शारीर
उरामध्यें फुफ्फुसाच्या दोन्ही बाजूस असलेल्या पार्श्वाच्या आश्रयानें हा व्याधि उत्पन्न होतो.
व्याख्या
पार्श्व या अवयवामध्यें वेदनायुक्त शूल उत्पन्न होतों म्हणून यास पार्श्वशूल असें म्हणतात.
स्वभाव
व्याधि बहुधा चिरकारी स्वरुपाचा व कष्टसाध्य असतों.
मार्ग
मध्यम
प्रकार
वातप्रधान व कफपित्तप्रधान असे दोन प्रकार आहेत.
निदान
शीतसंसर्ग, अतिश्रम, ज्वरादि व्याधींनीं शरीर कृश होणें, विषमाशन या कारणांनीं दोष प्रकोप होऊन पार्श्वशूल होतो.
संप्राप्ति
रुणद्धि मारुतं श्लेष्मा कुक्षिपार्श्वव्यवस्थित: ॥
सु.उ.४२-११७ पान ७२५
स प्रकुपितो वशिकं शरीरमनुसर्पन उदीर्य्यश्लेष्मपित्ते परि.
शोषयति मांसशोणिते, प्रच्यावयाति श्लेष्मापित्ते, संरुजति पार्श्वे ।
च.नि. ६-१०, पान ४६७
कफो हि वायुना क्षिप्तो विष्टब्ध: पार्श्वयोर्हृदि ॥
खरीकृतश्च पित्तेन शल्यवब्दाधेत नरम् ।
का.सं. पान २२०
बस्तौ हृत्कण्ठपार्श्वेषु सशूल: कफवातिक: ।
कुक्षौ हृन्नाभिमध्येषु स शूल: कफपैत्तिक ॥
वंगसेन शूल, पान ४२०
हृन्नाभिकुक्षौ कफसन्निकृष्टं ।
वंगसेन शूल, पान ४२०
प्रकुपित झालेल्या वायूमुळें कफाचें उदीरण होऊन वात व कफ पार्श्वामध्यें येतात आणि शूल हा व्याधि उत्पन्न करतात. तीनहि दोष या व्याधीमध्यें उण्याअधिक प्रमाणांत भाग घेत असतात. दूष्याच्या दृष्टीनें रस, रक्त, मांस यांची दुष्टी असते. पित्त हें या व्याधीमध्यें दोन अवस्था उत्पन्न करतें व वायूचें त्यास सहाय्य होत असतें. कफ अल्प, वातप्रधान व पित्ताचा अनुबंध असें घडल्यास कफ शुष्क होऊन वाताचा रुक्ष गुण व पित्ताचा तीक्ष्ण गुण यानें पार्श्वाचा क्षोभ होऊन शूल उत्पन्न होतो. वायूनें च्यावित केलेला कफ अधिक प्रमाणांत असल्यास पित्तानें त्याला विशेषच द्रवता येते. असा हा द्रवीभूत कफदोष पार्श्वामध्यें निचित होऊन (क्षोभ) शोथ उत्पन्न करतो. वातकफदुष्टीमुळें (व्यान वायू व क्लेदक कफ) पार्श्वशूल व्याधींचा उद्भव होतो. व्याधीचें अधिष्ठान पार्श्वामध्यें (फुप्फुसावरणांत) असतें. सर्व उर:स्थल व रसवहस्त्रोतस् हे त्याचें संचारक्षेत्र असतें.
पूर्वरुपें
ज्वर, पार्श्वामध्यें टोचल्याप्रमाणें वेदना, श्वास, कास, अरति.
रुपें
स संरुद्ध: करोत्याशु साध्मानं गुडगुडायनम् ।
सूचीभिरिव निस्तोदं कृच्छ्रोच्छ्वासी तदा नर: ।
नान्नं वांच्छति नो निद्रामुपैत्यर्तिनिपीडित: ।
यद्यपि चत्वार: शूला:, तथापि दोषधातुमलसंसर्गादायत-
नविशेषान्निमित्ततैश्चषां विकल्प इति कृत्वा पार्श्वादिशूलमाह रुणद्धीत्यादि ।
स वायु: आध्मानम् उदरापूर: । गुडगुडायनमत्र अव्यक्तशब्द: ।
नो निद्रामुपैति न निद्रां प्राप्नोतीत्यर्थ: ।
सटीक, सु.उ. ४२-११८, पान ७२५.
पार्श्वशूलं त्वनियंत संकोचायामलक्षणम् ।
च.चि. ८-५६, पान १०७५
वायू हा कफानें संरुद्ध झाल्यामुळें आध्मान उत्पन्न करतो. श्वासोच्छ्वासाचे वेळीं पार्श्वामध्यें सुया टोंचल्याप्रमाणें वेदना होतात त्या श्वासोच्छ्वासाचे वेळी वाढतात. श्वास घेणें कष्टाचें होतें. अतिवेदनेमुळें अन्नावर इच्छा असत नाहीं. झोप चांगली लागत नाहीं. रोगी अस्वस्थ असतो. पित्ताचा अनुबंध विशेष असतांना किंवा त्यामुळें प्रपाक झाला असतांना पार्श्वशूलामध्यें ज्वराचें प्रमाण तीव्र असतें. पार्श्वशूलामध्यें कधीं संकोच तर कधीं आयाम अशीं स्थिति असते. पार्श्वातील दोष संचितीमुळें फुप्फुसाचें पीडन झाल्यास श्वास हें लक्षण तीव्र स्वरुपांत असतें. रस व कफ क्लिन्न होऊन निचित झाले असल्यास पार्श्वामध्यें गौरव, स्तब्धता हीं लक्षणें असतात. ही अवस्था व्यवहारामध्यें पार्श्वशूलाची सजलावस्था म्हणून ओळखली जाते. काश्यप संहितेमध्यें पार्श्वशूलावरील चिकित्सेचे परिणाम सांगत असतांना या उपायांनीं श्लेष्मा हा खेचला जातो व त्यामुळें लाघव येते असे म्हटले आहे.
तेनास्य हृदयश्लेष्मा मन्यापार्श्वशिरोगलात् ॥
लीनो व्याकृष्यते शुष्के लाघवं चास्य जायते ।
काश्यप सं. पान २२०
या वर्णनाच्या संदर्भावरुन पार्श्वामधील द्रवीभूत कफाची संचिती कश्यपास अभिप्रेत असल्याचें स्पष्ट दिसतें. उरोग्रहातील वर्णनाप्रमाणें या अवस्थेस वा व्याधीस कुक्षिशोथ असेंहि म्हणतां येईल.
वृद्धिस्थानक्षय
पार्श्वशूलाच्या सजलावस्थेचा अतिरेक झाल्यास प्राणोपरोध व हृदयोपरोध अशीं लक्षणें दिसतात. हृदय ढकलल्यासारखे होऊन प्रकृत स्थानापासून बाजूस सरकतें. गिळण्यास त्रास होतो. खोकला येतो. कुशीवर झोपतां येत नाहीं किंवा श्वासाप्रमाणें `आसीनो लभते सौख्यम्' हें लक्षण उत्पन्न होते. क्लिन्न झालेला कफ व रस रक्तपित्ताच्या दुष्टीमुळें पूयीभूत झाल्यास तीव्र ज्वर, विषमज्वर, श्वास, मूर्च्छा अशीं लक्षणें उत्पन्न होतात. व्याधि मध्यममार्गांतील असल्यामुळें उत्पन्न झाल्यानंतर दीघकालपर्यंन्त तसाच रहातो. मंदज्वर, शूल, अल्पप्रमाणांत श्वास, कास, दौर्बल्य व पार्श्वामध्यें गौरव हीं लक्षणें टिकून रहातात. व्याधि बरा झाल्यास पार्श्वामध्यें लाघव उत्पन्न होतें. ज्वर, श्वास, कास अशीं लक्षणें नाहींशी होतात उत्साह वाटतो. श्वासोच्छ्वासाचे वेळीं किंचित् तोद असणें हें लक्षण मात्र पुढें बरेंच दिवस रहातें.
चिकित्सा संदर्भाने लक्षणें
पर्वभेद, ज्वर, अनिद्रा, श्वास, कास, कुष्ठरोग, मुखगौरव, आलस्य, पार्श्वभागीं जडता, उत्क्लेश, (का.सं.पृ.२२०)
उपद्रव
श्वास, कास, स्वरभेद, राजयक्ष्मा.
उदर्क
यक्ष्मा, फुफ्फुसांचा संकोच, पार्श्वग्रह; पार्श्वस्थानीं खरीभूत कफामुळें घनता येणें, श्वासोपरोध.
साध्यासाध्यविवेक
पार्श्वशूल हा व्याधि कष्टसाध्य आहे. उपद्रव उत्पन्न झाल्यास असाध्य होण्याची भीति आहे. रोगी बलवान्, व्याधि नुकतांच उत्पन्न झालेला व लक्षणें थोडी असल्यास हा व्याधि साध्य होतो.
रिष्ट लक्षणें
श्वास (महोर्ध्वछिन्न). वैवर्ण्य, तीव्र हृतशूल, तीक्ष्ण ज्वर.
चिकित्सा सूत्र
तस्याशुष्कस्य लीनस्य विलग्नस्य कृशात्मन: ॥
दु:खंनिर्हरणं कर्तु तीक्ष्णादन्यत्र भेषजात् ।
का.सं. पान २२०
पार्श्वामधील कफ अशुष्क (द्रवनिचित) लीन वा विलग्न कसाहि असला तरी मध्यम मार्गात असल्यामुळें तीर्यक्गति असतो. त्यामुळें युक्तीनें त्याचें निर्हरण करावें लागतें. हें काम अवघड आहे. तीक्ष्ण नस्य, तीक्ष्ण कवलग्रह उपनाह स्वेद, तापस्वेद वा प्रलेप असें उपचार करावेत. रोग्याला दिवसा झोपूं देऊं नये.
कल्प
लशुन, त्रिकटु, पुष्करमूल, दशमूलें सर्षप, कुमारी, लताकरंज, सुवर्णमालिनीवसंत, लोहपर्पटी, त्रैलोक्यचिंतामणि, लोकनाथरस, आरोग्यवर्धिनी, त्रिभुवनकीर्ति, नागगुटी, लक्ष्मीविलास, समीरपन्नग, हेमगर्भ. मल्लसिंदूर, श्वासकुठार, महायोगराजगुग्गुल, शिलाजित, कुमारीआसव, कुमारीकल्प, दशमूलारिष्ट.
आहार
ज्वर असतांना - लघु अन्न, कुलत्थयूष जीर्णशालींची थंड पेया; नंतर बाजरीची भाकरी व लसूण.
विहार
विश्रान्ति.
अपथ्य
अभिष्यंदी पदार्थ, दिवास्वाप, श्रम.