उद्गार - ७६१ ते ७७०

निळोबा महाराजांनी बाराशेच्यावर अभंग लिहीले आहेत. सर्व अभंगांतून त्यांनी विठ्ठल भक्ती गायलेली आहे. निळोबा महाराज विठोबाप्रमाणेच कृष्णाची भक्ती करीत. निळोबारायांनी श्रीकृष्ण चरित्र अतिशय उत्तम प्रकारे रचले आहे.

Sant Niloba Maharaj wrote more than 1200 Abhanga in praise of Vitthala. Sant Niloba was a devotee of Vitthala. Niloba Maharaj composed Krishna character in his abhangs in very devotional manner.


७६१

उगेचि आतां बैसेन मी म्हणे । तंव हा करणें चेष्टवितों ॥१॥

दृष्टीपुढें हा उभाचि ठाये ऐकणें होउनी राहे श्रोत्रबिळीं ॥२॥

मनही नेउनी लेपउनी ठेवी । चित्तासी हा गांवी आपणासीं ॥३॥

निळा म्हणे बाई हदयीच राहिला । अवघाचि रोधिला जागा येणें ॥४॥

७६२

उतरिला माझा भार । येणें कैवार धरुनियां ॥१॥

आपुला आपण सोहळा करी । पाहिजे संसारीं पुरवी तें ॥२॥

नेदि पडों उणें कोठें । आलीं संकटें निवारी ॥३॥

निळा म्हणे झाला ऋणी । चक्रपाणी आम्हां घरीं ॥४॥

७६३

उमटलें वरी । होतें तैसें तें अंतरीं ॥१॥

आतां नवजाय झांकिलें । बुध्दि वाचे वोसंडले ॥२॥

दीप अंधारीं ठेविला । प्रकाश न झांके फाकला ॥३॥

निळा म्हणे पांडुरंगें । चूतविलीं माझीं अंगें ॥४॥

७६४

ऐसा जोडियला दातार । करुनी नामाचा उच्चार ॥१॥

आम्हीं भाग्यवंतीं जनीं । पायीं याचे विश्वासोनी ॥२॥

नेदी जाऊं कोठें दुरी । पुरवी अवघेंचि हा घरीं ॥३॥

निळा म्हणे त्वरित आला । फळा अर्थ तो चिंतिला ॥४॥

७६५

काय करुं तैसे ज्ञान । जेणें अभिमान खवळे तें ॥१॥

राहो भाव तुझया चरणीं । गर्जो वाणी गुण कीर्ति ॥२॥

काय करुं व्यत्पत्ती तैसी । जेणें वादासी मूळ होय ॥३॥

निळा म्हणे अहंकार वाढे । नलगे वेडें वैराग्य तें ॥४॥

७६६

काय काज कोणासवें । विठ्ठल देवें वांचूनी ॥१॥

काय नाहीं चरणापासीं । पाहिजे ज्याशी तें तेथें ॥२॥

म्हणोनियां जीवें साठी । करुनि नेहटी बैसलों ॥३॥

निळा म्हणे सभाग्य धणी । पुरवील आयणी सकळ ही ॥४॥

७६७

काय विघरुनी केलें पाणी । घडिली अवनी कासयाची ॥१॥

महिमा जाणें त्याचा तोचि । नेणें विरंची जरी ज्ञाता ॥२॥

काय पिंजुनी केलें गगन । निर्मिला हुताशन कासयाचा ॥३॥

निळा म्हणे भरोनि अंबरा । निर्मिला वारा कासयाचा ॥४॥

७६८

कांहीच जाणीव न करावी । आहे जिवीं हें ठावें ॥१॥

परि मज बोलवी देवो । तेथें उपावो कोणाचा ॥२॥

नव्हे कांही बहुश्रुत । वक्ता पंडित वाचाळ ॥३॥

निळा म्हणे श्रीविठ्ठल  । बोलवी बोल ते बोलें ॥४॥

७६९

कृपाघनें वृष्टी केली । माझीं निवविलीं निजांगें ॥१॥

म्हणोनियां वारंवार । त्याचे उपकार आठवितों ॥२॥

न घेउनी कांही सेवा । धांविले कुणवा आपुलिया ॥३॥

निळा म्हणे सुखी केलें । हातीं धरिलें वरदानें ॥४॥

७७०

कृपादीन प्रकाशिला । विलया नेला अंध:कार ॥१॥

आतां दृष्टीपुढें दिसे । जेथें असें तें तैसें ॥२॥

सत्यासत्यमिळणी झाली । अवघी फावलीं निवडितां ॥३॥

निळा म्हणे उदयो केला । रवीचि उगवला नयनांत ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : August 23, 2026

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP