श्रीवडवाळसिद्ध नागनाथांचे इतरही भक्त होऊन गेले. उदाहरणार्थ आलमखान हा पठाण असून नागनाथ भक्त होता.
त्याचे पुढील पद पहा
धन्य हे सुक्षेत्र परब्रह्म पीकले ।
धन्य हे सुनीलजडित रत्न देखिले ॥ध्रु॥
प्रवाळवर्ण शुक्तिकेत मुक्त तो दिसे ।
त्यात कृष्ण शुक्ल श्वेत ओतिले कसे ।
त्यावरी सुनील चंद्र सूर्य तो दिसे ।
कोटि बिंदु पीत बिंदु भासती ठसे ॥१॥
रामह्रदय शिव साक्षी श्रुती बोलली ।
तेवि मूर्ति या ठशात केवि ओतली ।
अलक्ष लक्षणासि केवि पातली ॥
नवल म्हणूनिया वेद नेति खुंटली ॥२॥
याचि विषयी विश्वरुप पाहु लाधला ।
कृपांजने कडुनि ज्ञानचक्षु पावला ।
पाहताचि स्वात्मसुख पाहु लावला ।
गोठला आकार आलमखान आटला ॥३॥
त्याचे पुढील पद पहा-
तुझे स्वरुप गुरुराया । पाहता निरसली माया ।
आता कुरवंडित काया । तू करि मजवरी दया ॥१॥
नीज रुपाची सीमा । पार नेणे शिव ब्रह्मा ।
काय देऊ उपमा । संत साधु विश्रामा ॥२॥
चिन्मय चिद्रूप घनदाट । पाहता दिसे लखलखाट ॥
त्यातुनि करावी वाट । मीन मार्गासी नीट ॥३॥
स्वयं ज्योती प्रकाश । अलक्षरुप अविनाश ।
काय करू विलास । संतजन लोकास ॥४॥
नागेशकृपे वरदान । अलमखान संतचरण ।
सबाह्य ब्रह्म परिपूर्ण । मन हे झाले उन्मन ॥५॥