उद्गार - ७४८ ते ७६०

निळोबा महाराजांनी बाराशेच्यावर अभंग लिहीले आहेत. सर्व अभंगांतून त्यांनी विठ्ठल भक्ती गायलेली आहे. निळोबा महाराज विठोबाप्रमाणेच कृष्णाची भक्ती करीत. निळोबारायांनी श्रीकृष्ण चरित्र अतिशय उत्तम प्रकारे रचले आहे.

Sant Niloba Maharaj wrote more than 1200 Abhanga in praise of Vitthala. Sant Niloba was a devotee of Vitthala. Niloba Maharaj composed Krishna character in his abhangs in very devotional manner.


७४८

अखंडता ते झाली ऐसी । विठ्ठल  राहिला मानसीं । ध्यानीं मनीं लोचनासीं । अहर्निशीं निजबोध ॥१॥

जनीं वनीं जनार्दन । नाढळें त्या भिन्नाभिन्न । एकात्मता अनुसंधान । नित्य दर्शन विठठलीं ॥२॥

देहीं असोनी देहातीत । गुणीं गुणातें नातळत । विषयीं विषयापासुनी मुक्त । भोगीं भोगासक्त नव्हती ते ॥३॥

नित्य निरामय निर्गुण । जगादात्मा जो आनंदघन । विटेवर पाउलें समान । लोधलें मन चरणीं त्या ॥४॥

निळा म्हणे विठ्ठल  जपें । सांडिले ते पुण्यपापें । संकल्प सोडिले विकल्पें । त्रिविधतापें स्वानुभवी ॥५॥


७४९

अवघाची गुणीं आहे हा भला । परि हा याला लोभ कां ॥१॥

कांहींच उरों नेदी माझें । संचिंतपुजें भरियेलें ॥२॥

बरें वाईट हा न म्हणेचि कांहीं । पाप पुण्य तेंहि लुंचियेलें ॥३॥

निळा म्हणे जें जें देखें । तें तें हा सुखें भरितुची ॥४॥

७५०

अवघींच अंगे वेष्टोनि ठेलीं । हरीचिये रंगली निज सेवें ॥१॥

तेणेंचि वाटे कृतकुत्यार्थ । चुकले अनर्थ जन्मजरा ॥२॥


सर्व काळ सुखीं सुख । हरिखीं हरिख कोंदला ॥३॥

निळा म्हणे पुरले नवस । आलिया नरदेहास सफळ झालें ॥४॥

७५१

अवघ्या अंगें अवघें झालों । अवघेचि ल्यालों आळंकार ॥१॥

अवघ्या ठायीं अवघ्या देहीं । अवघ्या नाहीं वेगळां ॥२॥

अवघ्यां जवळी अवघ्यां दुरी । अवघ्यां परी सारखा ॥३॥

अवघा निळा अवघ्यां संगें । अवघ्या रंगे रंगला ॥४॥

७५२

असो आतां हें बोलणें । आम्ही निर्भय एक्या गुणें ॥१॥

सांगितलें करुं काम । हातें टाळी मुखें नाम ॥२॥

गुण वानूं नानापरी । आज्ञा त्याची वंदुनी शिरीं ॥३॥

निळा म्हणे राजा धरी । हातीं तया सभाग्य करीं ॥४॥

७५३

असोतु ऐसियाच्या गोठीं । काय करुनि लाभ तुटी ॥१॥

गाऊं विठठलु सांवळा । आठवूं तो वेळोवेळां ॥२॥

जया चरणीं ब्रीद भार । वांकि किंकणी झणत्कार ॥३॥

निळा म्हणे तुळसीमाळा । पदक एकावळी गळां ॥४॥

७५४

असो त्याची मात । गाऊं गीतीं पंढरीनाथ ॥१॥

जेणें मनासीं विश्रांती । फावे इंद्रियां सुखशांती ॥२॥

आळवितां नामें । भुवनें चौदाहिं संगमें ॥३॥

निळा म्हणे वैकुंठवासी । करी कृपा राहे पासीं ॥४॥

७५५

आम्हां सापडलें वर्म । हरिभक्तिचें सुगम ॥१॥

त्यांचे आळवावें नाम । ह्रदयीं धरुनियां प्रेम ॥२॥

वाजउनी टाळी । सुखें नाचावें राउळीं ॥३॥

निळा म्हणे संतीं । दाविलें हें कृपावंतीं ॥४॥

७५६

आम्हां सुखा नाहींचि उणें । सेवागुणें स्वामीचियां ॥१॥

अवघ्या ब्रम्हांडाच्या सूत्रीं । गाऊं वक्‍त्रीं गुण त्याचे ॥२॥

जेणें उदंड सभाग्य केलें । निजदास आपुले भूमंडळी ॥३॥

निळा म्हणे उपेक्षूं नेणें । आपुलिया स्मरणें नामाच्या ॥४॥

७५७

आळवीण क्षणक्षणां । नारायणा या नामें ॥१॥

या हो या हो पंढरीनाथा । कृपावंता सामोरे ॥२॥

आलियाचा हरा शीण । दया हो आलिंगन धांवोनी ॥३॥

निळा म्हणे परस्परें । अत्यादरें आदर ॥४॥

७५८

आळवूं आम्ही विठोबासी । नेणों आण्किासी रंजवूं ॥१॥

राग कळा घात मात । स्वर संगीत मूर्छना ॥२॥

ताल ग्राम छंद बंद । गीत प्रबंध कंपित ॥३॥

निळा म्हणे प्रेमें वाणी । गर्जवूं गुणीं श्रीहरिच्या ॥४॥

७५९

आज्ञापिलें जें श्रीहरी । तेचि वदली हें वैखरी ॥१॥

नाहीं माझें येथ वीर्य । जाणे ज्याचें तोचि कार्य ॥२॥

येईल जरी हे प्रतिती । धरा तरी हें हितचि चित्तीं ॥३॥

निळा म्हणे सांडिजे येरी । नास्तिक वादी परते दुरी ॥४॥

७६०

विसारे गोंविला । अवघा आंखुनी ठेविला ॥१॥

देउनिया अहंभावो । भक्तीं सांठविला देवो ॥२॥

नामाचिंतन । करुनि केला हा स्वाधीन ॥३॥

निळा म्हणे जिवेंसाठीं । करुनि सामाविला पोटीं ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : August 23, 2026

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP