नागनाथ माहात्म्य - अज्ञानसिद्धकृत संकटहरणी - प्रसंग चवथा

नागनाथ हे नवनाथापैकी असून ते साक्षात शंकराचाच अवतार होय.


श्री गुरु नागनाथाय नमः । जयजयाजी सगुण मूर्ति ।

निर्गूण अगम्य योगिया स्थिती ॥

आम्हा भोळीया आवडे ती ।

भक्ती चवथी योगिनी माया ॥१॥

आम्हा ऐसा तू होसी । तरीच तू देव मी भक्त खासी

झडझडाळ यावे ध्यानासी । कागा मानसी विलंबु ॥२॥

हे संकट हरावया । तेचि ध्यान प्रगटावया ।

मन उन्मन व्हावया । करी दया नामी स्वामी ॥३॥

नामी स्वामी सेवक तुमचा । हेचि माझी वाचा ।

किंवा चालक तू तत्वाचा । उभय खेळ तुमचाची ॥४॥

करी हे सगुण ध्यान सर्वाघटी ।

प्रत्यक्ष दावी माया ध्यान सन्मुख दृष्टी ।

आम्हा याची प्रीति मोठी ।

श्रद्धा लाठी धावा करी ॥५॥

धावा ऐकोनी गिरिजारमण ।

प्रगटला निज भक्ता लागून ।

नदी शंकर पाषाण । राउळी जाण जाणवी ॥६॥

अमूर्त मूर्ती मुसावले । सोने लेणे पणे हारपले ।

देवचि भक्त अंगे जाहले । ध्याना आले परस्परे ॥७॥

सगुण धरणी आसन ।

वरी सुनील छत्र निर्गुण गगन ।

एक दोन तीन वरी सिंहासन ।

शिवध्यान डोळा लक्षी ॥८॥

पंचध्यान कर्ण मुख । दशदिशा भुजा कर चोख ।

सप्तपाताळ पादुका ।

एकविस स्वर्ग मुगुट वरी ॥९॥

चिता भस्म सर्वांग भाळी ।

कोटी सूर्य चंद्र तेजा आगळी ।

चंद्रमाथा शोभे वेल्हाळी ।

गुप्त बाळी उन्मनी गंगा ॥१०॥

तिजा नेत्र धगधगित उभय उघडे ।

गळा मानव शिरे नाही बिरडे ।

खाय टकोरा टुकडे ।

ते ध्यान रोकडे आम्हापुढे ॥११॥

बोध पशु बैसना । व्याघ्रांबर गज चर्म ओढणा ।

तूर्या गिरिजा शोभना । स्वइच्छा देवी ॥१२॥

सोहं शंख गर्जे पुढे । संकल्प डौर फडफडे ।

महद्भुते भोवती वेढे । भक्त पिसा ॥१३॥

बहु काय बोलो ध्याना ।

स्वये शेष मौनावला जाणवी खुणा ।

नेति नेति नामी शहाणा ।

शिव ध्याना आला माये ॥१४॥

धन्य धन्य माझी जननी ।

एक सगुण एक निर्गुणी मी सादर झालो झटणी ।

तरीच धावोनी आला स्वामी ॥१५॥

अर्ध नारी नटेश्वरू । विश्वी भरोनी विश्वंभरू ।

अनाम नाम भक्त तारू ।

नेत्र भरू उघडा ध्याना ॥१६॥

प्रसन्न वदन हासत । म्हणे बहु संकटी ऐकोनी निरुत ।

पातलो सांग त्वरित ।

का धावत धावा करिसी ॥१७॥

आता इच्छे ऐसा जाहलो । माग ना मी उभा ठेलो ।

सन्मुख ध्याना भव्य केलो । देव ठेलो तू भक्त ॥१८॥

हे सगुण ध्यान सर्वाघट । तो तुज ऐसा झट ।

तयासी मी नीलकंठ ।

ह्रदयी प्रगट आठवी नामी ॥१९॥

हे रुप माझे नाना वेश । तुझे माजी भरोनी प्रवेश ।

द्वारी उभा घेवोनि वेश ।

मागणे असे ते मागावे ॥२०॥

तुझी इच्छा धरोनी गाठी । द्वारी नवनिधी लोटी ।

चुकवीन चवर्‍याऐंशी लक्ष कोटी ।

सायुज्य पीठी बैसवीन ॥२१॥

ऋद्धिसिद्धि अन्नपूर्णा । मेघ करील पाणी भरणा ।

वायु अंगणी झाडणा । स्वइच्छा रमणा ॥२२॥

बहु काय बोलू बोला । मी सर्वस्वे अंकिला ।

गिरिजे सहित उगला । द्वारी मला रीघ नाही ॥२३॥

ऐसी ऐकोनी शिव वाणी । बोले भक्त शिरोमणी ।

काही इच्छा नाही मनी ।

अखंड ध्यान हेचि भले ॥२४॥

हेचि मागणे आहे एक ।

ते पुढिले प्रसंगी सांगेन चोख ॥

जेणे तुज दुणावे हरीख । ओळवू देख तैसा हरा ॥२५॥

इति श्री संकट हरणी शिव ग्रंथ ।

भावे प्रार्थिला कैलासनाथ श्रोता सावध चित्त ।

प्रसंग वडवाळसिद्ध नागेश ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : September 27, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP