बरवी संतचरित्रे हो ! पावन परम पवित्रे हो ॥ध्रु॥
नागधर्मधर नगतनयावर प्रगटुनि या भूलोका ।
नागनाथ हे नाम धरिले शिव मानुरि अवलोका ॥१॥
कुश्चित स्वरुप नोळखती जन धरुनि राहसि माळी ।
अंगावरते विंचू किरडे, कोणी न येती जवळी ॥२॥
जो देखे तो करी उपेक्षा, शीत वृष्टी उन सोशी ।
एकलिंग तेली सद्भावे आला चरणापाशी ॥३॥
भावे सेवा करुनि निशिदिनि पर्णकुटी रचियेली ।
उत्तम अन्ने करी घरीहुनि येऊनि भोजन घाली ॥४॥
एके दिवशी सायंकाळी नीजगृहा प्रति जाता ।
मार्गी काही नवल वर्तले ऐका सज्जन येता ॥५॥
वर्धमान चिलवंत कुमारी सोळा वर्षे झाली ।
आयुःसरता प्राणा त्यजुनी प्रेतरूप पडियेली ॥६॥
माड रचोनि स्वयाति मेळा श्मशानभूमी नेती ।
एकलिंग तेली तिसि पाहे उतरुनि दृष्टी वरुती ॥७॥
भूमीशी हात घासुनि तीचे भाली चर्ची भावे ।
’नागनाथ बोलावित’ म्हणता उठोनि पाठी धावे ॥८॥
भय पावुनिया स्मशान जन हे समीप कोणी येना ।
राक्षस पिशाच भूते प्रेते खेळविताती नाना ॥९॥
सहज विनोदे करिता अद्भुत नवल वर्तले कैसे ।
दोघे धावत येता देकुनि नागनाथ मनि हासे ॥१०॥
नवनाथ चौर्यांशी सिद्धा वार्ता हे श्रुत होता ।
व्याघ्रसिंहसर्पावरि बैसुनि येती दर्शन आता ॥११॥
ऐसे जाणोनि एकलिंगा स्वमुखे आज्ञा करिती ।
’सामोरा तू हि जाय’ म्हणता बाहिर रचिता भिंती ॥१२॥
येरु वरुता बसोन चिखल धोंडे रचीत होता ।
नागेशाची आज्ञा होता चाल तिसि म्हणे आता ॥१३॥
भिंतीवरुते बसुनी त्याला घेऊनिया तो आला ।
पर्णकुटीके नागनाथ तो काय करीता झाला ॥१४॥
नग्नस्त्रियाते सेवा करिता वाम चरण उतरोनी ।
वरद बसैया नाम ठेविले स्त्रीचा पुरुष करोनी ॥१५॥
साक्षात् शंकर जाणूनिया संत लागती पायी ।
लीलाविग्रहि अवतरला तो येथे संशय नाही ॥१६॥
ऐसे अपार संत वर्णिता संशय सर्वहि जातो ।
आठविले ते एक्या भावे उद्धवचिद्धन गातो ॥१७॥