लक्षणे - १०६ ते ११०

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


१०६
अंतरीचा भाव अंतरें जाणावा । देव वोळखावा सर्वांघटीं ॥१॥
सर्वांघटीं देव येकलाची पुरे । पुरोनी वावरे वायुचक्रीं ॥२॥
वायुचक्रीं दृश्य सर्वही सांडूनी । हरी निरंजनी येकलाची ॥३॥
येकलाची हरी कोठें पवाडला । दास म्हणे जाला निरंजन ॥४॥

१०७
देव दैत्य बंधु लागला विरोधु । तैसाची संबंधु गोत्रजांसीं ॥१॥
ऐसा हा मत्सर लागलासे पाठीं । देवा तुझी भेटी केवी घडे ॥२॥
ब्राह्मणा यवना लागलासे कळहो । आत्रियां विग्रहो लागलासे ॥३॥
लागलासे कळहो सर्वत्र जीवांसी । नाहिं सज्जनांसी दास म्हणे ॥४॥

१०८
बहुरूपी दिसती बहुरूपें दिसेना । खेळवितो नाना बहुरूपें ॥१॥
खेळ तो मांडिला उणें कांहिं नाहिं । खेळकार पाहीं आलया रे ॥२॥
बोलवी चालवी सोंगसंपादणी । जयाची करणी तो शोधावा ॥३॥
रामदास म्हणे सोंगेची दिसती । खेळत्याचे गती ताची जाणे ॥४॥

१०९
बहुरूप मांडलें यासी नाहिं जोडा । पाहणारा थोडा भूमंडळीं ॥१॥
त्याग करवेना धारणा धरवेना । वृत्ती हे पुरवेना पाहावया ॥२॥
अखंड तमासा पाहाना आमासा । वाउगी वयसा वेचीतसे ॥३॥
रामदास म्हणे सर्वांचे अंतरीं । नित्य निरंतरीं वर्ततसे ॥४॥

११०
समर्थांचें उणें सेवका मरण । तेणें गुणें शीण होत असे ॥१॥
संसारीचें दुःख सांडुनीया आतां । मज तुझी चिंता वाटतसे ॥२॥
पतीतपावन नाम कैसें राहे । कासाविस होये जीव माझा ॥३॥
रामदास म्हणे भलतें करावें । आधीं उद्धरावे सेवकासी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 05, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP