हेगरस
सोलापूर जिल्ह्यात पंढरपुराच्या मार्गावर पूर्वीचे चंद्रमौळी (मोहोळ) हे गाव आहे. त्या गावी सुमारे सातशे वर्षापूर्वी अत्यंत सात्विक अशा एका घराण्यात श्री हेगरस यांचा जन्म झाला.
’चंद्रमौळी गावात एक, नांदतो ब्राह्मण अति भाविक ।
नाम तयाचे असे ठावुक, हेगरस नाम प्रसिद्ध ।
ऋग्वेदी पवित्र ब्राह्मण, शाकल शाखा आश्वलायन ।
भारद्वाज गोत्र जाण, नाम तयाचे हेगरस ।
काम तयाचे कुलकर्णी, भाग्योदय तयाचा सदा तरणी ।
अघटित ईश्वरी करणी, नाम तयाचे हेगरस ॥
एकदा त्याची आई सुमती हिने त्याला द्रव्यपुत्रादिकांचा पाश टाकून देऊन मोक्ष प्राप्तीचा मार्ग स्विकारण्याविषयी उपदेश केला. तेव्हा बारा वर्षे पर्यंत त्याने गाईची सेवा केली.
’पुनरपि मातृ दर्शना । सद्भावे तो आला सदना ते पुसतसे अनुष्ठाना । काय केले मम वत्सा ॥
तो वदे स्वजननीप्रति म्या ती । गोधने जिवविली बहुयुक्ती ।
देऊनीच सुजला यवसाला । योग हा करुनि त्या दिवसाला ।
असे म्हटल्यावर आईने त्याला जवळ घेतले व त्याच्या डोक्यावरून हात फिरवला हात फिरवताना तिने त्याच्या डोकीचे काही केस उपटले तेव्हा क्लेश होताच हा आईला असे का करतेस म्हणून जेव्हा विचारतो तेव्हा ती त्याला म्हणाली.
’ते हासुनि वै वदली बारे बहु छेदिली तृणे जेव्हा ।
तेणे पृथ्वी दुःखित झाली तुज दाविते कशी तेव्हा ॥
ज्यापरि आपुले हे वपु तैसेच विराट देह ही वसुधा ।
तृण वृक्ष केश जाण दोहीसी साम्यता असेचि बुधा ॥
या तुझियानुष्ठाने देवाला दुःखविले बहुत मला ।
आता निर्वाणपरमपद प्राप्ती ती कसि घडेल तुला ॥
याप्रमाणे आईचे बोलण एऐकताच त्याला अतिशय वाईट वाटले त्याने आपुल्या कर्माचा धिःकार केला तो म्हणाला.
म्हणे मी वृथा देह दंडण । केले सद्गुरु कृपेविण ।
तरी आता तयासी शरण । वेगी जावे निज हीता ॥
सद्गुरुंची लागली तहान । हेगरसा चिंता महान ॥
कुठे भेटेल गुरु जाण । एकचि आस मनी ॥
भावे मातृपद वंदिले ।ेगरस मनी संतोषिले ।
बळकट निश्चय करुनि निघाले । श्रीसद्गुरु शोधना ॥
असा विचार करीत तो जे निघाले ते थेट माहुरगडी आले, तेथे त्यानी एकनिष्ठपणाने कडकडीत तपश्चर्या सुरु केली.
षोडषोपचारे नित्य पुजा । महाविद्या महाराजा ।
हेगरस बसला त्याच काजा । रेणुका प्रसन्न व्हावया ॥
कठोर तपश्चर्यानंतरही देवी लवकर प्रसन्न होईना शेवटी आत्मसमर्पण करू लागताच देवी प्रसन्न झाली. तिने विचारले तुला काय पाहिजे ते माग सद्गुरु कृपेविषयी अति आतुर झालेला असा हा दुसरे ते काय मागणार त्याने एकच मागितले
म्हणे ब्रह्मादिका दीक्षागुरु । तो मज व्हावा माते गोचरु ॥
जो भवसागरीचे तारू । प्राणी यासी निर्धारी ॥
तयाची मज व्हावी भेटी । ऐसे इच्छीता हे मी पोटी तरी माते कृपादृष्टी । मजलागी दाखविजे ॥
असे म्हणताच देवीने ठीक आहे म्हणून सांगितले व म्हणाली की हस्तिनापुरापलीकडे हजार कोसावर एक सरोवर आहे तेथे तुला सद्गुरु भेटतील.
जो हा दारुमया सवारुवहना आरुढ त्या दे जिवा ।
संचारी पृथ्वीतलावरि करी तो अंतरिक्षीहि वा ॥
कद्रूच्या तनुजास जो धरि करि त्याते करी कोरडा ।
ज्या दिग्देश सुवस्त्र होय करिता आधाब्धिला कोरडा ॥
तेथे मी तुला जवळ नेऊन ठेवीन व मी अदृश्य होईन
जगत्पित्याची वाट पाहे । निश्चय वृत्तीने उभा राहे ।
म्या धवलघार शिरी राहे । प्रिय वत्सा हेगरसा ।
त्यावरून तू त्यांना ओळखून शरण जा. असे म्हणताच तिने हेगरसाला आपल्या मायेने एकदम त्या सरोवराच्या काठी आणून ठेविले. आणि संकेताप्रमाणे ती तेथून नाहीशी झाली व आकाशात शुभ्र घारीचा वेष घेऊन फिरु लागली
ऐसे सुंदर सरोवरी । माध्यान्ह दिन आलीयावरी ।
आरोहण करोनी वारुवरी । जल प्राशवी तुरुंगासी ।
मस्तकावर जटाभार असलेली, हातात सर्पाचा चाबूक घेतलेली स्वारी त्या सरोवरातीरी उतरली व घार त्यांचे डोक्यावर फिरु लागली. हे पाहताच हेगासांनी धावत जाऊन त्यांचे पाय धरले.
टाच देऊनी घोड्यासी । घोडा उडविला आकाशी ।
परी भक्त मिठी चरणासी । तव देव सुप्रसन्न ।
सद्गुरुने हेगरसाच्या पाठीवर बरेच फटकारे मारले तरी पाय सोडीना, त्यांना वाटले साध्या एका फटक्यात माणूस खाली पडला पाहिजे मी तर एवढे मारतो तरी हा पाय सोडीना.
ब्रह्ममूर्ती आशंकली । चिंतूनी स्वारी दमली ।
दृष्टी नभाकडे नेली । होई भ्रम निरसन ॥
असा विचार करुन
मग उतरुनी आले तळवटी । भक्ता दिली प्रेमेभेटी
स्वानंदे पाठी थापटी । भला भला म्हणोनी ॥
यावेळीच सद्गुरुनी त्याला उपदेश करुन कृतार्थ केले तेव्हा हेगरसांनी त्यांना सांगितले.
आपुले दर्शन उद्धार जाहला । स्वये निघावे जी संगतीला ।
मम सुमती माता सती बाला । तिये दर्शन द्यावया ।
हेगरस भाषण नम्र गोड । कि कारणे बांधील शंकर होड ।
पुरवील हेगरस कोड । प्रेमे कवतुक करील ॥
नागनाथांनी ते म्हणणे कबूल केले व सांगितले तू पुढे चल मी तुझ्या मागे आहेच. जाताना मात्र मागे पाहू नकोस. पाहशील तर मात्र मी तेथून पुढे येणार नाही. तुझ्या मुक्कामी मी दिसणार नाही. असे सांगून दोघे चालू लागले. येता येता ते मानुरास आले. एथे मात्र हेगरसास सद्गुरुचे दर्शन होऊन बरेच दिवस झाले त्यामुळे त्यांची उत्कंठा अतिशय वाढली व या ठिकाणी त्याने मागे पहाताच नागनाथ त्यांचे मागे होतेच. तू आता मागे पाहिलेस तेव्हा मी पुढे येणार नाही असे म्हणताच हेगरस म्हणाले-
माझा निश्चय बलवत्तर । कृपा करावी दीनावर ।
अन्यथा देह तव अंघ्रिवर । दयावंता नागनाथा ॥
असे म्हणताच नागनाथ म्हणाले बाबा, तू आपल्या गावी जा व माझी आठवण ठेव. मी पुढे कधीतरी तुझ्या गावी येईन तेव्हा मला ओळख म्हणजे झाले असे सांगून नागनाथांनी हेगरसास आपल्या गावी पाठवून दिले. ते स्वतः तेथेच राहिले. येथेच नागनाथांनी पुष्कळ चमत्कार केले पुष्कळ लोकांचा उद्धारही केला.
नवनाथ चौर्यांशी सिद्ध । छळाया येता सन्निध ।
दाऊनी नारीचा नर विबुध । गर्व संबंध हरिला ।
येथेच एकलिंग तेली त्यांच्या सेवेस लागला. यावेळी पुष्कळांचा उद्धार केलेला आहे. ती हकीकत विस्तारभयास्तव येथे देत नाही.
पुढे एके दिवशी ते मोहोळ येथे आले. व अमंगळ असा फकिराचा वेष घेऊन गावाबाहेर बसले. व त्यांनी हेगरसास बोलावणे पाठविले. हेगरस धावतच आले त्याने आपल्या सद्गुरुस ओळखिले.
कचकोलमे खाना लिये । दोनो मिलकर सिद्धसाधक खावे खवाये ।
जगमे नाम रकाये । जात पात सब छोड दिये ।
हेगरस फकिर मिल भये । निंदक जन निंदा करत रहे ।
आणि पुढे -
फकिरसवे केले भोजन । ऐसा प्रसंग अवलोकून । धर्मी नसे ऐसे भोजन । भ्रष्ट जाहला ब्राह्मण ॥
नंतर हेगरसांनी त्यांना आपल्या घरी नेले. पुढे नागनाथ हेगरसांच्या घरी राहिले असता एके दिवशी अक्षय्यतृतीया आली तेव्हा हेगरस चिंतेत पडले, कारण ब्राह्मण कोणी भोजनास येईनात, तेव्हा नागनाथांनी प्रत्यक्ष स्वर्गातून सर्व ग्रामस्थ लोकांचे पितर बोलाविले.
उपर स्वर्गसे पितर बुलाये । विमान उतर के टेकडी भर गये ।
वेद घोष तुंबल भये । निंदक बंमन देखन आये ।
देखत बडोका दर्शन हुये । शर्माके हात जुडाये ।
दिनरात तीन मिल रहे । सब आप आपने घर को ले आये ।
चौथे दिनको गायब हो गये । (अज्ञानसिद्ध)
उद्धव चिद्धनाने सुद्धा याचप्रमाणे केले आहे. ते परिशिष्टात स्वतंत्र दिलेले आहे.
अजून ही त्या ठिकाणास सिद्धटेकडी वा विमानटेकडी म्हणतात.