोल । रायें गौरविले कलविकल ।

वस्त्रें भूषणें देत अमूल्य । सैन्य तुंबल दिधलें सवें ॥८९॥

घेऊन चतुरंगिणी पूतना । करीत चालले बहुत गर्जना ।

हें जाणवलें शिवनंदना । तेणें गणास योजियेलें ॥९०॥

नंदी आणि पुष्पदंत । सवें दीधलें सैन्य बहुत ।

ते शत्रूवरी लोटत । युद्ध अद्भुत जाहलें ॥९१॥

नंदी निघोनि शत्‍रुगणांत । शृंगें मारी दैत्य बहुत ।

पादघातें संहारित । पुच्छें बहुत झोडीतसे ॥९२॥

महाबलाढ्य नंदिकेश्वर । करीत उठला दैत्यसंहार ।

कोण्हास येऊ न दे समोर । जाहला हाहाःकार राक्षसदळीं ॥९३॥

ऐसे अवलोकितां कलविकल । वर्षती शस्त्रभार तुंबल ।

परी नंदिवीर सबल । नाणी दृष्टीस तयातें ॥९४॥

नंदी पुंफावत गेला । विकलाचा रथ तेणें मोडिला ।

तंव कल धांवत आला । वर्षूं लागला शस्त्रभार ॥९५॥

न गणोन त्याचे सायकाशी । चूर करी त्याचे रथाशी ।

दोघे उतरोनियां भूमीशी । त्याणीं शृंगाशी धरियेलें ॥९६॥

शृंगे धरोनि नंदिकेश्वर । वोढीत नेताति असुर ।

हें पाहोनि पुष्पदंतवीर । धांवे समोर सपत्‍नांचे ॥९७॥

विकलें मारोनि लत्ताप्रहार । मूर्च्छित पाडिला पुष्पदंतवीर ।

शिवगणीं हाहाःकार थोर । धनुर्धर गजबजले ॥९८॥

ऐसा होतां आकांत भारी । वीरभद्र षडानन आले समरी ।

वीरभद्रें घेऊनि पर्वत करीं । विकलावरी टांकियेला ॥९९॥
पर्वततळीं विकल चूर । जाहाला जाणोनि कल वीर ।

धांवला षण्मुखावर । वर्षत शर तेधवां ॥१००॥

न गणोनि त्याचे सायकाशी । चपेटा मारिला कल वीरांशीं ।

तेणें तो वमी शोणिताशीं । कल प्राणांशी सोडीतसे ॥१॥

मेले कल विकल सरदार । इतर सैन्याचा केला चूर ।

जयवाद्यें वाजवित थोर । शिवकुमर परतले ॥२॥

येऊनि शिवभवानीस । नमिते जाहले आसमास ।

आलिंगी मयूरेश त्यास । ते आनंदास पात्र जाहले ॥३॥

स्वस्ति श्रीगणेशप्रतापग्रंथ । श्रीगणेशपुराण संमत ।

क्रीडाखंड रसभरित । षड्‌विंशतिंतमोध्याय गोड हा ॥४॥अध्याय॥२६॥ओव्या॥१०४॥

अध्याय सव्विसावा समाप्त

N/A

References : N/A
Last Updated : September 22, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP