श्रीब्राह्मण उवाच ।
सन्ति मे गुरवो राजन् बहवो बुद्ध्युपाश्रिताः ।
यतो बुद्धिमुपादाय मुक्तोऽटामीह तान् श्रृणु ॥३२॥
क्षीरसागर उचंबळला । कीं कृपेचा मेघ गर्जिन्नला ।
निजसुखाचा वाधावा आला । तैसें बोलिला ब्राह्मणु ॥१९॥
ऐकें राजया चूडामणी । यदुकुळदीप दिनमणी ।
धन्य धन्य तूझी वाणी । निजगुणीं निवविलें ॥३२०॥
राजा आणि सात्त्विकु । सिद्धलक्षणें लक्षकु ।
पृथ्वीमाजीं तूचि एकु । न दिसे आणिकु सर्वथा ॥२१॥
सुंदर आणि सगुण । उत्तमोत्तम केला प्रश्न ।
पुसिलें निजानंदकारण । तें यथार्थ जाण सांगेन ॥२२॥
गुरूविण आत्मप्राप्ती । सर्वथा न घडे गा नृपती ।
ते गुरूही मी तूजप्रती । यथानिगुतीं सांगेन ॥२३॥
निजबुद्धीच्या विवेकस्थितीं । बहुत गुरु म्यां केले असती ।
जे जे सद्गुण म्यां देखिले भूतीं । ते ते स्थितीं तो गुरु ॥२४॥
बुद्धीनें अंगिकारिलें गुणा । निजधैर्यें धरिली धारणा ।
तेणें मी मुक्त जालों जाणा । स्वेच्छा अटणा करीतसें ॥२५॥
संसारु तरावया । मुख्य सद्बुद्धि गा राया ।
रिगमू नाहीं आणिका उपाया । व्यर्थ कासया शिणावें ॥२६॥
सद्बुद्धि नाहीं ज्यापासीं । तो संसाराची आंदणी दासी ।
उसंत नाहीं अहर्निशीं । दूःखभोगासी अनंत ॥२७॥
सद्बुद्धि नाहीं हृदयभुवनीं । तेथ वैराग्य नुपजे मनीं ।
मा तो तरेल कैसेनीं । विवेक स्वप्नीं न देखे ॥२८॥
वैराग्याचेनि पडिपाडें । ज्यासी सद्बुद्धि सांपडे ।
तेथ संसार कोण बापुडें । घायें रोकडें विभांडी ॥२९॥
आधीं संसारु एकु असावा । मग तो खटाटोपें नासावा ।
जो रिघाला विवेकगांवा । त्यासी तेव्हां तो नाहीं ॥३३०॥
संसारनाशासी मूळ । शिष्य प्रज्ञाचि केवळ ।
तिचें झाल्या अढळ बळ । होये मृगजळ संसारु ॥३१॥
जे मी गुरु सांगेन म्हणे । तें निजप्रज्ञेचेनि लक्षणें ।
हेयोपादेयउपायपणें । घेणें त्यजणें सविवेकें ॥३२॥
हेचि मर्हाठिया भाखा । सांगेन तें सावध ऐका ।
जेणें शिष्याचा आवांका । पडे ठाउका प्रत्यक्ष ॥३३॥
ऐक प्रज्ञेचीं लक्षणें । सांगेन दृष्टांतपणें ।
सूप चाळणी रांधणें । घेणें त्यजणें विवेकें ॥३४॥
चाळणीमाजीं जें जें पडे । सूक्ष्म निजतत्त्व तळीं सांडे ।
उरती गुणदोषांचे खडे । करिती बडबडे खडबडित ॥३५॥
ऐसी जे अवस्था । ते त्यागावी सर्वथा ।
भ्रंशु होईल स्वार्था । हे राखतां त्रिशुद्धी ॥३६॥
सुपाची दशा ते ऐसी । त्यजी रजःकण भुसासी ।
निडारल्या निजबीजासी । निजहृदयेंसीं राखत ॥३७॥
स्वयें वैराग्यें तापणें । ते दशा रांधणें म्हणें ।
अपक्का परिपक्क करणें । निजगुणें निजांगें ॥३८॥
एवं या दोनी दशा । दृढ धराव्या वीरेशा ।
तेणें परमार्थु होये आपैसा । जेवी आरिसा यातींचा ॥३९॥
यदूसी म्हणे ब्राह्मण । जें म्यां सांगितलें लक्षण ।
तेथें ठेवूनियां मन । सावधान परियेसीं ॥३४०॥
जो जो जयाचा घेतला गुण । तो तो गुरु म्यां केला जाण ।
गुरूसी आलें अपारपण । जग संपूर्ण गुरु दिसे ॥४१॥
ज्याचा गुण घेतला । तो सहजें गुरुत्वा आला ।
ज्याचा गुण त्यागरूपें घेतला । तोही गुरु झाला अहितत्यागें ॥४२॥
एवं त्यागात्यागसमतुकें । दोहींसी गुरुत्व आलें निकें ।
राया तूं पाहें पां विवेकें । जगचि असकें गुरु दिसे ॥४३॥
ऐसें पाहतां सावकाशीं । गुरुत्व आलें जगासी ।
हेंचि साधन जयापासीं । तोचि परमार्थासी साधकु ॥४४॥
ऐसें सांगतां अचाट । तूज वाटेल हें कचाट ।
तरी गुरु सांगो श्रेष्ठश्रेष्ठ । मानिले वरिष्ठ निजबुद्धीं ॥४५॥