त एकदा निमेः सत्रमुपजग्मुर्यदृच्छया ।
वितायमानमृषिभिरजनाभेर्महात्मनः ॥२४॥
जेथें मनाचा प्रवेशु नाहीं । त्यांची पायवाट ते ठायीं ।
ऐसे स्वइच्छा विचरतां मही । आले ते पाहीं कर्मभूमीसी ॥९१॥
मही विचरतां वितंड । पातले ’अजनाभ’ खंड ।
तंव विदेहाचा याग प्रचंड । मीनले उदंड ऋषीश्वर ॥९२॥
याग वेदोक्तविधी निका । कुंडमंडप वेदिका ।
आवो साधोनि नेटका । विधानपीठिका अतिशुद्ध ॥९३॥
स्त्रुक्-स्त्रुवा-त्रिसंधानें । विस्तारुनि परिस्तरणें ।
अखंड वसुधारा दंडाप्रमाणें । ऋषिमंडणें होम करिती ॥९४॥
होम होतां संपूर्ण । पूर्णाहुतीसमयीं जाण ।
येतां देखिले नवही जण । देदीप्यमान निजतेजें ॥९५॥