खं वायुमग्निं सलिलं महीं च ज्योतींषि सत्त्वानि दिशो द्रुमादीन् ।
सरित्यसमुद्रांश्च हरेः शरीर यत्किंच भूतं प्रणमेदनन्यः ॥४१॥
ब्रह्म उन्मादपरमानंदें । जंव जंव पाहे स्वानंदबोधें ।
तंव तंव चराचर पूर्णानंदें । देखे स्वानंदकंदें दुमदुमित ॥८१॥
पृथ्वी आप तेज वायु नभ । देखे हरिरुप स्वयंभ ।
भूतां महाभूतांचें डिंभ । न देखे भिन्न कोंभ अभिन्नत्वें ॥८२॥
जेवीं न मेळवितां मेळा । पाहतां जैसा केळीचा कळा ।
स्वयें विकासे फळां दळां । तेवीं वस्तु हे पांचाला भूतभौतिकात्मक ॥८३॥
जेवीं कांतोनियां रंध्रसळे । स्फटिकदीपगृह-अंगमेळें ।
चित्तारिलीं अश्वगजदळें । तीं भासती सोज्ज्वळें आंतुलेनि दीपें ॥८४॥
तेवीं सोमसूर्यादि तेजशक्ती । कां वन्हि नक्षत्रें जे लखलखिती ।
जननयनादि निजदीप्ती । देखे आत्मज्योती सतेज ॥८५॥
युक्तीं मेळवितां द्रव्यांतर । अग्नि परी भासे पुष्पाकार ।
तेवीं वस्तु स्वलीला साचार । रविचंद्रकार नानात्वें भासे ॥८६॥
पृथ्वी गंधरुपें स्वयें असे । तो गंधु कस्तूर्यादिकीं भासे ।
तेवीं भगवत्सत्ता सर्वत्र असे । परी सात्त्विकीं दिसे अतिप्रगट ॥८७॥
यालागीं सात्त्विकाठायीं सत्त्व । तेथ देखे भगवत्तत्त्व ।
सत्त्वें सत्त्ववंतां महत्त्व । अति मान्यत्व हरिरुपें ॥८८॥
पृथ्वीसी जळावरण आहे । तेंचि चतुःसमुद्र नांव लाहे ।
तैसें देवाचेंचि अंग पाहे । दिशात्वें वाच्य होये दशदिशां ॥८९॥
पूर्वपश्चिमादि योग । दशदिशांचे दिग्विभाग ।
तेही देवाचेंचि अंग । तद्रूप श्रीरंग स्वयें भासे ॥५९०॥
तृण दूर्वा दर्भ द्रुम । देखोनि म्हणे हेही हरीचे रोम ।
अनोळखा हें अतिविषम । निजांगीं सर्व सम हरिरुप पाहतां ॥९१॥
जैशा आपुल्या अंगोळिया । गणितां दिसती वेगळालिया ।
परी असती लागलिया । स्वयें सगळिया अखंड अंगीं ॥९२॥
तेवीं वन-वल्ली-दर्भ-दांग । देखोनि म्हणे हें हरीचें अंग ।
अनन्यभावें लगबग । भिन्नभाग देखेना ॥९३॥
म्हणे दूर्वा-द्रुम-वन-वल्ली । हेचि अनंत कोटी रोमावळी ।
हरीचेनि अंगें असे वाढली । त्या निजशोभा शोभली हरिरुपत्वें ॥९४॥
जेवीं वटाच्या पारंबिया । लोंबोनि वाढती वेगळालिया ।
त्याही वटरुपें संचलिया । वटत्वा मुकलिया म्हणों नये ॥९५॥
तेवीं चैतन्यापासोनि वोघ । निघाले सरितारुप अनेग ।
तेही चैतन्यघन चांग । चिद्रूपें साङग सद वाहती ॥९६॥
हो कां चंद्रबिंबीं अमृत जैसें । बिंबीं बिंबरुप होऊनि असे ।
तेवीं भगवंतीं संसारु भासे । भजनविश्वासें भगवद्रूप ॥९७॥
ऐसे वेगवेगळे भाग । पाहतां उल्हासे जंव चांग ।
तंव अवघें उघडें जग । देवोचि साङग स्वयें झाला ॥९८॥
यालागीं सर्व भूतांचे ठायीं । अनन्यशरण कैसा पाहीं ।
लवण जैसें सागरापायीं । ठायीं ठायीं जडोनि ठाके ॥९९॥
तेथ मुंगीही देखोनि जाण । हरिरुपीं वंदी आपण ।
मशकासही अनन्यशरण । घाली लोटांगन भगवद्रूपें ॥६००॥
गो-खर-चांडाळ-श्वान । अतिनिंद्य जे हीन जन ।
ते भगवद्रूप देखोनि पूर्ण । घाली लोटांगण अनन्यभावें ॥१॥
हरिरुपें देखे पाषाण । भगवद्रूपें वंदी तृण ।
जंगमस्थावरादिकां शरण । घाली लोटांगण चिदैक्यभावें ॥२॥
करितां हरिनामस्मरणकीर्ती । एकाएकीं एवढी प्राप्ती ।
झाली म्हणसी कैशा रीतीं । ऐकें नृफ्ती तो भावो ॥३॥
करितां पूजाविधिविधान । कां श्रवण स्मरण कीर्तन ।
सर्वदा चिदैक्यभावना पूर्ण । ’पूर्ण प्राप्ति’ जान त्यातेंचि वरी ॥४॥;