प्राणवहस्त्रोतस् - परिचय

धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.


तत्र प्राणवहानां स्त्रोतसां हृदयं मूलं महास्त्रोतश्च ।
च.वि.५-९ पान ५२५
महास्त्रोतस्-विशेषत: मुखापासून आमाशयापर्यन्तचा भाग व हृदय हें प्राणवहस्त्रोतसाचें मूल आहे. महास्त्रोतस् या शब्दानें येथें आमाशयादि अवयव असा विशिष्ट अर्थ न घेतां महास्त्रोतस् शब्दाचा मोठे स्त्रोतस्, मोठा मार्ग असा सामान्य अर्थ करुन तो वायूचें वहन करणार्‍या कण्ठनाडीचा वाचक मानाचा असें कांहीं लोक मानतात. तेहि विचार करण्यासारखें असलें तरी विकृतींच्या कारणामध्यें आमाशयांची दुष्टि ही येथें विशेष महत्त्वाची असते असा अनेकवेळां अनुभव येतो. श्वासासारख्या व्याधीमध्यें तो आमाशयोद्भव असल्याचें स्पष्ट शब्दांत वर्णन केलें आहे. स्त्रोतसांची व्याप्ति एका विशिष्ट क्रियेपुरतीच मानलेंली नसून आयुर्वेदीय कल्पनेप्रमाणें तीं तीं कर्मे करणार्‍या विशिष्ट भावाचें अभिवहन करणारी तीं स्त्रोतसें असा अर्थ असल्यामुळें शरीरान्तर्गत प्राणाच्या संचार क्षेत्रांत महास्त्रोतस् म्हणजे आमाशयादि अवयवहि गृहीत धरावयास अडचण नाहीं असें आम्हास वाटतें. प्राणवहस्त्रोतसाची व्याप्ति केवळ श्वसनक्रियेपुरतीच मर्यादित न मानतां प्राणाचे संचारक्षेत्रांतील सर्व अवयवांचा त्यांत समावेश होतो, असें मानले तरी व्याधीचा विचार करतांना प्राधान्यानें श्वसनक्रिया व तिच्याशीं संबंधित असलेल्या अवयवांचाच विचार याठिकाणीं केला पाहिजे. हृदय व महास्त्रोतस् हें प्राणवह स्त्रोंतसाचें मूल सांगितलें आहे. महास्त्रोतस व हृदय या अवयवामध्यें विकृति झाली असतां ती सर्व प्राणवहस्त्रोतसामध्यें पसरण्याची शक्यता असते असा मूल शब्दाचा अर्थ स्त्रोतसाच्या प्रकरणांत करावा असें आम्हास वाटतें. हृदय शब्दानें येथें हृदय हा रसरक्ताचें विक्षेपण करणारा कमलकोशाकृति एक अवयव येवढाच मर्यादित अर्थ घेतला तरी चालण्यासारखें आहे. कांहीं हृदयाच्या उपलक्षणेंनें सर्व उरस्थान असा अर्थ करतात. तेंहि मानावें परन्तु असें करण्यांत मूल शब्दानें जी विशिष्टता सूचित होते ती जाऊन जवळ जवळ सर्व स्त्रोतस् ज्यांत समाविष्ट आहे त्याला मूल म्हणावें लागते. प्राणवहस्त्रोतसाचा विचार करीत असतांना याठिकाणी प्रामुख्यानें बाहेरुन शरीरांत घेतल्या जाणार्‍या उदक-अन्नांप्रमाणें एका पोषक अशा बाह्य वायूचा संबंध वर्णिला असला तरी या क्रियेचा जो प्रेरक वा नियंता तो पोष्य स्वरुपाचा प्राणवायुहि येथें विचारासाठीं अभिप्रेत आहे. त्यामुळें वाताच्या पंचविध प्रकारांतील प्राण नांवाचा वात, त्याचे गुण कर्म आणि त्याच्या संचार क्षेत्रांतील कांही अवयव यांचा विचार अनुषंगानें केला पाहिजे. सुश्रतानें `तत्र प्राणवहे द्वे तयोर्मूलं हृदयं रसवाहिन्यश्च धमन्य: (सू.शा.९-१२) असें म्हणून या स्त्रोंतसांतच रसवाहिन्याहि सांगितल्या आहेत त्या वरुन प्राणाच्या कार्यक्षेत्राची व्यापकताच सूचित होते.

नाभिस्थ: प्राणपवन: स्पृष्ट्‍वा हृत्कमलान्तरम् ॥
कण्ठाद्वहिर्विनिर्याति पातुं विष्णुपदामृतम् ।
पीत्वा चाम्बरपीयूषं पुनरायाति वेगत: ॥
प्रीणयन्देहमखिलं जीवयञ्जठरानलम् ।
दी.- नाभिस्थ इति । प्राणपवन: प्राणानिल: प्राणाश्रितो
वायुरिति तात्पर्यार्थ: । प्राणा अग्निसोमादय:,
नाभिस्थं इति कारणात् नाभौ स्थित: सकलशरीरव्यापकत्वात्,
एतेन नाभ्यावृतशिरास्वपि स्थित इति भाव: ।
तदुक्तं - `नाभिस्था: प्राणिनां प्राणा: प्राणान्नाभिव्युपाश्रिता ।
शिराभिरावृतानाभिश्चक्रनाभिवारकै:' इति ।
यथा - `ब्रह्मरन्ध्रान्नाभिचक्रं द्वादशारमवस्थितम् ।
लूतेव तन्तुजालस्था तत्र जीवोभ्रमत्यम् ॥
सुषुम्नया ब्रह्मरन्ध्रमारोहत्यवरोहति ।
जीव: प्राणसमारुढो रञ्जक: स्फटिको यथा' इति ।
तस्य कारणत्वं च तन्त्रान्तरेऽपि कथितम् ।
यथा `तेषामुष्णतम: प्राणो नाभिकन्दादध: स्थित: ।
चरत्यास्ये नासिकायां नाभौ हृदयपड्कजे ॥
शब्दोच्चारणनिश्वासोच्छ्वासकासादिकारणम् ।' इति ।
एवंविध: प्राणानिल: हृत्कमलान्तरं हृदयकमलस्याभ्यनन्तरं स्पृष्ट्‍वा
प्रबोध्य कण्ठाद्वहिर्विनिर्याति अर्थात् कण्ठमुलड्घ्य शिरसि प्राप्त इति तात्पर्यार्थ:
कृत इत्याह विष्णुपदामृतं पातुं विष्णुपदं ब्रह्मरन्ध्राश्रितं तत्राश्रितममृतं पीयूषं ।
अतएवाहुराचार्या:- चक्रं सहस्त्रपत्रं तु ब्रह्मरन्ध्र सुधाधरम् ।
तत्सुधासारधाराभिरभिवर्धयते तनुम' इति ।
मूलभारतेऽपि - `ब्रह्मरन्ध्रे स्थितो जीव:सुधया संप्लुतो यदा ।
तुष्टिगीतादिकार्याणि सप्रकर्षाणि साधयेत् इति । पीत्वेत्यादि ।
स एवानिल: अम्बरपीयूषं ब्रह्मरन्ध्राश्रिततममृतं पीत्वा अर्थात्
समादायपुनरीति तेनैव पथा वेगतस्तत्क्षनादेव आयाति स्वस्थान इति शेष:।
तादृशस्य तस्य कार्यमाह प्रीणयन्नित्यादि । अखिलं देहं प्रीणयन् सन्नास्ते इतिभाव: ।
अखिलमिति । शिखादिचरणपर्यन्तं न केवलं देहं पुष्णाति अपि तु जीवं जठरानलं च ।
जीव: पूर्व व्याख्यात: । स च ब्रह्मरन्ध्रे स्थित: जठरानल: च । पाचकाग्नि: तस्य पाचकादिशक्तिं
करोतीत्यभिप्राय: । ननुदेहग्रहणेन जीवानलादीनां ग्रहणमेव तत्कथं पृथुगुक्त: ?
उच्यते - देहग्रहणसामान्येनाड्गप्रत्यड्गविभागोऽमिहित: । जीवानलौ तु विशेषेण तन्मूलौ ।
अतएव `शरीराद्भिन्नो जीव' इतिश्रुति: । तस्मात्पृथुगुक्तौ न दोष: ।
यत: - `आयुर्वर्णो बलं स्वास्थमुत्साहोऽपचयप्रभा: ।
ओजस्तेजोऽग्नय: प्राणाश्चोक्ता देहेऽग्निहेतुका: ॥ शान्तेऽग्नौम्नियते युक्ते चिरंजीवत्यनामय: ।
रोगी स्याद्विकृते मूलमग्निस्तस्मान्निरुच्यते इति ॥
शा.स. प्रथमखण्ड. ५-४८, ४९ दीपिका टीकेसह पान ६०

प्राणवह स्त्रोतस् यांतील प्राण शब्दाचा बाह्य वायू असाहि अर्थ आहेच. शरीरान्तर्गत प्राणवायूच्या शक्तीनें नासिका-मुख-द्वारा अंबरपीयूष रुप पोषक वायू घेतला जातो. या अम्बरपीयूषाला उदक अन्नाप्रमाणें शरीरभावाचें पोषण करणारें एक पोषक द्रव्य या दृष्टीनें महत्त्व आहे. `वायु: प्राणसंज्ञाप्रदान-हेतूनां' असें चरकानें अग्र्यसंग्रहांत सांगितले आहे (च.सू.२५-४०) त्यावरुन या अंबरपीयूषाचें पोषकत्व स्पष्ट होते. श्वासोच्छ्‍वासाच्या क्रियेची प्रेरणा व्यक्त स्वरुपांत नाभीच्या आसमंतभागीं आरंभते व त्या क्रियेमुळें बाहेरील अंबरपीयूष खेचलें जातें. टीकाकारानें योगशास्त्रांतील संज्ञांचा अनुवाद करुन अंबरपीयूष या शब्दानें बाहेरील आकाशांत असणारा जीवनीय वायू असा अर्थ घेतला नाहीं. मस्तिष्कामध्यें असणार्‍या ब्रह्मरंध्रांतील चैतन्यदायक द्रव द्रव्यास अंबरपीयूष म्हटलें आहे; असें टीकाकार म्हणतो. टीकाकाराचें हें म्हणणें योगशास्त्राच्या प्रक्रियेमध्यें महत्त्वाचे असलें तरी वैद्यकाच्या दृष्टीनें चरकाच्या अग्र्यसंग्रहांतील वचनाप्रमाणें अंबरपीयूष शब्दानें आकाशांतील पोषक वायूच गृहीत धरला पाहिजे. शारंड्गधराचें वर्णन हें स्पष्ट आहे. श्वसनक्रियेचें इतकें चांगलें वर्णन इतर आयुर्वेदीय ग्रंथांत आढळत नाहीं.


श्वासाची संख्या योगशास्त्रांत सांगितली आहे.
स च वायु: सूर्योदयमारभ्य सार्ध घटिकाद्वय घटीयंत्रस्थित
घटभ्रमण न्यायेनैकैकस्यां नाडयां भवति । एवं सति अहर्निशं
श्वासप्रश्वासयो: षट्‍शताधिकैक विशंतिसहस्त्राणि जायन्ते ।
पातंजलदर्शन सर्वदर्शनसंग्रह पृष्ठ ३७७

६० घटिका वा २४ तासांत २१६०० श्वासोच्छ्वास होतात. म्हणजे एक तासांत ९०० व एका मिनिटांत १५ श्वासोश्वास होतात असे प्रमाण भारतीय शास्त्रांत आलेले आहे पूर्णपणें स्वस्थ पुरुषांत हे प्रमाण योग्य आहे असें म्हणता येते.

स्थानं प्राणस्य सूर्धौर: कन्ठजिह्वास्यनासिका: ।
ष्टीवनक्षवथूद्वारश्वासाहारादि कर्म च ॥
च.चि.२८-६. पान १४४५

यो वायुर्वक्त्रसंचारी स प्राणो नाम देहधृक् ॥
सोऽन्नं प्रवेशयत्यन्त: प्राणांश्चाप्यवलम्बते ॥
प्रायश: कुरुते दुष्टो हिक्काश्वासादिकान् गदान् ॥
नि.स. वक्त्रसंचारित्वं चास्योपलक्षणं तेन मूर्धोर: कण्ठनासिका
अपि प्राणस्य स्थानम् । अन्त:अभ्यन्तरमन्नं प्रवेशयति देहधारणाय ।
प्राणांश्चाप्यवलम्बत इति प्राणानग्न्यादीन्, अवलम्बते स्वक्रियासु योजयति ।
गयदासाचार्यस्त्वेवं मन्यतेप्राणानामग्नीषोमादीनामवलम्बनवचनेधारभूतहृदयावलम्ब-
नमोवोच्यते, एतेन प्राणाधारहृदयधारणेन प्राणधारणमेवोक्तम् ।
अत एव प्राणानामवलम्बेन मरणमूलत्वमुच्यते । यदुक्तं सुश्रुतौ-
यथा हि सैन्धवोऽश्व:शड्कुमुत्पाटय धावति तद्वत् प्राणोरुद्ध:
सर्वान् वायूनुत्पाट्य प्रयाणकाले धावति'' इति । श्वासादिका-
नित्यादिशब्दात् प्रतिश्यायस्वरभेदकासादय:
नि.सं. टीकेसह सु. नि. १-१३ पान २५९
प्राणोऽत्र मूर्धग: । उर: कण्ठचरो बुद्धिहृदयेन्द्रियचित्तधृक् ॥
ष्ठीवनक्षवथूद्वारनि:श्वासान्नप्रवेशकृत् ।
वा.सू. १२-४ पान १९३

तत्र प्राणो मूर्द्धन्यवस्थित: कण्ठोरश्चरो बुद्धीन्द्रियहृदय-
मनोधमनीधारणष्टीवनक्षवथूद्वारप्रश्वासोछ्‍वासान्नप्रवेशादिक्रिय: ।
अ.सं.सू.२०, पान १४७

प्राण: प्रीणाति भूताणि प्राणो जीव इति स्मृत: ।
भेल. सू. १६ पान १२८
प्राणा: प्राणभृतां यत्र श्रिता: सर्वेन्द्रियाणि च ।
यदुत्तमाड्गमड्गानां शिरस्तदभिधीयते ॥
च.सू.१७-१२ पान २०८

तत्र प्राणवहे द्वे, तयोर्मूलं हृदयं रसवाहिन्यश्च धमन्य: ।
सु.शा. ९-१२, पान ३८६

दशैवायतनान्याहु: प्राणा येषु प्रतिष्ठिता: ।
शड्खौ मर्मत्रयं कण्ठो रक्तं शुक्रौजसी गुदम् ॥
च.सू.२९-३, पान ३८४

दश प्राणायतनानि मूर्धा जिह्वाबन्धनं कण्ठो हृदयं नाभिबस्तिर्गुद: शुक्लमोजो रक्तं च ।
अ.सं.शा.५ पान ३२१

``वायो: सदागतित्वेन स्थानं नास्त्वेव शाश्वतम् ।
प्राय: शश्वच्चरत्वेऽपि साधर्म्यात् स्थानमुच्यते '' ।
सु.नि. १-१३, न्या.च.टीका, पान २५९-२६०

प्राणवायु हा स्वत:च्या वातस्वभावाप्रमाणें अत्यंत चल गुणाचा असून सदैव गतियुक्तच असतो. स्थैर्य असे त्याच्या ठिकाणीं कधींच नसतें वाताच्या या गुणामुळें कोणताहि वात अमुक एका स्थानांत असतो असें जे वर्णन केलें जातें तें प्राधान्यानें समजावें. त्या त्या ठिकाणीं त्या त्या वायूंची पुन: पुन: होणारी प्रवृत्ति आणि कर्माचें साधर्म्य लक्षांत घेऊन वायूचीं स्थानें सांगितलीं जातात. प्राणवायु हा त्याच्या गुणकर्माचस विचार करतां शरीरांतील अत्यंत महत्वाचा घटक आहे. तो शिर आणि हृदय याठिकाणीं प्रामुख्यानें आश्रय करुन राहतो. त्याचा संचार नासा, मुख, नेत्र, कर्ण, कण्ठ, उर या स्थानामध्यें सतत होत असतो. सर्व इंद्रियें, हृदय, मन, धमनी (मज्जधातु घटित संज्ञावाहिनी), बुद्धि, यांचे तो धारण करतो. या सर्व गोष्टींची कार्यक्षमत्सा प्राणवायूच्या प्रकृत स्थितीवर अवलंबून असते. रक्त, शुक्र आणि ओज या धातूंचाहि प्राणास आश्रय असतो. बस्तु गुद या मर्माशींहि प्राणाचा संबंध आहे. शिंकणें, थुंकणें, ढेकर देणें, घांस गिळणें, श्वास घेणें, श्वास टाकणें, रक्ताचे अनुवर्तन, करणें, शरीरामधील प्राणाचें, अग्नीचें, जीवाचें, चैतन्याचे रक्षण करणें हें प्राणवायूचें प्रकृत स्थितींतील कर्म आहे. प्राणवहस्त्रोतसाचा विचार करतां त्यामध्यें फुफ्फुसें ही व्यापकता आणि कार्य या दृष्टीनें हृदयाइतकींच महत्वाचे अवयव आहेत. उरामध्यें विशेषकरुन रहाणारा अवलंबक कफ, स्थूल, सूक्ष्म अशा सर्व संधीच्या आश्रयानें असणारा श्लेषक कफ हाहि प्राणबहस्त्रोतसाशीं संबद्ध असा महत्त्वाचा घटक आहे. उदान हा स्वत:च्या प्रयत्न कर्मानें या क्रियेमध्यें सहभागी होऊन प्राणाच्या गतीचा तोल नियमित राखतो. प्राणवह स्त्रोतसांच्या वर्णनांत कांही पाठभेदाप्रमाणें प्राणवाहिन्यांप्रमाणेंच रसवाहिन्याहि समाविष्ट केल्या गेल्या आहेत. प्राणवहस्त्रोतसाची विकृति व विकृतिहेतु या दृष्टीनें रसाचा या स्त्रोतसाशीं वर्णिलेला संबंध योग्य आहे असेंच म्हणावें लागतें. सारांश, नासा, मुख, कण्ठ, कण्ठनाडी, अपस्तंभ, कफ, रस, रक्त, मांस, स्नायू हे धातु, प्राणवाहिन्या, धमनी, सिरा हे वाहक अवयव, प्राणवहस्त्रोतस् या शब्दानें मर्यादित होणार्‍या क्षेत्रविस्तारामध्यें समाविष्ट होतात. प्राणवहस्त्रोतसाच्या दुष्टीचीं कारणें -

क्षयात्सन्धारणाद्रौक्ष्याद्‍ व्यायामात् क्षुधितस्य च ।
प्राणवाहीनि दुष्यन्ति स्त्रोतांस्यन्यैश्च दारुणै: ॥
च.वि. ५-१८ पान ५२७

स्थानवैगुण्य हें स्त्रोतोदुष्टीचें एक घटकस्वरुप आहे, याचा विचार मागें केलेला आहेच, येथें जीं कारणें सांगितलीं आहेत ती स्त्रोतसांमध्यें वैगुण्य उप्तन्न करणारीं आहेत असें मानावें, प्रत्यक्ष व्याधि उत्पन्न करणार्‍या दोष दुष्टीशीं त्यांचा संबंध न लावतां मानलीं पाहिजेत. हीं कारणें अतियोगानें सतत वा वरचेवर होत राहिलीं तर स्थानवैगुण्य आणि रोगोत्पादक दोषप्रकोप असें दुष्टीचें उभयविध स्वरुपहि त्यामुळें उत्पन्न होणें शक्य आहे. हीं कारणें अतियोगानें सतत वा वरचेवर होत राहिलीं तर स्थानवैगुण्य आणि रोगोत्पादक दोषप्रकोप असें दुष्टीचें उभयविध स्वरुपहि त्यामुळें उत्पन्न होणें शक्य आहे. स्त्रोतोदुष्टीचा हा सामान्य नियम समजावा. प्राणवहस्त्रोतसाशीं संबद्ध असलेल्या रस, रक्त, मांस, शुक्र आणि ओज या धातूंचा क्षय होणें, श्वासोच्छ्‍वास, शिंक, ढेकर यांच्या वेगांचा प्रतिरोध करणें, रुक्षगुणांचीं द्रव्यें सेवन करणें, फार व्यायाम करणें, भूक मारणें वा उपवास करणें (घडणें) या कारणांनीं स्थान वैगुण्य उत्पन्न होऊन प्राणवायु व प्राणवहस्त्रोतसें विकृत होतात.

अतिसृष्टमतिबद्धं कुपितमल्पाल्पमभीक्ष्णं वा सशब्दशूल-
मुच्छ्‍वसन्तं दृष्टवा प्राणवहान्यस्य स्त्रोतांसि प्रदुष्टानीति विद्यात् ।
च.वि.५-९ पान ५२५
तत्र विद्धस्य आक्रोशनविनमनमोहनभ्रमणवेपनानि मरणं वा भवति ॥
सु.शा.९-१२

मुख्यत: श्वासोच्छ्‍वास वेगानें होणें, श्वास घेणें वा सोडणें, अडखळत होणें, श्वास टाकण्याची क्रिया दीर्घ असणें ( विसर्गे दीर्घश्च अ. सं. शा. पृष्ठ. ३३ इंदुटीका) त्यांतील लबबद्धता नाहींशी होणे, श्वासासंबधीची विकृति वरचेवर प्रकट होणे, (श्वास प्रत्येक वेळी थोडासाच घेणे), उर-कण्ठ-नासा याठिकाणी वेगवेगळे शब्द उत्पन्न होणे, निरनिराळ्या वेदना वरील अवयवांत जाणवणें, हा त्रास वरचेवर होणें अशीं लक्षणें होतात. या व्यतिरिक्त सुश्रुतानें सांगितल्याप्रमाणें प्राणवायूच्या विकृतीमुळें प्रतिश्याय, स्वरभेद, कास, श्वास, हिक्का हे विकार उत्पन्न होतात. प्राणवायूच्या कर्माचा विचार करतां पुढील लक्षणें त्याच्या विकृतीची द्योतक मानतां येतील. शिंका फार येणें, मुळींच शिंक न येणें, वरचेवर थुंकावेसें वाटणें, थुंकी न सुटणें, ढेकर नीट न येणें, आवंढा गिळतांना त्रास होणें, कर्णशूल, कर्णस्त्राव, कर्णनाद वा बाधिर्य असणें, डोळे तारवटणें, डोळे थिजल्यासारखे होणें, रुपज्ञान नीट न होणें, बुद्धिद्वारां विषयांचे ग्रहण नीट न होणें, त्यामुळें तंद्रा, मोह मूर्च्छा, हे विकार उत्पन्न होणें, दैन्य, भय, उद्वेग, विषाद, इत्यादि मनोविकृति दिसणें, इंद्रियांना योग्य ती कार्यक्षमता न रहाणें हीं लक्षणें प्राणवायूच्या विकृतींत होतील. त्यांची व्यक्ताव्यक्तता प्राणवहस्त्रोतसांतील दुष्टीच्या न्यूनाधिकतेव अवलंबून असते. ही लक्षणें श्वासादि व्याधींत आनुषंगिक म्हणून उत्पन्न होतात.

प्राणवहस्त्रोतसाची परीक्षा -
प्राणवहस्त्रोतसामध्यें समाविष्ट होणारे जे अवयव - त्यांची परीक्षा प्रथम करावी.
नासा परीक्षा - नाकपुडयांची हालचाल कशी होते तें पहावें. प्रकृत श्वसनक्रियेमध्यें बहुधा नाकपुडया हालत नाहींत. नाकपुडया आंतून सुजल्यासारख्या असणें, नाक चोंदणें, नाकपुडया आंतून लाल असणें, त्यामध्यें ग्रंथी वाढलेल्या असणें, नासिकेचे उभयविध मार्ग हे मधील पटलाच्या विकृतीमुळें वाकडें झालेलें असणें, नाकाच्या शेजारीं गंडभागी न नासामूलाशीं लालाटभागीं शोथ, शूल, स्पर्शाशहत्व, गौरव अशीं लक्षणें असणें, नाकांतून होणारे स्त्राव त्या स्त्रावांचा वर्ण, द्रवता, घनता, पिच्छिलता, सपूयता, दुर्गधी, इ. सर्वगोष्टी पाहाव्यात. धूम्रपान, धूळ, धूम यांचे साहचर्य याची कारणाच्या दृष्टीने चौकशी करावी.

मुखकण्ठ परीक्षा -
लालास्त्राव, मुखशोष, तोंड उघडे राहाणें, गलशुण्डी लांबलेली असणें, गिलायू वृद्ध असणें, घसा आंतून लाल झालेला-सुजलेला-विस्फोटयुक्त असणें, बोलतांना वा आवंढा गिळतांना त्रास होणें, नासारंध्राशीं कण्ठशालूक नांवाच्या ग्रंथी असतात त्या घशामध्यें तर्जनी घालून स्पर्शानें पहाव्यात. धुर्धुरक - नासारोध - मुखश्वास इ. लक्षणें त्यामुळें संभवतात.

उर:परीक्षा -
उर: परीक्षेमध्यें कण्ठ, कण्ठनाडी, अपस्तंभ, हृदय, पार्श्व, पृष्ठ, फुफ्फुसभाग हे अवयव स्पर्शनानें व श्रवणपरीक्षेनें तपासावेत. कफानें झालेल्या स्त्रोतोरोधानें किंवा वायूच्या गतीमध्यें स्त्रोतस् संकोचानें उत्पन्न झालेल्या अवरोधानें किंवा कफसंचितीमुळें नेहमीच्या श्वसनामुळें उत्पन्न होणार्‍या शब्दांपेक्षां निराळे शब्द उरस्थानीं उत्पन्न होतात. स्पर्शनानें वा आकोटन क्रियेनें या अवयवांतील सुषिरता, घनता वा आकृति, स्वस्थ स्थितींत असते त्या प्रमाणें प्रकृत आहे कां विकृत आहे तेंहि निश्चित करावे. हृदयाची परीक्षा विशेष दक्षतेनें करावी. हृदय स्पंदन पावत असतांना विशिष्ट प्रकारचा ध्वनि लयबद्ध रीतीनें उत्पन्न होत असतो. प्रकृत स्थितीमध्यें असलेल्या हृदयाचे परीक्षण वरचेवर करुन वैद्यानें त्याचें ज्ञान करुन घेतलें असतां विकृतीमुळें उत्पन्न होणारे ध्वनींतील या लयबद्धतेतील पालट समजतात. हृदयध्वनि वृद्ध, क्षीण, प्लुत, द्रुत, मंद विषम यांपैकी कोणत्या रीतीनें विकृत झाला आहे तें पहावें. हृदस्पंद योग्यस्थानीं येतो कीं, स्वस्थानापासून दुसरीकडे सरकला आहे तें पहावें. हृदय - द्रव (व्यास) झाला असतां हृदय ध्वनीच्या स्वरुपामध्यें पालट होतो आणि हृद‍स्पंद नेहमींपेक्षां वेगळ्या जागीं प्रतीतीस येतो. [हृदयस्थ कफाचें अवलंबन कार्य विकृत झाल्यामुळें वातकोपानें आशयाचा आकार रुंदावून हृदयद्रव वा व्यास हें लक्षण उत्पन्न होतें.] उरस्थानाशीं जवल असल्यामुळें आमपक्वाशयाचीहि परीक्षा उर:परीक्षेनंतर करावी. महास्त्रोतस् हे प्राणवहस्त्रोतसाचें मूल असल्यामुळें त्यांतील विकृतीचा परिणाम प्राणवहस्त्रोतसावरहि होत असतो. आमपक्वाशामध्यें आध्मान, शूल, स्पर्शासहत्व हीं लक्षणें असल्यास स्पर्शन आकोटनादीनीं त्यांची परीक्षा करावी. आध्मानामुळें श्वास, हृदस्पंद, कास, हिक्का ही प्राणवहस्त्रोतसाश्रित लक्षणें उत्पन्न होऊं शकतात. मलावष्टंभामुळें वायूच्या अनुलोम गतीस अडथळा येऊन, तो प्रतिलोम होतो आणि त्यामुळें प्राणोदानाच्या प्रकृत कर्मामध्यें व्यत्यय येण्याची शक्यता असते. स्पर्शन, प्रश्नपरीक्षेनें तेंहि जाणून घ्यावें. कर्ण, शंख, मन्या, शिर या अवयवांच्या परीक्षेचा प्राणवहस्त्रोतसांतील श्वासकासादि विकृतींशीं क्वचित् संबंध असतो.

N/A

References : N/A
Last Updated : July 21, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP