श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीगुरुभ्यो नमः । श्रीक्षेत्रपालाय नमः ।
ओन्नमोजी जगद्वंद्या । पुराणपुरुषा विश्वाद्या । पुढे बोलवी रसाळ पद्या । कृपा करोनि जगदात्मया ॥१॥
श्रोते ऐका गणेशकथा । प्रपंची न ठेविजे चित्त सर्वथा । हा भार तुमचे माथा । श्रवणासाठी देतसे मी ॥२॥
नरदेहाचे सार्थक हेची । कथा ऐकिजे सर्वोत्तमाची । तेणे येरझार जन्ममरणाची । तुमची साची चुकेल पै ॥३॥
कथा गंगोदके न्हाले । ते सदा पवित्र जाहले । आम्ही वंदावी त्याची पाउले । हेचि भले संसारी ॥४॥
भगवल्लीला करिता श्रवण । न द्रवे ज्याचे अंतःकरण । ते नर पशुसमान जाण । भारास्पद अवनीवरी ॥५॥
म्हणोनि विनवितो जोडोनि कर । श्रवणी असावे आता सादर । मारोनिया व्योमासुर । जाहला संस्कार शिवगृही ॥६॥
गताध्यायी कथानग । कथन जाहला सुरंग । पुढे भक्तभवभयभंग । काय करिता जाहला ॥७॥
व्योमासुराची भगिनी । दिवसा जाऊन रानी । शतसंख्या महिषी भक्षुनी । प्रदोषकाली पातली गृही ॥८॥
श्रवण करिता बंधूचे निधन । राक्षसी करी शोकालागुन । म्हणे त्याचा सूड घेईन । अवलंबून कृत्रिमासी ॥९॥
करालकेशी महाघोरा । हलदंता कूपनेत्रा । लंबोष्ठ वारणश्रोत्रा । तालनासा दरीमुखा ॥१०॥
तिचे कुच लंबायमान । भूमीवरी जाहले पतन । परी कृत्रिमवेष अवलंबून । अंगना रत्न जाहली ॥११॥
घेत इंद्रायणीच्या वेषा । रूपे उज्ज्वली दाहीदिशा । पार्वतीचे दर्शनाची आशा । धरोनि पातली शिवालयी ॥१२॥
पाहता तिचे वदन । पुरुषास लागे तिचे ध्यान । पीनोन्नत कुच कंपायमान । मोही मन कामिकांचे ॥१३॥
जेथे होती आदिमाता । तेथे पातली अवचिता । तीते पाहता ग्रावदुहिता । धरोनि हाता आणी गृही ॥१४॥
करून अंबेते नमन । जवळ बैसली मर्यादेन । गौरी बोले सुहास्यवदन । आगमन कोणीकडे ॥१५॥
शची म्हणे आदिमाये । तुज सांगू दुःख काये । ह्रदयी लागले दुःखघाये । त्याची सोये पाहू आले ॥१६॥
सिंधुदैत्ये पराभविला । मघवा टाकोन स्वर्ग गेला । तेव्हापासून नाही देखिला । मजशी घडला वियोग बायी ॥१७॥
स्त्रियांसि होता अनेक आपदा । त्या सोसवती गे सदा । परी न सोसवे वियोगबाधा । याहून आपदा दुसरी नसे ॥१८॥
एक प्रियकरा वाचोनिया । संपूर्णसौख्ये जाती वाया । वियोगानळे जळते काया । तूतव अर्या सर्व जाणती ॥१९॥
करिता अशनशयनापान । सदा प्रियकराचे स्त्रियांस ध्यान । मी तळमळते शक्रावाचून । म्हणोन शोधार्थ पातले ॥२०॥
आर्या म्हणे वो पुलोमजे । सद्गृही अवतार गणराजे । धरोनिया मत्तनुजे । दैत्य अनेक मारिले ॥२१॥
पुढे वधील सिंधुअसुर । पदी स्थापील सुरवर । उतरूनिया महीचा भार । साधूनर रक्षील पै ॥२२॥
तुवा करावे आता भोजन । सुखशयनी करी शयन । स्वस्थ करोनिया मन । माझे घरी राहावे ॥२३॥
ऐसे देऊनिया अभयवचन । मग तिचे केले पूजन । षड्रसअन्ने करवोन भोजन । करवी शयन निज तल्पकी ॥२४॥
पाळण्यात होता जगत्पती । त्यासि उचलोन घेत पार्वती । स्तन घालोनि मुखाप्रती । स्तनपान करवीतसे ॥२५॥
त्याची पाहूनि रूपरेखा । राक्षसी पावली परमदुःखा । दाऊनिया परमसुखा । म्हणे मुख दाखवी याचे ॥२६॥
तुझा पाहूनि गे तनय । ह्रदय होते प्रमोदमय । म्हणता उचलोनि महाकाय । घेतला राक्षसीने कौतुके ॥२७॥
अंकी घेऊनिया कौतुके । आंदोलितसे राक्षसी हरिखे । याचिया दर्शने सुख सखे । माते होते साजणी ॥२८॥
राक्षसी गुणेश मुखचुंबन । घेता तरकला गजानन । तिचे दोही हाती कान । धरी बालक तेधवा ॥२९॥
नासिकावरी घालोन भार । श्वास कोंडोन लावी घरघर । अनंतब्रह्मांड नायक ईश्वर । लीला अगाध तयाची ॥३०॥
राक्षसी म्हणे बाळकाशी । मारतोस काय बा मजशी । मी कौतुके खेळविते तुजशी । धाव अंबेसी म्हणतसे ॥३१॥
धावत पातली गिरिबाला । दीनवदने विनवी लेकुराला । नको मारू या शचीला । अपयश तुजला येईल बा ॥३२॥
मुख्य धरोनि तिचे नाक । छेदिता जाहला बाळक । कर्ण हाते तोडी विनायक । दावी कौतुक निजभक्ता ॥३३॥
राक्षसी विक्राळ शब्द करून । तत्काळ सोडिती जाहली प्राण । विशाळ प्रेत पडले दारुण । अंकी गजकर्ण खेळतसे ॥३४॥
पाहोन विक्राळ तिचे प्रेत । पार्वती होऊनि भयभीत । शिवासि हाका मारी आक्रंदत । ऐकोन गण धाविन्नले ॥३५॥
त्याही उचलोनि गणपती । नेवोनि दिधला अंबेप्रती । तिची खंडे करूनि त्वरितगती । नेऊनि टाकिती वनांतरी ॥३६॥
बाळकाचे अरिष्ट नासले । शंकरे दाने विप्र गौरविले । दाक्षायणीने ह्रदयी धरिले । मुख पाहिले बाळकाचे ॥३७॥
तिचा होता प्राणनाश । सिंधु पाठवी कमठासुरास । तो येऊनि सिद्धिक्षेत्रास । कृत्रिमास करीतसे ॥३८॥
रात्री निद्रिस्थ सकलजन । कृत्रिमे जाहला कमठ आपण । प्रातःकाळी जन येऊन । विचरती त्याचे पृष्ठीवरी ॥३९॥
अंबा घालूनिया तल्पक । वरी निजवी निजबाळक । हे जाणोनि असुर देख । हालवी पृष्ठी निजबळे ॥४०॥
अवनी कापे थरथरा । जन म्हणती अनर्थ पुरा । तो नेऊ पाहे लंबोदरा । तेणे असुर जाणिजेले ॥४१॥
अनंत ब्रह्मांडाचा स्वामी । स्वभारे तयासि करी श्रमी । शोणिताते असुर वमी । मरणोर्मी येत तया ॥४२॥
याचे ह्रदयी श्वास कोंडले । असुराने प्राण सोडिले । दशयोजने प्रेत पडले । कमठासुराचे तेधवा ॥४३॥
लोक झाले भयापन्न । दैत्य माया म्हणती दारुण । विनायकाचे अरिष्ट खंडण । देवे केले वदती ते ॥४४॥
सातमासांचे गौरीबाळक । निजभक्ता दावी कौतुक । करुणार्णव भक्तपालक । लीला अतर्क्य तयाची ॥४५॥
ग्रीष्मऋतूचे पडले ऊन । तेणे तळमळती सकलजन । अंबा घेऊनिया सखीजन । पुष्पवाटिकी संचरली ॥४६॥
जातीमालती सुमनवल्ली । सुगंधसुमने प्रफुल्ल जाहली । शीतळवायू तयेवेळी । उदकावरोनि वाहतसे ॥४७॥
अक्रोडअंजिरचंपक । केळीनारळीवटअशोक । आम्रफणसपारिजातक । वृक्ष अनेक शोभती ॥४८॥
केवळ स्वच्छ शीतळपाणी । तेणे भरल्या पुष्करणी । आत विकसल्या कमळणी । वरी भ्रमरांनी वेष्ठिल्या ॥४९॥
ऐसी पाहोनि शीतळ हवा । ससुत तल्पकी निजली शिवा । दासी करिती तिची सेवा । मनोभावापासुनी ॥५०॥
तेथे येऊनि तल्पकासुर । मंचक उचलोनि माथ्यावर । घेउनि चालिला सत्वर । वळंघोनि अंबर तेधवा ॥५१॥
जागृत होवोनिया अपर्णा । धाव धाव म्हणे भोगिभूषणा । असुर नेतो तुझी अंगना । प्रियनंदना समवेत ॥५२॥
पार्वती करी तेव्हा आक्रोश । हे जाणोनि गणाधीश । प्रगट करी स्वसामर्थ्यास । पदे तल्पकास हाणीतसे ॥५३॥
तल्पक जाहला शतचूर्ण । खाली पडले दोघेजण । विनायक गर्जने दिशा पूर्ण । करोन त्रिभुवन कापवी ॥५४॥
असुर उचलोनि गुणेशाते । पुन्हा घेत निजस्कंदावरते । विनायक घालोनि पद्मासनाते । तळी असुराते रगडीतसे ॥५५॥
असुराने सोडिला प्राण । विजयी जाहला गजकर्ण । सुमने वर्षती सुरगण । जयजयजकारे गर्जती ॥५६॥
अंबा घेऊनिया तयाते । सख्यांसह पातली गृहाते । अपार दाने देत विप्रांते । धन्य तीते म्हणती सख्या ॥५७॥
तिसरे वर्ष गुणेशाते । लागता केल्या पराक्रमाते । भूपती ऐक सावचित्ते । यथामती कथितो तुजला ॥५८॥
दुंदुभीनामे महासुर । तेणे करूनि कृत्रिमाचार । सुवेश धरोनिया वर । पावला सत्वर बालकापासी ॥५९॥
विष भरित फळ सुंदर । देता जाहला तो असुर । त्याचा धरोनिया कर । म्हणे फळ भक्षी बाळका ॥६०॥
हे भक्षिता अमृतफळ । अमर काया तुझी होईल । प्रयत्न करोनि बहुसाल । तुजसाठी आणियेले ॥६१॥
गुणेशे जानोनि कपटभाव । फळ भक्षिले चोजावे दानव । अद्यापि न मरे हा सदैव । माझी माव न चले कदा ॥६२॥
जाणोनि कपटी तो असुर । धावत चढला मांडीवर । शिखा त्याची धरोनि सत्वर । दाढी धरी वामकरे ॥६३॥
ब्रह्मांडनायक दानवारी । भार घालूनि उरु चुरी । मान डोलविता वैरी । जाहला घाबरा असुर तो ॥६४॥
बाळा सोड शिखा दाढी । तुझी समजली मजला प्रौढी । चुरोन गेली माझी मांडी । माते सोडी बाळका ॥६५॥
मग प्रगटी निजस्वरुप । त्याते हापटी गणाधिप । त्याचे फळले त्यास पाप । मुकला प्राणास असुर पै ॥६६॥
देव वर्षती सुमनभार । विजयी जाहला अंबाकुमर । माता येऊनिया सत्वर । ह्रदयी त्यासि धरी तदा ॥६७॥
तीस जाहला परमानंद । प्रमोद पावले प्रमथवृंद । त्यांचे शरीराचा करोनि भेद । दूर टाकिती नेऊनिया ॥६८॥
इति श्रीगणेशप्रतापग्रंथ । श्रीगणेशपुराणसंमत । क्रीडाखंड रसभरित । अष्टादशोध्याय गोड हा ॥६९॥
अध्याय ॥१८॥ ओव्या ॥६९॥ श्रीगजाननार्पणमस्तु ॥
अध्याय अठरावा समाप्त