फराळाच्या ताटातली चकली उठली
चाकासारखी गरगर धावत सुटली.
तेव्हा करंजी म्हणाली, ’असे कसे झाले ?
चकलीला एकाएकी पाय कसे फुटले ?’
लाडू म्हणाला, ’माझ्या मनासारखं झालं
आता मला ऐसपैस बसायला मिळालं !’
धावणार्या चकलीने उंबरा गाठला
तेव्हा तिला अंगणात कावळोबा दिसला
’अगबाई कावळिटला !’ असे म्हणून चकली
गरकन् मागे वळून ताटाकडे पळाली
बिचारा लाडू मग अंग चोरुन बसला
तरी सुद्धा चकलीने त्याला धक्का मारला
तेव्हा टाळया पिटीत शंकरपाळी म्हणाली,
’भलतीच बिलंदर आहे की हो चकली !’