खरं सांगू ? विदूषकच सर्वांत जास्त शहाणा
त्याचे चाळे त्याचं वेड म्हणजे फक्त बहाणा
उंच उंच झोके घेणं हा तर त्याच्या हातचा मळ
धप्पकन खाली पडणं यालासुद्धा लागतं बळ
त्यानं शेपूट ओढली तरी वाघ त्याला रागवत नाही
आपल्यामधला एक म्हणून माकड नीट वागवत नाही
आखुड झगावाली छोकरी छत्री घेऊन नाचत येते
विदूषक आडवा येता छत्रीचाच फटका देते
विदूषक ओणवा होतो तसाच फिरतो रिंगणावर
प्रेक्षकांना हसवायसाठी चापटया मारतो ढुंगणावर
वाघ, सिंह, हत्ती, घोडे एकजात त्याचे मित्र
त्याला ढकला, पिटा, बुकला...गमत्या हेच त्याचे चित्र
सगळे खेळ येतात तरी येत नाहीत असा वागतो
सर्कशीचा राजा असून टोपी काढून भीक मागतो
विदूषक नसता तर सर्कशीत गंमत नाही
मार खाऊन हसवण्याची दुसर्यांजवळ हिंमत नाही !