श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीगुरुभ्यो नमः । श्रीक्षेत्रपालाय नमः ।
जयजयाजी अदितिकुमरा । अघहारका सुंदरा । महोत्कटा विश्वंभरा । वेदसारा परेशा ॥१॥
उध्दत धुंधुरांचे निधन । करिता जाहला कश्यपनंदन । जो भक्तकैवारी आनंदघन । पूर्ण सनातन परेश ॥२॥
पुढे त्याचे बालक्रीडन । श्रोते ऐका चित्त देऊन । तेणे टळेल भवबंधन । यम नमन करील तुम्हा ॥३॥
हाहाहूहू गंधर्वांशी । शिवदर्शनी उत्सुकता त्यांशी । प्राप्त होता वेगेशी । कैलासासि निघाले ॥४॥
शशिशेखरदर्शनकामी । प्रवेशले कश्यपाश्रमी । त्यासि कश्यप मुनी नमी । म्हणे स्वामी धन्य जाहलो ॥५॥
आसनपाद्यपूजार्पण । करूनि त्यासि पुसे ब्राह्मण । कोणी कडोन जाहले येणे । पुढे जाणे कवणे स्थळी ॥६॥
गंधर्व म्हणती द्विजश्रेष्ठा । धरोनि शिवदर्शनाची निष्ठा । जाता मार्गी पावलो कष्टा । त्वद्दर्शनासि पातलो ॥७॥
मुनि म्हणे भाग्यसुभट । म्हणोनि जाहली तुमची भेट । आता विश्रांती करोनि कष्ट । तुम्ही स्पष्ट परिहारा ॥८॥
अनुकूल ते करा भोजन । सुखशयनी करा शयन । मग सुखे करावे गमन । घ्यावे दर्शन महेशाचे ॥९॥
स्नानासि दीधले उष्णजीवन । मग ते करोनिया स्नान । करू लागले देवतार्चन । पंचायतन तत्वांचे ॥१०॥
अर्पूनिया षोडशोपचार । देवध्यानी जाहले तत्पर । पाक करी अदिती सुंदर । बाहेर कुमर खेळतसे ॥११॥
चिमणी मिळाली ऋषिबालके । माजी कश्यपी खेळे कौतुके । चक्रे कंदुक उडवी हरिखे । अवतार चरिते खेळ खेळती ॥१२॥
खेळ खेळता महोत्कट । गंधर्वा पाहिले ध्याननिष्ठ । याते दर्शन द्यावे स्पष्ट । म्हणोन चटपट धाविन्नला ॥१३॥
न कळता वागारा त्यांसी । त्यांचे उचलोनि पंचायतनांसी । नेवोनि टाकी अग्निकुंडासी । जाहली अग्नीत भस्मीभूत ॥१४॥
ध्यान विसर्जोनि गंधर्व । पुढे पाहती जव देव । न दिसती पंचही तत्व । आश्चर्य अभिन्नव पावले ॥१५॥
कोण तस्कर पातला येथे । तेणे उचलोनि नेले मूर्तीते । की पाहावया आमचे सत्वाते । पंचतत्वे गुप्त जाहली ॥१६॥
सक्रोध बोलती कश्यपासी । कोणी नेले पंचायतनासी । ही रीती तुमची कैसी । पांथस्थाशी पीडाकर ॥१७॥
क्रोध पावोनिया भूदेव । विद्यार्थी पाचारोनि सर्व । म्हणे कोणी नेले देव । चोरस्वभाव तुमचा ॥१८॥
ज्याचे अंगी लागेल चोरी । त्यासि दंडीन निर्धारी । म्हणती आमचे शरीरी । डाग नाही चोरीचा ॥१९॥
तुझा कुमर तू जाणशी । आम्हावर का रागे भरशी । न उच्चारावे परदोषाशी । आपले सुताशी पुसे वेगे ॥२०॥
हाती घेवोनिया वेताटी । ऋषि धावला उठाउठी । परदुःखे होऊनि कष्टी । पुत्रदृष्टी पाहतसे ॥२१॥
उगीच बैसला होमशाळेत । पिता जावोनि धरी हात । भीमशब्दे दबावित । नेत्र वटारित सक्रोधपणे ॥२२॥
हाती धरोनिया पुत्राशी । तेणे आणिले गंधर्वापाशी । म्हणे देई रे मूर्तीशी । नातरी प्राणासि मुकशील ॥२३॥
वेताटी उगारी मारावया । क्रोधे कापे थरथर काया । बाळावरी हात करोनिया । दीनवदने रुदन करी ॥२४॥
बाळ कापे चळचळा । रुदन ऐकोनिया दक्षबाळा । धावोनि आली तेवेळा । पुत्र कळवळा ह्रदयी तिच्या ॥२५॥
अदिती म्हणे कश्यपाते । का मारिता बाळकाते । म्हणोनि वेताटी धरिली हाते । विनायकाते सोडवीतसे ॥२६॥
येरू म्हणे परती सर । याणे अन्याय केला थोर । ताडण करीन यासि फार । म्हणोनि सुंदरी झिडकाविली ॥२७॥
उभारोनिया हात । स्फुंदस्फुंदोनि बाल रडत । येरू म्हणे आण त्वरित । पंचायतन अतिथीचे ॥२८॥
बालक म्हणे गा ताता । व्यर्थ का तुम्ही मजसी मारिता । देव नेले नाहीत तत्वता । सत्यवार्ता ही माजी ॥२९॥
रुदन करिता मुख पसरले । तव मुखात दिसू लागले । विश्व तेथे अवघे संचरले । अपूर्व पाहिले दोघांनी ॥३०॥
सप्तपाताल सप्तसमुद्र । तारामंडळ सूर्यचंद्र । अमरांसहित स्वर्ग इंद्र । वैकुंठ कैलासलोक सारे ॥३१॥
मेरुमांदार लोकालोक । भूप ऋषिलोक अनेक । लतावृक्ष सरितादिक । विश्वनायक दावी मुखी ॥३२॥
मुखामाजी कश्यपमुनी । बाळकासि दावी दटाउनी । तेथे सोडवी अदिती जननी । मुख पसरोनि बाळ रडे ॥३३॥
त्याचे मुखी विश्वस्थिती । मातापिता तेथे पाहती । ऐसे अपूर्व पाहोनि अदिती । भूमीप्रति मूर्च्छित पडे ॥३४॥
ऐसे पाहोनिया कौतुक । विस्मित जाहला मुनिनायक । म्हणे हा विश्वाचा जनक । जाहला बालक माझे गृही ॥३५॥
हातींची टाकोनिया वेताटी । अन्याय मानिला तेणे पोटी । सावध जाहली माता गोरटी । बाळ पोटी कवळिला ॥३६॥
तिजवरी घातले मायावरण । अदिती म्हणे बाळ तान्ह । म्हणोनि करवी स्तनपान । मुखचुंबन करीतसे ॥३७॥
ऋषि म्हणे गंधर्वाशी । मज ताडण न करवे त्याशी । तुम्हीच ताडण करोनि याशी । पंचायतनाशी सुखी घ्यावे ॥३८॥
गंधर्व म्हणती देवावाचून । आम्ही न घेऊ कदा अन्न । उपोषित जाऊ येथून । तुझा नंदन तू जेवी ॥३९॥
क्रोधे पाहती बाळकाशी । तव तो दिसे पंचमूर्तीशी । क्षणात दावी विराटरूपाशी । क्षणे बाळक दिसे ॥४०॥
क्षणात भासे नारायण । क्षणात भासे दुर्गारमण । क्षणात दिसे सहस्त्रकिरण । क्षणात दिसे शक्तिरूप ॥४१॥
क्षणात भासे गणनायक । शुंडाग्री कवळले मोदक । ऐसे पाहोनिया कौतुक । गंधर्वनायक विस्मित मनी ॥४२॥
गंधर्व म्हणती हा विश्वबीज । कश्यपगृही गणराज । अवतरोनि लीला सहज । दावीतसे कौतुके ॥४३॥
साष्टांग नमन करोनि त्याशी । स्तविते जाहले महोत्कटाशी । मायाजाळे गोवोनि विश्वाशी । पाहू न देसी स्वरूपाते ॥४४॥
तू आदिपुरुष मायाधीश । करोनि अकर्ता तू परेश । शरणागतांचे छेदिसी पाश । करिसी नाश मायेचा ॥४५॥
विश्वात्मया निरंजना । विरजातका कश्यपनंदना । बालवेशी मनमोहना । आनंदघना सर्वेशा ॥४६॥
हरिहर ब्रह्मादिकांसी । न कळे तव महिमा त्यांसी । पार न कळे वेदांसी । गुण शेषासी अगम्य ॥४७॥
जगन्नायका जगद्भूषणा । जगांतका जगत्कारणा । जगपालका जगत्प्राणा । करी करुणा आम्हावरी ॥४८॥
सर्व अन्याय घालोनि पोटी । उघडोन पाहे कृपादृष्टी । संसारी झालो व्यर्थ कष्टी । नाही भेटी स्वस्वरूपी ॥४९॥
तू जरी आता कृपा करिशी । तरीच वोळखू तुझे स्वरूपाशी । दीननाथा गुणैकराशी । निजभक्तांसी तारक तू ॥५०॥
ऐसा करोनि त्याचा स्तव । नमन करोनिया गंधर्व । हाच आहे आमुचा देव । ऐसा भाव ह्रदयी त्यांचे ॥५१॥
नैवेद्य करोनि त्यासि अर्पण । सुखे करोनिया तेथे भोजन । निघते जाहले मग तेथुन । शिवदर्शन घ्यावया ॥५२॥
कश्यप मानी आपले मनी । धन्यधन्य मी या त्रिभुवनी । माझे गृही कैवल्यदानी । पुत्र होवोनि राहिला ॥५३॥
अदिती घेवोनिया बाळकाशी । सुखे सारी भोजनाशी । स्तनपान करवोनि त्याशी । ऋषिसेवेशी सादर ॥५४॥
जयजयाजी गणेशा । माझी करी पूर्ण आशा । छेदोनिया मोहपाशा । स्वपद परेशा मज द्यावे ॥५५॥
स्वस्तिश्रीगणेशप्रतापग्रंथ । श्रीगणेशपुराणसंमत । क्रिडाखंडरसभरित । तृतीयोध्याय गोड हा ॥५६॥
अध्याय ॥३॥ ओव्या ॥५६॥