अत्र मां मृगयन्त्यद्धा युक्ता हेतूभिरीश्वरम् ।
गृह्यमाणैर्गुणैर्लिङ्गैरग्राह्यमनुमानतः ॥२३॥
येऊनि नरदेहाप्रती । कर्त्याची गवेषणा जे करिती ।
जो मी ईश्वर त्रिजगतीं । उत्पत्तिस्थिति संहर्ता ॥४९॥
बुद्धियुक्तीं विवेक करणें । ते जडें जे प्रकाशपणें ।
त्याचाही मी प्रकाशकु म्हणे । येणें लक्षणें लक्षिती ॥२५०॥
ऐशा नानापरींच्या अनुमानां । मी तंव वश नव्हें जाणा ।
जे लक्षिती सांडोनि अभिमाना । साक्षात्पणा ते येती ॥५१॥
ज्याची आशा होय निराश । तोचि ब्रह्म पावे सावकाश ।
तेणें कळीकाळावरी कांस । जाण अवश्य घालती ॥५२॥
मुख तंव स्वतःसिद्ध असे । तें निर्मळ आरिसां दिसे ।
तेवीं बुद्धीचेनि विवेकवशें । आत्मा भासे नरदेहीं ॥५३॥
येचिविखींचा इतिहास जाण । तूज मी सांगेन पुरातन ।
यदूअवधूतसंवादलक्षण । ज्ञानसाधन साधकां ॥५४॥