वाटी ठेविली चांदीची जेव्हा आज तुझ्यासाठी
चंद्र हासला घरात तुझ्या दूध-ओल्या ओठी
आशीर्वाद जिचे हात आई घास देते बाळा
’फुलां-पाखरांकरिता ठेव सूर्य जागा डोळा’
बघ, कुंडीत नक्षत्रे उगवली तुझ्यासाठी
आल्या चिमण्या दारात दोन कण खाण्यासाठी
तुझा घास, बळ त्यांना जाया लंघून दिगंत
तेज नभाचे लुंचून गात येतील परत
गाणे हिरव्या रानाचे, गाणे मनीच्या मनीचे
गाणे चंदेरी उन्हाचे, गाणे जांभळ्या ढगांचे
गाणे हसर्या झर्याचे, गाणे नाचर्या पानांचे
गाणे धुपत्या गंधाचे, गाणे झुलत्या पंखांचे
गाणे झावळ्या छायांचे, त्यात लपत्या वाटांचे
लाल-पिवळ्या फुलांचे, शुभ्र गवत तुर्यांचे
असे गाणे टवटव, त्यांच्या कंठांत फुटेल !
पुन्हा त्यांच्या त्या गाण्यात रान दुसरे लढेल.