तस्माद्भवन्तमनवद्यमनन्तपारं सर्वज्ञमीश्वरमकुण्ठविकुण्ठधिष्ण्यम् ।
निर्विण्णधीरहमु हे वृजिनाभितप्तो नारायणं नरसखं शरणं प्रपद्ये ॥१८॥
यालागीं जी यादवपती । नित्य शुद्ध पवित्रमूर्ती ।
तूज मायामोहो नातळती । पवित्र ख्याती यालागीं ॥८६॥
गोंवळांचेनि उच्छिष्टकवळें । ज्याची पवित्रता न मैळे ।
तेणेंचि उच्छिष्टबळें । गोंवळें सकळें तारिलीं ॥८७॥
प्राणें शोषिलें पूतनेसी । तरी पवित्रता अधिक कैसी ।
तेणेंचि उद्धरिलें तिसी । दोषें दोषांसी तारकु ॥८८॥
करूनि कालीयमर्दन । मर्दिला त्याचा अभिमान ।
तरी मैळेना पवित्रपण । निर्विषें जाण तारिला ॥८९॥
रजक अंत्यज अत्यंत । आतळे तया अधःपात ।
त्यासी मारूनियां निश्चित । केला पुनीत सायुज्या ॥१९०॥
करूनि गोपिकांसी निंद्य काम । तेणें त्या केल्या निष्काम ।
तेचि पवित्रता अनुत्तम । सायुज्यधाम पावल्या ॥९१॥
करितां सुकर्म कुकर्म । ज्याची पवित्रता अनुत्तम ।
यालागीं नामें पुरुषोत्तम । अकर्तात्म निजबोधें ॥९२॥
जो आकळे गुणांआंतू । त्यासी ते गुण करिती प्रांतू ।
त्या गुणांसी तूजमाजीं अंतू । यालागीं तूं अनंतू सर्वथा ॥९३॥
देशतः कालतः पार । तूज न करवेचि साचार ।
यालागीं अनंत तूं अपार । श्रुतींसी पार न कळेचि ॥९४॥
तूज म्यां करावी विनंती । किती यावें काकुळती ।
तूं हृदयस्थ ज्ञानमूर्ती । जाणता त्रिजगतीं तूं एकु ॥९५॥
ज्ञान अज्ञान मायाशक्ती । ईश्वराआधीन गा असती ।
त्या ईश्वराची तूं ईश्वरमूर्ती । सत्यकीर्ति तूं श्रीकृष्णा ॥९६॥
तूं सर्वांचा नियंता । सर्व करूनि अकर्ता ।
ऐसा ईश्वरु तूं कृष्णनाथा । भोगूनि अभोक्ता तूं एकु ॥९७॥
देशतः कालतः स्वभावेंसीं । नाशु न पावे ज्या स्थानासी ।
तेथींचा तूं निवासवासी । पूर्ण पूर्णांशी अवतारु ॥९८॥
नराचें अविनाशस्थान । यालागी तूं नारायण ।
तूझेनि जीवासी चळणवळण । चाळकपण तूजपाशीं ॥९९॥
ऐसा ईश्वर तूं आपण । नरसखा नारायण ।
युद्धसमयीं अर्जुनासी जाण । ब्रह्मज्ञान त्वां दिधलें ॥२००॥
दारुण होतां संग्रामासी । पावडा पावो युद्धासी ।
तेव्हां ब्रह्मज्ञान सांगसी । निज सख्यासी अर्जुना ॥१॥
ऐसा कृपाळू तूं नारायण । यालागीं तूज आलों शरण ।
त्रिविधतापें तापलों जाण । दूःख दारुण संसारु ॥२॥
संसार म्हणजे अंधकूप । माजीं कामक्रोधादि दूष्ट सर्प ।
निंदा स्पर्धा कांटे अमूप । दूःखरूप मी पडिलों ॥३॥
तेथ पडीलियापाठीं । ब्रह्मद्वेषाचा शूळ पोटीं ।
भरला जी उठाउठी । तेणें हिंपुटी होतूसें ॥४॥
तेथून निघावया त्रिशुद्धी । उपावो न दिसे गा निजबुद्धी ।
कृपाळूवा कृपानिधी । आत्मबोधीं मज काढीं ॥५॥