॥ श्री शंकर ॥
अमृतांशुधरं देवं विभुं मृत्युंजयं शिवम ।
वंदे विनम्रभावेन शश्वल्लोकमहेश्वरम् ॥
समालोच्य च संगृह्य पूर्वाचार्यगिर: शुभा: ।
नूतनो लिख्यते ग्रन्थोऽधुना व्याधिविनिश्चय: ॥
व्याधीचें सामान्य स्वरुप काय, ते कसें उत्पन्न होतात, त्यांचें वर्गीकरण कसें केलें आहे, त्यांचे उत्पत्तिहेतु कोणते, व्याधिज्ञानांची साधनें कोणतीं, व्याधी उत्पन्न करणारी शरीरांतील विकृति काय स्वरुपाची असते, या विकृतिमध्यें कोणकोणते घटक भाग घेतात आणि विकृतेचीं अवस्थान्तरें कशीं कशीं होत जातात; यासंबंधीचें सविस्तर वर्णन आम्ही यापूर्वी साधार व स्वमतपुरस्पर केलें आहे. व्याधींचे वर्गीकरण किती विविध रीतीनें होऊं शकतें तें आपण पूर्वी पाहिलेंच आहे. या वर्गीकरणांपैकीं अधिष्ठान-भेदानें केलेलें वर्गीकरण विशेष महत्त्वाचें मानून, अधिष्ठान जें शरीर त्याची विभागणी स्त्रोतसांचे दृष्टीनें करुन आम्ही रोगांचे वर्गीकरण केलें आहे. आयुर्वेदीय विचारसरणीमध्यें दोषदुष्टीला प्राधान्य आहे हे निर्विवाद असलें तरी वर्गीकरण हें नातिसंक्षेप-विस्तर असणें इष्ट आहे. तीन दोषांत रोगांचें वर्गीकरण करण्यांत फार संक्षेप झाला असतां; म्हणून त्यापेक्षां विस्तृत स्वरुपाचा स्त्रोतसांचा विचार वर्गीकरणास साधन मानला आहे. चिकित्सा व व्याधिव्यवच्छदे या सर्वामध्यें दोषांच्या खालोखाल दूष्यांच्या विचार हाच महत्वाचा असल्यानें व दोष हे सर्व दूष्यांना सारखेच रक्षक वा बाधक असल्यानें दूष्याच्या दृष्टीनें वर्गीकरण करण्यांत दोषांचें महत्व अबाधित राहूनहि त्यांच्या विकृतीची कल्पना वैशिष्ट्यासह येते. व्याधिविनिश्चय आणि व्याधिचिकित्सा या दोन्ही गोष्टींसाठीं हेंच वर्गीकरण व्यवहारत: विशेष उपयोगी असते असा अनुभव असल्यानें स्त्रोतसांच्या दृष्टीनें रोगांचें वर्गीकरण करण्याची कल्पना निश्चित करुन आम्ही या ग्रंथांतील व्याधींची विभागणी केली आहे. वर्गीकरण हा कांही सिद्धान्ताचा व तत्त्वनिष्ठेचा प्रश्न नाहीं. यापेक्षां निराळे व क्वचित् अधिक चांगलेंहि वर्गीकरण असूम शकणार नाहीं असें मुळींच नाहीं. आम्ही केलें आहे त्यापेक्षां दुसरें वर्गीकरण कोणी केलें व त्यामध्यें आमच्या वर्गीकरणामध्यें आहे त्यापेक्षां अधिक सोय झाली असें निश्चित झालें तर त्या वर्गीकरणाचा स्वीकार करण्यास मुळींच अडचण नाहीं; असेंच आमचें मत आहे. केलेल्या वर्गीकरणामध्येंहि अमुक व्याधि अमुक प्रकरणांत न घालतां अमुक प्रकरणांत घातला असतां तर अधिक उचित झालें असतें असेहि म्हणण्यास वाव आहे. आम्हास आमच्या कल्पनेप्रमाणें जी विभागणी त्यांतल्यात्यांत अधिक चांगली वाटली ती येथें केली आहे. आयुर्वेदीय ग्रंथांत विशेषत; चरकानें स्त्रोतसंबंधीचें वर्गीकरण चांगलें केलें आहे. व्याधिविचारामध्यें स्त्रोतसांना एक विशेष महत्त्व आहे; ही कल्पना चरकाचे पुढें निश्चित स्वरुपांत असली पाहिजे; व्याधि सामान्यज व नानात्मज असे दोन प्रकारचे असतात. त्यांतील सामान्यज व्याधींचे वर्गीकरण चरकानें अधिष्ठानभेदानें करावें असेंच दर्शविल्याचें दिसतें. चरकानें मार्गभेदानें सांगितलेला व्याधिविचार आणि सूत्रस्थानाच्या विविधाशीतपीतीय अध्यायामध्यें विविध-धातुदुष्टींच्या आधारानें सांगितलेला व्याधिविचार हा मार्गदर्शक आहे असें आम्हास वाटतें. धातुदुष्टींतील व्याधि हेच स्त्रोतोदुष्टींतील व्याधि होत असें चरकानें म्हटलें आहे
यान्येव हि धातूनां प्रदोषविज्ञानानि, तान्येव यथास्वं प्रदुष्टानां धातुस्त्रोतसाम्॥
च.वि.५-१३ पान ५२६
हें आमच्या वर्गीकरणास आम्ही संपूर्णपणें आधार म्हणून घेतलें आहे. व्याधींचा विचार स्त्रोतसांच्या वर्गीकरणांत करण्याच्या दृष्टीनें आरंभीं स्त्रोतस् म्हणजे काय या संबंधीचीं कल्पना निश्चित होणें महत्त्वाचें आहे. आयुर्वेदीय वाड्मयामध्यें धमनी, सिरा, आणि स्त्रोतस् हे शब्द प्रत्येक ठिकाणीं एका निश्चित अर्थानेंच येतात असें नाहीं.
स्त्रोतांसि सिरा धमन्यो रसायन्यो रसवाहिन्यो नाडय:
पन्थानो मार्गा: शरीरच्छिद्राणि संवृतासंवृतानि स्थानानि
आशया: क्षया निकेताश्चेति शरीरधावत्ववकाशानां लक्ष्यालक्ष्याणां नामानि भवन्ति ।
च.वि.५-१७ पान ५२७
चरकानें तर धमनी, सिरा, स्त्रोतस्, रसायनी, नाडी, पन्थ, मार्ग, शरीरच्छिद्र, संवतासवृंत, स्थान, आशय, क्षय, निकेत, असे सर्व शब्द स्पष्टपणेंच एकमेकांचे पर्याय म्हणून सांगितले आहेत.
मूलात् खादन्तरं देहे प्रसृतं त्वभिवाहि यत् ।
स्त्रोतस्तदिति विज्ञेयं सिराधमनिवर्जितम् ॥
मूलादित्यादि । - मूलात् खादिति हृदयादिच्छिद्रात्, प्रसृतम्
अभिवहनशीलं, यदन्तरम् अवकाश:, तत् स्त्रोतो विज्ञेयम् ॥
सु.शा. ९-१३ सटीक पान ३८७
सुश्रुतानें सिरा व धमनी यांचेपेक्षां स्त्रोतसें वेगळीं आहेत असें स्पष्ट शब्दांत सांगितलें आहे. त्यांचे वर्णनहि त्यानें वेगवेगळ्या अध्यायांत केलें आहे. यावरुन शब्दाच्या अर्थाची व्यापकता सोडून कांहीं निश्चित स्वरुपाची परिभाषा निर्माण करण्याची आवश्यकता त्यावेळीं सुश्रुतास वाटली असें दिसतें. आयुर्वेदीय वाड्मयांतील शारीरवाचक (रचना व क्रिया) संज्ञांच्या आर्यनिश्चितीच्या मार्गांत कांहीं मूलभूत स्वरुपाच्या अडचणी असल्या तरी आयुर्वेदीय विचारसरणीचें स्थान निश्चित ठेवून कांहीं प्रमाणात तरी आपापल्यापुरत्या संज्ञा निश्चित करणें अत्यंत आवश्यक आहे असें आम्हाला वाटतें. या दृष्टीनें शब्दस्पर्शरुपरसगंध यांचें ग्रहण वा आकुंचन - प्रसारण - चलन - वलन स्पंदन या क्रिया करण्यासाठीं वायूचें वहन करणार्या (मज्जमांसधातुघतित) ज्या वातवाहिन्या त्यांस आम्ही धमनी हा शब्द निश्चित केला आहे. ग्रंथामध्यें धमनीं शब्द इतर अर्थानें आला असल्यास आमच्या वरील मताप्रमाणें त्या त्या ठिकाणीं वचनांचा इष्ट तो अर्थ केला आहे. सिरा हा शब्द हृदयांतून बाहेर जाणार्या व हृदयाकडे परत येणार्या रसरक्त वाहिन्यांचा वाचक असें आम्ही गृहीत धरलें आहे. स्त्रोतस् हा शब्द व्यापक आहे. त्यामध्यें वरील धमनी व सिरा यांचा समावेश होतोच पण त्या व्यतिरिक्तहि स्त्रोतसांचें कार्य असतें.
यावन्त: पुरुषे मूर्तिमन्तो भावविशेषा:, तावन्त एवास्मिन्
स्त्रोतसां प्रकारविशेषा: । सर्वे भावा हि पुरुषे नान्तरेण
स्त्रोतांस्याभिनिर्वर्तन्ते क्षयं वाऽप्यभिगच्छति । स्त्रोतांसि
खलु परिणाममापद्यमानानां धातूनामभिवाहिनि भवन्त्यनार्थेन ॥
मूर्तिमन्त -इत्यसर्वगतद्रव्यपरीमाणवन्त:, असर्वगतद्रव्यपरिमाणं
हि मूर्तिरुच्यते । भावविशेषा-इत्युत्पत्तिमन्तो विशेषा:,
अत्र हेतुमाह-सर्व इत्यादि । अभिनिर्वर्त्तन्त - इति सन्तानन्यायेन ।
स्त्रोतांसीत्यादि - खलुशब्दो हेतौ । परिणाममापद्यमानानामिति पूर्वपूर्वरसादिरुपतापरित्यागेनोत्तरोत्तरं
रक्तादिरुपतामापद्यामानानम् । `अयनार्थेन' इति वचनान्नस्थिराणां धातूनामभिवाहीनि भवन्ति स्त्रोतांसि, किंतु
देशान्तरप्रापणेनाभिवाहीनि भवन्ति । एवं मन्यते-रक्तस्य वृद्धि: शोणितरुपया परिणमता रसेन मिलितेन कर्तव्या ।
स च स्थानान्तरस्थस्य रसस्य रुधिरेण समं मेलको न गमनमार्ग स्त्रोत:संज्ञकमन्तरा भवति ।
अयं तावदभिसन्धि: - स्त्रोत: कारणको हि धातूनां प्रायो रक्तादीनामुत्तरधातुपोषकभाग परिणामो भवति ।
तच्चाप्युत्तरधातुपोषणं नान्तरेण स्त्रोतो भवति । यश्च रक्ते न्याय:, स सर्वत्र शारीरे भावे ।
न चान्यस्त्रोतसा चान्यधातुपुष्टि: सम्भवति, सर्वपोष्याणां भिन्नदेशत्वात् । न ह्यभिन्नेन स्त्रोतसा भिन्नदेशवृक्षयो:
सेचनमस्ति । मनस्तु यद्यपि नित्यत्वेन न पोष्यं, तथापि तस्येन्द्रियप्रदेशगमनार्थं स्त्रोतो-स्त्येव ।
तच्च मन:प्रभृतीनामतीन्द्रियाणां कृत्स्नमेव शरीरं स्त्रोतोरुपं वक्ष्यति । दोषाणां तु सर्वशरीररचत्वेन
यथास्थूलस्त्रोतोऽभिधानेऽपि सर्व स्त्रोतांस्येव गमनार्थं वक्ष्यन्ते । सूक्ष्मजिज्ञासायां तु वातादीनामपि प्रधानभूता
धमन्य:सन्त्येव; यदुक्तं सुश्रुते - `तासां वातवाहिन्यो दश सिरा भवन्ति' (सु शा अ ७) इत्यादि ।
न च चरके सुश्रुत इव धमनीसिरान्नोतसां भेदो विवक्षित: ।
सटीक, च. वि. ५-३ पान ५२४
जे अवयव अवकाशयुक्त असे आहेत व ज्यांतून विशिष्ट भावांचें ग्रहण, धारण, परिणमन, वहन, निस्सारण, इत्यादि गोष्टी होतात त्यास स्त्रोतस् म्हणावे असें आम्हास वाटतें. हीं स्त्रोतसें स्थूल वा सूक्ष्म अशीं दोन्ही प्रकारचीं असूं शकतात. त्यांची रचनाहि कार्यानुरुप व स्थानविशेषानुरुप निरनिराळ्या प्रकारचीं असूं शकते. शरीरांतील प्रकृत स्वरुपाच्या क्रिया या स्त्रोतसांच्या अविकृत स्थितींवर अवलंबून असतात, त्या प्रमाणेंच शरीरांत उत्पन्न होणार्या सर्व प्रकारच्या विकृतींनाहि स्त्रोतसांची विकृति ही बहुधा आवश्यक असते. ज्यांना आपण दूष्य असें म्हणतो ते भाव धातु, व तत्संबद्ध स्त्रोतसें यांनींच घडलेले असतात. निरनिराळे अवयवहि कार्यदृष्टीनें या स्वरुपभेदानें त्या त्या स्त्रोतसांत किंवा धातूंत समाविष्ट करतां येतात. स्त्रोतसें तत्त्वत: आकाशीय असली तरी या पोकळीच्या मर्यादा ज्यांनीं घडल्या आहेत त्यांनाच स्थूल मानानें स्त्रोतस् अशीं संज्ञा दिली जाते आणि हे भाव बहुधा मांसभय असतात. क्वचित् अस्थि व मज्जा यांच्या अंशानेंहि स्त्रोतस् बनूं शकते, तसेंच मांसासवें रस, रक्त, मेद हेहि स्त्रोतसांच्या घडणींत उण्याअधिक प्रमाणांत भाग घेतात. सुश्रुताच्या शारीराच्या गर्भव्याकरण या चवथ्या अध्यायांत या संबंधीचें सविस्तर वर्णन आलेलें आहे. मधली पोकळी व ही सूक्ष्म वा स्थूल पोकळी मर्यादित करणारा तिच्या भोंवतीचा मूर्त; दृश्य, क्वचित् सूक्ष्म असा धातूमय भाग यांनीं मिळून स्त्रोतसांची घटना झालेली असते.
तेषां च धात्वादीनां दोषा एव प्रधानं । दोषेभ्य: एव धातूनां
प्रवृत्ति:, तथा च धातुपोषाय रसस्य वहन-पाक-स्नेह-
काठिण्यादि दोषप्रसाद लभ्यमेव ।
अ.सं. सू. १ इंदूटीका पान ४
दोष, धातु, मल या सर्व शारीर द्रव्यामध्यें दोष हेंच प्रधान आहेत. त्यांच्यामुळेंच धातुमलांची प्रवृत्ति (शरीरांतर्गत कर्मे) होते. तसेच धातुपोषण होतांना त्यासाठीं आवश्यक असलेले आहाररसाचें वहन, पचन, स्नेहन, काठिण्यादि गुणोत्पादन अशी कर्मे सुव्यवस्थित रीतीनें होण्यास दोषांच्या प्रसादाची-हितकर प्रमाणांतील कार्यक्षमतेची आवश्यकता अपरिहार्यपणें असते.
रसादिस्थेषु दोषेषु व्याधयस्संभवन्ति ये । तज्जनित्युपचारेण तानाहुर्धृत दाहवत् ।
अ.सं.सू. १ पान ५
या संग्रहाच्या सूत्रावरुन रोगोत्पत्तीतील दोषांचें महत्व किती अनन्यसाधारण आहे तें स्पष्ट होईल. दोषांना हेतू मानून ते रोगापेक्षां वेगळे आहेत असें म्हणण्याची कांहींची पद्धती आहे. परंतु इंदूनें -
``संप्राप्तिवशेन मुख्योक्ति: हेतुत्वेनौपचारिकी ।''
अ.सं.सू.१ इंदू टीका पान ७
असें म्हणून दोषांना हेतू म्हणणें वास्तविक नसून औपचारिक आहे असें स्पष्ट सांगितलें आहे. दोषप्रकोपामुळें स्त्रोतसांच्यामध्यें विकृति उत्पन्न होते. दोषांच्या साक्षात् संमूर्च्छनेंमुळें होणार्या विकृतीला दुष्टी असें म्हणतात. दुष्टीमध्यें दूष्यासवेंच दोषहि समवायसंबंधानें असतात. स्त्रोतसें दुष्ट होण्यासाठीं त्यामध्यें वैगुण्य असावें लागतें; हें वैगुण्य़ पूर्वकालीन दोषप्रकोपांमुळें वा दोषप्रकोपांच्या निमित्तानें झालेल्या धातूंच्या वा स्थानिक अशा पोष्य दोषांच्या वृद्धिक्षयानें उत्पन्न होतें. व्याधींच्या उत्पत्तींमध्यें अशा रीतीनें स्थानामधील या स्त्रोतसांमधील पोष्य दोषांचे आणि धातूंचें वृद्धिक्षयात्मक वैषम्य व तज्जन्य स्थानवैगुण्य हा एक विभाग असून रोगोत्पत्तीचा दुसरा भाग त्याठिकाणीं स्थानसंश्रय करणार्या पोषक दोषांच्या स्वरुपानें पुरा होतो अशा प्रकारें ते दूष्य व हे दोष यांच्या संमूर्च्छनेंतून व्याधि उत्पन्न होतो. स्त्रोतोदुष्टी ही या व्याध्युत्पत्तीचीच एक प्रारंभिक अवस्था असते. चरकानें स्त्रोतसांची संख्या तत्वत: निश्चित केलेली नाही.
अतिबहुत्वात् खलु केचिदपरिसंख्येयानि आचक्षते
स्त्रोतांसि, परिसंख्येयानि पुनरन्ये । तेषां स्त्रोतसां यथा-
स्थूलं कतिचित्प्रकारान्मूलतश्च प्रकोपविज्ञानतश्चानुव्या-
ख्यास्याम:, ये भविष्यन्त्यलमनुक्तार्थज्ञानाय ज्ञानवतां
विज्ञानाय चाज्ञानवताम् ॥
तद्यथा - प्राणोदकान्नरसरुधिरमांसमेदोऽस्थिमज्जशुक्रमूत्रपु-
रीषस्वेदवहानीति, वातपित्तश्लेष्मणां पुन: सर्वशरीरचराणां
सर्वस्त्रोतांस्ययनभूतानि ॥
प्रकोपविज्ञानतश्चेति - यथा प्रकोपो विज्ञायते तथा
व्याख्यास्याम इति योजना । अनुक्तार्थज्ञानायेत्यनुक्तस्त्रोतो-
ज्ञानाय ज्ञानवतामित्यनुक्तार्थज्ञानसमर्थानाम् । ज्ञानवन्तोह्यनेन
लिंड्गेनानुक्तमपि स्त्रोतोऽनमियते । विज्ञानाय चाज्ञानवतामिति
यथोक्तमानज्ञानाय च मन्दबुद्धिनामित्यर्थ: ।
सटीक, च.वि.५,६ पान ५२५
स्त्रोतसांची संख्या लहान मोठी असूं शकते असें सांगून व्यवहाराच्या सोयीसाठीं चरकानें तेरा प्रकारचीं स्त्रोतसें वर्णन केलेलीं आहेत.
(१) प्राणवह
(२) उदकवह
(३) अन्नवह
(४) रसवह
(५) रक्तवह
(६) मांसवह
(७) मेदोवह
(८) अस्थिवह
(९) मज्जवह
(१०) शुक्रवह
(११) स्वेदवह
(१२) मूत्रवह
(१३) पुरीषवह.
या तेरा स्त्रोतसांमध्यें सामान्यत: सर्व शारीररचना व क्रिया यांच्या विभागणीची व्यवस्था लागते. यांत पहिली प्राणादि तीन स्त्रोतसें बाहेरुन शरीरास उपयुक्त असणार्या भावांचे ग्रहण करणारीं अशीं आहेत. स्वेदादि शेवटची तीन शरीरास नको झालेल्या मलरुप द्रव्याचा शरीराबाहेर त्याग व्हावा यासाठीं कार्यकारी होतात आणि रसादि सात धातूंची स्त्रोतसें हीं प्रामुख्यानें स्थिर स्वरुपांत शरीराचें धारण करण्यासाठीं आवश्यक ते व्यापार करणारीं आहेत. वात, पित्त कफ हे सर्व शरीरव्यापाराचे नियंत्रक असल्यानें त्यांच्यासाठीं स्वतंत्र स्त्रोतसाची आवश्यकता नाहीं. त्यांचा संचार आवश्यकतेनुरुप सर्व स्त्रोत्रसांतून होत असतो, व्हावा लागतो. सुश्रुतानें सांगितलेल्या स्त्रोतसांच्या यादींत चरकानें वर्णिलेल्या स्त्रोतसांतील अस्थि, मज्जा व खेदवह स्त्रोतसांचा उल्लेख केलेला नाहीं. त्यानें तेथें दिलेल्या अकरा स्त्रोतसांत आर्तवाचा उल्लेख केला आहे. त्यानें प्रत्येक स्त्रोतस् वर्णितांना तीं दोन असतात असें सांगितले आहे, कांही अवयवांना महत्व देण्याची कल्पना त्यामध्यें असावी. चरकानें दिलेल्या या तेरा स्त्रोतसां व्यतिरिक्त स्तन्यवह, आर्तववह, रजोवह, ओजोवह अशीं कांहीं स्त्रोतसें व्यवहारासाठींहि मानणें इष्ट झालें असतें. यांतील ओजोवहाव्यतिरिक्त इतर स्त्रोतसें स्त्री-विशिष्ट असल्यानें, त्यांचा विचार आमच्या कौमारभृत्यतंत्रामध्यें झाला आहे. प्राणवहस्त्रोतसाची कल्पना चरकाच्या स्तोत्रोविमान अध्यांयातील कल्पनेंपेक्षां थोडी व्यापक मानून आम्ही ओजोवह स्त्रोतस् स्यांत समाविष्ट केलें आहे आणि मनोवहस्त्रोतस् हें मजवह स्त्रोतसांत गृहीत धरलें आहे कारण वैद्यकदृष्टया वायू हा मनाचा नियंता व प्रणेता आहे, त्याची विकृति मज्ज धातूच्या आश्रयानें होते, त्यामुळें मनोविकृतीला शारीरदृष्टया मज्जाविकृतीच अधिष्ठान असते. रोगवर्णनामध्येंहि एका विशिष्ट क्रमाचाच अवलंब सर्वत्र केला आहे. तसेंच ``चिकित्सा संदर्भानें वर्णिलेली लक्षणें वा विकार'' या नांवानें कांही संबंधित लक्षणें वा उपद्रव वर्णन केलें आहेत त्यास कांहीं कारण आहे. तें असे - आयुर्वेदीय ग्रंथांत चिकित्सास्थानांतून निरनिराळे औषधी कल्प सांगत असतांना त्या कल्पाचें कार्यक्षेत्र शेवटीं वेगवेगळ्या व्याधींचा व लक्षणांचा उल्लेख करुन कल्पवर्णनांत सांगितलेलें असते. ज्या रोगावर चिकित्सा म्हणून तो कल्प सांगितलेला असतो, त्या रोगाव्यतिरिक्त व रोगनिदामध्ये उल्लेखिलेल्या लक्षण, अवस्थाभेद, उपद्रव या प्रकारांतहि न वर्णिलेल्या विकारांचा उल्लेख त्या कल्पामध्यें शेवटी झालेला असतो. वरवर विचार करतां थोडेसें अप्रस्तुत वाटावें असें हें वर्णन असतें. आमच्या मतें मात्र मुख्य कल्प च्या रोगाकरितां सांगितलेला असतो त्या रोगाशीं निदान (कारणीभूत) व्याधि), अस्वस्था, उपद्रव, उदर्क या पर्यायोत्पन्नता या प्रकारांनीं संबद्ध असलेल्या विकारांचाच उल्लेख कल्पाच्या कार्य क्षेत्राचें वर्णन करतांना केला जातो.
कासिने छर्दनं दद्यात् (च.वि. १७-१२१) या सूत्रावर टीका लिहितांना कासिन इति हिक्काश्वासयुक्त एक कासी असें म्हणून चक्रदत्तानें वमन या उपचाराचें कार्यक्षेत्र हिक्का, श्वास, या विकारांतील कासापुरतेंच मर्यादित केलें आहे. हें स्पष्टीकरण उपलक्षणात्मक मानून सर्वच कल्पवर्णनामध्यें त्याचा उपयोग करावा असें आम्हास वाटतें. चिकित्सा करतांना कांहीं वेळां आमच्या या मतास अनुकूल असें अनुभव आले आहेत. प्रत्यक्षांत आढळून येणारी व रोगनिदानामध्यें न वर्णिलेली संबंधित विकारांच्या नामोल्लेखांची त्रुटि या प्रकारानें भरुन येते. निदानामध्यें वर्णन न करतां संबंधित विकारांचे हें वर्णन चिकित्सास्थानामध्यें असें दूरान्वयानें केले आहे, त्याचें कारण - आमच्या मतें - हे विकारसंबंध सर्वसाधारण नसून (सर्वत्र, सदैव आढळणारे नसून) प्रकृतिभेदानें वा अवस्थाभेदानें क्वचित् कोठेतरी उप्तन्न होणारे आहेत, हें असावें. कांही वेळां प्रत्यक्षांत त्या त्या व्याधीशीं संबंधित म्हणून कधींहि आढळून न येणारा व दूरान्वयानेंहि व्याधीशीं संबंद्ध आहे असें म्हणता येणार नाहीं अशा स्वरुपाचा विकार कल्यांच्या कार्यक्षेत्राच्या प्रकरणांत सांगितला जातो. परंतु `विकृतौ नियमो नास्ति' या सूत्राप्रमाणें आहे त्या वचनांच्या आधारावर त्यांचा उल्लेख आम्ही त्या त्या रोगाच्या लक्षणसमुच्चय प्रकरणीं करावा असें ठरविलें आहे. क्वचित् ज्या व्याधीवर कल्प सांगितलेला असतो तो व्याधि कार्यक्षेत्र सांगत असतांना उल्लेखिलेल्या विकारांचे लक्षण म्हणूनहि त्या त्या विकारांच्या निदान प्रकरणांत वर्णन केलेला आढळतो. एकदां लक्षण म्हणून असलेला विकार ज्यावेळीं स्वत: व्याधि असेल त्यावेळीं ज्याचें तो लक्षण असूं शकतो अशा व्याधींना स्वत:चे लक्षण वा स्वत:चा उपद्रव म्हणून उत्पन्न करुं शकतो, हें मानणें आयुर्वेद विचारसरणीला धरुनच होईल असे आम्हांस वाटतें. कार्यक्षेत्रांत उल्लेखलेले विकार उत्पन्न होण्यास पुढील कारणें असूं शकतात. मूळ व्याधि गंभीर होऊन धातुगत होतो. तो स्वभावत:च बहुदोषप्रकोपयुक्त असतो. `एक प्रकुपितो दोष: अन्यावधि प्रकोपयेत् ।' असें घडते. किंवा `कश्चिद्धि रोगों रोगस्य हेतूर्भूत्वा प्रशाम्यति, न प्रशाम्यति चाप्यन्य: हेतुत्वं कुरुतेऽ पि च ।' या कृच्छ्रतम व्याधि संकरास कारणीभूत होणार्या संप्राप्तीप्रमाणें जे अनेकप्रकारचे व्याधिसंकर उत्पन्न होतात, तोच प्रकार येथेहि घडतो असें मानावें. एकमेकांना कारणीभूत होणार्या ज्या विकाराचें स्पष्ट वर्णन ग्रंथांतरी केलें आहे, त्यांचीहि कार्यकारणमीमांसा सरळ तर्कयुक्त दृष्टीनें प्रत्येकवेळीं करतां येतेच असें म्हणतां येणार नाहीं. तेथेंहि पर्यायोत्पन्नता वा दूरान्वय पत्करावाच लागतो. मानवी शरीरासंबंधीचें शास्त्र निर्माण करतांना प्रत्यक्षांत आढळून येणार्या सर्व वस्तुस्थितीचा समन्वय साधण्याच्या प्रकारांत हें घडून येणें अस्वाभाविक नाहीं. या संदर्भानें लक्षणें' या मथळ्याखालीं एकप्रकारें परिशिष्टरुप असलेला लक्षणसमुच्चय वा विकारसंग्रह सांगितलेला आहे. विचक्षनानि योग्य वाटेल त्याप्रमाणें त्याचा स्वीकार करावा.