लक्षणे - ५६ ते ६०
समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.
५६
माजा देहे तुज देखतां पडावा । आवडी हे जीवा फार आहे ॥१॥
फार होती परी पुरली पाहातां । चारी देहे आतां हारपले ॥२॥
हारपले माझे सत्य चारी देहे । आतां निःसंदेहे देहातीत ॥३॥
देहातीत जाले देहा देखतांची । चिंतीलें आतांसी सिद्ध जालें ॥४॥
सिद्ध जालें माझें मनीचें कल्पीलें । दास म्हणे आले प्रत्ययासी ॥५॥
५७
उतावेळ चित्त भेटीचें आरत । पुरवीं मनोरथ मायबापा ॥१॥
रात्रंदिवस जीव लागलास झासा । उच्चाट मानसा वाटतसे ॥२॥
पराधीन जीणें काये करूं रामा । नेईं निजधामा माहियेरा ॥३॥
तुजवीण रामा मज कोण आहे । विचारूनी पाहे मायबाप ॥४॥
रामी रामदास बहु निर्बुजला । मीतूपणा ठेला बोळउनी ॥५॥
५८
राघवाचें घरीं सदा निरूपण । श्रवण मनन निजध्यास ॥१॥
निजध्यासें सत्य प्रचीत बाणली । साक्षात्कारें जाली सायुज्यता ॥२॥
स्वायुज्यता मुक्ती विवेकें पाहावी । अंतरीं राहावी विचारणा ॥३॥
विचारणा सारासार थोर आहे । अनुभवें पाहें साधका रें ॥४॥
साधका रें साध्य तूंची तूं आहेसी । रामी रामदासीं समाधान ॥५॥
५९
ज्ञाता ज्ञान ज्ञेये ध्याता ध्यान ध्येये । बोधें साध्य होये साधक तो ॥१॥
साधकु तो वस्तु होउनी राहिला । दृश्य द्रष्टा गेला हारपोनी ॥२॥
हारपोनी गेलें कार्य तें कारण । ठाकलें मरण येणें जाणें ॥३॥
येणें जाणें गेलें निरूपणासरिसें । ब्रह्म निजध्यास ब्रह्मरूप ॥४॥
ब्रह्म रूपातीत अच्युत अनंत । दास म्हणे संतसंग धरा ॥५॥
६०
राजा सांडूनीया प्रजांचा सेवक । त्यासी कोणी येक रागिजेल ॥१॥
रागेजेना कोण्ही राव वोळगतां । तैसें भगवंता वोळगावें ॥२॥
वोळगावें भावें देवा निर्गुणा । भजतां गुणासी नाश आहे ॥३॥
नाश आहे गुणा पाहावें निर्गुणा । योगियांच्या खुणा वोळखाव्या ॥४॥
वोळखतां खूण श्रवण मननें । आत्मनिवेदनें दास म्हणे ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : November 05, 2017
TOP