व्याख्या -
श्वासत्वं वेगवदूर्ध्ववातत्वम्
श्वासस्तु भस्त्रिकाध्मानसमवातोर्ध्वगामिता ।
मा.नि.श्वास १५ म, टीका पृष्ठ १४२
भाता जोरानें फुंकला असतां ज्याप्रमाणें उर्ध्वगति वायूचें स्वरुप असतें, त्याप्रमाणें (सशब्द, सावरोध) श्वासोच्छवास होतो. म्हणून या व्याधीस श्वास रोग असें म्हणतात. श्वसनाचा वेग वाढतो.
शारीर
श्वासरोगांतील मुख अधिष्ठान जे उर त्यांतील प्रधान अवयवांचें शारीर श्वास रोग वर्णन करण्यापूर्वी जाणणें आवश्यक आहे. श्वासोच्छवासामध्यें बाहेर जाणें आणि आंत येणें या दोन क्रिया करणारा मुख्य वायू प्राण आहे. उदान हा प्रयत्न करणें व बल देणें यादृष्टीनें श्वासोच्छवास क्रियेस साहाय्यक होतो. ही श्वासोच्छवास क्रिया व बाह्य पोषक प्राणवायूचें येणें-जाणें मुख्यत: ज्या क्षेत्रांत होतें तो अवयव फुफ्फुस होय.
उदानवायोराधार: फुप्फुस: प्रोच्यते बुधै: ।
शा.रं.प्र.५-४३ पृ.५७
शोणितफेन: प्रभव: फुफ्फुस: ।
सु.शा.४-२५ पृ.३५७
फुफ्फुसो हृदयनाडिका लग्न: ।
सु.शा.४-२५ टीका पृ.
तावत्योऽसृग्वहाज्ञेया यकृत्फुफ्फुसहृत्स्वति रक्तेन संप्लुता:
सर्वावस्थैवीतादिभि: सदा ।
आयुर्वेद शारीर पृ.११० शालिहोत्रसंहिता.
प्राणो ह्याभ्यन्तरो नृणां बाह्यप्राणगुणान्वित: ।
धारयत्यविरोधेन शरीरं पाञ्चभौतिकम् ॥
सू.सू. १७-१३, पान ८३
फुफ्फुस हें प्राणवायूचें वहन करणार्या लहान लहान स्त्रोतसांनीं बनलेलें असून रक्ताच्या फेसापासून उत्पन्न झालें असल्यामुळें दिसावयासहि तें फेन पुंजाप्रमाणें दिसतें. रक्तवाही सिच्या द्वारा तें हृदयाशीं जोडलेलें असतें. रक्तासवें अनुवर्तन करणार्या प्राणाचा विनिमय याच ठिकाणीं होतो. बाह्य वायूचें अभ्यंतर वायूमध्यें परिणमन होतें, ती क्रिया हीच. यामुळें श्वासोच्छ्वास क्रियेंतील फुफ्फुस हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. श्वासास कारण असणार्या स्थान वैगुण्याला फुफ्फुसाश्रित प्राणवहस्त्रोतसाची रचना व बल यांची विकृती कारणीभूत होते. सुश्रुताच्या टीकाकारानें सुश्रुताच्या वचनांतील प्राण शब्दाचा अर्थ आम्ही गृहीत धरलेल्या प्राणाच्या अर्थापेक्षा वेगळा केला आहे. प्राण शब्दाच्या अर्थाची व्यापकता लक्षांत घेतां ते योग्य दिसत असलें तरी याठिकाणी प्राणशब्दाचा बाह्यपोषक वायु व त्याच्या परिणमनानें झालेला अभ्यंतरप्राण हाच अर्थ अधिक योग्य आहे असेंच आम्हाला वाटतें. हृदयाशीं फुप्फुसाचा संबंध सांगत असताना सुश्रुत, शारंगधर हे ग्रंथकार फुफ्फुस हे हृदयाच्या डावीकडे असतें असें म्हणतात (सु.शा.४-३१ अष्टांगहृदयाचा टीकाकार अरुणदत्त यानें फुफ्फुस हें हृदयाच्या उजवीकडे असतें. असें वर्णन केलें आहे. (वा.शा. ३-१२ पृ.३८७) या दोन्ही वचनांच्या समन्वयानें फुफ्फुस हे हृदयाच्या दोन्हीकडे जवळ जवळ सर्व उरस्थानाला व्यापून असतें असें म्हटले पाहिजे.
स्वरुप
कामं प्राणहरा रोगा बहवो न तु ते तथा ।
यथा श्वासश्च हिक्का च प्राणानाशु निकृन्तत: ॥
अन्यैरप्युपसृष्टस्य रोगैर्जन्तो: पृथग्विधै: ।
अन्ते संजायते हिक्का श्वासो वा तीव्रवेदन: ॥
च.चि. १७-६, ७; पान १२३३
कफवातात्मकावेतौ पित्तस्थानसमुद्भवौ ।
हृदयस्य रसादीनां धातूनां चोपशोषणौ ॥
तस्मात्साधारणावेतौ मतौ परमदुर्जयौ ।
मिथ्योपचरितौ क्रुद्धौ हता आशीविषाविव ॥
च.चि.१७-८,९; पान १२३३
अनेक रोग प्राणघातक म्हणून प्रसिद्ध असले तरी श्वास हा व्याधि त्वरेनें प्राणघातक होतो. इतर रोगांनीं पीडित असलेल्या रोग्याच्या मरण समयींहि तीव्र स्वरुपाच्या वेदना उत्पन्न करणारा श्वास बहुधा उत्पन्न होतो. हा कफवातात्मक असून याच्या दोष दुष्टीचें मूलस्थान आमाशयांत असते. रसादि धातूंचे व हृदयाचे उपशोषण करणें हे याचें कार्य आहे. हा व्याधि असाध्य असून उपचार करण्यामध्यें चूक झाली तर त्वरित प्रकोप पावतो आणि दृष्टी वा निश्वास यांनीं प्राणघात्क होणार्या तीव्र विषारी सर्पाप्रमाणें मारक ठरतो.
मार्ग मध्यम व अभ्यंतर.
प्रकार
महोर्ध्वाच्छिन्नतमकक्षुद्रभेदैस्तु पञ्चधा ।
भिद्यते स महाव्याधि: श्वास एको विशेषत: ॥
आ.- स महाव्याधि: श्वासत्वेन एक एव सन् विशेषहेतुलिड्गभेदं
प्राप्य महोर्ध्वादिभेदै: पञ्चधा भिद्यते ।
पञ्चस्वपि श्वासत्वं वेगवदूर्ध्ववातत्वम् । उक्तं च तन्त्रान्तरे -
``श्वासस्तु भस्त्रिकाध्मानसप्रवातोर्ध्वगामिता'' - इति ।
संख्येयनिर्देशादेव पञ्चप्रकारे सिद्धे पञ्चवचनं तमकभेदस्य प्रतमकस्याधिक संख्यानिषेधार्थम् ।
तत्रान्तरे पञ्चानामपि दोषोत्कटत्वमुक्तम्, -``वातेन क्षुद्रक: श्लेष्मभूयिष्ठस्तमक: स्मृत: ।
छिन्न: पित्तप्रधान स्यादन्यौ मारुतकोपजौ'' इति ।
मा.नि.श्वास १५, आ. टीकेसह पान १४२
भेदस्त्वनयो: संप्राप्तिभेदाद्वेगक्रियादिना च, न तु कासवद्दोषभेदेन ।
श्वासकासाभ्यां हिक्काया: स्वनतोऽपि भेद: ।
मा.नि. हिक्का श्वास २ म. टीका पृ. १३९
महाश्वास, उर्ध्वश्वास, छिन्नश्वास, तमकश्वास, क्षुद्रश्वास असे श्वासाचें पांच प्रकार आहेत. श्वासाचे हे प्रकार दोषभेदानें पाडले नसून होणारी वेगांची भिन्नता व लक्षणांची तीव्रता लक्षात घेऊन पाडले आहेत. वायूची उर्ध्वगति वेगानें होणें, हे श्वासाचे सामान्यरुप पांचहि प्रकारांना साधारण असें असतें.
हेतू
रजसा धूमवाताभ्यां शीतस्थानाम्बुसेवनात् ॥
व्यायामाद्ग्राम्यधर्माध्वरुक्षान्नविषमाशनात् ॥
आमप्रदोषादानाहाद्रौक्ष्यादत्यपतर्पणात् ।
दौर्बल्यान्मर्मणो घाताद्द्वन्द्वाच्छुद्ध्यतियोगत: ॥
अतीसारज्वरच्छर्दिप्रतिश्यायक्षत्सक्षयात् ।
रक्तपित्तादुदावर्ताद्विसूच्यलसकादपि ॥
पाण्डुरोगाद्विषाच्चैव प्रवर्तेते गदाविमौ ।
(च.पा.) पृथगिति प्रत्येक पञ्चाविधौ ।
रोगसंग्रहे इति अष्टोदरीये ।
अत्र च रजसेत्यादिना प्रायो वातप्रकोपकगणो
विच्छिद्योक्त: प्रवर्तेते गदाविमावित्यन्तेन ।
च.चि. १७-११ ते १३, सटीक, पान १२३३-३४
निष्पावमाषपिण्याकतिलतैलनिषेवणात् ॥
पिष्टशालूकविष्टम्भिविदाहिगुरुभोजनात् ।
जलजानूपपिशितदध्यामक्षीरसेवनात् ॥
अभिष्यन्द्युपचाराच्च श्लेष्मलानां च सेवनात् ।
कण्ठोरस: प्रतीघाताद्विबन्धैश्च पृथग्विधै: ॥
निष्पावेत्यादिना कफकारणतया हिक्काश्वासयो: कफप्रकोपकहेतुगुणोऽभिहित: ।
तदनेन वातजनककफजनकहेतुवेगद्वयविच्छेदपाठेन वातकफयोरत्र स्वहेतुकुपितत्वेन
स्वातन्त्र्यं दर्शयति, नानुबन्धरुपत्वम् ।
च.चि. १७-१४ ते १६ सटीक, पान १२३४
कासवृध्द्या भवेच्छ्वास: पूर्वैर्वा दोषकोपनै: ।
आमातिसारवमथुविषपाण्डुज्वरैरपि ॥
रजोधूमानिलैर्मर्मघातादतिहिमाम्बुना ।
स. कासाधिक्येन श्वासो जायते, इत्येतदस्य प्रधानं निदानम् ।
तथा, पूर्वैर्वा - सर्वरोगनिदानोक्तै:, वातादिदोषकोपनै: -
तिक्तोषणादिभि: । न केवलमेतैर्यावदामातिसारदिभि: ।
आमातिसारेण वमथुना विषेण पाण्डुरोगेण ज्वरेण च ।
स.टीकेसह वा.नि.,४-१ पान ४७२
धूळ, धूर, वावटळी वारा, गारठ्याची जागा, गार पाण्याचें सेवन, व्यायाम, मैथुन, फार चालणें, रुक्षान्न, विषमाशन, आमप्रदोष, रुक्षण, अपतर्पण, दौर्बल्य, मर्मोपघात, गुरु-लघु-शीत-उष्ण-मंद-तीक्ष्ण-मृदु-कठिण-खर-श्लक्ष्ण-विशद-पिच्छिल-स्निग्ध-रुक्ष- अशीं द्रव्यें कधी हीं कधीं ती अशीं अनियमितपणें सेवन करणें, पंचकर्मोक्त शोधन कर्माचा अतियोग होणें,पावटा-उडीद पेंड-तिळाचें तेल पिठुळ पदार्थ-कमल कंद-मलावष्टंभ करणारीं द्रव्यें-पचण्यास जड असे पदार्थ-जलज आनूप प्राण्यांचें मांस-कच्चे दूध (चीक) यांच्या सेवनानें, तसेच अभिष्यंद उत्पन्न करणारे किंवा कफकर असे योग यांच्यामुळें श्वासरोग होतो. अतिसार, ज्वर, छर्दि, प्रतिश्याय, उरक्षत: राजयक्ष्मा, रक्तपित्त, दाह (वा.चि.४-१९) उदावर्त, आनाह, विषूचिका, अलसक, पाण्डुरोग, कास, विष (असात्म्य द्रव्यें) यांचा परिणाम म्हणूनहि (उदर्क) श्वास होतो. श्वासव्याधि उत्पन्न करणार्या कारणामध्यें स्थानवैगुण्य व दोषप्रकोप करणारीं कारणे सामान्यत: वेगळीं सांगता येतील. धूळ, धूर येथपासून सांगितलेली कारणें विशेषत: वातकर असून तीं स्थानवैगुण्य उत्पन्न करण्यास कारणीभूत होतात. उडीदापासून सांगितलेली कारणें विशेषत: कफकर असून ती दोषप्रकोपक होतात. निरनिराळे रोग बहुधा स्थानवैगुण्य उत्पन्न करणारीं अशीं काटेकोर विभागणीं करता येणें शक्य नाहीं. स्थानवैगुण्य मुळांत नसेल तर दोषप्रकोप कारण स्थानवैगुण्य उत्पन्न करण्यास साहाय्यक होईल. उलट स्थानवैगुण्य मुळांतच असल्यास, स्थानवैगुण्य उत्पन्न करणारें नवीन कारण दोष प्रकोप करील.
संप्राप्ति
मारुत: प्राणवाहीनि स्त्रोतांस्याविश्य कुप्यति ।
उर:स्थ: कफमुध्दूय हिक्काश्वासान्करोति स: ॥
घोरान् प्राणोपरोधाय प्राणिनां पञ्च पञ्च च ।
च.चि. १७-१७ पान १२३४
यदा स्त्रोतासि संरुध्य मारुत: कफपूर्वक: ।
विष्वग्वजति संरुद्धस्तदा श्वासान्करोति स: ॥
च.चि.१७-४५, पान १२३७
विहाय प्रकृतिं वायु: प्राणोऽथ कफसंयुत: ।
श्वासयत्यूर्ध्वगो भूत्वा तं श्वासं परिचक्षते ॥
इदानीं श्वाससंप्राप्तिमाह - विहायेत्याहि । प्राणो वायु:, प्रकृतिं
विहाय विगुणो भूत्वेत्यर्थ:, उर्ध्वगो भूत्वा तथा कफसंयुत:
सन् यदा श्वासयति तं बुधा: श्वासं परिचक्षते कथयन्ति ।
प्राणो वायु: कफसंयुत इत्युक्तेऽपि तत्रान्येऽपि दोष: समुच्च्चीयन्ते;
यदुक्तं तन्त्रान्तरे - ``क्षुद्रको वातिक: श्लेष्मभूयिष्ठस्तभक: स्मृत: ।
छिन्न: पित्तप्रधान: स्यादन्यौ मारुतकोपजौ'' इति ।
सु.उ.५१-४ सटीक, पान ७६१
कफोपरुद्धगमन: पवनो विष्वगास्थित: ।
उर:स्थ: कुरुते श्वासमामाशयसमुभ्दवम् ।
वा.नि.४-३, पान ४७२
एते हि कफसंरुद्धगतिप्राणप्रकोपजा: ।
वा.चि. ४-८
मिथ्याहार - विहारानें अग्निमांद्य होऊन प्राणवहस्त्रोतस् विगुण होते. आमाशयामध्यें दोषप्रकोप व आम उत्पन्न होतो. या कफप्रधान दोषानें प्राणवहस्त्रोतसांचा उपरोध झाल्यानें प्राणवायूच्या गमनक्रियेस अडथळा होऊन तो विमार्गग होतो व त्यामुळे सर्व उर:स्थल क्षुब्ध होऊन श्वास उत्पन्न होतो. प्राणवहस्त्रोतसाच्या साहचर्यात उदकवह व अन्नवह स्त्रोतसाचीहि दुष्टि होते. प्रकुपित वात प्राणवहस्त्रोतसांत प्रवेश करतो (आविश्य) प्राणवहस्त्रोसामध्यें राहून प्राणवहस्त्रोतसाला कार्यक्षम ठेवण्यासाठीं मृदुत्व, स्निग्धत्व, स्थिरत्व, हे गुण उत्पन्न करणारा प्रकृतस्थितींतील कफ, वातामुळें स्थानभ्रष्ट होतो. (कफं उदधूय) त्यामुळे स्त्रोतसांचें स्वाभाविक मार्दव नष्ट होतें. वातामुळें उत्पन्न होणारें रौक्ष्य, काठिण्य, संकोच हे गुण स्त्रोतसांच्या ठिकाणीं येतात. या कठिण व संकुचित स्त्रोतसांमध्यें आमाशयांतून येणारा साम कफ मार्गावरोध उत्पन्न करतो (कफपूर्वक: संवृद्ध:). त्यामुळें वायूचें वहन नीट होत नाहीं. तो विमार्गग होतो. अंबरपीयूषाच्या स्वीकाराची क्रियाही नीट होऊं शकत नाहीं. आमाशयांतील क्लेदक कफाची दुष्टी ही श्वासाच्या उत्पत्तीस मूलभूत कारण असल्यामुळें आमाशय हें श्वासाचें उद्भवस्थान होय. क्लेदक कफाचा परिणाम होऊन प्राणवह-स्त्रोतसांतील, विशेषत: उरांतील अवलंबक कफ दुष्ट होऊन त्याठिकाणीं श्वास उत्पन्न होतो म्हणून उर हें श्वासाचें अधिष्ठान होय आणि सर्व प्राणावह स्त्रोतस् हें लक्षणें उत्पन्न होण्याचे क्षेत्र असल्यामुळें तें श्वासाचें संचारक्षेत्र होय. हृदय,कण्ठ, शिर, नासा, महास्त्रोतस् , या अवयवामध्यें श्वासव्याधींत लक्षणें व्यक्त होतात.
वाताधिको भवेत्क्षुद्र: तमकस्तुकफोद्भव: कफवाताधिकश्चैव
संसृष्टच्छिन्नसंज्ञक: श्वासो मारुत: संसृष्टो महानूर्ध्वस्तथा: मता.''
असे प्रकारांचे दोषप्राधान्य प्राचीनांनीं सांगितलें आहे. सु.उ.५१-४ च्या टीकेंत छिन्नवास पित्तप्रधान असतो उल्लेख आहे.
पूर्वरुपें
आनाह: पार्श्वशूलं च पीडनं हृदयस्थ च ।
प्राणस्य च विलोमत्वं श्वासानां पूर्वलक्षणम् ॥
च.चि.१७-२०, पान १२३४
प्राग्रूपं तस्य हृत्पीडा भक्तद्वेषोऽरति: परा ।
आनाह: प्रार्श्वयो: शूलं वैरस्यं वदनस्य च ॥
सु.उ.५१-६, पान ७६१
प्राग्रूपं तस्य हृत्पार्श्वशूलं प्राणविलोमता ॥
आनाह: शंखभेदश्च ।
वा.नि.४-४, पान ४७२
श्वासाच्या पूर्वरुपामध्यें अग्निमांद्य वा आमाशय दुष्टी दर्शविणारी भक्त द्वेष, अरुचि, आनाह अशीं लक्षणें दिसतात. प्राणवहस्त्रोतसाच्या विकृतीची निदर्शक अशीं अरति, व प्राणाची पर्याकुलता दिसते. (श्वास घेतांना व बाहेर टाकतांना अशक्तता वाटणें, किंचित् अवघडल्यासारखे वाटणें). पार्श्वशूल, हृत्पीडा, शंखभेद, घुसमटल्यासारखे वाटणें यामुळें वायूचे विमार्गगमण प्रत्ययास येते. त्या त्या अवस्थेंतील सर्व घटना परिपूर्ण होऊं लागल्या कीं श्वासाचें रुप व्यक्त होतें.
लक्षणें
पूर्वरुपामध्यें उल्लेखिलेली लक्षणेंच ज्यावेळीं पूर्णपूणें व्यक्त होतात, त्यावेळीं त्यांना श्वासाची सामान्य लक्षणें म्हणावींत.
क्षुद्रश्वास
रुक्षायोसोद्भव: कोष्ठे क्षुद्रो वात उदीरयन् ।
क्षुद्रश्वासो न सोऽत्यर्थ दु:खेनाड्गप्रबाधक: ॥
हिनस्ति न स गात्राणि न च दु:खो यथेतरे ।
न च भोजनपानानां निरुणद्ध्युचितां गतिम् ॥
नेन्द्रियाणां व्यथां नापि कांचिदापादयेद्रुजम् ।
चं.चि.१७-६५,६६;पान १२६९
किञ्चिदारभमाणम्य यस्य श्वास: प्रवर्तते ।
निषण्णस्यैति शान्तिश्च च स क्षुद्र इति संज्ञित: ॥
सु.उ.५१-७ पृ.७६१
तत्रायासातिभोजनै: ।
प्रेरित: प्रेरयेत् क्षुद्रं स्वयं संशमनं मरुत् ॥
सटीक वा. नि.४-५ पृ.४७२
स.-तत्र-पञ्चसु श्वासेषु मध्ये, मरुत्-पवन;, आयासातिभोजनै:
क्षुद्राख्यं श्वासं करोति । आयासो व्यायामादिरुप;,
तेन तथाऽतिभोजनेन प्रेरित: प्रकर्षेणेरित उन्मार्गगामीकृत:,
कोपित इत्यर्थ: । किम्भूत श्वासम् ? स्वयं संशमनं,-
चिकित्सां विना किञ्चितकालातिवाहनेन शाम्यतीत्यर्थ:, अचि
रकालावस्थायित्वात् । स्वयं संशमनादल्पबलत्वाच्च क्षुद्रसंज्ञोऽयम् ।
आ.र. - क्षुद्रकलक्षणमाह - तत्रेति । क्षुद्रं - क्षुद्रकश्वासम् ।
स्वयं - औषधं विनैव ।
थोडेसे श्रम, वा थोडेसें अधिक जेवण होतांच वायु प्रकुपित होऊन श्वास उत्पन्न करतो. कांहीं काळ विश्वान्ति घेतली असतां आपोआपच व्याधीचा वेग नाहीसा होतो. या व्याधीमध्यें इतर श्वासाप्रमाणें विशेष पीडा होत नाहीं. इंद्रियांचे व्यापार बाधित होत नाहींत. खाणें, पिणें, गिळणे यांत व्यत्यय येत नाहीं. श्वासाच्या या प्रकाराचें स्वरुप सौम्य असतें. या व्याधीमध्यें स्त्रोतसांना अगदीं अल्पप्रमाणांत वैगुण्य असल्याचे वा वैगुण्य येऊं लागल्याचें लक्षण दिसतें. यामुळें किंचित् श्रम वा भोजन यांनीं उत्पन्न होणारी स्वाभाविक दोष वृद्धिहि स्त्रोतसांना सहन होत नाहीं व लक्षणें उत्पन्न होतात. दोषप्रकोप स्वाभाविक क्रमानेंच उपशय पावणारा असल्यामुळें दोषशमन होताच व्याधीचा वेग नाहींसा होतो. तसेंच स्थानवैगुण्यहि अगदीं अल्प प्रमाणांत असल्यामुळें वेग दीर्घकाल रहात नाहीं.
तमक श्वास
प्रतिलोमं यदा वायु: स्त्रोतांसि प्रतिपद्यते ।
ग्रीवां शिरश्च संगृह्य श्लेष्माणं समुदीर्य च ॥
करोति पीनसं तेन रुद्धो घुर्घुरुकं तथा ।
अतीव तीव्रवेगं च श्वासं प्राणप्रपीडकम् ॥
प्रताम्यत्यतिवेगाच्च कासते सन्निरुध्यते ।
प्रमोहं कासमानश्च स गच्छति मुहुर्मुहु: ॥
श्लेष्मण्यमुच्यमाने तु भृशं भवति दु:खित: ।
तस्यैव च विमोक्षान्ते मुहूर्त लभते सुखम् ।
अथास्योद्ध्वंसते कण्ठ: कृच्छ्रात्शक्नोति भाषितुम् ।
न चापि निद्रां लभते शयान: श्वासपीडित: ॥
पार्श्वे तस्यावगृह्णाति शयानस्य समीरण: ।
आसीनो लभते सौख्यमुष्णं चैवाभिनन्दति ॥
उच्छ्रिताक्षो ललाटेन स्विद्यता भृशमार्तिमान् ।
विशुष्कास्यो मुहु: श्वासो मुहुश्चैवावधम्यते ॥
मेघाम्बुशीतप्राग्वातै: श्लेष्मलैश्चामिवर्धते ।
स याप्यस्तमकश्वास: साध्यो वा स्यान्नवोत्थित: ॥
(च.पा.) प्रतिलोममित्यादिना तमकश्वासमाह ।
श्लेष्माणं समुदीर्य चेत्यनेन सामान्यसंप्राप्त्युक्तस्यापि
श्लेष्मण: पुनरभिधानादिह विशेषेण कारणत्वं दर्शयति ।
घुर्घुरुकमिति कण्ठे घुर्घुरुकशब्दम् । संनिरुध्यते इति ।
निश्चेष्टो भवति । तस्यैव चेति `श्लेष्मणा:' इति शेष: ।
आसीन उपविष्ट: । उच्छ्रिताक्ष इति उच्छूनाक्ष: ।
मुहुश्चैवावधम्यते इति क्षणं क्षणं श्वसनेन वायुनाऽवधम्यते ।
च.चि.१७-५५ ते ६२ सटीक, पान १२३८-३९
म.-तमकश्वासलक्षणमाह-प्रतिलोममित्यादि ।
श्लेष्माणं समुदीर्य चेत्यनेन सामान्यसंप्राप्तिलब्धस्यापि श्लेष्मण:
पुनरभिधानादिह विशेषेण कारणत्वं बोधयति ।
तेन रुद्ध: कफेनावृत: । घुर्घुरकं कण्ठे घर्घुरशब्दम् ।
प्राणप्रपीडकं प्राणाधिष्ठानहृदयस्य पीडकम् ।
प्रताम्यति तमसि प्रविशतीव । सन्निरुध्यते निश्चेष्टो भवतीति चक्र;,
जेज्जटस्तु सन्निरुध्यते श्वास इति शेषमाह । तस्यैवेति श्लेष्मण: ।
सुखं सुखमिव । उद्ध्वंसते कण्डूयते । पार्श्वे इति कर्मपदं, अवगृण्हाति पीडयति ।
उष्णमभिनन्दति वातकफारब्धत्वात् उच्छ्रिताक्ष उच्छूननेत्र: ।
ललाटेनेति उपलक्षणे तृतीया । अवधम्यते गजारुढस्येव सर्वगात्रं चाल्यते ।
मा.नि.श्वासनिदान, म. टीका, पान १४५
श्वासवेगाच्या वेळीं अंधेरी आल्यासारखे होतें म्हणून या प्रकारास तमकश्वास असें नांव आहे. या तमकामध्यें स्त्रोतसें कफानें रुद्ध झाल्यामुळें वायूची गति प्रतिलोम होऊन त्याच्या या प्रतिलोम गतीचे परिणाम लक्षणाच्या रुपानें उर, कष्ठ, शिर या सर्वच अवयवामध्यें व्यक्त होतात. व्याधीचा आरंभ पीनस (प्रतिश्याय), कास अशा पूर्वरुपोत्पन्न व्याधीपासून होतो. पीनस, कास, घशामध्यें घुरघुर असा आवाज होणें हे विकार पुढें लक्षण म्हणूनहि आढळतात. श्वासाचा वेग आला कीं, प्राणवहस्त्रोताचें अधिष्ठान जे हृदय, ते व्याकुल होऊन जीव जातो कीं काय असें वाटतें. रुग्ण कासावीस होतो. मधून मधून खोकल्याच्याहि उबळी येतात. खोकल्यामध्यें कफ सुटला नाहीं तर फारच त्रास होतो. कफ सुटला म्हणजे थोडावेळ बरें वाटतें. घसा सारखा खवखवत रहातो. बोलणें कष्टाचें होतें. निजले असतां पार्श्वपीडन होत असल्यामुळें वायू अधिकच अवरुद्ध होऊन आडवे होतां येत नाहीं. बसून राहिलें असतां बरें वाटतें. उंच तक्क्या, उशा, लोड यावर दोन्ही हात आडवे ठेवून त्यावर डोकें टेकून कशीबशी विश्वान्ति घ्यावी लागते. व्याधि कफवातात्मक असल्यामुळें शेकले वा गरम पाणी प्यायलें म्हणजे बरें वाटतें. श्वास, कास यांचे वेग वरचेवर व तीव्रस्वरुपांत आले असतां वेगकालीं प्रमोह उत्पन्न होऊन कांहीं सुचेनासें होतें. डोळे सुजल्यासारखे होतात. कपाळावर, गळ्यावर, छातीवर घाम येतो. खोकला कोरदा असेल तर अतिशय त्रास होतो. श्वासाच्या वेगकालीं सर्व अंग जणु हिंदकळ्यासारखे होऊन दुखतें. श्वासाचा वेग बहुधा कफकारक आहार विहारानें, थंडीमध्यें वा ढग आले असतां येतो, किंवा आलेला वाढतो. हा व्याधि अगदीं नुकताच सुरुं झाला असेल व रोगी मुळांत सुदृढ प्रकृतीचा असेल तर योग्य उपचारांनीं बरा होण्याची शक्यता असते. व्याधि स्वभावत: याप्य आहे. उपचारांनीं तेवढ्यापुरतें बरें वाटते. तमकश्वास व्याधीमध्यें कारणांच्या व कालाच्यामध्येंहि अनेक प्रकारची विविधता प्रकृतिभेदानुरुप आढळतें. कारण असलेल्या वायूच्या विषमरुपतेचा प्रत्यय या व्याधीइतका इतर व्याधींत क्वचितच येत असेल. तमकश्वासाचे वेग येतात, आलेला वेग कांहीं दिवसापासून कांहीं आठवडे पर्यंत टिकतो. मध्यन्तरी कांहीं दिवस, महिने वा त्याहुनहि अधिक काल सुखाने जातो. या काळांतहि स्थानवैगुण्य असतेंच; पण दोषप्रकोप झालेला नसल्यानें व्याधि प्रकट होत नाहीं.
प्रतमक आणि संतमक
ज्वरमूर्च्छापरीतस्य विद्यात् प्रतमकं तु तम् ।
उदावर्तरजोऽजीर्णाक्लिन्नकायनिरोधज: ॥
तमसा वर्धतेऽत्यर्थ शीतैश्चाशु प्रशाम्यति ।
मज्जतस्तमसीवाऽस्य विद्यात्संतमकं तु तम् ॥
च.चि.१७-६३, ६४, पान १२३९
तमकस्यैव पित्तानुबन्धत्वाज्ज्वरादियोगेन प्रतमकसंज्ञामाहज्वरेत्यादि ।
ज्वरमूर्छाभ्यां परीतो ज्वरमूर्च्छापरीत:, ज्वरेण मूर्छा ज्वरमूर्च्छेति जेज्जट: ।
एतस्यैवापकारणं लक्षणं चाह-उदावर्तेत्यादि । उदावर्तो रोग:, रजो धूलि:,
अजीर्णमामादि, क्लिन्नं विद्ग्धं, काये वेगानां निरोध; कायनिरोध:,
अथवा क्लिन्नकायो वृद्धनर इत्याहु:, निरोधो वेगनिरोध:,
अथवा कुयोगिनां कुम्भकादिरुपवातनिरोध इति जेज्जट: ।
तमसा अन्धकारेण, मानसदोषेण वा अत्यर्थमिति
इतरकारणापेक्षया विशेषण, वातकफारब्धोऽपि पित्तसंबन्धा-
च्छीतैरुपशाम्यतीत्याहु: । संतमक: प्रतमक एवेति ।
अन्ये तु उदावर्तेत्यादिना प्रतमकस्य उपसर्गमाहुरिति जेज्जट: ।
मा.नि.श्वास म. टीका, पान १४६
प्रतमक आणि संतमक असे तमक श्वासाचेच दोन उपप्रकार आहेत. या मध्यें पित्तानुबंध असतो. त्यामुळें तमकश्वासाच्या इतर लक्षणासवेंच ज्वर आणि मूर्च्छा या दोन लक्षणांचे आधिक्य प्रतमकामध्यें आहे. प्रतमकाला उदावर्त, रजोपघात, अजीर्ण, शरीराला क्लिन्न करणारीं कारणें (मलिन, अभिष्यंदी) घडणें, वेगरोध होणें, अति वार्धक्य असणें, योग्याभ्यासांतील प्रमाद घडणें अशीं कारणें विशेषे करुन घडतात, अंधारामुळें (रात्रीच्या वेळीं) वद्य पक्षांत किंवा तम या मानस दोषामुळें जो वाढतो त्यास संतमक असें म्हणतात. अंधारामध्यें जणु आपण बुडून गेलों आहोत असें या प्रकारांत वाटते. शीतोपचारानें वेगाचा उपशम होतो.
महा श्वास
उद्धूयमानवातो य: शब्दवद्दु:खितो नर: ।
उच्चै: श्वसिति संरुद्धो मत्तर्षभ: इवानिशम् ॥
प्रनष्टज्ञानविज्ञानस्तथा विभ्रान्तलोचन: ।
विकृताक्ष्याननो बद्धमूत्रवर्चा विशीर्णवाक् ॥
दीन: प्रश्वसितं चास्य दूराद्विज्ञायते भृशम् ।
महाश्वासोपसृष्ट: स क्षिप्रमेव विपद्यते ॥
च.चि. १७-४६ ते ४८, पान १२३७
महाश्वासलक्षणमाह-उद्धूयमानेत्यादि ।
उद्धूयमानवात इति उत् ऊर्ध्व धूयमानो नीयमानो वातो यस्य स तथा ।
शब्दवत् सशब्दं यथा भवति, उच्चैदीर्घम् संरुद्धो मत्तर्षभ:
इवेति स्वरविशेषज्ञापनार्थमयं दृष्टान्त: । ज्ञानं शास्त्रं, विज्ञानं तदर्थनिश्चय: ।
विभ्रान्तलोचन: चञ्चलनेत्र: । विवृते स्तब्धे अक्ष्यानने यस्य स तथा,
नेत्रस्य विभ्रान्तस्तब्धत्वे कालभेदा दिति जेज्जट: ।
विशीर्णवाक् वक्तुमक्षम:, मन्दवचनो वा ।
दीन: क्लान्तमना: हीनमिति पाठान्तरमयुक्तं, दूराद्विज्ञायते भृशमित्यनुपपत्तेरित्याहु: ।
मा.नि.श्वास, म. टीका पान १४३
वक्ष: समाक्षिपन् बद्धमूत्रवर्चा विशीर्णवाक् ।
शुष्ककण्ठो मुहुर्मुह्यन् कर्णशड्खशिरोतिरुक् ॥
वा.नि.४-१५, पान ४७३,७४
संरुद्ध व संक्षुब्ध झालेला वायु मोठयानें शब्द करीत उधळल्यासारखा होऊन दीर्घकाळ घेत श्वासावाटे बाहेर पडतो. माजलेल्या बैलानें फूत्कार टाकावेत त्याप्रमाणें आवाज करीत रोगी धापा टाकीत असतो. श्वासाचा हा आवाज लांबूनहि स्पष्टपणें ऐकूं येतो. रोगी अत्यंत दु:खित असतो. त्याचे डोळे अस्थिर होतात. दृष्टि विकृत होते. मुद्रा भेसूर दिसूं लागते. रोग्याचा शब्द वा स्वर खोल गेल्यासारखा ओढल्यासारखा, अस्पष्ट, न उमटणारा असा होतो. घसा कोरडा पडतो. कान, शंखभाग, शिर याठिकाणी तीव्र वेदना होतात. छाती भात्यासारखी खालीवर होत रहाते. मलमूत्रप्रवृत्तींचा अवरोध होतो. रोगी मूर्च्छित होतो. त्याची सर्वप्रकारची जाणीव नष्ट होते. महाश्वासाच्या अवस्थेंत रोगी फार वेळ जगत नाहीं.
ऊर्ध्वश्वास
दीर्घ श्वसिति यस्तूर्ध्व न च प्रत्याहरत्यध: ।
श्लेष्मावृतमुखस्त्रोता: क्रुद्धगन्धवहार्दित: ॥
ऊर्ध्वदृष्टिर्विपश्यंश्च विभ्रान्तक्ष इतस्तत: ।
प्रमुह्यन्वेदनार्तश्च शुष्कास्योऽरतिपीडित: ॥
ऊर्ध्वश्वासे प्रकुपिते ह्यध: श्वासो निरुध्यते ।
मुह्यतस्ताम्यतश्चोर्ध्व श्वासस्तस्यैव हन्त्यसून ॥
च.चि.१७-४९ ते ५१ पान १२३७,३८
ऊर्ध्वश्वासलक्षणमाह-ऊर्ध्वमित्यादिना । ऊर्ध्वमिति विशेषपरं,
सर्वश्वासानां तथाविधत्वात् । दीर्घमिति दीर्घकालम् ।
नच प्रत्याहरत्यध इति न श्वासमध:करोति दीर्घकालमित्यर्थ: ।
श्लेष्मावृतमुखस्त्रोता इति श्लेष्मणा आवृतानि मुखं स्त्रोतांसि
च यस्य स तथा । क्रुद्धगन्धवहार्दित: कुपितवातपीडित:
समस्तपाठे तु श्लेष्मावृतमुखस्त्रोतस्त्वेन क्रुद्धो यो गन्धवहस्तेनार्दित: ।
विपश्यंस्तु इतस्तत इति इततस्तो विकृतिं पश्यन् ।
`ऊर्ध्व श्वसिति यो दीर्घ न च प्रत्याहरत्यध:'
इति यदुक्तं तत्र हेतुमाह ऊर्ध्वश्वास इत्यादि ।
निरुध्यत इति हृदय एवातिस्तम्भित: स्यात्; अथवा श्वासो वात:
सोऽधो न वर्तते; ऊर्ध्व श्वास ऊर्ध्वश्वास: ।
ताम्यतो ग्लायतो मुह्यतश्वासन् प्राणान् हन्ति, नान्यथेति ।
मा.नि.श्वास, म.टीका पान १४३-४४
मर्मसु च्छिद्यमानेषु परिदेवी निरुद्धवाक् ॥
वा.नि. ४-१७, पान ४७४
स.- ऊर्ध्वाख्याच्छ्वासात् दीर्घमूर्ध्व श्वसिति ।
ऊर्ध्व श्वासं मुक्त्वा पुनरधो निश्वासवन्न तं श्वासं प्रत्याहरति ।
यथा,-अन्येषु श्वासेषु नर ऊर्ध्व दीर्घ श्वासं मुक्त्वा
पुनरध: प्रत्याहरति-पुनरन्त: प्रवेशियितुं शक्नोति, नैवमस्मिन्न्र्ध्वश्वास इत्यर्थ: ।
वा.नि.४-१७ स. टीका, पान ४७४
ऊर्ध्व श्वासामध्यें श्वास सोडतांना बराच वेळ लागतो. श्वास आंत घेणें फार कष्टाचें होतें. स्त्रोतसें व मुख कफानें आवृत झाल्यामुळें वायु अधिक प्रमाणांत प्रकुपित होऊन विमार्गग होतो व पीडा उत्पन्न करतो. रोग्याचे डोळे फिरतात. दृष्टि तारवटल्यासारखी होऊन वर लागते. तोंड कोरडें पडतें. रोगी कासावीस होतो. मर्मभेद झाल्यासारख्या वेदना होतात. स्वर ओढला जाऊन उमटत नाहीं. रोग्याला ग्लानी येते. तो मूर्छित होतो. रोग्याचें आयुष्य अशा स्थितींत फार वेळ टिकत नाहीं.
छिन्नश्वास
यस्तु श्वसिति विच्छिन्नं सर्वप्राणेन पीडित: ।
न वा श्वसिति दु:खार्तो मर्मच्छेदरुगर्दित: ॥
आनाहस्वेदमूर्च्छार्तो दह्यमानेन बस्तिना ।
विप्लुताक्ष: परिक्षीण: श्वसन् रक्तैकलोचन: ॥
विचेता: परिशुष्कास्यो विवर्ण: प्रलपन् नर: ।
छिन्नश्वासेन विच्छिन्न: स शीघ्रं प्रजहात्यसून ॥
च.चि.१७-५२ ते ५४, पान १२३८
छिन्नश्वासलक्षणमाह -
यस्त्वित्यादि । विच्छिन्न सविच्छेदम ।
सर्वप्राणेन यावब्दलेन ।
न वा श्वसिति श्वासं न लभ्यते ।
मर्मच्छेदरुगर्दित: इति हृदयच्छेददेवनयेव पीडीत: ।
दह्यमानेन बस्तिना उपलक्षित;, एतेन वातस्य पित्तानुबन्धो दर्शित: ।
विप्लुताक्ष: चञ्चलनेत्रोऽश्रुपूर्णचक्षुर्वा । न वा श्वासं लभते ।
रक्तैकलोचनत्वं व्याधिप्रभावात्, दोषात्तु द्वयोरपि स्यात् ।
विचेता उद्विग्नचित्त: । विच्छिन्नो विमोक्षितसन्धि:
पीडित इत्यन्ये, `विहत:' इति पाठान्तरम् ।
मा.नि.श्वास, म. टीका, पान १४४
या प्रकारच्या श्वासामध्यें श्वासवेगाचा लय खण्डित होऊन त्याची गति विषम होते. कांहीं श्वास वेगानें घेतले जातात्स, कांहीं फार सावकाश घेतले जातात, वा मध्यें मुळींच श्वासोच्छ्वास नाहीं अशीं अवस्था अल्पकाळ असते. रोग्याचें सर्व बल जणु नष्ट होतें. मर्मच्छेद झाल्यासारख्या असह्य वेदना होतात. घाम येतो. मूत्राचा अवरोध होतों. बस्तिभागीं आग होतें. रोगी अत्यंत क्षीण (थकून गळाल्यासारखा) होतो मन उद्विग्न होतें. तोंड कोरडे पडतें. कान्ति नष्ट होते. रोगी बडबडतो. डोळे फिरवितो. डोळ्यांना पाणी येतें. बहुधा एक डोळा क्वचित् दोन्ही डोळे रक्ताळतात. या अवस्थेंत रोगी फार वेळ जगत नाहीं. वर उल्लेखिलेल्या तीनहि प्रकारांतील लक्षणें एकमेकामध्यें मिसळलेली आढळतात. त्यामुळें या प्रकारभेदाचा विनिश्चय श्वासवेगाच्या स्वरुपावरच अवलंबून रहातो. प्रकारांना दिलेल्या नांवांतूनच श्वास वेगाचें वैशिष्टय स्पष्ट होतें. स्वतंत्र व्याधि म्हणून ज्या वेळीं या तीन प्रकारापैकीं एखादा प्रकार उत्पन्न होतो तेव्हां तो बहुतांशी ज्वर व गात्रस्तंभ या लक्षणांनीं युक्त असतो. अधिष्ठान विशेषाने शिरोग्रह हें लक्षण विशेषेकरुन असतें. श्वासरोगाचे दोष व बल यांच्यामुळे कांहीं भेद कल्पिले आहेत. बलवान श्वासरोगी असा दुसरा प्रकार. दोषबलांच्या मिश्रणानें आणिकहि भेद संभवतात.
(१) बलवान कफाधिक
(२) दुर्बल वाताधिक
(३) बलवान वाताधिक
(४) दुर्बल कफाधिक.
या सर्व प्रकार-भेदांपैकी चिकित्सेच्या दृष्टीनें रोगी बलवान असणें वा श्वासरोग रोगी बलवान् असणें वा श्वासरोग कफप्रधान असणें हें सोयीचें असतें. या अवस्थेंत उपचार सुलभ व परिणामकारक ठरतात. (च.चि.१७-८८ ते ९०)
लक्षण म्हणून श्वास पुढील रोगांत आढळतो. वात-कफज्वर, सन्निपातज्वर, हृद्रोग, जराकास, राजयक्ष्मा, उर:क्षत:, आध्मान, उदर, पाण्डु, ग्रहणी.
चिकित्सासंदर्भाने लक्षणे व विकार
उदावर्त, आध्मान, (च.चि.१७-८७)
कास,वातज अर्श, ग्रहणी, हृदशूल, पार्श्वशूल (च.चि.१७-१०३)
शोथ,वातज अर्श, ग्रहणी, हृदयशूल, पार्श्वशूल (च.चि.१७-११४)
कास,अर्श, अरोचक, गुल्म, शकृत्भेद, राजयक्ष्मा, स्वरभेद, वैवर्ण्य, अग्निमांद्य (भावप्रकाश श्वासचिकित्सा ५०-४७२)
कास, हिक्का, विषमज्वर, अर्श, ग्रहणी, हृद्रोग, अरुचि, पीनस, गुल्म, प्लीहा, दौर्बल्य, वैवर्ण्य, अग्निमांद्य (वंगसेन, श्वास पृ.२७४)
कास,क्षय, शोष, कण्ठरोग, अर्श, ग्रहणी, पाण्डु, विषमज्वर, वैस्वर्य, पीनस, शोफ, गुल्म, वातबलासक (वंगसेन, श्वास पृ.२७४)
पाण्डु, शोथ, कास, (सु.उ.५१-४३)
उपद्रव
स्वरभेद, कास, हृद्रोग, शोथ, नेत्ररोग (च.चि.१७-१२८)
उदर्क
कास, उरोविकृति, फुफ्फुसशैथिल्य, दुर्गंधयुक्त निष्ठीवन, प्राणवहस्त्रोतसाच्या विकृतीशीं संबद्ध असल्यामुळें स्वरभेद कास व हृद्रोग हे उपद्रव श्वासामध्यें होतात. वायु विमार्गग होऊन हृदयाशीं संबद्ध असलेल्या रसवहस्त्रोतसालाहि जेव्हां विकृत करतो त्यावेळीं श्वासाच्या रसगतावस्थेचा परिणाम म्हणून शोथ उत्पन्न होतो. या उपद्रवाप्रमाणेंच श्वासाच्या चिरकारितेमुळें प्राणवहस्त्रोतस् व उरस्थान यांच्या रचनेमध्यें कांहीं विकृति उत्पन्न होते. ही विकृति बहुधा स्थिर स्वरुपाची असते. वायूच्या विकृतीमुळें प्राणाचें वहन करणार्या स्त्रोतसांना विकृत अशीं अवस्था प्राप्त होते आणि ती वातविकृतीमध्यें उत्पन्न होणार्या `व्यास' या लक्षणानि युक्त असते. स्त्रोतसांना एकदा असें विवृतत्व प्राप्त झाल्यानंतर त्यामध्यें दोषांची संचित होऊन रहाण्याची प्रवृति बळावते. अवयवाच्या दौर्बल्यामुळें संचित दोष बाहेर काढून टाकण्याची क्रिया रहावी तशी कार्यक्षम रहात नाहीं. त्यामुळें संचित दोषांना मलरुपता येऊन दुर्गंधि, पूयसदृश निष्ठीवन यासारखे लक्षण उत्पन्न होते.
साध्यसाध्यता
क्षुद्र: साध्यो मतस्तेषां तमक: कृच्छ्र उच्यते ।
त्रय: श्वासा न सिध्यन्ति तमको दुर्बलस्य च ॥
मा.नि.श्वास ४०, पान १४६
स साध्य उक्तो बलिन: सर्वे चाव्यक्तलक्षणा: ।
च.चि.१७-६७, पान १२४०
न सोऽत्यर्थमिति नात्यर्थ दु:खकर: । न दु:ख इति न दु:खसाध्य: ।
सर्वे चाव्यक्तलक्षणा इत्यनेन साध्यत्वेनोक्तानां महाश्वासादीनां
व्यक्तसर्वलक्षणताव्यतिरिक्तायामेवावस्थायां साध्यतां प्रतिपादयति ।
टीका च. चि. १७-६७, पान १२४०
क्षुद्र श्वास हा साध्य आहे. तमकश्वास कष्टसाध्य वा याप्य आहे. रोग्याचे शरीरबल चांगले असून रोग नुकतांच उत्पन्न झाला असेल तर तमकश्वास बरा होण्याची शक्यता असते. महोर्ध्वच्छिन्न हे तीन श्वास असाध्य आहेत. चरकानें यांना प्राणहर, घोर, आशुकारी (च.चि. १७-६८) अशीं विशेषणें दिलीं आहेत. हे तीन श्वास सर्व लक्षणांनीं संपूर्ण असतांना तर साक्षात् मृत्युरुपच जाणावेत. क्वचित् अल्पक्षणयुक्त असल्यास कष्टसाध्य होण्याची शक्यता असते.
रिष्ट लक्षणें
कासश्वासौ ज्वरच्छर्दितृष्णातीसारशोफिनम् ।
वा.शा. ५-७६, टीका, पान ४२५
ज्वर, छर्दि, तृष्णा, अतिसार, शोथ, हा श्वासामधील रिष्ट लक्षणसमुच्चय आहें.
चिकित्सा सूत्रें
हिक्काश्वासार्दित स्निग्धैरादौ स्वेदैरुपाचरेत् ।
आक्तं लवणतैलेन नाडीप्रस्तरसंकरै: ॥
तैरस्य ग्रथित: श्लेष्मा स्त्रोत:स्वभिविलीयते ।
खानि मार्दवमायान्ति ततो वातानुलोमता ॥
यथाऽद्रिकुञ्जेष्वर्काशुतप्त विष्यन्दते हिमम ।
श्लेष्मा तप्त: स्थिरो देहे स्वेदैर्विष्यन्दते तथा ॥
स्निग्धं ज्ञात्वा ततस्तूर्णं भोजयेत स्निग्धमोदनम् ।
मत्स्यानां शूकराणां वा रसैर्दध्युत्तरेण वा ॥
तत: श्लेष्मानि संवृद्धे वमनं पाययेत्तु तम् ।
पिप्पलीसैन्धवक्षौद्रैर्युक्तं वाताविरोधि यत् ॥
निर्हृते सुखमाप्नोति स कफे दुष्टविग्रहे ।
स्त्रोत:सु च विशुद्धेषु चरत्यविहतोऽनिल: ॥
च.चि. १७,७१ ते ७६ पान १२४०
श्वास रोग्याला प्रथम मीठ व तेल यांनीं अभ्यंग करुन, स्निग्ध द्रव्यांनीं स्वेदन करावें. त्यामुळें ग्रंथील झालेला कफ पातळ होऊन स्त्रोतसांतून सुटतो, स्त्रोतसे मृदु होतात, वाताचे अनुलोमन होतें. स्वेदनानंतर त्यास स्निग्ध पदार्थ खाण्यासाठी देऊन कफाचे उदीरण करावें व वमन द्यावें. स्त्यान, ग्रंथिल, दुष्ट असा कफ या स्वेदन वमनादि उपचारांनीं निघून गेल्यावर स्त्रोतसें मोकळीं स्वच्छ होऊन वायूचें वहन अडथळा न होता होऊं शकते.
लीनश्चेद्दोषशेष: स्याद्धूमैस्तं निर्हरेद्बुध: ।
च.चि.१७-७७ पान १२४१
वमनानंतरहि कांहीं दोषशेष स्त्रोतसामध्यें लीन होऊन राहिले असल्यास धूमपान देऊन त्याचें शमन करावें.
हिक्काश्वासामयी ह्येको बलवान दुर्बलोऽपर: ।
कफाधिकस्तथैवैको रुक्षो बह्वनिलोऽपर: ॥
कफाधिके बलस्थे च वमनं सविरेचनम् ।
कुर्यात् पथ्याशिने धूमलेहादिशमनं तत: ॥
वातिकान्दुर्बलान् बालान् वृद्धांश्चानिलसूदनै: ॥
तर्पयेदेव शमनै:स्नेहयूषरसादिभि: ॥
च.चि.१७-८८ ते ९० पान १२४२
श्वासाचा रोगी बलवान व कफप्रधान असल्यास वमन, विरेचन, धूम, लेह, इत्यादि सर्व उपचार पथ्यकर आहारासह करावेत. रोगी दुर्बल व वातप्रधान असल्यास वातघ्न अशा स्नेह, यूष, रसांनीं संतर्पण करावें, शमनोपचार करावेत, शोधन देऊं नये.
अनुक्लिष्टकफास्विन्नदुर्बलानां विशोधनात् ।
वायुर्लब्धास्पदो मर्म संशोष्याशु हरेदसून ॥
दृढान् बहुफांस्तस्माद्रसैरानूपवारिजै: ।
तृप्तान्विशोधयेत्स्विन्नान्बृंहयेदितरान् भिषक् ॥
च.चि. १७-९१,९२ पान १२४२
कफदोष उत्किष्ट नसतांना, स्वेद न करतां, रोगी दुर्बल असतांना जर शोधनोपचार केले तर वाताचा प्रकोप अधिक होतो. मर्माचा उपघात होऊन प्राणघात होतो. यासाठीं शोधनोपचार करतांना कफाधिक्य, स्नेहन, स्वेदन, उत्क्लिष्टत्व, रोग्याचें बल यांचा विचार करुन शोधन करावें.
कासिने च्छर्दनं दद्यात् स्वरभड्गे च बुद्धिमान् ।
वातश्लेष्महरैर्युक्तं तमके तु विरेचनम् ॥
उदीर्यते भृशतरं मार्गरोधाब्दहज्जलम् ।
यथा तथाऽनिलस्तस्य मार्ग नित्यं विशोधयेत् ॥
च.चि. १७-१२१, १२२, पान १२४५
मार्गामध्यें अडथळा आला असतांना पाणी पात्राच्या बाहेर जाऊन वहाते व ते पाणी अनर्थ उत्पन्न करते त्या प्रमाणेंच मार्गावरोध असतांना प्रकुपित वात पीडाकर होतो. यासाठी वैद्यानें वाताचा मार्ग शुद्ध व मोकळा राहील अशी व्यवस्था नित्य केली पाहिजे. या स्त्रोतसशोधनासाठी स्वरभेद व कास अशीं लक्षणें असतांना वातकफहर द्रव्यांनीं वमन द्यावें. तमकश्वासामध्यें विरेचन द्यावें.
यत्किञ्चित् कफवातघ्नमुष्णं वातानुलोमनम् ।
भेषजं पानमन्नं वा तद्धितं श्वासहिक्किने ॥
वातकृद्वा कफहरं कफकृद्वाऽनिलापहम् ।
कार्य नैकान्तिकं ताभ्यां प्राय: श्रेयोऽनिलापहम् ॥ म्
च.चि.१७-१४७-१४८; पान १२४७
श्वासरोगावर वापरावयाचें औषध, अन्न, पेय हे पदार्थ उष्णवीर्य, उष्णस्पर्श, कफवातघ्न आणि वाताचे अनुलोमन करणारे असावेत. जे द्रव्य कफग्न पण वातवर्धक (कषाय) वा वातघ्न पण कफवर्धक (पिच्छिल) असें असेल तें वापरुं नये. त्यांतल्या त्यांत औषधांत वातघ्न गुण असणें अधिक महत्त्वाचें मानावे.
सर्वेषां बृंहणे ह्यल्प: शक्यश्च प्रायशो भवेत् ।
नात्यर्थ शमनेऽपायो भृशोऽशक्यश्च कर्शने ॥
तस्माच्छुद्धानशुद्धांश्च शमनैर्बृहणैरपि ।
हिक्काश्वासार्दिताञ्जन्तून् प्रायश: समुपाचरेत् ॥
च.चि. १७-१४९, ५०; पान १२४८
चिकित्सेचा सामान्य नियम लक्षांत घेतला तर तो न बृंहयेत लंघनीयां बृह्यास्तु मृदु लंघयेत् । (वा.सु.१४-१५) असा आहे. व्याधि बहुधा आत्मोपन्न असतो. मनुष्यस्वभावाचा विचार करतां संतर्पणोत्थ असतो. त्यामुळें व्याधीवरील मूलभूत चिकित्सा सामान्यपणें लंघन हीच ठरते. बृंहण हे अवस्थाविशेषानें कधींतरी अवलंबावें लागते. परन्तु श्वास रोग्यामध्यें स्त्रोतसें कफानें रुद्ध असली व व्याधि आमाशयोद्भव असल्यामुळें आमपाचनासाठी लंघन देणें योग्य असले तरी प्राणवहस्त्रोतस हें अधिष्ठान, ज्याची विकृति होते तो प्राण या गोष्टी विचारांत घेऊन सामान्य नियमापेक्षां थोडा वेगळा असा चिकित्सेचा विचार येथें सांगितला आहे. करावयास नको अशा स्थितीत जरी श्वास रोग्याला थोडेसे बृंहणोपचार केले गेले तरी त्यापासून होणारा अपाय हा प्रमाणत:अल्प असतो आणि साध्यहि होतो. परन्तु लंघनामध्यें जर चूक झाली तर (थोडासा जरी अतियोग झाला तरी) जो अपाय होईल तो विशेष त्रासदायक आणि बरा करण्यास फार कठीण असा असेल. यासाठीं शमनोपचाराचा मध्यममार्ग श्वास रोगावर उपचार करतांना उत्तम असतो. चूक झालीच तर ती बृंहणांत व्हावी, कर्षणांत होऊं नये. श्वास व्याधीमध्यें वमनासाठी मदन फल व विरेचनासाठी निशोत्तर वापरावे.
औषधे व कल्प
सोमलता, रिंगणी, पिंपळी, यष्टिमधु, तालीसपत्र, दालचिनी, वासा, मन:शिला, धत्तूर, वत्सनाभ, श्वासकुठार, श्लेष्मांतक, चतुर्भुज, समीरपन्नग, मल्लसिंदूर, हेमगर्भ, अभ्रकभस्म, रससिंदूर, दशमूलारिष्ट, द्राक्षांरिष्ट, कनकासव, पंचकोलासव, अशीं द्रव्यें वापरावीत.
पथ्यापथ्य
सूर्यास्तानंतर आहार घेऊं नये. आहार लघु असावा. सौहित्य निर्माण करणारा नसावा. आहार द्रव असणें अधिक चांगले. श्वासामध्ये कफप्राधान्य असेल तर कुलत्थ यूष चांगला उपयोगी पडतो. श्रम, व्यायाम व अनवश्यक हालचाली वर्ज्य कराव्यात. खोलीमध्यें वारा खेळतां राहिल पण अंगावर येणार नाहीं अशीं व्यवस्था असावी. निवासस्थल कोंदट, दमट, धूळ, धूर यानी युक्त असें असूं नये. श्वासाचा वेग नसतांना सापेक्षत: स्वास्थ्य असलेल्या मधील काळांत रोग्याचे स्थानवैगुण्य नाहीसे करण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठीं रसायनोपचार करावेत. च्यवनप्राश, अभ्रक, भस्म, शृंगभस्म, सुवर्ण मालिनी वसंत, लक्ष्मीविलास, बृहद्वात चिंतामणी, त्रैलोक्यचिंतामणी, वर्धनपिप्पली, भल्लातकरसायन ही द्रव्यें उपयोगी पडतात.
व्याधिमुकीचीं लक्षणें -
श्वास वेग नसणें, झोप लागणें, उरस्थलामध्यें हलकेपणा, मोकळेपणा वाटणे श्वासाचा ध्वनि कोणत्याहि प्रकारे अवरुद्ध नसणे, आवाज चांगला होणे, थोडयाशा श्रमानंतरहि दम न लागणे.