भक्तिः परेशानुभवो विरक्तिरन्यत्र चैष त्रिक एककालः ।
प्रपद्यमानस्य यथाऽश्नतः स्युस्तुष्टिः पुष्टिः क्षुदपायोऽनुघासम् ॥४२॥
आइकें विदेहा चक्रवर्ती । ऐशी जेथें भगवद्भक्ती ।
तीपाशीं विषयविरक्ती । ये धांवती गोवत्सन्यायें ॥५॥
हें असो जेवीं जावळीं फळें । हों नेणें येरयेरां वेगळें ।
तेवीं भक्ति विरक्ति एके काळें । भक्त तेणें बळें बळिष्ट होती ॥६॥
जेथ भक्ति आणि विरक्ती । नांदों लागती सहजस्थिती ।
तेथेंचि पूर्णप्राप्ती । दासीच्या स्थितीं सर्वदा राबे ॥७॥
यापरी भगवद्भक्ती । पूर्ण दाटुगी त्रिजगतीं ।
भक्तांघरीं नांदे प्राप्ती । भक्तिविरक्तिनिजयोगें ॥८॥
भक्ति विरक्ति अनुभवप्राप्ती । तिन्ही एके काळें होती ।
ऐक राया तेही स्थिती । विशदोक्तीं सांगेन ॥९॥
जैसी कीजे भगवद्भक्ती । तैसीच होय विषयविरक्ती ।
तदनुसारें अनुभवस्थिती । ती भक्त पावती तेचि क्षणीं ॥६१०॥
जेवीं कां भुकेलियापाशीं । ताट वाढिलें षड्रसीं ।
तो पुष्टि तुष्टि क्षुधानाशासी । जेवीं ग्रासोग्रासीं स्वयेंचि पावे ॥११॥
जितुक जितुका घेइजे ग्रास । तितुका तितुका क्षुधेचा नाश ।
तितुकाचि पुष्टिविन्यास । सुखोल्हास तितुकाचि ॥१२॥
पुष्टि तुष्टि क्षुधानाशनी । जेवीं एके काळें येती तिनी ।
भोक्ता पावे स्वयें भोजनीं । तेवीं भगवद्भजनीं भक्त्यादि त्रिकु ॥१३॥
सद्भावें करितां भगवद्भक्ती । भक्ति-विरक्ति-भग-वत्प्राप्ती ।
तिनी एके काळें होती । ऐशिया युक्तीं जाणिजे राया ॥१४॥
’भक्ति’ म्हणजे सर्व भूतीं । सप्रेम भजनयुक्ती ।
’प्राप्ति’ म्हणिजे अपरोक्षस्थिती । भवगत्स्फूर्ती अनिवार ॥१५॥
’विरक्ति’ म्हणिजे ऐशी पहा हो । स्त्रीपुत्रदेहादि अहंभावो ।
समूळ जेथें होय वावो । विरक्तिनिर्वाहो या नांव राया ॥१६॥
यापरी भजनाचे पोटीं । भक्ति-विरक्ति-प्राप्ति त्रिपुटी ।
ऐक्यभावें सद्भक्तां उठी । हरिभजनदिठी एकेचि काळीं ॥१७॥
यालागीं राया निजहितार्थी । आदरें करावी हरिभक्ती ।
तेणें अवश्य भगवत्प्राप्ती । उपसंहारार्थी कवि सांगे ॥१८॥;