मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री गणेश प्रताप|
अध्याय १३

श्री गणेश प्रताप - अध्याय १३

सर्व कीर्तीने युक्त, सर्व देवाधिदेवांमध्ये श्रेष्ठ अशा अत्यंत प्रिय असलेल्या श्रीगजाननाच्या स्तुतीपर हा ग्रंथ आहे.


श्रीगणेशाय नमः । श्रीदत्तात्रेयाय नमः ।

जयजयाजी विश्वसारा । मायातीता परात्परा । लड्डुप्रिया वेदकरा । दूर्वांकुरावतंसा ॥१॥

तुझे गुणगणनाची सीमा । कोण जाणेल पुरुषोत्तमा । वेदांगम्यत्वन्महिमा । जगल्ललामा जगद्‌गुरो ॥२॥

आकाशास घालवेल गवसणी । मापू शके समुद्रपाणी । संख्या करवेल ऋक्षगणी । परी त्वद्‌गुणवर्णनी शक्ती नसे ॥३॥

जरी सदया कृपा करिसील । तरीच वाणी गुणोच्चारिल । तेणे माझे जन्म सफल । असत्य बोल नव्हे हा ॥४॥

पूर्वाध्यायी कथाचरित । देवी पराभविले दैत्य समस्त । अमर जय शब्दे वाजवीत । विजयवाद्ये बहुसाल ॥५॥

पाहोनि क्षोभला त्रिपुरासुर । त्रिपुरारूढ होवोनि सत्वर । मग लोटला समोर । घोरांदर करी तेव्हा ॥६॥

वारुणास्त्र तेणे सोडिले । कल्पांत मेघ वर्षावले । शंकरसैन्य वाहू लागले । विद्युल्लता पडती एकसरे ॥७॥

ऐसे पाहोनि अंबानाथे । वायव्यास्त्र सोडिले तेथे । तेणे उडविले पर्जन्याते । नाहीच केले जळ कोठे ॥८॥

घोर सुटला प्रभंजन । असुरसैन्य जातसे उडोन । धुळीने झाकुळले नयन । गज उलथोन पडती रणी ॥९॥

महावाते सैन्यावरी । उन्मळोन पडती वृक्षहारी । गज अश्व वायसांपरी । एकसरे उडोन जाती ॥१०॥

कितेकांचे मोडले चरण । आदळोन भंगले वारण । रथ मोडोनि झाले चूर्ण । प्रळयकाळ वोढवला ॥११॥

पर्वतास्त्र त्रिपुरासुरे । सोडिता पवन एकसरे । कोंडोनि गेला पर्वताधारे । शिवसैन्यावरी नग पडती ॥१२॥

शिवसैन्यावरी पर्वत । पडो लागले अत्यद्भुत । तेणे गण चूर्ण होत । प्रळय मानिती ते काळी ॥१३॥

तृणीरांतून काढोनि बाण । असुरे वोढोनि आकर्ण । सोडिता प्रळयाग्नी जाण । शंभुसैन्यावरी धडकला ॥१४॥

चहूकडे उठल्या ज्वाळा । शिवसैन्य जळे ते वेळा । ज्वाळांतूनि महाकाय उठला । पुरुष तेव्हा घोरतर ॥१५॥

विक्राळदाढा भयंकर । दात खातसे करकर । तोंड पसरोनि भयंकर । जिव्हा बाहेर काढिली असे ॥१६॥

जिव्हा ज्याची शतयोजन । लडबडीतसे सिंदूरवर्ण । भक्षीतए अश्ववारण । सेना संपूर्ण खातसे ॥१७॥

देव वर्षती अस्त्रसंभार । मुख पसरोनि गिळी असुर । पळो लागले प्रमथभार । पर्जन्यास्त्र सोडी शिव ॥१८॥

तेणे अनळ शांत जाहला । महापुरुष मूर्च्छित पडला । मूर्च्छा सावरोनि उठला । भक्षू लागला शिवसेना ॥१९॥

पळोनि गेले प्रमथ देव । एकला रणी उभा शिव । चहूंकडे पाहे भव । साह्य कोणी असेना ॥२०॥

मग शंभू पलायन करी । सेवूनि राहिला घोर दरी । त्रिपुरासुर शिवमंदिरी । प्रवेश करी निर्भय ॥२१॥

गृही एकली गिरिजा सुंदर । येता ऐकोनिया असुर । भये कापतसे थरथर । लपवी म्हणे तातासी ॥२२॥

हिमालयी एकांत गव्हरी । लपविली आर्या सुंदरी । त्रिपुर संचरला मंदिरी । मृडनारी न दिसे कोठे ॥२३॥

मग धुंडाळी रिक्तमंदिर । चिंतामणीची मूर्ती मनोहर । सापडताचि घेऊनि असुर । मग सत्वर परतला ॥२४॥

कृतकृत्यार्थता मानुनी । करवी विजयवाद्यध्वनी । स्वस्थानाप्रति येउनी । आनंदवनी क्रीडतसे ॥२५॥

शिव जाहला चिंताक्रांत । तव पातला पद्मजसुत । पाहोनि त्याते नमस्कारित । मग पूजित यथाविधी ॥२६॥

शंकर वदे नारदाशी । युद्धी न जिंकवे त्रिपुराशी । चिंताग्रस्त होऊनि तुजशी । उपायासि विचारितो ॥२७॥

कर्तुमकर्तु अन्यथाकर्तु । शक्ती जाणशी अवघी तू । सकल कल्याणाचा हेतू । तुजवाचोनि कोण असे ॥२८॥

प्राकृतापरी विचारितोशी । म्हणोनि सांगतो आता तुजशी । न अर्चिले संकटहरणाशी । म्हणोनि विघ्न तूते जाहले ॥२९॥

सकलकारणादिकारण । तो प्रसन्न होता विघ्नहरण । मग पावशील कल्याण । भोगिभूषण जाण का ॥३०॥

ऐकोनि म्हणे कैलासाधीश । कैसा प्रसन्न होईल विघ्नेश । करील असुराचा नाश । भक्तपाशच्छेदक जो ॥३१॥

मुनि म्हणे गा शंकर । एकाक्षर षडक्षर । सर्वकामद मंत्र सुंदर । जप करीन गजेशा ॥३२॥

दंडकारण्यी नीललोहित । तेथे जाऊनि तप करीत । निराहार दशवर्षपर्यंत । शिव ध्यानस्थ बैसला ॥३३॥

अवलोकुनी अनुष्ठान गरिमा । कृपा आली सर्वोत्तमा । शिववक्त्राहूनि अनुत्तमा । मूर्ती प्रगट जाहली ॥३४॥

पंचवक्त्रशशिशेखर । मुंडमाली दशकर । भस्मे चर्चिले शरीर । मूर्ती सुंदर पुढे उभी ॥३५॥

ऐसा पाहोनि गणराय । शिव म्हणे द्विविध जाहलो काय । की त्रिपुर दावितो भय । कृत्रिम काय धरोनिया ॥३६॥

की पाहतो मी स्वप्न । किंवा जाहलो भ्रमापन्न । मग होवोनिया खिन्न । गजवदन आठवी ॥३७॥

ऐसे त्याचे ऐकोन वचन । गणेश बोले सुहास्यवदन । शंकरा तू भ्रम सांडुन । मीच गजानन वोळखावे ॥३८॥

वेदांगम्य माझे स्वरूप । शरणागत निजजनप । तुज करावया साक्षेप । मी गणाधिप प्रगटलो ॥३९॥

ऐसे ऐकोन पंचवदन । पंचशिरे नमी गजानन । मग म्हणे धन्य धन्य । माझे नयन अवलोकने ॥४०॥

पृथ्वीजलवायूतेज । तूच अवघा गणराज । चराचरब्रह्मांडबीज । तूच सर्व नटलासी ॥४१॥

रजोगुणे ब्रह्मांडकर्ता । सत्वगुणे तूचि भर्ता । तमोगुण संहारकर्ता । जगन्नाथा तूचि पै ॥४२॥

ऐसी नानाविध स्तुतिवचने । ऐकोनिया गजानने । मग बोले वरद वचने । प्रसन्न मने करोनिया ॥४३॥

आता माझे वरप्रतापे । त्रिपुर वधी साक्षेपे । निजसहस्त्रनाम गणाधिपे । शिवालागी उपदेशिले ॥४४॥

मस्तकी ठेऊनि वरद करी । गुप्त जाहला लंबोदर । आनंद पावले सुरवर । वीरश्री चढली तया ॥४५॥

सुरांसह त्रिदशेश्वर । प्रथमगण पातले सत्वर । करिती पिनाकीस नमस्कार । सर्वी शंकर स्तवियेला ॥४६॥

महेश्वरे केली गर्जना । सिद्ध जाहली सकळसेना । मांडिली काळासि कलना । नानावहनी आरूढले ॥४७॥

शिवे करोनिया ध्यान । ह्रदयी साठविला गजानन । सकल पावले त्रिपुरस्थान । वर्तमान कळले तया ॥४८॥

दैत्येंद्र सैन्यकांसी । वस्त्रे भूषणे अर्पिली त्यांसी । संतोषऊनिया सर्वांसी । मग युद्धासी निघाला ॥४९॥

शब्दे नादविला भुगोळ । दैत्य गर्जती प्रबळ । प्रजा जाहल्या भयविव्हळ । अवनीतळ पाहू लागल्या ॥५०॥

दोन्ही दळा जाहली बेट । शस्त्रास्त्रे वर्षती भट । परस्परे लोटले गजघंट । प्राणसंकट महावीरा ॥५१॥

भात्यातील शर सरले । कित्येक कोदंड मारू लागले । मल्लयुद्धासी मिसळले । वीर पडले नामांकित ॥५२॥

घाये मारिती गजाते । उपटोन घेती दंताते । चवताळोनि ते वीराते । दंतघाये हाणिती ॥५३॥

गजांची फोडिती गंडस्थळे । तेथून उसळती मुक्ताफळे । वीरांची पडली शिरकमळे । किरीटकुंडलासमवेत ॥५४॥

भूषणासहित तुटले कर । कोणाचे तुटले अर्धशिर । कोणाचे फुटले उदर । कंबर खंडली कित्येकांची ॥५५॥

कित्येक जाहले घायाळ । प्राणे करिती तळमळ । कोणी मूर्च्छित विकळ । अवनीतळी पहुडले ॥५६॥

चापापासूनि सुटले शर । तेणे खोचले महावीर । रणी पडला अंधकार । घोरांदर वोढवले ॥५७॥

रणी उठला धुरोळा । तेणे व्यापिले देवकुळा । शस्त्र वर्षे असुरमेळा । प्रयळकाल मांडला ॥५८॥

समरी माघारले देव । तेणे हर्षले दानव ऐसे पाहोनि अमरराव । ऐरावत लोटी पुढे ॥५९॥

हाणोनिया वज्रघाते । चूर्ण करी असुराते । कोटिशः पाडिली प्रेते । अशुद्ध नद्या वाहती ॥६०॥

आकांत वोढवला दैत्यांसी । पळ सुटला त्यांचे मुशी । ऐसे पाहोन त्रिपुरासी । संतापासी न साहवे ॥६१॥

सज्जूनिया धनुष्यबाण । हाक देऊनि दारुण । सन्मुख करोन शचीरमण । कुशब्दबाण सोडीतसे ॥६२॥

त्रिपुर म्हणे इंद्रासी । व्यर्थ का प्राण खर्चिसी । युद्धी न पुरशी तू मजशी । व्याघ्राशी जेवी अजापती ॥६३॥

वैनतेयासि भांडे सर्प । तैसा तुझा खटाटोप । बिडाळासी जैसा दर्प । मूषकाधिप दावीतसे ॥६४॥

तैसा तू सुरपती जाण । मजसी करू आलासि रण । आता घेईन तुझा प्राण । आले बाण पाहा माझे ॥६५॥

आकर्ण वोढोनिया वोढी । दानव मंत्रोनि बाण सोडी । एकापासोन शर परवडी । कोटि कोटि उत्पन्न होती ॥६६॥

शरे झाकुळले अंबर । तेणे झाला अंधकार । रणी खोचले सुरवर । त्याणी धीर सोडिला ॥६७॥

कोणी समोर राहेना । बाणी त्रासली शिवसेना । त्रिपुर करीतसे गर्जना । काळकळना मांडिली ॥६८॥

त्रिपुराचे तीक्ष्ण शरे । भिन्न झाली देवांची शरीरे । पळू लागले एकसरे । हे शंकरे पाहिले ॥६९॥

मग करोनिया ध्यान । चित्ती आठविला गजानन । तव पातला धातृनंदन । स्कंधी वाहून वल्लकी ॥७०॥

त्याचे होताचि दर्शन । झाले शिवासि समाधान । नारद म्हणे आर्याजीवन । विकल मन करू नको ॥७१॥

प्रसन्न असता लंबोदर । त्याशी सदा जयजयकार । एकाच बाणे हा त्रिपुर । करशील पार यमसदनी ॥७२॥

वर अर्पिता गणनाथे । पूर्वीच कथिले त्रिपुराते । एकाच बाणे रुद्र तूते । यमसदनाते पाठवील ॥७३॥

एकाच बाणे तेजोराशी । जरी त्रिपुराते भेदिसी । तरीच जयाते पावसी । देव सुखासी पावतील ॥७४॥

ऐकोन नारदाचे वचन । शिवे मांडिला महायत्‍न । पृथ्वीचा रथ निर्मून । रविशशींची चक्रे करी ॥७५॥

धनुष्य मेरूचे अद्भुत । बाण जाहला अच्युत । धुरेशी सारथी अश्विनीसुत । उमाकांत वीर रथी ॥७६॥

वोढी वोढोनि आकर्ण । सहस्त्रनामे मंत्री बाण । मग सोडी आर्यारमण । करीत निर्वाण चालिला तो ॥७७॥

सहस्त्र चपलांवरी थोर । कडकडाटे गर्जे शर । जैसे उदेले कोटिभास्कर । तेज न माये ब्रह्मांडी ॥७८॥

अवनी कापे थरथर । धरी सर्वावोनि फणींद्र । तडकले सप्तसमुद्र । नक्षत्रे रिचवती खळखळा ॥७९॥

देवगंधर्वयक्षमानव । मूर्च्छाग्रस्त जाहले सर्व । प्रळय मांडिला अभिन्नव । ब्रह्मांडगोळ उलथो हे ॥८०॥

ऐसा प्रळय करित चालला । बाण पाहून त्रिपुर भ्याला । म्हणे आता अंत झाला । माझा सरला पराक्रम ॥८१॥

बाणे जाळिले त्रिपुर । भस्म जाहले तेव्हा असुर । देव करिती जयजयकार । सुमने अपार वर्षती ॥८२॥

दुंदुभी वाजविती एकसरा । नृत्य करिती अप्सरा । आनंद जाहला सुरवरा । गौरीवराते स्तविती ते ॥८३॥

परस्परे भेटती देव । मग पावले स्वस्थान वैभव । निजपदी भोगिती राणिव । स्मरती नाम गणेशाचे ॥८४॥

मरण पावता त्रिपुरासुर । त्याचे ह्रदयातूनि तेज अपार । पाहात असता सकळ ऋषीसुर । शंकरदेही प्रवेशले ॥८५॥

त्रिभुवनकंटक त्रिपुरासुर । धर्मविध्वसंक घोरतर । शिवासि करिता वैराकार । तोही शंकर झाला बळे ॥८६॥

ईश्वर औदार्य कोण जाणे । अरिमित्रांशी समान देणे । करुणाकरे भोगि भूषणे । स्वपदी देवा स्थापिले ॥८७॥

जाहली स्वधर्माची प्रवृत्ती । स्वाहास्वधाकार यज्ञस्थिती । ऋषि आनंदे तप करिती । तेणे जगती जाहली सुखी ॥८८॥

गणेशप्रसादे त्रिपुरासुर । मरण पावता प्रमादे थोर । प्रसन्न जाहला जगदाकार । लंबोदर तुष्टला ॥८९॥

जे गणेशचरणी अनन्यशरण । त्यांचे संकट हरपे दारुण । अंती पावती तत्पद जाण । भोग भोगून इहलोकी ॥९०॥

जय भक्तह्रदयारविंदमिलिंदा । पूर्णब्रह्मा सच्चिदानंदा । तवकृपे माझी आपदा । नासोनि पदा पाववी मज ॥९१॥

स्वस्ति श्रीगणेशप्रतापग्रंथ । गणेशपुराणसंमत । उपासनाखंड रसभरित । त्रयोदशोध्याय गोड हा ॥९२॥

अध्याय ॥१३॥ओव्या ॥९२॥

N/A

References : N/A
Last Updated : September 22, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP