दुर्लभो मानुषो देहो देहिनां क्षणभङगुरः ।
तत्रापि दुर्लभं मन्ये वैकुण्ठप्रियदर्शनम् ॥२९॥
सकल देहांमाजीं पहा हो । अतिदुर्लभ मनुष्यदेहो ।
त्याचिया प्राप्तीचा संभवो । तो अभिप्रावो अतिदुर्गम ॥२४॥
सुकृतदुष्कृत समान समीं । तैं पाविजे कर्मभूमी ।
तेंचि जैं पडे विषमीं । तैं स्वर्गगामी कां नरकीं ॥२५॥
समानकर्मी नरदेह जोडे । तरी समस्तां समबुद्धि न घडे ।
त्यां समांमाजीं विषम गाढें । जेणें पडे तें ऐका ॥२६॥
पापाचा एकु महाचिरा । पुण्यें जोखणीं चाराचुरा ।
समान आलिया तुळाभारा । येणें जन्में नरा दृढ पापबुद्धी ॥२७॥
वाळू आणि सुवर्ण । जोखितां झाल्याही समान ।
सोनियालागीं वेंचिती धन । वाळू ते जाण न घेती फुकट ॥२८॥
एकाचें पुण्य अत्यंत थोर । पाप लहानसहान एकत्र ।
करुनि जोखितां तुळाभार । समान साचार जैं होय ॥२९॥
ऐसेनि कर्में जे जन्मती । त्यांसी पुण्यावरी अतिप्रीती
पुण्य पाप दोनी झडती । तैं नित्यमुक्ति पाविजे ॥२३०॥
ऐशा अतिसूक्ष्म संकटीं । मनुष्यदेहीं होय भेटी ।
तेथेंही अभिमान अति उठी । धन दारा दिठी विषयांच्या ॥३१॥
मनुष्यदेहींचेनि आयुष्यें । विषयीं सायास करिती कैसे ।
अमृत देऊनि घे जैसें । तान्हें सावकाशें मृगजळ ॥३२॥
गंधर्वनगरींचीं ठाणीं । घेतलीं देऊनि चिंतामणी ।
तैशी लटिकियालागीं आटणी । विषयसाधनीं नरदेहा ॥३३॥
तोडूनि कल्पतरुंचे उद्यान । सायासीं तें वाहोनि रान ।
तेथें साक्षेपें पेरिली जाण । आणूनि आपण विजया जैशी ॥३४॥
तैसें नरदेह येऊनि नरां । करिती आयुष्याचा मातेरा ।
पूर्ण व्यवसावो शिश्नोदरां । उपहास निद्रा कां निंदा ॥३५॥
नित्य प्रपंचाची कटकट । सदा विषयांची खटपट ।
कदा आरायिल्या चोखट । स्वेच्छा सारीपाट खेळणें ॥३६॥
नाना विनोद टवाळी । नित्य विषयांची वाचाळी ।
त्यासी जपतां रामनामावळी । पडे दांतखिळी असंभाव्य ॥३७॥
घरा आली कामधेनु । दवडिती न पोसवे म्हणूनु ।
तेवीं श्रीरामनाम नुच्चारुनु । नाडला जनु नरदेहीं ॥३८॥
करितां नरदेहीं अहंकार । तंव तो देहचि क्षणभंगुर ।
देहीं देहवंता भाग्य थोर । जैं भगवत्पर भेटती ॥३९॥
ज्यांसी भगवद्भक्तीची अति गोडी । त्यांवरी भगवंताची आवडी ।
त्यांची भेटी तैं होय रोकडी । जैं पुण्याच्या कोडी तिष्ठती ॥२४०॥
ज्यांचिया आवडीच्या लोभा । भगवंतु पालटें आला गर्भा ।
दशावतारांची शोभा । जाहली पद्मनाभा ज्यांचेनि ॥४१॥
ऐसे कृष्णकृपासमारंभें । जे भगवंताचे वालभे ।
त्यांची भेटी तैंचि लाभे । जैं भाग्यें सुलभें पैं होती ॥४२॥
निष्कामता निजदृष्टी । अनंत पुण्यकोटयनुकोटी ।
रोकडया लाभती पाठोपाठीं । तैं होय भेटी हरिप्रियांची ॥४३॥
व्याघ्रसिंहांचें दूध जोडे । चंद्रामृतही हाता चढे ।
परी हरिप्रियांची भेटी नातुडे । दुर्लभ भाग्य गाढें मनुष्यां ॥४४॥
व्याघ्रसिंहदुधासाठीं । अतिसबळता जोडे पुष्टी ।
परी जन्ममरणांची तुटी । दुधासाठीं कदा नव्हे ॥४५॥
म्हणती चंद्रामृत जो आरोगी । तो होय नित्य निरोगी ।
मुख्य चंद्रचि क्षयरोगी । त्याचें अमृत निरोगी करी केवीं ॥४६॥
व्याघ्रसिंहदुग्धाचे शक्तीं । प्राणी जैं अजरामर होती ।
तैं तेणें दुग्धें ज्यांची उत्पत्ती । ते कां मरती व्याघ्रसिंह ॥४७॥
जैं हरिभक्तांची भेटी घडे । तैं न बाधी संसारसांकडें ।
जन्ममरण समूळीं उडे । त्यांची भेटी आतुडे अतिभाग्यें ॥४८॥;
आजि मी भाग्यें सभाग्य पूर्ण । लाधलों तुमचें दर्शन ।
तरी ’आत्यंतिक क्षेम’ कोण । तें कृपा करुन मज सांगा ॥४९॥;