श्रुतोऽनुपठितो ध्यात आदृतो वाऽनुमोदितः ।
सद्यः पुनाति सद्धर्मो देवविश्वद्रुहोऽपि हि ॥१२॥
भागवतधर्माचेनि गुणें । एक उद्धरती श्रवणें ।
एक तरती पठणें । एक निस्तरती ध्यानें संसारपाश ॥१३॥
एक श्रोतयां वक्तयांतें । देखोनि सुखावती निजचित्तें ।
सद्भावें भलें म्हणती त्यांतें । तेही तरती येथें भागवतधर्में ॥१४॥
हें नवल नव्हे भागवतधर्मा । जो कां देवद्रोही दुरात्मा ।
अथवा विश्वद्रोही दुष्टात्मा । तोही तरे हा महिमा भागवतधर्मी ॥१५॥
हृदयीं धरितां भागवतधर्म । अकर्म्याचें निर्दळी कर्म ।
अधर्म्याचें निर्दळी धर्म । दे उत्तमोत्तमपदप्राप्ती ॥१६॥
जेथ रिघाले भागवतधर्म । तेथ निर्दळे कर्माकर्मविकर्म ।
निंदा द्वेष क्रोध अधर्म । अविद्येचें नाम उरों नेदी ॥१७॥;
ते भागवतधर्मी अत्यादर । श्रद्धेनें केला प्रश्न तुवां थोर ।
निजभाग्यें तूं अति उदार । परम पवित्र वसुदेवा ॥१८॥
तुझें वानूं पवित्रपण । तरी पोटा आला श्रीकृष्ण ।
जयाचेनि नामें आम्ही जाण । परम पावन जगद्वद्य ॥१९॥
तो स्वयें श्रीकृष्णनाथ । नित्य वसे तुझिया घरांत ।
तुझियाऐसा भाग्यवंत । न दिसे येथ मज पाहतां ॥१२०॥
वसुदेवा तुझिया नामतां । वासुदेव ’म्हणती अनंता ।
तें वासुदेव नाम स्मरतां । परमपावनता जगद्वंद्यां ॥२१॥