विषयेष्वाविशन्योगी नानाधर्मेषु सर्वतः ।
गुणदोषव्यपेतात्मा न विषज्जेत वायुवत् ॥४०॥
पार्थिवेष्विह देहेषु प्रविष्टस्तद्गुणाश्रयः ।
गुणैर्न युज्यते योगी गन्धैर्वायुरिवात्मदृक् ॥४१॥
ऐक्यता साधावी चतुरीं । ते वायूच्या ऐसी दोंहीपरी ।
बाह्य आणि अंतरीं । ऐक्यकरीं वर्तावें ॥२२॥
प्राणवृत्तीचीं लक्षणे । तूज सांगितलीं संपूर्णें ।
आतां बाह्य वायूचीं चिन्हें । सावधानें परियेसीं ॥२३॥
वायु सर्वांतें स्पर्शोनि जाये । परी अडकला कोठें न राहे ।
तैसें विषय सेवितां पाहे । आसक्तु नव्हे योगिया ॥२४॥
असोनि इंद्रियांचेनि मेळें । तो विषयांमाजी जरी खेळे ।
तरी गुणदोषआसक्तिमेळें । बोधू न मळे तयाचा ॥२५॥
वस्त्र चंदन वनिता माळा । सदा भोगितां विषयसोहळा ।
वायु नातळे जेवीं जाळा । तेवीं योगी वेगळा विषयांसी ॥२६॥
जैसें वारेनीं जाळ उडे । परी जाळीं वारा नातुडे ।
तेवीं भोग भोगितां गाढे । भोगीं नातुडे योगिया ॥२७॥
जातया वायूचे भेटी । सुगंध कोटी घालिती मिठी ।
त्यांची आसक्ती नाहीं पोटीं । उठाउठीं सांडितू ॥२८॥
तैसा आत्मत्वें योगिया पाहीं । प्रवेशलासे सर्वां देहीं ।
देह गुणाश्रयो पाहीं । ठायींच्या ठायीं तोचि तो ॥२९॥
निजात्मदृष्टीचेनि बळें । तो देहगुणांसी नातळे ।
जैसा गंधावरी वारा लोळे । परी नाकळे गंधासी ॥४३०॥
तेचि परिपूर्ण आत्मस्थिती । राया मी सांगेन तुजप्रती ।
जैसी आकाशाची प्रतीती । सर्व पदार्थीं अलिप्त ॥३१॥