तस्माद्युक्तेन्द्रियग्रामो युक्तचित्त इदं जगत् ।
आत्मनीक्षस्व विततमात्मानं मय्यधीश्वरे ॥९॥
यालागी इंद्रियांच्या द्वारीं । विषयो नेदावा चतूरीं ।
जेवीं विषें रांधिली क्षीरधारी । सांडिजे दूरी न चाखतां ॥८४॥
घमघमित अमृतफळें । वरी सर्पें घातलिया गरळें ।
तें न सेविती काउळे । सेवनीं कळे निजघातू ॥८५॥
तैसें सेवितां विषयांसी । कोण गोडी मुमुक्षासी ।
प्रतिपदीं । आत्मघातासी । अहर्निशीं देखती ॥८६॥
आत्मघातू न देखती । ते विषयी विषयो सेविती ।
जैशी दिवाभीता मध्यराती । असतां गभस्ति मध्यान्हीं ॥८७॥
तैसेंचि विषयसेवन । मुमुक्षांसी घडे जाण ।
तेणें न चुके जन्ममरण । आत्मपतन तयांचें ॥८८॥
म्हणसी प्राणियांची स्थिती । विषयावरी निश्चितीं ।
विषयत्यागें केवीं राहती । ते सुगम स्थिती अवधारीं ॥८९॥
असतां इंद्रियांचा नेमु । करी चित्ताचा उपरमु ।
ऐसा दोंहीपरी सुगमु । उत्तमोत्तमु हा त्यागु ॥९०॥
इंद्रियें असोतू विषयांवरी । मन रिघों नेदी त्यांभीतरी ।
हाही त्यागु सर्वांपरी । योगेश्वरीं बोलिजे ॥९१॥
मनासी विषयांचें बळ । विषयध्यासें तें चपळ ।
नव्हे म्हणती तें निश्चळ । ऐक समूळ तो उपावो ॥९२॥
माझें स्वरूप सर्वगत । मना बाहेरी आणि आंत ।
जेथ जेथ जाईल चित्त । तेथ तेथ तें असे ॥९३॥
मजवेगळें जावयासी । ठावो नाहीं पैं चित्तासी ।
स्वदेशीं हो परदेशीं । अहर्निशीं मजआंतू ॥९४॥
ऐसें निजरूप सतत । पाहतां थोरावेल चित्त ।
त्या चित्तामाजीं आद्यंत । पाहें समस्त हें जग ॥९५॥
अथवा जीवस्वरूप तूझें चांग । त्यामाजीं पाहतां हें जग ।
जगचि होईल तूझें अंग । अतिनिर्व्यंग निश्चित ॥९६॥
चरें आणि अचरें । लहानें आणि कां थोरें ।
जीवरूपीं सविस्तरें । पाहें निर्धारे तूं हें जग ॥९७॥
म्हणसी जीवु तो एकदेशी । त्यामाजीं केवीं पहावें जगासी ।
त्यासी ऐक्यता करीं मजसीं । जेवीं कनकेंसीं अळंकार ॥९८॥
चिंतितां कीटकी भिंगुरटी । तेचि ते होऊन उठी ।
तैसा तूं उठाउठीं । होईं निजदृष्टीं निजतत्व ॥९९॥
हो कां सैंधवाचा खडा । पडल्या सिंधूमाजिवडा ।
तो होवोनि ठाके त्याएवढा । तैसा तूं रोकडा मी होसी ॥१००॥
जेथ मीतूंपणाचा भेद । फिटोनि जाईल विशद ।
परमानंदें शुद्धबुद्ध । मुक्त सिद्ध तूं होसी ॥१॥