एका सिंहाचे तीन प्रधान होते; मेंढा, लांडगा व कोल्हा. एके दिवशी सिंहाने मेंढ्यास प्रश्न केला, 'काय रे, माझ्या तोंडाला काही वाईट वास येतो का?' मेंढा म्हणाला, 'होय महाराज येतो.' ते ऐकताच सिंहाने त्याला मूर्ख म्हणून एका फटक्यात त्याची आतडी बाहेर काढली. मग लांडग्याला त्याने तोच प्रश्न विचारला, तेव्हा त्याने 'नाही' म्हणून सांगितले. ते ऐकून हा 'तोंडपुजा' आहे म्हणून सिंहाने त्याचाही प्राण घेतला. मग त्याने कोल्ह्यास तोच प्रश्न विचारला असता त्याने उत्तर दिले, 'महाराज, मला पडसं आलं असल्यामुळे मला कोणत्याही वस्तूचा मुळी वासच येत नाही.'
तात्पर्य - थोरांच्या सहवासात राहून कोणत्या प्रश्नास काय उत्तर द्यावे हे ज्याला कळत नाही, ते मूर्ख लोक बर्याच वेळा लवकर नाश पावतात.