श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीगुरुभ्यो नमः ।
श्रीक्षेत्रपालाय नमः । गणेशप्रसादे कृतवीर्यकांता । दोहदवती जाहली तत्वता । तेणे सुखे प्रसन्नता । राजगृही वाढली ॥१॥
राये मांडिला उत्साह थोर । नवमास भरता साचार । प्रसूत जाहली सुंदर । थोटा कुमार प्रसवली ॥२॥
स्कंदहीन चरणहीन । वाळबाकी सुलक्षण । चंद्रकलाजिद्वदन । नयन कमळासारिखे ॥३॥
ऐसा पुत्र अवलोकिता । शोक करी राजकांता । धरणीवरी फोडोनि माथा । शोकी वनिता बुडाली ॥४॥
म्हणे माझे जन्मांतरीचे पाप । ते हे पावले आपोआप । कैसा जाहला हा कुळदीपक । थोटा माझे प्रालब्धे ॥५॥
ऐकोन तिचे दीर्घरुदन । रडू लागले सकळजन । राजा आला धाऊन । तोही रुदन करू लागला ॥६॥
म्हणे कैसे विपरीत घडले । तपव्रत कैसे वाया गेले । कुलदैवत कैसे क्षोभले । असत्य जाहले विधिवाक्य ॥७॥
राजा कपाळ पिटोन करी । दीनस्वरे रुदन करी । तेथे मिळाल्या नगरनारी । हलकल्लोळ माजला ॥८॥
सचिव म्हणती रायासी । व्यर्थ कारे शोक करिसी । प्रारब्धाची गती जैसी । भोगणे तैसी विवेके ॥९॥
चांगला होईल तुझा कुमर । कृपा करील लंबोदर । जातकर्म संस्कार आता कर । धरी विचार सुजाणा ॥१०॥
ऐकोनि त्यांची बोधवचने । राजा विचार करोनिया मने । पुरोहित आणोनि समाधाने । मंगलस्नाने शुद्ध जाहला ॥११॥
लागला वाद्यांचा गजर । जातकर्म संपादिले समग्र । राये फोडोन भांडार । धन अपार वेचिले ॥१२॥
गोभूहिरण्यदाने । सुखी केली ब्राह्मणांची मने । सेवकजन धनेमाने । कृतवीर्याने गौरविले ॥१३॥
राये सोडिले बंदीजन । द्वादशवर्ष सोहळा जाण । कार्तवीर्य हे नामाभिधान । तयालागून ठेविले ॥१४॥
ऐसी लोटली द्वादशवर्ष । राये केला परामर्ष । पुत्र वाढविला विशेष । परी हर्ष रायासि नाही ॥१५॥
तव खंडली कर्माची गती । दत्तात्रेय पातला महामती । ज्याचे दर्शन या त्रिजगती । दुलर्भ जाणे सोमकांता ॥१६॥
ऐसा तो अत्रिनंदन । पाहता राजा जाय धाऊन । दंडवत करोनिया नमन । सिंहासन समर्पिले ॥१७॥
अर्पोनि षोडशोपचार । नमन करी वारंवार । म्हणे धन्यधन्य माझे पितर । दर्शने साचार धन्य जाहलो ॥१८॥
महत्पुण्य असेल गाठी । तरी चालवभर तुमची भेटी । तो मी हा चर्मदृष्टी । त्याते तुष्टी देतसा ॥१९॥
जरी होय प्रालब्धोदय । तरीच दृष्टी पडती पाय । कोण चिंतूनिया कार्य । मुनिराय जाहले येणे ॥२०॥
दत्तात्रेय म्हणे गा भूपती । ऐकोन तुझे पुत्राची कीर्ती । कौतुक पाहावया निश्चिती । आलो सुमती तव गृही ॥२१॥
मग राये तयेवेळा । पुत्र समारंभे आणविला । मग अत्रिनंदने पाहिला । खेद वाटला तयासी ॥२२॥
माता पदर पसरून । ऋषीपुढे करी रुदन । राजा विनवी कर जोडून । येव्हडा नंदन नीट करी ॥२३॥
ऐकोनि त्यांची करुणावचने । अत्रिनंदन द्रवला मने । कृपा करिता गजवदने । नीट नंदन होईल तुझा ॥२४॥
मंत्र एकाक्षर उपदेशिला । मस्तकी वरद कर ठेविला । दत्त तेव्हा अदृश्य जाहला । राजा गेल तपोवनी ॥२५॥
वायुभक्षण जितेंद्रिय । तप करी तेव्हा राय । तेणे तुष्टला महाकाय । गणराय धावला ॥२६॥
सहस्त्र सूर्याचे समतेजे । मस्तकी मुगुटप्रभा विराजे । वरी दूर्वावतंस साजे । चंद्र लाजे मुखी ज्याच्या ॥२७॥
परशांकुश शोभती हाती । मुक्तमाळा गळा रुळती । कटितटवेष्टित भोगीपती । शुंडा दंती मुरडली ॥२८॥
ऐसे पाहूनिया भूपती । महद्भय पावला चित्ती । ना भी म्हणे भक्तपती । मंगलमुर्ती मी असे ॥२९॥
पुरवावया तुझा हेत । मी पावलो एकदंत । ऐसे ऐकता नरनाथ । पदी दंडवत घाली तेव्हा ॥३०॥
करोनिया जयजयकार । नमन करी वारंवार । नयनी वाहे प्रेमे नीर । ह्रदयी गहिवर नावरे ॥३१॥
धन्यधन्य माझे नयन । आज पाहती गजानन । धन्य जाहले माझे जनन । मातापिता धन्य ते ॥३२॥
तू आदिपुरुष परमात्मा । कोण जाणे तुझा महिमा । ठाव नसे निगमागमा । पुरुषोत्तमा तुझा पै ॥३३॥
तूच जगी नानावेष । धरोनिया आकृति विशेष । भक्तपालन करिसी परमपुरुष । परम तोष त्वद्भक्ता ॥३४॥
ऐसी ऐकोनि परमस्तुती । संतोषला तो भक्तपती । वर माग म्हणे गणपती । ऐकोन भूपती संतोषला ॥३५॥
दर्शने पुरले मनोरथ । जगी प्रसन्न तू गणनाथ । तरी सांग होवो माझा सुत । गणनाथ तथास्तु म्हणे ॥३६॥
होऊनिया अणुमान । त्याचे ह्रदयी प्रवेशता गजवदन । सांग जाहला सहस्त्रार्जुन । सहस्त्र करी मंडित तो ॥३७॥
जैसा कनकाचळ । तैसा उठोनि बसला बाळ । पाहता आनंदले सकळ । जयजयकारे गर्जती ॥३८॥
देव वर्षती कुसुमभार । विष्णूअंश हा सहस्त्रार्जुन वीर । हो का विजयी निरंतर । आशीर्वाद निर्जर देती ॥३९॥
राये मांडिला महोत्सव । धनदाने गौरविले भूदेव । वस्त्राभरणे सेवक सर्व । गौरविले रायाने ॥४०॥
तुष्टता दीननाथ संकटहरण । मग तेथे काय पडेल उण । राजा परमानंद पावोन । वारणानन अर्चीतसे ॥४१॥
व्यास म्हणे गा विष्णुसुता । विमानासहित शक्र पडता । मग शुरसेन काय जाहला करिता । हे आता मज सांगे ॥४२॥
ऐकोनि म्हणे सावित्रीपती । चतुर्थीव्रतमहिमा ऐकोनि भूपती । पाचारोनिया सेवकांप्रती । त्यासि नरपती सांगतसे ॥४३॥
तुम्ही जाऊनिया नगरात । शोध करावा बहुत । कोणी संकष्टीचतुर्थीव्रत । करणार स्त्रीपुरुष शोधावे ॥४४॥
दूत सहस्त्रावधी नगरात । हिंडती तेव्हा शोध करीत । तव विमान अकस्मात । परम अद्भुत देखिले ॥४५॥
तेथे एक चांडाली । महा अमंगळ होती पडली । तिची पुण्यरेखा उदयास आली । कृपा केली गजवदने ॥४६॥
पाठविले दिव्य विमान । मग ती दिव्य देही होऊन । अवलंबिले तिणे दिव्य यान । राजदूत पाहून आश्चर्य करिती ॥४७॥
राजदूत म्हणती गणेशदूतांशी । काय चांडाळी आचरली पुण्याशी । तेणे ही गती पावली ऐशी । हे आम्हासि सांगावे ॥४८॥
बंगालदेशी सारंगधर नामाभिधान । क्षत्रिय होता सुलक्षण । पूर्वजन्मी त्याची ही कन्यारत्न । सुंदरी नाम इयेचे ॥४९॥
लावण्यसागरींची लहरी । सिंहकटी कृशशरीरी । देवांगना नागकुमरी । जीची सरी न पावती कदा ॥५०॥
जीचे कटाक्षावलोकने करून । योगी टाकिती जपध्यान । रंभातिलोत्तमा अधोवदन । लज्जायमान जीचे पुढे ॥५१॥
चित्रनामा क्षत्रियवर । त्यासि अर्पिली जनके सुंदर । परी ते स्वैरिणी करी दुराचार । सदा जार भोगीतसे ॥५२॥
वंचोनिया निजपती । जारकर्मी रत अहोराती । परमलावण्य पाहोन उपपती । सदा संगती तयासी ॥५३॥
रत्नजडित पर्यकावरी । घेवोनि जार ती सुंदरी । स्वेच्छ तेव्हा क्रीडा करी । मन मोही तयाचे ॥५४॥
तव पातला तिचा पती । तेणे धिःकारिली ती युवती । पापिणी तू जाराची संगती । करोनि प्रीती वागविसी ॥५५॥
तुझे न पाहावे गे वदन । बुडविले दोहो कुळालागून । ऐसे ऐकता त्याचे वचन । क्रोधायमान ती जाहली ॥५६॥
घेवोनिया शस्त्र प्रखर । त्याचे फोडिले तिणे उदर । रात्र जाहले दोन प्रहर । गेली जार भोगावया ॥५७॥
मग त्यासी स्वइच्छे रमली । राजदूती तेव्हा धरिली । राजासमीप उभी केली । मग विधिली राजाने ॥५८॥
येऊनिया यमदूत । तीते नेती वोढीत मारित । यमाज्ञे करोनि भोगवीत । नरक अद्भुत तियेकडूनी ॥५९॥
करोनिया अधोवदन । मांस तोडिती जेव्हा श्वान । तेव्हा पूर्वकर्म आठऊन । चित्ती म्हणे अहाहा ॥६०॥
सांडसाने मांस तोडिती । सवेच वृश्चिक दंश करविती । असिपत्रावरूनि हिंडविती । मग घालिती नरककुंडी ॥६१॥
ऐसी भोगवोनि महायातना । मग जाहली चांडाळ अंगना । दुर्भगा ती भ्यासुरवदना । अयोग्य दर्शनाकारणे ॥६२॥
करोनिया मदिरापान । निद्रा केली इणे अवघा दिन । रात्री जागृत होऊन । भिक्षे लागोन निघाली ॥६३॥
गेली गणेशभक्तांचे मंदिरी । त्याणी घातली माधोकरी । चंद्रोदयी भोजन करी । गणेश उच्चारी निजमुखे ॥६४॥
संकष्टिचतुर्थीचा दिवस । न कळोनि घडला तिला उपवास । तेणे तुष्टला जगनिवास । विमानास पाठविले तेणे ॥६५॥
ऐसे ऐकोन राजदूत । म्हणती इंद्र पडला विमानासहित । त्यासि चतुर्थीव्रत पुण्यप्राप्त । होता त्वरित जाईल तो ॥६६॥
ईते संकष्टीव्रत घडले । ते पुण्य इणे पाहिजे दीधले । देता होईल द्विगुणित भले । हे जाणा वहिले दूत हो ॥६७॥
उभय दूतांचा संवाद घडता । विमानी आरूढली ती दिव्यकांता । ते विमान ऊर्ध्वपंथे जाता । आले अवचिता शक्र जेथे ॥६८॥
तिचा लागता अंगवात । शक्रविमान निघाले त्वरित । शूरसेनास पुसोन पुरुहूत । निजभुवनात प्रवेशला ॥६९॥
शूरसेनराये व्रतग्रहण । करिता तुष्टला गजकर्ण । तेणे पाठविले विमान । तयालागोन आणावया ॥७०॥
येवोनिया गणेशदूत । करिती रायासि दंडवत । म्हणती तुजवरी तुष्टला एकदंत । तेणे त्वरित बोलाविले ॥७१॥
ऐकोनिया त्याची वाणी । राजा प्रेमाश्रु टाकी नयनी । म्हणे मजवरी कैवल्यदानी । कोण्या योगे हा तुष्टला ॥७२॥
ज्याचा वेदा न कळे पार । तो मज पाचारितो लंबोदर । याहून लाभ तो कोण थोर । जन्म साचार साफल्य माझा ॥७३॥
हे अवघे जन टाकोनी । मी एकला न बैसे विमानी । दूत म्हणती सर्वास घेउनी । त्वरित आता निघावे ॥७४॥
मग सकल नगरासमवेत । विमानी आरूढला नगरनाथ । विमान न चले ऊर्ध्वपंथ । पाहून दुश्चित्त दूत जाहले ॥७५॥
म्हणती आत आहे कुष्टी पापी । तेणे विमान न चले किमपी । हा धरणीतली नेऊन सोपी । तरीच विमान चालेल वरी ॥७६॥
राजा करोनि नमस्कार । दूतांसि विनवी जोडोनि कर । कोणे दोषे कुष्टी हा नर । अति पापतर जाहला ॥७७॥
दूत म्हणती ऐक भूभुज । गौडदेशी गौडनागर द्विज । शाकिनीनामे त्याची भाज । तेजःपुंज पतिव्रता ॥७८॥
तिचे उद्धरी जन्मांतरी । हा जन्मला दुराचारी । सावित्रीनामे याची नारी । रूपे दुसरी रंभा जैशी ॥७९॥
येणे करोनि तिचा त्याग । नरमोहिनी वेश्येचा धरिला संग । तिशी जाहला सदा दंग । अनंगरंग खेळे तिशी ॥८०॥
करोनि गृही दुष्ट हा चोरी । वस्त्राभरणे तिला शृंगारी । सदा उन्मत्त मद्यपान करी । दुराचारी दुरात्मा ॥८१॥
गृही न देखोनिया स्वसुत । याची माता रुदन करित । पिता होवोनि स्नेहभरित । जाय शोधित घरोघरी ॥८२॥
तव वेश्यागारी रममाण । पाहोनि पिता खिन्न जाण । म्हणे कैसा जन्मलासि कुठारपूर्ण । स्ववंशवन छेदावया ॥८३॥
ऐकोनिया पितृवचन । तो जाहला क्रोधायमान । पित्यासि म्हणे तू पापिष्ठपूर्ण । रती माझी विध्वंशिली ॥८४॥
म्हणोनि घेऊनिया टोणपा । तेणे मारिले आपल्या बापा । न मानोनीच किमपि पापा । पदी बांधोनि भिरकाविले ॥८५॥
करोनिया पितृहनन । पुन्हा करूनि मदिरापान । वेश्येसि क्रीडा करून । प्रातःकाळी आला घरी ॥८६॥
तव माता करी रुदन । तिणे पुत्र अवलोकून । म्हणे लेकरा तुझेविण । आम्ही दीन जाहलो ॥८७॥
पुत्रमोहे जाकळली माता । तिणे ह्रदयी धरिले सुता । पान्हा दाटला ह्रदयी व्यथा । म्हणे सुता प्राशन करे ॥८८॥
तुज धुंडावया कारणे । पिता गेला तुझा जाणे । त्याचा तुवा शोध लावणे । मग बा येणे घरासी ॥८९॥
ऐसे तिचे वचन श्रवण करून । शुष्ककाष्ठे मारिले तियेलागुन । मग रज्जूने पाय बांधून । दूर भिरकाऊन दीधली ॥९०॥
पुन्हा जाऊनि वेश्यासदनी । तिशी रमे निशिदिनी । मदिरा यथेच्छ प्राशुनी । निजसदनी पातला ॥९१॥
घरी होती तरुणी वनिता । तिणे पाहून याची अवस्था । म्हणे ऐका प्राणनाथा । वचन सर्वथा हे माझे ॥९२॥
मस्तक ठेवूनिया चरणी । स्फुंदस्फुंदोनि रडे तरुणी । म्हणे नका करू विपरीत करणी । टाकोनि रमणी निजगृही ॥९३॥
मी धर्मपत्नी नवयौवना । लावण्यलहरी सुभग ललना । टाकोनिया वेश्यासदना । काय मना प्रशस्त वाटे ॥९४॥
घरी सांडूनि सुंदरकलत्र । पराचे भोगिता उच्छिष्ठपात्र । नरकाचे साधन ते अपवित्र । नाही परत्रगती येणे ॥९५॥
लोक निदिती तुम्हास । तेणे लज्जा मज वाटे बहुवस । मी काय सांगावे आपणास । सद्विचारास मनी धरा ॥९६॥
अहोरात्र रमावे मजशी । तेणे कल्याण होय तुम्हाशी । मी अनुकूल आहे दासी । सदा सेवेशी सादर ॥९७॥
ऐसी ऐकता तिची वाणी । म्हणे तू उन्मत्त जाहलीस गे तरुणी । तुला आता टाकीन वधुनी । पापखाणी तू मोठी ॥९८॥
सावित्री म्हणे प्राणजीवना । पतिहस्ते पावता निधना । सुख भोगीन देवसदना । परी वेधना या न साहती ॥९९॥
मद्यपाने जाहला मस्त । तिची वेणी धरोनि त्वरित । आसडोनि पाडिली अकस्मात । मग मारित तयेते ॥१००॥
घालोनि तिचे मुखी बोळा । ठाईठाई झोडिली ती अबळा । पाषाणघाते तयेवेळा । मारिली बाळा चांडाळे ॥१॥
न लगता सोडिला तिणे प्राण । मग तिचे हातपाय बांधून । दूर टाकिली भिरकाऊन । आपण तेथोन निघाला ॥२॥
येवोनिया वेश्येपाशी । कौतुके सांगे वर्तमान तिशी । तुजकारणे वधोन सर्वांशी । निर्वेधपणे आता आलो ॥३॥
येरू करी मनी विचार । हा तो केवळ राक्षस क्रूर । यासि देता प्रत्युत्तर । करील संहार त्यांचेपरी ॥४॥
मग म्हणे भले केले । आता मजशी पाहिजे रमले । धरोनिया चरणकमले । प्रेम दाखवी वरी सदा ॥५॥
मद्यपाने दुराचारी । नित्य तिशी क्रीडा करी । मग कोणे एके अवसरी । ग्रामांतरी प्रवेशला ॥६॥
कालभिनामा एक ब्राह्मण । गेला स्नानसंध्याकारण । त्रिकालज्ञानी भगवत्परायण । त्याचे घरी संचरला ॥७॥
घरी एकटी त्याची तरुणी । तिची धरोनिया बळे वेणी । गेला एकांत स्थळी घेऊनी । म्हणे भामिनी नको नको ॥८॥
तिचे नायकता वचन । बळे केले नीवीमोचन । निःशंक करोनिया नग्न । मुखचुंबन घेतसे ॥९॥
करोनिया कुचमर्दन । बळे भोगिले तिजलागुन । मग ती होवोनि क्रोधायमान । शापवचन बोलली ॥११०॥
बळात्कारे परवनिता । भोगिली तुवा रे पापभरिता । कुष्टी होशील पावशील व्यथा । सुख सर्वथा न पाहसी ॥११॥
मग भयभीत होऊन । तेथोन करी पलायन । मग पुढे पावला निधन । यमसदन पावला ॥१२॥
तेथे भोगविली यमे यातना । पुढे जन्मला हा शूरसेना । याचे कदा न पाहवे वदना । सांडसुमना होवोनिया ते ॥१३॥
राजा म्हणे दूतांशी । कैसा टाकू मी पतिताशी । तुम्ही सांगा उपाय याशी । जेणे पातकाशी खंडेल ॥१४॥
दृढ धरोनिया त्याचे चरण । राजा विनवी तयालागुन । आता तुम्ही कृपा करून । या लागोन उद्धरावे ॥१५॥
दूत म्हणती सोडी पाय । आता सांगतो यासि उपाय । कृपा करील गणराय । तरीच सोय होईल याची ॥१६॥
या अधमास अधिकार । दुसरा नाही साचार । विनायक हे नाम थोर । कर्णरंध्रे परिसवी ॥१७॥
नामे न जळे पातक । ऐसे नाही नरनायक । मग तयाचे कर्णी अलोलिक । त्रिवार नाम ऐकविले ॥१८॥
तेणे पातकाच्या कोटी । पळोन गेल्या उठाउठी । नाम श्रवण केलियापाठी । देहयष्टी शुद्ध जाहली ॥१९॥
मग चालले विमान । न कळे नामाचे महिमान । गेले गणलोकालागुन । जाहले दर्शन प्रभूचे ॥१२०॥
संकष्टिचतुर्थीमहिमान । व्यास कथिले तुजलागून । वर्णिता भागेल सहस्त्रवदन । काही कथन म्या केले ॥२१॥
जो चतुर्थीव्रत सांग पाळी । त्याचे पातकाची होऊनि होळी । विनायक उभा त्याचे जवळी । कदा काळी विसंबेना ॥२२॥
श्रोते परिसा सावधान । पुढे सहस्त्रार्जुनाख्यान । विनायक हा आवडीन । करील कथन गणेशकथा ॥२३॥
स्वस्तिश्रीगणेशप्रतापग्रंथ । श्रीगणेशपुराणसंमत । उपासनाखंड रसभरित । एकुणिसावाध्याय गोड हा ॥१२४॥
श्रीगजाननार्पणमस्तु ॥ अध्याय १९ ॥ ओव्या ॥१२४॥