नागनाथ माहात्म्य - अज्ञानसिद्ध कथा

नागनाथ हे नवनाथापैकी असून ते साक्षात शंकराचाच अवतार होय.


नागनाथ वडवाळ येथे पुढे बरेच दिवस राहिले. शेवटी येथेच गुप्त झाले. त्यांचे बरोबर त्यांचे परमभक्त हेगरस हेही पण वडवाळ येथेच गुरुसेवा करीत राहू लागले. असे असता एके दिवशी बहिरंभटाची स्वारी तेथे आली. बहिरंभट हा पैठणचा कौण्डिण्यगोत्री कर्मठ वैदिक विद्वान ब्राह्मण होता. त्यास एकाएकी पत्‍नीच्या भाषणावरून उपरति झाल्यामुळे आप्तेष्टादिकांचे पाश तोडण्यासाठी वयास ६० वर्षे झाली असतानाही त्याने एकदम त्रागा करुन आत्मकल्याणासाठी यवनधर्माची दीक्षा घेतली. परंतु तेथेही त्याला पश्चात्ताप झाला. पुनः तो स्वधर्मात आला परंतु यवन धर्माच्या झालेल्या शरीरावरील संस्काराने त्याचे मन संत्रस्तच राहिले त्याला आपण कोणत्या धर्मात आहोत हेच कळेना.

भ्रांतीष्ट चित्त ब्राह्मण । फिरुनी जाहला क्षीण ।

व्याकुळला जीव प्राण । उपाय सुचेना तयासी ॥

पूर्व पुण्याई असे बहुत । पूर्वजांचा तो वरदहस्त ।

गुरुभाव होता अंकुरीत । अस्त हो दुर्भाग्य ॥

शेवटी तो हिंडता हिंडता वडवाळ येथे आला व तेथे त्याने नागनाथांना तोच प्रश्न केला.

बहिरंभट हो देवासी । काय बोले त्यासी ।

मी हिंदु का मुसलमान । इतकेच मनी जाण ॥

हे ऐकून नागनाथांनी हातात खङ्‌ग घेऊन त्याच्या मस्तकावर प्रहार केला व त्याला मूर्छित केले व शिष्याकरवी त्याला उखळात घालून कुटले व शेवटी त्याला अग्नि दिला. त्या ज्वाळातून बहिरंभट पुनः बाहेर आले आणि तेव्हा नागनाथांनीच त्याला तू कोण हिंदू का मुसलमान असा उलट प्रश्न केला.

बहिरंभट सावध झाला । पाहतो आपणाला ।

जैसा मातेच्या उदरी । पूतळा जन्मला ।

तैसा दिसू हो लागला । नागनाथ देखिला ।

व नागनाथास म्हणाला -

सिद्दोऽहं सिद्धोऽहं मुखि ऐसा बोले

मागुति गडबड लोळण चरणावरि लोळे ।

स्वयेचि उठवुनि बाजू संन्निध बैसविले

स्वानंदे कुरवाळुनि निजरूपी मिळविले ॥

येथून पुढे त्याने विद्वत्ताप्रचुर असे वेदांतपर ग्रंथ केले आहेत. बहिरंभटाची समाधी व त्याला कुटलेले उखळ ही वडवाळ येथे (सोलापूर जिल्ह्यात) आहेत. बहिरंभटास बहिराजातवेद म्हणण्याचे कारण म्हणजे तो अग्नितून निघाला. अज्ञानसिद्ध ही हकीकत आपल्या अभंगात पुढीलप्रमाणे वर्णिली आहे.

’माझे भुजंगा उदारा ॥ येऊ दे करुणा तुला रे ॥

माझ्या दयाळा सागरा ॥ध्रु॥

येथे नव्हत मूळस्थळ ॥ एकच होत मळ ॥

माझा भुजंग अढळ ॥ अकळ याची कळ ॥

माझ्या नागेशा देवाने ॥ सरकाळाचे गाडे केले ॥

त्याला माकुड लाविले ॥ सर्पाचे नाडे केले ॥

प्रचंड धोंडे हो लादिले ॥ ओढूनी आणिले ॥२॥

उत्तम स्थळ हे देखिले ॥ पर्वत लोटिले ॥

देव आसन घातिले ॥ कैलास स्थापिले ॥३॥

माझ्या नागेश देवाने ॥ अकळ कळ केली ॥

त्याने पोवळ रचियेली ॥ नवखंड स्थापिली ॥४॥

अकळ कळीचा फकीर ॥ बैसे महाद्वारी ॥

तीन्ही ताळीच्या खबरी ॥ जाणतो अंतरी ॥५॥

इतकी खबर ऐकूनी ॥ बहिरंभट आला धाऊनी ॥

देव देखिला नयनी ॥ लागला चरणी ॥६॥

बहिरंभट हो आपण ॥ काय बोले वचन ॥

मी हिंदु का मुसलमान ॥ इतकेच मनी जाण ॥७॥

देवे खड्‌ग हो घेतिले ॥ मस्तकी घातिले ॥

चार सेवक पाचारिले ॥ कांडुन कुटून बारीक केले ॥

त्याचे मेण हो बनविले ॥ सवेचि मूर्त पैदा केले ॥८॥

बहिरंभट सावध झाला ॥ पाहतो आपणाला ।

जैसा मातेच्या उदरी ॥ पूतळा जन्मला ॥

तैसा दिसू हो लागला ॥ नागनाथ देखिला ॥ ९ ॥

धावुनि चारणासी लागला ॥ शिरी हस्त ठेविला ॥

बहिर्‍या पिशाच्या दातारा ॥ तारक नागेश्वरा ॥१०॥

हेगरस कौतुके देखिले ॥ विस्मीत जाहाले ॥

आपुले शिर हो उतरिले ॥ नागनाथ ओवाळिले ॥

देव भक्त एक जाहाले ॥ स्वरूपी मिळाले ॥११॥

हेगरस भक्तासाठी ॥ येथे येणे जाहाले ॥

एक दिल्लीत पावूल ॥ येथे एक ठेविला ॥

बोले अज्ञानसिद्ध नागेश ॥ चैतन्य उपदेशिले ॥१२॥

बहिरंभटाचे इतर काही ग्रंथ आहेत. त्याने श्रीमद्‍भागवतातील दशमस्कंधावर ओवीबद्ध सुंदर टीका लिहिलेली आहे. टीका मोठी असून अद्यापि अप्रकाशित आहे.

वरील अभंगात मुंगळ्याकडून सरकाळ्याच्या गाड्यावर प्रचंड धोंडे वाहिल्याचे वर्णन आहे. त्यास अनुसरुन वडवाळ येथे असलेला एक मोठा धोंडा मुंगीचा धोंडा. या नावाने ओळखिला व पूजिला जात आहे. याच अभंगात हेगरसांनी नागनाथाचे चरणी आपले शिर अर्पण केल्याचे संगितले आहे. हेगरसांची समाधी व ही खूण वडवाळ येथ गोपाळकृष्णाच्या मंदिरात आहे.

अज्ञानसिद्ध

अज्ञानसिद्ध हे हेगरसांच्या मुलीचा मुलगा-

हेगरसास अपत्य दोन । एक पुत्र कन्या जाण ।

तयांचे ऐका नामाभिधान । नागनाथ भक्त जन हो ।

योगेंद्र नामे एक पुत्र । अहिल्या कन्या ही सुपुत्र ।

हेगरस ख्याती सर्वत्र । कुलीन सात्विक घराणे ।

अहिल्या हीस मसूरगावी दिली होती. तिला ३ मुले झाली अज्ञानसिद्ध, विदेहसिद्ध व नरेंद्रसिद्ध, हे जमदग्नी गोमी होते. यापैकी फक्त नरेंद्रसिंहाने गृहस्थाश्रम स्विकारला. अज्ञानसिद्ध व विदेहसिद्ध हे ब्रह्मचारीच राहिले. त्यापैकी अज्ञानसिद्ध हा जन्मतःच विरक्त होता. तो कधी लहानपणी बोलत नसे व इतरांशी कधी तो मिसळत नसे किंवा भूक लागली म्हणून रडत ही नसे यावरुनच की काय त्याचे नाव अज्ञान ठेविले. याची अशी चमत्कारिक वृत्ती पाहून त्याच्या आईला मला मुलगा होऊ दे तुला आणून सोडीन अशा आपल्या पूर्वीच्या नवसाची आठवण होऊन तिने त्यास वडवाळ येथे आणले. येथे येताच मुलगा एकदम बोलू लागला. तेव्हा आईला अतिशय आनंद झाला. तिला मोह आवरेना. आपण ह्या मुलाची मुंज करू व नंतर त्याला येथे आणून सोडू असे म्हणून तिने त्याला घरी परत नेले पुढे काही दिवसांनि ब्राह्मण नियमानुसार योग्य काळी त्याची मुंज ही करण्यात आली. तरी त्याला वडवाळ येथे आणून सोडले नाही. असे होताच या मुलाची वृत्ती बदलून तो पुनः पूर्ववत झाला तेव्हा आईला अतिशय दुःख झाले. मोठ्या कष्टाने तिने त्यास वडवाळ येथे आणून सोडले. पुढे येथे आल्यावर त्याला सद्‍गुरु नागनाथांच्या कृपेने सहज ज्ञान प्राप्त झाले.

अज्ञानपणी सिद्ध स्थिती । म्हणूनी अज्ञानसिद्ध म्हणती ।

लोक त्यांना अज्ञानसिद्ध म्हणू लागले यांचे दोन्ही बंधू ज्ञानी होते. म्हणून त्यांनाही विदेदसिद्ध व नरेंद्रसिद्ध अशी नावे मिळाली. यावेळी नागनाथांचा प्रत्यक्ष संचार नसून ते त्यावेळी गुप्त झाले होते. तरी पण अज्ञानसिद्ध हे नागनाथांचे एकनिष्ठ भक्त असल्यामुळे त्यांना नागनाथांचे प्रत्यक्ष दर्शन होत असे. ज्याप्रमाणे नामदेवाला विठोबाचा सहवास घडत होता तसाच याना नागनाथांचा घडत असे. या काळात त्यांनी वेदांतपर प्राकृत भाषेत काही ग्रंथ केले आहेत.

याप्रमाणे अज्ञानसिद्ध नागनाथांची सेवा करीत असता एके दिवशी नागनाथांनी अज्ञानसिद्धाला तेथे न राहता नरेंद्रास (कोल्हापुर संस्थानातील नरंदे गावी जाऊन राहण्यास सांगितले. गुर्वाज्ञेप्रमाणे अज्ञानसिद्ध नरेंद्यास गेले. तेथे गेल्यावर त्यांना सद्‌गुरुचा विशेषच ध्यास लागला. अशा स्थितीत ते एके दिवशी नगराबाहेर आले व सद्‌गदित अंतःकरणाने त्यांनी नागनाथास हाक मारण्यास सुरुवात केली.

अज्ञानसिद्ध एके दिवशी । नगरबाह्य प्रदेशी ।

जाता आठविले नागेशासी । उन्मन मानसी झाला ।

गुरुचरण आठविले । प्रेमानंदासी भरते आले ।

अविद्या ओहळ बुजाले । लक्ष मुराले गुरुपदी ।

अट्टाहास्ये करुनी भली । आनंदवली तुझी कृपा ।

ऐसे हाकेत ऐकुनी । पूर्वेसी ओ दे वरदपाणी ।

पाहो जाता नेत्र उघडोनी । न दिसे नयनी नागेश्वर

पुन्हा अट्टाहासे हाक मारिता । दक्षिणेस ओ दे तत्वता ।

तिकडे अवलोकोनी पाहू जाता । न लभे अर्था दर्शनाच्या ।

लाभ लाभता पडे यत्‍न । तव तव यत्‍न करी निकर्षून ।

तेवी अट्टाहासे पुन्हा मागून । प्रेमे करोनी हाकमारी ।

तव ओ दे पश्चिमेकडोनी । ऐसा कानी ऐकोनीध्वनी ।

पाहू जाता दिसे नयनी । प्रेमे मनी सद्‌गद्‌ होय ।

हे नागनाथ ये दावी मुख । ऐसी अट्टाहासे मारिता हाक ।

उत्तरेकडोनी ओ दिली देख । पाहता अलोकिक न दिसे रुप ।

हे नागनाथ ये सत्वर । ऐसे हाक मारिता करुणाकर ।

ह्रदयातुनी उठला ओंकार । मननिश्चय विचार स्थिरावे ।

याप्रमाणे अज्ञानसिद्धांनी नागनाथाला हाक मारिताच चारी दिशाकडून ओ येता येता शेवटी ह्रदयातून ओ आली.

त्यासरशी त्यांना जी समाधी लागली ती उतरलीच नाही. त्यावेळी त्यांचे शिष्य दत्तचैतन्य त्यांच्या समाधीचे रक्षण करीत होते. त्यांना त्या दिवशी दृष्टांत झाला व त्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या भोवती बांधून काढले यावेळी ४ बाजूला ४ व मध्ये एक अशी लिंगे उत्पन्न झाली याप्रमाणे अज्ञानसिद्धांनी नरेंद्रास जिवंत समाधी घेतली आहे तेव्हापासून प्रतिवर्षी माघ शु ॥५ त्यांच्या पुण्यतिथीस तेथ उत्सव होत असतो त्या करिता कोल्हापूर दरबारातून अद्याप तेथे वर्षासन चालू आहे.

आता वडवाळ व मोहोळ येथे नागनाथांचा प्रतिवर्षी जो उत्सव होतो त्यामध्ये नागनाथ वायुरूपाने म्हणजे येथील पुजारी खर्गे यांच्या अंगात प्रवेश करून (संचार होऊन) हेगरस वशंजांना अद्यापि भेट देतात. हा आवर्णनीय समारंभ पाहण्यासारखा असतो.

श्री क्षेत्र वडवाळ येथे खर्गतीर्थामध्ये अज्ञानसिद्धांची तपश्चर्या गुहा आहे.

त्यांनी वरदनागेश, काळज्ञान, पृच्छापत्र, जीवब्रह्माभेद लक्षण, तत्वबोध, सिद्धांत पंचीकरण, सप्तकोटेश माहात्म्य, नागेश माहात्म्य, देवकी माहात्म्य, चतुर्थशून्य विवरण हे ग्रंथ लिहिले आहेत त्यातील संकटहरणी, वरदनागेश हे प्रकाशित आहेत. त्यापैकी इकडील सांप्रदायी लोकांच्या नित्य पठणातील संकटहरणी ग्रंथाच्या प्रकाशनाचा आज दुसर्‍यांदा योग येत आहे.

त्यांचे पद

निज तेज निज भूमी निज रावो निज उर्मी ॥

चारि मेरा आवरुनी कृषी कर्म केले ॥ध्रु॥

अनंत साधनी द्वैत क्लेश निरसिले ॥

शुद्ध भूमिके पेरिले । गुरु नीज बीजे ॥१॥

पीक जे पिकलेजन्म । दारिद्र्य तुटले ॥

परि उपाये रक्षिले । पाहिजे बापा ॥२॥

आत्मा हा पाटील । पुत्रा विवेकु सांगतु ॥

आत्महित शेत तू । रक्षी बापा ॥३॥

निजधान्य परमान । बांधुनिया वृत्ती ॥

निजशेता निश्चिति । रक्षाया जाई ॥४॥

अविद्या सर्पिणी । सांभाळी वाटे तीटे ।

गेल्या तरि काटे । तिचे लागो ने दी ॥५॥

विवेक भक्ति युक्त । पायि घालि पायरेखा ॥

मग नाहि शंका । निजमार्गी जाता ॥६॥

वैलिये डोंगरी । संकल्प श्वापदाचा हारी ।

तेथे निरंतरी जागत बैसे ॥७॥

संप्रज्ञात कळा । तू धारिका मानसी ॥

दिन या रात्रीसी । विसंबो नको ॥८॥

आसाव आसबली । नको म्हणो रे आपुली ।

तयेचि साचुली । तू घेत बैस ॥९॥

विषयाचे जाळि । घेतला तिणे थारा ।

तेथे सत्वधीरा । होउनि राहे ॥१०॥

तयेचा निवरी । विराश धोंडी भरी ।

पुनरपि बाहेरी । मग येवो नेदी ॥११॥

मद उनमत पंचाननाचा । येईल रे चपेटा ।

तो नोळखे वोखटा । आपपरु ॥१२॥

गुरुलक्ष निर्धारे । सांभाळि याचि उडी ।

निजशस्त्रे बिभाडी । नामरुप त्याचे ॥१३॥

काम हा कुरंगु । सवे कुबुद्धि हारिणी ।

केल्या कष्टा हाणी । करुनि जाती ॥१४॥

शुद्ध सत्त्व फासे । लावुनि धरि त्यासी ।

तरि निजधान्यासी । रक्षण होये ॥१५॥

चित्त हे चितळ । क्षण न र्‍हाये निश्चळ ।

हाथीचे चंचळ । धावे दश दिशा ॥१६॥

सुबुद्धि वाघुरा । लावुनि धरि तया ।

मग तुज खावया । कै दैन्य नाही ॥१७॥

कुसंकल्पु कोल्हा । नव्हे तेथे रिघु करी ।

त्यासि निरंतरी । तू रक्षि बापा ॥१८॥

तयाचे मस्तकि । हाणे भक्तिचा सुदंड ।

कदा काळे तोंड । मग दाखवेना ॥१९॥

अबोधी कुरोही । येतु जातु नाही शंका ।

निज दृष्टि नीका । रक्षि त्यासी ॥२०॥

शुद्ध सत्त्व टाकणी । लावुनी मारी त्यासी ।

तरि या शेतासी । रक्षण होये ॥२१॥

मन मर्कटेसि गाठी । तुज पडेल जेव्हा मिटि ।

ते निवारिका सृष्टी । मग तूचि येकु ॥२२॥

द्वैतांगेसी संधी । तू अभेद शस्त्रे भेदी ।

तरिचि तू निरावघी । होसील तेणे ॥२३॥

आज्ञानाचे शेत । सिद्धनागेश पिकले ।

जन्म दारिद्र्य तुटले येक वेळा ॥२४॥

अज्ञानसिद्ध-

N/A

References : N/A
Last Updated : September 27, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP